विमान घसरले
अनेक देश प्रगती करतात तसा नायजेरियाही प्रगती करतोय, पण मध्यंतरी एक काळ असा होता, कि तिथे
प्रगती उलट्या दिशेने होत होती. चालू असणारे उपक्रम बंद पाडण्यात त्यांचा हातखंडा आहे असे गमतीने म्हणत असत. एकेकाळी उत्तम चाललेली रेल्वे त्यांनी बंद पाडली. ( मी ऑफिसला जाताना मला रेल्वेचे रुळ पार करावे लागत. २ वर्षांत फक्त एकदाच मला इंजिनाचा आवाज आला आणि इंजिन चालताना दिसले. एरवी त्या रुळावर बाजार भरत असे. )
तसेच त्यांच्या विमानकंपनीचे देखील. नायजेरियन विमानकंपनी ८० च्या दशकात जोरात होती. पण पुढे ती भ्रष्टाचाराने पोखरली आणि शेवटी बंद पडली. एका विमानामागे कमीत कमी कर्मचारी ठेवले वा राखले तरच ती कंपनी फायद्यात चालते. हे तत्व तिथे पाळले नाहीच शिवाय विमानांची देखभालही नीट झाली नाही.
बंद पडण्यापुर्वी, लेगॉस ते लंडन अशी नियमित सेवा होती. तशी ती बरी चालली होती. पण व्हायचे काय, कि ती विमाने लंडनला जाऊन बिघडायची. तिथे दुरुस्तीला वेळ लागायचा. तर असे दुरुस्तीचे आणि ग्राऊंड रेंटचे बिल खुप थकले. अनेकदा विचारूनही ती बिले भागवली गेली नाहीत. अगदी अखेरचा उपाय म्हणून यू के एअरपोर्ट अथॉरिटीज ने नायजेरियन विमानांना लंडनला उतरण्यास मनाई केली.
बंदी असताना विमान तिथे नेणे शक्यच नव्हते. पण मग गप्प बसतील ते नायजेरियन कसले ? त्यांनी देखील ब्रिटीश विमानांना लेगॉसमधे उतरण्यास मनाई केली ? आता झाली कि नाही फिट्टंफाट ?
पण एक राहून गेले. मनाई केलीय ते ब्रिटीश एअरवेजला कळवायचेच राहिले. तोपर्यंत ब्रिटीश एअरवेजचे एक विमान ऑलरेडी लेगॉसकडे निघाले होते. ते लेगॉसवर घिरट्या घालू लागल्यावर त्यांना ही मनाई कळवण्यात आली.
आणि ते तसे ऐकणार नाहीत असे वाटल्याने, लेगॉस विमानतळावरचे सर्व लाईटस बंद करण्यात आले, अगदी रनवे वरचेही.
ब्रिटीश एअरवेजने नाईलाजाने विमान जवळच असलेल्या अक्रा कडे वळवले. तिथे स्विस एअरचे एक विमान उभेच होते आणि ते लेगॉसकडे निघणार होते. ( त्या काळी अनेक विमाने एकाच ट्रिपमधे अक्रा. लेगॉस करत असत. ) ब्रिटीश एअरवेजने आपले प्रवासी लेगॉसला न्यायची विनंति केली आणि ते प्रवासी स्विस एअर मधे बसले.
ते विमान लेगॉसकडे निघाले. या प्रवासाला अर्धा पाउण तासच लागतो. पण तेवढ्या वेळात नायजेरियाला हि बातमी मिळाली. त्यांनी काय केले तर एअरपोर्टवरचे दिवे चालूच केले नाहीत. स्विस एअरने अनेकवेळा विनंति केली, पण ते बधले नाहीत.
स्विस एअरचा नाईलाज होता. त्या विमानातले इंधन संपत आले होते. त्याने तशी सुचना देत अंदाजानेच विमान उतरवले. ( १९९७ ची घटना आहे ही ) लाईट्स चालू केलेच नव्हते रनवेवरचे. त्याचा अंदाज थोडक्यासाठी चुकला आणि विमान थोडे घसरले. एक टायर बदलण्याची गरज होती. . तो अर्थातच नायजेरियात उपलब्ध नव्हता. मग दुसर्या दिवशी झुरिकहून विमानाने तो आणला गेला.
ते विमान उतरल्यावर मात्र सर्व ती मदत करण्यात आली. ब्रिटिश एअरवेजची सेवाही सुरु झाली. नायजेरियन विमाने मात्र बराच काळ लेगॉसच्या विमानतळावर पडून होती.
विमान बुडाले.
मी गेल्या भागात लिहिल्याप्रमाणे लोकल विमानसेवा धोकादायक आणि बिनभरवश्याची होती. आमच्याकडे संपर्काची साधनेही नसत. एकमेव साधन म्हणजे वायरलेस रेडीओ. तोही आमच्या कंपनीच्या साइट्सवरच चालणार. त्या रेडीओवर बोलणे आणि ते ऐकू येणे म्हणजे दुर्लभ योग असायचा.
तर एका शनिवारी आमच्या पोर्ट हारकोर्ट मधून एक माणूस निघाला. एरवी तो पोहोचला कि नाही याची चौकशी
करायची पद्धत नव्हती ( कारण तशी सोयच नव्हती ) पण त्या दिवशी नेमके त्याच्यासोबत एक महत्वाचे पत्र पाठवले होते. ते मिळाले का, असे विचारले रेडीओवर. तर तो माणूस अजून पोहोचलाच नाही असे कळले.
लोकल विमान वाटेतल्या कुठल्याही एअरस्ट्रीपवर उतरले असेल असे वाटल्याने कुणी सिरियसली घेतले नाही. दुसर्या दिवशी सकाळी ते विमान लेगॉसला पोहोचलेच नाही, असा निरोप आला. पण तेवढ्यात तो माणूसही परत आला, कारण त्याचे विमानच चुकले होते. ( रात्रभर "सासुरवाडीला" राहिला होता. )
ते विमान वाटेतच गायब झाले होते. शोधकार्य सुरु झाले होते, प्ण दुसर्या दिवशी संध्याकाळापर्यंत पत्ता लागला नव्हता.
नायजेरियाच्या दक्षिण भागात अनेक दलदलीच्या जागा आहेत, तिथे रस्ते वगैरे नाहीत, वस्तीही तुरळकच आहे. ( नायजेरियात अगदी दुर्गम भागात वस्ती आहे. आफ्रिकेतला सर्वात जास्त घनदाट लोकसंख्या असलेला देश आहे तो. ) मी ऑफ शोअर साइट्सना भेटी द्यायचो तर वाटेत् छोट्याश्या बेटांवर पण घर दिसायचे. ते राहतात कसे, खातात काय ? असा प्र्श्नच पडायचा.
तर दुर्दैवाने ते विमान अश्याच एका दलदलीत कोसळले होते. आणि दलदलीत पार रुतूनही गेले होते. योगायोगाने तिथल्या एका माणसाने ते कोसळताना बघितले होते. पण त्याने आयूष्यात कधी जवळून विमानच बघितलेले नसल्याने तो घाबरला. रात्रभर घरात लपून राहिला. दुसर्या दिवशी दुपारी त्याने धावायला सुरवात केली तर तर संध्याकाळी एका गावात पोहोचला. त्याने काहितरी भयंकर बघितल्याचे कसेबसे सांगितले.
मग ती बातमी लेगॉसला पोहोचली आणि नव्याने शोधकार्य सुरु झाले होते. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.
त्यानंतर आमच्या कंपनीने कधी आम्हाला त्या विमानाने पाठवले नाही. आम्ही एअरो कॉन्ट्रॅक्टर च्या चार्टर्ड विमानाने येत असू. ती विमाने नवी होती. पण त्यांचा वेगळा विमानतळ नव्हता. एका एअरस्ट्रीपवर ती उतरत असत.
विमानतळ म्हणून फक्त एक टपरी होती.
ती उभी पण अश्या जागी रहात कि चिखल तुडवत जावे लागे. तिची तिकिटे आधीच गठ्ठ्याने विकत घ्यावी लागत आणि जायच्या दिवशी तिथे गेल्यावर जर सिट उपलब्ध असेल तर मिळत असे.
तरी माझ्या शेवटच्या दिवशी मला ते विमान चुकलेच. म्हणजे सिट नव्हती असे नाही तर इंधनच नसल्याने ते उडलेच नाही. पण त्यामूळे मला एक वेगळाच अनुभव मिळाला.
विमान उडाले.
माझा शेवट्चा दिवस होता. संध्याकाळचे स्विस एअरचे विमान पकडायचे होते. मी ५ दिवस झुरिक मधे राहणार होतो. सर्व बूकिंग झाले होते, पण माझे सकाळचे विमान चुकले.
माझा ड्रायव्हर इझे माझ्यासोबत होता. मला निरोप द्यायचा म्हणून रडवेला झाला होता. या इझेने माझ्यावर खुप माया केली. दिसायला आणि स्वभावानेही तो नायजेरियन नव्हता. अगदी नम्रे , वक्तशीर होता. दिलेला शब्द हमखास पाळत असे.
एकदा कम्यूनिटी प्रॉब्लेम मधे त्याने मला ढाल बनवून वाचवले होते. कम्यूनिटी प्रॉब्लेम हा खास नायजेरियाचा प्रॉब्लेम आहे. एखादा कारखाना ज्या भागात असतो, त्या भागात प्राबल्य असणारी एखादी टोळी हा प्रसंग घडवून आणते. एका दिवशी कुठलिही पूर्वसुचना न देता ती टोळी कारखान्यात घुसते. सिक्यूरिटी गार्ड्सना त्यांनी आधीच फितवलेले असते. सर्वांना ऑफिसबाहेर काढून ते फक्त मुख्य अधिकार्याशी बोलतात. कंपनीचा पर्सोनेल अधिकारी यात भाग घेऊ शकतो.
नायजेरियन कायद्याप्रमाणे हा अधिकारी नायजेरियनच असावा लागतो. आणि खुपदा तोदेखील यात सामिल असतो. तर या वाटाघाटीत त्या टोळीतल्या लोकांना नोकर्यात प्राधान्य देण्यापासून गावजेवण घालण्यापर्यंत काहिही आणि कितीही मागण्या होऊ शकतात. या वाटाघाटी होईस्तो, सर्व कर्मचार्यांना अडकवून ठेवलेले असते. त्यांना बाहेर जाता ये नाही. ( संपर्काची साधनेच नसल्याने बाहेरुन मदत मागवताह येत नसे. )
टोळीतले सिनियर लोक्स वाटाघाटी करत असतात तर ज्यूनियर लोक, बाहेर अडकवलेल्या कर्मचार्यांवर दमदाटी करत असतात.
आमच्या कंपनीतल्या अशा एका प्रसंगात, इझे माझ्या आजूबाजूला घुटमळत होता. खरे तर त्याला अडवलेले नव्हते. मी त्याला माझ्यासाठी बाहेरुन काहितरी आणायला पाठवले. त्याला पैसे देऊन बाकिचे पैसे मी माझ्या शर्टाच्या खिशात ठेवले. ते बघून एक टोळिवाला माझ्याकडे आला आणि खिश्यातले पैसे जबरदस्तीने काढून घेऊ लागला. मी विरोध करायच्या आधीच इझे धावून आला आणि त्याच्यावर ओरडला, माझ्या ओगाला हात लावलास तर तूला जिवंत ठेवणार नाही.
तो टोळीवाला वरमून मागे हटला. इझेचे हे रुप मी त्यापूर्वी कधी बघितलेच नव्हते, आणि नंतरही नाही.
तर माझे फ्लाईट चुकल्यावर, इझे म्हणाला रहा आणखी २/४ दिवस. पण माझे झुरिकचे बूकिंग फुकट गेले असते. लेगॉसचा विमानतळ गाठणे भाग होते.
दुसरे एखादे लोकल विमान मिळाले असते पण माझी कंपनी त्यासाठी तयार झाली नसती. आता एकमेव पर्याय म्हणजे, रस्त्याने जाणे.
त्या काळात गुगल वगैरे नव्हते. मूळात रस्ता आहे का ? तो धड आहे का ? हेच कुणाला माहीत नव्हते. दोनचार साइटसवर रेडीओवर बोलून रस्ता आहे पण तो मधेमधे खराब आहे आणि काही भाग घनदाट जंगलातून जात असल्याने, धोकादायक आहे, असे समजले.
मी इझेकडे अपेक्षेने बघितले. त्याला काय वाटले कुणास ठाऊक, म्हणाला, मी येतो. पण काही अटींवर. इझे पैसे मागेल याची शक्यताच नव्हती. तो म्हणाला वाटेत कुठेही थांबायचे नाही, खिडकिची काच खाली करायची नाही, दरवाजा उघडायचा नाही. काय खायचे प्यायचे ते आताच घे. वाटेत काहि मिळणार नाही.
मी बॅगा ठेवल्या, आणि नेहमीप्रमाणे पुढच्या सिटवर बसायला गेलो. त्यालाही इझेने मनाई केली. म्हणाला मागे, तेही त्याच्या मागे बसायचे. समोरून मी दिसता कामा नये.
एवढ्या सगळ्या अटी ऐकून थोडे दडपण आलेच होते. आमचा प्रवास सुरु झाला खरा. पण इझे नेहमीप्रमाणे गप्पा मारत नव्हता. कदाचित त्याच्याही मनावर ताण आला असेल.
वारी गावापर्यंत रस्ता त्याला माहित होता, पण त्यापुढे तोही कधी गेला नव्हता. पुढचा रस्ता अत्यंत घनदाट जंगलातून जात होता. समोरून एखादा ट्रेलर वगैरे दिसत असे. पण गाडी एकही नाही.
काही ठिकाणी रस्त्या एवढा अरुंद गोता, कि रस्त्याच्या कडेची माजलेली लाजाळूची झाडे गाडीच्या काचेला लागत होती. ( तिथे लाजाळूचे असेच रान माजलेले असते. ) काही ठिकाणी डोक्यावर एवढी दाटी होती कि भर दिवसा अंधार झाल्यासारखे वाटत होते. म्हणण्यासारखे एकच मोठे गाव लागले ते म्हणजे बेनिन सिटी ( बेनिन नावाचा देशही आहे. तो वेगळा )
तिथे थोडीफार माणसे दिसली. एक कॉलेजही लागले ( त्या कॉलेजचा युनिफॉर्म , गुलाबी पॅंट आणि जांभळा शर्ट असा होता. असे रंग काळ्यांना शोभतातही ) पण तरीही इझेने गाडी अजिबात स्लो वगैरे केली नाही. गाडीकडे काहि मुले रोखुनही बघत होती. ( नायजेरियात गाड्यांच्या नंबरप्लेटवर राज्याचे नाव लिहिलेले असे )
आणखी एका गावात तर बाजारही लागला. तिथे एका विक्रेत्याने पिवळा अजगर हातात धरुन गाडीजवळ आणला. ( नायजेरियात पिवळा अजगर खातात. ) जंगलात काही ठिकाणी मोठ्या नद्याही लागल्या. सुदैवाने त्यांच्यावरचे पूल शाबूत होते. एरवी हा प्रवास मी खुप एंजॉय केला असता.
आम्हाला जवळजवळ ८ तास लागले या प्रवासाला. लेगॉस जवळ आल्यावर रस्त्यावर रहदारी वाढली. मी वेळेवर एअरपोर्टवर पोहोचलो.
इझेला माझा निरोप घेणे अवघड झाले. तो झटक्याने निघून गेला. खरं तर त्यानेही काही खाल्ले नसणार. एवढ्या रात्री त्या रस्त्यावरूनच परत जाणार होता. दिवसा एवढा धोकादायक असणारा रस्ता रात्री सुरक्षित कसा असेल ?
माझे विमान उडेपर्यंत हेच विचार माझ्या डोक्यात होते. पुढे इझेशी कधी संपर्क झाला नाही.
भन्नाट अनुभव आहेत एकेक. एक
भन्नाट अनुभव आहेत एकेक.
एक मस्तं पुस्तक होईल यांचं!
छान
छान
शीर्षकाने फसवले.. एकच विमान
शीर्षकाने फसवले.. एकच विमान आधी घसरले, मग घसरत जाऊन बुडाले, आणि अचानक पाण्यातूनच उसळी मारत उडाले असे काहीसे वाटलेले
पण छान चालूय लेखमाला, बरेच नवीन आणि ईंटरेस्टींग गोष्टी समजत आहेत..
मस्तच ! साती > +१
मस्तच !
साती > +१
दिनेशदा, तो ब्रिटीश एअरवेज
दिनेशदा, तो ब्रिटीश एअरवेज आणि स्वीस एअरचा किस्सा वाचल्यावर काहीच सुचत नाही. एखाद्या देशातील सरकार एवढे निष्ठुर वागु शकते की प्रवाशांच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग यावा विश्वासच बसत नाही.
तुमचे कामाच्या ठिकाणाचा आणि रस्ते प्रवासाचा अनुभव वाचुन तर अंगावर सर्रकन काटा आला. नायजेरियात तुम्ही किती वर्ष काढलीत ते माहित नाही पण मी तर पहिल्याच दिवशी गळपटलो असतो. इझेला त्यानंतर भेटता आले नाही हे फार वाईट झाले. त्याची रूखरूख तुमच्या संवेदनशील मनाला नक्कीच लागुन राहिली असेल.
जबरदस्त दिनेशदा.........
जबरदस्त दिनेशदा......... असे वाटते की नॅशनल जिऑग्राफि वरची
ऐखादी सिरीज पाहत आहे ..मस्त
तर दुर्दैवाने ते विमान अश्याच
तर दुर्दैवाने ते विमान अश्याच एका दलदलीत कोसळले होते. आणि दलदलीत पार रुतूनही गेले होते. योगायोगाने तिथल्या एका माणसाने ते कोसळताना बघितले होते. पण त्याने आयूष्यात कधी जवळून विमानच बघितलेले नसल्याने तो घाबरला. रात्रभर घरात लपून राहिला. दुसर्या दिवशी दुपारी त्याने धावायला सुरवात केली तर तर संध्याकाळी एका गावात पोहोचला. त्याने काहितरी भयंकर बघितल्याचे कसेबसे सांगितले.>>>>>:हाहा: मला जाम हसू आले. काय सुरस अनूभव आहेत एकेक.
बाप्रे!............
बाप्रे!............ कल्पनेच्या पलिकडचे आहेत हे अनुभव!! इझेबद्दल वाचून.................... नाही सांगता येत शब्दात!
पण एक गोष्ट खूप जाणवतेय. ती म्हणजे हे असे अनुभव तुम्ही खूप पॉझिटिव्हली घेतलेत!
सोविएट च्या समर कथांइतके सुरस
सोविएट च्या समर कथांइतके सुरस आहेत तुझे लेख.. किती वेगळा प्रदेश, माणसं..
कधी काटे येताहेत वाचताना. तर कधी गम्मत वाटून हसू फुटतंय... खरंच पुस्तकच होईल तुझ्या अनुभवांवर..
भन्नाट इझोची काळजी लागून
भन्नाट इझोची काळजी लागून राहिली आहे फार
तुम्ही अश्या सुटून गेलेल्या माणसांना ज्यांचा तुम्ही उल्लेख केला आहे आजवर जशी ती भारतीय स्त्री जिला दिल्लीला पत्र पाठवायचे होते ती ..तश्याना पुन्हा भेटण्याचा आवर्जून प्रयत्न करून पहाल का प्लीज
त्यांना आमचे आभार कळवा आम्हाला त्यांची खुशाली !!
धन्यवाद दिनेशदा
खरंच पुस्तकच होईल तुझ्या अनुभवांवर..<+१००००००००००००००.............
दिनेश काय थरारक आहेत एकेक
दिनेश काय थरारक आहेत एकेक प्रकार. धन्य आहेस बाबा, सगळीकडे असलं मस्त मॅनेज करतोस ते! तु पुस्तक खरंच लिही. अगदी मनावर घेच!
बाप रे! सगळे अनुभव विचित्र
बाप रे! सगळे अनुभव विचित्र कथा ह्या शीर्षकाखाली अगदी फिट बसतात! दिनेशदा तुम्ही फार हिंमतवान आहात!
एकेक कथा वाचल्या कि हे असंही
एकेक कथा वाचल्या कि हे असंही होऊ शकतं असा प्रश्नच पडतो . बापरे एकदम वेगळेच अनुभव आहेत हे .. कधी भीती तर कधी हसू आणणारे ...
दिनोबा यावर एक पुस्तक तर
दिनोबा यावर एक पुस्तक तर बनतेच ना भाऊ !
भन्नाट अनुभव... इझे
भन्नाट अनुभव... इझे डोळ्यापुढे उभा राहिला.
छान
छान
वॉव
वॉव
सगळेच अनुभव एकपेक्षा एक
सगळेच अनुभव एकपेक्षा एक आहेत..
आपली लेखनशैली खिळवून ठेवणारी
आपली लेखनशैली खिळवून ठेवणारी आहे. पुस्तक लिहाच.
मस्तच अनुभव
मस्तच अनुभव
मस्त. काय चित्रविचित्र भन्नाट
मस्त. काय चित्रविचित्र भन्नाट अनुभव आहेत. पुस्तक लिहाच.
दिनेश किती खुसखुशीत लिहिलंय.
दिनेश किती खुसखुशीत लिहिलंय.

मजा येतेय वाचायला
सगळेच अनुभव एकपेक्षा एक आहेत.
सगळेच अनुभव एकपेक्षा एक आहेत. खरच पुस्तक लिहा तुम्ही.
आभार मित्रांनो.. आणखी १/२
आभार मित्रांनो.. आणखी १/२ अनुभव लिहायचे आहेत या मालिकेत अणि मग थोडेसे या अनुभवांबद्दल निवेदनही करायचे आहे.
जबरी अनुभव दिनेशदा ! असाच
जबरी अनुभव दिनेशदा !
असाच काहीसा अनुभव एकदा नागालँडमध्ये आला होता मला. त्यामुळे त्या प्रवासात तुमची काय मनोवस्था असेल हे जाणवले.
मस्त लिहिलंयत !
मस्त लिहिलंयत !
हाहाहाहा.. खुप छान चालली आहे
हाहाहाहा..
खुप छान चालली आहे हि लेखमाला... पुढचा भागही लवकर टाका.
खरंच सुरस कथा !
खरंच सुरस कथा !