कुठे आहे कळेना मी

Submitted by वैवकु on 6 February, 2015 - 05:23

इथे आहे तिथे आहे कुठे आहे कळेना मी
कधीचा शोधतो आहे मला काही मिळेना मी

कुठे नेणार आहे ही सरळ चालायची वृत्ती
मला कळले जरी आहे तरीसुद्धा वळेना मी

तुझे हळुवार श्वासांनी किती कुरवाळुनी झाले
तरी का भळभळत आहे मुळीही साकळेना मी

असा काही तुझ्यावरती अता मी भाळलो आहे
कितीदा पाहुनी झाले मलासुद्धा चळेना मी

कितीदा आग लावावी कितीदा देह जाळावा
कितीदा भान जाळावे तरीसुद्धा जळेना मी

तुझ्या ह्या बांधकामाची जगाला ह्यामुळे ईर्षा
जगाच्या पाडकामांनी जराही ढासळेना मी

~वैवकु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठे नेणार आहे ही सरळ चालायची वृत्ती
मला कळले जरी आहे तरीसुद्धा वळेना मी >>>>>>

मस्त !

मतल्यातील मिळेनापहाल.

धन्यवाद पाटील साहेब

मिळेना <<< ही सर्वमान्य म्हणता येइल अशी सूट आहे संदर्भासाठी बाराखडी वाचावीत अशी विनंती

असाकाही तुझ्यावरती अता मी भाळलो आहे
कितीदा पाहुनी झाले मलासुद्धा चळेना मी<<< अत्यंत काँप्लेक्स शेर आणि त्यामुळे आवडला.

तुझ्या ह्या बांधकामाची जगाला ह्यामुळे ईर्षा
जगाच्या पाडकामांनी जराही ढासळेना मी <<< वा वा

धन्यवाद बेफीजी
मी असे विचारणे जरा गैरच होईल पण बाकीचे शेर बरे झालेत का असे विचारावे वाटत आहे
अपल्या मार्गदर्शनाची गरज आहे

बाकी एक शेर आठवला सहजच आठवला

अजून काही अपेक्षिणे गैर होत राहील यापुढे
भले तुझा हुंदका जरा स्वैर होत राहील यापुढे

असाकाही तुझ्यावरती अता मी भाळलो आहे
कितीदा पाहुनी झाले मलासुद्धा चळेना मी<<<

आधी ह्या शेरातील शब्दरचनाच बदलायला हवी आहे हवा तो (काँप्लेक्स) अर्थ नीट पोचवायला.

असा काही तुझ्यावरती अता मी भाळलो आहे
मलासुद्धा कितीदा पाहुनी झाले......चळेना मी

असे करायला हवे आहे. (तसेच, असा आणि काही हे दोन वेगळे शब्द आहेत, एकच शब्द नव्हे)

ओके सर मी विचारात पडलो आहे
ह्या रचनेत जरा यतिभंगाची कळजी करत बसलेलो म्हणून असा विचार सुचला नसावा मला

मला अजून एक बदल अत्ता सुचला

सरळ चालायची वृत्ती कुठे नेणार आहे का
मला कळले जरी आहे तरीसुद्धा वळेना मी

मला वाटत आहे की यतिस्थानाच्या मोहात पडून मी ह्या रचनेत करताकरताच जे अनेक बदल करत गेलो आहे त्यामुळे मीच गोंधळात पडलो आहे आताशा त्यामुळे मीच पुरेसा समाधानी नाही झालेलो असेही वाटते आहे

अजून एक म्हणजे काही शब्द अनेकदा रिपीट झाले आहेत आणि काही पुन्हा पुन्हा साउंड करणार्‍या बाबी जसे जरी- तरी.....इथे /तिथे- कुठे अश्या ..पुन्हा पुन्हा आल्या आहेत

आपले मत प्रार्थनीय

गैर स्वैर च्या शेरात जमीन मस्त आली पण महत्प्रयासाने मला ४ काफियेच मिळाले जेमतेम ३ शेर आहेत झालेले
असो
धन्यवाद आवड कळवल्याबद्दल Happy

आनंदकंद, विद्युल्लता, रंगराग, शार्दुलविक्रीडित आणि (विधाताच्या दुप्पट मात्रा असलेले वृत्त - नांव माहीत नाही) ह्या वृत्तांना सोडून (व अश्या प्रकारच्या काही मला ज्ञात नसलेल्या वृत्तांना सोडून) यतीचा बाऊ करू नये. इतर वृत्तांंमध्ये यती पाळला गेला नाही तर ती त्या त्या अक्षरगणवृत्ताची मात्रावृत्ते ठरू शकतात, अतीकिचकटांसाठी! पण ती सहज उच्चारता येतात.

कुठे नेणार आहे ही सरळ चालायची वृत्ती
मला कळले जरी आहे तरीसुद्धा वळेना मी ...वा वा !

तुझ्या ह्या बांधकामाची जगाला ह्यामुळे ईर्षा
जगाच्या पाडकामांनी जराही ढासळेना मी..क्या ब्बात.

कितीदा भान जाळावे तरीसुद्धा जळेना मी <<मस्त मिसरा.
>> मलासुद्धा कितीदा पाहुनी झाले......चळेना मी<< बेफिजी म्हणतायत त्याप्रमाणे वाचल्यावर चटकन अर्थ लागला मलातरी. बेटर वाटतंय . Happy

धन्यवाद बेफीजी आणि खुरसाले साहेब

मला त्या ओळीत एक असा बदल सुचला >>>कितीदा पाहिले मी पण मलासुद्धा चळेना मी <<< कसे वाटेल कृपया कळवाच

अरे देवा, काय बदल करायचे ते एकदा बदल करुन घ्या. आणि मग वाचायला द्या.
आम्हाला अजिबात घाई नाही.

तुझे हळुवार श्वासांनी किती कुरवाळुनी झाले
तरी का भळभळत आहे मुळीही साकळेना मी

कितीदा पाहिले 'साकळुन' पण अर्थ लागेना.

बाय द वे, कवितेचं शास्त्र असं म्हणतं. कवींनी यति पाळला नाही तरी जिथे कुठे एक वा अनेक मात्रांचा विराम असतो तिथे यति मानल्या वाचून कोणताही पर्याय नसतो. (पाहा. छन्दोरचना. पृ.क्र. ६४/ ६५)

-दिलीप बिरुटे

आवडली