ही रुखरुख का जात नाही ?

Submitted by सुशांत खुरसाले on 5 February, 2015 - 10:02

सगळे ग्रूप म्यूट करून पाहिले
नोटिफीकेशन बार क्लियर केले
मेसेजेसना उत्तरं दिली
सगळं अनिवार्य म्हणून स्वीकारलं
पण
ही रुखरुख का जात नाही ?

पसारा करून पाहिला
पसारा आवरून पाहिला
स्वतःच्याच अवतीभोवती रेंगाळून पाहिलं
विचार करता करता सगळे दात कोरून झाले..
पण
ही रुखरुख का जात नाही ?

धुवायला दिलेल्या कपड्याच्या खिशात
जशी विसरावी महत्त्वाची चिठ्ठी
तसं काहीतरी विसरलंय
काळ खूप खेळून जातो म्हणतात-
उद्या त्या चिठ्ठीतली अक्षरं बदलतील
मलाच ओळखू येणार नाहीत

आवेग ओसरला की गोष्टींचे अर्थ बदलतात
असं काहीतरी होऊन
बिनमहत्त्वाची वाटू नये ती गोष्ट सापडल्यावर.
नाहीतर वाटेल-इतकी बिनमहत्त्वाची अस्वस्थता
कधीच भोगली नव्हती याआधी.

आणि हे जाणवून अजून अस्वस्थ वाटायला लागेल
मग त्या अस्वस्थतेवरची एखादी नवी कविता
पुन्हा एखाद्या कपड्याच्या खिशात ठेवली गेली तर ?

काळ खूप खेळून जातो म्हणतात..

ही रुखरुख का जात नाही ?

--सुशांत..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा मस्त आणि नेमकी वळणे (कलाटण्या) घेत घेत सुंदर प्रवास घडवते आहे कविता

शेवट प्रचंड अस्वस्थ करणारा !!

अभिनंदन ! सुंदर कवितेसाठी ...आणि धन्यवादही Happy

मराठीने अजून पाहिलेच काय आहे असे वाटवणारी रचना! किती थेट आणि किती इंपॅक्टिंग!

पण छंदातच लिहा असा आपला एक सल्ला! उगाचच समजा हवे तर!

धन्यवाद समीरजी, बेफिजी, स्वातीजी.

बेफिजी, खरंतर छंदातच लिहिण्याची ओढ आणि आवड आहे. पण ही एक कविता अशाच फॉर्मॅट मधे थेट सुचली आणि तशीच प्रकाशन्याचा मोह झाला. Happy

... मगर जो खो गई वो चीज क्या थी? << वहीच तो ढुंड रहा हूं.. Wink

Thank you all. Happy

सुरेख लिहिलय सुशांत. जस्त सुचेल तस, पण असं आतुन येणार, फारस रुपकात्मक नसलेल लिहा. छंदातच असल पाहिजे वगैरे अस काही नाही.

बिनमहत्त्वाची वाटू नये ती गोष्ट सापडल्यावर.
नाहीतर वाटेल-इतकी बिनमहत्त्वाची अस्वस्थता
कधीच भोगली नव्हती याआधी.>> हे सगळ्यात आवडलं!

वा वा, किती थेट आणि नेमक लिहिल आहे.
छंदाच्या मागे लागुन कविता भरकटतात. उगाच यमकांंचा मोह होत राहतो चारोळ्यांचे घाणे निघतात. तू गझल उत्तमच लिहितोस त्यामुळे प्रश्नच नाही. अनेक शुभेच्छा Happy

ही कविता वाचलेलीही दिसत नाहीये. छंदामुळे कविता भरकटत नाहीत ह्याचे उत्तम उदाहरण आहे ही कविता!

http://www.maayboli.com/node/53188

सुशांत,

ह्यातील काहीही तुम्हाला उद्देशून नाही.

सही!

इथले लाडिक हट्ट आणि उद्दाम सरसकटीकरण वाचून थक्क झाले.

सुशांत, तुम्ही प्रगल्भ लिहिता. तुमची अभिव्यक्ती अशा प्रतिसादांमुळे गढूळ करून घेणार नाही अशी आशा करते.

अरे वा? दुसरा एक कोणीतरी चांगले लिहितो हे सगळ्या जगाने आधीच ठरवलेले असताना पुन्हा एकदा ठरवायचा आणि त्याचे इतर लेखन वाचायचा वेळ मिळाला हे उत्तम झाले.

Pages