नायजेरियन विचित्र कथा - २ - बाबूल मोरा..

Submitted by दिनेश. on 1 February, 2015 - 09:40

हि घटना आहे १९९६ ची. मी त्यावेळी नायजेरियामधल्या पोर्ट हारकोर्ट या भागात होतो. हा भाग खनिज तेल समृद्ध आहे. पुढे हे शहर अपहरणासाठी कुप्रसिद्ध झाले. मी होतो त्या काळातही ते सुरक्षित नव्हतेच.

मी एका फ्रेंच कंपनीत नोकरीला होतो. आमच्या कंपनीत मी सोडल्यास दुसरा कुणीही भारतीय नव्हता. ४० फ्रेंच, १ इतालियन, १ जर्मन, १ ब्रिटीश आणि एक साऊथ आफ्रिकन होता. माझ्यासोबत ब्रिटिश आणि इतालियन माणूस रहात असे. आम्ही रोज एकत्रच कामावर जात असू.

घर ते ऑफिस अंतर फार नव्हते, पण तिथल्या "गो स्लो" ( गो स्लो म्हणजे नायजेरियन ट्राफिक जाम ) मूळे
अर्धा पाऊण तास लागत असे. त्यातल्या त्यात एका तिठ्यावर १०/ १५ मिनिटे खोळंबा होतच असे. सुरक्षिततेच्या
कारणासाठी गाडीतून उतरणेच काय, काचा खाली करणेही धोकादायक होते.

तिथे चानराय नावाचे भारतीय ( सिंधी ) समूहाचे सुपरमार्केट होते. त्यांच्याकडे भारतीय खाद्यपदार्थ मिळत. तिथला मॅनेजर माझ्या ओळखीचा होता, कारण ती कंपनी आमच्या साईट्सनाही पुरवठा करत असे. त्या सुपरमार्केटमधे गेलो तर मी त्याच्याशी हिंदीत बोलत असे.

तर रोजच्या ठिकाणी थांबल्यावर मला बहुदा एक मध्यमवयीन स्त्री दिसत असे. चेहर्‍यावरुन ती भारतीय , खास करून पंजाबी वाटत असे. आमची नजरानजर होत असे, ती ओळखीचे हसतही असे. तिच्याबरोबर, बहुदा तिचीच
जुळी मुले असत. त्यांचा तोंडावळा, खास करून केस भारतीय वाटत नसत. रंगाने मुले सावळी होती तर ती
बरीच उजळ होती.

ती खुपदा आमच्या गाडीजवळून रस्ता क्रॉस करत असे. पण खुपदा असे व्हायचे तेवढ्यात ट्राफिक क्लीयर व्हायचे आणि आम्ही निघायचो.

एक दिवस तिने बहुदा मला हात केला. माझे लक्ष नसावे किंवा मी मुद्दाम जाणून बुजून दुर्लक्षही केले असेल. तर तिने आमच्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. तसे करण्यात काही धोका नाही, अशी ड्रायव्हरने ग्वाही दिल्यावर मी त्याला गाडी बाजूला उभी करायला सांगितली.

ती गाडीजवळ आली, ( आज एकटीच होती. ) व म्हणाली, भाईसाब आप इंडीया से हो ना ? मी होकार दिल्यावर
ती म्हणाली, मेरा आपके साथ कुछ काम है, क्या बात कर सकती हूँ ?
खोटं कशाला बोलू ? ती पैसे वगैरे मागेल अशीच शंका आली मला. कदाचित माझ्या चेहर्‍यावर तिने ते वाचले असावे. मग म्हणाली, एक खत पहुचाना है इंडिया, क्या आप मदत करोगे ?

मी म्हणालो, जरुर, कहा है खत ?

तर ती म्हणाली, उद्या लिहून आणते.. हवं तर घरी आणून देते. पत्ता दे. परत मी जरा सावध झालो. मी तिला म्हणालो, घर आना थोडा मुष्किल होगा आप ऑफिसही आ जाना. आणि मी तिला ऑफिसचा पत्ता दिला.
इस सॅटरडे को सॅनिटेशन होगा तो आप १२ बजे के आसपास आ जाना ऑफिसमें. मै आपका इंतजार करुंगा.

शुक्रिया भाईसाब, असे म्हणत ती झप झप चालत निघूनही गेली.

( सॅनिटेशन ही नायजेरियातली एक प्रथा आहे. साधारणपणे दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी सकाळी ८ ते ११ या वेळात सॅनिटेशन असते. या काळात सर्व ऑफिसेस बंद असतात. कुणालाही रस्त्यावर गाडी आणायची परवानगी नसते. त्या काळात आपल्या घराच्या आजूबाजूची साफसफाई करावी, खास करून माजलेली झाडे, गवत साफ करावे, अशी अपेक्षा असते. या काळात जर कुणी रस्त्यावर आलाच, अगदी गाडी घेऊन तरी, त्याला पकडून पोलिस रस्ता झाडायला लावत. त्यामूळे आम्ही ११ नंतरच घरातून निघत असू. )

पत्राबद्दलही लिहायला हवे. त्या काळात नायजेरियातून भारतातच काय स्थानिक फोन करणेही मुष्किल होते.
मोबाईल फोन तर उदयालाही आले नव्हते. पोस्टाचा कारभार बेभरवश्याचा असे. कुरीयर हाच एकमेव मार्ग होता.
तिथल्या भारतीय कंपन्यांनी एक व्यवस्था केलेली असे. भारतातील एका पत्त्यावर नातेवाईकांनी पत्रे पाठवायची आणि महिन्यातून एकदा ती कुरियरने नायजेरियाला रवाना होत. भारतीय कंपन्यांमधे अनेक भारतीय असल्याने
ते शक्य असे. मी मात्र फक्त माझ्यासाठी, घरून असे कुरीयर मागवायचो. त्यात मग लोकप्रभा, चित्रलेखाचे अंक, लोकसत्ताच्या खास पुरवण्या असे सगळे येत असे. माझे वाचून झाले कि माझे मराठी मित्र, भक्तीभावाने सगळे घेऊन जात.
शिवाय माझा व्हीसा सहा महिन्याचाच असे. प्रत्येक सहा महिन्याने भारतात येऊन, दिल्लीला जाऊन मला स्वतः व्हीसा घ्यावा लागे, कारण माझ्या कंपनीचा भारतात कुणी एजंट नव्हता.

तर ठरल्याप्रमाणे ती शनिवारी माझ्या ऑफिसमधे आली. सोबत मुलेही होतीच. मी मुलांना बोर्नव्हीटा प्यायला दिले ( तिथे ऑफिसमधे ते उपलब्ध असे. ) तिला पण विचारले, पण ती नको म्हणाली.

इतक्या शांतपणे बोर्नव्हीटा पिऊन, कप जागेवर ठेवणारी मुले मी त्यापुर्वी ( आणि त्यानंतरही ) बघितली नाहीत.
मग ती सांगितलेल्या टिकाणी जाऊन बसली.

मग तिने आपल्याबद्दल सांगायला सुरवात केली. आधी तिने सांगून टाकले कि तिने मला चानरायमधे हिंदी बोलताना ऐकले होते, तसेच त्या बोलण्यात मी लवकरच भारतात जाणार आहे याचा उल्लेख केलेलाही तिने
ऐकला होता. ( असे चोरून ऐकल्याबद्दल तिने माफिही मागितली. )

ती मूळची पंजाबची. पंजाबमधे अशांतता झाल्यावर ती आणि तिचे कुटुंब दिल्लीत आले. वडील शाळेत शिक्षक होते. तिला एक लहान बहिणही होती. दिल्लीत आल्यावर वर्षभरातच आई वारली. वडीलांनी दोन मुलींवर अपार माया केली. त्यांनी दुसरे लग्न केले नाही व दोन्ही मुलींना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले.

ती लॉ करत असताना तिला एक नायजेरियन तरुण भेटला. तो नायजेरियन सरकारच्या स्कॉलरशिपवर भारतात
शिकायला आला. स्मार्ट होता. त्या काळात त्याला फि शिवाय, दर महिन्याला १,००० यू. एस. डॉलर्स एवढी
स्कॉलरशिप मिळत असे. त्याची रहाणी उच्च असे.

या दोघांचे प्रेम जमले. त्याचे शिक्षण संपल्यावर त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला. हिचा होकार होताच. घरून मात्र प्रचंड विरोध झाला. धाकट्या बहिणीचे लग्न कसे जमणार ? असेही विचारून झाले. पण ही बधत नाही बघितल्यावर, तू आम्हाला मेलीस, असे वडीलांनी सांगितले. हिचे शिक्षणही पूर्ण झाले नव्हते.

लग्न करण्यासाठी म्हणून तो तिला नायजेरियात घेऊन आला. काही वर्षे चांगले चालले. त्याची कमाईही चांगली
होती. नायजेरियन प्रथेप्रमाणे तिल मूल झाल्यावरच आपण लग्न करू असे तो म्ह्णाला, पण ती गरोदर राहिल्यावर मात्र त्याचा नूर बदलला. ( तेही नायजेरियन तरुणाला साजेसेच. ) त्याने दुसरी मैत्रिण शोधली.

हिला जुळे मुलगे झाले. तिने अथक प्रयत्नाने एका लॉ फर्म मधे नोकरी मिळवली ( तिचे शिक्षण पूर्ण झाले नव्हते. ) तसेच शाळेतही अर्धवेळ नोकरी मिळवली. आर्थिक प्रश्न सुटले. नायजेरियन स्त्रीप्रमाणेच ती एक हाती मुलांना
वाढवू लागली. पहिल्यांदा वडीलांची, बहिणीची खुप आठवण यायची, पण संपर्काची काही साधनेच नव्हती. परत
जाण्याएवढे, तेही मुलांसोबत पैसे ती जमवू शकली नाही. परत जाऊनही घरी स्वागत होईल, याची अजिबात खात्री
नव्हती.

तिने भारत सोडल्याला ७ वर्षे होऊन गेली होती. एवढ्या काळात ती एकदाही भारतात गेली नव्हती कि घरुन कुणी
तिच्याशी संपर्क साधला नव्हता. तिला आपल्या निर्णयाचा पश्चाताप नव्हता कि कुणाकडून आर्थिक मदतीची
अपेक्षा नव्हती. फक्त आपल्या वडीलांना आपल्याला माफ करावे, नातवंडाना आशिर्वाद द्यावा एवढीच तिची
ईच्छा होती. इतकेच नव्हे तर त्यांना काही मदत हवी असेल तरीदेखील ती करायची तिची तयारी होती.

हे सर्व तिने पत्रात लिहून आणले होते, मला तिने ते वाचूनही दाखवले. ते पत्र मी भारतातून पोस्ट करावे एवढीच
मदत तिला हवी होती. पत्ता दिल्लीचा होता आणि अनायासे मी दिल्लीला जाणारच होतो, त्यामूळे पत्र स्वतः
नेऊन देऊ का, असे मी तिला विचारले. तिने होकार दिल्यावर मी तिला आणखी सुचवले कि, जर मी माझा
मुंबईचा पत्ता दिला तर तिचे वडील त्या पत्त्यावर उत्तर पाठवू शकतील, आणि ते कुरियरने येईलही. तिला ती
कल्पनाही आवडली. त्या पत्रात खाली तिने माझा पत्ताही दिला..

मी ठरल्याप्रमाणे दिल्लीला आलो. त्या काळात दिल्लीतही सुरक्षेचा प्रश्न बिकट होता. हॉटेलमधे रुम घेतल्याबरोबर फोटो काढून पोलिस स्टेशनला द्यावा लागत असे. संध्याकाळी रस्ते सुनसान असत.
माझे नायजेरियन एम्बसी मधले काम झाल्यावर मी तिच्या घरचा पत्ता शोधत निघालो. मध्यमवर्गीय वस्ती
वाटत होती. घर सापडलेही.

बेल वाजवल्यावर बर्याच वेळाने एका स्त्रीने खिडकीतूनच, कौन है जी ? असे विचारले. तिचा चेहरा बघून
ती धाकटी बहीण असावी, असा मी कयास केला. आपकी बहनका खत लाया हूँ, असे मी म्ह्णाल्यावर तिने दार अर्धवट उघडले. पत्र घेऊन काही बोलण्यापुर्वीच ते बंदही केले. मी बराच वेळ वाट बघितली, पण परत दार उघडले नाही. परत बेल वाजवायचा धीर मला झाला नाही.

मी परत पोर्ट हारकोर्टला आलो. काही दिवसांनी ती त्याच ठिकाणी भेटली.. आपका खत पहुंचाया मैने, असे मी तिला सांगितले. घरमें कौन था ? कुछ बात हुई ? पिताजी कैसे है ? वगैरे ती विचारु लागले... शायद बाहर गये थे, मै खत दरवाजेके अंदर डालके आ गया.. असे मी खोटेच सांगितले.. तिचा विश्वास बसला.

नंतर तिचे दिसणे कमी झाले. तिच्याएवढीच मी देखील तिच्या वडीलांच्या उत्तराची वाट बघत असे. माझ्या घरच्या कुरीयरमधे ते कधी आलेच नाही..

तिच्या वडीलांनी तिला माफ केले असेल का ? बहिणीचे लग्न झाले असेल का ? त्यांचा परत संपर्क झाला असेल का ? त्यांची भेट, किमान बोलणे तरी झाले असेल का ?.. ती कशी आहे आता ?

मला अजून या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे...................... हे वाचून त्या बाईचं पुढे काय झालं असेल? ती मुलांना घेऊन कशी रहात असेल? असं वाटू लागलंय..............>>>> अगदी अगदी
मला वाटलं शेवटी तिला वडीलांच पत्र येईल Sad असं का करावं बरं त्या वडीलांनी!

हॄदय पिळवटून निघते !
परंतु राहुन राहुन वाटुन जाते की मुली असे धोके पत्कारुन परदेशी जातातच कशाला !

दिनेश दा,

एक शंका आहे, अहो कदाचित सात वर्शात तिच्या घरच्यांनी घर बदलले असेल आणि तिथे ते पत्र दुसर्‍याच कोणी घेतले असेल . असे असल्यामुळे कदाचित परत संपर्क झाला नसेल.

कारण काहि कारण असले तरी वडिलांनी माफ नक्कीच केले असते. निदान तिला उलट उत्तर ( पत्र) तरी लिहिले असते. असे मला वाटले.

"Not without my daughter" Mahmuddi Betti ya pustakachi athavan jhali...

Rajendr Devi

आभार,
सगळेच प्रश्न अनुत्तरीत राहिलेत, माझ्यासाठी, आता संपर्काची एवढी साधने आहेत, तिने नक्कीच काहीतरी प्रयत्न केला असेल. शेवट गोड झाला असेल, अशी अपेक्षा करु या !

दिनेशदा,

खरच सुन्न करनारा अनुभव! आणि शेवट नक्कीच गोड झाला असेल. कारण स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असते. ती स्वतासाठी नाही पण स्वताच्या मुलांसाठी नक्कीच खंबीरपणे उभी राहीली असेल.

Pages