नायजेरियन विचित्र कथा -१ - एक कर्नल कि मौत

Submitted by दिनेश. on 31 January, 2015 - 05:39

मी नायजेरियातल्या अगबारा या गावी नोकरी करत होतो त्या काळातली हि घटना. या गावी मोठे मोठे कारखाने आहेत. ग्लॅक्सोचाही कारखाना आहे. आमच्याच कंपनीचे अॅसिड प्लांट, ग्लास प्लांट, फर्टीलायझर डेपो, सिलिकेट प्लांट, आयर्न डेपो अशी काही युनिट्स होती. ६० च्यावर भारतीय होते आणि ३०० च्या वर नायजेरियन होते.

प्रत्येक विभागाचा कारभार बघायला स्वतंत्र मॅनेजर होतेच, पण तरी या सगळ्यांची मोट एकत्र बांधायला म्हणून एक रिटायर्ड कर्नल दाखल झाले होते. त्यांना कर्नलच म्हणायचे असा त्यांचा आग्रह होता.

लष्करातली शिस्त तिथे लावायच्या प्रयत्नात ते कायम असायचे, पण ती सर्वस्वी अशक्य गोष्ट होती. एकतर साधन साहित्याचा अभाव असायचा. कामाचे प्रेशर असायचे. आणि स्थानिक लोकांकडून काम करून घ्यायचे अतिकठीण काम आम्हा सर्वांनाच करावे लागायचे. त्यामूळे त्यांच्या सूचना खुपदा अव्हेरल्या जात.

बरं अगबारा गावी इतर काही सोयीसुविधाही नव्हत्या. साधा भाजीपाला, किराणासामान आणायचे तरी ४०/५० किलोमीटर अंतर कापायला पर्याय नव्हता. नावापुरती एकदोन क्लीनिक्स होती पण तिथले डॉक्टर्स अननुभवी होते.

आमच्या कंपनीत एक नर्स असायची पण तीदेखील रोज येत नसे. शिवाय मामुली प्रथमोपचार सोडल्यास ती काही करु शकत नसे. छोट्या मोठ्या आजारपणात आम्ही आमच्याकडे असलेली औषधेच एकमेकांना देत असू.

तिथलाच एक अनुभव सांगायचा तर माझे सहकारी, श्री नारायणन यांना माझ्यासोबत प्रवासात असताना अचानक छातीत दुखू लागले. घामही यायला लागला. मी ड्रायव्हरला गाडी एका क्लिनि़कमधे न्यायला लावली. त्यांच्याकडे अशा वेळी द्यायची गोळीही नव्हती कि इंजेक्शनही नव्हते. इसीजी काढू असे सुचवले तर ते मशीन चालू नव्हते.
आपण ब्लड टेस्ट करू असे तिथले डॉक्टर म्हणायला लागले. मी विचारले, त्याची काय गरज आहे ?
मलेरियासाठी टेस्ट करू असे ते म्हणू लागले. ( बहुदा तेवढी एकच सोय तिथे होती ) . मी म्हणालो त्यांना बहुदा हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यासंबंधात काही करु शकाल का ? तर त्यांनी नकारार्थी मान हलवली. पुढे श्री नारायणन यांनी भारतात येऊन योग्य ती ट्रीटमेंट घेतली.

तर परत कर्नल साहेबांकडे वळू..

कर्नल बंगाली होते. त्यांची बायको सोबत असे पण त्यांचा आम्हा कोणाशी कामाशिवाय संबध नसे. आम्ही सगळे एकाच कॉलनीत रहात होतो, त्यामूळे एरवीही काहीना काही कारणांनी एकत्र येत असू, पण कर्नल आणि त्यांची पत्नी कधी येत नसत. आमच्या पैकी फक्त एकाच माणसाची बायको तिथे होती, आणि त्या रुपाभाभी दर २/३ आठवड्यांनी आम्हाला जेवायला बोलावत असत. पण त्यांच्या बोलावण्यावरूनही कर्नल येत नसत.
कर्नलांच्या घरी एकदा गॅससिलिंडर देण्यासाठी म्हणून माझे जाणे झाले होते त्यावेळी मी त्यांच्या बायकोशी बोललो तेवढेच, एरवी त्यांना कुणी बघितलेही नव्हते.

कर्नलांचा डबा त्यांच्या घरून येत असे आणि तोही ते एकटाच खात असत. बाकी आम्ही सर्व एकत्रच जेवत असू. आमचेही डबे घरूनच येत असत. मी अर्थातच स्वतः जेवण करत असे आणि बाकिजणांसाठी हाउसमेड जेवण शिजवत असत. पण मी मात्र घासघास का होईना सर्वांना वाटून जेवत असे. इतकेच नव्हे तर आमच्या फॅक्टरीत बाहेरून कुणी येणार असेल त्याच्याही जेवणाची सोय मीच करत असे. बहुदा कर्नलच मला तसे सांगत. ( अगबारा गावात इतर काहीच सोय होण्यासारखी नव्हती. )

पण कर्नल कधी एका जागी बसत नसत. सदा फिरते असत. गरज नसतानाही फर्नेसजवळ जा, शिडीवर चढ असे प्रकार करत असत. ते रिटायर्ड होते, वयही झाले होतेच. तरी हेका सोडत नसत.

तर असेच एका दिवशी दुपारी माझ्याशी काही बोलून ते जेवायला गेले. थोड्याच वेळात आमचा गार्ड, कर्नल फेल डाऊन असे सांगत माझ्याकडे आला. खरे तर त्याच दिवशी ते एका शिडीवरुन पडल्याचे आम्हाला माहीत होते. तेच तो गार्ड मला सांगतोय असे वाटले. तरी मी धावत गेलो. बघितले तर टेबलावर त्यांचा डबा होता आणि ते खाली बसले होते.

तरी मी आरडाओरडा करून सगळ्यांना बोलावले. टेबल आणि खुर्चीच्या मधे ते अडकल्यासारक्झे वाटत होते. टेबल पुढे ओढले तरी ते बसलेल्या अवस्थेतच होते. डोळे मिटलेले.

मी आणि माझ्या सहकार्‍यानी त्यांचा हात धरून उठवायचा प्रयत्न केला तर घश्यातून एक आवंढा आला. आणि मान पुढे झुकली. मी त्यांच्याच टेबलावरची पाण्याची बाटली घेऊन तोंडावर पाणी मारले. पाठीवर थपडा मारल्या. हाका तर मारतच होतो. पण प्रतिसाद नव्हता.

मग आम्ही घाबरलो, त्यांना तसेच उचलून गाडीत घालून एका क्लीनीकमधे नेले तर तिथले डॉक्टर हजर नव्हते, शेवटी ड्रायव्हरच्याच मदतीने एक क्लिनिक शोधले. खरं तर ते एवढ्या अडचणीच्या जागी होते, कि गाडीला जायलाही रस्ता नव्हता. त्यांच्याकडे स्ट्रेचरही नव्हते. तसेच सहा जणांनी उचलून त्यांना क्लीनीकमधे नेले.

डॉक्टरांनी त्यांना तपासल्यावर ते गेले असे त्यांनी थेटच सांगितले. पण त्यांनी डेथ सर्टीफिकेट द्यायला नकार दिला. लवकरात लवकर बॉडी उचला असा धोषा लावला. ( कर्नलांचा पासपोर्ट आमच्याकडे नव्हता. )

एवढे सांगून तो डॉक्टर निघून गेला. क्लीनिकमधे दोन नर्स होत्या. बॉडीवर टाकायला पांढरे कापडही नव्हते त्यांच्याकडे. नाकात कानात कापूस ठेवायला. पायाचे अंगठे बांधायला पण त्यांना मला सांगायला लागले.

आता पुढची व्यवस्था करायला हवी होती. कर्नलांना बरे वाटत नाही आणि त्यांना क्लिनिकमधे नेतोय एवढा निरोप त्यांच्या बायकोला गेला होता. मी आधी रुपाभाभींकडे गेलो. त्यांनाही तो धक्काच होता.. म्ह्णालो, चला आपण त्यांच्या घरी जाऊ. त्या माझ्याबरोबर आल्या पण कर्नलच्या दारासमोर त्यांचे अवसान गळाले.

शेवटी मीच कर्नलच्या बायकोला हे सांगावे असे ठरले. मी त्यांना थेट नाहीच सांगितले. म्हणालो कर्नलांना खुप बरं नाही, तूम्ही माझ्याबरोबर क्लीनीकला चला. त्यांच्यासाठी जेवण करतेय. फिश करी झाली कि निघू. कपडेपण घ्यायला हवेत ना ? असे त्या बोलू लागल्या. मी म्हणालो, ड्रायव्हरला पाठवू आपण त्यासाठी पण तूम्ही चला. एखादी चादर घ्या हवीतर एवढेच म्हणालो,

गाडीत सोबत रुपाभाभी होत्या. त्यांचेच डोळे रडून रडून लाल झाले होते. पण तरीही त्या काही बोलल्या नाहीत. मलाही तो ताण असह्यच झाला होता. अगदी क्लीनिक जवळ आल्यावर ऑफिसमधले सगळेच तिथे जमलेले बघितल्यावर त्यांना शंका आलीच. मला त्या म्हणाल्या, भाई सचसच बताओ क्या हुआ है. मी म्हणालो,बुरी खबर है. त्या काय ते समजल्या. डोळ्यात एक अश्रु तरळला.

माझा हात धरून त्या सावकाश क्लिनिकमधे आल्या. चादर माझ्याच हातात होती. मी ती कर्नलांच्या शवावर टाकली पण चेहरा झाकताना त्यांनी मला थांबवले. मी त्यांना एक खुर्ची आणून दिली आणि नर्सेसना लक्ष द्यायला सांगून रुमच्या बाहेर आलो. दोनच मिनिटात त्या बाहेर आल्या, व म्हणाल्या, आगे क्या करना है बोलो.

पुढे काय करायचे याची मलाही नीट कल्पना नव्हती. मी ती जबाबदारी इतर सहकार्‍यांवर टाकली आणि त्यांना म्हणालो, आता तर काही करण्यासारखे नाही, आपण घरी जाऊ.

आम्ही गाडीत बसता बसताच तिथली नर्स धावत आली व माझ्यासमोर तिने बिल धरले. वाजवीपेक्षा खुपच जास्त होते ते. आणि माझ्याकडे तेवधे पैसेही नव्हते. गाडीच्या बाहेर पडून मी सर्वांकडून पैसे गोळा करून ते भागवले.
आणि कर्नलच्या बायकोला आणि रुपाभाभीला घेऊन घरी आलो.

कर्नलच्या बायकोंनी आपल्या घरी जायचेय असा आग्रह धरला. त्या घरी पोहोचलो तर तिथे दारातच हाऊसमेड उभी. ती आपले गाठोडे बांधून तयारच. ( एरवी तिथे या मेड्स घराच्या ऑटहाऊसमधेच राहतात. ) आता माझी नोकरी गेली, माझे पैसे द्या. असा हेका तिने लावला.

तिला देण्याएवढे पैसे माझ्याकडे नव्हते. रुपाभाभीकडे थोडे होते ते तिला देऊन दुसर्‍या दिवशी ऑफिसमधे ये, मग हिशेब करू असे सांगितले.

घरात गेल्यावर त्यांना मी पाणी वगैरे दिले. त्यांचा मुलगा अमेरिकेत होता. मुलगी व जावई यू.के. मधे होते. त्यांना त्यांनी फोन करुन बातमी कळवली. ते सर्व त्यांनी फार धीराने हाताळले.

रुपाभाभी त्यांना आपल्या घरी चला असे म्हणत होत्या. पण त्या तयार झाल्या नाहीत. त्यांना एकटीलाच घरी सोडणे आमच्या जीवावर आले होते, ( हाऊसमेडही निघून गेली होती ) रुपाभाभींनी आपल्या हाऊसमेडला बोलावून घेतले आणि आम्ही निघालो.

कर्नलांच्या पार्थिवाची व्यवस्था बघायचीच होती. लेगॉसहून गाडी मागवून घेतली होतीच, ती आल्यावर कर्नलांचे पार्थिव घेऊन डॉ. धर यांच्याकडे नेले. या डॉ. धर यांच्याबद्दलही थोडे लिहायलाच हवे.

(डॉ. धर लग्न करायचे नाही म्हणून भारतातून नायजेरियात, अनेक वर्षांपूर्वी गेले होते. त्यांच्या घरच्यांना याचा पत्ताच नव्हता. अनेक वर्षे ते नायजेरियातील ग्रामीण भागात रुग्णसेवा करत होते. पुढे आमच्याच कंपनीच्या क्लिनीकमधे रजू झाले. ते खुप लोकप्रिय होते. त्यांनी तपासून औषध दिले तर आपल्याला हमखास बरे वाटणार असा विश्वास सर्वांना वाटत असे.
पुढे काही वर्षांनी त्यांचा ठावठिकाणा मिळाल्यावर त्यांची बहिण भारतातून त्यांना भेटायला तिथे गेली होती. ते भेटले पण त्यांनी भारतात यायला नकार दिला. ते आजन्म ब्रम्हचारीच राहिले. अलिकडेच त्यांचे निधन झाले. )

डॉ. धरांनी कर्नलांचे डेथ सर्टीफिकेट तयार केले. त्यांच्या मुलांना व्हीसा आणि तिकिट मिळेपर्यंत ३/४ दिवस जाणार होते, म्हणून त्यांचे पार्थिव शवागरात ठेवले.

त्यांचा मुलगा वयाने लहानच होता. पंचवीसच्या आतलाच. तो, मुलगी व जावई ४ दिवसांनी आले. तोपर्यंत त्यांच्या मिसेस एकट्याच घरात होत्या. आम्ही रोज जाऊन चौकशी करत होतो.

त्यांचे पार्थिव नायजेरियाबाहेर नेणे कठीण होते. एकतर भारतासाठी थेट फ्लाईट नव्हते आणि तसेही त्याचे सोपस्कार बरेच होते. शेवटी त्यांच्यावर तिथेच अग्निसंस्कार करायचे ठरले.
पण तेही सोपे नव्हतेच. तिथे हिंदु स्मशानभुमी नाही. अग्निसंस्कार करण्यासाठी भारतीय दूतावास आणि नायजेरियन सरकार यांची परवानगी काढावी लागली. कुठे करायचे तोही प्रश्न होताच. शेवटी गावाबाहेरची मोकळी जागा ठरवण्यात आली.

चिता रचण्यासाठी लाकडेही मिळणे दुरापास्त होते. नायजेरियात खनिज तेल भरपूर असल्याने इंधन म्हणून गॅसचाच वापर होतो. जी लाकडे मिळाली ती देखील ओलसर होती. आणि त्याच दिवश नेमका पाऊसही कोसळू लागला. आडोसा, छप्पर असण्याचा काही प्रश्नच नव्हता. मला हे लिहायलाही वाईट वाटतेय पण डिझेल टाकण्याशिवाय काही उपायच नव्हता. त्यांचा मुलगा यांत्रिकपणे सर्व करत होता. त्याचे सांत्वन तरी कुठल्या शब्दात करणार ?

दहाव्या दिवशी त्यांनी लेगॉसमधल्या गीतामंदिरात, गीता पाठ ठेवला होता. आमच्या कंपनीतर्फे आम्ही काही जण बसने गेलो. तिथेही घोळ झालाच. तिथल्या पुजार्‍याने निरुपणासाठी चुकीचा अध्याय निवडला होता. त्याचे उच्चारही सदोष होते शेवटी कर्नलच्या मुलीनेच त्याला ते आटपते घ्यायला सांगितले.
त्यानंतर दोनच दिवसांनी कर्नलांचे कुटुंबिय ते घर सोडून निघून गेले. त्यांचा मृत्यू, त्यानंतर झालेली परवड याने आमच्या कंपनीतल्या सर्वांच्याच मनावर थोडाफार परिणाम झाला होता. " कर्नल कि मौत " हा टाळता न येण्याजोगा विषय झाला होता.

तरीही पुढची व्यवस्था करायची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. कर्नलांचे घर रिकामे करून द्यायचे होते. त्यातील सर्व सामान कंपनीच्या मालकिचे होते, त्याचीही विल्हेवाट लावायची होती. मला रुटीन काम सोडून जाणे
शक्य नव्हते, म्हणून मी ड्रायव्हरला, एका कामगाराला पाठवून सफाई करून घे असे सांगितले. तर तो दरवाजाच उघडत नाही असे सांगत आला.

संध्याकाळी परत त्यांना घेऊन गेलो. दरवाजा उघडायला थोडे प्रयास पडले. कामगाराला आत पाठवून मी बाहेर फेरी मारू लागलो, तर दोन मिनिटात तो आरडाओरड करत बाहेर आला. म्हणाला मला नोकरीवरून काढून टाकलस तरी चालेल पण मी या घरात काम करणार नाही.

मी त्याला म्हणालो चल परत बघू या काय होते ते, तर तो आत यायलाच तयार नव्हता. चक्क पळूनच गेला. अंधार होत आला होता. जनरेटर चालू करायला हवा होता ( नायजेरियात बहुदा जनरेटरवरच सगळे चालते. )

दुसर्‍या दिवशी इलेक्ट्रीशियनला घेऊन परत गेलो. त्याने बाहेरच्या बाहेर जनरेटर चालू करून दिला. तोही आत यायला तयार नव्हता. शेवटी मी एकटाच आत शिरलो. घर बर्‍यापैकि आवरले होते. पण तरी बरेच सामान होते.
मी वरच्या मजल्यावर गेलो तर तिथे कर्नलांचा देव्हारा होता आणि त्यात कालिमातेचा फोटो होता. बहुदा तो कामगार त्या फोटोलाच घाबरला होता. ( तसेही ते लोक आपल्या देवांना घाबरतात. )

तो फोटो तिथून काढल्याशिवाय कुठलाही कामगार तिथे येणे शक्य नव्हते. मी तो फोटो, आणखी एका स्वामींचा फोटो वगैरे सोबत घेतले. त्या फोटोंचे विसर्जन करायचे होते पण ते कुठे आणि कसे करायचे हा प्रश्न होताच.

ऑफिसमधे त्यावर चर्चा रंगली. बदागिरी बीच आमच्या ऑफिसपासून जवळ होता, पण समुद्राच्या आत जायला होडी वगैरेची व्यवस्था होण्यासारखी नव्हती. लेगॉस ते अगबारा अशा फेर्‍या मी वारंवार मारत असे. वाटेत एका नदीवरचा पूल लागतो, हे मला माहित होते. पूलावरूनच विसर्जन करावे लागणार होते. ( कारण तिथेही, खास करून या कामासाठी होडी मिळाली नसती. )

त्या फोटोवरची काच काढून कंपनीच्या ग्लास फॅक्टरीच्या कलेटमधे मिसळावी, लाकडे जाळून टाकावी. असेही काही लोक म्हणाले. पण फ्रेमशिवाय फोटो नदीत विसर्जित केले असते तर ते तरंगले असते आणि त्याचाही भयानक परिणाम झाला असता. शेवटी ते फोटो फ्रेमसकट नीट पॅक करून घेतले. ड्रायव्हरला सूचना न देता ( त्यानेही याला विरोधच केला असता. ) सहजच त्याला त्या पूलाजवळ गाडी थांबवायला सांगितले. आणि ते फोटो पूलावरुनच नदीत सोडले.

आता दुसरा एक कामगार घेऊन परत गेलो, तर तो म्हणायला लागला घराला शॉक बसतोय. मी बघितले तर ते खरेच होते. परत ईलेक्ट्रिशियनला घेऊन गेलो, तर म्हणाला कुठेतरी वायरींग शॉर्ट होतेय. फॉल्ट शोधायला वेळ लागेल. मग अंधारातच आम्ही आवराआवर करायला सुरवात केली.

कर्नलांच्या घरी अमाप सामान होते. किराणासामान फारसे नव्हते पण वापरात नसलेल्या प्लेट्स, इतर सामान भरपूर होते. त्यांना काय शौक होता कोण जाणे पण सगळ्या भिंतीवर घड्याळे होती. अगदी वॉशरुम्स मधेही !
उश्या, चादरी तर होत्याच पण त्यांचे मोजे, बनियन्स अंडर गार्मेंट्स पण शेकड्याने होते. ते सगळे नवीनच होते तरी कुणी घ्यायला तयार नव्हते. सगळे टाकून द्यावे लागले.

त्यांनी घरात एवढे अवजड फर्निचर करुन ठेवले होते ( अर्थात कंपनीच्या खर्चाने ) कि ते हलवणेही शक्य नव्हते ( नायजेरियात प्लायवूडचा फारसा वापर होत नाही. सगळे फर्निचर लाकडाचेच असते. ) तेही डिसमँटल करावे लागले.

एवढ्या सगळ्या उस्तवारीला दोन आठवडे लागले.

सगळे रिकामे करून घरमालकाला घर परत द्यायच्या आदल्या रात्री आणखी एक विचित्र घटना घडली. त्यांच्या घराबाहेरच्या रस्त्यावरुन भरधाव जाणार्‍या एका गाडीच्या चालकाच्या, गाडीवरचा ताबा सुटला. आणि ती गाडी, ५ फुटाचा फुटपाथ ओलांडून, घराच्या कुंपणाची भिंत फोडून आत गेली. चालकाचे काय झाले कळले नाही. ( बहुदा पळून गेला )
ती भिंत लगोलग दुरुस्त झाली खरी, पण मी तिथे असेपर्यंत त्या घरात कुणी भाडेकरू आला नव्हता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालिमातेच्या किंवा इतर देवांच्या फोटोला तिथले लोक का घाबरतात?
बाकी कथा खरच विचित्र वाटते.

बादशाह, त्या लोकांवर ब्लॅक मॅजिकचा खुप प्रभाव असतो. आपल्या देवदेवतांचे फोटो त्यांना त्या संबंधातले वाटतात.
त्यांना अशी भिती वाटणे तिथल्या भारतीयांच्या सोयीचे असल्याने, ते या भितीमधे भरच घालतात.

हि कथा क्रमशः नाही, पण असेच काही अनुभव या मालिकेत लिहिन म्ह्णतोय.

आफ्रिकेतले जीवन खुप कठिण असते. रोजच्या रोज काय घडू शकेल याचा नेम नसतो. तरीही अनेक भारतीय इथे
राहतात. त्यांच्यामधे आपोआप जिव्हाळ्याचे नाते तयार होते. वरच्या घटनेत माझ्या सहकार्‍यांनी पण बरीच मदत केली. हे सगळे एकट्याने निस्तारणे माझ्या कुवतीबाहेरचे होते.

बापरे.. खराच विचित्र अनुभव..

बाहेर देशातील लोकं खरंच घाबरतात आपल्याकडील देवादिकांच्या तसबीरींना, चीन मधे तर काही भारतियांनी घराबाहेर लावलेली स्वास्तिक, शुभ लाभ टाईप्स चिन्हे , कलश वगैरे असलेली तोरणं, रांगोळ्या इ.इ. त्यांच्या चीनी शेजार्‍यांनी मॅनेजमेंट ला कंप्लेंट करून काढून टाकायला लावली होती. त्यांना ही सर्व काला जादू वाटत असे.

विचित्र
त्या लोकांवर ब्लॅक मॅजिकचा खुप प्रभाव असतो. आपल्या देवदेवतांचे फोटो त्यांना त्या संबंधातले वाटतात.
तिथे पावलापावला गणिक black magic असते म्हणे . घरातल्या किमान एकाला तरी ती येत असते .

दिनेश दा, तुमची लेखन शैली खूपच छान.
तुमचे हे अनुभव वाचून आयुष्यात तुम्ही किती उन्हाळे-पावसाळे पहिले असतील याची हि कल्पना येते.

खरंच विचित्र आहे हे!.............
तुमचे हे अनुभव वाचून आयुष्यात तुम्ही किती उन्हाळे-पावसाळे पहिले असतील याची हि कल्पना येते.>>>अगदी अगदी!

विचित्रच अनुभव.
एक भा प्र आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर नाकात कापसाचे बोळे का घालतात?
आणि तुम्ही अंगठे बांधतात असं ही लिहिलंय ते नक्की कसे आणि का बांधतात? शास्त्रीय कारण काय?
अवांतर पोस्ट साठी माफी

दक्षिणा, मृत्यू झाल्यानंतर मेंदू विरघळायला लागतो आणि तो द्रव कानानाकातून बाहेर यायला लागतो. तसेच देह ताठ व्हायला लागतो. त्या काळात जर पाय विलग झाले तर परत एकत्र करणे कठीण असते, म्हणून अंगठे बांधतात.. हि मला माहित असलेली कारणे.

बापरे वाचतांना भयंकर वाटतंय तर प्रत्यक्ष तुम्ही कसं फेस केलंय हि कल्पना पण कठीणच.

माणूस गेल्यावर लगेच नाकातोंडात कापूस घालतात कारण न घातल्यास तोंड आणि नाकाद्वारे शरीरात हवा जाते आणि मग हळूहळू शरीर पोट फुगायला लागतं. तसेच काही वेळाने शरीर ताठ होऊन असेल त्या स्थितीत कडक होत म्हणून तस होण्याआधी शरीर सरळ राहावं या हेतून दोन्ही पायाचे अंगठे आणि हात पोटावर घेऊन हाताचे अंगठे एकमेकांना बांधतात. माझ्या माहितीप्रमाणे