फिर वही रात है .....

Submitted by विशाल कुलकर्णी on 30 January, 2015 - 00:38

साधारणतः चाळीसच्या दशकात खांडव्याहून मायानगरी मुंबईत आलेल्या आभासकुमार गांगूली नावाच्या त्या कलंदराने बहुदा रसिकांच्या मनावर तहहयात अधिराज्य गाजवायचं हे ठरवुनच मुंबईकडे प्रस्थान केलं होतं. सुरूवात अभिनयक्षेत्रातुनच झाली. १९४६ मध्ये आलेल्या आणि अशोककुमार नायक असलेल्या 'शिकारी' मधुन किशोरदांनी एक अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं. अशोककुमारांची इच्छा किशोरदांनी त्यांच्याप्रमाणे अभिनेता बनावे हीच होती. स्वत; किशोरदा मात्र फिल्मी करियरबद्दल फारसे गंभीर नव्हते. १९४८ साली आलेल्या 'जिद्दी' मध्ये संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोरदांना सर्वप्रथम गाण्याची संधी दिली. गाणे होते ,"मरने की दुवाये क्युं मांगू..." त्यानंतर किशोरदांचे अभिनय आणि पार्श्वगायन हे दोन्ही प्रकार समांतरपणे चालु होतेच. पण मुळात फिल्मलाईनमध्येच फारसे स्वारस्य नसल्याने किशोरदंच्या टिवल्या-बावल्याच जास्त चालु होत्या.

मी कुठेतरी वाचलं होतं की 'मशाल'च्या निर्मीतीदरम्यान एकदा कै. सचीनदेव बर्मन काही कारणांमुळे अशोककुमार यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा किशोरदा कुंदनलाल सहगल यांचं एक गीत सैगलसाहेबांच्या स्टाईलमध्ये गुणगुणत होते. साहजिकच सचीनदा त्या अनघड आवाजाकडे आकर्षित झाले. गाणे ऐकल्यावर त्यांनी मनापासून किशोरदांचे कौतुक केले आणि एक मोलाचा सल्ला दिला, " सैगलची नक्कल करण्यापेक्षा स्वतःची शैली विकसीत कर, या क्षेत्रात तुझे भवितव्य अतिशय उज्वल आहे." सचीनदांसारख्या संगीतातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्वाचा सल्ला अव्हेरणे किशोरदांना शक्यच नव्हते. त्यांनी स्वतःची शैली विकसीत करण्याचे मनावर घेतले . पण सचीनदांनी केवळ कौतुक करून आपले कर्तव्य संपले असा भाव न बाळगता किशोरदांना आपल्या चित्रपटांमधून अनेक संधी दिल्या. त्या संधींचं किशोरदांनी काय केलं हे जगजाहीर आहे. सचीनदांसाठी गाताना पंचमशी मैत्र जुळले आणि मग एक नव्या पर्वाची सुरूवात झाली. सचीनदांच्या संगीतात किशोरदांचा आवाज, त्यांचे सुर विलक्षण खुलायचे. त्या स्वरांना आर.डी. अर्थात पंचमदांनी एक मनस्वी टोकदारपणा दिला. त्यात गुलझारसाहेबांची संगत लागली आणि ही जोडी अजुनच फुलून आली. या त्रिकुटाने अनेक सुंदर गाणी दिली आहेत. त्यातलंच एक जिवघेणं गाणं.....

"फिर वही रात है....."

तसं बघायला गेलं तर अगदी साधे थोडेसे श्रुंगारिकच वाटणारे शब्द. तसं तर हे गाणं कुठुनही आणि कधीही ऐकलं तरी आवडतंच कारण किशोरदांनी या गाण्याला ट्रीटमेंटच असली जबरा दिलेली आहे की पुछो मत. विशेषतः "फिर वही..." हे दोन शब्द उच्चारताना 'फिर' मधल्या 'र्'ची अनपेक्षीतपणे साथ सोडताना 'वही' मधल्या 'व'ला लावलेला जीव.. !

कातिल ..कातिल सूर लावलेत किशोरदांनी. पण हे गाणं जर अनुभवायचं असेल तर हा चित्रपट पाहणे अतिशय गरजेचे होवून बसते. "फिर" वही रात... यातला 'फिर' हा शब्दच अतिशय वाईट्ट आहे. पुनरावृत्तीचा आनंद देतानाच जुन्या, गतकाळातील स्मृतींच्या खपल्या काढणारा आहे. एकमेवावर जिवापाड प्रेम करणारे विकास आणि आरती हे एक गोड जोडपे. विनोद मेहरा आणि रेखा असं सेटच्या बाहेरही गाजलेलं जोडपं Happy . आपल्या छोट्याश्या विश्वात रमलेले विकास आणि आरती एके दिवशी रात्री चित्रपट पाहून परत येताना त्यांच्या आयुष्यात एक दुर्घटना घडते आणि आरती मुळापासून कोसळून जाते, हरवून जाते. आणि मग सुरू होते तिला परत माणसात आणण्यासाठीची विकासची धडपड. तिच्या मनात एक किंतु जन्माला आलेला आहे. आता आपण शुद्ध राहीलेलो नाही. विकासच्या लायक राहीलेलो नाही. या भावनेतून मनोमन खचलेली, उध्वस्त झालेली 'आरती'. तिचं हे खचलेपण, तिचं हे उध्वस्त होणं रेखाने प्रचंड ताकदीने उभं केलय. जरी ही प्रेमकथा असली तरी माझ्या मते या चित्रपटाची नायिका आणि नायक या दोन्ही भुमिका रेखानेच साकारलेल्या आहेत असे मला कायम वाटत आलेले आहे. शुन्यात हरवलेल्या, खचलेल्या 'आरतीला' त्या विमनस्क अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी धडपडणारा, त्यासाठी स्वतःची सगळी वेदना चेहर्‍यावरच्या खोट्या हास्यात बुडवून टाकणारा विकास देखील विनोदने अतिशय संयमीपणे उभा केलाय.

hqdefault.jpg

या सगळ्या पार्श्वभुमीवर 'गुलझारसाहेबांचे' विद्ध करणारे शब्द येतात....

काँच के ख्वाब हैं, आँखों में चुभ जायेंगे
पलकों पे लेना इन्हें, आँखों में रुक जायेंगे

गुलझारचं हेच वैशिष्ठ्य आहे, फारसं न बोलता प्रचंड काही सांगून जातात. मानवी आयुष्यात स्वप्नांचं महत्त्व अनमोल आहे. पण म्हणूनच स्वप्ने ही काचेसारखी असतात. विलक्षण जपावी लागतात, जरा हलगर्जीपणा झाला, थोडी जरी चुक झाली तरी तडा गेलाच म्हणून समजा. पापणीवर अलगद रेंगाळणार्‍या आंसवांप्रमाणे हळुवारपणे जपावं लागतं त्यांना. नाहीतर मग प्राक्तन फक्त आणि फक्त वेदना असते.

गंमत बघा, इथे गुलझारसाहेब किती सहजपणे शब्दांशी खेळतात. एकीकडे 'फिर वही रात है' असे सांगताना तिच्या जुन्या रम्य आठवणींना उजाळा देण्याचं काम करतानाच, ती रात्र (दु:स्वप्न) आहे, पण म्हणूनच लवकरच संपणार, नवी, नव्या सुखांची पहाट होणार याचेही सुतोवाच करतात. इथे तिचे सांत्वन करतानाच 'मी काहीही झाले तरी कायम तुझ्या सोबत आहे" हे अगदी सहजपणे तिला सांगून जातात..... "रात भर ख्वाबमें, देखा करेंगे तुम्हें"......

हे गाणं चालु असताना कॅमेरा हलके हलके कधी विकासच्या तर कधी आरतीच्या चेहर्‍यावर फिरत राहतो. विकासच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहणारं प्रेम आणि त्याचवेळी आरतीच्या डोळ्यातून जाणवणारं प्रचंड तुटलेपण आपल्याला आजुबाजुचं सगळं काही विसरायला लावतं.

मासूम सी नींद में, जब कोई सपना चले
हमको बुला लेना तुम, पलकों के पर्दे तले

"मासूमसी नींद" ... स्पेशल गुलझार स्पर्श ! हे असलं काही गुलझारच करु जाणे. इथे पण बघा, परत शब्दांशी , त्यांच्या अर्थाशी खेळणं, त्यांना लडिवाळपणे गोंजारणं आहेच. इथे तुझ्या स्वप्नात सुद्धा मला जागा हवी अशी लाडिक मागणी करतानाच तिथे सुद्धा मी कायम तुझ्या बरोबर, तुझ्या पाठीशी आहे अशी आश्वासक प्रेमाची खात्री देणारे हे शब्द. गाणं संपत येताना विकास तीला झोप लागलीय असं समजून हलकेच 'आरती'च्या अंगावरचं पांघरूण सारखं करतो. खिडकीचे पडदे ओढून घेवुन दिवे मालवतो आणि पलंगाशेजारी टिपॉयवर ठेवलेला टेबल लँप बंद करण्यासाठी म्हणून पलंगाच्या त्या बाजूला जातो आणि नेमके त्याच वेळी त्याच्या लक्षात येतं की ती अजुनही जागीच आहे....

त्या क्षणी क्षणभर, अगदी क्षणभरच विकासचा वेदनेने पिळवटलेला चेहरा आपल्याला दिसतो, त्या एका क्षणभराच्या दर्शनाने आपण मुळापासून हलतो. दुसर्‍याच क्षणी विकासच्या चेहर्‍यावर परत हास्य येते आणि आपण अजुनच हळवे होतो. केवढी विलक्षण कुचंबणा आहे. तिचं सांत्वन तर करायचंय पण त्यावेळी स्वत:ची वेदना मात्र दाबून टाकायची.

उगीच नाहीत म्हणत 'प्रेम ही जगातली सर्वोत्कृष्ट भावना आहे' म्हणून.......

या गाण्यावरून अजुन एक असंच सुंदर गाणं आठवलं गुलझार आणि रेखाचंच.....

यात पहिल्या कडव्यात गुलझारसाहेबांनी एक शब्द वापरलाय... "कांच के ख्वाब" ! असंच एक नितांत सुंदर गाणं गुलझारसाहेब आणि रेखाने दिलं होतं 'आस्था' या चित्रपटात....

तनपें लगती 'कांचकी बुंदे, मन पे लगे तो जानूं...
बर्फसे ठंडी आगकी बुंदे, दर्द चुगे तो जानू....

या गाण्याबद्दल पुढच्या लेखात. तो पर्यंत 'घर' मधलं हे गाणं ऐका, जमल्यास अनुभवून पाहा.

https://www.youtube.com/watch?v=C-5WjfVmxKQ&w=560&h=315

हा सगळा लिखाणाचा प्रपंच खरेतर 'किशोरदांच्या' अफाट सामर्थ्याला दाद देण्यासाठीच आहे. (संगीताबद्दल सुद्धा नंतर कधीतरी) पण त्यावर मी काही बोलण्यापेक्षा हे गाणे आणि किशोरदांचे सुरच अधिक प्रभावीपणे बोलू शकतील म्हणून त्यावर काही भाष्य करण्याचा करंटेपणा हेतुपुरस्सर टाळला आहे. क्षमस्व

विशाल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रस्तुत लेखात लेखकाने रेखा च्या अभिनया बद्दल जे लिहलंय, ते प्र चि मध्ये स्पष्ट उमटलंय.
एकदम योग्य प्र चि. व्वाह

मस्त!
या गाण्याबद्दल काही लिहीणे किती अवघड आहे!
गिटार, मादल आणि रेसो-रेसो हा आर्डी सिग्नेचर वाद्यमेळ! itwofs च्या मते https://www.youtube.com/watch?v=Eh1JJqfO_rA याचा थोडा प्रभाव आहे.

व्वा ! विशाल भाउ,

एकदम मस्त गाणं.
पंचम दा आणि गुलजार साहेब ज्या वेळी एकमेकांना भेटले असतील तो क्षण स्वतः वरच लुब्ध झाला असेल, इतकी अविट गाणी ह्या जोडी ने आपल्याला दिली आहे. हिंदी चित्रपट संगीताला जसा अभिजाततेचा समृद्ध वारसा आहे तसाच उचलेगिरीचा शाप ही मिळाला आहे, पण पंचम ह्या बाबतीत फार निराळे होते. Western ट्युन आवडली तर ढापण्या पेक्शा ती improvise करुन वापरणे त्यांनी नेहेमीच पसंत केले. वरिल गाण्याची ट्युन ही Carpenters ह्या बँड च्या Sing a song गाण्यावरुन बेतलेली आहे. पहा:
www.youtube.com/watch?v=2LYekeK0HWo
पण हिंदीत वापरताना पंचम दांनी त्याचे सोने केलयं

विशाल तुम्ही लिहिले छान आहे.. पण एक सांगू का असे कधी म्हणू नये की अमुक हे काम फक्त ह्यालाच जमेल त्यालाच जमेल. जसे तुम्ही इथे लिहिले हे फक्त गुलझारच लिहू जाणे. इतके छान छान साहित्य निर्माण झाले ते काय फक्त गुलझार होते म्हणून!!!

रसग्रहणामधे स्तुती खूप झाली आहे. कितीतरी गायक उपेक्षित राहिलेले आहेत.

रेखा ही कुठल्याही सिनेमात चांगलाच अभिनय करते. तिचा अभिनय कधीच व्यर्थ जात नाही.

मस्त लिहिलं आहेस. हे गाणं आवडतं आहेच, पण त्यातही गुलझारचे शब्द. गुल्झारच्या गाण्यांचं एक वैशिष्ट्य असतं, तो कधीच "गाणं" लिहत नाही. त्या सिनेमामधल्या गोष्टींचाच एक भाग काव्यमय रूपात लिहितो, त्यामुळे कितीही लिहिलं तरीही ते मूळ सिनेमाच्या गाभ्याशी फटकून कधीच नसतं. म्हणून गुलझार ग्रेट!!

<<<गुल्झारच्या गाण्यांचं एक वैशिष्ट्य असतं, तो कधीच "गाणं" लिहत नाही. त्या सिनेमामधल्या गोष्टींचाच एक भाग काव्यमय रूपात लिहितो, त्यामुळे कितीही लिहिलं तरीही ते मूळ सिनेमाच्या गाभ्याशी फटकून कधीच नसतं. म्हणून गुलझार ग्रेट!!>>>

'बी' , बहुदा तुम्हाला तुमच्या शंकेचे उत्तर मिळाले असेल नंदिनीच्या पोस्टमध्ये.

<<जसे तुम्ही इथे लिहिले हे फक्त गुलझारच लिहू जाणे.>>>> एखाद्याच्या लेखनाची स्तुती करण्याची ही पद्धत असते 'बी'. याचा अर्थ असा नाही होत की आणखी कुणाला जमणारच नाही. पण ही शैली, ही पद्धत ही केवळ गुलझारचीच मिरासदारी आहे, असते असा त्याचा अर्थ होतो.

<<<रसग्रहणामधे स्तुती खूप झाली आहे. कितीतरी गायक उपेक्षित राहिलेले आहेत.>>>>

या लेखात आपण या गाण्याच्या गायकाबद्दल बोलतोय. ज्याला भारतीय चित्रपटसंगीताच्या इतिहासात "दी किशोर कुमार" म्हणून ओळखलं जातं. या गाण्याबद्दल बोलताना , खरेतर कायमच किशोरबद्दल बोलताना स्तुती खूप आणि खूपच होते, ते अपरिहार्य आहे. इतर कितीतरी गायक उपेक्षीत राहिलेले आहेत हा किशोरदाचा दोष नाही किंवा मला / रसिकांना ते किशोरदांइतके आवडत नसतील हा ही आमचा किंवा त्यांचाही दोष नाहीये. ही फक्त ज्याची त्याची आवड आहे.

<<या गाण्याबद्दल काही लिहीणे किती अवघड आहे!
गिटार, मादल आणि रेसो-रेसो हा आर्डी सिग्नेचर वाद्यमेळ>>>

आगाऊ, म्हणूनच मी संगीताबद्दल बोलायचे धाडस केले नाही. Wink

नंदिनी, पूर्णपणे सहमत आहे.

मनःपूर्वक आभार मंडळी !

विशालभाऊ सुरेख लिहिलंय. तुमच्यातला कवीच असं लिहु शकतो Happy

आणि गाण्याच्या निवडीबाबत काय बोलणार? नितांतसुंदर गाणं. गाण्याची प्रकृती ओळखुन संगीत दिलंय आरडींनी. काही गाणी ऐकताना आपल्याला अगदी वेगळ्याच विश्वात घेऊन जातात नाही?

व्वा! लेख मस्त जमलाय! माझे आवडते गाणे!

>>गुल्झारच्या गाण्यांचं एक वैशिष्ट्य असतं, तो कधीच "गाणं" लिहत नाही. त्या सिनेमामधल्या गोष्टींचाच एक भाग काव्यमय रूपात लिहितो, त्यामुळे कितीही लिहिलं तरीही ते मूळ सिनेमाच्या गाभ्याशी फटकून कधीच नसतं. म्हणून गुलझार ग्रेट!!>> नंदिनी , अगदी अगदी!

मस्त रे!
मला गाण्याची पार्श्वभूमी माहिती नव्हती.
बाकी नंदिनीच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

विशाल भाऊ मस्त लेख. घर मधली सगळी गाणी आवडतात आणि गुलजारांच्या लेखनशैली बद्दल मी पामर काय बोलणार.

धन्यु!

छान लिहिलं आहे .
माझ्या आवडत्या गाण्यांपैकी आहे हे गाणं पण त्याची पार्श्वभूमी ठाऊक नव्हती.

मस्त गाण्याची आठवण करून दिलीत. Happy

बाकी कशाहीपेक्षा मला हे विकासच्या पेशन्सचं गाणं वाटतं. 'हम को बुला लेना तुम..' तो नवरा आहे, पण तिची नाइटमेअर्स संपून तिला पुन्हा मासूम स्वप्नं पडायला लागेपर्यंत, त्यांत तिने आपण होऊन बोलावेपर्यंत थांबायची त्याची तयारी आहे.

त्याचं स्वप्न ती आहे, पण अट्टहास केला तर काय होतं माहीत आहे ना? स्वप्नांना तडे जातात आणि नुसत्या काचा रुतत राहतात डोळ्यांत! तो ते करणार नाहीये. 'पलकोंपे बिठाना' म्हणजे adore करणे. आत्यंतिक प्रेम, कौतुक, आदर, सन्मान असं सगळं येतं त्यात. He adores her!

त्याच्या मनात आपल्याबद्दल किंतु आलाच असणार या भीतीने पछाडलेली (पॅरानॉइड झालेली) आरती.. तिला ती भीती किती निराधार आहे हे समजेपर्यंत तिचा आधार होऊन राहणं ही तारेवरची कसरत आहे. पण कठीण असलं म्हणून कोणी स्वप्नं जपायचं थांबवतं का?

-----

बाकी गुलझार, आरडी आणि किशोर कुमार यांच्याबद्दल लिहावं तितकं कमीच. तेव्हा ते राहू दे. Happy