देऊळ

Submitted by भारती.. on 27 January, 2015 - 10:24

देऊळ

जिथे काळ थांबे तिथे थाटलेले
कधीचेच ते भव्य देऊळ आहे
स्मृती आणि स्वप्नांस ओलांडताना
धुक्याच्या दरीशी दिसे भासताहे

ढळे सांज तेथे जळे दीपमाळा
जुन्या वेदनावेदिपाशी नव्याने
झळाळे पुन्हा दु:खसौंदर्य सारे
किती न्याहळू मंत्रमुग्धाप्रमाणे

अमर्याद आवार विस्तारलेले
निनादून घंटाध्वनी दूर जाई
जरा गारवा दाटतो आसमंती
जळी तीर्थकुंडातल्या कंप येई

इथे पायरीशीच मी तिष्ठताना
सरे वाटते जन्म काही कळेना
कुणाची प्रतीक्षा कशाची उदासी
झरे शून्य काही मला आठवेना

क्षणांच्या सवे आत गर्भगृहाच्या
खुळे शब्द माझे पुन्हा चाललेले
मला उंबऱ्याशीच ठेवून मागे
असे काय शोधायला हे निघाले ..

-भारती बिर्जे डिग्गीकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा गारवा दाटतो आसमंती
जळी तीर्थकुंडातल्या कंप येई

क्षणांच्या सवे आत गर्भगृहाच्या
खुळे शब्द माझे पुन्हा चाललेले
मला उंबऱ्याशीच ठेवून मागे
असे काय शोधायला हे निघाले ..<<<

फार सुरेख, शांत!

माझी ही एक रचना उगीच आठवली.

सुरेख! Happy

वेदनावेदी.. हा शब्द मनात रेंगाळत राहिला आहे. Happy
(हे हृदय नसे परि स्थंडिल धगधगलेले... Happy )

वाह!
इथे पायरीशीच मी तिष्ठताना
सरे वाटते जन्म काही कळेना
कुणाची प्रतीक्षा कशाची उदासी
झरे शून्य काही मला आठवेना

सुंदर.

मी तुमची फॅन झाले आहे.

आवडली. निःशब्द.
असे काय शोधायला हे निघाले .. >> हे वाचताना काहीतरी खटकलं. चाललेले वरून त्या प्रकारचा शब्द नाही म्हणून असेल. चूक का बरोबर माहित नाही.

<<<<क्षणांच्या सवे आत गर्भगृहाच्या
खुळे शब्द माझे पुन्हा चाललेले
मला उंबऱ्याशीच ठेवून मागे
असे काय शोधायला हे निघाले >>>> या ओळी विशेष आवडल्या . पूर्ण कविताच मस्त आहे

वा! खुळ्यावल्यागत वाचत रहावं आणि सारंच चित्रदर्शी होऊन जावं.. आणि..

इथे पायरीशीच मी तिष्ठताना
सरे वाटते जन्म काही कळेना
कुणाची प्रतीक्षा कशाची उदासी
झरे शून्य काही मला आठवेना>>> ही भावावस्था अगदी ओळखीची, अगदी माझी वाटावी.. असं झालं अगदी!

सुरेख!

क्षणांच्या सवे आत गर्भगृहाच्या
खुळे शब्द माझे पुन्हा चाललेले
मला उंबऱ्याशीच ठेवून मागे
असे काय शोधायला हे निघाले .. >>> व्वाह! खूपच सुंदर ...

भारतीताई,

पूर्ण कविता खास आहे. शेवटची ओळ तर जबरदस्त आहे. Happy

ही शोकान्त कविता वाटते. मात्र हा शोक दु:खदायक नाहीये. सासरी जाणारी मुलगी जशी रडते तसा हा शोक वाटंत राहतो.

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद भारतीजी… इतकी अजोड शब्दरचना वाचायला दिल्याबद्दल . .मी आत्तापर्यन्त मायबोलीवर वाचलेल्या सर्व कवितांमधली सर से पावतलक सर्वान्गसुन्दर भाव तरलअशी ही कविता वाटली....एक शब्दातीत सुंदर औदासिन्य देवळाच्या रम्यगुढ आसमंतात मनाने वावरताना महसूस करता आले
आता एव्हढच म्हणेन ,
`अशा रंगापाशी मातीचे चांदणे
पल्याडचे जिणे जन्माआधी '
ग्रेस

नेहमीप्रमाणेच अतिशय सुरेख. त्या शब्दापलिकडील सुरेख.

माझ्यामते हे मुलीने सासरी जाणे नाही. जिवाने शरीर सोडणे आहे. सोडून जाताना आत्म्याला / जिवाला काय वाटेल ते लिहीले आहे. सव भौतिक जीवन खाली राहिले, जुनी दु:खे एकदा मन भरून पाहिली. पण आता त्यात काही इन्वॉलव्मेंट नाही. मंदिराच्या पायथ्याशी जीव आला आहे व तिथून तो आता जाणार आहे आता कसले आणि काय शोधत आहेत हे शब्द. असे.

मी तुमच्या प्रतिभेच्या प्रेमात आहे.

सुरेख रचना
अकल्पिताची जाणीव/ओळख होतानाची भावपूर्ण अवस्था, तीही इतक्या रेखीव तरल शब्दांत, यू आर अ मार्व्हल !

भुईकमळ आणि अमा यांनीही सुंदर लिहिलंय.

अमा,

>> सोडून जाताना आत्म्याला / जिवाला काय वाटेल ते लिहीले आहे.

तेच तर! एक घर सोडून दुसऱ्या घरी जायचं! Happy

आ.न.,
-गा.पै.

अमा टु गामा>> अहो ही भावना नववधु प्रिया मी बावरते गाण्यातही अशीच येते साधारण. एका कवितेचे वेग्ळे इंटर प्रिटेशन. अशी दोन्ही भावना ये गलियां ये चौबारा गाण्यातही येते. रसग्रहण माझा प्रांत नाही जे मनात आले कविता वाचून ते लिव्हले आहे.

अत्यंत अत्यंत आभार सर्वांचे!
तुमची सुंदर कविता वाचली बेफिकीर , साम्यविरोध स्थळं असलेली.
अमा, गामा,भुईकमळ,अमेय, सहमत .''रसग्रहण माझा प्रांत नाही'' असं म्हणणाऱ्या लोकांनी इतकं समरसून लिहिलं आहे या कृतीवर की मी काही बोलायची गरज नाही. अगदी मर्मबंधातली ठेव आहे ही, एवढंच ..