प्रेमाचा नवा संपात

Submitted by वैवकु on 25 January, 2015 - 10:23

बरेही होत नाही ते कश्याही झाडपाल्याने
जिभेला वेड लावावे कुण्या गोपाळकाल्याने ?

मुळी लिहिलेच नसते तर कुठे बिघडायचे होते
मनाचे एक रामायण तरी केलेच वाल्याने

फुलांच्या गंधकोशाना सुगावा लागला माझा
कुणाला काय मिळते हो कुणाचा घात झाल्याने

कितीदा प्राण घ्यावा हा नियम का पाळला नाही
तुझ्या नजरेत लपलेल्या दयेच्या दग्ध भाल्याने

कुठे त्रिज्या बदलली की कुठे हलला तुझा बिंदू
तुझ्या परिघात प्रेमाचा नवा संपात आल्याने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाल्याचा शेर आवडला. काही ओळी फार छान आल्यात.
बरेही होत नाही ते कश्याही झाडपाल्याने

कुठे त्रिज्या बदलली की कुठे हलला तुझा बिंदू
तुझ्या परिघात प्रेमाचा नवा संपात आल्याने

संकल्पना वेगळी वाटली. संपात शब्दाचा अर्थ शेराच्या संदर्भात लागला नाही.
धन्यवाद.

धन्यवाद समीरजी

संपात म्हणजे मीलन . एक रेषा एका बिंदूला जिथे मिळते त्याला संपातबिंदू म्हणतात टँजेंट (स्पर्शिका ) परिघाला(सर्कम्फेरेन्स) जिथे मिळते त्याला टँजेंट पॉइन्ट (संपातबिंदू) किंवा पॉइन्ट ओफ इन्टरसेप्शन म्हणतात .

शेरात पहिल्या ओळीतला बिंदू म्हणजे सेंटर ऑफ सर्कल आहे .एकंदर शेर विठ्ठलावर आहे आयुष्यात ( परीघ) प्रेमाचा नवा संपात(बायको ) आल्याने त्रिज्या कुठे बदलली (गझल) की केंद्र कुठे हलले (विठ्ठल ) असा आशय आहे {बायको ही त्या परिघाला केवळ चाटून जाणारी स्पर्शिका असावी अश्या भावनेतून शेर आला असावा. )

आधी एकदा (अर्थात लग्नापूर्वी :)) वेगळ्या आशयाचा पण वर्तुळाच्या भूमितीचा संदर्भ घेवूनच एक विठ्ठलाचा शेर केलेला...

नेणिवबिंदूंतुन काही त्रिज्या खेचूया म्हटले
पण ह्या अमोघ परिघाला बहुधा संपातच नाही Happy

ह्या शेरात आतून बाहेर पडणार्‍या रेशेनी परिघ ठरवण्यासाठी संपात शोधून पाहिल्यावर तो सापडतच नाहीये हे पाहून बाहेरून आलेल्या स्पर्शिकेच्या सहाय्याने तो निश्चित करण्याचा प्रयत्न नव्या शेरात झाला असावा Happy

धन्यवाद समीरजी

कितीदा प्राण घ्यावा हा नियम का पाळला नाही
तुझ्या नजरेत लपलेल्या दयेच्या दग्ध भाल्याने

कुठे त्रिज्या बदलली की कुठे हलला तुझा बिंदू
तुझ्या परिघात प्रेमाचा नवा संपात आल्याने

व्याकुळता आणि व्यामिश्रता साध्य झाली आहे गझलेत

फुलांच्या गंधकोशाना सुगावा लागला माझा
कुणाला काय मिळते हो कुणाचा घात झाल्याने

कितीदा प्राण घ्यावा हा नियम का पाळला नाही
तुझ्या नजरेत लपलेल्या दयेच्या दग्ध भाल्याने<<<

सुरेख शेर

गझल आवडली.

बरेही होत नाही ते कश्याही झाडपाल्याने
जिभेला वेड लावावे कुण्या गोपाळकाल्याने ?

मुळी लिहिलेच नसते तर कुठे बिघडायचे होते
मनाचे एक रामायण तरी केलेच वाल्याने

वाह ! मस्त शेर.

कुठे त्रिज्या बदलली की कुठे हलला तुझा बिंदू
तुझ्या परिघात प्रेमाचा नवा संपात आल्याने << तुम्ही सांगितल्यानंतर छान अर्थ लागला . धन्स. Happy

विकु, खूपच छान जमली आहे गझल. समीरजींप्रमाणे मलाही संपातचा अंदाज लागला नव्हता पण तुमचे विवेचन वाचल्यावर सुखद आनंद मिळाला. कविता सापेक्ष असते ह्याची प्रचिती आली कारण मी सुरवातीला जो अर्थ घेतला होता तो अर्थ तुमच्या मनी नव्हता.

धन्यवाद तुम्हा दोन्ही काव्यप्रेमींचे.

धन्यवाद भारतीताई गझल विभागात बरेच दिवसांनी दिसलात

पाटील आपले म्हणणे पटते आहे कारण दयेचा आणि दग्ध हे दोन शब्द मला सुचताना खूप त्रास देवून गेले सुचता सुचत नव्हते मात्राही भरायच्याच होत्या माझ्याकडे दोन तीन पर्याय होते पण रुचत नव्हते मग ही गझल इथे पेश करताना मला अचानक हे दोन शब्द सुचले अनुप्रास उच्चाराची मजा देत होताच मग मी ते तसेच ठेवले मला एकंदर कल्पनाच स्पष्ट झालेली नाहीये अजून ती दयेचा दग्ध भाला वाली .पण पण् एक निश्चित असा अर्थ काढता येतोय आणि मला त्याच्याशी रीलेटही व्यवस्थित करता येतेय म्हणून तूर्तास बदलत नाही आहे .धन्यवाद आपले

बी आपलेही विशेष आभार पण् मी विकु नाही विकु इस फॉर विशाल कुलकर्णी मी वैभव कुलकर्णी ! वैभव वसंतराव कुलकर्णी !! असो आपल्याला लागलेला अर्थ जाणून घ्यायला खूप आवडेल Happy

खुरसाले धन्यवाद

बेफीजी आपले विशेष आभार आपल्या प्रतिसादाची खूप वाट पाहत होतो मी धन्यवाद सर Happy

मुळी लिहिलेच नसते तर कुठे बिघडायचे होते
मनाचे एक रामायण तरी केलेच वाल्याने >>>>>>वा वा वा वा

मुळी लिहिलेच नसते तर कुठे बिघडायचे होते
मनाचे एक रामायण तरी केलेच वाल्याने.............मस्त !

फुलांच्या गंधकोशाना सुगावा लागला माझा
कुणाला काय मिळते हो कुणाचा घात झाल्याने..... क्या बात !

कितीदा प्राण घ्यावा हा नियम का पाळला नाही
तुझ्या नजरेत लपलेल्या दयेच्या दग्ध भाल्याने...... वा वा !