देवपूरकरांची एक गझल

Submitted by वैवकु on 22 January, 2015 - 08:32

नमस्ते !
अज मी देवसरांची एक गझल त्यांच्या परवानगीने इथे पोस्ट करत आहे . हे असे दुसर्‍याचे लेखन प्रकाशित करणे मायबोलीच्या आणि माझ्याही नियमात बसत नसले तरी त्यांच्या गझलेवरील प्रेमापोटी मी तसे करत आहे इतकेच सांगून गझल आपणास सुपूर्द करतो...बाकीचे नंतर बोलू
________________________________________________________

भान आले, पण कधी?.....मी राख बनल्यावर!
जग मला शोधीत आहे, मी न उरल्यावर!!

तू दिला मज हात पण मज शुद्धही नव्हती
वाट झाली बिकट माझी, हात सुटल्यावर!

ओळखाया येत नाही जवळ असले की,
मोल कळते माणसाचे, जवळ नसल्यावर!

ना कुणासाठीच थांबत काळ केव्हाही
फोल ठरती औषधेही वीष भिनल्यावर!

हे तुझ्यासाठीच आहे डवरणे माझे
तोड तू मजला परंतू पूर्ण फुलल्यावर!

मांड ताळेबंद तू आताच जगण्याचा
काय रे उपयोग सारे श्वास सरल्यावर?

पाहिजे चिंतन, मनन, नंतर कृती व्हावी
व्यर्थ आहे मनन करणे, गोष्ट घडल्यावर!

पाहिजे ताबा स्वत:च्या बोलण्यावरती
येत ना माघार कुठला बाण सुटल्यावर!

झापडे लावून झाले खूप हे जगणे
काय तू जगणार हे डोळेच मिटल्यावर?

स्पष्ट दिसते आपल्याला आपली प्रतिमा
काळजाच्या आरशाला स्वच्छ पुसल्यावर!

प्राचार्य सतीश देवपूरकर
फोन: ९८२२७८४९६१

_______________________________________________________

ह्या गझलेची काही वैशिष्ठ्ये आपल्याला जाणवली असावीत . देवपूरकरांची पश्चातापाची मनस्थिती दिसते आहे .असो पण ही गझल मी इथे दिली कारण त्यांनी परवा अनेक महिन्यांनी स्वतःहून माझ्याशी फेबु संपर्क साधून ही सादर केली . ही त्यांची चौदाशेवी (१४००) गझल असल्याचे ते म्हणाले ह्या पुढची एक १४०१ वी आहे आणि तिथे त्यांचे २० गझलसंग्रह लिहून पूर्ण होत आहेत ह्या १४०० गझलांमध्ये त्यांनी तब्बल १०३ प्रकारची वॄत्ते हाताळली आहेत .
ह्या त्यांच्या कामाबद्दल आपण मायबोलीकरांनी त्यांचे अभिनंदन करायलाच हवे !!

आपणापैकी अनेकजण नक्कीच देवसराना मिस करत असाल .तेही आपल्याला सर्वाना मिस करत आहेत त्याना आपणासर्वाना प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा आहे त्याचा बेत नंतर आखूच आपण

पण माझी स्पेशल विनंती आहे की कृपया ह्या धाग्यावर देवसरांचा अवमान होईल असे कुणी बोलू नका गझलमध्ये ़जर काही आवडले तर त्याची मनमोकळी तारीफ केलीत तर उत्तमच कारण देवपूरकर माबो सदस्य नसले तरी आवर्जून इथे भेट द्यायला येणार आहेत असे त्यांनी कबूल केले आहे

असो आता माझ्या बडबडीमुळे लिंक तुटली असेल तर प्रतिसाद देण्यापूर्वी गझल पुन्हा वाचाल का प्लीज Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे गझल! Happy

मतला आणि हे खालचे शेर आवडले.

>>>तू दिला मज हात पण मज शुद्धही नव्हती
वाट झाली बिकट माझी, हात सुटल्यावर!

ओळखाया येत नाही जवळ असले की,
मोल कळते माणसाचे, जवळ नसल्यावर!

हे तुझ्यासाठीच आहे डवरणे माझे
तोड तू मजला परंतू पूर्ण फुलल्यावर!<<<

आमचीही आठवण सांगावीत त्यांना!

गझलेवरचे प्रेम ही एक कॉमन बाब इतर सर्व गोष्टींपेक्षा महत्वाचीच!

धन्यवाद वैवकु!