आपण इथे असण्याची कारणे

Submitted by बेफ़िकीर on 21 January, 2015 - 10:34

आज कोणी एक मायबोली सदस्य स्वतःचे सदस्यत्व घालवून बसला. प्रशासनाने हा निर्णय घेताना त्या सदस्याचा कालावधी, त्या कालावधीत त्याने मन लावून केलेले 'अवतारकार्य' व मायबोलीच्या उमद्या प्रवाहाला सोडून निव्वळ विशिष्ट सामाजीक / राजकीय भूमिकेचा प्रसार करण्याची मानसिकता बहुधा मापली.

त्या सदस्याने ही गोष्ट त्याच्या स्वतःच्या मनाला तितकी लावून घेतली नसेलही, कारण त्याला त्याचा अंत कदाचित माहीत असावा. किंबहुना, काही काळ स्वतःच्या भूमिकेचा दबदबा निर्माण करण्याच्या हेतूनेच त्याने सदस्यत्व घेतले असावे. कदाचित, तो येथल्याच कोणाचा आणखीन एक आय डी असेलही!

त्या सदस्याचे सदस्यत्व नष्ट झाल्यावर काही इतरांकडून झालेला उत्सव शिसारी आणणारा होता.

पण मायबोली म्हणजे फक्त राजकीय चर्चा किंवा राजकीय हेतूने आरंभलेल्या चर्चा नाहीत.

येथे अंगभूत कलेला वावही आहे आणि व्यक्तीस्वातंत्र्यही आहे.

मी मायबोलीवर आलो त्यापूर्वी केव्हापासूनच आणि आजतागायतही येथे अनेक प्रकारचे धागे निर्माण होतात.

'मायबोली हे एक उथळ संकेतस्थळ आहे' असे काही इतर स्थळांच्या चालकांकडून ऐकलेले वाक्य मी तिथल्यातिथेच परतवून लावलेले होते. ह्याचे कारण माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार मायबोली तुम्हाला व्यक्त व्हायला कधीही आडकाठी करत नाही. कारवाई झालीच तर ती निव्वळ विशिष्ट हेतूने कार्यरत असलेल्या सदस्यांवर, तेही, जर त्यांचे हेतू निव्वळ वादोत्पादक किंवा अशोभनीय असले तर.

प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेबाबत काही बोलण्याचा ना कोणाला नैतिक अधिकार आहे ना कोणाची ती योग्यता! पण आपण स्वत: 'तूर्त चालू असलेल्या राजकीय उखाळ्यापाखाळ्यांचे अस्तित्त्व' दिसत असूनही मायबोलीवर येणे किती एन्जॉय करतो व का करतो ते कृपया लिहावेत अशी विनंती!

अत्यंत परस्परविरोधी मतांचे लोक येथे येऊन नांदत राहतात, नांदू शकतात. मायबोली राजकीय धाग्यांपलीकडे खूप काही आहे. असे तुम्हाला वाटते का? की आता येथे फक्त तेच तेच चाललेलेल असते असे वाटते?

नम्रपणे मान्य करतो की हा प्रश्न विचारण्याची योग्यता माझी नाही कारण माझ्यापेक्षा दहा, दहा वर्षे आधीपासून येथे असणारे कित्येक सदस्य आहेत. पण तेही इथे अजूनही येतातच.

खूप काही बिनसल्यासारखे आपल्याला तरी वाटत नाही राव! अजूनही अनेक इतर गोष्टींचा आनंद घेता येतो.

कृपया, तुमची उत्स्फुर्त मते येथे द्यावीत अशी विनंती! ही विनंती करतानाही मला प्रशासनाने दिलेल्या स्वातंत्र्याचाच मी एक प्रकारे वापर करत आहे ह्याची नम्र जाणीव आहे. पण मत द्यायचे नाही असे कृपया करू नका. जे काय असेल ते मत द्या!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त आणि फक्त वाचण्यासाठी मायबोलीवर आले रस्ता चुकून आणि जुन्या गुलमोहोरातल्या सुपरमॉम, दाद, नंदिनी, कवठीचाफा, विशाल यांच्या कथा वाचत गेले... वेगवेगळे विषय चर्चिले गेले, मतमतांतरे, वाद-प्रतिवाद वाचले... त्यातून मला स्वतःला वारंवार पडताळून घेता आले... कधी सक्रिय प्रतिसादक म्हणून कधी फक्त रोमात राहून! माझ्या स्वभावाप्रमाणे चांगले ते ते घ्यावे बाकीचे सोडून द्यावे करत गेले... जाणीवा-नेणीवा प्रगल्भ बनत गेल्या... नवनवीन साहित्यप्रकार वाचायला मिळाले, तोंपासू रेसिपीजपासून, फॅशन, मेकअप, तंत्रज्ञान, कधी थकल्या भागल्या जीवाला निखळ करमणूक... जिव्हाळ्याने दिलेले तर कधी व्यावहारीक दृष्टीकोनातून दिलेले सल्ले तर कधी नुसताच नंबर शेअर करून कधी बोलावसं वाटलं तर कधीही हक्काने बोल किंवा लांबलचक मेल्स मधून संवाद... मायबोली फक्त एक संकेतस्थळ न राहता विचार, भावनांचे आदान्प्रदान करणारी हक्काची खिडकी वाटायला लागली... आपल्या नजरेतून बाहेरचे जग पाहणारी...

सस्मित>> अनुमोदन
मायबोलीने मला काही अशी माणसांशी ओळख करून दिलीये की त्यांकरिता मी मायबोलीची जन्मभर ऋणी आहे >> +११११११ प्रत्यक्ष कोणाला जास्त ओळखत नसले तरी जेवढ्यांना जेवढं ओळखते ते सगळे त्या त्या स्वभावासकट पटलेत आणि आवडलेतही!!

>>>> मायबोली नावाची वेबसाईट त्या कथेतील घोडा आहे! <<<< Uhoh
तुम्हाला असे तर म्हणायचे नाही ना की मायबोली ही साईट "तबेला" आहे अन येथील सभासद घोडा/घोडी आहेत? Proud

>>> खूप काही बिनसल्यासारखे आपल्याला तरी वाटत नाही राव! <<<<
बरोबर
खूप काही बिनसल्यासारखे वाटण्याची गरज वाटेल, पण ते केव्हा?
तर जेव्हा मी माझ्या फ्लॅटचा दरवाजा आतुन लावून घेऊन मग माझ्या घरात हवातसा धुडगुस घालू शकतो यात आनंद मानित असेन, व इथे मायबोलीवरही तशीच "रिझर्व्ड" नियंत्रित लोकसंख्या अपेक्षित असेन !
प्रत्यक्षात घराचा उंबरठा ओलांडल्यावर भेटणार्‍या/भेटू शकणार्‍या असंख्य माणसांवर, त्यांच्या वागण्याबोलण्यावर आपल्याला आवडत असो वा नसो, नियंत्रण नसते तसेच इथेही भेटणार्‍या असंख्य आयडीजच्या लिखाणावर आपले नियंत्रण असू शकत नाही, असावे अशी अपेक्षाही चूक आहे, कारण हे काही दारास आतून कडीकुलपे लावुन बंदिस्त केलेले तुमचे खाजगी घर नाही !
ही सार्वजनिक जागा आहे, अन नेट उपलब्ध असलेया यच्चयावत व्यक्तिपैकी कोणीही इथे टपकू शकते हे लक्षात घेतले पाहिजेच.
असो

मी जुन्या मराठी कवितांच्या नादाने आले. आणि संख च्या कविता. त्याच्या फॅन क्लब मधे शिरुन त्याच्या बद्दल
वाचायला आवडायचं. तेव्हा मी रोमात होते. सदस्य नंतर झाले . पण इकड्च्या विशेष भाषेचं माझ्यावर गारुड झालं. आणि मग मी माय्बोलिकर झाले. Happy

मराठी कथा शोधताना एके दिवशी मायबोलीवर आले. 'बेफिकीर' यांची 'श्रीनिवास..' ही कादंबरी वाचली आणि झपाटलेल्यासारख्या बेफिंच्या सगळ्या कथा / कादंबर्या वाचुन काढल्या. माबोवर येण्याचे खरे कारण म्हणजे 'बेफिकीरच'.
२-३ महिने अज्ञातवासात राहुन माबोवरील बरेसचे लेखन वाचुन काढले व नंतर प्रतिसाद देण्याच्या बहाण्याने माबो सदस्य झाले. मी इथे आहे हे माझ्या व्यतिरिक्त कोणाला माहितही नसेल कारण माझा संबंध कधीतरी प्रतिसाद देण्यापुरताच. पण असे असले तरी मी इथे सतत पडीक असते, इथले लिखाण वाचत असते, इथली भांडणे, इथली आपुलकी सर्व काही एन्जॉय करते. एक दिवस जरी मी इथे आले नाही तरी मला चुकल्याचुकल्यासारखे होते. इथल्या बहुतेक सदस्यांना फक्त त्यांच्या लिखाणामुळे मी जणु वैयक्तिकरित्या ओळखते असे मला वाटते.

मला आवडते इथे यायला आणि मी येतच राहणार कारण मी माबो अ‍ॅडिक्ट आहे. Proud

मामा आणि आशुडी यांचे प्रतिसाद आवडले. मलाही तसेच वाटते.
मी सुरुवात कविता लिहिण्यापासून केली.
नंतर थोडे ललित लेखन आणि मुख्यत्वे भारतीय शास्त्रीय संगीताबद्दल लिखाण करत गेलो.
आजकाल फार वेळ मिळत नाही सर्व लेखन सविस्तर वाचायला, तरीही काही लेखक आवडीचे आहेत खास!
त्यांचे नांव दिसले की वेळ काढून लेख वाचतो.
सध्या मुख्यत्वे धन्य ते गायनी कळा ह्या ग्रूपवरचे लिखाण वाचण्यासाठी येतो आहे.
मायबोलीने भरभरून दिले आहे त्यामुळे दिवसातून किमान एकदा इथे डोकावतोच. मायबोली सोडण्याचा विचार आत्ता तरी करवत नाही.

मी इथे असण्याची कारणं....

सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे मायबोलीने मला एक ओळख दिली. तसा १९९४ पासून विविध वृत्तपत्रातून विविध प्रकारचे लेखन करत होतो. पण मायबोलीने 'चांगलं आणि उत्तम लिहायला शिकवलं'. सुरुवातीला खुप वेळा आणि खुपजणांशी भांडलो सुद्धा. पण त्या भांडणातून सुद्धा चांगले मित्र आणि मैत्र निर्माण झाले. मायबोलीमुळे लेखक म्हणून, काही प्रमाणात कवि म्हणून ओळख मिळाली. इतर संस्थळाकडून "अरे आमच्याकडे पण लिहा ना" अशी आमंत्रणे येवू लागली. मी खुप ठिकाणी लिहीले सुद्धा. परंतू कुठेच फार काळ नाही स्थिरावू शकलो. इथे जसं मन लागलं होतं तसं इतर कुठे नाहीच लागु शकलं.

मध्ये काही काळ माझा ब्लॉग सोडला तर इतर कुठेही लिहीणं बंद केलेलं होतं मी. पण त्या दरम्यान माबोवर वाचनमात्र होतोच. त्या दरम्यान एक गोष्ट लक्षात आली की मी जरी माबोपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असलो तरी ते शक्य नाहीये कारण माबोवरची माझ्यावर, माझ्या लेखनावर प्रेम करणारी माझी माणसं इतका मोठा खंड पडूनही आजही मला विसरलेली नाहीत. ही गोष्ट माझ्यासाठी खुप आनंददायी आहे. त्यामुळे पुन्हा इथे अ‍ॅक्टिव्ह व्हायला सुरूवात केलीय.

मायबोलीने खुप काही दिले. कौत्या, अज्ञात , पल्ली, आश्या (चाफा), धुंद रवि, उदय, दक्षी, मंद्या, आशुमाय, कवि, सई, स्मिता आणि असे कितीतरी जवळचे मित्र-मैत्रीणी दिल्या. गझलेच्या 'ग'पासून सुद्धा दहा पाऊले दूर राहणारा मी, पण कैलासदादा उर्फ डॉ. कैलास गायकवाड यांच्यासारखा गुरू लाभला आणि मी चक्क गझला लिहायला लागलो. शशांकदादा , शांकली, आरती (अवल), हर्पेन, मल्ल्या, उम्या (उमेश कोठीकर) यांच्या सारखी जीव लावणारी माणसे मिळाली. अजून काय हवे हो.

बाकी खुपदा ऐकतो की माबोचं काहीतरी बिनसलय. इथे लेखनापेक्षा लेखनावरच्या वादांचीच चर्चा फार जिव्हाळ्याची झालीय वगैरे वगैरे.. असेलही, कदाचित त्यात काही प्रमाणात तथ्य असेलही पण त्यामुळे केवळ आनंदासाठी म्हणून माबोवर येणार्‍या माझ्यासारख्या सर्वसामान्य माबोकराला फरक पडायचे कारण नाही. कारण शेवटी काय वाचायचे आणि कुठे, किती लक्ष घालायचे ते आपल्या हातात असते.

प्रत्येकाचा एक काळ असतो. उद्या कदाचित 'मायबोली' बदलेल, जुने जावून नवे मायबोलीकर येतील. जुने एकमेकांना खासकरून मलाही विसरुन सुद्धा जातील. पण मी किंवा यांच्यापैकी कोणीही मायबोलीला कधीही विसरणार नाहीत हे मात्र शंभर टक्के सत्य आहे.

मायबोली आवडते, मायबोलीकर आवडतात, इथे उत्तम मित्रमैत्रिणी भेटल्यात म्हणुन मी इथे असते.

भेंड्या खेळणे, गप्पा मारणे, दंगा करणे, झेपणा-या उपक्रमात सहभागी होणे, काव्य-शास्त्र-विनोद-कला-आरोग्य-समाज यावर केल्या जाणा-या हर प्रकारच्या लेखनाचा आनंद घेणे, नवनवे पदार्थ वाचणे-बघणे आणि काही जमल्यास करून बघणे, खुसखुशीत ते डोकेफोड व्हाया खमंग चर्चेचा आस्वाद घेणे, अगम्य विषयांवरच्या सुरस धाग्यांनी करमणूक करून घेणे, अस्वस्थता असेल तर मन मोकळे करता येणे, ज्येष्ठ/कनिष्ठ/जाणकार/माहितगार/नवशिके सर्वांकडून मिळणारे विविध सल्ले/मतं, यासारख्या अनंत कारणांसाठी मी मायबोलीवर असते.

व्यक्तिशः मला मायबोलीने खुप समृद्ध केलं म्हणुन मी मायबोलीवर असते Happy

मायबोलीवर तशी मी नविनच आहे. परदेशात राहून मराठी वाचन खूपच कमी झाले होते मायबोलीने ही कसर भरून काढली. छान छान कथा, कादंबर्‍या, ललित, कविता वाचता याव्यात आणि प्रतिसाद देता यावेत म्हणून मी सदस्यत्व घेतले. वेगवेगळ्या धाग्यांवर लोकांची मते वाचून प्रत्येक विषयामध्ये वेगवेगळे दृष्टीकोन मिळत गेले आणि मी सखोल विचार करण्यासाठी प्रवृत्त होत गेले. मग मला जाणवले की सांगण्यासारखे काही अनुभव माझ्याजवळसुद्धा आहेत. मग थोडेथोडे लिहायला चालू केले. येथील प्रतिसाद वाचून लिहायचा हुरूप खूप वाढला. आता कायम काहीतरी तरी लिहावे असे वाटते. लिहायला नविन विषय मिळावे म्हणून आजूबाजूच्या घटनांचे, माणसांचे निरिक्षण करायची आणि त्यातून मला काय शिकायला मिळते ते तपासायची एक सवयच लागली आहे. माझे व्यक्तिमत्व अजून समृद्ध करण्यामध्ये मायबोलीचे खूप मोठे श्रेय आहे.

बेफिकीर,

आयला, काय जबऱ्या सवाल टाकलाय तुम्ही! म्हणे, आपण इथे असण्याची कारणे सांगा!! Rofl

उंदीर मेल्यावर घाण कशी सुटते? किंवा गुळाच्या ढेपेला मुंगळे कुठून चिकटतात? अशा तऱ्हेचा हा प्रश्न नाही वाटंत? Light 1

असो. गंमत समाप्त. थोड्या गांभीर्याने सांगतो.

इथे आपापल्या क्षेत्रात प्रवीण असलेल्या तत्ज्ञांच्या लेखनाची खोली प्रकर्षाने जाणवते. अर्थात राजकीय चिखलफेक दुर्लक्षावी लागते. ते फारसं कठीण नाही. इथे येण्याचा केवळ रंजन हा हेतू ठेवला तर मला कंटाळा येणार हे माहितीये.

एक महत्त्वाची बाब म्हणजे इथे येणारा प्रत्येक माणूस मराठी आहे. त्याला कुणाचीही भाडभीड न बाळगता व्यक्त होता येतंय. म्हणून वैचारिक खाद्य मिळावं हा माझा प्रमुख हेतू आहे. रंजन झालं तर सोन्याहून पिवळं. आजून काय पाहिजे?

आ.न.,
-गा.पै.

मी मायबोली साठी नवीन असेन...पण मला तुम्ही सगळे जुनेच आहात...कारण मी गेले बरीच वर्ष नियमीत वाचक आहे...पण आता मला पण हळू हळू तुमच्यात भाग घ्यावासा वाटू लागला.
मी या पूर्वी पासून लेखनाचा प्रयत्न करते....पण इथले दर्जेदार लेखन विशेष भावले..... मग मी पण एक शोर्ट स्टोरी लिहायचा प्रयत्न केला आणि ती चक्क सप्ताहिक सकाळ्साठी घेण्यात आली... यात मायबोलीकरांचा नकळत मोठा वाटा आहे.....
म्हणून मला परत परत तुम्हा सर्वांना भेटावेसे वाटते.... आभारी आहे...

मराठी वाचायला आवडते म्हणून कुठून तरी लिंक मिळून इथे प्रथम आले. इतरांप्रमाणे आधी फक्त सभासद न होता वाचनमात्र होते. पण नंतर वाटायला लागले कि इथले लेखक इतके सुंदर लिहतात आणि आपण करंटे मात्र आवडल्याची पोच प्रतिसाद पण देत नाही. ह्याची खंत वाढली तेंव्हा सभासद झाले.
मला मायबोलीने खुप समृद्ध केलं म्हणुन मी मायबोलीवर असते खरच भरभरून दिले आहे .

मी अनेक वर्षापुर्वी बहिणीने (सईने) सांगितलं म्हणून बघु तरी काय आहे असा विचार करून सभासद झाले. माझ्या नावाचा आयडी आधीच कुणितरी ढापलेला पाहून चिडचिडही झाली होती. नंतर हळू हळू मी प्रतिसाद देऊ लागले. बर्‍याच वेळेला फक्त वाचनमात्र असे. पण २००८ नंतर मी खूपच रेग्युलर झाले. माबो ने खूप मित्र मैत्रिणी दिले, शहाणं बनवलं. वाचनाची आवड वाढली. सोशल सर्कल मोठं झालं.

मायबोलीवरचे सर्वांचे प्रेम अबाधित आहे हे प्रकर्षाने जाणवत आहे. अनेक जुन्यांनी अजून येथे काही मतप्रदर्शन केलेले दिसत नाही. अनेक जुन्यांनी केलेलेही आहे. ज्या समान बाबी आढळल्या त्या साधारण अश्या आहेतः

- वाचायला आवडते. येथे बरेच वैविध्यपूर्ण लेखन होते.

- मित्र मिळतात. सोशलाईझिंग होते. अपडेटेड राहतो. व्यसन आहे.

- काही धाग्यांवर वादविवाद चाललेले असले तरी एकुण स्वारस्य अजिबात घटत नाही.

अवांतर - एकदोघांनी माझे सदस्यनाम नोंदवले आहे त्यांचे मनापासून व नम्रपणे आभार.

सर्व प्रतिसाददात्यांचेही अनेक आभार!

-'बेफिकीर'!

मराठी कथा शोधताना एके दिवशी मायबोलीवर आले. 'बेफिकीर' यांची 'श्रीनिवास..' ही कादंबरी वाचली आणि झपाटलेल्यासारख्या बेफिंच्या सगळ्या कथा / कादंबर्या वाचुन काढल्या. माबोवर येण्याचे खरे कारण म्हणजे 'बेफिकीरच'.>>>>११११% अनुमोदन.
मा बो वरच लेखन ईतक छान असत कि ते पुन्हा पुन्हा वाचाव अस वाट्त.

मी बेफिकीर यांच्या सर्व कादंबऱ्या
म्हणजे "सावट" पासून ते "मोरपिसे" पर्यंत सर्व वाचून काढल्या. त्या इतक्या आवडल्या की मी त्या pdf करून ठेवल्या आहेत जेणेकरून अधून मधून वाचता
येतील.

"श्रीनिवास पेंढारकर एक बाप" ही कादंबरी वाचताना मी अक्षरशः रडलो आहे. (कोणाला ही अतिशयोक्ती वाटत असेल तर क्षमस्व).

तसेच नंदिनी यांची "शब्द" ही कथा आहे. त्या कथेने मला विचार करायला लावले. आणी ती कथा मी माझ्या काही मित्रांना वाचायला सांगीतली. आणी खरे सांगतो सर्वांना ती आवडली.

तर आता हे सर्व आणी अशा दर्जाचे वाचायला मिळणारे ठिकाण म्हणजे मायबोली. म्हणून मी केवळ ही भूक भागवण्यासाठी आणी केवळ माझ्या या स्वार्थासाठी मी मायबोलीवर येतो

आणी येत राहणार.

हाताची सगळी बोट कुठे सारखी असतात ? एकाच वडीलांच्या /आईच्या पोटी जन्माला आलेली मुले तरी कुठे सारखी असतात ?

टोकाचे बुध्दीमान, अभ्यासु, कलाकार, मनस्वी, विचारवंत, कृतीशील....... ही यादी मोठी आहे असे लोक या एकाच पटलावर येतात. चर्चा करतात. व्यक्त होतात. व्यक्त व्हायला सुध्दा व्यासपीठ हव असत. प्रत्येक वेळी अजेंड्याला धरुनच नियमानुसार चर्चा व्हावी अस नाही. चर्चेच स्वरुप मुक्त असाव.

केव्हा केव्हा हे मनस्तापाच कारण होत कारण लोक आपले विचार आणि मुद्दा सोडुन तुम्ही काल कोणत्या विचारसरणीचे होतात, त्याचे आराध्य कोण आहेत. तुमची हीच विचारसरणी असणार असा मुद्दा शोधतात. वाईट म्हणजे जातीवर किंवा व्यवसायावर टीका करतात. दुसर्‍यालाही मते असतात त्याचा आदर करायला हवा ही विचारसरणी ठेवत नाहीत तेव्हा इथे संवाद संपुन झुंडशाही अवतरल्याचा भास होतो. हे नियंत्रणात आल्यास आपण इथे का आहोत असा प्रश्न अधुन मधुन पडला तरी निघुन जाण्याइतका प्रभावी असणार नाही.

दरजेदार लेखन वाचायला आवडते. येथे बरेच वैविध्यपूर्ण लेखन होते अशा दर्जाचे वाचायला मिळणारे ठिकाण म्हणजे मायबोली. म्हणून मी केवळ ही वाचनाची भूक भागवण्यासाठी आणी केवळ माझ्या या स्वार्थासाठी मी मायबोलीवर येतो

<<माबोवर येण्याचे खरे कारण म्हणजे 'बेफिकीरच'.>>+१११% अनुमोदन.
<<"श्रीनिवास पेंढारकर एक बाप" ही कादंबरी वाचताना मी अक्षरशः रडलो आहे. (कोणाला ही अतिशयोक्ती वाटत असेल तर क्षमस्व) +१११

मराठी दर्जेदार वाचन!!! बस...आता तर मी मायबोली addictअच झालीय.

पण खरेच बर्याच वेळा असे होते अरे ...इथे तर माझेच विचार मांडलेत.म्हणजे आपण काही फारच वेगळा विचार नाही करत आहोत.

केव्हा केव्हा हे मनस्तापाच कारण होत कारण लोक आपले विचार आणि मुद्दा सोडुन तुम्ही काल कोणत्या विचारसरणीचे होतात, त्याचे आराध्य कोण आहेत. तुमची हीच विचारसरणी असणार असा मुद्दा शोधतात. वाईट म्हणजे जातीवर किंवा व्यवसायावर टीका करतात. दुसर्‍यालाही मते असतात त्याचा आदर करायला हवा ही विचारसरणी ठेवत नाहीत तेव्हा इथे संवाद संपुन झुंडशाही अवतरल्याचा भास होतो. हे नियंत्रणात आल्यास आपण इथे का आहोत असा प्रश्न अधुन मधुन पडला तरी निघुन जाण्याइतका प्रभावी असणार नाही.>>>>>>+१००
\

आणी अर्थातच मलाही काही मैत्रिणि मिळाल्या मायबोलीमुळेच!!

काय बेफिकिर .....

तुम्च्या नावाचा जप करून बाकी देव प्रसन्न झाले …. पण तुम्ही काय आशीर्वाद देईनात बुवा ….

आशाताईचा काय तो विल्हेवाट लावा लवकर...... पुधच भाग कधी...

मी इथे, तू तिथे, कोण कुठे ? Lol

फार फार वर्षांपुर्वी मी लहान असताना (म्हणजे आत्तापेक्षा लहान), आयुष्यात पहिल्यांदाच नोकरी निमित्ताने देशाबाहेर गेलो होतो. कामाच्या ठिकाणी मराठी तर लांबच भारतीय पण कोणी नव्हते. आणि अस्मादिकांना वाचन आणि बोलण्याची खुप आवड. मग मराठी वाचण्यासाठी नेटाने शोध घ्यायला सुरूवात केली.
सर्वात आधी सापडला सकाळ, मग मिळाली गदिमा वेबसाईट आणि तिसरी मिळाली माबो.

मग काय तेव्हापासुन इथेच टाका तंबू Lol

दुसर्‍या कोणत्याच साईटवर जायची गरज वाटली नाही. जाऊन पाहिले एक दोन ठिकाणी पण मन रमले नाही. लोक अतिशय जास्तच विचित्र आणि आक्रस्ताळे वाटले. Sad

गेल्या काही काळापासुन येथे पण असा एक मोठा प्रवाह चालू झाला आहे खरा. त्याला बंद करून पुर्वीसारखे दिलखुलास वातावरण टिकविण्याचा प्रयत्न केला पण ते अशक्य आहे असे वाटू लागले आहे. Sad
वाईट एवढेच वाटते की काही शक्ती येथे येऊन "मी म्हणजे कोण" आणि सतत "जितं मया" अशा थाटात लिहित असतात ते आत्यंतिक चुकीचे आहे. अनेक मूक वाचकांचा अशाने दाट गैरसमज होण्याची मोठीच शक्यता वाटते.
मी लिहितो तेच बरोबर आणि बाकीच्यांनी त्या विरोधात काहीच लिहायचे नाही, जे लिहितील त्यांना गटागटाने अनेक ठिकाणी गाठून हरवायला बघायचे ही प्रवृत्ती अतिशय हिणकस आहे. Sad

आता कदाचित माझे त्या घोड्याच्या गोष्टीतल्या माणसासारखे झाले आहे. म्हणून येथेच असतो. Lol

Pages