पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ४ - धाडसी महिलांच्या गावात

Submitted by सावली on 20 January, 2015 - 04:37

पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ४ - धाडसी महिलांच्या गावात

३० डिसेंबर २०१३

रात्र तशी फारच कुडकुडत गेली होती. सकाळीच सामान आवरून, बॅगा घेऊन आम्ही तिघी बंगल्याच्या बाहेर आलो. थोड्याच वेळात इतर तिघेही आले आणि आम्ही आमचे सारथी गोविंदजी यांची वाट बघत थांबलो. सारथ्याचे नाव गोविंद असणे हा काय सुरेख योगायोग आहे पहा.

तोपर्यंत आम्ही आजुबाजूला पहायला लागलो तर समोरच्या डोंगरउतारावर पसरलेले सुरेखसे गाव दिसले, जोवाई! या सुंदर टुमदार गावाबद्दल बरेच काही ऐकले होते पण आज याची देही ते पहाणार होतो. आत्ता गप्पा मारता मारता संघमित्रा म्हणाली 'रात्री काय थंडी होती ना, मला सहनच होत नव्हती. शेवटी मी मधेच उठून जोरात फेऱ्या घालायला लागले, त्यामुळे अंगात जरा ऊब आली आणि मग मी झोपले' हे ऐकून मी वेड्यासारखी हसत बसले. इतरांना कळेच ना की मला अचानक असं काय झालं. माझं हसू आवरल्यावर मी घडलेला किस्सा सांगितला. तर रात्री मलाही थंडी वाजत होती म्हणुन मी पांघरूण डोक्यावर घेऊन झोपले होते, अजून थंडी वाजल्यावर टोपीही कान आणि डोळ्यावर ओढुन घेतली. मधेच केव्हातरी मला कुणीतरी चालतंय असा आभास झाला. मित्रा किंवा वेदिका असेल असा मी विचार केला. एकदा पांघरूण काढून बघावं असं वाटलं पण म्हटलं नको केवढी थंडी आहे बाहेर. अर्धवट झोपेत वेळेचा काही अंदाज येत नाही त्यामुळे काही वेळात पावलांचा आवाज जोरात येतोय असे वाटले. मग डोक्यात आले की अरे हा तर इन्स्पेक्शन बंगलो आहे, सहसा असे बंगले गावापासून दूर असतात आणि अशा ठिकाणी भुते वगैरेही असण्याची वंदता असतात. आता इथेही असेल एखादे भूत. म्हटलं असेनात का भूत तर भूत. बिचारे चालतेच आहे ना एकटे मग जाऊदे. असंही आपण उठून काय करणार? पांघरुण काढलं तर आपल्यालाच थंडी वाजेल , भुताला काय! इतका लॉजिकल(!) विचार करून मी वर असेही ठरवले की हे काही बाकी कोणाला सांगायला नको. बाकीचे भुताला घाबरले तर काय घ्या! अजून इतक्या दिवसाचा प्रवास बाकी आहे. आपण हे आपल्याकडेच ठेवू. मग पावलांचा आवाज ऐकता ऐकता पुन्हा गाढ झोपले. आता हा किस्सा सांगितल्यावर मात्र सगळ्यांनाच हसू कोसळले. तितक्यात आमचे सारथी आले आणि मला वेड्यात काढायचा प्रसंग टळला गेला.

आज आम्ही जोवाईतल्या एप्रिलदा बारे यांना भेटणार होतो. छोट्या छोट्या रस्त्यावरून गाडी कौशल्याने वळवत जाताना कुठुनतरी हमकल्ला आम्हाला जॉईन झाला. एव्हाना गाडीतल्या आमच्या जागा जवळपास फिक्स झाल्या होत्या. पुढे आशिष आणि सारथी. मध्ये संजय , मी आणि संघमित्रा. तिला हाताचा आणि मानेचा त्रास होता त्यामुळे तीला उजव्या हाताला सपोर्ट हवा असायचा. मागे वेदिका आणि कुमार, त्यांच्या बाजूला काही हँडबॅगा. माझी, संघमित्राची हँडबॅग आमच्या पायाशी. आता गाडीत कुणी जास्तीचं आलं तर मात्र मी मागे बसायचे. मागे तीन जण बसले की हात हलवायलाही जागा उरायची नाही पण तरी आम्ही गोंधळ घालायचोच.

इथे या गावातली सगळी घरं फार सुरेख होती. रंग तर आपण कधीच विचार करणार नाही असे. जांभळी, पोपटी, आकाशी, गुलाबी, किरमिजी, पिवळी, अगदी सगळ्या रंगांची घरं. नुकतीच रंगवून काढली असावीत इतकी सुंदर , स्वच्छ. त्यांना काचेच्या खिडक्या, पांढरे लेसचे पडदे. घराच्या सभोवती कुंपण आणि कुंपणाच्या आता विविध फुलझाडे. काय रेखीव दृश्य होते! या इथल्या घरातच थोडे दिवस राहावं असा आम्हाला सगळ्यांनाच वाटलं पण व्यक्त करून दाखवलं ते कुमारने. झालं! कुमारला चिडवायला सगळ्यांना संधीच मिळाली. एरवी कुमार उत्स्फूर्तपणे सगळ्यांच्या विकेट काढण्यात पटाईत, इतका की तो गाडीत असेल तर दुसरी कसलीच करमणुकीच्या साधनांची गरज नाही. शेवटी आपणच त्याला गप्प राहयाला सांगू. पण आता मात्र सगळ्यांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. इथेच थोडे दिवस रहा आणि इथली मुलगी शोध, मग तुला इथेच राहता येईल असे म्हणुन पुढच्या अख्ख्या ट्रिपला त्याला पिडले होते.


जोवाई इथली सुंदर, नीटनेटकी  घरे


उंच सखल जोवाई 

एप्रिलदा बारे

गाडी एप्रिलदा बारे यांच्या घरासमोर थांबली, आम्ही आमची तोंड बंद करून फोटोग्राफरच्या मोड मध्ये शिरलो आणि आमचे काम सुरु केले. या जोवाई गावात रहाणाऱ्या एप्रिलदा बारे या गेले अनेक वर्ष 'सेन राय अप्पर प्रायमरी स्कूल' या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. आपल्या शाळेतील मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणुन त्या सतत झटत असतात. त्यासाठी विविध ठिकाणी कार्यशाळा घेणे, कार्यानुभव सहली आयोजित करणे, मुलांना विज्ञानाभिमुख करणे इत्यादी अनेक उपक्रम त्या त्यांच्या शाळेत राबवतात.


एप्रिलदा बारे -  त्यांच्या घराच्या वर्हांडयामधे

मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे अगदी काटेकोरपणे लक्ष असते. मुलांनी शाळा बुडवू नये, त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी त्या प्रयत्नशील असतात. एका ठराविक इयत्तेनंतर मुलांचे शाळागळतीचे प्रमाण वाढत चालले आहे असे त्यांना लक्षात आले. त्याची कारणे शोधल्यावर त्यांना जाणवले की आत्यंतिक गरिबीमुळे मुले उपजीविकेसाठी काही ना काही काम करतात. त्यामुळे शाळेसाठी वेळ देणे त्यांना जमत नाही आणि अशा मुलांचे शिक्षण बंद पडते. त्यामुळे अशा मुलांनीही पुढे शिकावे म्हणून त्यांनी कमी फी असलेल्या रात्रशाळा सुरु करायचे ठरवले. दुलोङ येथे पहिली KSAR रात्र शाळा सुरु केली. शिक्षण प्रवाहातून बाजूला पडलेल्या मुलांना गोळा करून शाळेत यायची गोडी लावायचे मोठे काम त्यांनी सुरु केले. ज्या मुलांना हा रात्रशाळेचा हा खर्चही परवडत नाही त्यांच्यासाठी फुकट शिक्षण आणि इतर सुविधा त्या उपलब्ध करून देतात. एप्रिलदा बारे यांना मुलांच्या शिक्षणासाठी अजुनही अनेक उपक्रम राबवायचे आहेत असेही त्यांनी सांगितले.


एप्रिलदा यांच्या शाळेचे नविन बांधकाम सुरु आहे.


मुख्याध्यापिकेच्या खुर्चीवरून 

इथून पुढे आम्ही त्यांच्या शाळेत गेलो तिथे त्यांचे फोटो सेशन केले, त्यांच्या मुलीशी म्हणजे सिलिकीशी आमची ओळख झाली. इथल्या मुली अगदी कणखर आणि आपले निर्णय आपण घेणाऱ्या वाटल्या. इथे मुलगा मुलगी भेदभावही फारसा नसावा किंवा मातृसत्ताक पद्धतीमुळे मुलीच जास्त डॉमिनेटींग असाव्यात असे वाटले. अगदी पहिल्यांदाच एखाद्या मुलाला भेटल्यावर सुद्धा मुलीने त्याच्या पाठीवर थाप मारून बोलण्याचा मोकळेपणा इथे दिसला आणि खूप आवडला देखील.

इथून त्यांच्याबरोबरच निघून आम्हाला जोवाई गावातल्या एका कार्यक्रमाला पोचायचे होते. नेमकी आजच इथला स्वातंत्र्यवीर यु किआंग नांगबा' यांची एकशेपन्नासावी पुण्यतिथी होती. त्यानिमित्त इथल्या एका पवित्र टेकडीवर , त्यांच्या स्मारकाला भेट देऊन फुले वाहायची प्रथा होती. एरवीच्या दिवशी सर्व लोकाना या टेकडीवर प्रवेश नसतो पण आजचा दिवस अपवाद. आम्हीही तिथे पोहोचलो. असले कार्यक्रम म्हणजे , मंडप, मोठाले स्पिकर्स, भाषणं, गाणी असा सगळा भपका असतो आपल्याकडे. पण इथे मात्र अगदी उलट चित्र होतं. मोजकी लोकं तिथे त्या दगडी स्मारका भोवती जमली होती. थोड्याच वेळात त्या गावातले प्रतिष्टीत मान्यवर लोक आले, त्यात काल भेटलेले हर्क्युलसही होते. अतिशय सुरेख सजवलेले फुलांचे वेगळ्या प्रकाराचे गुच्छ त्यांनी स्मारकाला अर्पण केले आणि इथला कार्यक्रम संपला. खाली गावात त्यानिमित्त भाषणे असणार होती म्हणे पण आम्ही तिथे थांबलो नाही. हा साधासा समारंभ मात्र खूप भावला.


यु किआंग नांगबा' यांचे टेकडीवरील स्मारक


'यु किआंग नांगबा' यांचे नदीकाठाचे स्मारक

त्यानंतर गावातल्या अजून एका घरी डकार कुटुंबात आणि नवीनच उघडलेल्या केकच्या दुकानात आम्हाला आमंत्रण होते. तिथे भेटी दिल्या. इथे एक वेगळीच गंमत झाली. आमच्या बरोबर 'हमकल्ला' होता. त्याला कुणीतरी नाव विचारल्यावर त्याने ते सांगितले. पण ते इथले मेघालयातले नाव आहे असे म्हणे त्या लोकांना वाटलेच नाही. त्यामुळे त्यांना तोही आमच्या बरोबर महाराष्ट्रातून आलाय असं वाटलं. बराच वेळाने खरी परिस्थिती समजल्यावर सगळ्यांना हसता हसता पुरेवाट झाली होती. सकाळपासुन तीनवेळा लाल चहा प्यायलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो. रस्त्यात गल्ल्यांमध्ये दिसणार्या भाजीवाल्या आणि फ़ळवाल्या फोटो काढण्यासाठी खुणावत होत्या पण तिथे न थांबता निघालो. गावात गर्दी असल्याने वेळ जाईल म्हणुन थोडं बाहेर पडुन जेवू असे संजय आणि आशिषने ठरवले. तिथेच आमची जरा चूक झाली! पुन्हा एकदा मध्ये एक नदीकाठचे स्मारक लागते तिथे काही मिनीटे जाउन आलो आणि रस्त्याला लागलो.

गावाबाहेर पडल्यावर मात्र खाण्यापिण्याचे एकही दुकान दिसेना. पुढे दिसेल, पुढे दिसेल असा विचार करून आम्ही जात राहिलो. आज बांग्लादेशाच्या सीमेनजीक असलेल्या एका दुर्गम गावी लवकरात लवकर पोचायचे होते. पण मध्ये मध्ये इतक्या ठिकाणी भेटी आणि थांबे होत गेले की उशीर होईल असे वाटत होते. त्यात मध्ये एका 'स्मित' नावाच्या गावात तिथल्या राजाला , हो खराखुरा राजाच, त्याला भेटायचे होते. आम्ही जाऊन त्यांच्या पारंपारिक पद्धतीने बांधलेल्या लाकडी घरासारख्या राजवाड्यासमोर उभे राहिलो. राजाला यायला वेळ होता. दुपार उलटून गेल्याने पोटात कावळे ओरडत होते. मग सर्व्हायवलसाठी आणलेली ड्रायफ़्रुटची पिशवी उघडली आणि ते खात वाट बघत राहिलो. राजा घोड्यावरून वगैरे येईल का, उंची कपडे घातलेले असतील का अशा चित्रविचित्र कल्पना करता ठेवून आम्ही तिथे उभे होतो. बराच वेळाने आम्हाला आत बोलावले गेले. आमच्या सार्या अपेक्षांवर पाणी फिरवत राजेसाहेब, डॉ. बलजित सिंग सिएम, नेहेमीचे कपडे, मफलर वगैरे गुंडाळून आले. आमच्याशी गप्पा मारल्या, आमच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली. हा राजा अगदी साधा पण तितकाच कणखर वाटला. तिथल्या स्थानिक जनतेबद्दल त्यांना अपार प्रेम होतं ते त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं.


राजेसाहेब डॉ. बलजित सिंग सीएम


राजवाडा

आता मात्र आम्हाला खरच उशीर झाला होता. पोटातले कावळे ओरडून ओरडून मरायला टेकले होते, पण खायची सोय सापडत नव्हती. आमचे सारथी गोविंदजीही आता वैतागलेले वाटत होते. त्यात आताचा रस्ता अतिशय भयंकर वळणांचा. खाली पाहिले तर नजर ठरणार नाही अशी खोल दरी. बराचवेळ आसपास एकही गाव दिसले नव्हते. एखाद क्षणाचा जरी अंदाज चुकला तर गाडी सरळ खाली जायची. चिडलेला ड्रायवर हा एक अतिशय भयानक प्रकार. गोविंदजीचे इतक्या दोन दिवसातले ड्रायविंग आणि आजचे ड्रायविंग यात फरक जाणवत होता, चिडून अतिशय रफ गाडी चालवत होते. प्रत्येक वळणावर आमच्या काळजाचा ठोका चुकत होता. जर इथे काही झालंच तर आम्ही नक्की कुठे पडलो आहोत हे बाहेरच्या जगात लोकांना कळायलाच अनेक दिवस जातील असे अनेको विचार मनात यायला लागले. गाडीत आमच्याकडे मुड हलका करायला म्युझिकही नव्हतं. आम्ही सगळेच चुपचाप बसून बाहेर बघत राहिलो. अचानक रस्त्यावर डावीकडे एका चढावावर गाडी चढली ( आदल्या रात्रीही डावीकडचाच चढाव होता हा योगायोग) आणि एका घरासमोर थांबली. इथे काहीजण आमची वाट बघत थांबले होते त्यांना घेतलं जरा पाच मिनीटात फ्रेश झालो आणि पुन्हा चढाव उतरून रस्त्यावरून पुढे निघालो. अगदी अंधारत आले तेव्हा एका मोडक्या शाळेजवळ गाडी थांबली. इथे भेटणार होतो इथल्या शाळेतल्या शिक्षिका फोर्सिला डकार यांना.

फोर्सिला डकार

बांग्लादेशाच्या सीमेनजीक असलेले पेनुर्सला नावाचे हे एक दुर्गम गाव. इतक्या दुर्गम भागात शिक्षणाचा अभाव आणि त्याविषयी गोडी नसणे हे नेहेमीचेच आहे. फोर्सिला स्वत: या गावातल्याच असुनही त्यांनी हे प्रश्न ओळखले. इथल्या मुलांना शिकवणे गरजेचे आहे हे जाणुन त्यांनी इथे सर्वप्रथम शाळा सुरु केली. सुरुवातीची दोन वर्षेतर फोर्सिला एकही पैसा स्वत:साठी न घेता शाळा चालवत होत्या. ही शाळा अतिशय दुर्गम भागात होती त्यामुळे ती बघायला आम्ही दुसऱ्या दिवशी जाणार होतो.
पण फोर्सिला यांना आणखी भेडसावणारा प्रश्न म्हणजे मुलांच्या कुपोषणाचा. इथला कष्टकरी वर्ग दिवसभर बाहेर कामात मग्न असतो. मुलांना वेळेवर आणि चांगले जेवणखाण मिळणं कठीणच. म्हणुन त्या रोज संध्याकाळी मुलांना दुध आणि बिस्किटांचे वाटप करतात. स्वत:च्या खिशात पैसे नसताना शंभरएक मुलांसाठी रोज दुध बिस्किटाची सोय करणे किती कठिण असेल? आज आम्ही उशिरा पोचलो होतो त्यामुळे मुलं बिचारी वाट बघत होती. फोर्सिलाने मुलांना दुध आधीच दिले होते पण बिस्कीट अजून वाटायची होती. ते कळल्यावर आम्हाला आम्ही जेवायला थांबून वेळ फुकट न घालवल्याबद्दल जरा बरंच वाटलं.


मुलांबरोबर फोर्सिला डकार ( यांचे बाकीचे फोटो नंतरच्या लेखात येतील )

इथे आजुबाजूला काहीच नसल्याने, रस्त्यावर दिवेही नसल्याने खूपच अंधार वाटायला लागला. आता फोटो कसे काढणार हा एक प्रश्न होता. मग पटापट गाडीचे हेडलाईट लावले. दोन फ्लॅश जोडले, रिफ्लेक्टर काढले आणि त्या प्रकाशात शूट करायचा प्रयत्न केला. फ्लॅश सिंक झाले नाहीत आणि फक्त एकदाच एका वेळेला दोन्ही फायर झाले आणि बंद पडले, मग पुढचे काही फोटो गाडीच्या प्रकाशात घेतले. आता अंधारात इथे जास्त थांबता येणार नव्हते त्यामुळे लगेच निघालो दुसर्या एका धाडसी महिलेला भेटायला. मघाशी ज्या घरी पाच मिनीट थांबलो होतो तिथेच. मधेच एका ठिकाणी केळी मिळाली ती घेतली आणि पोटात ढकलली.

तेरेसा खोङथॉ -

तेरेसा खोङथॉ. अतिशय दुर्गम असा हा पेनुर्सला भाग वळणा वळणांच्या घाटरस्त्याने इतर भागाशी जोडला असला तरी इथे फारसे पर्यटक येत नाहीत. दळणवळणाची साधने अगदीच अपुरी आहेत. तसे हे गाव बाङलादेशाच्या सीमेपासून अगदी काही किलोमीटर अंतरावर आहे. आणि यामुळेच इथे घुसखोरी, रात्रीची वाटमारी , दरोडेखोरी अशा प्रश्नांचे प्रमाणही लक्षणीय आहे. तेरेसा यांना आपल्या गावातली ही असुरक्षितता खटकली आणि त्यावर उपाय योजण्याचे त्यांनी ठरवले. उपाय काय? तर बचत गटाच्या सत्तरएक महिला आहेत, त्यांचे सात सात चे गट करायचे. आणि या एकेका गटाने रात्रीची रोज गस्त घालायची. गस्त कुठे तर आम्ही आत्ता ज्या रस्त्यांनी दिवसा,गाडीने जायला टरकत होतो तसल्याच रस्त्यावरून! रस्त्यावर एकही दिवा नाही, घरंही एकमेकांपासून दूर दूर. इथे गस्त घालायची ही कसली भन्नाट योजना होती !. पण या स्त्रिया डगमगल्या नाहीत आणि मागे तर मुळीच हटल्या नाहीत. त्यांनी गस्त घालायचे काम सुरु केले. बांग्लादेश आणि भारताच्या सीमेनजीक अशी गस्त घालणे किती जिगरबाजीचे काम असेल? हातात स्वसंरक्षणार्थ फक्त तर एक काठी आणि एक टॉर्च! पण आज त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय. गावातली दरोडेखोरी, चोर्यामार्या कमी झाल्यात!

हे काम ऐकूनच अंगावर काटा आला, यांना मदत करणे जाऊदेत पण या स्त्रियांच्या कामाला न्याय देईल असा किमान फोटोतरी मला काढता येईल? काय केलं , कसा फोटो काढला म्हणजे यांचं हे काम मी जगापुढे आणु शकेन असा एक कोलाहल माझ्या मनात माजला आणि तेवढ्यात डोक्यात एक कल्पना चमकून गेली. मघासच्या चढावाच्या आधीच गाडी थांबवली. तेरेसा आणि त्यांच्या इतर सहकारी तिथेच थांबल्या होत्या. संजयला म्हटलं गाडीच्या हेडलाइट मध्ये सीलहाउट घेतेय तुम्ही इथेच गाडी थांबवा. गोविंदजीना खरंतर वर घराजवळ नेऊन थांबवायची होती पण मी लक्ष दिले नाही. मला इथेच हवा तो कोन मिळणार होता. वैतागलेल्या गोविंदजीकडे दुर्लक्ष करून गाडीचा अँगल अ‍ॅडजस्ट करून घेतला व गाडीचे हेडलाईट सुरु ठेवून गाडी तिथेच थांबवायला लावली. वेदिका आणि संघमित्राला घेऊन खाली उतरले. तेरेसा आणि इतर स्त्रियांना त्या गाडीच्या प्रकाशात उभे केले आणि पुढचा थोडा वेळा वेगवेगळे कोन साधत शुट केले. तिथल्या काही जणांना या शूटचा रिझल्ट काय असणार हे कळलं नसावं पण माझ्यासाठी हा फार सफलतेचा क्षण होता. बाहेरची बोचरी थंडी, दिवसभराचे श्रम, सक्तीचा उपवास सगळे काही विसरून हा फोटो काढायचा क्षण मी जगले. हे आटोपून वरच्या घरात परतलो. आणि मग कॅमेरावरचा एक सिलेक्टेड फोटो संजयला दाखवला. फोटो बघून संजयने 'या फोटोसाठी आणि त्याच्या कल्पनेसाठी माझ्याकडुन तू मागशील ते देईन' अशी दाद दिली आणि मला हा फोटो हवा तसा आल्याची खात्री पटली! अजून आशिषना आम्ही नक्की कसे शुट केले याची कल्पना नसावी असे वाटले त्यामुळे त्यांनाही तो फोटो दाखवला आणि त्यांनाही आमच्या फोटोग्राफर्सच्या आनंदात सहभागी करून घेतले.


रात्रीची गस्त!

(हा फोटो प्रदर्शनात मोठे प्रिंट करून लावला होता आणि जवळपास प्रत्येकाने त्याला दाद दिली. तसेच लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीने अर्धपान भरून हा फोटो छापला होता.)

इथे अजून जेवण व्हायला वेळ होता त्यामुळे मी आणि कुमार बाहेर आलो. उपवासाच्या पित्ताने माझं डोकं संध्याकाळपासून ठणकत होतं ते आता अगदी चढलं. बाहेर प्रचंड थंडी पण आकाश बघावं तर रत्नांनी मढलेलं. चक्क दूधगंगाही आकाशात दिसत होती. तार्यांचे फोटो काढायचे म्हणुन घरापासून दूर कॅमेरा ट्रायपॉड वर लावून बसून राहिलो. बराच वेळाने लक्षात आले की इथे कुत्रे आहेत आणि अंधारात त्यांचा कॅमेराला धक्का लागू शकतो. मग कॅमेराच्या बाजूला जाऊन उभे राहिलो. बाहेर खरतर तिथे फारच बोचरा वारा होता. मधेमधे बाकीचे बाहेर येऊन आम्हाला थंडीत न थांबण्याबद्दल सांगत होते. पण इथले तारांगण बघणे जास्त सुखदायक होते त्यामुळे बाहेरच थांबलो. शेवटी जेवण तयार झाले तसे आम्हाला राहवले नाही आणि आम्ही कॅमेरा घेऊन आत आलो. इतक्या वेळात घरातले लाईट जाणे , मग दुरवरच्या दुसर्या घरातून अर्धा स्वयंपाक करणे वगैरे प्रकारही घडले.

जेवताना फ़रसबीच्याचिरून उकडलेल्या तुकड्यांवर काळे तिळ वाटुन घालून एक चटणी केली होती. दिसायला काळी, कशीतरी दिसली तरी अगदी चविष्ठ होती. इतर मेनू नेहेमीसारखाच चवदार. खूप भूक होती पण पित्तामुळे मला अगदी मोजकंच जेवता आलं.
जेवण झाल्यावर आमची सोय दुरवरच्या एका डॉच्या घरी करण्यात आली होती. आम्ही तिघी तिथे गेलो. डॉ म्हंजे गावातले एखादे भारदस्त व्यक्तिमत्व असेल असे वाटले होते पण ती एक छोटीशी, नाजुकशी मुलगी होती. आधीच रात्र झाल्याने आणि माझे डोकेही दुखत असल्याने रात्री आमचे बोलणे मात्र झाले नाही. गोळी घेऊन मी लगेचच झोपायला गेले. आजचा दिवस फार घडामोडींचा होता तसाच समाधान देणाराही होता ही जाणीव मात्र सुखद होती. उद्या या वर्षातला शेवटचा दिवस, कोणते अनुभव घेऊन येणार कोण जाणे…

आजचा प्रवास


खाली सीमा दिसते ती भारत आणि बांग्ला देश यांच्यामधील सीमा आहे.

पुढचा भाग
पूर्वांचल - मातृशक्तीचे विराट दर्शन - ५ - अजून थोडे पेनुर्सला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त भाग .
रात्री पहारा स्त्रिया देतात तर पुरुष काय करतात ? त्या गावात पुरुष नाहीत का ?

हा पण भाग मस्तच ...

हा फोटो प्रदर्शनात मोठे प्रिंट करून लावला होता आणि जवळपास प्रत्येकाने त्याला दाद दिली. तसेच लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीने अर्धपान भरून हा फोटो छापला होता.>>>> सिंपली ग्रेट .. कौतुकास्पद च आला आहे तो फोटो Happy

हा भागही मस्त! संघमित्रा चा किस्सा वाचुन हसायला आले.
पहाररेदा स्त्रियाचा फोटो छान...
खरेच तिकडच्या लोकांचे जिवन खुप कठीन आहे. पण त्यांच्या चेहर्‍यावर कायम शांतता व समाधान दिसते.

गस्तीच्या फोटोबद्दल तुझ्याकडून आधी ऐकलेलं होतं, लोकसत्तातही वाचलं होतं...तरी आत्ता पुन्हा वाचताना अंगावर काटा आला.
लिहीत रहा. आम्ही वाचतोय. Happy

छान झाला आहे हाही भाग!!
भुताचा किस्सा भारी!
राजा मस्त हँड्सम आहे! Happy
गस्तीचा फोटो अ-फ-ला-तू-न!!

गस्तीच्या फोटोबद्दल तुझ्याकडून आधी ऐकलेलं होतं, लोकसत्तातही वाचलं होतं...तरी आत्ता पुन्हा वाचताना अंगावर काटा आला.>>> +१

सुंदर अनुभव, सावली! मस्त मालिका आहे. आत्ताच चारही लेख वाचून काढले. पुढील लेख वाचायला उत्सुक आहे.

सावली, फोटो खूप छान पण त्यापाठीमागची कारण ऐकून कसंसच झालं. भूताचा किस्सा धमाल! पुढचे भाग येऊ देत लवकर लवकर....

मित, बाजिंदा, माधुरी१०१ , चनस, सुरेख, सशल , सायो , ललिता-प्रीति, जिज्ञासा, Bsk, अश्विनी के, अगो ,रायगड ,मंजू ,सृष्टी धन्यवाद Happy

बाजिंदा, तुमचा प्रश्न थोडा गमतीशीर आणि थोडा आपली मानसिकता ( सॉरी, तुम्हाला असे जज्ज करत नाहीये. महाराष्ट्रातल्या इतर अनेक जणांनी, अनेक प्रश्नोत्तराच्या सेशन मधे आम्हाला हाच प्रश्न विचारला आहे) दाखवणारा आहे. पुढच्या कुठल्यातरी लेखात मी त्याचा उल्लेख कदाचित केला असता किंवा राहुनही गेला असता. त्यामुळे तुम्ही इथे विचारलत हे छान झालं. Happy

रात्रीची गस्त घालायची म्हणजे पुरुष का घालत नाहीत हा प्रश्न आपल्या मनात येतो कारण आपण कुठेतरी मनात हे स्त्रियांचे काम / हे पुरुषांचे काम असा विचार जाणता अजाणता करत असतो. मुळात इथे आम्हाला ज्या ज्या स्त्रीया भेटल्या ( ज्यांच्याबद्दल अजुन इथे लिहिलं नाही त्यासुद्धा) त्यांची ओळख त्यांची स्वतःची होती. कुणाची बायको, कुणाची मुलगी, कुणाचीतरी आई अशी नव्हती ही एक फार महत्वाची गोष्टं आहे. त्यातल्या कुणीच त्यांच्या नवर्‍याची वगैरे आमच्याशी ओळख करुन दिली नाही, त्यांना ती गरजही भासली नाही.

साधी गोष्टं आहे. आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो, त्यांचे काम जाणुन घ्यायला गेलो होतो. त्यांचे लग्न झाले आहे की नाही, नवरा आहे की नाही, असल्यास तो काय करतो यातल्या कुठल्याच गोष्टी त्यांना आम्हाला सांगण्याइतक्या जरुरीच्या वाटल्या नाहीत. आणि महत्वाचे म्हणजे आम्ही ते विचारण्याचा मुर्खपणा केला नाही. हा मातृसत्ताक पद्धतीचा परिणामही असु शकतो, पण जे होतं ते मला फार आवडलं.

आपल्याकडे कुठल्याही यशस्वी स्त्री ची मुलाखत घेताना "तुम्ही घर सांभाळुन हे कसं केलं? , तुमच्या नवर्‍याची, सासरची साथ होती का? मुलांना कसे सांभाळले" अशा टाईपचे प्रश्न सर्रास विचारले जातात. विचारणार्‍याला हा प्रश्न विचारुन आपण काही चुकतोय असे कधीच वाटत नाही. आणि मुलाखत देणार्‍या व्यक्तींना आवडले नाही तरी त्या कधी हा प्रश्न फारसा डावलतानाही दिसत नाहीत. मला स्वतःला हा प्रश्न कधीच आवडला नव्हता. इथल्या जवळपास सर्व स्त्रीयांच्या छोटेखानी मुलाखती मी घेतल्या पण कुठल्याच स्त्रीला हा प्रश्न मी विचारला नाही. गरजच वाटली नाही. त्यांच्या बोलण्यातुनही स्वतःच्या घरादारासंबंधी , स्वतःच्या पर्सनल प्रश्नांविषयी काही निघालं नाही.

इथे त्यांना गरज वाटली त्यांनी गस्त घालायला सुरुवात केली, त्या इतर कोणाची वाट बघत बसल्या नाहीत. इतरही अनेक कामातुन आणि पुढच्या लेखातुन तुमच्या हेच लक्षात येईल. जिथे गरज होती तिथे या विद्युल्लता स्वतःच उभ्या ठाकल्या. हाच इथल्या स्त्रीयांचा मोठेपणा आहे. या सौदामिनी स्वतःच इतक्या तेजःपुंज असताना त्यांना दुसरा कुठला आधार आहे का प्रश्न त्यांच्यासाठी दुय्यम ठरतो.

इथल्या पुरुषांबद्दल लिहायचंच झालं तर इतकं म्हणेन की एक पिढी नशेमुळे बरबाद झाली असावी. अगदी सगळेच नाही आणि हे सरसकटीकरणही नाही, आम्ही चांगल्या लोकांना भेटलोच की. पण साधारण हा प्रॉब्लेम कॉमन आहे असे ऐकले.

(आमची चतुरंगसाठी आणि आकाशवाणीसाठी मुलाखत झाली तेव्हा मी आवर्जुन 'आम्ही घर सांभाळुन हे शूट कसं करतो अशा टाईपचे प्रश्न विचारू नका' अशी रिक्वेस्ट केली होती )

पहिल्या लेखात कुणीतरी विचारांचा प्रवास कसा कसा झाला हे वाचायला आवडेल असे लिहीले होते. तर या अशा छोट्या छोट्या परंतु अनेक गोष्टी आहेत Happy

होपफुली तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असावे Happy

आपल्याकडे कुठल्याही यशस्वी स्त्री ची मुलाखत घेताना "तुम्ही घर सांभाळुन हे कसं केलं? , तुमच्या नवर्‍याची, सासरची साथ होती का? मुलांना कसे सांभाळले" >>> आपल्याकडेच (भारतात) नाही तर जगभर हा ट्रेंड आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सी ई ओ, एमडी असलेल्या बायांना हा प्रश्न विचारला जातो आणि कुणी सुद्धा या प्रश्नाला उत्तर देण्याचे नाकारताना दिसत नाही. उलट पीयर प्रेशरमध्ये येउन मी कसं पहाटे चार वाजता उठून बेक सेलसाठी कुक्या बनवत असे अशा इर्रिलेवन्ट गोष्टी सांगत बसतात. पोरांना बापाच्या ताब्यात देऊन बिझिनेस ट्रिपवर/कामावर गेल्यावर मुलांचे खाण्या-पिण्याचे-अभ्यासाचे हाल झाले असं सांगणार्‍या "फेमिनिस्ट" बाया यातल्याच. बायांच्या बाजूने बघाल तर हा प्रकार सार्वत्रिक आहे, प्रश्न आणि अशा प्रकारची उत्तरं दोन्ही.

सॉरी, फारच अवांतर झालं. सगळी लेखमाला अजून वाचली नाही म्हणून प्रतिसाद दिला नव्हता पण तुझी पोस्ट वाचून राहावलं नाही.

सावली छान आहे विचार ..

कोणी असे प्रश्न विचारले किंवा अशा प्रश्नांबद्दल उत्सुकता दाखवली तरी जज्ज करू नये .. लेखात अगदी सुरूवातीला तूही तुझ्या लेकीबद्दल काळजी व्यक्त केलीच आहेस (म्हणजे या ट्रिप ला जाणं कसं जमेल हे ठरवताना) ..

कुटुंबाची काळजी केली म्हणून कसली लेबलं नकोत आणि नाही केली म्हणूनही नकोत असं मला वाटतं ..

लेखमाला उत्तम चालू आहे .. तू घेतलेल्या ह्या अगदी वेगळ्या अनुभवाबद्दल वाचायला खूप आवडत आहे ..

सिंडरेला Happy

सशल, माझ्या प्रतिसादात मी दुसर्‍याच वाक्यात जज्ज करण्याबद्दल लिहीलं आहे.

<<लेखात अगदी सुरूवातीला तूही तुझ्या लेकीबद्दल काळजी व्यक्त केलीच आहेस (म्हणजे या ट्रिप ला जाणं कसं जमेल हे ठरवताना) ..>> येस. अर्थातच. इथे लेख लिहीताना त्याचा उल्लेख मी पूर्णपणे टाळू शकले असते. पण तरिही मी ते केलेलं नाही. कारण मला स्वतःहून याबद्दल लिहायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण त्या दोन वाक्यांच्या पुढे आम्ही कसं मॅनेज केलं, काही प्रॉब्लेम आले का/ नाही याबद्दल मला काहीच लिहायचं नव्हतं. पुस्तकात, इतर लेखात कुठेच लिहीले नाहीये, इथेही लिहीणार नाही कारण ते जरुरी नाही. मला हे ही सांगायचं होतं की एका क्षणात 'जायचेच' असा डिसिजन मला घेता आला नव्हता, जो कदाचित माझा तोकडेपणा असावा. पण हाच प्रश्न आम्हाला जेव्हा चतुरंगसाठी विचारला गेला तेव्हा मी त्यांना याबद्दल काही लिहु नका अशी विनंती केली होती.

कुटुंबाची काळजी केली म्हणून कसली लेबलं नकोत आणि नाही केली म्हणूनही नकोत असं मला वाटतं >> कुटुंबाची काळजी केली किंवा न केल्याच्या लेबल्स बद्दल मी अजिबात काही म्हणाले नाहीये. तसं वाटतय का माझ्या प्रतिसादातुन? असल्यास बदलेन तो भाग. या बायका त्यांच्या कुटुंबाची काळजी घेत नसतील असे थोडीच आहे? त्यांना मुलंबाळंही होतीच की. त्यांची काळजी घेऊन त्या ही घराबाहेरची काम करत असतीलही किंवा कसेही. पण ते त्या स्त्रीच्या मोठे ठरण्याचा एक भाग होऊ नये. माझे म्हणणे आहे ते स्त्रीचे कर्तृत्व गौरवताना 'बघा कसे घरातले पण करते' टाईपचा जो सुर लागतो त्याबद्दल. आणि ज्यांनी आम्हाला काही प्रश्न विचारले त्यांचा साधारण मुद्दा असा वाटला की 'मग अशी कामे पुरूष का नाही करत?' हा मुद्दा गौण ठरावा अशी अपेक्षा होती / राहील.

नाही सावली तुझ्या प्रतिसादातून तसं कन्व्हे नाही होत आहे पण मूळ प्रश्न आणि त्या अनुषंगाने इतर पोस्ट्स वाचून जे वाटलं ते लिहीलं .. खरंच फार अवांतर होतंय .. Happy पुढच्या भागाबद्दल उत्सुकता आहे ..

थँक्स सशल.
त्या प्रश्नाच्या अनुषंगाने हे मुद्दे आठवले त्यामुळे बाजिंदा यांना लिहिताना मी कुठेतरी ते मुद्दे क्लिअर करायचा प्रयत्न केला.

अर्थातच याला वादाचे स्वरुप द्यायची इच्छा नाही की इथे वादविवाद पण घडवुन आणायचा नाही. पण कुठेतरी या नोंदी होत रहातील, कुणालाच जज्ज न करता.

पुढचा लेख पूर्ण करते Wink

माझी पोस्ट वाचून लिहीलं असशील तर माझा पॉइंट तुला कळलेला नाही.

सावलीने म्हटलंअय तसं "स्त्रीचे कर्तृत्व गौरवताना 'बघा कसे घरातले पण करते' टाईपचा जो सुर लागतो त्याबद्दल" याबद्दल मला आक्षेप आहे.

दुसरा आक्षेप आहे ते बायका पण याला बळी पडताना दिसतात. करीयर/छंद/सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला जातो पण नंतर तो डिफेंड करणं किंवा मी नसताना कसं सगळं विस्कळीत झालं अशा टाइप्स बोलणं हे फार सर्रास दिसतं. सावली आणि तिच्या टीमने असे प्रश्न विचारू नका सांगितलं हे म्हणूनच कौतुकास्पद वाटलं.

असो, फारच अवांतर होत चालल्याने हेमाशेपो.

हा भाग सगळ्यात जास्त आवडला आतापर्यंत. तो फोटो, त्यामागचा तुझा विचार खूप आवडलं. या लेखात पण तो सगळाच पॅरा सुरेख उतरला आहे.

इंद्रा नुयीची मुलाखत बघताना हेच आवडलं नव्हतं. >>> +१.

सावलीची पोस्ट्स आवडली आणि सिंडीचा आक्षेप पटला. इंद्रा नुयीची मुलाखत बघताना हेच आवडलं नव्हतं. >> +१

मज्जा येतेय वाचताना ...
पूर्वांचल मधील मातृसत्ताक पद्धती बद्दल कल्पना होती .. तिथल्या जीवनाबद्दल आणि लोकांबद्दल सुद्धा वाचून आहे ..
माझा आवडता विषय आहे ... इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद ..
लोक त्यांना चीनी , नेपाळी म्हणतात तेव्हा खरच खुप राग येतो आणि त्यांना याबद्दल चीड आहे हे पन ठाऊक आहे ..

यवतमाळ ला हिवाळा सुरु झाला कि या लोकांची गरम कपड्यांची दुकान ते लावतात .. मुख्यत्वे आसाम चे लोक जास्त असतात ..
सर्व कारभार स्त्रीयांच्या हाती असतो .. १० ते १५ दुकानांपैकी एक ते दोन दुकानात पुरुष असतात ..
त्यात सव वयाच्या स्त्रीया असतात .. बरेचदा त्यांच्या छोट्या मुलीही असतात ... अगदी बाहुली सारख्या गोड दिसतात ...

तुमचे अनुभव फार छान आहेत .. वाचतेय .. पटापट येऊद्या Wink

Pages