मी आणि "ते"

Submitted by मुरारी on 18 January, 2015 - 03:05

"ते" असतातच तुमच्या आजूबाजूला, लहानपणी माहित नसतं, हळू हळू मोठे होत जातो तसे त्यांची व्याप्ती लक्षात यायला लागते,तरीही तसा त्यांचा त्रास नसतो तुमचे शिक्षण पूर्ण होते,मग तुम्हाला नोकरी लागते.वय तिशी कडे झुकायला लागले कि तुमच्याच घरातले घात करतात, आणि त्यांच्या नजरा तुमच्याकडे वळतात.
मग कधीही दिवसा ढवळ्या रात्री अपरात्री ते तुम्हाला दर्शन द्य्याला लागतात,तुम्हाला त्यांच्यात ओढायचा त्यांचा बेत असतो,जणू तेच त्यांचे जीवितकार्य असते.साम दाम दंड भेद सगळे मार्ग अवलंबिले जातात.या मध्ये काही मध्यस्त आणि तुमचे नातेवाईक सुद्धा असतात,कुठूनही ते तुम्हाला शोधू शकतात,लपायचा काहीच चान्स नाही.
अस्मादिक हि याला कसे अपवाद असतील.या वर्षीचा वाढदिवस साजरा झाला आणि मातोश्रींनी बॉम्ब टाकला चला, नावनोंदणी करून टाकू, जाहिरात करायला आता आम्ही मोकळे, बस झाले उंडारणे.माझ्या परवानगी सारख्या मामुली गोष्टीची अर्थातच त्यांना आवश्यक्यता वाटली नाहीच,काही दिवस शांत गेले आणि अचानक मला कुठल्या कुठल्या नंबर वरून फोन यायला लागले.ते "तेच" होते,भेटायचं म्हणत असायचे मी मेल वर पत्रिका पाठवा म्हणून कटवायचो

त्यातल्या त्यात माझे सुदैव असे कि घरी पत्रिका हा मुद्दा महत्वाचा असल्याने मी सुखी होतो, जल्ला एकही पत्रिका जुळायला मागत नसल्याने पुढचा काही त्रास नव्हता.

पण त्यांनी आक्रमणाचा जोर वाढवला आणि घरीही यायला लागले.काल काही समदुक्खी मित्र wats app वर गप्पा मारत असताना हा विषय निघाला, एक एक किस्से एवढे वाढत गेले,कि हे दुख्ख इथवर मर्यादित ण ठेवता सर्वदूर पसरले पाहिजे या मतावर सर्व आले
आखिर दर्द बाटनेसेही तो कम होता हे म्हणून हा प्रपंच

प्रसंग एक :-

रात्री ९ च्या दरम्यान कसाबसा दमून भागून घरी आलो, "ते" बसलेले होते, पहिलाच अनुभव असल्याने मी आत जाऊन आईला विचारले कोण ब्वा हे.. मग समजले मुलीचे पिताश्री. बाहेर आलो वर पासून खालपर्यंत स्क्यान्निंग झालं. मग नमस्कार चमत्कार बाबांनी विचारलं मुलगी काय करते, बस्स इतकच विचारायची वाट बघत होते वाट्त ते , धाडधाड गोळीबार सुरु, मुलगी कुठल्या नर्सरीत शिकायची इथपासून सुरवात झाली...मध्येच ती दुसरीत मलेरिया मुळे सहामाही मध्ये मराठीत नापास झाली होती हि महत्वाची माहिती पण मिळाली Lol
पोटात मरणाचे कावळे बोंबलत होते.तरी तसाच हां हु करत पुराण ऐकत होतो.शेवटी समजल कि ढोर मेहनत करून मुलीने मास्टर्स केले आहे IT मध्ये. घशाला कोरड पडली म्हणून पाणी प्यायला आत आलो, मागोमाग आई .. अरे भयंकर शिकलेली दिसतेय हि मुलगी तिला चालेल का पण , नाहीतर डॉक्टर , इंजिनिअर अशा अपेक्षा असतात हो मुलींच्या हल्ली, म्हटल मला काय विचारतेस, तुम्ही आणलय न हे .. तुम्हीच विचारा, परत बाहेर आलो
समोरून स्तुतीसुमनांचा धबधबा कोसळतच होता, तरी तशीच तशीच हिम्मत करत चालत्या ट्रेन मध्ये चढलो,विचारलं नोकरी कुठे करते ? एखाद्या भिकार्याकडे बघतात तसं माझ्याकडे बघत म्हणाला, तिच्या प्रोफाईल ला सुट होईल असा जॉब आहेच कुठे मुंबईत, शोधतेय तरी
म्हटलं ओह, (अच्चा अच्च जाल तल - हे मनातल्या मनात) अजून २० मिनिटे पुराण ऐकवल्यावर त्याने तिचा बायो डेटा माझ्याकडे सरकवला, आई बाबांनी एव्हाना धीर सोडलेला होता, मी पण सहज नजर टाकली, शिक्षण: बी.कॉम ( सेकंड क्लास), tally, आणि आणि

MSCIT.

???????

फुल हादरलो , MSCIT??????? (नाही रे नाही नसतं रे असं ... अरे ए .. सांगा रे कोणीतरी याला , पहिलीतली मुले पण देतात हि परीक्षा)
म्हटलं मास्टर्स कुठून केलं? तर म्हणाले इथूनच, गजाजन काम्पुटर मधून घराखालीच आहे, सरकारी नोकरी आता अश्शी मिळेल.. दोन मिनिटे काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतो नंतर चेहऱ्यावर कुठलेच भाव येत नव्हते...:( हातपाय लटपटत होते त्यांना तसेच वंदन केले आणि कशीबशी त्यांची बोळवण केली. सुदैवाने नंतर पत्रिका जुळली नाही, आणि मी वाचलो (हुश्श)

प्रसंग २ : काही दिवस शांततेत गेले आणि अजून एक वेगळे "ते" श्री. XXX असेच रविवार संध्याकाळचे घरी उगवले,नेमक्या एक काकू घरी येऊन बसल्या होत्या.मागचा अनुभव असल्याने मी सावरून बसलो आणि आधी बायो डेटा वर झडप मारून शिक्षण चेक केलं.हा ठीके आतापुढे
हे गृहस्थ मिस्टर बिन चा मराठी अवतार म्हणता येईल असे, नुसती चळवळ, आई बाबा हस्तायेत माझ्याकडे बघून. मी शक्य तेवढा मख्ख चेहरा ठेऊन थंडपणे बोलत होतो, मग हे साहेब आई बाबांना अहो आई , अहो बाबा म्हणायला लागले, आईंग म्हटल डायरेक्ट आई आणि बाबा ? आपण कुठे कामाला होतात म्हटल्यावर एकदम ताडकन उभेच राहिले, आणि शर्टात हात घालून काहीतरी शोधायला लागले, म्हटल आता हे काय, ५ मिनिटांनी त्यांना त्यांचे ओळखपत्र सापडले, साहेब रेल्वेत होते.आता रिटायर. मग म्हणे मला AC टून प्रवास असतो,
तेही मोफत आहात कुठे ?

मी :हँ,हँ.. हो का ? मस्तच

ते : मग,आणि मी कोणाला अजून एकाला सोबत घेऊन जाऊ शकतो. त्यांना पण मोफतच,बाबांना फिरवेन मी मस्त.काय बाबा याचं लग्न झालं कि आपण दोघे मोकळेच कि (मायला याच्या कुठे पोचला हा),बाबांनाच असं नाही हा तुम्हाला पण अख्खा भारत फिर्वेन मी.

मी : (ए नको रे नको असं बोलू, कंट्रोल जातोय माझा,तोंडावर हसेन मग मी येड्यासारखा,बरे दिसेल का ते) आ ?

ते: : म्हणजे कोणीही एक चालतो. पुरूषच पाहिजे असं काही नाही, उद्या समजा या काकूंना पण मी घेऊन जैन (तोवर काकू ताडकन ..ऑ नको नको.. काहीतरीच आपलं,असं काहीसे घशातून विचित्र आवाज काढत बरळत उठून चपला घालायला लागल्या, आई आत पळाली ती शेवटपर्यंत बाहेर आलीच नाही) म्हणजे माझी हि बहिण आहे असे सांगीन हो मी, तात्पर्य काय कि आता ट्रेन ची चिंता नाही

मी : ण हसल्याने आतडी पीळवटली गेली होती, काकू पसार झालेल्या होत्या, मी आणि बाबा दोघे आता खिंड लढवत होतो.

ते: मी काय म्हणतो जावाय बापू (संपलोच), आता नेमके आपण किती जवळ राहतो, रात्री कधीही जेवायला आलात तरी तुम्ही दोघे ५ मिनिटात घरी, सगळे आपण एकत्रच म्हणजे ( मेलो मेलो )

मी : काका, अहो एवढा पुढचा विचार नको हो, आधी पत्रिका तर जुळून दे.

ते: ती जुळली आहेच मी आधीच दाखवली आहे, आता कशाला वेळ घालवायचा, पटापट पुढच्या गोष्टी बोलायला लागू या, आणि मुलगी तुला आवडेलच प्रश्नच नाही, मी सांगतो ना. काय बाबा ? (वारलो)
हे ऐकून उरले सुरले त्राण गेले, पुढचे काहिच ऐकू आले अहि बहुधा नातवंडांची नावे काय ठेवायची यावर चर्चा सुरु होती, मी शुद्धीत आलो तेंव्हा ते गेलेले होते. घर शांत होतं .............

प्रसंग ३ : या तडाख्यातून सावरायला वेळ लागला, आता घरी मी नसताना कोणालाही बोलवायचं असेल तर बोलवा हे डील मी फायनल केलं
एका शुक्रवारी मी ऑफिस मध्ये असताना मातोश्रींनी फोन केला, अरे ऐक ना, एक श्री XXXX म्हणून आहेत त्यांनी फोन केलेला, ते तुला भेटायचं म्हणत आहेत आज,सोबत पत्रिका नी फोटो घेऊन येतील, तर त्यांना भेटून घे ओके? तुझा नंबर दिलाय मी त्यांना. मी काही बोलायच्या आत अर्थात फोन ठेवला गेला.
चायला विकेंड चा एकतर मी कसंही ऑफिस ला जातो , थ्री फोर्थ आणि वर टी शर्ट, आजच यायचं होतं काय.आणि मागचे अनुभव बघता मला कल्पनेनेच घाम फुटायला लागला, आता तर मी एकटा होतो, होम ग्रौन्ड पण नव्हतं. कामातले लक्ष उडाले, साधारण १२ ला त्यांचा फोन आला. मी पत्ता सांगितला, ऑफिस च्या बाजूला CCD मध्ये भेटायचे ठरले.बोलण्यावरून तरी तो माणूस बरंच शांत वाटला, जरा धीर आला.
२ ची वेळ ठरलेली, ३ वाजले तरी पत्ता नाही, म्हटल चला बराय वाचलो हे महाशय काही येत नाहीत आता, तेवढ्यात फोन वाजलाच, ते आलेले होते, मीपण निघालो CCD त. २ कॉफी ऑर्डर केल्या आणि बसलो, परत सेम नमस्कार चमत्कार, स्वतःची ओळख वेग्रे. माणूस एकदम शांत होता प्रश्नच नाही.मी मुलीबद्दल विचारले, तर त्याने पिशवीतून एक जाडजूड फाईल काढली ( मी घाबरलो म्हटल हिची सर्तीफिकेत्स आणली कि काय ह्याने पहिलीपासूनची)
ते : मी xxxx,सर्प मित्र आहे

मी : अरे वा

ते : होय १९६५ पासून वयाच्या १५ व्या वर्षीपासून मी साप पकडतो, ( फाईल उघडून - त्यात वर्तमान पत्रांची कात्रणे चिकटवलेली होती) हे १९७० पासून पेपरात माझी नावे यायला लागली. (मायला हा लग्नाचा अल्बम दाखवतो तसा मला एक एक पान दाखवत होता , नको रे ए नको न प्लीज्ज )
साधारण अर्ध्या तासानंतर अर्ध पुस्तक संपलं .

ते: अशी पटापट पाने नका उलटू , तुम्हाला समजणार नाही मग, एक एक बातमी नीट वाचा, आता वेळ काढून आलाच आहात म्हणून सांगतोय , नाहीतर हल्लीच्या तरुण मुलांना जर्रा म्हणून वेळ नसतो, हा बघा मी हिमाचल मध्ये पण एक साप पकडलेला, तिकडच्या पेप्रातली बातमी. नंतर हॉटेल वाल्याने मला कुरियर केला पेपर,अशी दयाळू माणसे असतात.

मी : मुलगी काय करते ?

ते : हा तर त्यानंतर मी नोकरी सोडून दिली आणि पूर्णपणे यात उतरलो ( अरे ए .. मे क्या बोल रहा हु, तू क्या बोल रहा हे , मी तेरी मुलगी के बारे मे पुच रहा हु णा)नोकरी महत्वाची कि साप पकडणे ? सांगा पाहू ?
अजून साधारण पंधरा मिनिटांनी

मी : पत्रिका आणि फोटो मागितलेला आईने आणलाय का ?

ते: हल्ली सर्प मित्र उरलेत कुठे पण , माझं पण वय झालाय आता, मी अजून एक पण काम करतो , समाजसेवा म्हणता येईल, अंधांसाठी मी ब्रेल लिपीत पुस्तके लिहितो, हि बघा (पोतडीतून त्यांनी अजून काही जाडजूड पुस्तके काढली, अता मला काय घंटा कळणारे त्यातले साहेब माझा हात हातात घेऊन त्या पुस्तकावर ठेऊन मला सांगत होते हे बघा हि ब्रेल लीपी (काय सांगताय काय? हाव च्वित) इकडे ऑफिस मधून फोन वर फोन पोरगा गायब झाला कुठे
पुढील बराच वेळ मग अंध, ब्रेल लिपी आणि समाजसेवा यावर

मी: पत्रिका देताय णा

ते : देतो हो त्या आधी मी एक गम्मत आणलीये , तुमच्या साठी नवीन असेल, मला उशीर का झाला याचे कारण

मी : ??? (अजून एक काळी पिशवी टेबलावर आली)

ते : तुम्हाला भेटायचं म्हणून निघालो आणि कॉल आला, चेंबूर BARC भागात मध्ये धामण दिसलीये, मग आधी तिकडे गेलो, (

तोवर ती काळी पिशवी वळवळायला लागली, आणि मला अंदाज आला त्यात ती पकडलेली धामण होती

)

मग पकडली आणि आणली इथे आता इथून येऊर ला जाणार आणि सोडणार, हात लावा ना

(नको हो नको , हातभर फाटलीये माझी) "अहो लावा हो हात मी सांगतो कशी धरायची ते," (माझी बोबडी वळलेली होती,)माझा हात पकडायचा ते साहेब निरर्थक प्रयत्न करत होते, ती पिशवी वळवळत होती आणि त्यात धामण होती.

मी: काका अहो नको लोक बघतायेत आपण निघुयात आता, नंतर केंव्हातरी मी येईन साप पकडायला,(तेवढ्यात त्यांच्या गडबडीत ती पिशवी खाली पडली आणि अर्धी धामण पब्लिकला पण दिसली, आधीच एकतर हुच्च्च लोकस पुढे काय झाले असेल , कल्पना करा लिहित बसत नाही)

आता मला त्या CCD मध्ये घेत नाहीत Sad

त्या मुली बद्दल काहीही समजले नाही, पत्रिका नंतर त्यांनी मेल केली, ती अर्थातच जुळली नाही
आता पुढचा धक्का कधी बसणारे या विचारात दिवस काढतोय,
बापू म्हणतात बेटा ये तो ट्रेलर हे ,पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त!!!!!

-धक्क्याला लागलेला (व्यथित)

* सर्व प्रसंग काल्पनिक असून वास्तवाशी काही संबंध आढळल्यास योगायोग समजावा Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोवर काकू ताडकन ..ऑ नको नको.. काहीतरीच आपलं,असं काहीसे घशातून विचित्र आवाज काढत बरळत उठून चपला घालायला लागल्या >>> हसून हसून पार मुरकुंडी वळली ...

माझ्या वेळेसचा एक प्रसंग आठवतोय ... एक ते रविवारी सकाळी ६:३० ला आले होते पत्रिका द्यायला ... म्हणाले मॉर्निंग walk ला जाता जाता द्यावी म्हणून आलो .... Happy

mala awadla..... mi hi hyatun jaat ahe ata......... khup vichitra asta sagla... funny

Pages