फ्लॅश फिक्शन ( शिकार )

Submitted by कवठीचाफा on 16 January, 2015 - 18:06

सरोवराकाठी त्यांची पार्टी पूर्णं रंगात आली होती, वेगवेगळ्या झाडांपासून मिळवलेली मद्ये, मोसमात उपलब्ध असलेली फळे, अनेक तर्‍हेच्या झाडांच्या पानांना एकत्र करून तयार केलेल्या खाद्यकृती, सोबत जिभेला झणका देणार्‍या मुळ्या. हो, असेच सगळे, कारण आता जिभेचे बाकी चोचले पुरवायला दूर दूरपर्यंत एकही शिकार उपलब्ध होत नव्हती, जी काही थोडीफार शिकार शिल्लक होती ती सुद्धा संरक्षीत करून फार दूरवर नेऊन ठेवण्यात आलेली होती.

पार्टीतल्या काहीजणांचे दु:ख हेच होतं आणि ते त्यांच्या चेहर्‍यावरून स्पष्ट जाणवत होतं. मध्यभागी कोंडाळं करून बसलेल्यांपासून दूर अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरताना त्यांच्यातल्या एकानं ती अस्पष्ट चाहूल टिपली.. नक्कीच आज नशीब जोरावर होतं, पावलांचाच आवाज तो.. एकमेकांशी नेत्रपल्लवी करत तिघेही आवाजाच्या दिशेनं सरकले. काही पावलातच सावज नजरेच्या टप्प्यात आलं, आणि तिघांनीही त्याला टिपण्यासाठी धाव घेतली...

तेवीस शक्य समांतर विश्वातील अशक्यप्राय घटना पाहून त्यानं नुकताच चोविसाव्या विश्वात प्रवेश केला, तहानेनं कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी समोरच्या सरोवराकडे जाताना आजूबाजूनं अचानक आलेल्या आवाजानं तो दचकला, काही क्षणच.. पुढच्याच क्षणी तो जमिनीवर कोसळलेला होता..
जमिनीवर निष्प्राण पडलेल्या आपल्या शिकारीकडे विजयी नजरेनं पाहत त्या तिन्ही हरणांनी जल्लोष केला, खुप काळानंतर आज त्यांना मांसाहार मिळणार होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users