'पिफ' - २०१५ - समारोप

Submitted by चिनूक्स on 15 January, 2015 - 14:02

गेला आठवडाभर तमाम चित्रपटप्रेमींच्या गर्दीत सुरू असलेला जगभरातल्या उत्तमोत्तम चित्रपटांचा महोत्सव आज संपला.

कोथरुडातल्या सिटिप्राईड चित्रपटगृहात समारोप व बक्षीससमारंभ रंगला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे सांस्कृतिकमंत्री श्री. विनोद तावडे उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक, महोत्सवाचे प्रायोजक यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती.

समारोप समारंभाचं मुख्य आकर्षण होतं महोत्सवाच्या स्पर्धाविभागाचा निकाल.

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'संत तुकाराम' पुरस्कार यावर्षी 'एलिझाबेथ एकादशी' आणि 'किल्ला' या चित्रपटांना विभागून देण्यात आला.

अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट दिग्दर्शकासाठी रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'ख्वाडा' चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना मिळाला, तर अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'एक हजाराची नोट' या चित्रपटातील भूमिकेबद्दल अभिनेत्री उषा नाईक यांना जाहीर करण्यात आला.

मराठी चित्रपट स्पर्धाविभागात 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' आणि 'यलो' या चित्रपटांना परीक्षकांचा खास पुरस्कार देण्यात आला, तर सर्वोत्कृष्ट छायांकनाचा पुरस्कार अमोल गोळे यांना 'एलिझाबेथ एकादशी'साठी मिळाला. सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार 'एक हजाराची नोट' या चित्रपटासाठी श्रीकांत बोजेवार यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठी असलेला प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार किरण यज्ञोपवित दिग्दर्शित 'सलाम' या चित्रपटाला जाहीर करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय स्पर्धाविभागाचे निकाल पुढीलप्रमाणे -

१. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'प्रभात' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - 'बिहेवियर' (Conducta) - दिग्दर्शक - एर्नेस्तो दारानास (क्यूबा)

२. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'प्रभात' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - Jako Nikdy ('Like Never Before', Czech Republic) व Alexander Kott ('Test', Russia).

३. प्रेक्षकांच्या पसंतीचा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट - Test.

४. परीक्षकांचा खास पुरस्कार - 'Difret' (Ethiopia) या चित्रपटातल्या भूमिकेसाठी Tizita Hagere

५. परीक्षकांचा खास पुरस्कार - 'Bad Hair' (Pelo Malo) या ब्राझीलच्या चित्रपटातील भूमिकेसाठी Ms. Samantha Castillo

६. परीक्षकांचा खास पुरस्कार - 'Nabat' (Azerbaijan) या चित्रपटाचे निर्माते Mushfiq Hatamov

पुरस्कार वितरणसमारंभाच्या आधी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा 'सचिनदेव बर्मन पुरस्कार' सुप्रसिद्ध संगीतकार आनंदजी शहा यांना सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी उपस्थित रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांना मानवंदना दिली. हा पुरस्कार स्वीकारताना आनंदजी शहा यांनाही गहिवरून आलं.

यंदाच्या महोत्सवातील परीक्षकमंडळाचे अध्यक्ष श्री. क्रिस्तोफ झानुसी यांचाही चित्रपटक्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

गेली काही वर्षं महोत्सवात तरुण प्रेक्षकांची संख्या सातत्यानं वाढते आहे. उद्घाटनाच्या आणि समारोपाच्या वेळी या प्रेक्षकांचा जबरदस्त उत्साह केवळ बघण्यासारखा होता. श्री. आनंदजी शहा आणि श्री. क्रिस्तोफ झानुसी यांच्यासाठी झालेला टाळ्यांचा कडकडाट अवर्णनीय होता. खेरीज महोत्सवाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर श्री. समर नखाते यांचं नाव पुकारलं गेल्यावर प्रत्येकवेळी टाळ्याशिट्ट्यांनी थिएटर दणाणून जाणं हे दरवर्षीप्रमाणे यंदाही बघायला मिळालं. नखातेसरांनी चित्रपटप्रेम किती तरुणांमध्ये रुजवलं याची गणती नाही. सरांच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्याबद्दल असलेला आदर दरवर्षी अशाप्रकारे दिसून येतो.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपटातले महत्त्वाचे चित्रपट मुंबईत यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात १७-२१ जानेवारी आणि औरंगाबादेत २९ जानेवारी - ३१ जानेवारी या काळात दाखवण्यात येणार आहेत. पुढच्या वर्षीपासून हा महोत्सव नागपुरातही आयोजित केला जाणार आहे.

पुढच्या वर्षीच्या 'पिफ'च्या तारखा आहेत १४-२१ जानेवारी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संपलं पण पिफ ?
प्रत्येकाने पाहिलेल्या चित्रपटांबद्दल नक्की लिहा. इथे नेटफ्लीक्सवर वगैरे असतील तर बघता येतील..
सर्व विजेत्यांचे अभिनंदन !

सलाम आणि किल्लाबद्दल बरच ऐकलय. डीव्हिडी आहेत का त्यांच्या ?

'किल्ला' अजून काही महिन्यांनी प्रदर्शित होईल. 'सलाम'च्या डीव्हीडीची चौकशी करावी लागेल.
यंदा 'पिफ'ला काही जबरी चित्रपट बघायला मिळाले. लिहीन लवकरच. झानुसींचं व्याख्यानही मस्त होतं. तेही अनुवाद करून टाकेन इथे.