सलाम!

Submitted by झुलेलाल on 15 January, 2015 - 12:36

परवाचाच एक अनुभव. गाडी स्टेशनवर थांबण्याआधी रिकामी झाली होती. मी व्हॉटसअपवर असल्याने मला स्टेशन आल्याचे जरा उशीराच लक्षात आले. फर्स्टक्लासचा तो डबा जवळपास रिकामा होता. समोरच्या बाकावर, माझ्यासारखाच, उशीरा लक्षात आलेला एकजण होता. मी उतरताना सहज वर बघितलं. एक चकचकीत बॉक्स असलेली प्लास्टिकची पिशवी कुणीतरी रॆंकवर विसरून गेला होता. मी बाजूच्या त्या माणसाला विचारलं.
ये आपका है?
त्याची नसल्यामुळे तातडीनं तो नाही म्हणाला. पण लगेचच त्याचं लक्ष त्या पिशवीवर खिळलं.
मी उतरलो. मागे बघितलं.
तो माणूस डब्यात रेंगाळला होता.
थोडं पुढे जाऊन मी थांबून बघू लागलो.
तो माणूस उतरला, तेव्हा त्याच्या हातात ती पिशवी होती!
... बहुधा मी उतरायची किंवा मूळ मालक येतो की काय याची वाट पहात तो रेंगाळला होता.
तो फलाटावर उतरून चालू लागला, आणि काही अंतरावर उभा असलेल्या मला त्यानं पाहिलं. झटक्यात मागे वळून उलट्या दिशेनं झपाझप चालत तो दिसेनासा झाला होता!

... एका बातमीमुळे हा प्रसंग पुन्हा आठवला.

पुण्याच्या एका भंगारवाल्यानं, एका उच्चभ्रू घरातलं एक जुनं कपाट विकत घेतलं.
ते दुसऱ्याला विकून चार पैसे नफा मिळणार म्हणून तो खुश होता.
या धंद्यातून होणाऱ्या पाचसहा हजाराच्या कमाईतून त्याचं कुटुंब कसंबसं जगत होतं. मुलगी कॉलेजात शिकत होती. खेळात नाव कमवायचं स्वप्न तिच्या मनात रुजलं होतं.
तिच्या शिक्षणासाठी घेतलेलं कर्जही त्याच तुटपुंज्या कमाईतून तो नेमानं फेडत होता.
आपल्या वाटणीला आलेलं आयुष्य ते कुटुंब आनंदानं आणि प्रामाणिकपणाने जगत होतं.
ते कपाट विकून या वेळी हाताशी चार पैसे जास्त मिळणार होते.
त्यानं ते कपाट घरी आणलं, आणि विकण्याआधी स्वच्छ करण्याकरीता उघडलं. आत एक लॉकर होता. त्यानं तो उघडला.
एक जुनी पिशवी आत होती. काहीतरी भरून ठेवलेली!
त्यानं ती बाहेर काढून उघडली, आणि त्याचे डोळे विस्फारले. नकळत दोन्ही हातांचे तळवे गालांवर आले.
काही वेळ फक्त तो त्या पिशवीत पाहात होता.
... आत सोन्याचे दागिने होते!
त्यानं भानावर येऊन पुन्हा पिशवी उचलली. जड होती. किलोभर तरी वजन होतं.
क्षणभरच, अनेक विचार मनात येऊन गेले.
आख्खं भविष्य एका सुखद वळणावर येऊन थांबल्याचा भासही त्याला झाला.
पुढचा क्षण त्याचं आयुष्य बदलण्यासाठी समोर हात जोडून जणू उभा होता.
त्यानं मिनिटभर डोळे मिटले, आणि लहानपणी आईवडिलांच्या तोंडून एेकलेल्या संतांच्या गोष्टी त्याला आठवल्या. पंढरीच्या वारीला जाणारे वारकरी आठवले...
... आणि पिशवीला घट्ट गाठ मारून तो पुन्हा पेंडशांच्या घरी गेला.
दार वाजवून हिराबागेतील पेंडशांच्या हाती त्यानं ती पिशवी सोपवली.
पेंडशांनी ती उघडली.
आता त्यांचे डोळे विस्फारले होते. तोंडाचा आ झाला होता. त्यांना काही बोलायलाच सुचत नव्हते. अचानक समोर उभं राहिलेलं हे भाग्य आपल्याच घरात भंगारात कितीतरी वर्ष पडून राहिलं होतं, हेही त्यांना माहीतच नव्हतं...
तो भंगारवाला समोर दरवाजात उभा होता. काहीच न बोलता.
काही वेळानं पेंडसे सावरले. पिशवी घेऊन आत गेले, आणि पुन्हा बाहेर आले.
त्यांच्या हातात पाचशेची नोट होती. ती त्यांनी भंगारवाल्याच्या हातावर ठेवली.
तो जरासा कचरलाच. त्याचा हात पुढे झालाच नाही. मग पेंडशांनी त्याच्या खांद्यावर थोपटलं!
'अरे, हे तुझ्या प्रामाणिकपणाचं बक्षिस आहे! घे!' असं म्हणाले.
पाचशेची नोट घेऊन कपाळाला लावत त्यानं खिशात घातली आणि तो घरी आला.
त्या क्षणी त्याला अगदी हलकंहलकं, मोकळं वाटत होतं!
.... हा दुसरा प्रसंग.
पुण्यात घडलेला.
दुसऱ्या दिवशी लोकसत्तात ती बातमी वाचली, आणि मला ट्रेनमधला प्रसंग आठवला.
मोहाचे क्षण टाळणं, भल्याभल्यांना जमत नाही.
प्रामाणिकपणाच्या गप्पा सगळेच मारतात. पण असा एखादा क्षण समोर आलाच, तर कितीजण तो प्रत्यक्षात जगतील हे सांगणं कठीण असतं.
.... या दोन प्रसंगांतून ही दोन्ही उत्तरं मिळालीत!
पुण्याच्या त्या गरीब भंगापवाल्याच्या प्रामाणिकपणाला आणि श्रीमंतीला सलाम.
अशा प्रामाणिकपणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे.
त्याला बक्षिस देऊन त्याच्या प्रामाणिकपणाची कदर केली पाहिजे.
यासाठी, व्हॉटसअप, सोशल साईटस, फ्रेंडस ग्रुप्स यांनी पुढे आलं पाहिजे.
आम्ही त्यासाठी एकत्र आलोय.
तुम्हीही सोबत या.
सुभाष वडवराव या भंगारवाल्याच्या कुटुंबाच्या भविष्यात यथाशक्ती आनंद उधळू या!
त्याची मुलगी नववीत शिकते. पत्नी जेवणाचे डबे बनवते. दोन मुलं मजुरी करतात.
हे घर म्हणजे श्रमाचं मंदिर आहे. घराचं आणि आजारपणाचं कर्ज असतानाही ते आनंदी आहे.
हा आनंद आपण आणखी फुलवू!
त्याचा बँक खाते क्रमांक आणि आवश्यक तपशील पुढे देतोय.
ही मदत नाही, तर दुर्मीळ होत चाललेल्या प्रामाणिकपणाची कदर आहे. त्यामुळे त्यासाठी पुढे होणाऱ्या हाताचे नाव काय हा मुद्दा महत्वाचा नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहे. प्रामाणिकपणा आजकाल दुर्मिळ होत चालला आहे. नसलेल्या प्रामाणिकपणाला चातुर्याचा बुरखा घालून उदो उदो होताना दिसतो सगळी कडे. त्या भंगारवाल्याला शतशः प्रणाम....