कलंदर कलाकार बाबा (डॉ अनिल अवचट) भेट वृत्तांत

Submitted by मंजूताई on 15 January, 2015 - 05:14

सालाबादप्रमाणे नवीन वर्ष येतं अन संपत, कसं, ते कळतही नाही. अनपेक्षितपणे डॉ कन्ना मडावी व डॉ प्रकाश व डॉ मंदा आमटेच्या भेटीने दोन हजार चौदाची सांगता झाली अन त्या आठवणी आळवत असतानाच नवीन वर्षाची सुरुवात आवडत्या लेखकाच्या भेटीने झाली ... ... क्या बात है! आपलाच हेवा आपल्याला वाटावा. नाही, हा हेवा नाही तर 'ठेवा' आहे.
त्याचं असं झालं आमची एक सेतू - अ कॉन्शस पेरेंट फोरम ही पालकांची संस्था आहे. दरवर्षी मुलांच्या छंदांच प्रदर्शन व काही तज्ञांच्या कार्यशाळा आयोजित करत असतो. हे जरी प्रदर्शन असलं तरी मुलांसाठी उत्सव व आमच्यासाठी एक कार्यच असतं. तारखा ठरल्या अन कळलं की श्री. श्री द महाजन व डॉ अनिल अवचट कान्ह्याला जाणार आहेत व नागपुरात मुक्कामाला थांबणार आहेत. आम्ही संधी सोडली नाही.

इथे पोचल्यावर जेवण, आराम, मुलांसाठी ओरीगामी कार्यशाळा व संध्याकाळी बापू व बाबांच्या गप्पा असा आखलेला कार्यक्रम होता पण विमान उशिरापोचल्याने कार्यशाळे व्यतिरिक्त सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडले. बापू एक चालता बोलता वनस्पती विश्वकोष आहेत,ह्याशिवाय त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. तर बाबाबद्दल (बाबांबद्दल नाही, ए बाबा) बरीच वाचून, ऐकून होते. त्यांच्या पाहुणचाराची जबाबदारी आम्ही दोघी कार्यकर्त्या, अस्मादिक व वर्षावर होती. खाण्यापिण्याच्या नखरे नसल्याचे कळल्याने सेलिब्रेटींसाठी,( नो, नो, सेलीब्रीटीतला 'से' शब्द उच्चारायला सक्त मनाई) खायला काय करायचं ह्याच टेन्शन अजिबात नव्हते. पाहुणचाराची संधी मिळाल्याचा आनंद तर होताच त्याचबरोबर त्यांच्याशी गप्पा मारायला मिळणार ह्याचा आनंद जास्त होता. काश! विमान वेळेवर न आल्यामुळे मला ह्या दुहेरी मेजवानीचा आस्वाद घेता आला नाही. असो!

भरगच्च सभागृहात बाबाने ओरीगामीच फूल करता करता बापूंशी मारलेल्या गप्पांचा आनंद रसिकांनी घेतला. रात्रीच्या जेवणात घासभर भात खाणारे ते तिघं अन पसाभर खाणारे आम्ही तीस कार्यकर्ते अशी पंगत साग्रसंगीत ( ह्यातलं साग्र काय माहीत नाही पण बाबाच्या संगीताने ) झाली. विनंतीशिवाय गाणं म्हणणारा हा एकमेव गायक असावा! पुणेकरांना वर्‍हाडी तिखट जेवणानंतर काहीतरी गोड खायची इच्छा झाली . आपण आईस्क्रीम खाऊ या, हे सांगण्यातला तिघांचाही मोकळेपणा, नि:संकोचपणा, साधेपणा, सहजता खूपच भावली.

बापूंचं वय, हवामान व पुढचे कान्हातले कार्यक्रम बघता, दुसर्‍यादिवशी सकाळी महाराजबागेत फेरफटका रद्द करावा लागला तरी फार निराशा झाली नाही कारण तेवढाच वेळ त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात वर्षाच्या घरी घालवता आला. बाबाने गुळपोळीच्या केलेल्या कौतुकाच्या नशेत सुरळीच्या वड्या खाऊ घालायची कालची अपुरी इच्छा आज पूर्ण करून घेतली. वर्षाकडे गेलो तो स्नेहा, अमर, तन्वीही येऊन पोचलेले अन बाबाच्या फर्माइशी पर पोहे करण्यात वर्षा मग्न होती. सकाळी सकाळी बासरीवर बाबा 'रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा' वाजवत होता... सगळ्यांची आपुलकीने चौकशी..... पोहे मस्त झालेत हं... हे गाणं किती छान 'तुम पास आए, युं मुस्कुराये'...सगळ्यांसाठी एकेक ओरीगामीच भेटवस्तू करणं.. एखादं जुनं गाणं, तन्वी, अमरचं गाणं ... अंगणात जाऊन आमचे फोटो काकां..जगभरातल्या आदिवासींचा छंदाचं प्रात्यक्षिक व गोष्टीसह बोटांवरच्या दोरीच्या करामती.... त्याचबरोबर बापूंच त्यांच्याजवळचा खजिना उधळणं.. त्या उत्साहात तयार व्हायचं विसरून जाणं ... थोड्या थोड्या वेळाने बापूंना त्याची आठवण करून देणं ... लाकूड मिळालं असतं तर तेही करून दाखवलं असतं...... चौसष्ठ कलांपैकी किती येत नसतील? कदाचित बोटावर मोजण्या इतपत.. धमाल! दोन तास कसे गेले ते कळलंच नाही.

बदललेली आर्थिक, सामाजिक परिस्थिती, जीवनशैली .....ढसळलेली नीतिमूल्ये... दोन पिढ्यांतली दरी .... असंवेदनशीलता.. अशा अनेक विषयांवर बाबाशी मारलेल्या गप्पा....सुरुवात झाली ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने..

"पसायदान ही फार ग्रेट कविता आहे जगातली. केवढं भव्य स्वप्न आहे हे! ज्ञानदेव काय म्हणतात - लेखन कसं असावं - साज्य अन मवाळ. साज्य म्हणजे सच्चं व मवाळ म्हणजे आक्रमक नसावं. मितुले अन रसाळ! मितुले म्हणजे थोडक्यात असलेतरी रसाळ, रसरशीत असावे. शब्द जसे कल्लोळ अमृताचे... आपल्या किती मिळतं ह्या ज्ञानेश्वरीतून... आपल्याकडचं शहाणपण आहे ते का सोडायचं? विज्ञानाने जे काय दिलं आहे , ते घेऊ यात.. पण हे जे शहाणपण असेल तर विज्ञानाचा योग्य उपयोग करू शकू.. एक ठाकर जमातीचा आदिवासी होता.. गोफण फिरवायचा अन पाखरं उडवायचा.. मी त्याच्याकडून गोफण फिरवायला शिकलो. मी जोराने गोफण फिरवली, तसा तो म्हणाला, ' पोरा जोर करू नको काही वाटा पाखरांचा अस्तुया '... हा इसेन्स आपण घालवलाय... आमच्याकडे एक म्हैस होती कल्याणी नावाची. ..तिच्या कपाळावर चांदवा होता..तिच्या दुधावर आम्ही पोसलो... दोन हजार सालापासून त्र्याणववर्षाची आई माझ्याकडे असते... आम्ही जुन्या आठवणी काढतो, गप्पा मारतो... ती मेल्यावर तिला पुरलं... मी आईला विचारलं तिचं कातडी काढून विकतात वैगेरे.. तर ती म्हणाली माझी सगळी पोरं तिचं दूध प्यायली,आईला असं कोणी विकत का? व्हल्यु अडिशन की काय ते म्हणतात,...ते आपण गमावलंय! आपण वस्तू विकत घेतो, उपभोग घेतो, नवीन वस्तू घेतो अन कचरा निर्माण करतो.... कुणाविषयी आत्मीयताच नाही राहिली. ही माझी बासरी! तिनी मला किती आनंद दिलाय... माझ्या मनात तिच्याविषयी कृतज्ञता आहे.... माझं पुस्तक आहे सृष्टीत गोष्ट, वनात जनात त्यात लिहिलंय... मी माझ्या सगळ्या वस्तूंशी संवाद साधतो...काष्ठशिल्प वैगेरे करताना वस्तू चटकन दिसत नाही, जरा इकडेतिकडे बघितलं की दिसतातही ,मग मी विचारतो ..हातोडेबुवा रुसलात का? किंवा काहो कुठे गेला होतात... नाही, जरा बिडी प्यायला गेलो होतो... असे मनातल्या मनात संवाद होत असतात. हे अगत्य आहे ना ते सजीवांविषयी आहेच निर्जीवांविषयीही आहे. ते आज आपण घालवलंय...

आपल्या मुलांना जन्म दिलाय ही एक जैविक घटना घडून गेलीये... आपली मुलं ही स्वतंत्र माणसं आहेत... ती सक्षम झाली की आपण त्यांना वेगळी व्यक्ती समजावं... त्यांचं जीवन त्यांच्या हातात आहे... आपण शेजार्‍यांकडून अपेक्षा ठेवत नाही ना तसंच मुलांकडून कमीतकमी अपेक्षा ठेवायच्या... जगात दु:खाच मूळ कारण अपेक्षा आहे... मुलं अडचणीत आली तर आपण त्यांच्या पाठीशी असावं... विश्वास गमवता कामा नये... सुनंदाला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा तिने मला तयार केलं... आपल्यालाच का झाला हा प्रश्न विचारायचा नाही्, ह्यातून काही निष्पन्न होणार नाही... आता काय करता येईल, त्याचा विचार करायचा... औषध घेऊन तिला आठ वर्ष जास्तीची मिळाली... जाण्यापूर्वी दोन वर्ष आधी मुक्तांगण सुरू झालं होतं... चार केमो झाल्या... केमोचा दिवस सोडला तर बाकी दिवस ती काम करत असे... डॉनी सुचवलं परदेशी जाऊन उपचार घ्यायला पण ती म्हणे इथेच राहणार, इथेच उपचार घेणार अन मुक्तांगणाचं काम करणार... ती वन डे अ‍ॅट अ टाइम नाही तर ती वन मोमेंट अ‍ॅट अ टाइम जगली.. ..तिने मला तयार केलं! हे जे छोटे मोठे प्रसंग मला अलीकडचे वाटतात. मृत्यू समीप ही शक्यता नाहीतर खात्री असताना शांत राहून काम करणं हे मी पाहिलंय...हे मानवी जीवनात शक्य आहे मग लहानसहान गोष्टींवर का मात करता येऊ नये "...

सुनंदा नोकरी करून पैसे कमावणार व बाबा स्वच्छंदी आयुष्य जगणार ! बिनशर्त विभागणी! खरंच त्यांना हे जमलं असेल का ? अशी मनात शंका सुद्धा येत नाही! किती नितळ, पारदर्शी आयुष्य ! कुठल्याही प्रकारचं ओझं नाही.. साधं, सरळ, सहज, सोपं, सरधोपट... आयुष्य! आपण किती ओझी बाळगत असतो, नाही का! तो काय म्हणाला...... तिला काय वाटेल...... अशी एक ना दोन ...अनेक ओझी!

'जगा व जगू द्या' ह्या जीवनमंत्रात, बाबाच्या भेटीतून एका शब्दाची भर पडली .... 'जगा व जगू द्या ओझ्याविना'

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वृत्तांत. भाग्यवान आहात. आनंदी होण्यासारखीच गोष्ट आहे. दोन मनस्वी वल्लींना जवळून बघाय-भेटायचा योग आला तुम्हाला Happy
मीही तुमच्यासारख्या भाग्यवानांपैकी एक आहे. त्यामुळे तुमच्या आनंदात सहभागी आहे Happy

नत होऊन चरणस्पर्श करावा अशी आहेत ती दोघंही. त्या दोघांचं आपसातलं मैत्रही खुप लोभस आहे. मूर्तीमंत आनंद आणि प्रसन्नता.

धन्यवाद सगळ्यांना! . त्यांच्या मुली त्यांना चुळबुळ्या बाबा म्हणतात. सतत कार्यरत राहणे ... शांत, स्वस्थ बसणं माहीतचं नाही...शेवटच्या फोटोत गप्पा मारता मारता ओरीगामीचं फूल करताहेत...

खूप छान लिहिलं आहे!! ह्या आठवणी निश्चितच खूप मोठा ठेवा आहेत!! >>> +१००...

ग्रेट व्यक्तिमत्वे, ग्रेट अनुभव ..... सुर्रेख शब्दांकन ... Happy

उत्क्रुष्ट शब्दरचना नेहमी प्रमाणेच Happy खुपच सुरेख लेख...
ह्या आठवणी निश्चितच खूप मोठा ठेवा आहेत!! >>> +१००...

ग्रेट, मी तर फॅन आहे त्यांची. अगदी नतमस्तक व्हावं असं व्यक्तिमत्व.

बाबाना ____/\____. तुलाही ___/\___ मंजुताई, फार सुंदर परिचय. भाग्यवान आहेस.

काही वाटा पाखरांचा असतो...>>>
_/\_

सुरेख वृत्तांत लिहिलात. भाग्यवान आहात म्हणून अशा व्यक्तींचा सहवास लाभला तुम्हाला

छान लिहीलं आहे! Happy

२ वर्षांपूर्वी भारतात जाताना सिंगापोर एअरपोर्टवर हॉल्टला उतरताना माझ्यापुढे अनिल अवचट! मी इतकी बावचळले होते. पण नंतर छान गप्पा झाल्या. हॉल्टमध्ये या गेटपासून त्या गेटवर जाताना दरवेळेस हसून ओळख देत होते! Happy

मस्त लिहिलं आहे...

डॉ.सुनंदा अवचट म्हणजे आधीच्या सुनंदा सोहोनी ह्यांचं माहेर माझ्या आईच्याच बिल्डिंग मधे. त्या मुळे अनिल अवचटांना खुप वेळा पाहिलं आहे. त्या वेळेस एस.टि.डी. असलेला फोन पूर्ण बिल्डिंग मधे फक्त आमच्या कडेच होता. त्या वेळे स ते खुप वेळा घरी आलेले.

नंतर पुण्याला टिळक स्मारक मंडळात एका कार्येक्रमात परत भेट झाली असता त्यांनी मुलांना दाखवलेली ओरिगामी अजुनही स्मरणात आहे....

ग्रेट माणूस

हा माझा ठेवा चित्ररुपानेही मिळाला. बाबा आमचे फोटो काढत होता ... फोटोसाठी मी खूपच कॉन्शस होते त्यात बाबा काढणार म्हणून जरा जास्तच झाले होते... पण बाबाने गप्पात रंगवून , हसवून फोटो काढले अन ते पोस्टाने पाठवले देखील ... ग्रेट _/\_

मस्त लिहिलंय. खरंच भाग्यवान आहात!

माझ्या बहिणीला पौड रोडवर आनंदनगरच्या बाहेर एकदा ते भाजी घेताना दिसले! ती एकदम म्हणाली, तुम्ही भाजी घेताय? तर ते म्हणाले, हो, मी भाजी खातो म्हणून घेतो. Happy

ज्याना बघून, ऐकून , वाचून छान जगावंसं अधिकच तीव्रतेने वाटतं, त्यातलं एक आवडतं माणूस ! भावपूर्ण श्रद्धांजली!!

Pages