पैज!

Submitted by झुलेलाल on 14 January, 2015 - 03:51

पैज!
तुम्ही कधी पैज लावली आहे?
कधी पैज जिंकली आहे? कधी हरला आहात?
पैजेची एक गंमत असते. पण ती नंतर सांगतो.
अनेकांना, पैजेवर बोलण्याची हौस असते. काहीजण तर पैज लावूनच पुढे बोलतात.
हा वर्ग स्वत:विषयी प्रचंड आत्मविश्वासाने वावरत असतो. आपल्याला एखादी गोष्ट माहीत नाही, असे मानायला सहसा हा वर्ग तयार नसतो.
किंवा कोणत्याही मुद्द्यावर, आपला शब्द हा अंतिम शब्द अशी त्याची समजूत असते.
अनेकदा इतरांच्या अद्न्यानाबाबतच्या कणवेचे भाव चेहऱ्यावर वागवतच हा वर्ग वावरत असतो.
त्यांच्या दृष्टीने त्याचा एक फायदा असतो.
पहिला म्हणजे, असे भाव समोरच्याच्या चेहऱ्यावर असले, की आपण आपोआपच ओस्लो होऊ लागतो. एक कॉम्प्लेक्स मनावर दाटू लागतो.
... त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे कणवेचे भाव आणखीनच गडद होतात आणि त्याचा आत्मविश्वासही वाढतो.
मग तो पैज लावण्यासाठी सरसावतो.
दामटून, आपलाच दावा खरा असल्याचे सिद्ध करण्याचा हा हुकूमशाही प्रकार.
हा प्रकार जेवढ्या आक्रमकपणे वापरता, त्यावर समोरच्या माणसाची नमते घेण्याची क्षमता अवलंबून असते.
म्हणजे, पैजेचे हे मानसशास्त्र असते.
... फार पूर्वीपासून मी त्यावर अभ्यास करतोय. त्यामुळे हे मानसशास्त्र मला पटलेय!
माझ्या अभ्यासाच्या सुरुवातीला मी काही प्रयोगही केलेत.
नमुना म्हणून एक सांगतो.
एकदा रस्त्यावरून चालत असताना माझ्या एका मित्राने मागून येऊन मला गाठले. पाठीवर थाप मारली. आणि त्याच्याकडे न पाहता मी म्हणालो, 'बंड्या! '
तो चकित. 'कसं ओळखलंस? '
'सोप्पय... तू खूप मागे होतास तेव्हाच मी तुला ओळखलं होतं... ' मी ठामपणे दामटून सांगितलं, आणि तो आणखी चकित.
'कसं शक्यय?... मागे न बघता मागे असलेला माणूस कुणी ओळखू शकेल? काहीही सांगतोस?... तो म्हणाला, पण त्यात ठामपणा नव्हता.
मला ते जाणवलं.
'मला जमतं. मी ओळखू शकतो. ' मी आवाजात ठासून विश्वास भरला आणि म्हणालो.
त्यानं फक्त तोंड वाकडं करून खांदे उडवले.
माझ्या दाव्याला आव्हान द्यायची त्याची हिंमत नाही, हे माझ्या लक्षात आलं. माझं अवसान आणखी वाढलं, आणि मी म्हणालो, 'चल. एक हजार रुपयांची पैज! मी सिद्ध करून दाखवतो! '
त्याचा चेहरा अगदीच हा झालेला.
'बरं, पाचशेची! ' मी म्हणालो.
तरी तो तयार नव्हता.
मग मी जोरात म्हणालो, बंड्या, जाऊ दे. पण मी ओळखू शकतो, हे तरी पुन्हा पटवून देतो. तू मागे जा, मी पुढे चालत राहातो. पाचशे पावलं पुढे गेल्यानंतर मी मागे न पाहाता तुला हाक मारून ओळखून दाखवतो. मी जर ओळखू शकलो नाही, तर पाचशे देईन. तू हरलास तरी मला देऊ नको. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे?... जमला तर तुझा विश्वास तरी बसेल असं शक्य असतं याच्यावर...:' मी भडाभडा मुद्दामच बोलत सुटलो आणि तो भांबावत गेला..
काही क्शणांनंतर मी विचारलं, 'बोल.. आहे तयारी? '
तो वरमला. 'नको बाबा... पाचशे रुपये फुकट घालवायला काही वर आले नाहीयेत! '
.... नंतर आम्ही बराच वेळ एकत्र चालत होतो.
बंड्या गप्प होता. बहुधा विचार करत होता.
मग अचानक म्हणाला, 'तू मला गंडवायला बघत होतास! '
आम्ही दोघंही टाळ्या देत मस्त हसलो.
पैजेच्या मानसशसस्त्राचा एक पैलू मला तिथे सापडला.
बोला! लावता पैज?

Group content visibility: 
Public - accessible to all site users