दूधसागरास..

Submitted by Yo.Rocks on 11 January, 2015 - 14:15

गणेशचतुर्थिनिमित्त कोकणात जाण्याचे शेवटच्या क्षणी ठरले.. गेलो ते मनाशी भटकंतीचा प्लान पक्के करून.. कुठे भटकायचे ठरवले नव्हते पण एका ठिकाणाला सर्वात जास्त पसंती होती ती म्हणजे दूधसागर धबधबा ! गोवा-कर्नाटक सीमेवर 'ब्रीगांझा' Briganza घाटात असलेला हा धबधबा बरीच वर्ष खुणावत होता.. फारसा परिचित नसलेला हा धबधबा 'चेन्नई एक्सप्रेस' सिनेमातील दृश्यामुळे प्रकाशझोतात झाला...

घरचे गणपती गावी गेले नि सहाव्या दिवशी आम्हीपण घराच्यांचा निरोप घेउन बाहेर पडलो.. आम्ही म्हणजे मी व बायकोच ! निघालेलो निवतीचा किल्ला बघण्यासाठी.. तो बघून एक दिवस राहून मग 'दूधसागर'साठी जाणार होतो.. पण कुडाळ बसस्थानाकातून सकाळी जाणारी बस चुकली सो प्लान बदलला ! त्यात पाऊस अधुनमधुन दमदार सरींचा कार्यक्रम दाखवत होता तेव्हा नकोच म्हणत आम्ही थेट कुडाळ रेल्वेस्थानक गाठले..

सकाळची साडेनऊची मडगाव एक्सप्रेस 'कोकणकन्या' वेळेप्रमाणे वीस मिनिटे उशिराने आली नि आम्ही मडगावच्या दिशेने कूच केले.. लख्ख उनात चमचमणारे हिरव्या भातशेतीचे किनारे दाखवत 'कोकणकन्या'ने नारळाच्या बागेत आणले नि गोव्यात दाखल झाल्याची जाणीव झाली..

आपला प्रवास नेहमी कुडाळ- सावंतवाडी पर्यंतच मर्यादीत असल्याने 'मडगाव'ला पहिल्यांदाच भेट देत होतो.. रेल्वेस्थानक अगदी सोयीचे.. रिटायरिंग रूम्स, २४ तास सुरु असणारी लॉकर सुविधा इत्यादी सोयींनी उपयुक्त.. तिथेच असणाऱ्या 'बेंजो' हॉटेलमध्ये नॉन-वेज खाऊन श्रावण-भाद्रपद सोडला !
आम्ही दुपारी पोहोचलेलो नि दूधसागर साठी योग्य वेळ व ट्रेन उपलब्ध नसल्याने मडगावलाच रेल्वेस्थानकाजवळील एका  हॉटेलात मुक्काम केला.. त्या दिवसाची संध्या 'कोलवा' बीचवर व्यतीत केली.. जास्त गर्दी नसलेला शांत किनारा.. किनाऱ्याच्या वाळुत चालताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही..

दिवस उजाडला... मडगावहून सकाळची पावणे आठची वास्को हावड़ा - अमरावती एक्प्रेस  (क्र.१८०४८) पकडायची होती.. लक्ष्य एकच दूधसागर !

'भारतातील सर्वात मोठ्या धबधब्यांमध्ये 'दूधसागर' हा सहाव्या क्रमांकावर आहे.. चार टप्प्यात कोसळणाऱ्या या जलप्रतापाची ऊंची सुमारे ११२० फुट.. पावसाळ्यात याचे पात्र १०० फूटी रुंद असते आणि म्हणुनच हा धबधबा पावसात एकदम बघेबल ठरतो !  गोवा-कर्नाटक सीमेवर 'ब्रीगांझा' घाटाचे नंदनवन आहे..  या घाटाच्या डोंगरमाथ्यावरूनच हा धबधबा झेप घेतो.. हा सारा परिसर भगवान महावीर अभयारण्यात येत असल्याने सभोवताली घनदाट हिरवे जंगल.. पावसात उधाण आलेल्या या विशाल धबधाब्याची धार अगदी दुधासारखी शुभ्र भासते नि म्हणूनच 'दूधसागर' नाव पडले असावे.

इथे पोचायाचे तर कॅस्टलरॉक नि कुलेम ही जवळची रेल्वेस्थानकं.. 'दूधसागर' नावाचे पण स्थानक आहे पण तिथे कुठलीही गाडी ऑफ़िशिअलि थांबत नाही वा या स्थानकासाठी तिकीट मिळत नाही.. कॅस्टलरॉक व कुलेमच्या मध्ये तीन स्थानकं लागतात.. कुलेम पासून सुरवात केली तर सोनालिम- दूधसागर-करंजोल नि मग कॅस्टलरॉक. या तिन्ही स्थानकांवर कुठलीच गाडी थांबत नाही पण तांत्रिक कारणासाठी 'दूधसागर'ला एक- दोन मिनिटे गाडी थांबवली जाते.. हा ब्रेक फक्त कॅस्टलरॉकहून कुलेमला येतानाच असतो मग ती मालगाड़ी असो वा एक्सप्रेस... याउलट कुलेमहून येणारी संध्याकाळची गोवा-पुणे एक्सप्रेस फ़क्त दोनेक मिनीटासाठी थांबते...

इथे ट्रेक करायचा तर ३-४ पर्याय आहेत.. त्यात जास्त पसंती कॅस्टलरॉक वरून जाणाऱ्या मार्गाला दिली जाते.. मुंबई पुण्याचा पब्लिक पुण्याहून शक्यतो 'गोवा एक्सप्रेस' पकडून इथे येतात.. (पण गाड्यांचे वेळापत्रक बघुनच.. दोन गाड्या आहेत क्र. १२७८० व ११०९७ ) कॅस्टलरॉक स्टेशनहून चालायचे तर अंतर १४ किमी नि जवळपास ११ भोगदे !! तेव्हा कॅस्टलरॉकला न उतरता दूधसागर स्टेशनलाच गाडी थांबली की पटकन उतरून घ्यायचे इथून पुढे १ किमी अंतरावर धबधबा लागतो !

अजुन एक फारसा वापरत नसलेला पर्याय म्हणजे  कुलेमवरुन चालत.. अंतर अंदाजे १२ किमी ! लागणारे भोगदे ५ ! आम्ही 'मडगाव' या कुलेमच्या आधी असलेल्या स्टेशनाला असल्याने माझा ट्रेक प्लॅन हाच होता.. पण सौ. रॉक्स बरोबर होत्या.. ती कितपत चालेल याबद्दल साशंक होतो.. शिवाय घनदाट जंगल नि आम्ही दोघेच अशा सुरक्षेच्या दृष्टीने नकारात्मक अडचणी होत्याच ! म्हणून मडगावहून अमरावती एक्सप्रेस पकडायची.. कुलेमच्या पुढे दूधसागरला थांबली तर ठीक नाहीतर थेट कॅस्टलरॉक.. मग तिथून मिळेल त्या गाडीने दूधसागर स्थानक ! धबधबा बघून परत दूधसागर स्थानक नि मिळेल त्या गाडीने कुलेम नि तिथून पेसेंजरने मडगाव..इति तंगडतोड बचाव प्लॅन होता..

पण डाव फसला.. वेळ माहीत असुनही माहिती केंद्रावर चौकशी करताना गैरसमज झाला.. गाडी येण्यास अजुन १५ मिनिटे आहेत या भ्रमात आम्ही आवश्यक फलाटावर न जाता खादाडीसाठी टिपी करत बसलो.. परिणामी गाडी समोरच्या फलाटावरून निघून गेली !!! चुक लक्षात आली नि जोराचा झटका लागला ! आदल्या रात्री केलेल्या प्लॅनचा चुराडा झाला ! आता काय करायचे प्रश्ण पडला... मडगावहून पुढे कुलें ला जाणारी ८ ची पेसेंजर होती.. पण कुलेमपासून पुढे जायला काही पर्याय दिसत नव्हता..

पंधरा मिनिटांनी सव्वा आठची 'वास्को-कुलेम' धावणारी पेसेंजर आली नि 'काय होईल ते बघू' म्हणत बेभरवश्यावर आम्ही मडगाव सोडले.. जेमतेम पाउण तासाचा प्रवास.. खिडकीतून फ़क्त नि फ़क्त ताडमाडच दिसतात.. या प्रवासात लागणाऱ्या स्थानकांपैंकी 'चांदरगाव' नि 'कालेम' हीच काय ती नाव उच्चारण्यासारखी.. बाकी जल्ला एकही नाव धड नाही.. कुलेमला पेसेंजर खाली झाली नि समोर पावसाचे लक्षण  दिसू लागले.. कुलेमला उतरलो तर समोरच एक माणूस शेवाळ्य़ावरुन घसरला.. उठायला गेला तर पुन्हा घसरला ! सांगण्याचे तात्पर्य ही पेसेंजर ज्या उघड्या फलाटावर येते तो संपुर्ण शेवाळाच्छादीत होता ! तेव्हा जपून जपून चाल !

आम्ही लगेच गार्ड कार्यालय गाठले पण आता संध्याकाळपर्यंत कुठलीच ट्रेन नसल्याचे कळले ! आता एकच पर्याय होता चालत जाण्याचा.. रेल्वे रुळ पाहीला तर जंगलात घुसून गायब झालेला..

जायचे की नाही ह्या द्विधामनस्थितित होतो.. एका प्रवाशाला विचारले तर भोगदे लागत नाहीत म्हणाला पण गार्डकडे चौकशी केली नि भोगदे असल्याची खात्री झाली.. म्हटले आता टॉर्च असलेला बरा म्हणुन कुलेम स्टेशन बाहेर पडलो.. बाहेर दुकानं आहेत.. छोटी हॉटेल्स पण आहेत.. एक टॉर्च, जळवांचा त्रास नको म्हणुन मीठाची पुडी, खायला गोव्याची पेशल नारळाची बिस्किट इति घाइघाइत खरेदी केली.. सकाळी सव्वादहालाच दालफ्राय खाऊन पोट पण भरुन घेतले.. एव्हाना नकारात्मक विचार मागे पडून आगळा हुरूप चढला सो लेट्स गो केले.. स्टेशनबाहेरच दूधसागर नावाचा टॅक्सी स्टॅंड आहे पण पावसात एकतर गाडीचा रस्ता बंद असतो आणि नेलेच तर एक किमी अंतर आधी नेउन सोडतात.. पण हा मार्ग धबधाब्याच्या तळाकडे घेउन जातो.. तिकडून पुन्हा जंगलातून वरती चढ़ावे लागते.. तरी हुकमी जागा पहायची तर रेल्वे ट्रॅक वरूनच जायचे ! पावसात जीप नसल्या तरी बाइक- टॅक्सी (बाइकवरुन घेउन जाणारे) उपलब्ध होत्या.. तिथे दुर्लक्ष करत आम्ही लेटस गो केले..

रेल्वे रुळावर आलो.. वाटले आम्ही दोघेच दूधसागरला जाणारे तोच मागोमाग कुण्या गावचे सात-आठ गावकरी आले.. पुढे सुनसान जंगल नि त्यात हा घोळका.. थोडे टेंशन आलेच.. तेव्हा पुढे यांचा आपल्यावर watch नको म्हणत मुद्दाम मागे राहिलो.. पण त्या घोळक्यात दोन वयस्कर माणसांचा  चालण्याचा वेग पाहून पुन्हा त्यांना मागे टाकले नि सुसाट निघालो...

त्यात धो- धो पाउस सुरु झाला.. सौ. कड़े विण्ड्चिटर नि टोपी सोपवली होतीच.. तर मी छत्री नि सॅक सांभाळत  चालू लागलो.. त्या ग्रुपकडे काहीच नसल्याने ते लोक्स मग पावसात मागच्या मागे राहूनच गेले..

आता भर पावसात निसर्गाचा आनंद घेत आमच्या दोघांची वाटचाल सुरु झाली.. संपूर्ण ट्रेक रुळ मार्गावरून चालत करण्यात एक वेगळीच मजा येत होती.. पण चालणे तितके सोप्पे नव्हते..  कुलेम पासून अंदाजे ३ किमी अंतर तरी रुळाच्या बाजूने पाउलवाट आहे तेव्हा आम्ही आलटून पालटून मार्ग बदलत होतो.. काही मिनिटातच बाइकचा आवाज ऐकू आला.. मागे वळून पाहिले तर बाइक-टॅक्सीवाले... चक्क रुळाच्या बाजूने येणाऱ्या अरुंद वाटेने चालवत होते..!!  एका बाइकवर एक नि लहान मूल असतील तर ट्रिपल सिट.. आयडिया भारी होती पण भर पावसात अश्या खडबडी नि छोट्या रस्त्यातून जायचे तरी कसे... ते कितपर्यंत नि भोगद्यात कसे जात असतील असे अनेक प्रश्न पडले.. नंतर कळले की पुढे रेल्वेरुळ ओलांडून एका वाटेने जंगलात उतरतात नि पुढचा रस्ता एकदम खराब नि दोन तीन वेळा ओढा पार करावा लागतो. थोडक्यात पाठदुखीला आमंत्रण !! शिवाय पैसे पण म्हणे अव्वाच्या सव्वा घेतात..

बाइक अडखळत अडखळत पुढे निघून गेल्या नि पुन्हा नीरव शांतता..  दोन्ही बाजुला उंच झाडीचे घनदाट जंगल.. आभाळ भरुन आल्याने अंधुकसा प्रकाश नि अधुन मधून गाजावाजा करत येणारी पावसाची मोठी सर.. सर येउन गेल्यावर पानांवरून टपकणाऱ्या थेंबांची टिपटिप..नि मध्येच ऐकू येणारा झऱ्याचा खळखळाट.. जंगलातला पाऊस किती आल्हाददायक असतो ते अनुभवत होतो.. असे मस्त वातावरण एन्जॉय करण्यासारखे.. पण ते सोडून आमच्या सौ. सारख्या मागे-पुढे कुणी दिसतय का पाहत होत्या.. भर जंगलात दोघेच असल्याने तिची टरकली होती..

रेल्वेरुळ टप्प्याटप्प्याने वळण घेत होती.. एव्हाना त्या एकट्या रेल्वेरुळाशी सलगी झालेली.. बरीच चाल झाली तेव्हा कुठे या निर्मनुष्य परिसरात रुळावर काम करणारे गार्ड भेटले.. त्यांना विचारले तेव्हा अजुन ८ किमी अंतर बाकी होते !!!

पुढे काही अंतरावर रेल्वेचा भोंगा ऐकू आला.. जंगलात आवाज दुमदुमणारच ! ट्रेनचा भोंगा दुरदुरवरुन  कानावर पडत असतोच.. पण ट्रेन पुढून येणार की मागून हे कळत नाही... पण पाचेक मिनिटांतच मालडबे घेउन इंजिन समोरून आले.. आम्ही ट्रेनसाठी आधीच वाट मोकळी करून दिलेली.. या मार्गावर काही निवडक ट्रेन सोडल्या तर मालवाहतुकच जास्त प्रमाणात चालते.. घाटमार्ग असल्याने ट्रेनचा वेग अगदी नगण्य असतो.. त्यामुळे ट्रेन आली तरी घाबरण्याचे कारण नाही.. 

- - -

फ़क्त नीट काळजी घ्यायची ती भोगदा आला की.. काही अंतरानंतर पहिला भोगदा समोर आलाच.. आमच्या सोबतीचा रुळ पुढे जात थेट पहाडातच खुपसले होते.. दाट जंगलामध्ये नीरव शांततेत पहाडाला पाडलेल्या या भोगद्याचे तोंड मात्र विलक्षण गुढमय वाटत होते.. 

साहाजिकच सौ.ला तो भोगदा पाहून धडकीच भरली.. पुढे सरावण्यास तयारच नाही.. 'बस झाले इथूनच परत जाउया..'  चा नारा सुरु झाला.. भोगाद्याची लांबी किती आहे ते माहीत नव्हते.. शिवाय कुठली ट्रेन जवळपास असल्याची चाहुल नव्हती तेव्हा पटकन भोगदा पार करणे उचित होते.. पण मिट्ट काळोख बघून तिला काही धीर होत नव्हता.. अगदी रडकुंडीलाच आलेली..क्षणभर मलाही सुचेनासे झाले.. शेवटी मोबाइलचा टॉर्च व घेतलेला टॉर्च यांच्या संमिश्र प्रकाशात तीला जवळपास ओढत कसेबसे भोगाद्यात प्रवेश केला.. भोगदा ऐसपैस असला तरी वळण असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य होते..  नशिबाने फार लांबीचा नव्हता.. घाबरून गांगरलेल्या सौ.ला धीर देत भोगदा एकदाचा पार केला.. नि एक मोठा टप्पाच पार केलाय असे वाटून गेले..

वातावरण पण अगदी धुंदमय होते..  ढगांचा थवा वॄक्षराजींच्या पहाडावर डोलत होता... पाऊस अगदीच हलके तुषार उडवत हवेत गारवा आणू पाहत होता.. पक्ष्यांची नजरभेट नाही झाली तरी त्यांचे गुणगान साद घालतच होते.. इथला परिसर बऱ्यापैंकी मोकळा होता.. एकट्या रुळाला देखील आता इतर रुळांची साथ लाभलेली. 

अर्थात हे रुळ म्हणजे भोगद्यातून रेल्वे पास होउ देण्यासाठी केलेली सोय होती.. तशी एक कुलेमच्या दिशेने जाणारी मालगाड़ी येउन उभी पण राहिली.. इथेच 'सोनालिम'  नावाचे स्टेशन लागले नि हायसे वाटले.. 

वाटले होते फलाट वगैरे असेल.. बसून पेटपूजा करू असा विचार केलेला पण सोनालिम नावाचा फलक सोडला तर जल्ला बाकी काहीच नाही.. !!! एक गार्ड लोकांची खोली आहे जिथे चार पाच कामगार लोक होते.. हे सगळ ठीक होत पण 'दूधसागर ५ किमी' हे लिहिलेले पाहून मात्र त्रास झाला...

पुन्हा रुळ जंगलात घुसला नि एकटा पडला... पुन्हा तेच जंगल.. पण आता जाणवत होते की घाटातून जातोय म्हणून.. झाडीच्या पलिकडे दरी असल्याचे जाणवत होते.. पुढे मार्गात रुळाचे काम करण्यात मग्न असलेले कामगार दिसले.. घाटातून इतक्या वजनदार मालगाड्यांची वाहतुक सुरळीत चालण्यात यांचाच हातभर असतो.

पुढे दूसरा भोगदा लागला पण हा नावाला होता.. फारच छोटा त्यात भोगद्याच्या तोंडाशी दोन-तीन कामगार विश्रांती करत होते.. तेव्हा इथे सौ. ने पुनरावृत्ति केली नाही.. पुढे काही मिनिटातच तिसरा भोगदा लागला.. पण रेल्वेचा भोंगा ऐकू आला नि तिथेच थांबलो.. भोगाद्यात अंधारात बाजूला उभे राहण्यापेक्षा बाहेरच वाट पाहिलेली बरी.. पुन्हा मालगाडीच मागून आली नि मघाशी सोनालिम ला कुलेमाच्या दिशेने जाणारी मालगाडी ह्या गाडीसाठीच थांबली असावी हे समजले..

- - -

तिसऱ्या भोगद्यातसुद्धा पलिकडचे तोंड दिसत असल्याने फारशी अडचण वाटली नाही.. इथून बाहेर आलो नि दुरवर धबधबा कोसळतोय याची पहिल्यांदा चाहुल लागली.. आवाज कानी पडत होता.. 

काही मिनिटातच गर्द हिरव्या झाडी पलिकडे पांढरट पडदा दिसला नि आमची पावल पटापट पडू लागली.. वाचून होतो की कुलेम वरुन जाणाऱ्या मार्गाने दूधसागराचे विहंगमय दृश्य नजरेस पडते.. या धबधब्याखालून ट्रेन जाताना दिसली तर सोने पे सुहागा ! शेवटी ती जागा आलीच जिथून संपूर्ण दूधसागर नजरेस पडला... आणि काय नशीब म्हणावे..  त्याचवेळी ट्रेनसुद्धा हजर झाली.. आतापर्यंत नेट वर फोटो पाहीले होते पण आज प्रत्यक्षात पाहत होतो..

- - -

- - -

- - -

खरच निसर्गाची किमया ! आभाळाला भिडलेल्या डोंगरमाथ्यावरून कोसळणारा हा पांढराशुभ्र धबधबा जणु हिरव्या सृष्टीवर केलेला दुधाचा अभिषेकच भासतो.. असेल त्या पाण्याला वेग पण दुरून बघताना खरच एका सुंदर लयीत पडताना दिसते..

कविवर्य बा. भ. बोरकरांनी 'दूधसागरास' या कवितेत म्हटलेच आहे..

"हास खदखदून हास असा दूधसागरा,
लासल्या गिरिदरीत फेक फेस पांढरा..

हास्यी तव वेदघोष
सृजनाचा दिव्यतोष
जीवनकल्लोळहर्ष वर्षवी शुभंकरा..

हास्यध्वनी तव उठोत
कंठ प्रस्तरां फुटोत
हिरवळो नटो फुलांत माउली वसुंधरा.."

यापुढे आपण काय बोलावे.. 

- - -

- - -

- - -

या धबधब्याला पाहताना शुद्ध आली जेव्हा रेल्वेने भोंगा वाजवला.. हीच रेल्वे मघाशी धबधब्यासमोरून जाताना दिसलेली.. ! भानावर आलो कारण ही अमरावती एक्सप्रेस होती !! तासभर लवकर आलो असतो तर दूधसागर स्टेशनवरुन हमखास कुलेमपर्यंत लिफ्ट मिळाली असती.. इथे आम्ही अजुन त्या धबधब्यापर्यंत पोचलोदेखिल नव्हतो.. चालून तीन तास उलटत होते नि अजुन एक किमी अंतर बाकी होते..!!

- - -

आता दोन वळण पार केली की आम्ही पोचणार होतो.. दरीत खळखळाट दुमदुमत होता.. पुढेच वाटेत उजवीकडे छोटा धबधबा लागला.. यथेच्छ डुंबण्यासाठी मस्त जागा.. पण आता वेळ नव्हता.. पुढे लगेच छोट्या अंतराचा चौथा भोगदा लागला... तो संपला की सात -आठ फुटाच्या अंतराने लागुनच पाचवा छोटा भोगदा.. ! या रचनेमुळे ही जागा लक्ष वेधून घेते.. दोन्ही छोट्या भोगद्यांमधील अंतर फारच कमी असल्याने काळोख्या वाटेत मध्येच दिसणारा प्रकाशझोत अगदीच तेजस्वी वाटतो नि भोगाद्याच्या तोंडावरून ओघळणारे पाणी त्यावर साज चढवतो..

- - -

- - -

पाचव्या भोगाद्यातून बाहेर पडलो नि पांढराशुभ्र धबधबा सामोरा आला.. ऊंचीवरुन कोसळणारा हा अवाढव्य पांढराशुभ्र जलप्रताप पाहून या धबधब्यास 'दूधसागर' का म्हणतात याची प्रचिती आली... वाऱ्यासोबत उडणारे धबधाब्याचे शुभ्रकण आमचे भिजवून स्वागत करत होते... ह्या धबधाब्याचे पाणी जिथे पडते तिथे अगदी जवळच रेल्वेचा पूल आहे व या पुलाखालूनच मग दूधसागर पुढील वाटचाल चालू ठेवतो.. पुलाच्या एका बाजूस पहाडावरून धबधब्याचे पाणी पडताना दिसते तर दुसऱ्या बाजूस खोल दरीत तेच पाणी झेपावताना दिसते.. हा पूल म्हणजे धबधब्याचा मध्यबिंदूच.. म्हणुनच या पूलावरून रेल्वे जातानाचे दृश्य दुरून नयनरम्य ठरते.. या पूलावरूनच दुधसागराची अनुभति घ्यावी..  'फक्त दर्शनच घ्या, हात मात्र लावायला येउ नका' असाच काहीसा त्याचा दरारा..!

 - - -

गुरूवार असला तरी त्यामानाने गर्दी बऱ्यापैंकि होती.. म्हणजे शनि-रविवारी पर्यटक व ट्रेकर्स यांची फार वर्दळ असावी..धबधब्याच्या दोन्ही बाजुस दोन आडोशे आहेत त्यात एकीकडे चायनाश्त्याची टपरी आहे नि खाण म्हटलं की माकडं पण हजर.. आल्यापासून आमच लक्ष फक्त धबधब्याकडे होत.. उडणाऱ्या शिंतोडयामुळे कॅमेरावरचा हात मात्र आखडता घ्यावा लागला.. पोहोचून जेमतेम पाचेक मिनिटेच झाली असतील नि समोरून कुलेमच्या दिशेने जाणारे इंजिन येउन थांबले.. त्यातून लिफ्ट घेतलेल्या पाच-सहा पोरांचा घोळका उतरला.. ते पाहून सौ. ना पटकन लक्षात आले नि 'आपण जाऊया; विचारा त्यांना ' म्हणू लागली.. धुंदमंद वातावरणातून इतक्या लवकर निघणे शक्य नव्हते.. पण वेळीच भानावर आलो नि धावत इंजिनापाशी गेलो.. मोटोरमन ने चला लवकरचा इशारा केला नि आमचा मोठा प्रश्ण मिटला... ! नंतर कुलेमला जाण्यास कुठली गाडी असेल याचा अंदाज नव्हता.. दुपारचे दोन वाजलेले नि कुलेमहून परत मडगावला जाण्यास संध्याकाळी पाचची शेवटची पॅसेंजर होती.. तेव्हा त्या वेळेत कुलेमपर्यंतचे अंतर पुन्हा चालून जाणे सौ. ला तरी शक्य नव्हते..थोडक्यात मडगाव गाठायचे तर हा शेवटचा पर्याय होता !

गंमत अशी की इंजिन सुरु होण्याअगोदर आम्ही धावत जाउन मोटरमनला विनंती केलेली.. एकदा इंजिन निघाले नि पुढे काही जणांनी पुन्हा थांबवायची विनंती केली तेव्हा मात्र मोटरमन थांबला नाही.. तात्पर्य ते ड्यूटीवर असुनही जर मदत करत असतील तर तो आपला हक्क समजू नका.. ! Respect them !

जे अंतर चालून जाण्यास जवळपास तीन तास लागले होते तेच अंतर आता वीसेक मिनीटात पार पडले !!! इंजिन मध्ये पहिल्यांदाच प्रवेश मिळालेला त्यामुळे मस्त वाटले.. एक जण इंजिन चालवत होता तर एक भोंगा वाजवत होता.. त्यांची गोयाची भाषा थोडीफार समजत होती.. आम्ही कुडाळचे समजल्यावर जास्त विचारपूस झाली.. पण खरच योगायोग होता अन्यथा कुलेम वरून मडगावला जाणारी शेवटची पॅसेंजर गाठणे पुरते अवघड बनले असते.. पण आता आम्ही दुपारीच अडीचला कुलेम गाठलेले.. अचानक मदतीचा हात पुढे केलेल्या त्या देवमाणसांचे आभार मानले.. आता दोन तास मुक्काम कुलेमलाच.. खरे तर स्थानकाजवळच 'Elephant Village' असल्याची माहिती नेटवर काढली होती पण हत्ती बघण्याऐवजी  'जेवण नि आराम' करण्यास प्राधान्य दिले..

कुलेमला शेवटचा चहा घेतला नि बरोबर पाचला मडगावसाठी परतीची गाडी सुटली..पुन्हा आभाळ भरून आले.. पावसाने शिडकावा सुरु केला.. त्याच्या निरोपाचा आनंदाने स्विकार करत मनोमनी 'दूधसागरा'स देखील हात जोडले !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्यांदा इथे कोणाची तरी सहल वाचून अक्षरशा जळाली, हेवा वाटला.. सौ बरोबर अशी ट्रिप.. काय तो अनुभव, काय ते वर्णन.. शब्द संपले माझे !!!!!!!!

काय ते साहसवीर जोडपे! ते बोगद्यातून जाणे म्हणजे खतरनाकच रे.

कसला पडतोय तो... भन्नाट्ट!!! डोळ्याचे पारणे फिटणे ते हेच्च!

काय ते साहसवीर जोडपे! ते बोगद्यातून जाणे म्हणजे खतरनाकच रे.

कसला पडतोय तो... भन्नाट्ट!!! डोळ्याचे पारणे फिटणे ते हेच्च! >>>>> +१०००

वा! हा दुधसागर तोच ना जो गोवा कर्नाटक बॉर्डरवर आहे. आम्ही जंगलातून गाडीने गेलो होतो. आम्ही फक्त पायथ्याशी उभे होतो आणि वर रेल्वे आली की आवाज ऐकू यायचा. आता कळले किती उंची आहे ह्या सागराची.

योगेश....

कॉलेजच्या जीवनात तीनचार मित्रांसह दूधसागर पाहिला होता....पण त्यावेळी उन्हाळा असल्याने तुमच्या फोटोतून दिसणारे त्याचे विस्तारीत रुप तसेच शुद्ध दुधाचे देखणेपण असे तीव्रतेने जाणवले नव्हते. तुमच्या फोटोग्राफीने या सर्व दृश्याला असे काही जादूचे अलंकार लागले आहेत की वाचनापेक्षाही ह्या फोटोजकडेच पाहात बसावे तासनतास.. तरीही मन भरणार नाही असेच वाटत राहते.

कोकण रेल्वेचे बांधकाम आणि बोगदे खणणे प्राथमिक पातळीवर होते त्याकाळी....ते कामकाज पाहाणेही आम्हाला लाभले होते....म्हणजे रेल्वेरुळाशिवाय त्यापूर्वीची अवस्था इतपत काम आले होते. आज तुमचे बोगद्यातील फोटो पाहताना त्यावेळेचे आणि स्थितीतील चित्रे नजरेसमोर आली.

(तुमच्या लिखाणात वारंवार "भोगदा" हे नाम आले आहे. प्रथमच असा उल्लेख वाचला...आमच्याकडे "बोगदा" असाच पुकार प्रचलित आहे.)

साहाजिकच सौ.ला तो भोगदा पाहून धडकीच भरली.. पुढे सरावण्यास तयारच नाही.. 'बस झाले इथूनच परत जाउया..' चा नारा सुरु झाला.. भोगाद्याची लांबी किती आहे ते माहीत नव्हते.. शिवाय कुठली ट्रेन जवळपास असल्याची चाहुल नव्हती तेव्हा पटकन भोगदा पार करणे उचित होते.. पण मिट्ट काळोख बघून तिला काही धीर होत नव्हता.. अगदी रडकुंडीलाच आलेली..क्षणभर मलाही सुचेनासे झाले.. शेवटी मोबाइलचा टॉर्च व घेतलेला टॉर्च यांच्या संमिश्र प्रकाशात तीला जवळपास ओढत कसेबसे भोगाद्यात प्रवेश केला.. भोगदा ऐसपैस असला तरी वळण असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य होते.. नशिबाने फार लांबीचा नव्हता.. घाबरून गांगरलेल्या सौ.ला धीर देत भोगदा एकदाचा पार केला.. नि एक मोठा टप्पाच पार केलाय असे वाटून गेले..>>

हे वाचून शहारे आले अंगावर.

खूप छान माहिती आणि अप्रतिम फोटो! ३ तास चालून पोचलात म्हणजे ट्रेकच झाला तुमचा! मस्ट सी जागा वाटते आहे! नक्की जाणार!

मस्त!

तुमचे डेरींग मानलं बुवा. ते हि बाईमाणूस घेवून अश्या सूनसान रस्त्यात, पावसात चालत. कामगार लोकं आणि बिना ओळखीचा ग्रूप सुद्धा दिसले तरी भितीच.( हे भिती घालायला नाही) पण खरेच....

फोटो मस्तच. मला वाचताना उगाच चिंता... जलला कसली हौस असते लोकांना. Happy

मी नवर्‍याला सांगितले असते, फिटव तुझी हौस... मी जाते घरी. Proud
(ह. घ्या.)

मी पण गेलो होतो इथे, त्या बाइक वाल्यांबरोबर, इथे दुचाकी चालवण्याचा अनुभव खुप छान होता. (तिथला ड्राइव्हर सुरुवातिला गाडी आमच्या हातात द्यायला तयार नव्हता, रस्ता खुप धोकादायक आहे असे तो सांगत होता, पण त्याला आम्ही पुण्यात गाडी चालवली आहे हे सांगितल्यावर तयार झाला Wink :फिदी:, जोक्स अपार्ट, त्याला आम्ही सांगितलं की जर अम्हाला भिती वाटली तर परत तु चालव आणि तो तयार झाला, पण रस्ता बर्‍यापैकी धोकादायक आहे, आम्हिही एकदा कपाळमोक्ष होता होता वाचलो)

मस्त रे .... एकतर असे उद्योग करतोस ..तेही बायकोला घेउन ... तेही स्वत:च्या ... खरच कमाल आहेस ...:फिदी:

Pages