स्मरण विसंगती

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 9 January, 2015 - 10:46

काही काळापूर्वी एका आस्थापनेत प्रशिक्षण देण्याकरिता गेलो होतो. प्रशिक्षणाचा विषय होता - समस्या सोडविण्याची तंत्रे (Problem Solving Techniques). समोर बसलेल्या प्रशिक्षणार्थींना मी समस्या सोडविण्याचं माझं नेहमीचं तंत्र सांगत होतो. गुंतागुंतीची क्लिष्ट अशी काही समस्या नसतेच मुळी. असा काही असतो तो आपला तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. जगाच्या दृष्टीने अतिशय गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या समस्या केवळ काही सोप्या कल्पना वापरून सोडविल्या जाऊ शकतात (Complex Problems can be solved using simple ideas). खरे तर व्यवहारातील अनेक समस्या या आपण कुठलेही उपाय वापरण्याआधीच सुटलेल्या असतात. आपण त्यांच्यापाशी अडखळलो तर मात्र त्या सुटता सुटत नाहीत. जसे की, रस्त्यावर एखादा सहा इंच रुंद, सहा इंच खोल व रस्त्याच्या रुंदीइतका लांब असा खड्डा आहे. आपण ताशी ८० किमी वेगाने वाहनातून त्या रस्त्यावरून जात असू आणि आपण तो खड्डा त्याच वेगात पार केला तर आपल्याला जाणवणार देखील नाही. कारण खड्डा जिथे सुरू होतो व पुढे सहा इंचावर जिथे पुन्हा रस्ता सुरू होतो ते अंतर या ताशी किमी वेगाने जाताना चाकाला जाणवणार देखील नाही इतक्या तीव्रतेने पार होते. पण आपण जर खड्डा पाहून आधीच आपले वाहन हळू केले आणि वेग ताशी ४० किमी पर्यंत कमी केला तर मात्र आपणाला हा खड्डा चांगलाच जाणवेल. अशा वेळी खड्ड्याचा त्रास कमीत कमी व्हावा म्हणून आपल्याला वाहनाचा वेग अतिशय कमी (ताशी १५ किमी अथवा त्याहूनही कमी) करावा लागेल. तरी देखील खड्डा जाणवणारच फक्त त्रास कमी होईल इतकेच. त्यापेक्षा ८० किमी वेगाने चटकन निघून गेलेले कधीही जास्त सोयीस्कर नाही का? (अर्थात असा प्रयोग केवळ ६ इंच लांब व सहा इंच खोल किंवा त्यापेक्षा लहान खड्ड्यावरच करून पाहा. गतिरोधकावर [Speed Breaker] नको हे सांगायला मी विसरलो नाही. ) हे म्हणजे १/१० सेकंदापेक्षाही कमी वेळ पाय टेकवत, चटका न बसता विस्तवावरून झरझर चालण्यासारखेच आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या कृती वेगाने करीत गेलो तर लहानसहान समस्या जाणवत देखील नाहीत अशा पद्धतीने त्या सुटलेल्या असतात. परंतु जर आपण बारीकसारीक गोष्टींचा विचार करीत बसलो तर मात्र समस्या जाणवतात आणि सोडवायलाही त्रास होतो.

प्रशिक्षणार्थींनी मला अशा प्रकारच्या व्यवहारातील एखाद्या समस्येचे उदाहरण मागितले. हे उदाहरण मी अजून तासाभराने देईन असे मी त्यांना सांगितले. कदाचित प्रशिक्षणाच्या एक दिवसाच्या कालावधीत मी त्यांना उदाहरण देऊ शकलो नाही तर त्यांनी मला नंतर संपर्क साधावा, मी त्यांना उदाहरण पुन्हा कधीतरी देईन असेही सुचविले. त्याकरिता मी सर्वांना माझे नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक देखील लिहून घेण्यास सुचविले. प्रशिक्षणार्थींना ही बाब काहीशी विचित्र वाटली. इतक्या क्षुल्लक बाबीकरिता मी त्यांना पुन्हा संपर्क साधायला का सांगतोय असा काहीसा आश्चर्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

साधारण तासाभराने मी त्यांना स्मरणशक्तीच्या विसंगतीचे उदाहरण देऊन त्याची उकल करायला सांगितली. ते थोडक्यात असे - आपण कधी कुठल्या अनोळखी व्यक्तीसोबत नव्याने ओळख करून घेतली आणि त्यावेळी त्या व्यक्तीने आपल्याला तिचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक हे तपशील सांगितले तर नाव आपल्या लक्षात चटकन राहते तर भ्रमणध्वनी क्रमांक आठवणीत राहिलेला नसतो. याच वस्तुस्थितीची जाणीव व्हावी म्हणून सर्वांना मी माझे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक जो तासाभरापूर्वी सांगितला होता तो विचारला. बहुतेकांना माझे नाव चटकन आठवले परंतु भ्रमणध्वनी क्रमांक डायरीत पाहून सांगावा लागला. आता मी त्यांना ही समस्या अजूनच तपशिलात स्पष्ट करून सांगितली. माझे नाव व क्रमांक त्यांच्या भ्रमणध्वनीवर अथवा डायरीत कशा पद्धतीने नोंद केला जातोय हे आधी फलकावर दाखविले.

Name : CHETAN GUGALE
Number : 9552077615

म्हणजे नाव जिथे साठविले जात आहे तिथे १२ अक्षरे आहेत. प्रत्येक अक्षर ए ते झेड या सव्वीस अक्षरांपैकी कुठले तरी एक आहे. तरीही नाव चटकन लक्षात राहते तर क्रमांक जिथे साठविला जात आहे तिथे दहाच अंक आहेत आणि प्रत्येक अंकाच्या जागी ० ते ९ पैकी कुठला तरी एक अंक असणार आहे तरी क्रमांक चटकन आठवत नाही. असे का होत असावे? साधा तर्क लावला तर सव्वीस अक्षरांपैकी प्रत्येक जागी एक अक्षर असे मिळून बारा अक्षरांचे नाव आडनाव आणि त्याच्या तुलनेत प्रत्येक अंकाच्या जागी ० ते ९ पैकी एक अंक असा दहा अंकी क्रमांक यात क्रमांक लक्षात ठेवणे जास्त सोयीचे पडावे परंतु तसे न होता नाव लक्षात राहते या समस्येची उकल कशी काय करावी?

खरे तर व्यवहारात आपल्याला कधी ही समस्या जाणवत देखील नाही. नाव लक्षात ठेवणे आपल्याला जास्त गरजेचे असते व आपला मेंदू ते बरोबर करतो. क्रमांक लक्षात ठेवणे इतके गरजेचे नसतेच. संपर्क साधतेवेळी ते भ्रमणध्वनीच्या अथवा डायरीतील संपर्क नोंदीतून सहज शक्य होते. म्हणजे ही एक समस्या आपल्या दैनंदिन कामकाजाच्या वेगात कधी आपल्याला जाणवतच नाही परंतु अगदी बारीक सारीक विचार करत आहोत तर जाणवू लागली आहे. बरं आता जाणीव झाली तर हे असे का घडतेय याची उकल देखील लवकर होत नाही. म्हणजेच ही बारीक समस्या विचारात घेतली तर त्रास देते, पण विचारात घेतलीच नाही तर काहीच त्रास नाही.

प्रशिक्षणार्थींना हे उदाहरण पटले, पण हे असे का घडते हे जाणून घेण्यास ते उत्सुक होते म्हणून मी त्यांना याचे थोडक्यात स्पष्टीकरण दिले ते असे - प्रत्यक्षात नावाची बारा अक्षरे आपण डायरीत किंवा भ्रमणध्वनीच्या संपर्क यादीत नोंद करून ठेवत असलो तरी मेंदूत ती त्याप्रकारे साठविली जात नाहीत तर त्या अक्षरांपासून बनलेला संच अर्थात आपले नावच पूर्णतः साठवले जाते. हे अक्षरांचे संच अर्थात नावे आपल्या परिचयाचीच असतात त्यामुळे ती चटकन साठविली जातात. म्हणजे चेतन गुगळे हे नाव आणि आडनाव मिळून एका व्यक्तीचे पूर्णं नाव जरी आपण प्रथमच ऐकत असलो तरी हे नावांचे आणि आडनावांचे शब्द म्हणजेच अक्षरांचे संच आपण पूर्वी ऐकलेले असतात. आता ते इथे आपण एका चेहऱ्याच्या प्रतिमेसोबत आपल्या मेंदूत साठवून ठेवतो. क्रमांक साठवताना आपल्याला जरी दहा आकडे नोंद करून ठेवायचे इतके लहान काम दिसत असले तरी प्रत्यक्षात आपला मेंदू थेट एखादा आकडा साठवू शकत नाही त्याला त्या आकड्यांचा उच्चार साठवावा लागतो. जसे की नऊ पाच पाच दोन शून्य सात सात सहा एक पाच. म्हणजे तसे पाहायला गेले तर दहा आकडे लक्षात ठेवणे हे बारा अक्षरी नाव लक्षात ठेवण्यापेक्षा जास्त अवघड आहे. शिवाय इथे कुठला परिचित संच देखील नाही. तसा तो असता तर क्रमांक लक्षात ठेवणे देखील सोपे गेले असते जसे की ४४४४४४४४४४ हा आस्कमी चा संपर्क क्रमांक आहे हे आपल्याला एकदा वाचलं किंवा ऐकलं की लगेच आठवणीत राहतं कारण ते आपल्या मेंदूत दहा वेळा चार या संचाच्या स्वरूपात साठवलं जातं.

ही समस्या जितकी लहान होती तितकंच तिचं उत्तर देखील साधंसोपं होतं, पण आधी एक तर समस्या कधी जाणवलीच नव्हती आणि जेव्हा तिची जाणीव करून दिली गेली तेव्हा तिची उकल लवकर करता आली नाही. जेव्हा मी ती करून दिली तेव्हा "हात्तिच्या! हे तर किती सोपं होतं" असं वाटून गेलं. जीवनातल्या बहुतेक समस्या ह्या अशाच क्षुल्लक असतात. एक तर सहसा त्या जाणवत देखील नाहीत इतक्या सहजतेने पार केल्या जातात आणि कधी आपण तिथे अडखळलोच तर मात्र फरशीवर समोर पडलेली सुई दिसू नये अशी डोक्याची अवस्था होऊन जाते. अशा वेळी चित्त शांत ठेवून समस्येला लहान लहान घटकांमध्ये विभागून तिच्याकडे पाहिलं की ती किती साधी वाटू लागते आणि तितक्याच सरळ सोप्या उपायांनी तिची उकल कशी होते हे मी उर्वरित प्रशिक्षण सत्रात सांगितलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.. अजून कोणत्या विषयांवर लेक्चर देता आपण..

रोजच्या आयुष्यातील समस्येकडे बघण्याचा माझा एक द्रुष्टीकोन वा माझी स्वत:ची एक स्ट्रेस रिलीफ मेथड मी सांगतो. ती समस्या जास्तीत जास्त किती दिवस राहणार आहे याचा अंदाज बांधतो आणि त्यानंतरच्या दिवसाला ती समस्या नसणारच हे मनाला पटवून देतो. मग ती कोण सोडवणार आहे वा कशी सुटणार आहे हे मॅटर नाही करत

उदाहरणार्थ ऑफिसच्या कामासंदर्भात बोलायचे झाल्यास वर्कलोड खूप आहे, काही चुकाही झाल्यात, अक्षरशा बूच लागलाय.. तरीही एका डेडलाईनला हे काम संपणारच आहे हे एकदा मनाला पटले की प्रेशर कमी होते. आपसूक फायदाही होतोच. त्यानंतर ते काम कसे करायचे आहे किंवा ती समस्या कशी सुटणार आहे याचा विचार न करता बस्स त्या दिवसापर्यंत जगायचे आहे, मधला काळ आपल्याच स्पीडने जाणार आहे, एकदा का तो दिवस उजाडला की समस्या नष्ट झालेली असणार असा विचार करतो. तसेच कामात चूक झाली आहे, बॉस वा क्लायंट आज त्यावरून आपल्यावर रागावणार आहे, कदाचित कमी कदाचित जास्त, पण एकदा का आजचा हेक्टीक दिवस संपला, की ती समस्या कशी का होईना नष्ट झाली असणार. हा, जर प्रकरण वाढले तर त्याला नवी समस्या म्हणून बघायचे आणि नवी डेडलाईन टाकायची. आजाराबाबतही असेच करता येते.

धन्यवाद देवकी, मित, ऋन्मेऽऽष.

<< अजून कोणत्या विषयांवर लेक्चर देता आपण >>

Time Management (वेळेचे व्यवस्थापन)
Effective communication Skills (परिणाम कारक संवाद कौशल्ये)
Problem Solving Techniques (समस्या सोडविण्याची तंत्रे)
Leadership Development (नेतृत्वगुणांचा विकास)

याशिवाय ग्राहक आस्थापनांच्या मागणीनुसार अजुनही अनेक विषयांवर जसे की, Root Cause Analysis, Statistical Process Control, इत्यादी.

<< मधला काळ आपल्याच स्पीडने जाणार आहे, एकदा का तो दिवस उजाडला की समस्या नष्ट झालेली असणार असा विचार करतो. तसेच कामात चूक झाली आहे, बॉस वा क्लायंट आज त्यावरून आपल्यावर रागावणार आहे, कदाचित कमी कदाचित जास्त, पण एकदा का आजचा हेक्टीक दिवस संपला, की ती समस्या कशी का होईना नष्ट झाली असणार. >>

हे तंत्र खरोखरीच परिणाम कारक आहे.

मस्त लेख!!!

परंतु जर आपण बारीकसारीक गोष्टींचा विचार करीत बसलो तर मात्र समस्या जाणवतात आणि सोडवायलाही त्रास होतो. >> हे अगदी पटलं!!

ॠन्मेष तुमची युक्ती पण फार छान....वापर करून पहिन!!

अत्यंत उपयुक्त आणि छान लेख . खालच्या प्रतीसादातील बाकीचे विषय ही महत्वाचे आहेत त्याचेही लेखमालिके सारखे लेख येउद्यात.

परंतु जर आपण बारीकसारीक गोष्टींचा विचार करीत बसलो तर मात्र समस्या जाणवतात आणि सोडवायलाही त्रास होतो.>> अगदि पटले आणि समस्या लहान जरी असली तरी ती प्रत्येकाला सुरवातीला मोठीच वाटते..तुमच्या लिखातल्या उदाहरणाने मुद्दा समजलाय.याचा उपयोग होईल समस्या सोडवताना.

ऋन्मेऽऽष यांची स्ट्रेस रिलीफ मेथड पण छान आहे.

परंतु जर आपण बारीकसारीक गोष्टींचा विचार करीत बसलो तर मात्र समस्या जाणवतात आणि सोडवायलाही त्रास होतो.
<<

पटत नाही

शहामृग स्ट्रॅटेजी वाटते.

शहामृग स्ट्रॅटेजी म्हणजे जरा नीट विस्तार करुन सांगा .ही नवीन माहीतीही आवडेल .थोड्क्यात वाचलेBehavioral economics वगैरे .तुम्ही थोडक्यात मराठीतुन सांगा. नंतर वाचेन.

धन्यवाद सिनि, बेफिकिर.

<< लेख अर्धामुर्धा वाटला स्मित

मुद्दे छान आहेत, पण अधिक सखोलपणे नोंदवले जायला हवे होते असे वाटून गेले. >>

. समस्येला लहान लहान घटकांमध्ये विभागून तिच्याकडे पाहिलं की ती किती साधी वाटू लागते आणि तितक्याच सरळ सोप्या उपायांनी तिची उकल कशी होते हे मी उर्वरित प्रशिक्षण सत्रात सांगितलं.

ट्रेलर मध्येच सारा चित्रपट दाखविता कसा येईल? बाकी गोष्टी या लेखात टाकायच्या म्हणजे माझं संपुर्ण दिवसभराच्या प्रशिक्षण सत्राचं वृत्तच इथे द्यावं लागेल.

बाकी ही << शहामृग स्ट्रॅटेजी >> नाही. तिथे प्रत्यक्षात समस्या समोर येते ती सोडविली नाही तर तुमचे नुकसान करून जाते. इथे लेखातल्या उदाहरणात प्रत्येक अंकाच्या ठिकाणी एक ते दहापैकी कुठलातरी एक अंक असणारे दहा अंक लक्षात ठेवणे अवघड कसे आणि प्रत्येक अक्षराच्या ए ते झेड या सव्वीस अक्षरापैकी कुठलेतरी एक अक्षर असणारी बारा अक्षरे लक्षात ठेवणे सोपे कसे ही अशी समस्या नक्कीच नाही की जी सुटली नाही तर तुमची काही हानी होईल. मु़ळात ती समस्या रोजच्या व्यवहारात आपल्याला जाणवतच नाही, पण बारीक विचार केला तर जाणवते आणि मग सोडवायला गेलो तर पुन्हा बराच वेळ खाते. तेव्हा अशा न जाणवणार्‍या समस्या शोधून त्या सोडविण्याची गरज सामान्य माणसाला रोजच्या व्यवहारात नसते (संशोधक मंडळी हा सर्व खटाटोप करून त्यांच्या अहवालात प्रसिद्ध करीतच असतात). हा या लेखाचा मुद्दा आहे.

>>>बाकी गोष्टी या लेखात टाकायच्या म्हणजे माझं संपुर्ण दिवसभराच्या प्रशिक्षण सत्राचं वृत्तच इथे द्यावं लागेल. <<<

Happy

तुम्हाला असे वाटत नाही का, की लेख लिहिणे म्हणजे:

१. निरिक्षिलेली परिस्थिती सांगणे
२. ती परिस्थिती तशी का असावी ह्याबद्दल स्वतःच्या बुद्धीला पटेल अशी कारणमीमांसा लिहिणे
३. ही परिस्थिती वाईट असल्यास ती कशी बदलेल आणि चांगली असल्यास ती कशी सर्वव्यापी होईल ह्याबद्दल मनातील विचार नोंदवणे
४. इतर वाचकांकडून त्यांची मते मागवणे

असे पटत असले तर संपूर्ण प्रक्रिया लिहायला हवी ना? Happy

@ बेफिकीर,

  1. हा लेख म्हणजे समस्या सोडविण्याची तंत्रे या संपुर्ण विषयावरचा लेख नाही.
  2. या प्रशिक्षणातील एक प्रकरण म्हणजे न जाणवणार्‍या किरकोळ समस्या बळेच शोधू नयेत.
  3. या समस्या अतिशय बारकाईने शोधल्यास दिसतात देखील परंतु त्या सोडविण्यास अजुन यातायात करावी लागते.
  4. पुन्हा इतके श्रम घेऊनही फायदा काही नाहीच.
  5. हा मुद्दा सिद्ध करण्याकरिता एक मुद्दाम शोधलेली समस्या व तिची उकल याचे उदाहरण दिले आहे.

ओके Happy