मध्यंतरी प्रवासात रस्त्याकडेला लागून एक शाळा होती आणि शाळेवर एक मोठी पाटी होती.
YOUR CHILD IS IN NO PUNISHMENT ZONE
ही पाटी लावलेली पाहून इतके चटकन् लक्षात आले की पालकांना शाळेबाबत विश्वासार्हता वाटावी ह्यासाठी हे विधान मुद्दाम एखाद्या जाहिरातीसारखे झळकवले गेलेले आहे.
साहजिकच मी शाळेत होतो त्या काळाची ह्या काळाशी 'विद्यार्थ्यांना शिक्षा करणे' ह्या निकषावर होऊ शकणारी तुलना मनात आली आणि हे जाणवले की आजच्या पालकांना इतर कोणी आपल्या पाल्याला शिक्षा केलेली खचितच आवडत नसणार. आवडत नसणार असे म्हणण्यापेक्षा तसे घडल्यास आजचे पालक चवताळून उठतही असतील कदाचित, असेही वाटले. पुन्हा साहजिकच आमच्या पालकांच्या ह्यासंदर्भातील भूमिकेची आठवण झाली व तेव्हाच्या काळात शिक्षा सहजपणे दिल्या जात असून आपल्या पाल्याला शिक्षा होणे ही बाब पालक 'शिक्षकांना अपेक्षित असलेल्या गांभीर्याने' घेत असत हे आठवले.
धाक दाखवून विद्यार्थ्यांना वळण लावण्याची जागा सकारात्मक विचारप्रेरणेमार्गे वर्तन बदलवण्याने घेतली आहे हे मी समजू शकलो. शिक्षेमार्फत विद्यार्थ्याला काही भलतीच इजा पोहोचू नये, तसेच त्याला लाजिरवाणे वाटून त्याचे काही काळापुरते मानसिक खच्चीकरण होऊ नये ह्या कारणांसाठी हा बदल घडवून आणण्यात आला असावा असेही जाणवले.
अधिक विचार केल्यावर असे वाटले की आपल्यावेळी (म्हणजे आपण विद्यार्थीदशेत असताना) शिक्षक हे जणू आईवडिलांप्रमाणेच संस्कार करण्यास अलिखितरीत्या अधिकृत समजले जायचे. बहुधा तसे आजचे शिक्षक असतीलच असे नाही, आहेत की नाही हे बघण्याची यंत्रणा अस्तित्त्वात नसल्याने शिक्षकांवर तो विश्वास टाकलाच जात नाही किंवा दुसर्या कोणी माझ्या पाल्याला इजा पोहोचवूच नये असे म्हणणार्या पालकांची भूमिका सर्वानुमते मान्य झालेली आहे.
विषयापासून थोडे दूर जाऊन एका वेगळ्याच मुद्यावर मुद्दाम विचार केला. आजचे विद्यार्थी आणि आपण विद्यार्थी होतो तेव्हाचे विद्यार्थी, ह्यांच्या एकंदर वर्तनात काय फरक जाणवतात? तर मनाने कौल असा दिला की आजचे विद्यार्थी हे वर्तनाने बरेचसे (विद्यार्थी म्हणून) शिस्तप्रिय व विद्यार्थीदशेबाबत, शिक्षणाबाबत गंभीर असतात तर आपल्यावेळी अनेक विद्यार्थी थोडेफार 'हटके' असायचे. आजकालचे विद्यार्थी अधिक दबावाखाली असतात व दप्तराच्या दसपट अपेक्षांचे ओझे वागवत असतात हेही जाणवले. अश्या विद्यार्थ्यांना शिक्षा करावीशी वाटणारही नाही.
मग मात्र जरा विचित्र प्रश्न पडला. आपण 'शिक्षेमार्फत वर्तन-सुधारणा' प्रकारचे होतो आणि आजकालचे विद्यार्थी 'शहाण्यास शब्दांचा मार' ह्या प्रकारात मोडतात का? तसे असल्यास ते चांगलेच आहे, पण तसे होण्याची कारणे चांगली आहेत का?
म्हणजे असे, की विद्यार्थी परिपक्व आहेत म्हणून शिक्षा आवश्यक नाही ही बाब चांगली आहे, पण विद्यार्थी परिपक्व आहेत ह्यामागे त्यांच्यावर असलेल्या प्रचंड अपेक्षांचे ओझे कारणीभूत आहे का? विद्यार्थ्यांना जराही 'हटके' वागायची संधीसुद्धा मिळत नाही आहे का? 'छंद' हा प्रकारही एखाद्या शैक्षणीक अभ्यासक्रमाप्रमाणे त्यांच्यावर लादला जात आहे का?
थोडक्यात, त्यांचा आवाज दाबून टाकून, त्यांना मूक समजून, मग त्यांना परिपक्व समजण्यात येत आहे का? किंवा, त्यानंतर ते परिपक्व असल्यामुळे त्यांना शिक्षेची आवश्यकताच नाही असे पालकांतर्फे (व कदाचित त्यामुळे शिक्षकांतर्फे) आणि शाळेतर्फे समजण्यात येत आहे का?
मग अनेक प्रश्न पडू लागले. अपत्यसंख्या हा त्यामागील एक कारणीभूत घटक आहे का? पालकांची शक्य तितकी स्वप्ने एकदोनच अपत्यांना पेलायला लागणे हे एक कारण आहे का? भीषण स्पर्धेची जाणीव बालकांना नको त्या वयात होत आहे का? 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' हे तत्त्व सर्व्हायव्हलची काळजीही न भेडसावणार्या वयात शिकावे लागत आहे का?
'शिक्षा पाहिजे' असे अजिबातच म्हणणे नाही. किंबहुना, आजचे विद्यार्थी पाहून तर पालकांनाच शिक्षा दिली जावी असे वाटते.
पण 'येथे तुमच्या पाल्याला शिक्षा दिली जाणार नाही' असे सांगणार्या शाळा काय, ते वाचून आनंदणारे पालक काय किंवा 'शिक्षा नसणे' हा निकष प्रवेश घेण्यासाठीचा एक महत्वाचा निकष बनणे काय, हे सगळेच मला 'कोणीतरी कोणाचीतरी केलेली दिशाभूल' वाटत आहे. हे माझ्यातील 'त्या' काळच्या विद्यार्थ्याचे विधान नसून 'ह्या' काळातील एका व्यक्तीचे विधान आहे.
आमचे विद्यार्थी टॉपर्स होतात, आमच्या शाळेत विद्याध्ययनासोबतच सुजाण नागरीक बनवले जातात, अश्या जाहिराती न लागता 'आमच्या येथे तुमच्या पाल्याला शिक्षा दिली जाणार नाही' अशी जाहिरात लागणे (मे बी, आय एस ओ साठी का असेनात, पण तरीही) हे जरा विनोदीच वाटते.
-'बेफिकीर'!
(हे सगळे लिहायचा नैतिक अधिकार नाही ह्याची नम्र जाणीव आहे)
(Well! So, one of the questions is, are they already punished so much, in terms of pressures, that the schools can safely say that they can't go beyond that.)
त्यात काही निरिक्षणे ह्या
त्यात काही निरिक्षणे ह्या क्षेत्रातील तज्ञाने नोंदवावीत तशी नोंदवलेली दिसत आहेत व काही व्यक्तीगत ताशेरे हे त्याहीपेक्षा अधिक तज्ञाने ओढावेत तसे ओढलेले दिसत आहेत. ह्यावरून मला असे वाटत आहे की आपण बहुध ह्याच क्षेत्रात असाव्यात. तसे नसल्यास तुमच्या प्रतिसादातील ताशेर्यांकडे दुर्लक्ष करत आहे, निरिक्षणे शांतपणे बाजूला सारत आहे आणि मुद्दे मात्र व्यवस्थित विचारात घेत आहे.
<<
हे फेकिफिर मात्र या विक्याषतले तज्ञ आहेत, त्यामुळे यांचे ताशेरे अन निरिक्षणे कुठे सारावीत याचा विचार करतोय.
चांगले मुद्दे मांडले
चांगले मुद्दे मांडले आहेत..
पण 'पूर्वी' व 'आता' अशी तुलना किंवा तसा विचार करायचा झाल्यास मात्र फारच खोलात विचार करावा लागेल. मुळात बरेचसे संदर्भ बदलले आहेत... शाळा ह्या आता 'व्यावसाय' तत्वावर अधिक चालतात. त्यामूळे ब्रँडीग व मार्केटींग मध्ये अक्षरशः काहीच्या काही गोष्टी डकवल्या जातात. विषय मोठा, गंभीर, विनोदी, कटकटीचा ई. अनेक प्रकारचा आहे...
'आपण सुटलो' एव्हडेच म्हणून समाधान मानायचे..!
लोकहो, ही बातमी कुठे द्यावी
लोकहो,
ही बातमी कुठे द्यावी ते समजत नव्हतं. म्हणून इथे देतोय.
मूळ बातमी इथे आहे : http://dainiksanatanprabhat.blogspot.co.uk/2015/01/blog-post_9477.html
आ.न.,
-गा.पै.
बेफि - शिक्षा असावी कि असु
बेफि - शिक्षा असावी कि असु नये ह्या मुद्द्यावर छान वाद चाललेत.
आमच्या लहानपनिच्या शिक्षा यावर एक नवीन धागा नक्कि बनू शकतो.
Pages