पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१५

Submitted by चिनूक्स on 5 January, 2015 - 12:58

तर, नवं वर्षं सुरू झालं.
नवं वर्षं सुरू होताना तमाम चित्रपटप्रेमी पुणेकरांना वेध लागतात ते 'पिफ'चे.
म्हणजे 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'चे.
कारण चित्रपटगृहातल्या आश्वासक अंधारात भल्यामोठ्या पडद्यावरच्या हलत्या चित्रांबरोबर जगभरातल्या माणसांशी, त्यांच्या सुखदु:खांशी नातं जोडण्यासारखं सुख दुसरं नाही.

piff.jpg

महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन ८ ते १५ जानेवारी, २०१५ या काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये करण्यात आलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव आहे.

यंदा महोत्सवात आठ चित्रपटगृहांमध्ये, चौदा पडद्यांवर ऐंशीपेक्षा जास्त देशांतल्या अडीचशेहून अधिक चित्रपटांचे सुमारे ३५० खेळ सादर केले जाणार आहेत.

या वर्षीच्या महोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे जगभरात ज्यांचे चित्रपट नावाजले गेले आहेत, ते पोलिश दिग्दर्शक व निर्माते श्री. क्रिस्तोफ झानुसी परीक्षणमंडळाचे प्रमुख असणार आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे महोत्सवातल्या 'विजय तेंडुलकर स्मृती व्याख्याना'त श्री. क्रिस्तोफ झानुसी व्याख्यान देणार आहेत.

महोत्सवात श्री. झानुसी यांचे काही गाजलेले चित्रपट 'रेट्रोस्पेक्टिव्ह' विभागात पाहता येतील. हे चित्रपट पुढीलप्रमाणे -

१. Camouflage (पोलिश - Barwy ochronne)
२. In Full Gallop (पोलिश - Cwał)
३. Life as a Fatal Sexually Transmitted Disease (पोलिश - Życie jako śmiertelna choroba przenoszona drogą płciową)
४. Persona non Grata
५. The Constant Factor (पोलिश - Constans)
६. The illumination (पोलिश - Iluminacja)
७. The Supplement (पोलिश - Suplement)

ज्येष्ठ लेखक श्री. किरण नगरकर (भारत), ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक-पटकथालेखक श्री. फर्नांडो कोलोमो (स्पेन), इन्स्ब्रूकच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रमुख श्री. हेल्मुट ग्रोशप (ऑस्ट्रिया), दिग्दर्शक-पटकथालेखक श्री. मार्सेल गिस्लर (स्वित्झर्लंड), श्री. मार्को पिसोनी (इटली), श्री. पीटर टॉईन्स (जर्मनी), नंदना सेन (अमेरिका) यांचाही परीक्षणमंडळात समावेश आहे.

८ जानेवारीला उद्घाटनानंतर 'टिंबक्टु' हा यंदा अनेक महोत्सवांमध्ये गाजलेला चित्रपट दाखवण्यात येणार आहे. फ्रान्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक अब्दररेहमान सिसाको हे आहेत. २००२ साली 'कान चित्रपट महोत्सवात' त्यांच्या 'Waiting for Happiness' (Heremanko) या चित्रपटाला गौरवण्यात आलं होतं. 'टिंबक्टु' हा चित्रपट यंदाच्या कान चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धाविभागात निवडण्यात आला होता.

जागतिक स्पर्धा-विभागात यंदा विविध देशांतील सहाशेहून अधिक चित्रपटांमधून १४ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. हे चित्रपट पुढीलप्रमाणे -

अनुक्रमांक. इंग्रजी नाव (मूळ नाव) - निर्माते देश - दिग्दर्शक

१. Adventure (Priklyuchenie) - Kazakhstan - Nariman Turbayeu
२. Bad Hair (Pelo malo) - Venezuela, Peru, Argentina, Germany - Mariana Rondón
३. Behavior (Conducta) - Cuba - Ernesto Daranas
४. Consequences (Silsile) - Turkey - Ozan Aciktan
५. Court (Court) - India - Chaitanya Tamhane
६. Difret (Difret) - Ethiopia - Zeresenay Berhane Mehari
७. Hotel Nueva Isla (Hotel Nueva Isla) - Spain, Cuba - Irene Gutierrez
८. Like Never Before (Jako Nikdy) - Czech Republic - Zdenek Tyc
९. Nabat (Nabat) - Azerbaijan - Elchin Musaoglu
१०. One for the Road (En el último trago) - Mexico - Jack Zagha Kababie
११. Song of My Mother (Annemin Sarkisi) - Turkey - Erol Mintas
१२. Test (Ispytanie) - Russia - Alexander Kott
१३. The Kindergarten Teacher (Haganenet) - Israel, France - Nadav Lapid
१४. The Owners (The Owners) - Kazakhstan - Adilkhan Yerzhanov

या विभागात महाराष्ट्र शासन - प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (रु. दहा लाख), महाराष्ट्र शासन - प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक (रुपये पाच लाख) व विशेष ज्यूरी पुरस्कार हे पुरस्कार दिले जातात. महोत्सवाच्या वतीने प्रेक्षक-पसंती लाभलेला उत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कारही दिला जातो.

मराठी स्पर्धा-विभागात यंदा ४८ चित्रपटांनी भाग घेतला आणि निवडसमितीने त्यांपैकी ७ चित्रपटांची निवड केली आहे. या विभागात महाराष्ट्र शासन - संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार (रु. पाच लाख) व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनय, पटकथा आणि छायाचित्रण असे प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पुरस्कार दिले जातात. महोत्सवाच्या वतीने प्रेक्षक-पसंती लाभलेला उत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कारही दिला जातो.

यंदा मराठी स्पर्धाविभातातील चित्रपट पुढीलप्रमाणे -

१. एक हजाराची नोट (दिग्दर्शन - श्रीहरी साठे)
२. एलिझाबेथ एकादशी (दिग्दर्शन - परेश मोकाशी)
३. किल्ला (दिग्दर्शन - अविनाश अरुण)
४. ख्वाडा (दिग्दर्शन - भाऊराव कर्‍हाडे)
५. डॉ. प्रकाश बाबा आमटे (दिग्दर्शन - समृद्धी पोरे)
६. सलाम (दिग्दर्शन - किरण यज्ञोपवीत)
७. येलो (दिग्दर्शन - महेश लिमये)

फोक्सवॅगन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट स्पर्धा-विभागात 'लाईव्ह अ‍ॅक्शन' विभागात ४६ देशांतल्या १०६ संस्थांच्या १२३ लघुपटांचा सहभाग होता. अंतिम फेरीसाठी त्यांपैकी १३ लघुपटांची निवड झाली आहे. 'अ‍ॅनिमेशन' विभागात २९ देशांतल्या ५१ संस्थांमधल्या ६८ लघुपटांचा सहभाग होता. अंतिम फेरीसाठी त्यांपैकी १३ लघुपटांची निवड झाली आहे. 'लाईव्ह अ‍ॅक्शन' विभागात सर्वोत्कृष्ट लघुपट, दिग्दर्शक, पटकथा, छायालेखन, ध्वनिमुद्रण च 'अ‍ॅनिमेशन' विभागात सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशनपट (भारतीय) व सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशनपट (आंतरराष्ट्रीय) अशी सुमारे तीन लाख रुपयांची पारितोषिकं देण्यात येतील.

यंदा महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं 'महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा', 'महाराष्ट्राचा नैसर्गिक वारसा' आणि 'महाराष्ट्राची संस्कृती' या तीन विभागांत लघुपटांची स्पर्धा घेतली. प्रत्येक विभागात अंतिम फेरीसाठी पाच लघुपटांची निवड झाली असून हे लघुपट महोत्सवात दाखवले जातील. तिन्ही विभागांत प्रत्येकी तीन पारितोषिकं देण्यात येतील.

पहिल्या महायुद्धाला यंदा शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. बर्लिनची भिंत पडली, त्यालाही यंदा पंचवीस वर्षं पूर्ण होत आहेत. या निमिताने या दोन घटनांचा मागोवा घेणारे, जगाला मानवतेचा, प्रेमाचा संदेश देणारे चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. त्यासाठी 'वॉर अगेन्स्ट वॉर' हा खास विभाग तयार करण्यात आला असून, हीच या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पनाही आहे.

याशिवाय जागतिक चित्रपटविभागात यंदा २८ देशांतले ऐंशीहून अधिक चित्रपट दाखवले जातील. कान, बर्लिन, व्हेनिस, टोरंटो, रोटरडॅम, म्यूनिख अशा अनेक नामांकित चित्रपटमहोत्सवांत गाजलेले चित्रपट या विभागात पाहायला मिळतील.

'कॅलिडोस्कोप' या विभागात जपान, चीन, स्वीडन, दक्षिण कोरिया व तैवान या देशांतील एकूण पंचवीस चित्रपटांचा समावेश असणार आहे.

'फ्रेंच ग्रॅण्ड क्लालिक्स' या विभागात जाँ रन्वार, गोदार, द्युव्हिव्हिए, ब्रेसाँ, त्रुफॉ, ताति यांसारख्या जगभरात नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या अकरा अजरामर कलाकृती बघायला मिळतील. प्रख्यात फ्रेंच दिग्दर्शक ब्रेत्रेन ताव्हर्निए यांनी या विभागातल्या चित्रपटांची निवड केली आहे.

'कण्ट्री फोकस' या विभागात यंदा अल्जिरिया, ब्राझील आणि इजिप्त या तीन देशांतले २० चित्रपट दाखवण्यात येतील.

'रेट्रोस्पेक्टिव्ह' विभागात यंदा ख्यातनाम भारतीय अभिनेते सौमित्र चतर्जी यांचे 'अपुर संसार', 'अरण्येर दिनरात्री', 'चारुलता', 'गणशत्रू', 'हीरक राजार देशे', 'क्षुधित पाषाण' असे सहा चित्रपट व पेरू देशातील ख्यातनाम दिग्दर्शक फ्रान्सिस्को लोम्बार्डी यांचे चार चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

'फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडिया'नं सौमित्र चतर्जी यांच्यावर तयार केलेला लघुपटही यावेळी दाखवला जाईल. या लघुपटांच्या विभागात के. एल. सैगल, महेंद कपूर, नौशाद अली, रफी, सलील चौधरी यांच्यावर तयार झालेले लघुपटही दाखवले जातील.

'इंडियन सिनेमा टुडे' या विभागात २०१४ सालचे सर्वोत्कृष्ट दहा भारतीय चित्रपट दाखवले जातील. 'आंखो देखी', 'मंजुनाथ', 'अन्जान', 'स्वप्नम्', ओरालप्पोक्कम्', तीनकाहों' हे ते चित्रपट आहेत.

'मराठी सिनेमा टुडे' या विभागात या वर्षीचे महत्त्वाचे पण अप्रदर्शित असे पाच मराठी चित्रपट दाखवले जातील. 'आभास', 'साम दाम दंड भेद', 'तिचा उंबरठा', 'बायोस्कोप' हे ते चित्रपट आहेत.

'ट्रिब्यूट' या विभागात चित्रपतसृष्टीतील या वर्षी दिवंगत झालेल्या सात चित्रकर्मींचं कर्तृत्व अधोरेखित करणारे चित्रपट दाखवण्यात येतील. 'अंगूर' (देवेन वर्मा), 'अर्धसत्य' (सदाशिव अमरापूरकर), 'देवदास' (सुचित्रा सेन), हम दोनो' (नंदा), सवत माझी लाडकी' (स्मिता तळवलकर), घटश्राद्ध' (यू. आर. अनंतमूर्ती) या चित्रपटांचा त्यात समावेश आहे.

याशिवाय अनेक परिसंवाद, मुलाखती हे कार्यक्रमही अर्थातच असतील.

९ जानेवारी, २०१५पासून सिटीप्राईड (कोथरुड, सातारा रोड, आर डेक्कन), आयनॉक्स (कँप), मंगला, बिग सिनेमा (पिंपरी-चिंचवड), राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (लॉ कॉलेज रस्ता व कोथरुड) अशा आठ ठिकाणी एकूण चौदा पडद्यांवर हे चित्रपट दाखवण्यात येतील.

महोत्सवाचं उद्घाटन ८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे सांस्कृतिकमंत्री श्री. विनोद तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय पर्यावरणमंत्री श्री. प्रकाश जावडेकर, इटलीचे भारतातले राजदूत श्री. डॅनियल मॅनसिनी, राज्याचे अन्न-नागरी पुरवठा व संसदीय कामकाज मंत्री श्री. गिरीश बापट, खा. अनिल शिरोळे कार्यक्रमार उपस्थित असतील. प्रसिद्ध तालवादक श्री. तौफिक कुरेशी व त्यांचा वाद्यवृंद कार्यक्रमाची सुरुवात करतील.

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणार्‍या ज्येष्ठ चित्रकर्मींना दरवर्षी ’पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’तर्फे ’पिफ विशेष गौरव सन्मान’ देऊन गौरवण्यात येतं. यावर्षी अभिनेते श्री. शत्रुघ्न सिन्हा व ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती तनुजा यांना, तसंच ज्येष्ठ गीतकार-कवी श्री. नां. धो. महानोर यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

'पिफ'ला दरवर्षी अनेक मायबोलीकरांची हजेरी असते. यंदाही या महोत्सवात मायबोलीकर धमाल करतील, हे नक्की!

piff1.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेलसी टाइम अगेन Happy
मस्त सिनेमे पहा, कॉफी पित डिस्कशन करा हॉट हॉट आणि रिपोर्ट कळवा, आणि आम्हा जेलस होणार्‍यांना मिस करा !!

मला उत्सुकता होती युद्धपटांची...पण इतकी जाहीरात करून त्यामानाने युद्धचित्रपट फारसे नाहीतच. मला तरी जेमतेम ५-६च आढळले. आता कॅटलॉग मिळाल्यावर ग्लोबल सिनेमा मध्ये काही असेल तर बघावे लागेल.

वा वा वा ! जबरी ! खूप धमाल करा पिफला !

टिंबक्टु >>>> गेल्या दोन्हीवर्षीचा अनुभव असा होता की उद्घाटनापेक्षा बाकीचे चित्रपट जास्त आवडले..

पाहिलेल्या चित्रपटांची माहिती लिहा नक्की कोणीतरी..

बाकी खूप फोनाफोनी, मेसेजा-मेसेजी, धापवळ करा, लायनी लावा, जागा पकडा, त्यावरून इतरांशी भांडणं करा, भुक लागली की स्वतःजवळ मिळेल / सापडेल ते खा, नाहीच मिळालं तर आजुबाजूंच्याकडून मागून खा, कॉफ्या ढोसा, आसपासच्या फूड स्टॉल्सवर जा.. एकंदरीत मजा करा !!

मराठी चित्रपटांमध्ये 'कापूसकोंड्याची गोष्ट' नाही का?

आंखो देखी वगळल्यास इतर कुठलेही भारतीय-फॉरेन सिनेमे बघितलेले नाहीत.

महोत्सवास हजेरी लावणार्‍यांनी सविस्तर वृतांत लिहा प्लीज. चिनूक्स की आर्फीला त्या एक कोणी काकू पिफमध्येच भेटल्या होत्या ना?

सिंडरेला,
'कापूसकोंड्याची गोष्ट' या महोत्सवात नाही.

'आभास', 'तिचा उंबरठा', 'साम दाम दंड भेद', 'बायोस्कोप' हे अप्रदर्शित चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.

कोणत्या काकू??

पाचवा चित्रपट - 'बरड'. दिग्दर्शक - तानाजी घाडगे.

'कोर्ट' हा चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित चित्रपट अजिबात चुकवू नये असा आहे. मंगळवारी दुपारी २.३० वाजता सिटीप्राईड कोथरुडला (स्क्रीन १) आणि १५ तारखेला आयनॉक्सला सकाळी ११ वाजता (स्क्रीन ३) हा चित्रपट दाखवला जाईल.

चिनूक्स खूप छान माहिती दिलीस. ह्या कार्यक्रमाची लिंक नाही का? लोकेशन काय आहे? बावधनमधे असेल तर नक्की जागा सांग. धन्यवाद.

टिंबक्टु मी पाहिला आहे हा सिनेमा. मस्त आहे.