उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?

Submitted by अभय आर्वीकर on 31 December, 2014 - 13:22

उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?

              शेती हा विषयच मोठा विचित्र आहे. या विषयात जितके खोलवर अध्ययन करत जावे तितके गुंते वाढत जातात. एक गुंता सोडवायला बघावं तर तो गुंता सुटायच्या आतच नवे दहा गुंते निर्माण व्हायला लागतात. शेतीच्या उभारणीत साहित्यविश्वाचे काय योगदान असेल याचा आज थोडासा अंदाज घ्यायला निघालो तर चिंतनाची गाडी पहिल्याच पायरीवर अडखळली. शेतीची दहापट अधोगती घडवून एकपट प्रगती झाल्याचं आज जे ठसठशीतपणे जाणवत आहे त्याला बर्‍यापैकी शेतीशी संबंधीत साहित्यविश्व आणि एकंदरीतच सृजनशीलतेची अपरिपक्व मोघमता कारणीभूत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि शरद जोशी यांच्याखेरीज शेतीविषयाची नाडच कुणाला कळली नाही. रोगाचे योग्य निदान न करताच केले जाणारे औषधोपचार जसे रोग्याच्या जिवावर उठतात, कधीकधी चुकीच्या उपचारपद्धतीने जसा रोगी दगावतो अगदी तसेच शेतीमध्ये घडले आहे. शेतीच्या अधोगतीचे कारणच न कळल्याने साहित्यिकांनी जरी शुद्ध भावनेने शेतीच्या उन्नतीसाठी साहित्य निर्माण केले असले तरी ते काही तुरळक अपवाद सोडले तर अन्य साहित्यिकांचे शेतीविषयक किंवा शेतीसंबंधित साहित्य हे शेतीसाठी तारक कमी आणि मारकच जास्त ठरले आहे.

              महात्मा ज्योतिबा फुले, शरद जोशी आणि काही तुरळक अपवाद वगळता शेतीविषयाला लाभलेले साहित्यिक, लेखक आणि शेतकीतज्ज्ञच मुळात उंटावरून शेळ्या हाकलणारे असल्याने ते शेती विषयाला न्याय देऊ शकलेले नाहीत, हे विधान मी अत्यंत जबाबदारी आणि सर्वांचा रोष पत्करण्याची मानसिक तयारी ठेवून करत आहे. शेती हा एकमेव विषय असा झाला आहे की, उठसूठ जो-तो स्वतःच्या पात्रतेचा अथवा आवाक्याचा विचार न करताच शेतीविषयक सल्ला द्यायला उतावीळ असतो. शेती विषयाचे आपल्याला प्रचंड ज्ञान आहे आणि त्यावर आपले मतप्रदर्शन करण्याचा जन्मसिद्धच अधिकार आहे, अशाच आविर्भावात प्रत्येक मनुष्य वावरत असतो. शेती हा कदाचित एकमेव विषय असेल जेथे सल्ला ऐकणार्‍यांची संख्या नगण्य आणि सल्ला देणार्‍यांची संख्या प्रचंड आहे.

              एखाद्या रोगाची साथ आली तर जो-तो उठसूठ आपापले उपचारविषयक ज्ञान पाजळत फिरत नाही. आरोग्य शास्त्रातले तज्ज्ञ बोलतात आणि बाकीचे ऐकतात. कायदेविषयक गुंता असेल तर कायदेविषयक तज्ज्ञ बोलतात आणि बाकीचे ऐकतात. व्यापारामध्ये यशस्वी व्यापार्‍याचा शब्द प्रमाण मानला जातो. मात्र शेतीमध्ये अगदीच उलट आहे. शेतीमध्ये यशस्वी असलेल्या शेतकर्‍याला मूर्ख, अज्ञानी असे गृहीत धरून ज्याने कधीच शेती केली नाही, केली असेल तर निव्वळ शेतीच्या भरवशावर निदान सुपरक्लासवन अधिकार्‍याच्या तोडीचे जीवनमान उंचावून दाखवता आले नाही किंवा ज्याला भुईमुगाला शेंगा कुठे लागतात हे सुद्धा माहीत नसते तो सुद्धा स्वतःला शेतकीतज्ज्ञ समजून शेतकर्‍याचे प्रबोधन करायला अत्यंत उतावीळ असतो.

              पण खरी मेख त्याही पुढे आहे. विशेषज्ञ डॉक्टरचा पेशा डॉक्टरकीच असतो. नामवंत कायदेतज्ज्ञाचा पेशा कायदेविषयाशीच संबंधीत असतो. शिक्षणतज्ज्ञ हा शिक्षणक्षेत्रातील वाटसरू असतो. किर्तन-पारायण करणारे तर प्रत्यक्ष संत बनून संतत्वाला साजेसे वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. तद्वतच या सर्वांच्या उपजीविकेचे साधनसुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधितच असते. त्याच प्रमाणे या विषयातील साहित्यनिर्मिती करणारे, मार्गदर्शन करणारे अथवा उदबोधन करणारे त्या-त्या विषयातीलच कर्मयोगी असतात. ट्रकचा वाहनचालक आरोग्यशास्त्राशी संबंधीत पुस्तक लिहीत नाही. ढोलकीवादक कायदेविषयक पुस्तक लिहीत नाही, एखादी नृत्यांगना विद्यापीठाचा अभ्यासक्रम ठरवत नाही किंवा मासोळ्या विकून पोट भरणारा किर्तन करत नाही. शेती वगळता अन्य सर्व विषयामध्ये "आधी स्वतः करून दाखवले मग सांगितले" हेच सूत्र असताना शेतीत मात्र अगदी विपरित घडत असते.

              विशेषज्ञ मास्तर उंटावरून शेळ्या हाकत नाही; हाती खडू घेऊन फळ्यावर लिहून दाखवतो. विशेषज्ञ डॉक्टर उंटावरून शेळ्या हाकत नाही; हाती कात्री घेऊन शस्त्रक्रिया करून दाखवतो, विशेषज्ञ वकील उंटावरून शेळ्या हाकत नाही; स्वतः न्यायाधीशासमोर बाजू मांडतो, विशेषज्ञ उद्योजक आपल्या उद्योगात प्रत्यक्ष सहभागी असतो. शेतीविषयात मात्र नेमके याच्या उलट घडत असते. शेती हा विषयच मोठा विचित्र आहे, इथे प्रत्यक्ष शेती कसणारा शेतकरी सोडून अन्य व्यवसायावर किंवा आयत्या शासकीय अनुदानावर उपजीविका करणारेच शेतकी तज्ज्ञ होतात. शेतीवर ज्याची उपजीविका अवलंबून नाही तो शेती साहित्याची निर्मिती करतो. ज्याला शेती करून स्वतःचे पोट जगवण्यात कधीच यश आले नाही तो "शेतीविषयक मार्गदर्शन’’ शिबिरात मार्गदर्शक म्हणून लांबलचक भाषण ठोकून देतो आणि मानधनाच्या स्वरूपात अर्थार्जन करून स्वतःचे पोट भरणारा इतरांना निसर्गशेतीचे सल्ले देत फिरतो. शेतकी तज्ज्ञ किंवा शेतकीविषयावर लिहिणारा साहित्यिक आपल्या हातात नांगर धरत नाही, विळा हातात घेऊन खुरपणी करत नाही, पाठीवर फवारा घेऊन फ़वारणी करत नाही. विशेषज्ञ डॉक्टर डॉक्टरकी करून जगत असतो, विशेषज्ञ वकील वकिली करून जगत असतो. विशेषज्ञ उद्योजक उद्योग करून जगत असतो त्याच न्यायाने स्वतः गहू, धान, बाजरी, दाळी, कापूस, सोयाबीन, कांदा यापैकी एखाद्या पिकाची शेती करून, त्याच शेतीवर आपला उदरनिर्वाह करून आणि इतर सर्व शेतकर्‍यांपेक्षा अधिक मिळकत मिळवून दाखवणारा शेतकरी तज्ज्ञ या संपूर्ण भारत देशात एकही सापडत नाही. झाडून सारेच्या सारे शेतकीतज्ज्ञ सरकारी पगारावर जगत असतात. त्यामुळे शेतकी तज्ज्ञ आणि शेतीसंबंधित साहित्यिक हे उंटावरचे शहाणेच असतात, असे थेट विधान केले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही. शेतीचे विशेष आणि वास्तविक ज्ञान असल्याशिवाय उच्च प्रतीची आणि वास्तवाचे भान असणारी साहित्यनिर्मिती होऊ शकत नाही. हे आज ना उद्या, उद्या ना परवा, कधी ना कधीतरी सर्वांना मान्य करावेच लागेल आणि तो दिवस उजाडेपर्यंत शेतीला चांगले दिवस येण्याची हातावर हात ठेऊन प्रतिक्षा करत बसावे लागेल.

              शेतीला केंद्रस्थानी ठेऊन विचार केला तर साहित्यविश्व परिपूर्ण नाही, हे विधान करताना मला अजिबात संकोच वाटत नाही. शेतीव्यवसायाचा सर्वांगीण विचार करणारे साहित्यच लिहिले गेलेले नाही. समजा एखाद्या नवतरुणाला नव्याने शेती करायची असेल तर त्याला सर्वंकश मार्गदर्शन करू शकेल किंवा शेती करताना त्याला साहित्याचा आधार घेऊन दमदारपणे वाटचाल करता येईल असे साहित्य उपलब्ध नाही. ज्या साहित्याचा शेतीच्या व्यावहारिक पातळीवर उपयोग नाही असे साहित्य मात्र साहित्य विपुल प्रमाणात लिहिले गेले आहे. शेती करायची असेल तर मशागत कशी करावी, कष्ट कसे करावे, आधीच गळत असलेला घाम आणखी कसा गाळावा, बियाणे कोणते वापरावे, फ़वारणी कोणती करावी एवढेच नव्हे तर राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज काढून आणखी कर्जबाजारी कसे व्हावे, याविषयी मार्गदर्शन करणारी, दिशानिर्देश देणारी पुस्तके रद्दीच्या भावात घाऊकपणे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत; मात्र बँकेकडून कर्ज काढून बियाणे घेऊन ते मातीत पेरल्यानंतर, खते जमिनीत ओतल्यानंतर, कीटकनाशके फवारून हवेत गमावल्यानंतर जर अतिपावसाने किंवा कमी पावसाने शेतातील उभे पीक नेस्तनाबूत झाले आणि बँकेतून कर्जरुपाने आणलेले पैसे जर मातीत गेले, पाण्यात गेले किंवा हवेत गेले तर मग बँकेचे कर्ज फेडायला पैसे कुठून आणायचे याचे उत्तर देणारे एकही पुस्तक शेतकी तज्ज्ञांना आणि सरस्वतीच्या लेकरांना आजतागायत लिहिता आलेले नाही. शेतमालाचा उत्पादनखर्च कसा काढावा, कोणत्या पिकाचा उपादनखर्च किती येतो, कोणते पीक घेतले तर खर्च वजा जाता कीती रक्कम शिल्लक असू शकते याचा शास्त्रशुद्ध ताळेबंद उपलब्ध करून देणारे एकही पुस्तक आज उपलब्ध नाही.

              शेती वगळता अन्य कोणताही व्यवसाय केला आणि व्यवसायावर जर कोणत्या कारणाने विपत्ती आली आणि मुद्दलसुद्धा नष्ट झाले तर विमाकंपनी कडून भरपाई मागावी, कोणता, कुठे आणि कसा फ़ॉर्म भरावा याची शिकवण देणारी पुस्तके आहेत. शेतीसाठी मात्र अशी पुस्तके उपलब्ध नाहीत. जर शेती वगळता अन्य कोणताही व्यवसाय कुठल्याही कारणाने पूर्णपणे तोट्यात गेला, दिवाळं निघालं तर त्याला दिवाळखोरी/व्यवसाय आजारी किंवा नादारी घोषित करायचा कायदेशीर मार्ग सांगणारी आणि त्या बिगरशेती व्यावसायिकाला संरक्षण देणारी कायद्याची चिक्कार पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र सर्वांना समान न्यायाचं तत्त्व सांगणारी कायद्याची पुस्तके सुद्धा शेतकर्‍याच्या बाजूने उभी राहायला तयार नाही.

              कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा प्रत्यक्ष शेतीक्षेत्राशी काहीही संबंध उरलेला नाही. साहित्यविश्व व शेतीमधली वास्तविकता यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अत्यंत लाजिरवाणेच आहे. साहित्यातून समाजाच्या सामुहिकमनाचे वास्तव प्रतिबिंबित व्हायला हवे; पण मागील काही वर्षाचा साहित्यिक आढावा घेतला तर ते सुद्धा होताना दिसत नाही. गेल्या १५-२० वर्षांमध्ये लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नाही किंवा त्याचे प्रतिबिंब काही साहित्यात उमटलेले नाही. एक खैरलांजी प्रकरण झाले तर त्यावर शेकडो पुस्तके लिहिली गेली. दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून करण्यात आला तर शेकड्यांनी पुस्तके लिहिली जातात, मात्र; लाखो शेतकर्‍यांच्या आत्महत्या दखल घेण्याइतपतही साहित्यक्षेत्राला महत्त्वाच्या वाटत नाही. कारण काय? शेतकरी गरीब असतो म्हणून? की त्याच्याकडे पुस्तके विकत घेण्याची ऐपत नसते म्हणून? या दोन्ही प्रश्नाची उत्तरे ’होय’ अशीच येत असतील व ”खपणार तेच विकणार" हाच सरस्वतीच्या उपासकांचा अंतरस्थ हेतू असेल तर "साहित्य म्हणजे समाजाचा आरसा" ही उक्ती प्रत्यक्षात उतरेलच कशी? शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्र आणि सरस्वतीची लेकरं यांची पात्रता आणि प्रतिभेची उंची अजूनही अत्यंत खुजी आहे, हे स्पष्ट व्हायला पुरेसे आहे.

              शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे शरद जोशींचे लेखन वगळता काहीही अन्य लेखन साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही, ही उणीव साहित्यक्षेत्रात राहिलेली आहे, हे सत्य आहे. शेतीच्या दुर्दशेचे कारण सांगताना शेतकरी आळशी आहे, त्याला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येत नाही, तो अज्ञानी आहे, तो व्यसनाधीन आहे अशा कांगावखोर आणि शास्त्रशुद्ध अर्थवादाचा लवलेश नसलेल्या लेखनापलीकडे साहित्याच्या महामेरूंना काही लिहिताच आलेले नाही. योग्य कारणाचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण लेखन करण्यात साहित्यक्षेत्राने कुचराई केली ही पहिली चूक आणि जे लिहिले ते निखालस खोटे, अशास्त्रीय लिहिले ही दुसरी चूक.

असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी

              शेतीला भाकड शेतकीतज्ज्ञांचा आणि शेती साहित्यिकांचा शून्य उपयोग आहे. कारण ह्या साहित्यिकांचे, लेखकांचे लेखन आणि मार्गदर्शन फ़ारतर विषाच्या बाटलीपर्यंत किंवा गळफ़ासाच्या दोरापर्यंत शेतकर्‍यांना पोहचवून देऊ शकते. शेतकर्‍यांच्या मुक्तीची गुरुकिल्ली यांनाच अजून गवसलेली नाही मग या मंडळींचे लेखन शेतकर्‍यांना मुक्तीचा मार्ग कसा दाखवू शकेल? तरीही शेतकर्‍यांना फुकटाचा नको तो सल्ला देणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना उच्च तंत्रज्ञान वापरायला सांगतो, दुसरा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना निसर्गशेती करायला सांगतो, तिसरा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना जोडधंदे करायला सांगतो, चवथा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना मार्केटिंग कशी करावी हे शिकवू पाहतो. त्यामुळे शेतकरी गोंधळतो एवढेच नव्हे तर या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे सल्ले तद्दन फालतू, फडतूस आणि अव्यवहार्य असल्याने शेतकर्‍यांनी ते वापरायचा प्रयत्न केल्यास त्यांची शेती आणखी घाट्यांत जाते. त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्‍या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे जेणेकरून निदान तोंड तरी बंद होईल. शेतकरी मरत असेल तर मरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. शेतकर्‍यांसाठी तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त शेतकरी देशोधडीस लागावा म्हणून शासकीय पातळीवरून होणार्‍या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. शेतकरी स्वतःचे स्वतःच बघून घेईल. तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त शेतकर्‍यांच्या छातीवरून उठा. तुम्ही छातीवरून उठलात तर शेतकरी स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्यास समर्थ आहे. त्याला तुमच्या भाकड सल्ल्याची आवश्यकता तर नाहीच नाही.

               आता काही मिनिटातच वर्षे २०१४ मावळणार आहे आणि नवे वर्ष येणार आहे. हे नववर्षा! जुने जाऊदे मरणालागुनी....... बळीराजासाठी काहीतरी नवीन घेऊन येरे बाबा!!

                                                                                                                - गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुटेसर, सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो, की शेती या विषयातलं काहीच मला समजत नाही.
काल-परवा एबीपी माझा वर एक शेतीविषयक बातमी पाहिली. मंगळवेढा मधील काही शेतकर्‍यांनी एकत्रित येऊन (२० एक जण) काही एकरांवर शेडनेट उभारुन, त्यात फळभाज्या, फळं यांचं उत्पादन घेतलं. त्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलं. पावसाचं प्रमाण या भागात अतिशय कमी असल्याने, पावसाळ्याच्या दिवसांत पाण्याचा योग्यतो साठा करुन ठेवला. शेडनेट मुळे गारपीटीच्या तश्या नव्या संकटालाही व्यवस्थित सामोरं जाता आलं.

आजकाल आपल्या वृत्तवाहिन्या अश्या प्रेरणादायी बातम्या वारंवार दाखवत असतात.

ही आणि अश्या बातम्या पाहून, शेती विषयी काहीच माहिती नसलेल्या माझ्या मनातही शंका आल्या की अशी बातमी पाहून शेतकरी म्हणून काय काय गोष्टी/शंका मनात येतील.. आपली भौगोलिक परिस्थिती (जमीनीची पत, पाण्याची व्यवस्था वगैरे), आर्थिक परिस्थिती (भांडवल, नफा, बँकांकडून कर्ज मिळण्याची शक्यता वगैरे). या सगळ्या माहितीचा आपल्या शेती साठी कसा आणि किती उपयोग होऊ शकतो...

वृत्तवाहिन्या किंवा असे सल्ले देणारे लेख उंटावरुन शेळ्या हाकल्यासारखे वाटणं तसं स्वाभाविक आहे. पण यातूनच काही प्रेरणा घेण्यासारखे काही शेतकर्‍यांना वाटणे हेही एक प्रकारे यांचं यश आणि सरतेशेवटी बळीराजाच्या फायद्याचे आहे असं नाही का वाटत ?

@गामा_पैलवान_५७४३जी,
अशा तर्हेची अनेक आव्हाने देऊन झालीत. अनेकांना उघडे पाडून झालेत. पण ते सर्व तेवढ्यावेळापुरते पळून जातात.
मागे मी पंकृवीच्या कुलगुरुला आव्हाण दिले होते. पळून गेला कारण उत्तर देण्यासारखे त्यांच्याकडे काहीही नसते.

कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....!

@मामी, लेख एवढा विस्तारित लिहूनही मुख्य मुद्दा वाचकापर्यंत पोचत नाही आहे. हे मलाही जाणवले आहे. कारणे शोधत आहे.

@shendenaxatra,
भडक भाषा, एकांगी आणि टोकाचे विचार मांडुनही शेतीचे प्रश्न सुटत नाही आहे. आणि मी असा लेख लिहिण्यापूर्वी सुद्धा सुटलेले नव्हते. शेतीचे प्रश्न सहजरित्या सुटत नाही, हे सुद्धा एक दुखने आहेच.

@बेफि, माझा आणि लेखाचा रोख फक्त "उंटावरच्या शहाण्यावरच" आहे. ज्यांचे पाय जमिनीला लागून आहे त्यांचेबद्दल मला आदरच आहे.

१. साहित्यिकांची काही भूमिकाच का असावी? साहित्यिकांची भुमिका नसती तरी चालले असते पण दुर्दैवाने ती आहे आणि शेतीला मारक आहे. साहित्यिकांची भुमिका असलीच तर ती शेतीला पुरक असावी, एवढाच माझा मुद्दा आहे.

२. साहित्यिकांची भूमिका प्रभावी आहे / असली तर शेतकर्‍यांना दूर सारून शासनाकडून ती भूमिका का ऐकली जाते? ४. साहित्यिकांनी शेतकर्‍यांचे नेमके कसे नुकसान केले? साहित्यिकांनी शेतीविषयाचे काही अंशी विकृत चित्रण केले. शेतीच्या मूळ समस्येला व त्यावरिल उपचाराला चुकीची दिशा दाखवली, त्याचा फायदा प्रस्थापितांना झाला. सरकार हे प्रस्थापितांचेच असते. त्यामुळेच शेतीची दुर्दशा झाली.

३. भलत्याचीच भूमिका ऐकली जाते तेव्हा शेतकरी काय करत असतात? शेतकरी शेतात कष्ट करून मरमर राबण्यापलिकडे काहीच करत नाही, हेच तर सर्वात मोठे दुखणे आहे.

.

मुटेसाहेब, हे साहित्यिक कोण हे सांगाल का एकदा? मी पुल, गदिमा, कुसुमाग्रज, कानेटकर, फडके, अत्रे, खांडेकर, सुशि, बाबा कदम, द मा मिरासदार, बेफिकिर, विशाल कुलकर्णी, कौतुक शिरोडकर, कवठीचाफा इत्यादी मंडळींनी शेतीवर आधारित कथा कादंब-या न लिहिल्याने शेतक-यांचे कसे नुकसान झाले याची कल्पना करुन माझे डोके पिकवुन घेत आहे. माझ्या डोक्यात असलेले साहित्यिक आणि तुम्हाला अभिप्रेत असलेले साहित्यिक यांच्यात फरक असावा. मला माहित असलेल्या काही साहित्यिकांची नावे मी वर दिलीत. तुम्हाला अभिप्रेत असलेल्यांची निदान नावे तरी द्या. साहित्य मी शोधेन.

लेख वाचला. शेतीविषयक प्रश्नांमधे उंटावरच्या शहाण्यांचीच केवळ चलती हा विषय मान्य.
पण हे केवळ शेतीबाबतच घडते असे नाही तर "बळी तो कान पिळी" या न्यायाने केवळ शारिरीक दृष्ट्या नव्हे तर बौद्धिकद्रुष्ट्याही कान पिळण्याचे कार्य या उंटावरच्या शहाण्यांकडून अनेकविध क्षेत्रात होतच असते, उदाहरणार्थ मुकबुल फिदा हुसेनला "चित्रकार" म्हणून डोक्यावर घेणे!

हे उंटावरचे शहाणे केवळ लेखकू/विद्वान/पत्रकार असतात असे नाही तर सर्व प्रकारच्या प्रशासनातील सर्व थरातील नोकर, सरकारी कमिट्यांचे मेम्बर, वित्त-अर्थकारणातील संस्था, राजकारणी, व येता जाता वाढत्या महागाईला नावे ठेवित शेतकयांच्या नावाने खडे मोडणारे सामान्यजनही यातच येतात. होय, अन यातच कृषीविद्यापीठातील नग ही येतातच.

एक आठवते तसे छोटे उदाहरण देतो. लिंबिच्या शेतात शेततळे करण्याचा प्रयोग मी मागे केला होता, तेव्हा बर्‍याच उंटावरच्या शहाण्यान्नी मला "हल्ली काय अनुदान वगैरे मिळते ते घ्या की, स्वतः कशाला राबत बसता" असा टोला हाणला होता.
तर शेततळ्याकरता सरकारी अनुदान आहे हे नक्की, पण त्याकरता किमान किती जमीनीची मालकी असायला हवी व किमान किती आकाराचे शेततळे बनवायला हवेच हवे याचे फिक्स्ड केलेले निकष आहेत ज्यात लिम्बीची जमिन अन शेततळे आकाराने बसत नव्हते. खरेतर लिम्बीची जमीन डोंगर उतारावर आहे. वरच्या टोकाला दोन ते तीन लाख लिटर पाणी साठवले तर सायफनने बाकी आख्खी जमीन पाण्याखाली/ठिबकपद्धतीने येईल. पण त्याकरता अनुदान वगैरे मिळविण्याचा विचारही करता येत नाही, कारण मूळात जे निकष ठरवले आहेत ते अशाच कोणा "उंटावरच्या एका वा अनेक शहाण्यांनी" बनवले आहेत. व ते अल्पभूधारक असलेल्या लिम्बीच्या काहीही कामाचे नाहीत, मात्र वास्तव स्थिती अशी आहे की त्या जागी कृत्रिम तळे/पाणी साठवणूकीची जागा केली तर लिम्बीचे शेत सुजलाम सुफलाम होईलच पण जवळच्या जंगलातील वन्य पशूंची पाण्याचीही सोय होईल. अर्थातच, एकतर लिम्बी ब्राह्मण, शिवाय अल्पभूधारक, तेव्हा तिला सरकारी मदतीची काडीचीही आशा नाही.

या व्यतिरिक्त मढ्याच्या ताळवेवरचे लोणी खाणार्‍यांप्रमाणे अजुन एक वर्ग आहे, तो म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास नुकसान मागणी करणार्‍यांचा व नुकसानभरपाई देताना आपला "टक्का" काढणार्‍यांचा. मतपेढ्या तयार करण्याकरता या संपुर्ण योजनांचा वापर न झाला तरच नवल.

याव्यतिरिक्त, एक बाब दुर्लक्षित केली जाते ती म्हणजे शेतीची बहुतांश उत्पन्ने जीवनावश्यक /खाद्यपदार्थांची असतात ज्यांचे भाव जमीन/सोने व अन्य कोणत्याही उत्पादनाच्या किमती इतके कधीच वाढत नाहीत, वाढू देणे कोणत्याच जनतेला व त्यांच्या सरकारला परवडणार नाही. त्यामुळे शंभर वर्षांपूर्वीचा धनधान्याने समृद्ध शेतकरी आजच्या सुधारित जगात अवकळा आल्याप्रमाणे, व टोपी धोतर असा वेष असल्यास अन हात पाय चिखलात / उन्हातानात काम करून रापलेले असल्यास तो गावंढळ / अडाणी /असंस्क्रुत मानला जातोच, व दहावी/बारावी/ग्रॅज्युएशनच्या परीक्षा नुस्ते जरी पास झाले तरी महिनोमाल खात्रीशीर पगाराच्या आशेने शेतकर्‍याची पुढची पिढी शेतीकडे ढुंकुनही बघत नाही, शेती करायला मागत नाही, कारण बहुतेक वेळा शेतीत राबून मिळणार्‍या वर्षाच्या उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने अधिक पैका शहरात नोकरी करुन मिळतो हे वास्तव आहे.

या सर्व प्रश्नान्ना निवळ दुसर्‍याकडे म्हणजे सरकार/जन्ता/उम्टावरचे शहाणे इत्यादींकडे बोट करुन चालणार नाही, शेतकरी वा त्याच्या पुढच्या पिढ्याही सामोर्‍या येणार्‍या बदलास दीर्घकालिनरित्या तोंड द्यायला सज्ज नव्हती/नाहीत. पुन्हा एक छोटे उदाहरण देतो.
सातार्‍याकडून पुण्यास येताना खेडशिवापुर अलिकडे डाव्या हाताला बरेच शेतकरी बायाबापे भाजी विकत असतात. बरेचसे पुण्यामुंबईस परतणारे कारवाले तिथे थांबुन भाजी वगैरे घेतात.
परवाच्याच रविवारी मी तिथे थांबलो, मटारीचा दर विचारला, भाजी विकणार्‍या मावशीने मला साठ रुपये किलो असा सांगितला, मी तिथल्या तिथे तिला म्हणले की अग पुणे मार्केटयार्ड राहूदेच, आकुर्डीत मला ४० रुपयाने मिळतोय, तर मटार कितीही गोड असला तरी ६० रुपये मी कसे काय देऊ? मग थोडी वरमुन तिने बोला मग कितीला घेणार, किती हवी वगैरे चालू केले. पण तोवर माझा "मटार" घ्यायचा मूड गेलेला होता. तिथे येऊन तोंडात येईल सांगितलेल्या किमतीला थोडीफार घासागिस करुन भाजी घेणार्‍या कारवाल्यांयेवढी माझी ऐपत नसल्याने व वास्तव परिस्थिती माहित असल्याने मावशीला म्हणले की निदान माणसे बघून तरी "भाव फोडत जा". आमच्यात बारगनिंग करीत नाहीत, आम्हि पुणेरी, चितळ्यांचा आदर्श मानणारे, एकच भाव हे सूत्र. बारगनिंग करणे म्हणजे शब्दशः भीक मागण्यासारखे मानणारे, तेव्हा बाई ग, सध्या तुमचे मटार नकोत.
आता यातुन बोध काय घ्यायचा तो घ्या.
या उलट परिस्थितीही बघितली आहे, की मार्केटयार्ड वा बाजारसमितीच्या आवारात एकदा का तुमचा माल गेला की किती व कसा कसा भाव पाडून घेतला जातो व मधले दलालच त्यांची तुंबडी कसे भरतात त्याचे चित्तथरारक अनुभव आहेत, व नको ती शेती असे कसे होते ते ही अनुभव आहेत.

हे असेच चालू राहिले तर एक नक्कि आहे अन ते समजायला भविष्यवेत्याची गरज नाही की परिस्थिती अशीच राहिली तर येत्या उण्यापुर्‍या पाच ते दहा वर्षात संपुर्ण भारत अन्नधान्याचे बाबतीत परावलंबी झालेला दिसेल, अन त्यावेळेस हे उंटावरचे शहाणे काय करणार ते बघण्याची उत्सुकता आहे.

परंतू, गावाकडील मंडळी साधीभोळी वगैरे असतात हा देखिल एक साहित्यिक गैरसमजच आहे, हा स्वानुभव आहे. त्याविषयी नंतर कधीतरी.

शहरात आम्ही एक बिस्किटचा काही मोजक्या ग्रॅम वजनाचा पुडा घेताना कधीही घासागिस करीत नाही, वा तो बिस्किटचा पुडा घेताना दर हजारी ग्रॅमचा दर किती अवाढव्य होतोय याचा विचार करीत नाही.
तेच क्याडबरी वा तत्सम काही किरकोळ वजनाच्या चॉकलेटस घेताना कधीही पैक्याचा विचार करीत नाही
मात्र गहू वा साखरे मधे काही थोडीफार वाढ झाली तर हाशहुश्श करीत शिव्यांच्या लाखोल्या वहातो.

आमचा समाज सर्रास ढोंगी व चंगळवादाच्या आहारी गेलेला आहे हे गव्हाच्या दरकिलो दराच्या तुलनेत बिस्किटांचे प्रत्येक किलोचे दर याची तुलना/विचार करता तत्काळ समजुन येते, जर समजुन घेतले तर.

लिंबूटिंबू,

अक्षरशः पंधरा मिनिटांपूर्वीच खेड शिवापूरहून परतलो. काही कामासाठी त्या गावात गेलो होतो, हायवेवरून पास झालेलो नाही. आत गावात गेलो होतो. तेथे जो भाजी बाजार बसतो तेथील भाव असे:

मेथीची भरदार गड्डी - ५ रुपये (पुण्यातील दर - १० रुपये किमान)

चार सणसणीत मुळे असलेली गड्डी पाल्यासकट - १० रुपये (पुण्यात एक मुळा पाच रुपयाला)

करडई व चाकवत गड्डी - प्रत्येकी साडे सात रुपये (पुण्यातील दर पंधरा रुपये)

हे भाव खरोखरच कमी आहेत आणि त्यातही पुन्हा बार्गेनिंगला थोडासा स्कोप आहे जे मी केले नाही कारण जो भाव मिळत होता तोच आवडला होता.

तेव्हा, तुम्हाला जी हिरमुसणारी भाजीवाली भेटली तिला आणि तिच्या सहकार्‍यांना हायवेवरील उच्चवर्गीयांना काय भाव लावायचा हे माहीत झालेले असते आणि तुमच्यासारखा एखादा वस्सकन् अंगावर येणारा (हलके घ्या) भेटला की ते लोक हिरमुसतात.

सांगायचा मुद्दा हा की त्यांच्यात खोटेपणा आणणारेही आपल्यातलेच काही लोक आहेत. मोह कोणाला होत नाही? त्यांनाही झाला तर काय बिघडले. पण एक चाकवताची जुडी जुळवताना ती पिकवण्यापासूनचे कष्ट आठवले तर साडे सात रुपये ही काय किंमत झाली का?

पण मुटे मुद्यावरच येत नाही आहेत. साहित्यिकांच्या नावाने शंख तेवढा करत आहेत. दोन उदाहरणे देत नाही आहेत की नेमके कोणी नुकसान केले शेतीचे!

बेफिकीर, मी निव्वळ मानसिकतेचे उदाहरण दिले, अशाकरता की शेतकरी विरुद्ध बाकी समाज असे वर्गविद्रोही चित्र उभे करणे टळावे... सगळेच एकाच माळेचे मणी आहेत जेव्हा आम्हि भारतिय समाजाचा एक भाग असतो.

>>>>दोन उदाहरणे देत नाही आहेत की नेमके कोणी नुकसान केले शेतीचे! <<<
शेतकरी स्वतः देखिल यास जबाबदार आहे हे मी खात्रीने म्हणू शकतो. पण त्याचबरोबर, क्वालिटी अन क्वान्टीटीचा "माज" करायची क्षमता त्याने कधी जोपासलीच नाही, व आता तर ती क्षमताही राहिली नाहि. बाजारसमित्यांच्या "कारभाराने" व व्यापार्‍यांच्या दलालि/सट्टेबाजाराने शेतकर्‍यांची केव्हाच वाट लागली आहे.
आज शेती कसायला घरातील वा मोलमजुरीने बाहेरील माणूस मिळत नाहीये. मिळाले तर त्याची किम्मत अजिबात परवडत नाही. गावे ओस पडू लागून शहरे भरली जाताहेत, अन जागतिक ब्यान्केसहित अन्य सर्व परकीय अर्थमहासत्ता भारताची खेडेगावातील ताकद केव्हा मोडून पडते याची वाट बघत आहेत, व त्यानुसार शहरीकरणास उठाव देणार्‍या अटी लादत आहेत. तसे झाल्यासच त्यान्ना, अन्नधान्याकरता पूर्णतः परावलंबी बनलेल्या भरतखंडास बाजारपेठ म्हणून व स्वःस्तात राबणार्‍यांची फौज म्हणुन हवे तसे वाकविता येणार आहे. अजुन काहीच वर्षात मागिल दाराने "कंपनी सरकार" सारखीच "कंपनी शेति" आली तर नवल वाटून देऊ नका.
दुर्दैव असे की शेतकरी तर "झोपलेलाच/झोपवलेलाच" आहे, बाकी समाजही डोळ्यावर गेंड्याची कातडी ओढून बसला आहे.
साहित्तिकांचा संबंध असा येतो की मराठी साहित्यात वा पाठ्य पुस्तकात वास्तवाचे भान आणणारी अन मार्गदर्शक ठरणारी / प्रबोधन करणारी अशी कोणतीही साहित्यकृती दिसत नाही.

शेतीविषयक मार्गदर्शन’’ शिबिरात मार्गदर्शक म्हणून लांबलचक भाषण ठोकून देतो आणि मानधनाच्या स्वरूपात अर्थार्जन करून स्वतःचे पोट भरणारा इतरांना निसर्गशेतीचे सल्ले देत फिरतो. >>

मी ह्या विधानाशी मात्र नक्कीच सहमत आहे. आजकाल तर माझेही दोन तीन मित्र निसर्गशेतीच कशी बेस्ट ह्यावर शिबीर भरवतात. पण आईशप्पथ त्यांना नांगराची बैलाशी जोड कशी करायची हे पण माहीत नाही. त्यामुळे मुटे ज्यांना "उंटावरचे शहाणे" म्हणत आहेत त्यात माझे हे मित्रही येतात.

पण एकंदरीत सरस्वतीची लेकरं अन उंटावरचे शहाणे अन इतर असे एकत्र आणून मुटेंनी लेखात गोंधळ निर्माण केला आहे. रादर तुम्ही ह्या उंटावरचे शहाण्यांवरच लेख लिहायचा होता. त्याने तुमचे म्हणणे सर्वांना कळले असते.

शेतीवर बोलणार्‍याला नांगराची बैलाशी जोड करता आलीच पाहिजे असे आडमुठे धोरण का? कुठल्याही आकाराचे शेत हे बैलाच्या नांगरावरच चालवले जाते का? अगदी लहान वा अगदी प्रचंड शेतात नांगरणी वेगळ्या प्रकारे होऊ शकत नाही का? आणि जर ह्या लोकांना शेतीतले कळतच नसेल तर दुर्लक्ष करा. तुमचा दृष्टीकोन हा सर्वसामान्य शेतकर्याच्या दृष्टीकोनाचा प्रतिनिधी असेल तर तेही अशा लोकांकडे तुच्छतेनेच बघतील. मग अशा लोकांचा खरोखर त्रास होईल का? अशा प्रकारे अव्हेरले गेलेले लोक शेतीचे नुकसान करु शकतील का? उगाच नस्त्या गोष्टीकरता रडगाणे गाण्यापेक्षा स्वतः नांगराची बैलाशी जोड वगैरे शेतकी कामे करता करता साहित्य निर्मितीही करावी आणि शेतकरी बंधूंचे भले करावे. दुसरे कुणी करतील अशी अपेक्षा ठेवणे चूक आहे.

निसर्ग शेतीवाल्याना बैलांची नांगराशी जोड कशी करावी ते माहित असण्याची काय गरज?
उलट बैल आणि नांगर न वापरता शेती कशी करावी ते शिकणे म्हणजे निसर्गशेती.
वन स्ट्रॉ रिवॉल्युशन वाचलं नाही का?

@नितीनचंद्र, तुम्ही म्हणता हे खरे आहे. शेतकर्‍याचा वेळोवेळी घातच झाला आहे. गोड बोलून सर्वांनी त्याच्या भोळसरपणाचा गैरफायदा घेतला आहे. त्यामुळे त्याचा कुणावर विश्वास नाही, हे खरे आहे. मी प्रत्यक्श शेतीत अनेक प्रयोग यशस्वी करून दाखवले. तरीही शेतकर्‍यांनी माझे अनुकरण करायला तब्बल ५-६ वर्षाचा काळ घेतला.

शेतकरी संघटीत न होण्यामागे त्याचा पुढार्‍यावर फारसा विश्वास नाही, हेही एक कारण आहे. आम्ही ३०-३२ वर्षापासून प्रयत्न करत आहोत पण अजूनही शेतकर्‍यांना आमचा विश्वास वाटत नाही. मात्र त्याची आम्हाला खंत नाही. मी शेतकर्‍यांच्या या भूमिकेचंं स्वागतच करतो.

शेतकरी आंधळेपणाने काहीच स्विकारत नाही. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या कसोटीवर तावूनसुलावूनच घेतो.
मात्र तो अनेकदा इतरांचा सल्ला ऐकत असल्याचे सोंग करत असतो.

जसे की,

- कर्ज काढायचे असेल तर बँकेच्या बाबूसमोर मान डोलावतो.
- उधार पाहिजे असेल तर कृषि केंद्राच्या मालकासमोर मान डोलावतो.
- अनुदान पाहिजे असेल तर सरकारी अधिकार्‍यांसमोर मान डोलावतो.

वगैरे वगैरे!!!

@ पिंगू,
ती बातमी अत्यंत दिशाभूल करणारी आहे. बनवाबनवी आहे. विस्तृतपणे लिहायला गेलं तर लेखच लिहावा लागेल.

@ मित, तुम्हाला एका बातमीचे उदाहरण सांगतो.

पंढरपूर : मंगळवेढ्यात कृषीक्रांती फार्मर्स ग्रुपने नंदनवन फ़ुलवल्याची व ढोबळी मिर्ची आणि काकडीचं पीक घेतल्याची एबीपी माझाची बातमी लक्षवेधी जरुर होऊ शकते पण महाराष्ट्रासमोर नवा आदर्श घालून दिला असल्याची भाषा ही चक्क दिशाभूल आहे.
जोपर्यंत गहू, ज्वारी, धान, तूर, सोयाबिन, उडीद, कापूस वगैरे पीक घेऊन कोणी सर्व खर्च वजा जाता लाखो/करोडो रुपये निव्वळ नफ़ा मिळवून दाखवत नाही तोपर्यंत नवा आदर्श घातल्याच्या गप्पा ह्या केवळ वल्गनाच ठरतील. ढोबळी मिर्ची आणि काकडी हे काही देशभरातील बहुसंख्य शेतकर्‍यांच पीक नाहीये की इतरांनी असल्या आदर्शाचे अनुकरण करावे.
समजा देशभरात अन्य सर्व पिकाऐवजी पूर्ण भारतभर काकडीचेच पीक घेतले तर काय होईल? मग एवढी काकडी कोण विकत घेणार? एवढ्या काकडीचे करणार तरी काय? आणि मग आयुष्यभर भात-पोळी ऐवजी सारेच नुसतीच काकडी व ढोबळी मिर्ची खाणार काय? शिवाय या आदर्शाचे अनुकरण करायचे म्हणून किंवा भरमसाठ नफ़ा मिळतो असे गृहित धरून देशभरात काकडी व ढोबळी मिर्चीची लागवड झाली तर मग भाव तरी मिळतील का? की समुद्रात नेऊन फ़ेकून द्यावी लागेल? मागणी पुरवठ्याचा सिद्धांताला असली आदर्शाची भाषा तरी कळते काय?
कसला आदर्श नी कसलं काय!
माझा आक्षेप बातमीला नाही फ़क्त आदर्श या शब्दाला आहे.

- गंगाधर मुटे
------------------------------------------------------------------------------
http://abpmajha.abplive.in/maharashtra/2015/01/03/article467214.ece/Mang...
या लिंकवर मी माझा प्रतिसाद/आक्षेप सुद्धा नोंदवला आहे. कुणी उत्तरे सुद्धा देत नाही.

गंगाधरराव,

नुकतंच मुंबईत इंडियन सायन्स काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्यात बृजमोहन मिश्र यांनी सुमारे निम्मे भारतीय शेतकरी आजूनही सावकारी कर्जच उचलतात असं सांगितलं. पण कोणत्याही वृत्तपत्राला ही महत्त्वाची बातमी द्यावीशी वाटली नाही. इथे थोडे दुवे देतो :

१. मूळ बातमी दैनिक सनातन प्रभात : भारतातील ४८ टक्के शेतकरी सावकारांच्या कर्जावर अवलंबून !

२. मूळ बातमी लोकसत्ता : ४८ टक्के शेतकरी सावकारी पाशातच!

३. महाराष्ट्र टाईम्स : आदिवासींसाठी विज्ञानाची साथ हवी

४. महाराष्ट्र टाईम्स : दुष्काळमुक्तीसाठी हवे योगदान

५. दैनिक लोकमत : समारोपातही भारतीय पुराणांची भलामण

६. महान्यूज (सरकारी प्रसारण) : कृषी क्षेत्रातील आमूलाग्र बदलासाठी संशोधकांनी योगदान द्यावे- मुख्य सचिव

असो.

कोणाची काय प्राधान्ये आहेत ते ठळकपणे दिसतं, नाहीका? असा घेतला शोध.

आ.न.,
-गा.पै.

मुटे आपल्याला डोक्यात राख घालून घ्यायची वाईट सवय आहे. अहो, अमकी तमकी शेती करून काहीतरी चांगले करून दाखवले तर लगेच महाराष्ट्रातील सगळ्या शेतकर्‍यांनी काकड्या आणि ढोबळी मिरची शेतात लावून शेतीचा बट्ट्याबोळ केला आहे असली भलतीसलती स्वप्ने का दिसू लागतात? एक वेगळे आणि चांगले काहीतरी करून दाखवले तसे इतर शेतकर्यांनीही काहीतरी वेगळे आणि चांगले करायचा विचार करावा असा हा आदर्श. निव्वळ काकड्या व मिरच्या लावायचा आदर्श नव्हे. मला खात्री आहे की शेतकर्‍याला इतके अर्थशास्त्र नक्कीच कळते की तमाम शेतकर्‍यांनी एकच पीक घेतले तर तोट्यात जाईल. पण ह्याचा अर्थ कुणीही काकड्या व ढोबळ्या लावू नये असा दुसरा टोकाचा घ्यायचा का?
एखादा रिक्षावाल्याचा मुलगा जिद्दीने आय ए एस मधे उत्तीर्ण झाला आणि मोठा अधिकारी झाला तर ती एक मोठी बातमी बनते. पण ह्याचा अर्थ असा घ्यायचा का की सगळ्या गरीब मुलांनी आय ए एस मधे शिरा? मग रिक्षा कोण चालवणार? डॉक्टर कोण बनणार? सुतार, न्हावी, गवंडी, लोहार कोण बनणार? आणि मग रडगाणे गात रहायचे?
तुमची प्रतिक्रिया ह्या धरतीची आहे. असो.

अभय आर्वीकर म्हणजेच गंगाधर मुटे का? हा सेम लेख मिसळपाव वर आहे आणि तिथे एकांनी त्या लेखावर आपले विचार मांडले आहेत जे मला आवडले म्हणून इथे त्या लेखाचा दुवा देत आहे. ही एक वेगळी विचारसरणी आहे, कितपत व्यवहार्य आहे हा भाग वेगळा पण निश्चित अधिक शाश्वत विकासाच्या मार्गाने जाणारी वाटली. http://www.misalpav.com/node/29961

@साधनाजी,
मी पुल, गदिमा, कुसुमाग्रज, कानेटकर, फडके, अत्रे, खांडेकर, सुशि, बाबा कदम, द मा मिरासदार, बेफिकिर, विशाल कुलकर्णी, कौतुक शिरोडकर यांचे बद्दल बोलत नाहीय. यांनी शेतकरी समाजाला सल्ले देणारी शिबीरे कुठे भरवली? यांनी कधी त्यांचे लेखन म्हणजे शेतकरी समाजाच्या विकासाचे जिर्णोद्धार आहे, असा कधी दावा केलाय?

मी त्यांचे बद्दल बोलतोय ज्यांनी स्वतःला शेतीचा आवाका समजल्याचा आव आणून लेखन केले आहे. हा लेख सुद्धा स्पष्टपणे त्यांचेकडेच अंगुली निर्देश करतेय.

@लिंबुटिंबुजी, सहमत

@ या धाग्यावर मी फक्त लेखाशी संबंधितच लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुढचे मुद्दे टाळत आहे.

- रामदेवबाबा स्वत: योग करून दाखवतात.
- विशेषज्ञ डॉक्टर विद्यार्थ्यांना स्वत: ऑपरेशन करून दाखवतो.
- प्रशिक्षणार्थी वाहनचालकांना प्रशिक्षक स्वत: वाहन चालवून दाखवतो.
- अभियंत्याला स्वत: आराखडा तयार करावा लागतो, साईटवर प्रत्यक्ष जावून आखणी करावी लागते, स्वत:च्या हाताने मोजमाप करावे लागते. नंतरच तो विशेषज्ञ अभियंता बनतो आणि इतरांना प्रशिक्षण आणि सल्ला देतो.
- प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याला हजामत कशी करावी लागते, हे प्रत्यक्ष हजामत करून शिकविले जाते.

उंटावरचे शहाणे शेतकीतज्ज्ञ सल्ला देण्यापूर्वी किंवा सल्ला देताना असे काहीही करत नाहीत, असा माझा मुद्दा आहे.

@ केदार, सरस्वतीची बरीचशी लेकरं सुद्धा उंटावरचे शहाणेच आहेत हो!

@ गामा_पैलवान_५७४३२जी, ती बातमी वाचली. मी हाच मुद्दा वारंवार उचलून धरत असतो. शेतकरी मिळेल ते ज्ञान शिकण्याचाच प्रयत्न करत असतो. त्याला योग्य वाटले तर तो त्यासाठी कितीही कष्ट उपसायला तयार असतो.
मात्र भाकड तज्ज्ञांचे सल्ले घरपोच मिळण्याची व्यवस्था झाली तरी मात्र तो ते ऐकायला अजिबात तयार नसतो.
त्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही.

@चक्रम
निसर्गशेतीमध्ये बैल व नांगरच वापरायचा नसेल तर निसर्ग शेतीवाल्याना बैलांची नांगराशी जोड कशी करावी ते माहित असण्याची गरजच नाही. पण प्रत्यक्ष निसर्गशेती कशी करावी, हे माहित असायला पाहिजे की नाही?

निसर्गशेतीचा सल्ला देनार्‍यांनी जर निसर्गशेती करुन न दाखवताच नुसता बोलघेवडे पणा केला तर तो आक्षेपार्ह ठरतो, असा माझा मुद्दा आहे.
एवढ्या मोठ्या भारत देशात निसर्गशेती करून समृद्ध झालेली दहा-वीस गावे तरी त्यांनी दाखवून द्यावीत ना? ही माझी अपेक्षा रास्त नाही का? बीटी तंत्रज्ञान आलं तर कुणीही शिबीरे भरवली नाही, फुकटचा सल्ला दिला नाही तरीसुद्धा बीटीची लागवड करणारी लाखो गावे मी दाखवू शकतो.

Pages