उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?

Submitted by अभय आर्वीकर on 31 December, 2014 - 13:22

उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?

              शेती हा विषयच मोठा विचित्र आहे. या विषयात जितके खोलवर अध्ययन करत जावे तितके गुंते वाढत जातात. एक गुंता सोडवायला बघावं तर तो गुंता सुटायच्या आतच नवे दहा गुंते निर्माण व्हायला लागतात. शेतीच्या उभारणीत साहित्यविश्वाचे काय योगदान असेल याचा आज थोडासा अंदाज घ्यायला निघालो तर चिंतनाची गाडी पहिल्याच पायरीवर अडखळली. शेतीची दहापट अधोगती घडवून एकपट प्रगती झाल्याचं आज जे ठसठशीतपणे जाणवत आहे त्याला बर्‍यापैकी शेतीशी संबंधीत साहित्यविश्व आणि एकंदरीतच सृजनशीलतेची अपरिपक्व मोघमता कारणीभूत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि शरद जोशी यांच्याखेरीज शेतीविषयाची नाडच कुणाला कळली नाही. रोगाचे योग्य निदान न करताच केले जाणारे औषधोपचार जसे रोग्याच्या जिवावर उठतात, कधीकधी चुकीच्या उपचारपद्धतीने जसा रोगी दगावतो अगदी तसेच शेतीमध्ये घडले आहे. शेतीच्या अधोगतीचे कारणच न कळल्याने साहित्यिकांनी जरी शुद्ध भावनेने शेतीच्या उन्नतीसाठी साहित्य निर्माण केले असले तरी ते काही तुरळक अपवाद सोडले तर अन्य साहित्यिकांचे शेतीविषयक किंवा शेतीसंबंधित साहित्य हे शेतीसाठी तारक कमी आणि मारकच जास्त ठरले आहे.

              महात्मा ज्योतिबा फुले, शरद जोशी आणि काही तुरळक अपवाद वगळता शेतीविषयाला लाभलेले साहित्यिक, लेखक आणि शेतकीतज्ज्ञच मुळात उंटावरून शेळ्या हाकलणारे असल्याने ते शेती विषयाला न्याय देऊ शकलेले नाहीत, हे विधान मी अत्यंत जबाबदारी आणि सर्वांचा रोष पत्करण्याची मानसिक तयारी ठेवून करत आहे. शेती हा एकमेव विषय असा झाला आहे की, उठसूठ जो-तो स्वतःच्या पात्रतेचा अथवा आवाक्याचा विचार न करताच शेतीविषयक सल्ला द्यायला उतावीळ असतो. शेती विषयाचे आपल्याला प्रचंड ज्ञान आहे आणि त्यावर आपले मतप्रदर्शन करण्याचा जन्मसिद्धच अधिकार आहे, अशाच आविर्भावात प्रत्येक मनुष्य वावरत असतो. शेती हा कदाचित एकमेव विषय असेल जेथे सल्ला ऐकणार्‍यांची संख्या नगण्य आणि सल्ला देणार्‍यांची संख्या प्रचंड आहे.

              एखाद्या रोगाची साथ आली तर जो-तो उठसूठ आपापले उपचारविषयक ज्ञान पाजळत फिरत नाही. आरोग्य शास्त्रातले तज्ज्ञ बोलतात आणि बाकीचे ऐकतात. कायदेविषयक गुंता असेल तर कायदेविषयक तज्ज्ञ बोलतात आणि बाकीचे ऐकतात. व्यापारामध्ये यशस्वी व्यापार्‍याचा शब्द प्रमाण मानला जातो. मात्र शेतीमध्ये अगदीच उलट आहे. शेतीमध्ये यशस्वी असलेल्या शेतकर्‍याला मूर्ख, अज्ञानी असे गृहीत धरून ज्याने कधीच शेती केली नाही, केली असेल तर निव्वळ शेतीच्या भरवशावर निदान सुपरक्लासवन अधिकार्‍याच्या तोडीचे जीवनमान उंचावून दाखवता आले नाही किंवा ज्याला भुईमुगाला शेंगा कुठे लागतात हे सुद्धा माहीत नसते तो सुद्धा स्वतःला शेतकीतज्ज्ञ समजून शेतकर्‍याचे प्रबोधन करायला अत्यंत उतावीळ असतो.

              पण खरी मेख त्याही पुढे आहे. विशेषज्ञ डॉक्टरचा पेशा डॉक्टरकीच असतो. नामवंत कायदेतज्ज्ञाचा पेशा कायदेविषयाशीच संबंधीत असतो. शिक्षणतज्ज्ञ हा शिक्षणक्षेत्रातील वाटसरू असतो. किर्तन-पारायण करणारे तर प्रत्यक्ष संत बनून संतत्वाला साजेसे वर्तन करण्याचा प्रयत्न करतात. तद्वतच या सर्वांच्या उपजीविकेचे साधनसुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधितच असते. त्याच प्रमाणे या विषयातील साहित्यनिर्मिती करणारे, मार्गदर्शन करणारे अथवा उदबोधन करणारे त्या-त्या विषयातीलच कर्मयोगी असतात. ट्रकचा वाहनचालक आरोग्यशास्त्राशी संबंधीत पुस्तक लिहीत नाही. ढोलकीवादक कायदेविषयक पुस्तक लिहीत नाही, एखादी नृत्यांगना विद्यापीठाचा अभ्यासक्रम ठरवत नाही किंवा मासोळ्या विकून पोट भरणारा किर्तन करत नाही. शेती वगळता अन्य सर्व विषयामध्ये "आधी स्वतः करून दाखवले मग सांगितले" हेच सूत्र असताना शेतीत मात्र अगदी विपरित घडत असते.

              विशेषज्ञ मास्तर उंटावरून शेळ्या हाकत नाही; हाती खडू घेऊन फळ्यावर लिहून दाखवतो. विशेषज्ञ डॉक्टर उंटावरून शेळ्या हाकत नाही; हाती कात्री घेऊन शस्त्रक्रिया करून दाखवतो, विशेषज्ञ वकील उंटावरून शेळ्या हाकत नाही; स्वतः न्यायाधीशासमोर बाजू मांडतो, विशेषज्ञ उद्योजक आपल्या उद्योगात प्रत्यक्ष सहभागी असतो. शेतीविषयात मात्र नेमके याच्या उलट घडत असते. शेती हा विषयच मोठा विचित्र आहे, इथे प्रत्यक्ष शेती कसणारा शेतकरी सोडून अन्य व्यवसायावर किंवा आयत्या शासकीय अनुदानावर उपजीविका करणारेच शेतकी तज्ज्ञ होतात. शेतीवर ज्याची उपजीविका अवलंबून नाही तो शेती साहित्याची निर्मिती करतो. ज्याला शेती करून स्वतःचे पोट जगवण्यात कधीच यश आले नाही तो "शेतीविषयक मार्गदर्शन’’ शिबिरात मार्गदर्शक म्हणून लांबलचक भाषण ठोकून देतो आणि मानधनाच्या स्वरूपात अर्थार्जन करून स्वतःचे पोट भरणारा इतरांना निसर्गशेतीचे सल्ले देत फिरतो. शेतकी तज्ज्ञ किंवा शेतकीविषयावर लिहिणारा साहित्यिक आपल्या हातात नांगर धरत नाही, विळा हातात घेऊन खुरपणी करत नाही, पाठीवर फवारा घेऊन फ़वारणी करत नाही. विशेषज्ञ डॉक्टर डॉक्टरकी करून जगत असतो, विशेषज्ञ वकील वकिली करून जगत असतो. विशेषज्ञ उद्योजक उद्योग करून जगत असतो त्याच न्यायाने स्वतः गहू, धान, बाजरी, दाळी, कापूस, सोयाबीन, कांदा यापैकी एखाद्या पिकाची शेती करून, त्याच शेतीवर आपला उदरनिर्वाह करून आणि इतर सर्व शेतकर्‍यांपेक्षा अधिक मिळकत मिळवून दाखवणारा शेतकरी तज्ज्ञ या संपूर्ण भारत देशात एकही सापडत नाही. झाडून सारेच्या सारे शेतकीतज्ज्ञ सरकारी पगारावर जगत असतात. त्यामुळे शेतकी तज्ज्ञ आणि शेतीसंबंधित साहित्यिक हे उंटावरचे शहाणेच असतात, असे थेट विधान केले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही. शेतीचे विशेष आणि वास्तविक ज्ञान असल्याशिवाय उच्च प्रतीची आणि वास्तवाचे भान असणारी साहित्यनिर्मिती होऊ शकत नाही. हे आज ना उद्या, उद्या ना परवा, कधी ना कधीतरी सर्वांना मान्य करावेच लागेल आणि तो दिवस उजाडेपर्यंत शेतीला चांगले दिवस येण्याची हातावर हात ठेऊन प्रतिक्षा करत बसावे लागेल.

              शेतीला केंद्रस्थानी ठेऊन विचार केला तर साहित्यविश्व परिपूर्ण नाही, हे विधान करताना मला अजिबात संकोच वाटत नाही. शेतीव्यवसायाचा सर्वांगीण विचार करणारे साहित्यच लिहिले गेलेले नाही. समजा एखाद्या नवतरुणाला नव्याने शेती करायची असेल तर त्याला सर्वंकश मार्गदर्शन करू शकेल किंवा शेती करताना त्याला साहित्याचा आधार घेऊन दमदारपणे वाटचाल करता येईल असे साहित्य उपलब्ध नाही. ज्या साहित्याचा शेतीच्या व्यावहारिक पातळीवर उपयोग नाही असे साहित्य मात्र साहित्य विपुल प्रमाणात लिहिले गेले आहे. शेती करायची असेल तर मशागत कशी करावी, कष्ट कसे करावे, आधीच गळत असलेला घाम आणखी कसा गाळावा, बियाणे कोणते वापरावे, फ़वारणी कोणती करावी एवढेच नव्हे तर राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज काढून आणखी कर्जबाजारी कसे व्हावे, याविषयी मार्गदर्शन करणारी, दिशानिर्देश देणारी पुस्तके रद्दीच्या भावात घाऊकपणे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत; मात्र बँकेकडून कर्ज काढून बियाणे घेऊन ते मातीत पेरल्यानंतर, खते जमिनीत ओतल्यानंतर, कीटकनाशके फवारून हवेत गमावल्यानंतर जर अतिपावसाने किंवा कमी पावसाने शेतातील उभे पीक नेस्तनाबूत झाले आणि बँकेतून कर्जरुपाने आणलेले पैसे जर मातीत गेले, पाण्यात गेले किंवा हवेत गेले तर मग बँकेचे कर्ज फेडायला पैसे कुठून आणायचे याचे उत्तर देणारे एकही पुस्तक शेतकी तज्ज्ञांना आणि सरस्वतीच्या लेकरांना आजतागायत लिहिता आलेले नाही. शेतमालाचा उत्पादनखर्च कसा काढावा, कोणत्या पिकाचा उपादनखर्च किती येतो, कोणते पीक घेतले तर खर्च वजा जाता कीती रक्कम शिल्लक असू शकते याचा शास्त्रशुद्ध ताळेबंद उपलब्ध करून देणारे एकही पुस्तक आज उपलब्ध नाही.

              शेती वगळता अन्य कोणताही व्यवसाय केला आणि व्यवसायावर जर कोणत्या कारणाने विपत्ती आली आणि मुद्दलसुद्धा नष्ट झाले तर विमाकंपनी कडून भरपाई मागावी, कोणता, कुठे आणि कसा फ़ॉर्म भरावा याची शिकवण देणारी पुस्तके आहेत. शेतीसाठी मात्र अशी पुस्तके उपलब्ध नाहीत. जर शेती वगळता अन्य कोणताही व्यवसाय कुठल्याही कारणाने पूर्णपणे तोट्यात गेला, दिवाळं निघालं तर त्याला दिवाळखोरी/व्यवसाय आजारी किंवा नादारी घोषित करायचा कायदेशीर मार्ग सांगणारी आणि त्या बिगरशेती व्यावसायिकाला संरक्षण देणारी कायद्याची चिक्कार पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र सर्वांना समान न्यायाचं तत्त्व सांगणारी कायद्याची पुस्तके सुद्धा शेतकर्‍याच्या बाजूने उभी राहायला तयार नाही.

              कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा प्रत्यक्ष शेतीक्षेत्राशी काहीही संबंध उरलेला नाही. साहित्यविश्व व शेतीमधली वास्तविकता यांचा कुठेही ताळमेळ बसत नाही. ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अत्यंत लाजिरवाणेच आहे. साहित्यातून समाजाच्या सामुहिकमनाचे वास्तव प्रतिबिंबित व्हायला हवे; पण मागील काही वर्षाचा साहित्यिक आढावा घेतला तर ते सुद्धा होताना दिसत नाही. गेल्या १५-२० वर्षांमध्ये लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नाही किंवा त्याचे प्रतिबिंब काही साहित्यात उमटलेले नाही. एक खैरलांजी प्रकरण झाले तर त्यावर शेकडो पुस्तके लिहिली गेली. दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून करण्यात आला तर शेकड्यांनी पुस्तके लिहिली जातात, मात्र; लाखो शेतकर्‍यांच्या आत्महत्या दखल घेण्याइतपतही साहित्यक्षेत्राला महत्त्वाच्या वाटत नाही. कारण काय? शेतकरी गरीब असतो म्हणून? की त्याच्याकडे पुस्तके विकत घेण्याची ऐपत नसते म्हणून? या दोन्ही प्रश्नाची उत्तरे ’होय’ अशीच येत असतील व ”खपणार तेच विकणार" हाच सरस्वतीच्या उपासकांचा अंतरस्थ हेतू असेल तर "साहित्य म्हणजे समाजाचा आरसा" ही उक्ती प्रत्यक्षात उतरेलच कशी? शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्र आणि सरस्वतीची लेकरं यांची पात्रता आणि प्रतिभेची उंची अजूनही अत्यंत खुजी आहे, हे स्पष्ट व्हायला पुरेसे आहे.

              शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे शरद जोशींचे लेखन वगळता काहीही अन्य लेखन साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही, ही उणीव साहित्यक्षेत्रात राहिलेली आहे, हे सत्य आहे. शेतीच्या दुर्दशेचे कारण सांगताना शेतकरी आळशी आहे, त्याला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करता येत नाही, तो अज्ञानी आहे, तो व्यसनाधीन आहे अशा कांगावखोर आणि शास्त्रशुद्ध अर्थवादाचा लवलेश नसलेल्या लेखनापलीकडे साहित्याच्या महामेरूंना काही लिहिताच आलेले नाही. योग्य कारणाचा वेध घेऊन अभ्यासपूर्ण लेखन करण्यात साहित्यक्षेत्राने कुचराई केली ही पहिली चूक आणि जे लिहिले ते निखालस खोटे, अशास्त्रीय लिहिले ही दुसरी चूक.

असे गैर ती आत्महत्या कधीही, म्हणे कास्तकारास समजावुनी
परी कारणांचा जरा शोध घ्यावा, अशी सुज्ञता दाखवेना कुणी

              शेतीला भाकड शेतकीतज्ज्ञांचा आणि शेती साहित्यिकांचा शून्य उपयोग आहे. कारण ह्या साहित्यिकांचे, लेखकांचे लेखन आणि मार्गदर्शन फ़ारतर विषाच्या बाटलीपर्यंत किंवा गळफ़ासाच्या दोरापर्यंत शेतकर्‍यांना पोहचवून देऊ शकते. शेतकर्‍यांच्या मुक्तीची गुरुकिल्ली यांनाच अजून गवसलेली नाही मग या मंडळींचे लेखन शेतकर्‍यांना मुक्तीचा मार्ग कसा दाखवू शकेल? तरीही शेतकर्‍यांना फुकटाचा नको तो सल्ला देणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एक उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना उच्च तंत्रज्ञान वापरायला सांगतो, दुसरा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना निसर्गशेती करायला सांगतो, तिसरा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना जोडधंदे करायला सांगतो, चवथा उंटावरचा शहाणा शेतकर्‍यांना मार्केटिंग कशी करावी हे शिकवू पाहतो. त्यामुळे शेतकरी गोंधळतो एवढेच नव्हे तर या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे सल्ले तद्दन फालतू, फडतूस आणि अव्यवहार्य असल्याने शेतकर्‍यांनी ते वापरायचा प्रयत्न केल्यास त्यांची शेती आणखी घाट्यांत जाते. त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्‍या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे जेणेकरून निदान तोंड तरी बंद होईल. शेतकरी मरत असेल तर मरू द्या पण उंटावरच्या शहाण्यांनो प्रथम तुमचे तोंड आवरा, तुमच्या लेखण्या थांबवा. शेतकर्‍यांसाठी तुम्ही काहीच करण्याची गरज नाही. फक्त शेतकरी देशोधडीस लागावा म्हणून शासकीय पातळीवरून होणार्‍या कटकारस्थास तुम्ही जो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावता आहात, तेवढा बंद करा. शेतकरी स्वतःचे स्वतःच बघून घेईल. तुम्ही काहीच करण्याची गरज नाही फक्त शेतकर्‍यांच्या छातीवरून उठा. तुम्ही छातीवरून उठलात तर शेतकरी स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्यास समर्थ आहे. त्याला तुमच्या भाकड सल्ल्याची आवश्यकता तर नाहीच नाही.

               आता काही मिनिटातच वर्षे २०१४ मावळणार आहे आणि नवे वर्ष येणार आहे. हे नववर्षा! जुने जाऊदे मरणालागुनी....... बळीराजासाठी काहीतरी नवीन घेऊन येरे बाबा!!

                                                                                                                - गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

M.Sc./B.Sc. Agriculture च्या अभ्यासक्रमात कोणती पुस्तके असतात? तुम्हाला कोणत्या प्रकारचे साहित्य अपेक्षित आहे? I'm sure there is some technical know how published in the field. What experience teaches can never translate into books. And that's true in any field.

कृषीविषयक अभ्यासक्रम आणि साहीत्य यात गल्लत होतेय का ?

मुटेसर
आपला लेख वाचला. तुमचा रोख साहीत्यावर आहे असं जाणवलं.
तुम्हाला साहीत्य म्हणायचंय की माहीतीपुस्तिका ? कारण साहीत्य वाचून कुणी शेती करेल असं वाटत नाही.

शेतीविषयक तज्ञ किंवा स्वतः प्रगतीशील शेतकरी असलेले डॉ. बुधाजीराव मुळीक, कै. अप्पासाहेब पवार आणि आणखीही काही शेतकरी आहेत ज्यांच्या शब्दाला मान आहे, अशा लोकांनी शेतीविषयक पुस्तके लिहीली असतील तर त्याबद्दल जागृती नाही का करता येणार ?

उंटावरचे शहाणे सल्ला देतात पण स्वत: शेती करून त्याचे आर्थिक धोके अनुभवतात का ?असा मुद्दा आहे का ?साहित्य वाङमय त्या हालापेष्टांची नोंद करत नाही ?

नववर्षाच्या शुभेच्छा..

तुम्हाला असे म्हणायचे आहे का की...
ज्यात शेतकर्‍याच्या आयुष्याचे खरे प्रतिबिंब दिसेल असे (एखाद्या शेतकरी समाजातील ते जीवन जगलेल्या किंवा त्याची जाण अस्लेल्या माणसाने) लिहिलेले दर्जेदार साहित्य झाले नाही. किंवा कोणी Established साहित्यीकाने शेतकर्‍यांना जवळच्या अशा विषयांना हात घातला नाही (उदा. शेतकर्‍यांच्या आत्महत्या इ.)
पण तुम्ही अशा शेतीशी स्वतः संबंधित नसलेल्यांनी समजा काही लिहिले तर त्याना "उंटावरचे शहाणे" ही म्हणता..
तुम्हाला नक्की कुठल्या तर्‍हेचे साहित्य अपेक्षित आहे.. आणि ते कोणाकडुन अपेक्षित आहे? आणि असे साहित्य (मी ललित साहित्याबद्दल बोलत आहे.. शेतीच्या माहितीपुस्तिकेबद्दल नाही) अट्टाहासाने लिहिले जावे/जाते का?

(तुम्ही वर बरेच मुद्दे लिहिले आहेत. क्षमस्व पण मला नीट कळला नाही तुमचा रोष नक्की कोणावर आहे ते)

ह्म्म..

मलाही कळले नाही नक्की काय म्हणायचेय ते. साहित्यिक म्हणजे साधारणतः कथा, कादंबरी, ललित, कविता इ. लिहिणारे लोक. त्यांनी शेतीवर लिहिले नाही म्हणुन शेतीचे नुकसान झाले की इथे लेखकाला साहित्यिक म्हणजे अ‍ॅग्रोवन सारख्या पेपरात लिहिणारी मंडळी आणि त्या मंडळींनी अनुभवाविना लिहिलेले साहित्य जे चुकीचे आहे आणि त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होतेय असे म्हणायचेय?

एवढ्या अगडबंब लेखात लेखकाला अभिप्रेत असलेल्या साहित्यिक आणि त्यांच्या साहित्याची पाचदहा उदाहरणे दिली असती तर लेखक सोडून इतर लोकांनाही लेखकाला काय म्हणायचे आहे याचे आकलन झाले असते.

अजुनही अशी उदाहरणे लेखात घालता येतील. तेव्हा ती घालणे ही नम्र विनंती.

त्यामुळे या चारही प्रकारच्या उंटावरच्या शहाण्यांचे पहिले तोंड बंद केले पाहिजे. बर्‍या बोलाने ऐकत नसेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे जेणेकरून निदान तोंड तरी बंद होईल.

वर लिहिलेली उदाहरणे मिळाली तर हे काम अगदी उत्साहाने करण्यात येईल. माबोवर तशीही उत्साही मंडळी भरपुर आहेत आणि समाजात त्यांना हवा असलेला दंगा करण्यास काहीच वाव मिळत नसल्याने ती मंडळी इथेच एकमेकांशी शाब्दिक दंगा करण्यात गुंतलेली आहेत. उंटावरचे शहाणे कोण हे नावानिशी कळाले तर इथली मंडळी नक्कीच या सत्कार्याला हातभार लावतील. Happy

@काऊजी, धन्यवाद.

@जिज्ञासाजी, माझ्या मनाप्रमाणे इतरांनी केले पाहिजे, अशी माझी येरागबाळी अपेक्षा नाहीये. पण शेती क्षेत्रात, शेतकी साहित्यात, शेतकी सल्ल्यात जे चाललेय ते नक्कीच विचित्र आहे.

@वीणाजी सुरू, कृषीविषयक अभ्यासक्रम, साहीत्य, अवातंर शेतकी मुद्रीत मार्गदर्शपर लेखन आणि तोंडी/प्रसारमाध्यमातून दिले जाणारे सल्ले आणि सल्लागार हे सर्वच यादृष्टीने एकाच वर्गवारीत मोडणारे आहे.

डॉ. बुधाजीराव मुळीक, कै. अप्पासाहेब पवार यांनी स्वतः कधी उंटावरचा शाहाणपणा केलेला नाही. माझा रोख उंटावरच्या शहाण्यांकडे आहे.

@Srdजी, @mansmi18जी,
- रामदेवबाबा स्वत: योग करून दाखवतात.
- विशेषज्ञ डॉक्टर विद्यार्थ्यांना स्वत: ऑपरेशन करून दाखवतो.
- प्रशिक्षणार्थी वाहनचालकांना प्रशिक्षक स्वत: वाहन चालवून दाखवतो.
- अभियंत्याला स्वत: आराखडा तयार करावा लागतो, साईटवर प्रत्यक्ष जावून आखणी करावी लागते, स्वत:च्या हाताने मोजमाप करावे लागते. नंतरच तो विशेषज्ञ अभियंता बनतो आणि इतरांना प्रशिक्षण आणि सल्ला देतो.
- प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याला हजामत कशी करावी लागते, हे प्रत्यक्ष हजामत करून शिकविले जाते.
उंटावरचे शहाणे शेतकीतज्ज्ञ सल्ला देण्यापूर्वी किंवा सल्ला देताना असे काहीही करत नाहीत.

माझा कुणावरही व्यक्तिगत रोख/रोष नाही. एकूनच प्रवाहाबद्दल आहे.

@साधनाजी, उंटावरच्या शहाण्यांचे तोंड बंद करण्यासाठी मी माबोकरांना सुपारी वगैरे देणार नाही. Wink पण माबोवर तशीही उत्साही मंडळी भरपुर असेल आणि समाजात त्यांना हवा असलेला दंगा करण्यास काहीच वाव मिळत नसल्याने ती मंडळी इथेच एकमेकांशी शाब्दिक दंगा करण्यात गुंतलेली असेल तर उंटावरचे शहाणे कोण हे त्यांनीच शोधावे म्हणजे त्यांना आणखी काम मिळेल. आणि या सत्कार्याला हातभार लावावा. Happy
आणि हो, शेतीक्षेत्रात केवळ उंटावरचे शहाणेच नाही तर "उंटावरच्या शहाण्या" सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्हीही आत्तापासून काय कवायद, सराव वगैरे म्हणतात ना, ते करायला लागा. Happy Proud

गंगाधरराव,

तुम्ही काय म्हणताय ते थोडंथोडं ध्यानी येतंय. पण उदाहरणं हवीत.

इथे इंग्लंडमध्ये लोकं शेती करायला फारशी उत्सुक नाहीत. शासन नवीन शेतकऱ्यांना उत्तेजन देतं. मी राहतो त्या ब्रायटन शहरापासून जवळच सॅडल्सकूम फार्म आहे. गेल्या वर्षी कमिला आणि रॉली हे जोडपं शेती करायला आलं. त्यांनी प्रथम २००९ मध्ये ऑक्सफर्डच्या जवळ एका ठिकाणी पहिली शेती करून अनुभव घेतला.

जरी त्यांच्या कुटुंबांस शेतीची पार्श्वभूमी असली तरी ते दोघे कचेरीत काम करणारे नोकरदार होते. पहिल्या शेतीसाठी सरकारी योजनांचं सहाय्य घेतलं. शेती आणि पशुपालनाचा जराही अनुभव नसतांना त्यांनी केवळ जिद्द आणि शारामांच्या जोरावर आपलं स्वप्न पुरं केलं. त्यांना सर्वांगीण मार्गदर्शनाच्या रूपात मदत मिळाली असणार हे उघड आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेची भारतात कल्पनाही करता येणार नाही.

या प्रकारचा भारतातील अनुभव कसा आहे त्याची उदाहरणं दिलीत तर विषय अधिक चांगला समजेल. Happy

आ.न.,
-गा.पै.

गापै,
उदाहरणाचेी गरजच नाहीय. सार्वत्रिक चित्र आहे हे. दुसर्‍या भाषेत असेही म्हणता येईल की की,

ज्याला अन्य कुठलाही पर्याय उपलब्ध नाही तो नाईलाजाने शेती करतो आणि ज्याला शेतीतलं काहीच कळतं नाही तो शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतो. Happy

फारच विचित्र आहे हो!

गंगाधारराव,

>> उदाहरणाचेी गरजच नाहीय. सार्वत्रिक चित्र आहे हे.

उदाहरणांची गरज आहे. कारण मला शेतीतलं काहीही कळंत नाही. एखाद्या उंटावरच्या शहाण्याचा लेख चर्चेला घ्या आणि त्यातला विपर्यास प्रत्यक्ष उलगडून दाखवा. Happy

आ.न.,
-गा.पै.

अभय आर्वीकर,

तुम्ही स्वतः शेतकरी असल्याने तुम्हाला शेतीसाहित्यातल्या चुका कळत असतील. पण माबोकर जे शेतकरी नाहीत त्यांना कशा काय क़ळाव्यात या चुका? आणि जर या चुका आहेत हेच माहित नाही तर मग त्यांनी कसे ओळखावेत हे उंटावरचे शहाणे?

तुमची कळकळ दिसतेय पण तुम्ही ज्याकडे निर्देश करताहात ते शेतीशी संबंधीत नसलेल्या इतरांनी कसे ओळखायचे?

तुम्हाला जे सांगायचेय ते तुम्ही थेट सांगितले तर काहीतरी उलगडा होईल. इथे मुदलात तुम्ही कोणाला साहित्यिक म्हणताय त्याचाच पत्ता लागत नाहीय तर त्यातले बरेवाईट कसे ओळखणार?

एखाद्या उंटावरच्या शहाण्याचा लेख चर्चेला घ्या आणि त्यातला विपर्यास प्रत्यक्ष उलगडून दाखवा.

सहमत. असा एखादा प्रयत्न केल्यास बरे होईल.

@गापै, @साधना

लेखात माझा रोख व्यक्तिगत नसून समूह/व्यवस्था/यंत्रणा असा आहे. त्यामुळे एखाद्याला व्यक्तिगत पातळीवर झोडपून काढण्यात काहीच उप्योग नाही. विषयाची व्यप्ती फार मोठी असल्याने प्रतिसादात लिहिताना मर्यादा सुद्धा येतात.

सर्वात मोठ पुस्तक म्हणजे देशाचे संविधान ना? तिथेपण शेतीला न्याय दिला गेलेला नाही. कशाकशाची चर्चा करायची आणि कशाकशाला, कुणाकुणाला उत्तरे द्यायची?

उत्तरे देण्यासाठी मी लेख लिहितो आणि पुन्हा नवनवे प्रश्न तयार होतात.

काही वर्षापूर्वी मी "श्याम्याची बिमारी' या लेखात एक उदाहरण दिले होते;
----------
ना. धो. महानोरांची "या नभाने भुईला दान द्यावे" ही कविता तर सर्वांची आवडती कविता. उत्तुंग लोकप्रियता लाभलेली पण श्याम्याला नाहीच आवडत.
तो समर्थनार्थ जे पुरावे सादर करतो तेही जगावेगळे.
त्याच्या मते नभाने भुईला नेहमीच दान दिलेले आहे. आणि भुईला दिलेल्या दानावर नभ अजूनही ठाम व प्रामाणिक आहे म्हणून तर ही सजीवसृष्टी टिकून आहे. देशाची लोकसंख्या चमत्कारिक गतीने वाढत असतानाही सर्वांना पोटभरून खायला पुरेल आणि सडायलाही शिल्लक साठा उरेल एवढे मुबलक अन्नधान्य या देशात पिकते. नभाचे दान आहे म्हणूनच असे घडते ना?
मग अतिरिक्त दानाची मागणी करणे याचा अर्थ मातीतून अधिक भरघोस उत्पन्न निघावे अशी अपेक्षा असणार. मग समजा नभाने या अतिरिक्त दानाची आराधना स्वीकारली, भरमसाठ उत्पादन आले आणि जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे, सूर्य आणि चंद्र जरी जखडलेत तरी त्याने काय घडणार आहे, असा श्याम्याचा सवाल आहे. कवीने ज्या शेतकरी समाजाच्या भल्यासाठी हे अतिरिक्त दान मागितले, त्या शेतकर्‍याच्या पदरात काय पडणार आहे? हाच लाखमोलाचा प्रश्न आहे, असे त्याला वाटते. शेतीमध्ये जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे, सूर्य आणि चंद्र जखडायला लागल्याबरोबर प्रचलित व्यवस्थेनुसार कोणतेही सरकार चांदणे, सूर्य आणि चंद्राकडे "शेतमाल" याच दृष्टिकोनातून बघणार, अतिरिक्त उत्पादन येऊनही "ग्राहकासाठी शेतमाल स्वस्तात उपलब्ध झाला पाहिजे" या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने निर्यातबंदी लादणार आणि या सूर्य, चंद्र तार्‍यांना "कांदाभजी किंवा आलुबोंडा" यापेक्षा जास्त भाव मिळणार नाही याची पुरेपूर व्यवस्था करणार. कदाचित शासन रेशनकार्डावर अनुदानित किंमतींत सूर्य, चंद्र तारे उपलब्ध करून देईल. त्यामुळे गल्लोगल्लीत, कचरापेटीत व नालीच्या प्रवाहात सूर्य, चंद्र, तारकांचे ढिगारे साचलेले दिसतील. त्यामुळे मुबलक पिकण्याचे आणि जोंधळ्याच्या ताटाला कणसांऐवजी चांदणे, सूर्य आणि चंद्र लागण्याचे कवीचे स्वप्न साकार होईल.
पण ज्या शेतकर्‍यांसाठी हिरिरीने एवढे मोठे दान मागितले त्याच्या पदरात काय पडणार आहे? शेतात सूर्य, चंद्र, तारे पिकवूनही ते जर मातीमोल भावानेच खपणार असेल तर त्याची दरिद्री आहे तशीच राहणार आहे, सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. त्या ऐवजी कवीने "या नभाने सरकारला अक्कलदान द्यावे, विजेच्या लखलखाटाने सरकारचे डोके ठिकाणावर यावे, जेणेकरून शेतकर्‍यांच्या दारापर्यंत विकाससूर्य पोहचेल" अशी मागणी करणे जास्त संयुक्तिक नसते का ठरले? त्यातल्या त्यात कवी बिगर शेतकरी असता तर श्याम्याची अजिबात हरकत नव्हती. पण कवी दस्तूरखुद्द शेतकरी असल्याने ही बाब जास्तच गंभीर आहे, असे त्याला वाटते. आणि असे त्याला वाटले की तो डाव्याहातचे पुस्तक तो उजव्या हातात घेतो आणि फेकून देतो.
-----------
हे उदाहरण या लेखाच्या अनुषंगाने चपखल नाही, हे मान्य. पण निमित्ताने एकंदरित शेतीसाहित्याची कल्पना येण्यास मदतगार ठरू शकेल.

@ अभय आर्वीकर
शेतकर्‍यांचा माल जो कवडीमोलाने विकल्या जातो.... तो चांगल्या भावाने विकण्यासाठी तुमच्याकडे काही "Idea" आहे का?...... कारण त्याच्याशिवाय तो सधन होणार नाही.

>>> साहित्य हि एक कला असते, त्या वास्तव उतरतेच असं नाही.
>>> तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? (शेतीला दरवर्षी अनुदान!)

अभय आर्विकर, तुमची कळकळ समजते. कामगार विश्वाबाबात नारायण सुर्व्यांनी जशी साहित्य निर्मिती केली तसे काही शेतीबाबत साहित्यिकांनी केले नाही असे काहिसे तुम्हाला म्हणायचे आहे का? तुम्ही महानोरांच्या कवितेचे उदाहरण दिले आहे. तुम्ही म्हणता तशी कविता लिहिल्याने ती कविता श्याम्याला आपली वाटली असती परंतू तरीही श्याम्याच्या स्थितीत काही फरक पडला असता का हा प्रश्न उरतोच.
भारतीय संविधानाबद्दल बोलायचे तर त्यात कुणासाठी काय कायदे आहेत , तरतुदी आहेत हे बहुसंख्य सामान्य लोकांना माहित नाही. जे माहितच नाही त्याबद्दल योग्य - अयोग्य काय हे ठरवणार कसे आणि दाद मागणार कशी? साधे लग्न करायचे तर ते कुठल्या अ‍ॅक्ट प्रमाणे केल्याने त्याचे काय परीणाम हे घरात चार कझिन्स वकील असून मला माहित नव्हते. परंतू नुसते दोष देवून काय पदरात पडणार आहे? ब्लॉग्ज, ईबुक्स वगैरे माध्यम वापरुन शेतकर्‍यांच्या हितासाठी आणि सामान्य नागरीकांनाही कळावे म्हणून उपयुक्त साहित्य निर्माण करता येइल का? साध्या सोप्या भाषेत माहितीचे संकलन झाले तर ते सगळ्यांनाच उपयोगी येइल. सामान्य नागरीकांना शेतकर्‍यांच्यां कष्टमय आयुष्याची जाणीव आहे, अनुकंपा देखील वाटते पण हळहळण्यापलीकडे काही करु शकत नाही.

मी इथे अमेरीकेत मिडवेस्ट मधे रहाते. मध्यंतरी इथे फार्मबिलामुळे बरेच बदल झाले. हे फार्मबिल काय असणार आहे त्यामुळे काय होइल, काय होणार नाही याबाबत स्थानिक वृत्तपत्रात माहिती देणारा कॉलम येत असे. अ‍ॅग एजुकेटर ही माहिती साध्या इंग्लिशमधे लिहित असल्याने माझ्यासारख्या परसदारी भाज्या लावणार्‍या सामान्य गृहिणीलाही समजत असे. ( हे परक्या देशात स्वतःपुरते भाज्या लावणे वगैरे देखील एज्युकेटर आणि मास्टर गार्डनर्स च्या मोफत सल्ल्यामुळेच शक्य झाले.) बिलाबाबत आपल्या भागातील कॉग्रेस, सेनेटवर निवडून गेलेल्या व्यक्तींना एक नागरीक म्हणून कसा संपर्क करता येइल, गावची मिटिंग कधी असेल वगैरे माहिती देखील दिली गेली. आता बिल पास झाल्यावर पुन्हा मार्गदर्शनपर कॉलम येतो. काय घडत आहे हे सोप्या भाषेत सामान्य नागरीकांना कळते .

>>
ज्याला अन्य कुठलाही पर्याय उपलब्ध नाही तो नाईलाजाने शेती करतो आणि ज्याला शेतीतलं काहीच कळतं नाही तो शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतो
>>
हे बदलणे का शक्य नाही ? नाईलाज म्हणून शेती असा दृष्टीकोन असेल तर प्रश्न कसा सुटणार? नाईलाज म्हणून कुठलाही उद्योग व्यवसाय केला तर तो फायदेशीर होणार नाही. शेतीचा अनुभव आहे अशा लोकांनी एकत्र येवून नॉलेज बॅन्क तयार करणे शक्य आहे का? माझ्या जावयाला शेती करायची आहे पण त्याने चौकशी केली असता त्याला असे कळले की तो शेतकरी नसल्याने त्याला शेती विकत घेता येणार नाही. आता असे असेल तर जे शेती हा व्यवसाय म्हणून मनापासून निवडू इच्छित असुन करता येत नाहीये असे एकीकडे आणि दुसरे काही जमत नाही तेव्हा वडीलोपार्जित शेती नाईलाजाने करणे दुसरी कडे होते.

विशेषज्ञ डॉक्टर उंटावरून शेळ्या हाकत नाही; हाती कात्री घेऊन शस्त्रक्रिया करून दाखवतो, विशेषज्ञ वकील उंटावरून शेळ्या हाकत नाही; स्वतः न्यायाधीशासमोर बाजू मांडतो, विशेषज्ञ उद्योजक आपल्या उद्योगात प्रत्यक्ष सहभागी असतो. शेतीविषयात मात्र नेमके याच्या उलट घडत असते.

>> +१०००. बाकी शेतीतल काहीच कळत नसल्याने काहीच भाष्य करायची कुवत नाही.

@अनंतरंगी,
साहित्य हि एक कला असते,हे मान्य. त्या वास्तव उतरतेच असं नाही. हे सुद्धा मान्य पण साहित्यात जेव्हा विपरित आणि विकृत स्वरुपात चित्रण केले जाते, तेव्हा ती बाब निश्चितच गंभीर बनत असते. कला कलेपुरतीच मर्यादित असावी ना? पण तसे होत नाही. साहित्यिकांकडून नको तेथे नाक खुपसले जाते आणि अत्यंत असंबंद्ध व अशास्त्रिय मांडणी केली जाते. त्याचे समाजावर विपरित परिणाम होतात.

शेतीला दरवर्षी अनुदान नकोच. तशी गरजच नाही. फक्त शेतीला देशोधडीस लावण्याचे शासकीय कारस्थान बंद झाले पाहिजे.

@ स्वाती२,
कथा, कादंबरी, कविता वगैरे साहित्याचा समाजाच्या जडघडणीवर आणि समाजाच्या मानसिकतेवर परिणाम होतो.
नाईलाज म्हणून शेती केली जाते कारण अन्य पर्याय उपलब्ध नाहीत. शेतकरी हा बहुसंख्य समाज आहे. सर्वांनी शेतीसोडून नोकरी, व्यापार वगैरे करणे शक्य नाही. तेवढ्या संध्या देखील उपलब्ध करून देणे कोणत्याही सरकारला अशक्य आहे. म्हणून शेतीमध्ये शेतकरी सुखासमाधानाने व सन्मानाने जगू शकेल अशी व्यवस्था असणे जास्त हितकारक आहे.
शेतकरी नसल्याने त्याला शेती विकत घेता येत नाही, हा शेतकरी विरोधी शासकिय धोरणाचा एक नमुना आहे. शेती करायला निघणार्‍यांना पावलो पावली नुसतेच अडथळे आहेत.

@अनिरुद्ध_वैद्य, धन्यवाद.

संपूर्ण लेखात एकच मुद्दा वेगवेगळ्या प्रकारांनी मांडल्यासारखे वाटत आहे. गापै म्हणतात तशी उदाहरणे आवश्यक वाटत आहेत. पहिले दोन पॅरा वाचताना असे वाटले होते की खूप महत्वाचे असे काहीतरी पुढे असेल. उदाहरणे असतील. साहित्य कसे असायला हवे ह्याच्या अपेक्षा असतील. साहित्यिकांनी स्वतः काय करून पाहायला हवे ह्याबाबत मतप्रदर्शन असेल. साहित्याने शेतीचे नुकसान नेमके कसे केले ह्याचे काही दाखले असतील.

ह्यातले काहीही वाचायला मिळाले नाही. जो मुद्दा लेखाच्या पहिल्या पॅरामध्ये आहे तोच शेवटच्याही पॅरात असल्याप्रमाणे (व मधल्या सर्वच पॅरांत असल्याप्रमाणे) वाटले, किंबहुना तो तसा आहेच.

माफ करा, पण मला हे लेखनही साहित्यिकांच्या शेळ्या हाकल्यासारखे वाटले. चु भु द्या घ्या

-'बेफिकीर'!

बेफि,
तुम्हाला माहित आहे की मुद्यावर आधारित प्रतिसादाचा (अर्थात खोचक, उपहासात्मक वगैरे नसेल तर) मी आदरच करत असतो.त्यामुळे तुम्ही "माफ करा" हा शब्द वापरायची गरजच नव्हती.

संपूर्ण लेखात एकच मुद्दा वेगवेगळ्या प्रकारांनी मांडल्यासारखे वाटत आहे कारण मुद्दा एकच आहे पण नेमकेपणाने वाचकापर्यंत पोचावा म्हणून मी त्याचा सुक्ष्म विस्तार केला आहे.

हा लेख आंतरजालावर आणि व्हाटसपवर १६ ठिकाणी प्रकाशित केला आहे. गंमत अशी आहे की, माझा मुद्दा ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना कळलाच नाही, हे स्पष्टपणे जाणवत आहे. त्याची २ कारणे असू शकतात.

१) मला मुद्दा नीट मांडता आलेला नाही. मला जे म्हणायचे आहे ते शब्दात नेमकेपणाने उतरलेले नाही, लेखनशैलीत माझी लेखनी कमी पडली.

२) वाचकांना हा दृष्टीकोन नवा आहे. त्यांनी अशा तर्‍हेने कधी विचार केलेलाच नव्हता. त्यामुळे समजायला अवघड चाललेय.
अनेकदा जे आपण कधीच ऐकलं नाही, शाळेतल्या पुस्तकांनी शिकवलं नाही, कोणत्याही ग्रंथात आलेलं नाही, आपल्या गुरुजनांनाही त्याचा गंध नव्हता; असंही बरंच काही असू शकते आणि ते समजून घ्यायला बरंच काही लागते. वाचकांची कसोटी आणि अभ्यास लागू शकते. पण ते माझ्यासारख्या सामान्य माणसाने लिहिले असल्याने मेहनत करून समजून घ्यायची कल्पना वाचकांना शिवली नाही.

लेखात उतरला किंवा नाही ते मी सांगू शकत नाही पण माझ्या डोक्यात असलेला मुद्दा अत्यंत स्पष्ट आहे आणि तो बिनतोड आहे.

बघुयात. नाहीतर कधीतरी हाच लेख नव्याने लिहावा लागेल. Happy

लेखकाने (धाग्याच्या) आजपर्यंत जे काही वाचले त्यावरून त्यांचे जे मत झाले ते मांडले गेले आहे पण जे काही वाचले ते सांगता येत नसावे अशी माझी समजूत झाली होती. पण साहीत्य म्हणजे काय याबद्दल लेखकाचे काय म्हणणे आहे हे समजत नाही. भारताचे संविधान हे साहीत्य आहे का हे पण समजले नाही. भारताच्या संविधानात अमूक एका व्यवसायासाठी प्रोव्हीजन करतात की लोकांच्या अपेक्षेने चालणा-या सरकारसाठी मार्गदर्शन असते याबद्दल लेखकाने अजून खुलासा केल्यास गोंधळ नाहीसा होईल.

या नभाने या भुईला दान द्यावे

ही कविता शेतीविषयक, शेतक-याविषयी, शेतीच्या धंद्याची माहीती देणारी आहे का याबद्दल थोडी माहीती मिळावी.

@वीणा सुरू,
साहित्यिक, शेतीविषयक लेखन करणारे, श्रीमुखाने मार्गदर्शन करणारे वगैरे या सर्वाना उद्देशून आहे, म्हणून मी सरस्वतीची लेकरं असा केंद्रस्थानी शब्द वापरला आहे.

एखाद्या प्रगतीशील शेतकर्‍याने लेखन करुन अनुभव मांडला असेल, तरच तो गृहित धरण्यासारखा आहे. एखादा शेतीचा सर्वे करुन फसवी माहिती देणार्‍यांना उंटावरचे शहाणे ही पदवी सर्वार्थाने योग्य आहे..

गंगाधरराव,

>> १) मला मुद्दा नीट मांडता आलेला नाही. मला जे म्हणायचे आहे ते शब्दात नेमकेपणाने उतरलेले नाही, लेखनशैलीत
>> माझी लेखनी कमी पडली.

याच्याशी सहमत. तुम्ही म्हणालात की :

>> शेतीला दरवर्षी अनुदान नकोच. तशी गरजच नाही. फक्त शेतीला देशोधडीस लावण्याचे शासकीय कारस्थान
>> बंद झाले पाहिजे.

शेतीतल्या अवास्तव सरकारी हस्तक्षेपाचा मुद्दा मूळ दुखणं आहेसं दिसतंय. तर मग तुम्ही त्याच्याविरुद्ध लिहा. तसेच पर्यायी व्यवस्थेचा प्रस्ताव मांडून तिचा आग्रह धरा. उंटावरनं शेळ्याबिळ्या हाकणारे आपसूक दुर्लक्षित होत जातील. जरी त्यांची संख्या जास्त असली, तरी त्यांना उघडं पाडणं हे तुमचं ध्येय नाही.

बघा पटतंय का ते.

आ.न.,
-गा.पै.

@गामा_पैलवान_५७४३२ जी,

गेली ३० वर्षापासून मी (आम्ही) हे काम सातत्याने करितच आहे. त्यासाठी बरिचशी आयुध वापरुन झालीत. पण ही एकंदरीत सिस्टिम आणि समाजमन एवढं घट्ट आहे की, आणखी बरीच वर्षे (कदाचित काही पिढ्या) हे काम जमेल त्या माध्यमातून करतच राहावे लागणार आहे.

समाज प्रबोधन करणे हे सुद्धा एक आयुध ठरू शकते.

@पिंगू धन्यवाद!

----------------------------------------
शेतीविशयक धोरणावर लहानसहान वाटणार्‍या बाबी सुद्धा प्रभाव टाकून जातात आणि शेतीच्या दुर्दशेत आणखी भर घालण्यास अप्रत्यक्श हातभार लावत असतात.
कुर्‍हाडीचा दांडा

गंगाधरराव,

अशा बातमीचा सुगावा लागला की सरळ त्या तथाकथित शेतकी सम्राटाच्या शेताचा फोटू टाका की. पूर्वी वार्ताहर माज करायचे. हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि क्यामेरे आलेत. बातमीची खातरजमा काही मिनिटांत होते. तसाच प्रकार इथेही करता येईलसं वाटतं.

तसंच शहरी अनभिज्ञांसाठी 'शेती फॉर डमीज' सारखं एखादं पुस्तक वा सदर वा अनुदिनी चालू करून पहा. बरेच शेतकरी ते करू शकतील. Happy

आ.न.,
-गा.पै.

लेख उगाच खूप जनरल आणि पसरट झाला आहे त्यामुळे नक्की मुद्दा काय आहे हे लक्षात येत नाहीये. सगळीच विधानं अतिशय जनरल आहेत. आणि बेफी म्हणतात त्याप्रमाणे एकच एक मुद्दा घोळवून लिहिला आहे आणि वर तो मुद्दाही स्पष्ट होत नाहीये.

तुम्ही जर तुमचा मुद्दा नक्की काय ते स्पष्टपणे आणि नेमकंच लिहिलं तर बरं पडेल.

तुम्ही स्वतः शेतकरी आहात आणि तुमचा या विषयावरचा अभ्यासही दांडगा आहे. मग यावर उपायही तुम्ही लेखात दिलेत तर लोकांना मार्गदर्शन होईल. उपाय देखिल नेमके आणि प्रॅक्टिकल दिलेत तर लिहिणार्‍यांनाही दिशा मिळेल.

जे काही कळलंय त्यावरून मला असं वाटतं की, शेतकी विषयक माहिती वगैरे, पुस्तकं वगैरे शेतकर्‍यांनी लिहिले पाहिजेत आणि साहित्यात शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे चित्रण आले पाहिजे. या दोन्ही गोष्टी जर उंटावरच्या शहाण्यांनी करू नयेत असं वाटत असेल तर त्या शेतकर्‍यांनीच केल्या पाहिजेत. त्याकरता त्यांना लिहिण्यास उद्द्युक्त करण्याचे काम तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना करता येईल.

तुमच्या लेखाचा सूर नेहमीच खूप तक्रारीचा असतो. ते ही ठीकच पण तुम्ही जो प्रॉब्लेम मांडता त्यावर तुम्ही स्वतः काही कधी सोल्युशन देत नाही. या लेखातही असंच आहे. बाकीचे जे उपाय सुचवत आहेत त्यांनाही तुम्ही खोडून काढताय. नक्की काय अपेक्षित आहे तुम्हाला?

भडक भाषा, एकांगी आणि टोकाचे विचार असे ह्या लेखाचे वैशिष्ट्य.
शेती ह्या विषयाला विविध पैलू असू शकतात. पिकांच्या वेगवेगळ्या जाती, जमिनीचा कस मोजणे, पैसे व ऊर्जा कमीत कमी वापरून पाणीपुरवठा, मालाची वाहतूक, शेतात पिकलेल्या मालावर प्रक्रिया, माल चांगल्या स्थितीत पोचावा म्हणून रेफ्रिजरेशन, अर्थशास्त्र देशाचे आणि जागतिकही, हवामानशास्त्र असे कितीतरी विषय जे शेतीशी संबंधित आहेत ज्यात शेतात कसणारा शेतकरी फारसे काही ज्ञान बाळगत नाही. पण शेती व्यवसाय यशस्वी करण्याकरता ह्या जाणकारांची मते जाणून घेणे नक्कीच फायद्याचे आहे.
पण सदर लेखक अशा लोकांच्या कानाखाली आवाज काढण्याची भडक भाषा वापरतो हे दुर्दैवी आहे. अर्थात असे अट्टाहासाने तज्ञांचे मार्गदर्शन धुडकावून लावण्याच्या दुराग्रहामुळे नुकसान शेतकर्यांचेच होणार हे नक्की.

शेंडेनक्षत्र,

(समोर दिसू शकणार्‍या प्रत्येक बाबीवर आपले मत ठोकलेच पाहिजे असे नाही ह्याची नम्र जाणीव ठेवूनही असे म्हणावेसे वाटते की)

शेतकर्‍याला व्यवसाय समजत नसतो असे नव्हे. पण त्याचे जीवन पूर्णतः निसर्गावर अवलंबून असते आणि त्याच्या जिवावर (की जीवावर?) जगणार्‍यांचे आयुष्य देशाच्या एक्झिम पॉलिसीसकट अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

शेतकरी दुधखुळा नसतो, तो दुधखुळा असतो असे समजून केल्या जाणार्‍या लेखनावर ताशेरे झोडलेले दिसत आहेत मूळ धाग्यात!

मूळ धाग्यात काय मिस होत आहे हे जर विचारलेच तर मी बापुडा म्हणेन की:

१. साहित्यिकांची काही भूमिकाच का असावी?

२. साहित्यिकांची भूमिका प्रभावी आहे / असली तर शेतकर्‍यांना दूर सारून शासनाकडून ती भूमिका का ऐकली जाते?

३. भलत्याचीच भूमिका ऐकली जाते तेव्हा शेतकरी काय करत असतात?

४. साहित्यिकांनी शेतकर्‍यांचे नेमके कसे नुकसान केले?

चौथ्या प्रश्नातील 'नेमके' ह्या शब्दाबाबत वरील धाग्यात काही म्हंटले गेलेले दिसत नाही आहे.

मी एकदा एका मोठ्या मॅनेजरचे एका मोठ्या सेमीनार मध्ये भाषण ऐकले होते. हे मॅनेजर म्हणाले की शेतीचा सल्ला देणारा स्वतः शेतकरी नसेल तर असले फुकाचे सल्ले शेतकरी मानत नाहीत.

हवामान खात्याच्या पावसाच्या सल्यापेक्षा मेंढरु गवतात तोंड खुपसु लागल म्हणजे पाऊस पडणार हे ठोकताळे त्यांना भरवश्याचे वाटतात.

Pages