संवाद : श्री. विक्रम गायकवाड

Submitted by चिनूक्स on 11 January, 2009 - 23:50

VG11.jpg

रंगभूषा हा एक आंगिक कलाविष्कार आहे. जे नाही ते आहे असा भास निर्माण करण्याचं काम रंगभूषा करते. मुखवटे किंवा हळद, हिंगूळ, पिवळी माती, काजळ यांसारख्या प्रसाधनांचा वापर करून पूर्वी रंगभूषा केली जाई. भरतमुनींनी रंगभूषेच्या दृष्टीने अनेक सूचना दिल्या आहेत. थेस्पिस या ग्रीक कवीने आपल्या नाटकांत अशा रंगभूषेचा वापर केला होता. त्याकाळी ग्रीक नाटकं उघड्या मैदानात हजारो प्रेक्षकांच्या समोर होत. सर्वांना रंगमंचावरील पात्रे नीट दिसावीत, म्हणून मुखवट्यांचा वापर सुरू झाला. या मुखवट्यांना भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात 'प्रतिशीर्षक' असं म्हटलं आहे. मुखवट्यांमुळे मुद्राभिनय मात्र दिसू शकत नसे. मुद्राभिनयाच्या अनिवार्य व महत्त्वाच्या भागाकडे मुखवट्यांमुळे दुर्लक्ष होऊ लागल्यावर रंगभूषेने योग्य तो परिणाम कसा साधता येईल, याचा विचार सुरू झाला आणि रंगभूषाशास्त्र प्रगत होऊ लागले. केसांचे टोप, कृत्रिम दाढीमिशांचा वापर होऊ लागला.

आप्पासाहेब टिपणीस, कारखानीस, नाना जोगळेकर यांनी महाराष्ट्रात रंगभूषेचं तंत्र पुढे नेलं. वसंत पेंटर, बबनराव शिंदे या रंगभूषाकारांनी स्वतःच्या अनुभवांवर आधारीत अशी अनेक नवी तंत्रं विकसित केली. याच परंपरेतील एक तरूण रंगभूषाकार म्हणजे श्री. विक्रम गायकवाड. रंगभूषेतील अफलातून कौशल्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या श्री. विक्रम गायकवाड यांनी प्रोस्थेटिक रंगभूषेच्या तंत्रात अफाट कौशल्य प्राप्त केलं आहे. भारतातील ते एकमेव रंगभूषासंकल्पक आहेत. 'सरदार', 'झुबेदा', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', 'बोस - द फरगॉटन हिरो', 'हे!राम', 'सरदारी बेगम', 'वेलकम टू सज्जनपूर', 'ओंकारा', 'मकबूल', 'खाकी', 'द लीजंड ऑफ भगतसिंग', 'रंग दे बसंती', 'अक्स' यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी रंगभूषासंकल्पन केले आहे. त्यांच्याशी केलेली ही बातचीत...

Vikram.jpg

चिन्मय : चांगल्या रंगभूषेचे निकष काय असतात?

विक्रम : रंगभूषा ही एक आभासकला आहे. पण हा आभास जर खरा वाटत असेल, तरच ती चांगली रंगभूषा. नाटकात किंवा चित्रपटात एखाद्या पात्राची रंगभूषा ही 'खरी' वाटली पाहिजे. कसं असतं, तुम्ही जर एखाद्या पात्राने केलेली रंगभूषा पाहिली आणि म्हटलं, 'व्वा!! काय रंगभूषा आहे!!', तर ती चांगल्या रंगभूषेला मिळालेली पावती असेल. पण तुम्ही जर म्हणालात, 'ही रंगभूषा आहे? आम्हाला कळलंच नाही. अगदी खरं वाटतं आहे हे', तर ती रंगभूषा उत्तम झाली असं मी समजेन. आणि अशीच रंगभूषा मला अपेक्षित असते. आज रंगभूषेचं तंत्र इतकं पुढे गेलं आहे की 'खरी' रंगभूषा करणं फारसं अवघड राहिलेलं नाही.

रंगभूषेचे वेगवेगळे प्रकार असतात. उदाहरणार्थ, society makeup. यात पार्टीसाठीची रंगभूषा, किंवा नवरीची रंगभूषा, नोकरी करणार्‍या स्त्रियांची रंगभूषा यांचा समावेश होतो. जाहिराती, चित्रपट, नाटक या क्षेत्रांमध्ये तर रंगभूषा अत्यावश्यकच असते. यात glamour makeup, corrective makeup, character makeup आणि prosthetic makeup असे प्रकार असतात. Glamour makeup म्हणजे जाहिरातींत किंवा फॅशन शोमध्ये सुंदर, ग्लॅमरस दिसण्यासाठी केलेली रंगभूषा. Corrective makeup म्हणजे चेहर्‍यातील वैगुण्य लपवण्यासाठी केलेली रंगभूषा आणि character makeup म्हणजे एखादा नट किंवा नटी साकारत असलेली भूमिका लक्षात घेऊन केलेली रंगभूषा.

चिन्मय : Prosthetic makeup म्हणजे काय?

विक्रम : Prosthetic makeup म्हणजे मुखवट्याच्या, मास्कच्या आधारे केलेला मेकअप. समजा तुम्ही उत्तम नट आहात, आणि तुम्हाला रंगमंचावर किंवा पडद्यावर गांधी, नेहरू, आंबेडकर, टिळक साकारायचे आहेत. पण तुमचा चेहरा मात्र या भूमिकांसाठी योग्य नाही. मग तुम्ही prosthetic makeupची मदत घेऊ शकता. आम्ही त्या व्यक्तीच्या चेहर्‍याचा mould बनवतो, मग त्याचा मास्क तयार करतो. रबर व फोमचे हे मास्क असतात. हे मास्क खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. उदाहरणार्थ, गांधींसारखं नाक, किंवा पटेलांसारखी हनुवटी. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटात मम्मुटीची रंगभूषा करताना मी हे तंत्र वापरलं होतं. 'सरदार' या चित्रपटात परेश रावळने सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका केली होती. त्यावेळी रंगभूषा करताना टक्कल, रेखीव नाक, डोळ्यांखाली असलेली सूज, वरचा पातळ ओठ हे सगळं प्रोस्थेटिक तंत्र वापरून केलं होतं. नाक, टक्कल हे सगळे खोटे रबराचे अवयव होते. परेश रावळ तेव्हा पस्तीस वर्षांचा होता. वयाच्या तिशीपासून ते सत्तरीपर्यंत वेगवेगळे टप्पे आम्ही रंगभूषेतून दाखवले होते. 'आंबेडकर' चित्रपटातसुद्धा बाबासाहेब कॉलेजमध्ये असल्यापासून ते दीक्षाभूमीवर धर्मांतर केल्यापर्यंतचा संपूर्ण कालखंड आम्ही दाखवला होता.

Bose.jpg

'बोस - द फरगॉटन हीरो' या चित्रपटातसुद्धा मी हे तंत्र खूप वापरलं होतं. नेताजी सुभाषचंद्र बोसांचा चेहरा बघितला तर लक्षात येईल की त्यांच्या चेहर्‍याची ठेवण मंगोल आहे. त्यांचे गाल, डोळे आणि त्यांची हनुवटी ही मंगोल वंशाशी साम्य दाखवणारी आहे. आणि सचिन खेडेकर हा माणूस महाराष्ट्रीय आहे. म्हणून मग रबर आणि फोम वापरून आम्ही सचिनची हनुवटी, डोळे बदलले. नेताजींनी अनेक वेषांतरं केली होती. त्यासाठीही प्रोस्थेटिक तंत्र वापरलं. नेताजींची त्वचा किंचित पिवळसर होती, सचिनच्या त्वचेचा रंगही मी बदलला. तर रबर किंवा फोम वापरून खोटे अवयव तयार करून रंगभूषा करणे, याला प्रोस्थेटिक रंगभूषा म्हणतात आणि या तंत्राचा खूप उपयोग होतो.

मी जी वर उदाहरणं दिली त्या सगळ्या चित्रपटांमध्ये प्रमुख व्यक्तिरेखांचा तरुणपण ते म्हातारपण असा प्रवास दाखवला आहे. आणि या सार्‍या नेत्यांचे चेहरे ओळखू येणार नाहीत, इतके बदलत गेले. त्यांची वैचारिक क्षमता इतकी प्रखर होती की त्यांच्या चेहर्‍यावर त्यांच्या विचारांचं प्रतिबिंब पडलेलं दिसून येतं. प्रत्येकाला तरुणपणी डोक्यावर भरघोस केस होते, आणि नंतर सगळ्यांना टक्कल पडलेलं दिसून येईल. हे सारे बदल प्रोस्थेटिक तंत्राने दाखवता येतात.

VG4.jpg

याच तंत्राचा दुसरा भाग special effectsशी संबंधित आहे. गळा कापणं, डोकं छाटणं, चाकूच्या जखमा हे दाखवायला या तंत्राचा उपयोग होतो. 'नैना' या चित्रपटात उर्मिला मातोंडकरच्या पायात काचा जातात, किंवा एका माणसाचं शवविच्छेदन सुरू असताना तो उठून बसतो, अशा दृश्यांमध्ये प्रोस्थेटिक तंत्र वापरलं आहे. अजून एक उदाहरण म्हणजे बंदुकीच्या गोळीने झालेली जखम, किंवा तलवारीचा वार हे या तंत्रामुळे खूप वास्तव दाखवता येतं. एका चित्रपटात मला स्वयंपाकघरात आपण जो झारा वापरतो, त्या झार्‍याने केलेले वार दाखवायचे होते. ते मी प्रोस्थेटिक तंत्र वापरून दाखवले. हे जे वर चित्र आहे, त्यात मी या झार्‍याने केलेल्या जखमा आणि घाव दाखवले आहेत. उजवीकडे वर असलेल्या फोटोत हे तंत्र वापरून केलेली ममीची रंगभूषा दाखवली आहे.

पण अशा रंगभूषा करताना खूप अभ्यास करावा लागतो. शरीरशास्त्राचा सखोल अभ्यास गरजेचा असतो. शस्त्रांचा अभ्यास लागतो. कुठल्या बंदुकीने कशाप्रकारची जखम होते, गोळी किती अंतरावरून मारली असता किती खोल रुतून बसते हे माहित असावं लागतं. किती mmची गोळी आहे, आणि ती किती अंतरावरून मारली यावरून रक्त पुढून येणार की मागून हे ठरतं. या गोष्टींचा नीट अभ्यास असावा लागतो. नाहीतर चूक पकडली जाते. जेजे रुग्णालयात एन्काउंटर झालेल्या गुंडांना आणतात. मी त्यांच्या जखमा पाहून अभ्यास केला आहे. भाजल्यावर त्वचा कशी दिसते, १०% भाजणे म्हणजे काय, ७०% भाजणे म्हणजे काय, तीन दिवसांनंतर मृतदेहाची काय अवस्था होते, सात दिवसांनंतर मृतदेह कसा दिसतो, हे सगळं मी अभ्यासलं आहे.

चिन्मय : आपण भारतातले एकमेव रंगभूषासंकल्पक आहात. रंगभूषासंकल्पन म्हणजे नक्की काय?

विक्रम : 'रंगभूषासंकल्पन' ही संकल्पना भारतात मीच प्रथम रुजवली. रंगभूषासंकल्पन म्हणजे काय? तर चित्रपटाचा दिग्दर्शक मला पटकथेबद्दल आणि नटांबद्दल माहिती देतो. त्या नटांची रंगभूषा ही चित्रपटाच्या पटकथेला साजेशी असणं हे महत्त्वाचं असतं. सर्व पात्रांच्या रंगभूषा या एकजिनसी दिसायला हव्यात. दिग्दर्शकाच्या जर पात्रांच्या रंगभूषेबद्दल काही कल्पना असतील तर उत्तम. पण अनेकदा एखादं पात्र पडद्यावर असं दिसेल हे दिग्दर्शकाला निश्चित ठाऊक नसतं. शिवाय काहीवेळा त्या चित्रपटात काम करणार्‍या नटाची प्रतिमा आणि त्या चित्रपटातील व्यक्तिरेखा यांत खूप तफावत असते.

उदाहरणार्थ, 'ओंकारा'तील सैफ अली खान. तो एक चॉकलेट हिरो आहे. उत्तर प्रदेशातील एक बाहुबली म्हणून तो कितपत शोभून दिसेल हे दिग्दर्शकाला एकदा कळलं की मग तो पुढचा विचार करू शकतो. तर पात्राची रंगभूषा ठरवणं, नटाची तशी रंगभूषा करून तो त्या भूमिकेसाठी योग्य आहे की नाही, हे बघणं आणि एकदा त्या भूमिकेसाठी तो नट ठरला की त्याची तशी रंगभूषा करणं, ही कामं रंगभूषासंकल्पक करतो. शिवाय, पूर्वी जेव्हा मी एखाद्या चित्रपटासाठी रंगभूषा करायचो, तेव्हा त्या चित्रपटाचं चित्रीकरण होईपर्यंत मला अडकून पडावं लागायचं. वर्ष-दोन वर्षं एकच चित्रपट करायचा, रोज तीच रंगभूषा करायची, याचा मला कंटाळा यायचा. एखाद्या पात्राची त्या चित्रपटासाठीची रंगभूषा ठरली, आणि त्या पात्राचा त्यानुसार मेकअप केला, की माझा त्या कामात फारसा रस राहत नाही. त्या पात्राचा, पटकथेचा विचार करून रंगभूषा केली की पुढे नवीन काही करायचं शिल्लक राहिलेलं नसतं.

मग मी असा विचार केला की, आपल्यासारखंच कसब असलेले रंगभूषाकार आपण तयार केले, तर ते या चित्रपटांसाठी काम करू शकतील. रंगभूषा ठरून त्यानुसार एकदा तसं काम माझ्या सहाय्यकांना शिकवलं, की ते या चित्रपटासाठी त्याच पद्धतीचं, तेवढंच उत्कृष्ट काम करू शकतील आणि मी दुसर्‍या चित्रपटासाठी काम करू शकेन. या चित्रपटाचीही रंगभूषा योजना एकदा ठरली की माझे सहाय्यक ते काम हाताळू शकतील. यामुळे मी एकावेळी बरंच काम उत्तम प्रकारे करू शकेन, आणि अनेक रंगभूषाकारसुद्धा तयार होतील. तर माझा हा उद्देश होता, आणि म्हणूनच मी रंगभूषासंकल्पक झालो.

रंगभूषासंकल्पक हा संपूर्ण चित्रपटाचा विचार करून रंगभूषा ठरवतो, ती रंगभूषाकारांना शिकवतो आणि रंगभूषाकार त्यानुसार रंगभूषा करतो. पण भारतात आज माझ्याशिवाय असं काम कोणी करत नाही.

चिन्मय : रंगभूषासंकल्पनात नक्की कोणत्या कामांचा अंतर्भाव होतो?

विक्रम : सर्वप्रथम पटकथेचा विचार करून मग संगणकावर त्या नटाचा / नटीचा चेहरा ठरलेल्या रंगभूषेनुसार संगणकावर मॉर्फ करणं, ती रंगभूषा चित्रपटाचा दिग्दर्शक, लेखक व अभिनेत्याकडून संमत करून घेणं, सुरुवातीला तशी रंगभूषा करून काही फेरफार करावे लागतात का, हे बघणं, मग ती रंगभूषा माझ्या सहाय्यकांना शिकवणं, ही सर्व कामं एक रंगभूषासंकल्पक म्हणून मी करतो. बर्‍याच नटांचे व्यक्तिगत रंगभूषाकार असतात. मग मी ठरवलेली रंगभूषा त्यांना शिकवावी लागते. चित्रीकरण व्यवस्थित सुरू होईपर्यंत रंगभूषा मी करतो. अगदी सुरुवातीचा ट्रायल मेकअप, मग त्या विशिष्ट रंगभूषेत नटांची छायाचित्रे काढणे आणि चित्रीकरण सुरू होईपर्यंत त्यात काही फेरफार करणे, ही सर्व कामं मी करतो. तोपर्यंत माझे सहाय्यक किंवा इतर रंगभूषाकार ते काम शिकून घेतात, आणि मी पुढच्या चित्रपटाच्या कामाला लागतो. मग पुढे काही नवीन पात्रांची रंगभूषा करायची असेल, किंवा अगोदर ठरलेल्या रंगभूषेत फेरफार करायचे असतील, तर मी त्यासाठी काही दिवस राखून ठेवलेले असतात. मी परत त्या चित्रपटासाठी काम करणार्‍या रंगभूषाकारांना शिकवतो, आणि अशाप्रकारे ते काम सुरू राहतं.

अगोदर दिलेलं 'ओंकारा'तील सैफ अली खानचं उदाहरण आपण घेऊ. लखनऊ, अलाहाबादच्या आसपास असलेले बाहुबली, म्हणजे गुंडच ते, कसे वावरतात याचा मी अभ्यास केला. त्यानुसार संगणकावर सैफचा चेहरा घेऊन त्याचा रंग बदलला, डोळ्यांचा, दातांचा रंग बदलला, केस अगदी छोटे केले, दाढीमिशा लावल्या. अशा लोकांच्या चेहर्‍यावर कुठेतरी घाव असतो, लहानपणी कधीतरी मारामारी केली असते आणि त्याची खूण अभिमानाने ते वागवत असतात. सैफच्या चेहर्‍यावर तसा एक व्रण तयार केला. अशी दोन-तीन वेगवेगळी रुपं संगणकावर तयार केली. त्यांपैकी मला जी रंगभूषा सर्वाधिक आवडली होती त्याप्रमाणे आम्ही सैफची रंगभूषा केली.

आपल्याकडे जरी मीच एकमेव रंगभूषासंकल्पक असलो, तरी हॉलिवूडमध्ये मात्र या पद्धतीनंच काम केलं जातं. तिथे प्रत्येक चित्रपटासाठी एक रंगभूषासंकल्पक असतो, एक मेकअप सेट सुपरवायझर असतो आणि एक रंगभूषाकार असतो. रंगभूषाकार चित्रीकरणाच्या वेळी रंगभूषासंकल्पकाने सांगितल्याप्रमाणे रंगभूषा करतो आहे किंवा नाही, यावर लक्ष ठेवायला मेकअप सेट सुपरवायझर असतो. 'ओंकारा', 'रंग दे बसंती' यांसारख्या काही चित्रपटांसाठी माझे सहाय्यक सुपरवायझर म्हणून उपस्थित राहत. एखाद्या नटाचा व्यक्तिगत रंगभूषाकार मी जसं सांगितलं आहे तसंच काम करतो की नाही, याकडे हे सुपरवायझर लक्ष देतात. बरेचदा असं होतं की काही विशिष्ट गोष्टी माझ्या सहाय्यकांच्या सरावातल्या असतात. व्यक्तिगत रंगभूषाकारांना तशी रंगभूषा करण्याची सवय नसते. उदाहरणार्थ, 'ओंकारा'तील सैफ अली खानची रंगभूषा. त्याची काळवंडलेली त्वचा, भुवईवर असलेला जखमेचा व्रण किंवा तंबाखूमुळे दातांवर पडलेले डाग या सार्‍या गोष्टी सामान्य रंगभूषेचा भाग नाहीत. त्यामुळे ही रंगभूषा माझे सहाय्यकच करत. सैफच्या व्यक्तिगत रंगभूषाकाराला ते जमणं शक्य नव्हतं.

चिन्मय : एखाद्या पात्राची रंगभूषा कशी असावी हे ठरवण्यात आपला सहभाग नेमका किती असतो?

विक्रम : मी ज्या चित्रपटांसाठी रंगभूषासंयोजन करतो, त्या चित्रपटांतील सर्व पात्रांची रंगभूषा मीच ठरवतो. माझे सर्व दिग्दर्शक मला ते स्वातंत्र्य देतात. हल्ली बरेचदा दिग्दर्शक पटकथा ऐकवत असतानाच माझ्या डोक्यात त्या पात्रांची रंगभूषा तयार झालेली असते आणि त्यानुसार मी काम करतो.

मी करत असलेली रंगभूषा त्या व्यक्तिरेखेला शोभून दिसली पाहिजे याकडे मी लक्ष देतो. त्यामुळे केवळ रंगभूषाच नाही, तर वेशभूषेकडेही माझं लक्ष असतं. 'रंग दे बसंती' या चित्रपटात अनेक पात्रांना कमीत कमी रंगभूषा केली आहे. पण त्यांच्या रूपांतील फरक हा कपड्यांमुळे उठून दिसतो.

VG5.jpg

'वेलकम टू सज्जनपूर' या चित्रपटात रवी झंकाल या अभिनेत्याने मुन्नीबाईचे काम केले आहे. मुन्नीबाई निवडणूक जिंकल्यावर तिच्या दिसण्यात एकदम फरक पडतो. हा फरक रंगभूषेऐवजी मी वेशभूषेतून दाखवला आहे. माझ्या बहुतेक सर्व चित्रपटांत पात्रांचे कपडे कसे असावे हे मीच ठरवलेलं असतं.

चिन्मय : एखादा रंगभूषाकार चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी, फॅशन या वेगवेगळ्या क्षेत्रांत तितकंच उत्तम काम करू शकतो का?

विक्रम : तू म्हणतोस ती सारी क्षेत्रं खूप वेगवेगळी आहेत. मी चित्रपट, थिएटर, सोसायटी मेकअप असं सगळं केलं आहे. पण पण प्रत्येक ठिकाणी काही गोष्टींकडे लक्ष द्यावंच लागतं. उदाहरणार्थ, नाटकात प्रेक्षक लांब बसलेले असतात. त्यामुळे नटाचा चेहरा नीट दिसावा म्हणून काही विशिष्ट रंगछटा वापरल्या जातात. नवरीची रंगभूषा म्हणजे ब्रायडल मेकप करताना लक्षात ठेवावं लागतं की, लोक अतिशय जवळून नवरीला बघणार आहेत. त्यामुळे तिचा मेकअप हा अतिशय खरा दिसायला हवा. नाहीतर तिचा चेहरा पांढरा दिसेल. त्यामुळे अशाप्रकारचा सोसायटी मेकअप करणं अवघड असतं कारण तो मेकअप जवळून बघितला जातो. त्याचप्रमाणे फोटो काढण्यासाठी पूर्वी फिल्म वापरावी लागत असे. आता डिजीटल कॅमेरे असतात. हे कॅमेरे वापरून काढलेले फोटो खूप शार्प असतात. त्यामुळे जाहिराती किंवा एखाद्या कॅलेंडरसाठी काम करताना काळजीपूर्वक रंगभूषा करावी लागते.

टीव्हीचा पडदा छोटा असतो. प्रकाशयोजना प्रखर असते. त्यामुळे परत मेकअप अधिक उठून दिसण्याचा धोका असतो. चित्रपटात असं होण्याचा धोका कमी असतो. मात्र आता HD कॅमेरे आले आहेत. त्यामुळे माध्यम कोणतंही असो, मेकअप खरा दिसण्यासाठी मेहनत करावीच लागते. रंगभूषा करताना त्या माध्यमाची जाण तर आवश्यक आहेच, पण वापरल्या जाणार्‍या साधनांचासुद्धा उत्तम अभ्यास लागतो.

चिन्मय : पण बहुतेक ठिकाणी आपण उल्लेख केलेल्या गोष्टींचं भान ठेवलं गेलं नसल्याचं लक्षात येतं. उदाहरणार्थ, दूरचित्रवाणीवरील बहुतेक मालिकांत सर्वांची सारखीच आणि भडक अशी रंगभूषा असते.

विक्रम : या मालिकांत केली जाणारी रंगभूषा ही खूप कृत्रिम अशी आहे. खरं म्हणजे तिला 'रंगभूषा' म्हणणंसुद्धा चूक आहे. याला कारण म्हणजे तिथे असणारी स्पर्धा. एका मालिकेत अनेक कलाकार काम करत असतात आणि प्रत्येकाची प्रत्येकाशी स्पर्धा सुरू असते. गंमत अशी आहे की, एखाद्या प्रसंगात जर तीन - चार स्त्रिया असतील तर प्रत्येकीला वाटतं की, 'माझ्यापेक्षा गोरी, माझ्यापेक्षा सुंदर' कोणी नसावं. प्रत्येकीला आपला मेकअप सर्वांत चांगला असायला हवा असतो. पण चांगला मेकअप म्हणजे भरपूर मेकअप चेहर्‍यावर थापणे, असं नाही. पण हे त्यांना कळत नाही. तसं पाहिलं तर एखाद्या विशिष्ट कालावधीत एखादी शैली लोकप्रिय होत असते, आणि त्यानुसार हे रंगभूषाकार काम करत असतात. पण मला अशा प्रकारचं काम अजिबात आवडत नाही. रंगभूषा ही पटकथेनुसारच व्हायला हवी. हल्लीच्या मालिकांत नायिका सकाळी झोपेतून उठते तेव्हाही तिने लिपस्टिक लावलेलं असतं, खोट्या पापण्या लावलेल्या असतात. तिची केशभूषा अगदी व्यवस्थित असते. तुम्ही झोपेतून उठताय आणि तुमचा अवतार मात्र नटूनथटून लग्नाला निघाल्यासारखा. पण हा केवळ रंगभूषाकाराचा किंवा कलाकारांचा दोष नाही. या मालिका कशा 'दिसाव्यात' हे ठरवणारे अनेक घटक आहेत. निर्मात्याचा आणि वाहिनीचा आग्रह असतो की प्रत्येक गोष्ट सुरेखच दिसली पाहिजे. जाहिरातीत सगळं कसं सुंदर दिसतं, त्याप्रमाणे. सगळं असं 'सुंदर' दाखवलं तरच लोकांना आपली मालिका आवडेल, अशी त्यांची खात्री झालेली आहे. लोकांना काय आवडतं किंवा नाही, हे त्यांनी स्वतःच ठरवून ठेवलेलं आहे. पण या प्रकारामुळे एखाद्या मालिकेत जो किमान 'कॉमनसेन्स' अपेक्षित असतो, तो हरवला आहे.

चिन्मय : आपण नाटक, दूरचित्रवाणी आणि चित्रपट या तीनही माध्यमांत काम केलं आहे. या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये रंगभूषा करताना काय फरक केला जातो? समजा मला 'देवदास' हे पात्र या वेगवेगळ्या माध्यमांत दाखवायचं आहे, तर रंगभूषेत कोणते फरक करणं अभिप्रेत आहे?

विक्रम : पूर्वी नाटकं ही मशालींच्या उजेडात केली जात. किंवा भरतनाट्यम्, कथकली हे नृत्यप्रकार मंदिराच्या आवारात केले जात आणि मशालींचाच उजेड असे. या नृत्यप्रकारांत अभिनयाला स्थान आहे, होतं. डोळे, ओठ, गाल यांच्या मदतीने भावना दाखवल्या जात. राग, लोभ, प्रेम, मत्सर या सार्‍या भावना हावभावातून दाखवल्या जात, आणि हा अभिनय अंधारात नीट दिसावा म्हणून भडक रंगभूषा केली जात असे. शिवाय तो अभिनयही भडक असे. कारण उजेड पुरेसा नसे. पण आता जर रंगमंचावर भरपूर प्रकाश असतो, तर भडक रंगभूषेची गरजच काय? पण आजही भरतनाट्यम् सादर करताना भडक रंगभूषा केली जाते. अर्थात परंपरेला धरूनच हे चालतं. पण डोळ्यांचा आकार नीट दिसावा म्हणून liner वापरणं वेगळं आणि मुळात डोळेच दिसत नाहीत म्हणून liner वापरणं वेगळं. तर हा फरक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.

मला जर रंगमंचावर 'देवदास' हे पात्र दाखवायचं असेल तर मी भडक रंगभूषा करणार नाही. कारण पूर्वी नाटकांत गाल, ओठ रंगवले जात, भरपूर पावडर फासली जात असे, त्याला अपुरा प्रकाश हे कारण होतं. आता तसं काही राहिलेलं नाही. तर 'देवदास' या पात्राची रंगभूषा करायची असेल, तर त्या पुस्तकात जसं वर्णन केलं आहे तशी त्याची वेशभूषा करा. नटाची त्वचा चांगली नसेल, किंवा चेहर्‍यात काही मामुली दोष वाटत असतील तर ते दुरुस्त करा. म्हणजे corrective makeup हा जो प्रकार आहे, तो वापरला गेला पाहिजे. चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांच्या बाबतीतही असंच केलं जावं.

चिन्मय : पण 'देवदास'ऐवजी एखादी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकार करायची असेल, उदाहरणार्थ, शिवाजी महाराज किंवा गांधीजी, तर काम करण्याची पद्धत काय असते?

विक्रम : ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकार करताना अभिनेत्याच्या चेहर्‍याचा अभ्यास करून रंगभूषा करावी लागते. समजा एखाद्या नटाला शिवाजी महाराजांची भूमिका करायची असेल तर मी आधी महाराजांचं एखादं छायाचित्र मिळवून त्याचा आणि नटाच्या चेहर्‍याचा अभ्यास करेन. पण महाराजांचं नाक, डोळे, हनुवटी, दाढी हे काही त्या अभिनेत्याकडे नाही. पण कसलेला अभिनेता असल्याने शिवाजी महाराजांच्या भूमिकेला तो उत्तम न्याय देईल, असं दिग्दर्शकाला वाटतं. मुळात माझा असा विचार असतो की नटाची निवड इतकी चपखल असली पाहिजे की रंगभूषेची फारशी आवश्यकता भासता कामा नये. पण अनेकदा ऐतिहासिक भूमिका साकारताना हे शक्य होत नाही. मग त्या नटाचं नाक शिवाजी महाराजांच्या नाकासारखं करायचं प्रोस्थेटिक तंत्र वापरून. दाढीमिशी लावायची. या दाढीमिशीचा आकारसुद्धा प्रत्येक चेहर्‍यानुसार बदलतो. दोन भुवयांमध्ये किती अंतर आहे हे बघावं लागतं. डोळे छोटे असतील तर ते महाराजांच्या डोळ्यांप्रमाणे मोठे कसे दिसतील हे बघावं लागतं. कपाळ अरुंद असेल तर दाढीमिशी लावल्यावर ते अजूनच लहान दिसेल. म्हणून कपाळ रुंद कसं दाखवता येईल हे बघावं लागतं.

हे सर्व नीट जमून येण्यासाठी facial anatomyचा अभ्यास करणं आवश्यक असतं. त्याचबरोबर भरपूर अनुभव गाठीशी लागतो. अनेक नटांना मिशी लावल्यावर त्यांचे डोळे जवळ येतात. मनोज वाजपेयीचे डोळे खोल आहेत. त्याला मिशी लावल्यावर त्याचे डोळे खूप जवळ आल्यासारखे वाटतात. नुसते कल्ले वाढवले तरी चेहरा लांबुळका दिसतो. रंगभूषाकार हे विचार करत नाहीत. फक्त मिशीला मिशी लावतात. आणि मग ती रंगभूषा फसते.

चिन्मय : रंगभूषा करताना जसा अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, त्याचप्रमाणे रंगभूषेसाठी लागणारी साधनंही महत्त्वाची असतात. American Chemical Society, Royal Society of Chemistry यांच्या अनेक विज्ञानपत्रिकांमध्ये रंगभूषेत वापरल्या जाणार्‍या साधनांवर लेख वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. या अत्याधुनिक साधनांमुळे रंगभूषेचे शास्त्र खूप प्रगत झाले आहे. पण पूर्वीच्या रंगभूषाकारांकडे ही साधनं उपलब्ध नसूनही उत्तम रंगभूषा होत असे. त्यामानाने हल्लीची रंगभूषा खूप बटबटीत असते. आपलं याबाबत काय मत आहे?

विक्रम : तू म्हणतोस ते बरोबर आहे. पूर्वीचे रंगभूषाकार हे उत्तम कलाकार होते. त्यामुळे साधनं कमी असूनही त्यांनी त्यांच्या कामाचा दर्जा राखला होता. माझ्या मते साधनं कमी असताना काम करण्यातच मजा आहे, कारण तेव्हा तुमची शोधप्रवृत्ती जागृत झालेली असते. तुम्हाला जर एखादं गणित सोडवायचं असेल, तर पाढे पाठ असायला हवेत. पाढे पाठ असले की गणित पटकन सुटतं. तेच जर तुम्हाला calculator वापरायला दिलं तर तुम्ही गणित पटकन सोडवाल, पण पाढे पाठ करणार नाही. आणि तुमच्याकडे calculator नसलं की तुमचं काम अडेल. हल्लीची रंगभूषा अशीच आहे. तुमच्याकडे एखादं विशिष्ट प्रसाधन नसेल तर तुमची रंगभूषा थांबते. त्यामुळे आमच्या आधीच्या पिढ्यांची कला खूप मोठी होती. आत्ताची कला वाटते मोठी पण ती तशी नाही. ग्लॅमरला अवास्तव महत्त्व प्राप्त झालं आहे. चित्रपटात व्यक्तिरेखा कोणतीही असो, ती ग्लॅमरस दिसली पाहिजे असा विचित्र हट्ट असतो.

चिन्मय : आपण रंगभूषाकार कसे झालात?

विक्रम : माझं सारं लहानपण नुसती धमाल करण्यात गेलं. अभ्यास कमी, खेळ जास्ती. आणि जोडीला नाटक. खूप लहान असल्यापासून मी नाटकांशी संबंधित आहे. माझे गुरू, श्री. बबनराव शिंदे, हे आमच्या घराजवळच राहायचे. त्यांना मी बाबा म्हणायचो. त्यांच्या घरातच नाटकाचं सारं सामान असायचं. राक्षसाचे मुखवटे, गदा, तलवारी, डमरू, प्लास्टिकचा नाग असं बरंच काही तिथे असे. ते वातावरण मला खूप आवडायचं. त्यांच्याबरोबर आम्ही मुलं बालनाट्यांना जात असू. खूप बालनाट्यांत कामही केलं. माझे गुरू, म्हणजे बाबा, तिथे रंगभूषा करत आणि ते बघायला मला फार आवडे. मुलांना दाढीमिशा काढायच्या, चेटकिणीचा चेहरा रंगवायचा अशी मजा तिथे असायची. मी तिकडे आकर्षित झालो आणि ठरवलं की आपणही हेच करायचं. आणि मग मी बाबांकडून रंगभूषा शिकायला सुरूवात केली. तेव्हा सातवी-आठवीत होतो मी. शाळेच्या अभ्यासात मला फारसा रस नव्हता. पण माझं नशीब चांगलं असल्याने फळ्यावर शिकवलेलंच मला परीक्षेत विचारलं जायचं, आणि मी पास व्हायचो. दरवर्षी ५५-६० टक्के मार्क मिळवत मी कसाबसा दहावी उत्तीर्ण झालो. त्यानंतर मी automobile maintenance या विषयात diploma केला. कार मेकॅनिक झालो. पण तोपर्यंत मी स्वतः रंगभूषाकार झालो होतो, आणि माझं रंगभूषेचं कामही जोरात सुरू असायचं. मग पुढे मी पूर्णवेळ रंगभूषाकार झालो. एव्हाना महाराष्ट्रात माझं बर्‍यापैकी नाव झालं होतं. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात मी नाट्यस्पर्धांसाठी जात असे. राज्य नाट्यस्पर्धा, कामगार कल्याण, एस. टी.च्या स्पर्धा अश्या पंचेचाळीस स्पर्धांसाठी त्यावेळी मी काम करत होतो. अगदी छोट्या खेड्यांमध्येसुद्धा मी कामासाठी नियमित जात असे. दिवसरात्र काम करत होतो तेव्हा मी. मग हळूहळू लग्नासाठीचा मेकप, टीव्ही मालिका असं करत करत मी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटपर्यंत पोहोचलो. १९८३ सालची ही गोष्ट. तेव्हा मी एकोणीस वर्षांचा होतो.

चार वर्षं मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सहाय्यक रंगभूषाकार म्हणून काम केलं. तिथे मला जगभरात तयार झालेले चित्रपट पाहायला मिळाले. प्रोस्थेटिक्स म्हणजे काय, किंवा संयत रंगभूषा कशी करायची, हे मला तिथे शिकायला मिळालं. तिथे मला अजून एक गुरू भेटले. त्यांचं नाव श्री. अंजी बाबू. अंजी बाबूंचं रंगभूषेच्या थिअरीवर अफाट प्रभुत्व होतं. रंगभूषेतील बारकाव्यांची त्यांना इत्यंभूत माहिती होती. पण त्यांचं हे ज्ञान त्यांच्या हातातून कधी समोर आलं नाही. बबनराव शिंदे हे जातिवंत कलाकार होते. उत्तम चित्रकार होते. त्यांची कला त्यांच्या हातात होती. अंजी बाबूंचं मात्र दुर्दैवानं तसं नव्हतं. पण अंजी बाबूंनी त्यांचा हात म्हणून मला वापरलं. त्यांचं संपूर्ण ज्ञान त्यांनी माझ्या माध्यमातून प्रत्यक्षात आणलं.

बबनराव शिंदे व अंजी बाबू या दोन गुरूंचं माझ्यावर फार मोठं ऋण आहे. बाबा घराजवळच राहायचे, त्यामुळे त्यांच्यादेखतच मी वाढलो. मी आधी म्हटलं तसं रंगभूषा मला बाबांनीच शिकवली. सुरुवातीचे काही दिवस बाबांनी मला फक्त ते किती रंग उचलतात, हे बघायला सांगितलं. डॉक्टर जसा रुग्णाच्या कपाळाला हात लावून ताप मोजतो, तसं बाबा हात लावून शरीरातील उष्णता बघत आणि त्यानुसार किती रंग वापरायचा ते ठरवत. त्यांनी मला कपडेपट कसा सांभाळायचा ते शिकवलं. अगदी कपड्यांना इस्त्री करण्यापासून ते नीट घड्या घालण्यापर्यंत सगळं त्यांनी मला शिकवलं. तलवार कशी पकडायची, गदा कशी सांभाळायची ते त्यांनीच शिकवलं. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक नाटकांतील रंगभूषा, केशभूषा, वेशभूषेतील फरक मी त्यांच्याकडून शिकलो. उदाहरणार्थ, टोप्यांचे वेगवेगळे प्रकार, कुठल्या भागात काळी टोपी घालतात, कुठे बुट्ट्याची टोपी घालतात, पांढरी टोपी कधी घालतात हेही मी शिकलो. त्यामुळे आज मी जेव्हा एखाद्या चित्रपटासाठी काम करतो, तेव्हा माझा उपयोग वेशभूषाकारांनाही होतो. राकेश ओमप्रकाश मेहरा किंवा विशाल भारद्वाजसारखे दिग्दर्शक मला दाखवल्याखेरीज कपडेपट पास करत नाहीत.

अंजी बाबूंना फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये खूप मान होता. त्यांना सगळे तिथे एंजॉय बाबू म्हणत. प्रत्येकाशी त्यांचे उत्तम संबंध होते. बाहेरगावचे, परदेशातून आलेले असे अनेक विद्यार्थी इन्स्टिट्यूटमध्ये होते आणि त्या प्रत्येकाची ते आपुलकीने चौकशी करत. इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांच्यामुळेच मी बर्‍यापैकी इंग्रजी बोलायला लागलो. माझं शिक्षण पुण्यात झालेलं असल्याने तसं मला बर्‍यापैकी इंग्रजी बोलता यायचं. पण त्यात सफाई नव्हती. अंजी बाबूंनी मला फक्त इंग्रजीत बोलण्याची सक्ती केली. कोणी माझ्याशी हिंदीत किंवा मराठीत बोललं तरी मी मात्र इंग्रजीतच बोललं पाहिजे, असा नियम त्यांनी घालून दिला. त्यामुळे माझं इंग्रजी खूप सुधारलं. मी आधी सांगितलं त्याप्रमाणे अंजी बाबूंना रंगभूषेची थिअरी तोंडपाठ होती. मला एखादा प्रश्न पडला की ते मला अमुक एका पुस्तकातील विशिष्ट प्रकरण वाचायला सांगत. त्यात मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडे. ती सगळी ब्रिटिश किंवा अमेरिकन पुस्तकं असत. बरेच कठीण इंग्रजी शब्द त्यांत असत. म्हणून अंजी बाबूंनी मला एक शब्दकोश आणून दिला होता. त्यातून शब्दांचा अर्थ बघून मी माझी उत्तरं शोधत बसे. मग त्या पुस्तकांत लिहिल्याप्रमाणे मला रंगभूषा करावीशी वाटली तर स्वतःच्या पैशांनी मला सगळं सामान आणून देत, स्वतः उभं राहून माझ्याकडून रंगभूषा करून घेत. 'हे असं कर, तू हा रंग वापरलास त्याऐवजी तो रंग वापरून बघ', अशा सूचना देत ते मला शिकवत असत. मग काम पूर्ण झालं की मला सांगत, 'आता काम पुरे. थिएटरात जा आणि तो अमुक एक उत्तम चित्रपट आता दाखवणार आहेत, तो बघ. मग त्यात रंगभूषा कशी केली आहे, यावर आपण रात्री चर्चा करू.' आमच्या फिल्म इंस्टिट्यूटमध्ये रोज जगभरातले चित्रपट आम्हांला बघायला मिळत. अंजी बाबू त्या चित्रपटांतील रंगभूषेबद्दल आमच्याशी चर्चा करत, आमच्या शंकांना उत्तरं देत. त्यांच्या देखरेखीखाली मी भरपूर प्रात्यक्षिकं केली. अनेक नव्या रंगभूषाकारांना शिकवलं.

अंजी बाबूंकडून मी आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो, आणि ती म्हणजे स्वच्छता. ग्रीन रूम कायम स्वच्छ असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. ग्रीन रूम म्हणजे काय? शब्दशः अर्थ बघितला तर 'हिरवी खोली'. मग हिरवीच खोली का? ब्लू रूम, यलो रून, रेड रूम का नाही? तर हिरव्या रंगाचा आणि आपल्या डोळ्यांचा व मानसिक शांतीचा खूप जवळचा संबंध आहे. तू हिरवं शेत बघ, हिरवे डोंगर बघ. तुला लगेच प्रसन्न वाटेल. त्या हिरवाईमुळे तुला छान वाटतं. तर आमची मेकअप रूम ही खरोखर ग्रीन होती. रोज पहाटे मी तिथे वेगवेगळ्या कुंड्या, फुलं आणून ठेवत असे. उदबती, धूप लावायचो. आमचे कपडे अतिशय स्वच्छ असत. सर्व ब्रश, कात्र्या कार्बन टेट्राक्लोराईडमध्ये धुतल्या जात. टेबलावर फोर्मॅलिन ठेवलेलं असे. ऑपरेशन थेटरातल्या एखाद्या टेबलासारखं आमचं ते टेबल दिसे. अंजी बाबूंकडून असं बरंच काही शिकलो. असे गुरू लाभणं हे भाग्याचं असतं.

आत्ता आठवलं म्हणून सांगतो. मी अठरा वर्षं व्यावसायिक रंगभूषाकार म्हणून काम केल्यानंतर एकदा मला एक मोठा प्रश्न पडला होता. झालं असं की, डॉ. श्रीराम लागू यांनी 'सूर्य पाहिलेला माणूस' या नाटकात सॉक्रेटिसची भूमिका करायचं ठरवलं. त्यावेळी त्यांनी दिग्दर्शकाला सांगितलं की, रंगभूषाकार म्हणून विक्रम गायकवाडच हवा. मग अतुल पेठे मला येऊन भेटला आणि म्हणाला की, 'डॉक्टरांनी तुला नाटकासाठी रंगभूषा करायला सांगितलं आहे. आम्ही पुण्यातल्याच एका रंगभूषाकाराला डॉक्टरांसाठी दाढी तयार करायला सांगितलं होतं. पण ती दाढी गोसाव्याच्या दाढीसारखी दिसते आणि खूप जड आहे. तू ताबडतोब काहीतरी कर.' मी अक्षरशः दहा-बारा ग्रॅमची दाढी तयार केली. कारण डॉक्टरांची मान सतत हलते, आणि त्या वयात त्यांना जड दाढी लावणं शक्यही नव्हतं. ती दाढी डॉक्टरांच्या पसंतीस उतरली. त्यांनी केस वाढवले होते, त्यांना व्यवस्थित आकार दिला. अतिशय सुंदर रंगभूषा झाली होती. पण तरीही मला त्यांच्या चेहर्‍यात भूमिकेला आवश्यक असलेला softness हवा होता, तो दिसेना. डॉक्टरांचे डोळे जरा उग्र आहेत. निळसर-राखाडी रंग आहे त्यांच्या डोळ्यांचा. दाढीमिशी, केस व्यवस्थित असले तरी त्यांच्या डोळ्यात असलेली खलनायकी छटा काही जाईना. मी खूप विचार केला पण मला काहीच सुचत नव्हतं. म्हणून मी बबनराव शिंद्यांकडे गेलो. त्यांना सगळं सांगितलं. बबनराव डॉक्टरांच्या पिढीतले. दोघांनी बरंच एकत्र कामही केलं होतं. मला म्हणाले, 'डॉक्टरांचे डोळे थोडे off करायला हवेत.' पण ते करायचे कसे? डॉक्टर काही लेन्स वापरू शकणार नव्हते. बबनराव म्हणाले, 'त्यांना थोड्या दाट भुवया लाव. थोड्या जाड असलेल्या. म्हणजे रंगमंचावर असलेल्या दिव्यांमुळे त्या भुवयांची सावली डोळ्यांवर पडेल आणि डोळे तुला हवे तसे off होतील.' मी डॉक्टरांना तशाच भुवया लावल्या आणि त्याक्षणी मला हवा तसा effect मिळाला. गुरूचं महत्त्व हे असं आहे. तुम्ही कितीही व्यावसायिक यश मिळवलं तरी गुरूचं मार्गदर्शन आयुष्यभर लागतंच.

या माझ्या दोन्ही गुरूंनी माझ्याकडून भरपूर काम करवून घेतलं. त्यामुळे मी सतत रंगभूषेचाच विचार करत असे. अगदी घरी असलो तरी माझ्या डोक्यात तेच विचार असत, किंवा घरीसुद्धा मी काम करत असे. त्यामुळे माझे विचार पक्के होत गेले.

चिन्मय : आपण फिल्म इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडल्यानंतर आपला व्यावसायिक प्रवास कसा झाला?

विक्रम : खरं म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यापूर्वीच मी व्यावसायिक रंगभूषाकार म्हणून काम करत होतो. बबनराव शिंदे मला बाहेर कामासाठी पाठवायचे. 'जाणता राजा' हे नाटक मी केलं. त्याआधी अनेक संगीत नाटकांसाठी मी रंगभूषा केली होती. 'संगीत मंदारमाला', 'मानापमान', 'संशयकल्लोळ' अशी नाटकं मी करत असे. शरद तळवलकर, चित्तरंजन कोल्हटकर, रामदास कामत, मधुवंती दांडेकर या सार्‍यांची रंगभूषा मी नववी-दहावीत असताना केली आहे. पण मी एकांकिका स्पर्धा करायचो तेही व्यावसायिक म्हणूनच. त्या हौशी स्पर्धा असल्या तरी मी मात्र माझे पैसे घेत असे. ती मुलं मला त्यांच्या ऐपतीप्रमाणे पैसे देत असत. पण तेव्हाही माझं मानधन हे नटापेक्षा जास्त असे. त्याकाळी नटाला दोनशे रुपये नाईट मिळत असे, आणि मी तीनशे रुपये घेई. आणि अनेकदा असंही झालं आहे की विक्रम गायकवाड अमुक एका नाटकासाठी रंगभूषा करणार हे कळल्यावर लोक ती रंगभूषा बघण्यासाठी गर्दी करत.

चिन्मय : आणि दूरचित्रवाणी मालिका व चित्रपट?

विक्रम : 'स्वामी' ही माझी पहिली मोठी दूरचित्रवाणी मालिका. त्यानंतर मी एक चित्रपट केला होता. 'पवळा' नावाचा. हा माझा पहिला चित्रपट. राम कदम यांनी दिग्दर्शन केलं होतं. पवळा आणि पठ्ठे बापूराव यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला होता. अशोक शिंदे व मेनका जळगावकर या फडावरील मोठ्या अभिनेत्री त्यात होत्या. या चित्रपटासाठी मी जे काम केलं, ते परत मी क्वचितच कधी करू शकलो. अशोक शिंदेला मी वयाच्या पंचविशीपासून ते ऐंशी वर्षांपर्यंतचा span दिला होता. त्यावेळी माझ्याकडे काहीच साधनं नव्हती. फक्त टिश्यू पेपर आणि कापूस वापरून मी ती सगळी रंगभूषा केली होती. त्याच दरम्यान मी 'जाणता राजा' करत होतो. नंतर 'राऊ' ही मालिका केली. त्याकाळी तीस मालिकांसाठी काम केलं मी. आता नावंही आठवत नाहीत. अर्थात फार सुरुवातीचं काम आहे हे. FTIIला असताना 'गांधी' चित्रपटासाठी सहाय्यक रंगभूषाकार म्हणूनही काम केलं होतं. या चित्रपटातले सारे फेटे मी बांधले आहेत. सर्व धोतरं मी नेसवली आहेत. बेन किंग्स्लेची रंगभूषाही मी केली होती.

चिन्मय : आपण 'संघर्ष जीवनाचा' या चित्रपटात एक भूमिका केली होती, आणि त्यासाठी आपल्याला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्याचा राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला. अभिनयाकडे आपण कसे वळलात?

विक्रम : अभिनय तर मी लहानपणापासून करत होतोच. गाणंही शिकायचो भारत गायन समाजात. पण झालं असं की, माझ्या घरची परिस्थिती अचानक बिघडली. मी शाळेत असताना माझे वडील वारले. त्यांनी आमची बरीचशी संपत्ती एका नातलगाकडे विश्वासाने सांभाळायला दिली होती, आणि नंतर त्याने ती परत द्यायला नकार दिला. त्यामुळे घर चालवण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. आई काही नोकरी करत नव्हती. पैसे मिळतील असं एकच काम मला येत होतं, आणि ते म्हणजे रंगभूषा. म्हणून शाळा सांभाळून रंगभूषेची कामं मी करू लागलो. आठशे-हजार रुपये दर महिन्याला मला मिळत आणि त्यातून माझं घर चालत असे. शाळाही सुरूच होती. पण त्यामुळे अभिनय आणि गाणं दोन्हीही मागे पडले.

त्याकाळीसुद्धा अभिनय किंवा गाणं करायचं असेल तर तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असावी लागे. तालमी, कपडे यांसाठी पैसे लागत. मग पुढे एखादा कलाकार आला नाही, तर बदली भूमिका मी करायचो. अनेक नाटकांत अश्या भूमिका केल्या. मग 'संघर्ष जीवनाचा' या चित्रपटाची रंगभूषा करताना एक कलाकार आला नाही म्हणून दोन दृश्यांमध्ये काम केलं. माझं काम दिग्दर्शकाला आवडलं म्हणून माझ्यासाठी अजून काही दृश्यं लिहिली गेली आणि त्या भूमिकेला पुरस्कार मिळाला. पुढे अनेकांनी मला नाटकांत, चित्रपटांत काम करण्याविषयी विचारले. पण रंगभूषेवर माझी उपजीविका अवलंबून होती. तेवढे पैसे मला अभिनय करून मिळाले नसते. शिवाय रंगभूषा हेच माझं जीवन होतं. त्यामुळे परत अभिनयाकडे मी वळलो नाही.

चिन्मय : फिल्म इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडल्यानंतर आपण परत रंगभूषेचं शिक्षण घेतलं का?

विक्रम : फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये मी नोकरीसाठी होतो. तिथे भरपूर शिकायला मिळालं ते वेगळं. तिथून बाहेर पडल्यावर मी कामांना सुरुवात केली. पण माझं शिक्षण म्हणजे भरपूर चित्रपट बघणं. राहुल, अलकाला प्रत्येक नवीन आलेला चित्रपट पाहायचो. मग त्यातील रंगभूषा बघून ती परत करून बघत असे. Moulds तयार करत असे. हेच माझं शिक्षण होतं. पुढे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटासाठी काम करत होतो तेव्हा न्यू यॉर्कला गेलो होतो. तिथे Research Council of Makeup Artists आहे. RCMA म्हणतात त्या संस्थेला. त्यांचं एक workshop मी केलं आणि नंतर त्यांची परीक्षा दिली. मॉडेल म्हणून मम्मुटी होता. त्याच्यावर मी सगळे प्रयोग केले, आणि परीक्षेच्या वेळीसुद्धा मॉडेल म्हणून तोच आला होता.

चिन्मय : आपण 'डॉ. आंबेडकर' या चित्रपटासाठी हे खास शिक्षण घेतलं होतं का?

विक्रम : नाही. या चित्रपटासाठीची रंगभूषा मी अगोदरच केली होती. पण त्यावेळी आपल्याकडे असा समज होता की एखाद्याकडे परदेशी प्रमाणपत्र नसेल तर त्याला काम येत नाही. भारतीयांचा प्रॉब्लेमच आहे हा. जोपर्यंत एखादा परदेशी, म्हणजे गोरा, माणूस येऊन तुमचं कौतुक करत नाही, तोपर्यंत तुमचं काम उत्कृष्ट आहे, हे मानलं जात नाही. तुमच्या डोळ्यांना काम दिसतं पण त्याची गुणवत्ता तुम्ही मान्य करत नाही, कारण गोर्‍या माणसाने त्यावर शिक्का मारलेला नसतो. म्हणून मला तिकडे प्रमाणपत्र मिळवायला जावं लागलं. त्यावेळी RCMAचे अध्यक्ष मला भेटले. फार मोठे रंगभूषाकार आहेत ते. त्यांचं नाव रिक बेकर. त्यांनी माझं काम बघितलं आणि मला म्हणाले की तुला या परीक्षेला बसायची अजिबात गरज नाही. त्यांना मी केलेलं काम फार आवडलं होतं. वास्तविक ते माझ्यापेक्षा फार मोठे. 'Nutty Professor' या चित्रपटात एडी मर्फीची रंगभूषा त्यांनी केली होती. त्यांच्या कामासमोर माझं काम खरंच किरकोळ होतं. पण त्यांनी त्या कामामागची मेहनत ओळखली. आपल्याकडे मात्र सहसा असं होत नाही.

चिन्मय : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटाअगोदर 'सरदार' या चित्रपटासाठी आपण केलेली रंगभूषा बरीच गाजली. पडद्यावर शंभर टक्के अस्सल सरदार वल्लभभाई पटेल दिसले, यात श्री. परेश रावळ यांच्या अभिनयकौशल्याइतकाच आपल्या रंगभूषेचाही वाटा होता.

विक्रम : 'सरदार' हा चित्रपट अगदी अपघातानं माझ्याकडे आला. काही गोष्टी या अपघातानं, किंवा योगायोगानं, घडतात. ध्यानीमनी नसताना अशा काही घटना घडतात की तुमचं संपूर्ण आयुष्यच त्यामुळे बदलून जातं. त्याचं झालं असं की, संजय वैद्य नावाचे एक गृहस्थ एकदा आमच्या दुकानात आले. दुकानात मी, बाबा असे बसलो होतो. हे संजय वैद्य एक हौशी नाट्यकलावंत होते. ते बाबांना म्हणाले की, 'सरदार पटेलांवर एक चित्रपट निघतो आहे. आजच मी पेपरात जाहिरात वाचली. श्याम बेनेगल निर्माते आहेत आणि केतन मेहता दिग्दर्शक. या सिनेमात मला काम करायचंच आहे. तर मला कुठला रोल मिळू शकेल?' आता हे वैद्य चांगले सहा फूट उंच होते. म्हणून बाबा म्हणाले की, 'तुला एकच रोल मिळू शकतो. खान अब्दुल गफार खान यांचा.' वैद्य म्हणाले, 'मग मला ताबडतोब मेकअप करून द्या. मी लगेच फोटो काढतो आणि बेनेगलांच्या ऑफिसात नेऊन देतो.' बाबांनी मला वैद्यांचा मेकअप करायला सांगितलं.

मग आम्ही बोहरी आळीत जाऊन मेण आणलं. खान अब्दुल गफार खान यांचं नाक मोठं आणि धारदार होतं. म्हणून मेणाचं नाक लावलं. सुट्ट्या केसांची दाढी लावली. टोपी, कुर्ता असं सगळं व्यवस्थित घातलं. भरत नाट्य मंदिराच्या मागे 'वामनस्मृती' नावाची इमारत होती. तिथे वैद्य कॉटबेसिसवर राहायचे. या इमारतीच्या गच्चीवर साध्या हॉटशॉटच्या कॅमेर्‍यानं आम्ही वैद्यांचे फोटो काढले. ते फोटो घेऊन वैद्य तडक श्याम बेनेगलांच्या ऑफिसात गेले. अपॉइंटमेंट वगैरे आधी काही घेतली नव्हती. त्यांनी श्यामबाबूंच्या टेबलावर ते फोटो ठेवले आणि म्हणाले, 'मी पुण्याचा एक कलाकार आहे. मला तुमच्या चित्रपटात खानसाहेबांचा रोल करायचा आहे.' श्यामबाबू म्हणाले, 'ते आपण नंतर बघू. आधी तुमचा मेकअप कोणी केला ते सांगा.' श्यामबाबूंनी माझा फोननंबर घेतला आणि मला फोन केला. त्यावेळी आमच्या घरासमोरच्या मारवाड्याकडे फोन होता. त्यांनी फोन केला तेव्हा मी एका नाटकाच्या रंगभूषेसाठी दौर्‍यावर गेलो होतो. आल्यावर मला निरोप मिळाला आणि मी श्यामबाबूंना भेटायला गेलो. तोपर्यंत मुंबईतील अठरा रंगभूषाकारांनी परेश रावळच्या चेहर्‍यावर वेगवेगळे प्रयोग केले होते. पण कोणालाच ते काम नीट जमत नव्हतं. मी श्यामबाबूंना भेटलो, परेश रावळ यांची पूर्ण रंगभूषा केली आणि त्यांनी लगेच माझी त्या चित्रपटासाठी नेमणूक करून टाकली. म्हणजे पहा, सदाशिव पेठेत राहणारा एक रंगभूषाकार काहीही कल्पना नसताना एकदम एका आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी काम करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या या पहिल्याच मोठ्या कामाचं कौतुकही खूप झालं.

या चित्रपटाच्या वेळी माझी परेश रावळशी मैत्री झाली. अजूनही ती टिकून आहे. अनेकदा माझा संबंध नसतानाही तो काम करत असलेल्या चित्रपटांसाठी मी त्याला रंगभूषा कशी असावी, ते सुचवतो. 'हेराफेरी'मधील बाबूराव आपटे, 'कभी ना कभी'मधील कचरासेठ या भूमिकांसाठीची रंगभूषा मीच सुचवली होती.

sardar1.jpg

'सरदार' या चित्रपटात परेश रावळ यांची तरुणपण ते म्हातारपण अशी रंगभूषा होती. सरदार पटेलांच्या व्यक्तिमत्त्वातले सूक्ष्म बदल त्या रंगभूषेत दिसणं अपेक्षित होतं. उदाहरणार्थ, सरदार पटेल बॅरिस्टर होण्यापूर्वी बार असोसिएशनच्या क्लबात पत्ते खेळायचे. द. अफ्रिकेतून भारतात परतल्यावर गांधीजींचं पहिलं भाषण तिथे झालं होतं. सरदार पटेलांनी ते ऐकलं आणि गांधीजींचे विचार ऐकून ते प्रभावित झाले. अगोदर मात्र त्यांचा गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर अजिबात विश्वास नव्हता. एक माणूस संपूर्ण इंग्रजी साम्राज्याला वेठीस धरू शकतो, यावर त्यांचा विश्वास नव्हता. ते भाषण ऐकल्यावर मात्र ते गांधीजींचे अनुयायी झाले. तर हे सगळे टप्पे मला त्या चित्रपटात दाखवायचे होते, आणि ते करताना खूप मजा आली.

आज मात्र मी प्रामाणिकपणे कबूल करतो की 'सरदार'च्या रंगभूषेत काही त्रुटी होत्या. काही चुकाही झाल्या होत्या. अर्थात प्रेक्षकांच्या त्या लक्षात येणार नाहीत. पण आज माझ्या मलाच त्या खटकतात. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', 'बोस - द फरगॉटन हिरो' हे चित्रपट मात्र निर्दोष आहेत. अर्थात हल्ली HD कॅमेरे आले आहेत. दाढीचा प्रत्येक केस, चेहर्‍यावरील प्रत्येक रंध्र त्या कॅमेर्‍यात व्यवस्थित दिसतं. त्यामुळे मलाही सतत काळजीपूर्वक काम करावं लागतं.

चिन्मय : श्री. श्याम बेनेगल यांच्या 'द मेकींग ऑफ महात्मा', 'सरदारी बेगम', 'झुबेदा', 'हरीभरी', 'बोस - द फरगॉटन हिरो', 'वेलकम टू सज्जनपूर' यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी आपण रंगभूषा केली आहे. त्यांच्याकडून आपल्याला काय शिकायला मिळालं?

विक्रम : Shyambabu is an institution. चित्रपट आणि चित्रपटाचं तंत्र यासंबंधी त्यांच्याइतकं ज्ञान आपल्याकडे क्वचितच कोणाकडे असेल. आणि केवळ चित्रपटच नव्हे, तर इतर असंख्य विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. तुम्ही त्यांना कोणताही प्रश्न विचारा, आणि त्याचं उत्तर ते देतील. अगदी सुईपासून समुद्राच्या पोटात असणार्‍या प्रवाळापर्यंत अनेक गोष्टींची त्यांना व्यवस्थित माहिती आहे. शरीरशास्त्र, मानववंशशास्त्र (anthropology), मानवी नातेसंबंध, निसर्ग, भारतातील विविध भागातील लोक, त्यांचे केस, त्वचेचा पोत, दाढीमिशीची ठेवण अशा वेगवेगळ्या गोष्टी मी श्यामबाबूंबरोबर राहून शिकलो. एखाद्या गोष्टीचा खोलात जाऊन नीट अभ्यास कसा करायचा हे मी त्यांच्याकडून शिकलो. त्यांच्या अनेक चित्रपटांसाठी मी वेशभूषा केली आहे. चित्रपटसृष्टीत मला मान मिळाला तो त्यांच्यामुळेच. त्याच्या चित्रपटांत काम केलेल्या माणसाला परत आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागत नाही. श्यामबाबूंनी निवडलेला माणूस हा उत्कृष्टच असेल, अशी लोकांची खात्री असते. त्यामुळे चित्रपटसृष्टीत माझं नाव श्यामबाबूंमुळेच झालं. आंतरराष्ट्रीय पातळीवर मला नाव मिळालं ते 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटामुळे. अगदी कान, व्हेनिस, मॉस्कोच्या चित्रपट महोत्सवांतसुद्धा मी केलेली रंगभूषा नावाजली गेली होती.

चिन्मय : 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटासाठी रंगभूषा करताना आपले अनुभव कसे होते?

विक्रम : मम्मुटीच्या घरी मी डॉ. जब्बार पटेलांबरोबर गेलो, तेव्हा मी पटकथेचा नीट अभ्यास केला होता. C-DACमधून मम्मुटीच्या चेहर्‍यावर मी करणार असलेली रंगभूषा व्यवस्थित मॉर्फ करून घेतली होती. डॉ. पटेलांनी मला सांगितलं होतं की, दाक्षिणात्य नटांना त्यांची मिशी खूप प्रिय असते. त्यामुळे मी चार-पाच मिश्या बरोबर घेतल्या होत्या. मम्मुटीच्या घरीच आम्ही रंगभूषा करणार होतो. मम्मुटी डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेत शोभून दिसतो की नाही, हे आम्हाला अगोदर बघायचं होतं. त्याच्या घरीच रंगभूषा करावी, अशी त्याची इच्छा होती, म्हणून आम्ही त्याच्या घरी गेलो. मी कोणी खूप मोठा आंतरराष्ट्रीय दर्जाचा रंगभूषाकार आहे, असा बहुतेक त्याचा समज झाला असावा, कारण त्याने मला अतिशय आदराने वागवलं. तो मला आत त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला, 'माझ्या चेहर्‍याकडे नीट बघ, आणि सांग की मी खरंच डॉ. आंबेडकरांसारखा दिसू शकेन की नाही. आणि मिशीचासुद्धा प्रॉब्लेम आहेच.' मी म्हटलं, 'तुम्ही नक्की बाबासाहेबांसारखे दिसाल. अजिबात काळजी करू नका. फक्त रंगभूषा करत असताना मी आरसा दाखवणार नाही.' या चित्रपटात बाबासाहेबांच्या आयुष्यातील साधारण पन्नास वर्षांचा काळ दाखवला जाणार होता आणि बाबासाहेब त्यांच्या साठीत जसे दिसत, त्या रंगभूषेपासून सुरुवात केली. मिशी काढली, टक्कल लावलं. कोट, चष्मा घातला. आणि अचानक एका मोठ्या आरशासमोर त्याला मी उभं केलं.

VG2.jpg

माझ्या आयुष्यात अशा फार कमी घटना घडल्या आहेत की ज्यांमुळे मी स्वतःच स्तिमित झालो असेन. पण मम्मुटीचं बदलेलं रूप पाहून मीच आश्चर्यचकित झालो होतो. मम्मुटी पाच मिनिटं शांतपणे आरशासमोर उभा होता. आणि मग एकदम वळला आणि मला मिठी मारली. डोळ्यांत पाणी होतं त्याच्या. मला म्हणाला, ' You are a magician. मी स्वतःलाच त्या आरशात शोधत होतो. मी कसा दिसतो, हेच मी विसरून गेलो होतो.' मग तो तसाच स्वयंपाकघरात गेला. त्याची बायको स्वयंपाक करत होती. सरळ आत जाऊन तिला म्हणाला, 'Hello, I have come to meet Mr. Mammootty. कुठे आहे तो?' ती ओरडली, 'तुम्ही आधी इथपर्यंत आलातच कसे? ताबडतोब बाहेर व्हा.' मग मम्मुटीने तिला सांगितल्यावर तिच्या लक्षात आलं. डॉ. पटेलांनाही खूप आनंद झाला. लगेच चित्रीकरण कुठे, कधी करायचं हे ठरलं. त्या दिवशी मम्मुटीने मला त्याच्या घरी ठेवून घेतलं. रात्री जेवायला बाहेर नेलं. खरं म्हणजे त्याच दिवशी मला कमल हासनला भेटायला जायचं होतं त्याच्या चित्रपटासाठी. पण डॉ. आंबेडकरांसारखं दिसणं आणि त्यांची भूमिका करायला मिळणं, हे मम्मुटीसाठी इतकं आनंददायक होतं की त्याने मला माझे सर्व कार्यक्रम रद्द करायला लावले.

VG3.jpg

मग दुसर्‍या दिवशी आम्ही बाबासाहेबांच्या तरुणपणापासून म्हातारपणापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांतील सर्व रंगभूषा केल्या. फोटो काढले. पुढे दोन वर्षं आम्ही या चित्रपटाचं चित्रीकरण करत होतो. असंख्य लोकेशन्स, पात्रं होती. शेकडो व्यक्तिरेखा होत्या. सरदार पटेल, गांधी, नेहरू, इंग्रज अधिकारी हे त्या त्या वयांत कसे दिसत याचा अभ्यास करणं, संदर्भ तपासणं, असं भरपूर काम होतं. त्या दोन वर्षांत मी मम्मुटीबरोबर माझ्या आयुष्यातील खूप सुंदर काळ घालवला. आम्ही एकमेकांचे अतिशय चांगले मित्र बनलो. अगदी डबिंगसाठी तीन दिवस मुंबईला येणार असला तरी मला तिथे तो बोलावून घ्यायचा. मम्मुटी लगेच होमसिक होतो. त्याला सतत त्याच्या जवळची माणसं आसपास हवी असतात. तर तो मुंबईत असला की मला हॉटेल लीलाला बोलवायचा आणि तिथे राहायला लावायचा. संध्याकाळी फिरायला जाताना माझी जुनी मारुती गाडी स्वतः ड्राईव्ह करायचा. त्याची मर्सिडीझ मागे असायची. मग नंतर त्याने माझ्या गाडीत ए.सी., सीडी प्लेअर असं सगळं लावून घेतलं. मुंबईत आम्ही पुष्कळ भटकलो. पण बाहेर फिरायला जातानासुद्धा मेकअप करावा लागे. खोट्या दाढीमिशा, टोप्या. कारण मुंबईत बहुतेक सगळी हॉटेलं दाक्षिणात्यांची आणि दाक्षिणात्य लोकही भरपूर. मम्मुटी त्यांचा सुपरस्टार. त्याला दक्षिणेत अगदी देवाचा अवतारच समजतात. त्यामुळे त्याला कोणी ओळखलं तर पंचाईत. म्हणून आम्ही रोज वेगवेगळे मेकअप करून बाहेर पडायचो.

याच चित्रपटात मोहन गोखलेने गांधीजींची भूमिका केली होती. त्याची रंगभूषाही खूप सुरेख वठली होती. त्याने कामही सुंदर केलं. 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर'मुळे अगदी राष्ट्रपती भवनापासून ते ऑस्कर कमिटीपर्यंत माझं काम पोहोचलं.

चिन्मय : आपण श्यामबाबूंबद्दल बोलत होतात. त्यांच्याकडे केलेल्या चित्रपटांपासून आपली कारकीर्द सुरू झाली. इतर दिग्दर्शकांबरोबर काम करताना आपल्याला त्या अनुभवाचा काही फायदा झाला का?

विक्रम : मी आधी म्हटल्याप्रमाणे एकदा श्यामबाबूंकडे काम केल्यावर लोक तुम्हाला काही शिकवण्याचा प्रयत्न करत नाहीत. तुम्हाला प्रचंड मान दिला जातो. त्यामुळे सुभाष घई, संजय लीला भन्साली, राजकुमार संतोषी यांनी कायम अनेक गोष्टींत माझ्याशी सल्लामसलत करूनच निर्णय घेतले आहेत. प्रत्येक सिनेमात एखादं पात्र कसं दिसेल हे ठरवण्यात अंतिम निर्णय माझा असतो.

श्यामबाबू अभिनेत्यांशी कसं वागतात हे बघून मीसुद्धा अभिनेत्यांशी त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. श्यामबाबूंकडे शिकलेल्या अनेक गोष्टी इतर दिग्दर्शकांकडे काम करताना माझ्या उपयोगी येत असतात. अनेकदा असं होतं की अभिनेत्यांना लहानसहान गोष्टींचं ज्ञान नसतं. उदाहरणार्थ, मान थोडी खाली झुकवली की डोळे मोठे दिसतात. देहबोलीचं ज्ञान त्यांना नसतं. माझी रंगभूषा अशामुळे वाया जाऊ शकते. म्हणून मी त्यांना काही गोष्टी सांगतो. आता मी 'Meridian' नावाचा एक इंग्रजी चित्रपट केला. लंडनला चित्रीकरण केलं. त्यात अर्जुन रामपाल ७४ वर्षांचा म्हातारा दाखवला आहे. सुंदर रंगभूषा केली मी, पण तो त्या रंगभूषेत चालायला लागला ते एखाद्या मॉडेलसारखा. म्हातारपणी खांदे वर येतात, मान आत जाते, हे त्याच्या गावीही नव्हतं. मग त्याला कसं चालायचं हे मी दाखवलं. अजय देवगण आणि काजोल यांचा म्हातारपणीचा मेकअप मी केला होता. तेव्हा अजय देवगणलाही मी कसं चालायचं ते शिकवलं होतं कारण तो धड चालला नाही तर माझी मेहनत वाया जाणार. मुळात अभिनय हा या लोकांचा प्रांत नाही. मारधाड करणं, चांगले कपडे घालून नाचणं हे त्यांचं कार्यक्षेत्र. म्हणून मला मी केलेल्या रंगभूषेची काळजी घ्यावी लागते.

चिन्मय : पण विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटांत 'मकबूल' व 'ओंकारा' या चित्रपटांत आपण काही अस्सल अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. तसंच 'स्टार' असलेल्या बिपाशा बसू, विवेक ओबेरॉय, करीना कपूर यांच्याबरोबरही काम केलं आहे. तेव्हाचा आपला अनुभव कसा होता?

VG78.jpg

विक्रम : विशाल भारद्वाज मला संपूर्ण स्वातंत्र्य देतो. 'मकबूल'मध्ये फार मोठे लोक होते. नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, पंकज कपूर, इरफान, तबू वगैरे. त्या रंगभूषेचं texture खूप सुरेख होतं. पंकज कपूर यांनी अब्बाजींची भूमिका केली होती. त्यांचं पुढे आलेलं पोट, चेहर्‍यावर असलेला निबरपणा असं सगळं मस्त जमून आलं होतं. त्यांचा थोडा जाड मेकअप, ओम पुरी व नासीरसाहेबांच्या मिशा व केस, तबूचं थोराड दिसणं हे सगळं मला छान दाखवता आलं होतं. आणि हे सगळे कसलेले 'अभिनेते' असल्याने माझ्या रंगभूषेचंही चीज झालं. तबूच्या ऐवजी दुसरी एखादी अभिनेत्री असती तर कदाचित मला तिला थोराड दाखवणं शक्य झालं नसतं. पण तबूची अजिबात तक्रार नसल्याने अगदी थोडा मेकअप वापरून मी तिचं वय वाढवू शकलो. तिचं हरलेपण आणि महत्त्वाकांक्षी वृत्ती पडद्यावर नीट दिसली.

VG8_0.jpg

'ओंकारा'मध्ये खूप वेगळी रंगभूषा केली होती मी. उत्तर प्रदेशात हा चित्रपट घडतो, आणि यातील बहुतेक पात्रं ही गुंड आहेत. सैफ अली खानला आम्ही केस कापायला लावले. सहा महिने त्याने आम्हाला त्रास दिला. त्याला केस कापून घ्यायचे नव्हते. मी विशालला सांगितलं की याने केस कापून घेतले नाहीत तर मी हा चित्रपट करणार नाही. विशालने सैफला सांगितलं की त्याने जर केस कापले नाहीत तर तो हा चित्रपटच तयार करणार नाही. मग कसाबसा सैफ तयार झाला. त्याने 'हो' म्हणताक्षणीच माझ्या न्हाव्याने त्याचे केस कापून टाकले. करीना कपूरलाही मी तिने केलेला मेकअप काढायला लावला. तिने खूप वाद घातला माझ्याशी. चित्रपटात मेकअप करायचा नाही, हे तिला पचनीच पडत नव्हतं. तिला समजावलं की हा वेगळा चित्रपट आहे, यात तुला रंगभूषेची गरज नाही. मग ती तयार झाली, पण तिला blusher हवं होतं. मी मलमलचा एक तुकडा ओला करून तिच्या गालावर घासला. तिचे गाल लाल झाले. मग नंतर तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि लक्षात आलं की आपण रंगभूषेशिवाय सुंदर दिसतो. 'झुबेदा'मध्ये करिष्माही अशीच सुंदर दिसली होती.

नासीरसाहेबांना मात्र जेव्हा मी त्यांच्या रंगभूषेबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी लगेच माझ्या सर्व कल्पना मान्य केल्या. त्याच दिवशी टक्कल करून घेतलं आणि मिशी कापून घेतली. खूप वेगळा लूक होता त्यांचा या चित्रपटात. टक्कल, काळा गॉगल, धोतर यांमुळे ते एकदम वेगळे दिसले. त्यांच्या काही हालचाली या गांधीजींशी साधर्म्य दाखवणार्‍या होत्या. 'गांधींचं नाव घेऊन कृष्णकृत्य करणारा पुढारी' असं काहीसं आम्हाला त्यातून सुचवायचं होतं. त्यांचा त्या चित्रपटातील एकंदर वावरच खूप अंगावर येणारा होता. पुढे टक्कल केलेलं असल्याने 'गांधी v/s गांधी' या नाटकाचे प्रयोगही केले. कोंकोनानेसुद्धा एका शब्दाने मला रंगभूषेबद्दल विचारलं नाही. मी तिला सांगितलं तसं केलं. तर कलावंतांमध्ये हा असा फरक असतो.

चिन्मय : 'मकबूल'शिवाय पंकज कपूर यांच्याबरोबर आपण इतर अनेक चित्रपटांत काम केलं आहे. 'The blue umbrella' या चित्रपटात आपण केलेली रंगभूषा अप्रतिम होती. त्यात पंकज कपूर यांचा थंडीमुळे निळसर झालेला चेहरा, दाढीचे खुंट आणि चेहर्‍यावरील निमिषार्धात बदलणारे भाव, हे सारं निव्वळ थोर होतं.

tbupk.jpg

विक्रम : या चित्रपटाच्या वेळीही एक गंमत झाली होती. या चित्रपटात काम करायला जी लहान मुलं निवडली होती ती सगळी लहान गावातली आणि झोपडपट्टीत राहणारी अशी होती. अभिनयाचा त्यांना अजिबातच अनुभव नव्हता. विशाल भारद्वाजने त्या मुलांना एका कार्यशाळेसाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला पाठवलं. पंकज कपूर यांनीही एक कार्यशाळा खंडाळ्याला घेतली. पंकज कपूर यांची रंगभूषा मी पूर्ण design केली होती. त्यानुसार त्यांनी मिशी वाढवली. केस कापले. त्यांना मी खोटे दात लावले होते आणि त्यांच्या त्या दातांवर तंबाखूचे डाग लावले होते. आम्हा सगळ्यांनाच ती रंगभूषा फार आवडली.

डलहौसीजवळ खज्जियार येथे आमचं चित्रीकरण सुरू झालं. पहिली दोन दृश्यं चित्रीत झाली आणि पंकज कपूर मला जरा बाजूला घेऊन गेले. मला म्हणाले, 'विक्रम, ही मुलं खूप नैसर्गिक अभिनय करत आहेत. खूप fresh मुलं आहेत ही. हे खोटे दात लावल्यामुळे त्यांच्यात मी विचित्र दिसतो आहे. तर हे दात काढले तर चालेल का?' मला त्यांचं म्हणणं पटलं. मी ते दात काढले आणि ती दोन दृश्यं आम्ही परत चित्रीत केली. म्हणजे बघ, काही अभिनेते किती खोल विचार करतात. संपूर्ण चित्रपटाचा विचार त्यांच्या डोक्यात घोळत असतो.

चिन्मय : एकीकडे नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, पंकज कपूर, परेश रावळ, कमल हासन, मम्मुटी यांसारखे थोर अभिनेते, तर दुसरीकडे अर्जुन रामपाल, सैफ अली खान, अजय देवगण, अक्षय कुमार यांसारखे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी नट. रंगभूषेच्या दृष्टीने विचार करताना या दोन गटांत आपल्याला काय फरक जाणवतो? ही सर्व मंडळी व्यक्तिरेखेचा आणि पर्यायाने रंगभूषेचा सारखाच विचार करतात का?

विक्रम : तू जी सुरुवातीला नावं घेतलीस ती खरोखर थोर मंडळी आहेत. आणि मी अगोदर उदाहरणं दिली त्याप्रमाणे त्यांना ते साकारत असलेल्या व्यक्तिरेखेसारखं दिसायचं असतं. त्या व्यक्तिरेखेने आपल्यासारखं दिसावं असा त्यांचा हट्ट नसतो. स्टार मंडळींना मात्र आपण कसे दिसतो, यात जास्त इंटरेस्ट असतो. व्यक्तिरेखेची त्यांना फारशी काळजी नसते. भरतमुनींनी नाट्यशास्त्रात काय सांगितलं आहे? तर अभिनेता हा पिशाच्चाप्रमाणे असला पाहिजे. त्याने परकायाप्रवेश केला पाहिजे. पण दिलीपकुमार, अमिताभ बच्चन किंवा इतर स्टारमंडळींना परकायेने आपल्यात प्रवेश करावा अशी इच्छा असते. कारण त्यांना स्वतःच्या दिसण्यात अधिक रस असतो. जुने चित्रपट बघ म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल. राजेश खन्ना काय किंवा अमिताभ बच्चन काय, प्रत्येक चित्रपटात सारखेच दिसायचे. नायिकासुद्धा नदीवर पाणी भरायला जाताना, जेवताना, झोपताना, लग्नात, गुंडांसमोर नाचताना, मरताना त्याच रंगभूषेत असायच्या, प्रत्येक दृश्यात सारख्याच दिसायच्या. अर्थात अजूनही यात फारसा फरक झालेला नाही. हल्लीचे स्टारही प्रत्येक चित्रपटात सारखेच दिसतात आणि सारखाच अभिनय करतात.

याचं कारण म्हणजे, 'आपण पडद्यावर जराही वेगळे दिसलो तर लोकांना आवडणार नाही', अशी असुरक्षिततेची भावना त्यांना सतत त्रास देत असते. अर्थात पूर्वीही बलराज साहनी, संजीव कुमार यांसारखे अभिनेते आपल्या इमेजचा विचार न करता व्यक्तिरेखेचा विचार करत. पण हे अपवाद झाले. स्टार लोकांनी ठरवूनच ठेवलं आहे की ते पडद्यावर जसे दिसतात तशीच ती व्यक्तिरेखा दिसणं अपेक्षित आहे. त्यांनी स्वतःच तशी समजून करून घेतल्याने तुमच्याआमच्या मतांची त्यांना गरज भासत नाही. शिवाय त्यांनी चित्रपटात कसंही काम केलं, चित्रपटाला कथानक नसलं तरी त्यांचे चित्रपट चालतात. लोक गर्दी करतात. त्यामुळे त्यांना वाटतं की आपण व्यक्तिरेखेसारखं दिसलो नाही तरी चालतं, 'आपण' पडद्यावर दिसलो म्हणजे लोक खूष असतात.

आता झालं असं आहे की जगभरातील चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतात. उत्कृष्ट रंगभूषा असते. आपले कलाकार मात्र पन्नास-शंभर चित्रपटांमध्ये तसेच दिसतात, तसाच अभिनय करतात. प्रत्येक स्टारचे हावभाव प्रेक्षकांना पाठ झालेले असतात. एखादा सुपरस्टार आता कसा हसेल, कसा रडेल हे डोळे मिटून सांगता येतं. मग असं म्हणावसं वाटतं की, बाबारे, तू प्रत्येक चित्रपटात सारखाच अभिनय करतोस, निदान वेगळं दिसण्याचा तरी प्रयत्न कर.

या स्टारलोकांचे इगोही खूप मोठे असतात. त्यांना त्यांच्याआधी रंगभूषाकाराचे नाव येणं मान्य नसतं. त्यामुळेही काही प्रयोग करायची त्यांची तयारी नसते.

'अल्लाह के बंदे' नावाचा एक चित्रपट मी एवढ्यात केला. त्यात नसिरुद्दीन शाहसाहेब आहेत. त्यात नासीरसाहेबांचं शरीर सडलेलं दाखवायचं होतं. ती व्यक्तिरेखा गतजन्मी काहीतरी पाप करते आणि त्याची शिक्षा म्हणून अंग सडतं. मी रुग्णालयांत जाऊन अभ्यास केला आणि त्याप्रमाणे रंगभूषा केली. सात तास लागले मला सगळं काम करायला. पण नासीरसाहेबांनी एका शब्दाने तक्रार केली नाही. संपूर्ण सहकार्य केलं. 'Such a long journey' या चित्रपटात नासीरसाहेबांनी कर्नल बिलीमोरीयाची भूमिका केली होती. या कर्नलवर विषबाधा केली जाते. काविळीचे जंतू त्याच्या शरीरात सोडले जातात. तर काविळीच्या जंतूमुळे मरणासन्न रुग्णाची रंगभूषा मी केली होती. त्यावेळी त्या भूमिकेसाठी नासीरसाहेबांनी व्यायाम करून शरीर कमावलं होतं. पण आता काविळीचा रुग्ण दाखवायचा तर तो कृश हवा. मग मी मधे खोल असलेला पलंग आणला. नासीरसाहेब त्यावर झोपल्यावर त्यांच्या शरीराचा बराचसा भाग आपोआप खाली गेला आणि ते कृश दिसू लागले. या दोन्ही रंगभूषा पाहून ते अतिशय आनंदी झाले होते. 'इष्कीया' हा अभिषेक चौबेचा नवा चित्रपट येतो आहे. विशाल भारद्वाजचा हा सहाय्यक. त्यात नासीरसाहेबांबरोबर विद्या बालन आहे. एरवी नासीरसाहेब केस काळे करायला नकार देतात. अकारण तरुण दिसणं त्यांना आवडत नाही. पण या चित्रपटासाठी त्यांनी केस रंगवले आहेत. सांगण्याचा मुद्दा हा की एखादी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेतात. रंगभूषेचं महत्त्व त्यांना ठाऊक आहे. प्रत्येक चित्रपटाच्या आधी ते माझ्याशी चर्चा करतात, आणि मगच त्या रंगभूषाकाराला रंगभूषा करण्याची परवानगी देतात. आपल्या कामावर जबरदस्त निष्ठा असलेला हा कलावंत आहे.

पंकज कपूरसुद्धा भूमिकेची गरज असेल त्याप्रमाणे दाढीमिशा वाढवतात. खोट्या दाढीमिशा लावणं त्यांना आवडत नाही. ते २-३ महिने घरी बसून केस, दाढीमिशा वाढवतात आणि मग मी गरजेप्रमाणे आकार देतो. 'धर्म' चित्रपटात त्यांनी टक्कल केलं होतं. दाढीमिशी काढली होती. प्रत्येक चित्रपटासाठी ते ही मेहनत घेतात. याउलट अमिताभ बच्चन यांना रंगभूषेसाठी वेळच नसतो. 'खाकी', 'अक्स' या चित्रपटांत मी त्यांच्याबरोबर काम केलं. त्यांना दहा मिनिटांत सर्व रंगभूषा करून हवी असायची. कारण त्यांच्याकडे वेळ नाही. 'ब्लॅक' या चित्रपटाच्या वेळी शेवटी मी वैतागून काम सोडून दिलं. रंगभूषेला तुम्ही इतकं कमी कसे लेखू शकता? मग त्यांनी माकडटोपी वगैरे घालून वेळ मारून नेली. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या वेळी मात्र हे स्टार आपण या 'लूक'साठी किती मेहनत घेतली हे सांगत फिरतात. त्यातल्या निम्म्या गोष्टी खोट्या असतात. सैफने आपण कसे टॅन झालो याच्या हकिकती सांगितल्या होत्या. आम्ही त्याला काळा रंग फासला होता. आता 'कमीने' चित्रपटात शाहीद कपूरच्या भन्नाट रंगभूषा आहेत. त्याच्याही मुलाखतींत तो असंच काहीतरी सांगत सुटेल. हॉलिवूडमध्ये प्रत्येक नट आपल्या दिसण्यावर, म्हणजे व्यक्तिरेखेसारखं दिसण्यावर, प्रचंड मेहनत घेतो. आपल्याकडे सगळा आनंदच आहे याबाबतीत.

चिन्मय : आपण मघाशी म्हणालात तसं काही चित्रपटांमध्ये रंगभूषा असूनही कळत नाही. मला एक उदाहरण आठवतं आहे ते म्हणजे 'मनोरमा सिक्स फीट अंडर' या चित्रपटाचे. या चित्रपटात गुल पनाग, अभय देओल, रायमा सेन हे कलाकार इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळे दिसतात. सकृतदर्शनी या कलाकारांनी रंगभूषा केली आहे, हे कळत नाही. मात्र इतर चित्रपटांपेक्षा या चित्रपटात ते वेगळे दिसतात, याचा अर्थ रंगभूषा उत्कृष्ट झाली आहे. याचं गमक काय?

VG89.jpg

विक्रम : तू म्हणतोस ते बरोबर आहे. ज्या चित्रपटात नटांनी रंगभूषा केली आहे, हे लगेच कळत नाही, ती उत्तम रंगभूषा. आता 'मनोरमा सिक्स फीट अंडर' या चित्रपटात अभय देओल हा PWDमध्ये अभियंता आहे. त्याची मिशी, त्याची रापलेली त्वचा, दाढीचे खुंट या गोष्टीमुळे इतर चित्रपटांत दिसतो तसा देओल घराण्यातला हिरो तो या चित्रपटात दिसत नाही. गुल पनाग ही एक मॉडेल आहे. इतर चित्रपटांमध्ये ती ग्लॅमरस दिसते. या चित्रपटात ती राजस्थानातल्या एका गावात राहणारी एक गृहिणी दाखवली आहे. तिला सहा वर्षांची एक मुलगी आहे. त्यामुळे तिची रंगभूषा एका लहान गावातल्या सुशिक्षित गृहिणीची असते तशीच केली आहे. तिचा पोलीस इन्स्पेक्टर भाऊ किंवा रायमा सेन पटकथेनुसार जसे दिसायला हवेत, तसेच दिसतात. रायमा सेन व सारिका यांची रंगभूषा इतकी सौम्य आहे की त्यांचं मुळचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. कुलभूषण खरबंदांनी असंख्य चित्रपटांत मंत्र्याची भूमिका केली आहे. या चित्रपटात त्यांची मिशी आणि त्यांचा भांग बघ. तो वेगळा आहे. ते चित्रपटभर राजस्थानातले एक मंत्रीच दिसतात आणि शेवटच्या दृश्यात रंगभूषेत काही फरक न करताही त्यांचा लंपटपणा चेहर्‍यावर दिसतो. अशी रंगभूषा चटकन लक्षात येत नाही, आणि हेच त्या रंगभूषेचं यश आहे.

चिन्मय : पण 'सरदार', किंवा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' यांसारख्या चित्रपटांत रंगभूषा पहिल्याप्रथम लक्षात येते. कारण परेश रावळ किंवा मम्मुटी हे नट सरदार पटेल किंवा बाबासाहेबांसारखे दिसणं अर्थातच शक्य नाही. पण चित्रपटात तसे ते दिसतात आणि याला कारणीभूत असते ती उत्तम रंगभूषा. मग अमुक एका प्रकारची रंगभूषा अधिक चांगली, हे कसं?

विक्रम : ऐतिहासिक चित्रपटांत रंगभूषा लगेच लक्षात येते आणि म्हणून तिचा दर्जा कमी, असं मी म्हणणार नाही. अशा चित्रपटांत पात्रांनी कसं दिसावं यात स्वातंत्र्य घेता येत नाही, आणि म्हणून रंगभूषाही नेमकी करावी लागते. परेश रावळ जेव्हा सरदार पटेलांसारखा 'दिसतो' असं प्रेक्षकाला वाटतं, तेव्हा माझ्या रंगभूषेला दाद मिळालेली असते. 'रंगभूषा लक्षात न येणं', हे इतर चित्रपटांमध्ये आवश्यक असलं तरी ऐतिहासिक चित्रपटांत कलाकाराने त्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वासारखं दिसणं अपेक्षित असल्याने रंगभूषेची नोंद घेतली जाणं स्वाभाविक आहे.

आता परेश रावळसारखा नट जेव्हा दोन-अडीचशे चित्रपटांत काम करतो आणि रोज आपल्याला टिव्हीवर दिसतो, तेव्हा त्याची रंगभूषा करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण त्याचा चेहरा प्रेक्षकाच्या नीट लक्षात राहिलेला असतो. अमुक एक भूमिका 'परेश रावळ' करतो आहे, हे चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या लक्षात असतं. मग परेश रावळसारख्या overexposed कलाकाराची दोन प्रकारे रंगभूषा करता येते. अतिशय तरल अशी रंगभूषा करायची की जेणेकरून त्याच्या चेहर्‍यात बदल होतील, आणि त्याचा चेहरा वेगळा वाटू लागेल. किंवा व्यक्तिरेखेच्या गरजेनुसार नाक, कान, हनुवटी, दाढीमिशी यांत बदल करून चेहरा बदलणे. हे दोन्ही प्रकार अतिशय कठीण आहेत, आणि यांत खूप कौशल्य लागतं.

लग्नात नवरीच्या रंगभूषेचं उदाहरण घेऊ. नवरीला रोज तिचे नातेवाईक, शेजारी, मित्रमैत्रिणी बघत असतात. तिचा चेहरा त्यांच्या ओळखीचा असतो. आणि तुम्ही रंगभूषेत काहीतरी odd करून ठेवलं, तर तुम्ही पकडले जाल. मग काय करायचं? तर तिच्या चेहर्‍यात एखादं वैगुण्य असेल, तर ते झाकायचा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ, डोळ्याखाली काळी वर्तुळं असतील तर ती हलके झाकायची. लग्नात रंगभूषाकार नेमकं उलटं करतात. भरमसाठ मेकअप थोपून ठेवतात. मग एखादी आजी किंवा मामी विचारते, 'काय गं, आत्ता पिठाच्या गिरणीतून येते आहेस का?' तर असं होऊ नये. रंगभूषा अशी असावी की ती नवरी सुंदर दिसली पाहिजे. ती ओळखूच आली नाही तर काय फायदा? हेच चित्रपटांच्या बाबतीतही खरं आहे. रंगभूषा त्या पात्राला साजेशी असावी. ऐतिहासिक चित्रपटांत किंवा इतर चित्रपटांतही त्या पात्राची ओळख पुसली जाऊ नये.

चिन्मय : आपण श्याम बेनेगल, विशाल भारद्वाज, राजकुमार संतोषी, डॉ. जब्बार पटेल, राकेश ओमप्रकाश मेहरा यांसारख्या बुद्धिमान आणि प्रयोगशील दिग्दर्शकांबरोबरच जास्तीत जास्त काम केलं आहे. मग इतर दिग्दर्शकांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा असतो?

विक्रम : इतर दिग्दर्शकांबरोबरसुद्धा मी बरंच काम केलं आहे. 'तू तिथं मी', 'चौकट राजा', 'वासुदेव बळवंत फडके' यांसारखे मराठी चित्रपट केले आहेत. 'Sacred evil', 'Meridian', 'Such a long journey', 'Good Sharma' यांसारखे इंग्रजी चित्रपट केले आहेत. 'अपना सपना मनी मनी'सारखा मसालापटही मी केला आहे. या चित्रपटात रितेश देशमुखच्या खूप वेगवेगळ्या रंगभूषा मी केल्या होत्या.

VG56.jpg

हवाई बेटांवरील तरुणी, बनारसी गायिका, म्हातारा अशा वेगवेगळ्या भूमिका होत्या आणि प्रोस्थेटिक मेकअपच्या मदतीनं मी त्याची रंगभूषा केली होती. प्रत्येक भूमिकेसाठी वेगळा मास्क तयार केला होता. या सगळ्या रंगभूषा प्रत्यक्षात आणायला मला जवळजवळ तीन महिने लागले होते. पण तसं पाहिलं तर तू उल्लेख केलेल्या दिग्दर्शकांच्या व्यतिरिक्त मी फार थोड्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. मग मी जेव्हा माझ्या आवडत्या दिग्दर्शकांबरोबर काम करत नसतो तेव्हा कोणाबरोबर काम करतो? तर मी बर्‍याच दिग्दर्शकांचे पहिले चित्रपट करतो. पण मजा अशी आहे की यांपैकी बहुतेक सगळे दिग्दर्शक हे तू उल्लेखलेल्या दिग्दर्शकांचे सहाय्यक असतात. त्यांच्या कामात नवखेपणा अजिबात नसतो. आपल्या चित्रपटाबद्दल त्यांचा कल्पना स्पष्ट असतात कारण या मोठ्या, कर्तृत्ववान दिग्दर्शकांच्या हाताखाली त्यांनी काम केलेलं असतं. जसं राजकुमार संतोषीचा सहाय्यक असलेल्या गिरीष जोशीने 'घोंसला' नावाचा चित्रपट तयार केला आहे. मिथुन चक्रवर्ती, महेश मांजरेकर, गुलशन ग्रोव्हर वगैरे कलावंत त्यात आहेत. खूप छान entertaining चित्रपट आहे हा. एका बिल्डरला झाड पाडून इमारत बांधायची असते, आणि लहान मुलं ते झाड कसं वाचवतात याची ती कथा आहे. या लोकांबरोबर मला काम करायला आवडतं कारण त्यांच्यात एक passion असते. माझ्या अनुभवाचा फायदा त्यांना मिळायलाच हवा. हे तरुण दिग्दर्शक माझ्याकडे येतात, मला पटकथा ऐकवतात. मी त्यांच्यासाठी अगदी कमी पैशात काम करतो. मी ते काम केलं नाही तर मिथुन चक्रवर्ती दाढी, लांब केस लावून न घेता नेहमीप्रमाणे शर्टाचं बटन उघडं टाकून चित्रपटभर वावरेल याची मला खात्री असते.

मी राकेश ओमप्रकाश मेहराचे 'अक्स', 'रंग दे बसंती' हे चित्रपट केले. आता 'दिल्ली ६' करतो आहे. पण हे चित्रपट दिग्दर्शित करण्यापूर्वी त्याने एक लघुपट तयार केला होता. 'मामुलीराम' नावाचा. हा त्याचा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न होता. धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या आयुष्यावर हा लघुपट आधारित होता. तेव्हा राकेशकडे फक्त एक लाख रुपये होते. त्याकाळी मला चित्रपटांत बर्‍यापैकी पैसे मिळत. पण मी राकेशसाठी अगदी फुकटात काम केलं. या लघुपटाच्या वेळची एक गंमत सांगतो. मी कलाकारांसाठी हवेत म्हणून कपडे शिवून घेतले आणि ते आम्ही ज्या गावात चित्रीकरण करत होतो, तिथल्या गावकर्‍यांना देऊन टाकले. गावकर्‍यांचे जुने कपडे कलाकारांना दिले आणि त्याच कपड्यांत लघुपट पूर्ण केला. हा लघुपट बराच गाजला. खूप पारितोषिकं मिळाली.

चिन्मय : हे झालं नवीन दिग्दर्शकांबद्दल. किंवा आपण ज्या इतर चित्रपटांचा उल्लेख केलात, त्या सर्व चित्रपटांमध्ये रंगभूषेच्या करामती होत्या. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आपल्याला रंगभूषेतून दाखवायच्या होत्या. पण बहुतेक चित्रपट असे असतात की ज्यांत सर्व पात्र अतिशय देखणी, सुंदर दिसतात. प्रत्येकजण नुकताच ब्युटीपार्लरमध्ये जाऊन आल्यासारखा दिसतो.

विक्रम : ज्या चित्रपटांत प्रत्येक पात्र सुंदर दिसतं, तिथे माझा उपयोग काय? तशी रंगभूषा करणारे अनेक रंगभूषाकार आज मुंबईत आहेत. सुंदर दिसो किंवा न दिसो, त्या व्यक्तिरेखेची रंगभूषा चित्रपटासाठी योग्य आहे की नाही, हे जिथे बघितलं जातं, त्याच चित्रपटांसाठी मी काम करतो. काही चकचकीत चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी मला बोलावलं होतं. ते म्हणाले की या नटीला चित्रपटात म्हातारपणाची रंगभूषा करायची आहे. पण ही केस रंगवणारी, रोज व्यायाम करणारी, नियमितपणे ब्युटीपार्लरमध्ये जाणारी म्हातारी आहे. तेव्हा तू तुझी नेहमीची खरीखुरी रंगभूषा करू नकोस, फक्त सुंदर दाखव. तर अशा लोकांबरोबर काम करण्याची माझी योग्यता नाही. मी त्यांच्यासारखा विचार करू शकत नाही म्हणून मी त्यांच्याबरोबर काम करण्यास लायक नाही. त्यांची विचार करण्याची एक वेगळी पद्धत आहे, आणि त्यांनी तसा विचार करून काढलेले चित्रपट चालतात.

आता उद्या कोणी श्याम बेनेगलांना 'पार्टनर' हा चित्रपट बनवायला सांगितलं, किंवा डॉ. जब्बार पटेलांना 'गुंडा' बनवायला सांगितलं, तर त्यांना ते जमणार नाही. कारण त्यांच्या sensibilities वेगळ्या आहेत. त्याचप्रमाणे माझी विचारसरणीही वेगळी आहे. मी लहानपणापासून बबनराव शिंद्यांच्या सहवासात वाढलो. ते गांधीवादी होते. निर्व्यसनी आणि कायम सत्याचा आग्रह धरणारे. तेच संस्कार माझ्यावर झाले. त्यामुळे चित्रपटासाठीसुद्धा मी खोटा विचार करू शकत नाही. एखाद्या मध्यमवर्गीय मुलीला मी लिपस्टीक, foundation वगैरे लावून कॉलेजात जाताना दाखवणार नाही. कारण मी तसा विचारच करू शकत नाही.

'चक दे इंडीया'साठी मला बोलावलं होतं. आता या चित्रपटात मी काय करणार? मी त्यांना सांगितलं की तुम्ही रंगभूषाकार, केशभूषाकार ठेवू नका. भारतीय हॉकी संघाच्या मुलींना बघा आणि मुलींना तसे केस स्वतःचे स्वतः बांधू द्या. रंगभूषेची अजिबात आवश्यकता नाही. आणि तुमचा जो सुपरस्टार आहे त्याला दाढी आणि मिशी वाढवायला सांगा. त्यालाही रंगभूषेची आवश्यकता नाही. त्या चित्रपटात रंगभूषेची खरंच आवश्यकता नव्हती आणि मी तो चित्रपट केला नाही. दुसर्‍या एका रंगभूषाकाराने तो चित्रपट केला आणि 'अगदी खरी वाटणारी रंगभूषा कशी केली', यावर मुलाखतीही दिल्या.

चिन्मय : आपण अक्षरशः शेकडो जाहिरातींसाठी रंगभूषा केली आहे. चित्रपटांसाठी रंगभूषा करताना ते काम आपल्या नावासकट लोकांसमोर येतं. जाहिरातींच्या बाबतीत तसं होत नाही. त्यामुळे आपण जाहिरातींसाठी केलेली रंगभूषा थोडी दुर्लक्षिली गेली, असं मला वाटतं.

विक्रम : जाहिराती तर मी खरंच शेकड्याने केल्या आहेत. पण तिथेही 'सफेदी की चमकार' किंवा 'बंदर छाप टुथपेस्ट' अशा जाहिरातींसाठी कोणी मला बोलावत नाही. 'अमुल', 'महिंद्र' यांसाठी मी अनेक जाहिराती केल्या आहेत. 'जेलुसिल'ची जाहिरात बरीच गाजली होती. त्यात acidityचा राक्षस तयार केला होता. अनेक जाहिरातींमध्ये तरुणपणापासून वृद्धापकाळापर्यंतचे विविध टप्पे दाखवले आहेत. Axeचा चॉकलेटचा माणूस, Palmoliveच्या जाहिरातीतला टक्कल असलेला राहुल द्रविड या जाहिराती बर्‍याच गा़जल्या होत्या. Ogilvy & Mather या जाहिरातसंस्थेने Perkची जाहिरात तयार केली होती. Cast away या चित्रपटावर ती आधारीत होती. शर्मन जोशी त्यात होता आणि हाँगकाँगजवळ एका बेटावर आम्ही ती चित्रित केली होती. त्यानंतर झी सिनेमासाठी केलेली एक जाहिरात खूप गाजली होती. अमरीश पुरी यांच्या निधनानंतर ती जाहिरात केली होती. त्यात अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांचा पाठलाग अमरीश पुरी करत आहेत, असं दाखवायचं होतं. पण चित्रीकरणाच्या अगोदरच त्यांचं निधन झालं. मग मी त्यांच्या चेहर्‍याचा मास्क तयार केला आणि चित्रीकरण केलं. जाहिरातीत अमरीशजी नाहीत, याची कोणाला शंकाही आली नाही.

शादी.कॉमच्या एका जाहिरातीची मजा सांगतो. त्यात एक तरुणी एका चिम्पांझीशी लग्न करते असं दाखवलं होतं. चिम्पांझीचा मुखवटा मी तयार केला आणि एका नटाला तशी माकडाची रंगभूषा केली आणि आम्ही चित्रीकरण केलं. ती जाहिरात टिव्हीवर, वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आणि आठवड्याभरात तिच्यावर बंदी आली. त्या जाहिरातीत आमच्या दृष्टीने आक्षेपार्ह काहीच नव्हतं. नंतर आम्हाला बंदीचं कारण कळलं. मनेका गांधी तेव्हा केंद्र सरकारात मंत्री होत्या आणि परवानगी न घेता आम्ही चिम्पांझीचे चित्रीकरण केलं म्हणून त्या जाहिरातीवर बंदी आली होती. मग मी तो मास्क आणि चिम्पांझीचं काम केलेल्या नटाला घेऊन दिल्लीला गेलो, मनेका गांधींसमोर त्या नटाला चिम्पांझीचा मेकअप केला. तेव्हा कुठे त्यांची खात्री पटली की आम्ही खरं माकड वापरलं नव्हतं आणि मग बंदी मागे घेतली गेली.

चिन्मय : बबनराव शिंदे आणि अंजी बाबू यांशिवाय एखाद्या रंगभूषाकाराने आपल्याला प्रेरित केलं आहे का?

विक्रम : भारतात म्हणशील तर माझ्या गुरूंशिवाय कोणीच मला inspire केलं नाही. कारण इथे व्यावसायिक गरजांनुसार काम केलं जातं, आणि रंगभूषाकाराला स्वातंत्र्य नसतं. निर्माता, दिग्दर्शक, नट सर्व निर्णय घेतात. जुन्या काळात म्हणशील तर दादा परांजपे, लक्ष्मणराव कासेगावकर, सरोश मोदी यांनी खूप चांगलं काम केलं. पंढरीदादा जुकर यांनीही चांगलं काम केलं आहे. 'प्रभात' आणि नंतरच्या काळात या सर्व रंगभूषाकारांनी खूप काम केलं होतं. सध्याच्या काळात मिकी काँट्रॅक्टर, भरत गोडांबे चांगलं काम करतात.

चिन्मय : पण पंढरीदादा जुकर, मिकी काँट्रॅक्टर, भरत गोडांबे यांचं नाव glamour makeupच्या संदर्भात घेतलं जातं.

विक्रम : अगदी बरोबर. Character makeup कोणीच करत नाहीत. पंढरीदादांनी दिलीपकुमार, अमिताभ बच्चनपासून माधुरी दीक्षित, जुही, काजोलपर्यंत अनेकांबरोबर काम केलं. पण त्यांनीही कधी कमी मेकअप करण्याची risk घेतली नाही. त्यावेळी नटांना वेगळं काही करायची इच्छा नसे, आणि पंढरीदादांनीही कधी तो धोका पत्करला नाही. आपण सुंदर, रुबाबदार दिसलो नाही तर लोक काय म्हणतील अशी भीती नटांना वाटे आणि नटांना रुबाबदार, सुंदर दाखवलं नाही तर आपल्याला पुढच्या चित्रपटात काम मिळणार नाही, अशी भीती रंगभूषाकारांना वाटे. मीसुद्धा 'सरदार', 'आंबेडकर' हे चित्रपट केले त्यातही धोका होताच. या चित्रपटांतील रंगभूषा नीट जमली नसती तर मला पुढचे चित्रपट मिळाले नसते. मला घरी बसून राहावं लागलं असतं. मी तो धोका पत्करला. माझ्यापूर्वीच्या अनेक रंगभूषाकारांनी आणि नटांनी असे धोके पत्करले नाहीत. बरेचदा तर असं होतं की एखादा कलाकार अभिनयात कमी पडत असेल तरी त्याचं खापर रंगभूषेवर फोडलं जातं. त्यामुळे सहसा कुठलाही रंगभूषाकार फार काही नवीन करायचा प्रयत्न करत नाही.

याचीच दुसरी बाजूही आहे. आपल्याकडे वेगळ्या विषयांवर आधारलेले असे किती चित्रपट तयार होतात? बहुतेक सर्व चित्रपट हे एकतर कौटुंबिक असतात नाहीतर प्रेमकथा. किंवा हाणामारीचे चित्रपट. यांत काय रंगभूषा करणार? सुंदर दिसायचं नाहीतर जखमी व्हायचं एवढंच कलाकारांना काम असतं. त्यामुळे आपले रंगभूषाकार वेगळं काही करायला शिकलेच नाहीत. 'प्रभात'च्या काळात खूप नवीन प्रयोग केले जात आणि तेव्हा आपले तंत्रज्ञ परदेशी तंत्रज्ञांच्या तोडीचे होते. नंतर मात्र परिस्थिती बदलली. अजूनही फारसे नवीन प्रयोग केले जात नाहीत. मग नवीन रंगभूषाकार तयार कसे होणार? हॉलिवूडमध्ये नवनवीन विषयांवर चित्रपट तयार होतात. त्यामुळे तिथल्या रंगभूषाकारांना सतत नवीन प्रयोग करावे लागतात. तशी गरज निर्माण झाल्याने वेगवेगळ्या रसायनांचे, तंत्रांचे शोध लागतात. आपल्याकडे तसं काहीच होत नाही. अगदी एखादं प्रसाधन हवं असेल तर ते इथे मिळत नाही. परदेशातून मागवावं लागतं.

चिन्मय : पण हल्ली दिग्दर्शक, अभिनेते नवनवीन प्रयोग करताना दिसतात. पटकथेत नावीन्य असतं. अशावेळी मात्र रंगभूषा चांगली नसेल तर ते लगेच लक्षात येतं. 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटात दिलीप प्रभावळकरांची रंगभूषा मला आवडली नव्हती. त्यांचे कान बेगडी वाटत होते. कानांचा, नाकाचा रंगही चित्रपटभर बदलत होता.

विक्रम : गंमत सांगतो. राजकुमार हिराणीने मला या चित्रपटासाठी बोलावलं होतं. पण त्याच्या Production Teamने माझ्याचकडे प्रवासखर्च मागितला. म्हणून मी तो चित्रपट सोडला. खरं म्हणजे मला तो चित्रपट करण्याची खूप इच्छा होती. प्रभावळकरांनी गांधींची भूमिका करावी हे मीच सुचवलं होतं. पण पैशाचा प्रश्न आला, आणि मी बाहेर पडलो. तू तो चित्रपट नीट बघितलास तर तुझ्या लक्षात येईल की गांधीजींचे close ups फारसे नाहीत. आणि त्यांच्या चेहर्‍यावर प्रकाशही फारसा पडत नाही. ते बहुतेक वेळी अंधारात दाखवले आहेत. रंगभूषा अजिबात चांगली झाली नव्हती म्हणून राजकुमार हिराणीला या तडजोडी कराव्या लागल्या. प्रभावळकरांची अंगकाठी, चेहरा गांधी साकारण्यासाठी अगदी योग्य आहे. फक्त नाक थोडं मोठं करायचं आणि प्रभावळकरांची हनुवटी निमुळती आहे, ती थोडी मोठी करायची. तसं सोपं काम आहे ते. आणि प्रभावळकरांसारखा अप्रतिम नट गांधींची भूमिका करतो म्हटल्यावर रंगभूषा उत्कृष्टच असली पाहिजे. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. बेन किंग्स्ले ('गांधी'), नसिरुद्दीन शाह ('हे! राम'), मोहन गोखले ('सरदार'), रजित कपूर ('द मेकींग ऑफ महात्मा'), अन्नू कपूर ('डॉ. बाबासाहेब आंबेडकर') या नटांनी साकारलेल्या गांधींची रंगभूषा मी केली आहे. प्रभावळकरांचा गांधीही चांगला केला असता.

हा खरं म्हणजे सारा पैशाचा खेळ आहे. Production Deptt.ची माणसं ठरवतात की आपलं बजेट इतकं आहे, आणि त्या पैशात कोणता रंगभूषाकार काम करायला तयार होईल याचा शोध ते घेतात. रंभूषाकारांची प्रतवारी ते मानधनाच्या पैशांनुसार करतात. त्यांना कामाच्या दर्जाशी काहीच घेणंदेणं नसतं. म्हणजे, 435 कॅमेरे ज्यांच्याकडे असतील, त्या सर्वांची यादी करायची आणि त्यांपैकी जो सर्वांत स्वस्त असेल त्याच्याकडून कॅमेरा आणायचा, असं असतं. पण माझी कला ही 435 कॅमेरा नाही. ते माझं कसब आहे. माझी मेहनत आहे त्यामागे. पण काही लोकांना हे कळत नाही आणि चित्रपटात त्यांनी केलेल्या तडजोडी उघड्या पडतात. म्हणूनच राजकुमार संतोषी, विशाल भारद्वाज, राकेश ओमप्रकाश मेहरा, श्यामबाबू माझ्याशिवाय कामच करत नाहीत. राजकुमार हिराणीबरोबर आता '3 Idiots' करतो आहे. त्यात आमीर खान, माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर आहेत. त्याला मी अजूनही सांगत असतो की, 'लगे रहो मुन्नाभाई' मी केला असता तर तो अधिक चांगला दिसला असता.

चिन्मय : 'मी या चित्रपटात रंगभूषा केली असती तर तो अधिक चांगला झाला असता', असं वाटायला लावणारे अजून कुठले चित्रपट?

विक्रम : 'लगे रहो मुन्नाभाई' तर आहेच. 'गांधी माय फादर', 'जोधा अकबर' हे अजून काही चित्रपट. 'जोधा अकबर' मी करणार होतो. आशुतोषबरोबर मी कामाला सुरुवातही केली होती. पण नंतर त्यांनी माझ्या सहाय्यकांना कमी पैसे दिले. मी तो चित्रपट सोडला. आता वाटतं की तो चित्रपट करायला हवा होता. पण पैशाच्या बाबतीत नको तिथे तडजोड मी करत नाही. नवीन लोकांसाठी किंवा श्यामबाबूंसाठी मी फुकटात काम करतो. पण इतर सगळ्या गोष्टींसाठी पैसा असताना फक्त रंगभूषेच्या बाबतीत काटकसर केलेली मला आवडत नाही. तसंच नितीन देसाईची 'राजा शिवछत्रपती' ही मालिका. दागिने, कपडे, नेपथ्य यांवर त्यांनी भरमसाठ खर्च केला आहे. पण रंगभूषा अगदी निकृष्ट. जरा चांगले लोक घेतले असते तर मालिकेचा दर्जा उंचावला नसता का? त्या मालिकेतली जिजाबाई बघ. मृणाल कुलकर्णी 'अवंतिका' या मालिकेत दिसायची तशीच दिसते. जिजाबाई अजिबात वाटत नाही. थोडे केस आणि भुवया पांढर्‍या केल्या आहेत फक्त. बाकी पूर्ण 'अवंतिका' मालिकेतली मृणाल कुलकर्णी. मी नितीन देसाईला सांगितलं की, 'नुसती दाढीमिशी लावून शिवाजी महाराज होता येत नाही. त्यासाठी त्या कलावंताचा आत्मा त्या भूमिकेत शिरावा लागतो. नुसता मेकअप करून अभिनय कामाचा नाही. आणि मेकअपसुद्धा इतका कमी दर्जाचा आहे. सगळंच कचकड्याचं वाटतं.' नितीनला हे पटलं की नाही ठाऊक नाही. त्याचप्रमाणे 'वीर सावरकर' हा चित्रपट करायला मला आवडलं असतं.

चिन्मय : असे काही कलावंत की ज्यांची रंगभूषा करायला आपल्याला आवडलं असतं?

विक्रम : बरेच आहेत असे कलावंत. बलराज साहनी, मोतीलाल, संजीव कुमार, प्राणसाहेब, ललिता पवार या कलावंतांनी खूप वेगवेगळ्या भूमिका केल्या. त्यांच्यासोबत काम करायला मजा आली असती. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाशी संबंधित सर्वजणांचा शिवाजी पार्कावर सत्कार झाला होता. तेव्हा श्री. सुनील दत्त मला म्हणाले होते की मी त्यांच्या वेळी काम करत असतो, तर त्यांनी बर्‍याच वेगळ्या भूमिका केल्या असत्या.

चिन्मय : आपले आगामी चित्रपट कोणते?

विक्रम : '3 Idiots' आहे. 'अजब प्रेम की गजब कहानी' हा राजकुमार संतोषीचा चित्रपट आहे. त्यात रणबीर कपूर आणि कतरिना कैफ आहेत. राकेश मेहराचा 'दिल्ली ६' आहे. वहिदा रहमान, ओम पूरी, अमिताभ बच्चन, अतुल कुलकर्णी, अभिषेक बच्चन वगैरे कलावंत त्यात आहेत. सुंदर रंगभूषा झाली आहे प्रत्येकाची. मणीरत्नमचा 'रावण' आहे. 'Quick Gun Murugan' हा एक धमाल चित्रपट आहे. एका वेगळ्याच जगात घडणारी ही एक रम्य गोष्ट आहे. त्यात डॉ. राजेंद्रप्रसाद आहेत. दक्षिणेतले हे एक खूप मोठे नट आहेत. त्यांना अभिनयासाठी दोन डॉक्टरेट्स मिळाल्या आहेत. अनुराधा मेननने या चित्रपटात नऊ भूमिका केल्या आहेत. अनुराधा मेनन म्हणजे लोला कुट्टी. त्यानंतर संतोष सिवनचा एक चित्रपट करतो आहे. बरंच आव्हानात्मक काम करायला मिळेल मला या चित्रपटात. कमल हासनचा नवीन चित्रपट सुरू होतो आहे. तामिळ, इंग्रजी आणि जपानी अशा तीन भाषांत तो आहे. कमल हासनबरोबर यापूर्वी मी 'हे! राम' आणि 'मरदनायकन्' असे दोन चित्रपट केले आहेत. मी इतर चित्रपटांत व्यस्त असल्याने त्याचे इतर चित्रपट करू शकलो नाही. पण विक्रम गायकवाड उपलब्ध नाही म्हणूनच त्याने हॉलिवूडमधून तंत्रज्ञ आणले.

चिन्मय : रंगभूषेची कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून आपल्या काही योजना आहेत का?

विक्रम : मला एक रंगभूषेचं शिक्षण देणारी शाळा काढायची आहे. पण सध्या माझ्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही नाही. मी माझ्या दोन सहाय्यकांना शिकवून पुढे त्यांनी दुसर्‍यांना शिकवायचं, असे चाटे क्लासेस मला काढायचे नाहीत. त्यामुळे सध्यातरी मला माझी कामं बंद करून शाळा काढता येणार नाही. पण मी सुभाष घईंच्या Whistling Woodsला शिकवतो. कालिकत विद्यापीठात आणि पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटला शिकवतो, रंगभूषेच्या कार्यशाळा घेतो. पुण्यात माझे वर्ग असतात, तिथे काही विद्यार्थ्यांना मी रंगभूषा शिकवतो.

चिन्मय : एक उत्तम रंगभूषाकार होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?

विक्रम : दोनच गोष्टी. श्रद्धा आणि श्रद्धा. गुरूवरील श्रद्धा आणि तुमच्या कामावरील श्रद्धा. या दोन गोष्टी असल्या की मग तुम्ही यशस्वी होताच. आणि हे कोणत्याही क्षेत्राबाबत खरं आहे. जोडीला संयम हवा. तुमचं मन सात्त्विक हवं. वर्षानुवर्षं मेहनत करण्याची तयारी हवी. 'इन्स्टंट' काहीही मिळत नसतं. शिवाय तुमची सतत नवीन शिकण्याची तयारी हवी. आजही मी सतत काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. नवीन पद्धतीने रंगभूषा करताना आजही माझा हात थरथरतो. ही थरथर थांबली की मी expert झालो, असं समजेन. पण तेव्हा माझ्यातला रंगभूषाकार संपलेला असेल, कारण नवीन काही शिकणं थांबलेलं असेल. ही माझ्या हाताची थरथर जोपर्यंत आहे, तोपर्यंतच माझ्या अस्तित्वाला काही अर्थ आहे...

***

विशेष आभार - श्री. केतन दंडारे (arbhaat)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच. वेगळा विषय, वेगळी माहिती. बरेच दिवसांनी काहीतरी नवीन वाचल्याचं समाधान मिळालं.

एकदम जमली आहे.
>>> नवीन पद्धतीने रंगभूषा करताना आजही माझा हात थरथरतो. ही थरथर थांबली की मी expert झालो, असं समजेन. पण तेव्हा माझ्यातला रंगभूषाकार संपलेला असेल, कारण नवीन काही शिकणं थांबलेलं असेल. ही माझ्या हाताची थरथर जोपर्यंत आहे, तोपर्यंतच माझ्या अस्तित्वाला काही अर्थ आहे...
सुरेखच !
ही कला आणि हे कलाकार यांची अशी ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

  ***
  The geek shall inherit the earth (BILL 24:7)

  ज ब र द स्त मुलाखत!
  मेकअप, नाही रंगभूषा म्हणजे काय असते, हे सर्वार्थाने समजलेला माणूस! त्यांनी त्यांच्या गुरूंबद्दल सांगितलेल्या आठवणी फार आवडल्या.
  एका उत्तम माणसाशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद चिन्मय!

  सही.. Happy
  काहीच माहिती नसलेल्या या विषयाचे इतके वेगवेगळे पदर उलगडून दाखवलेस. मस्तच रंगला आहे रे संवाद..!

  --
  आतली पणती, तेवायला अशी;
  अंधाराची कुशी, लागतेच..!!

  चिन्या... मस्त रे!!
  परत एकदा माझ्या गुरूची माझ्याशी गाठ घालून दिल्याबद्दल खूप खूप धन्स!!
  -नी
  http://saaneedhapa.googlepages.com/home

  चिन्मय, खूप छान झालाय संवाद. एकदम अघळपघळ पण वाचनीय. या दीर्घ संवादाकरता विक्रमजींचे, तुमचे आणि केतनचे आभार.

  अप्रतीम मुलाखत चिनूक्स Happy
  .
  अगदी छान बोलत केल आहेस विक्रम गायकवाडांना Happy

  विक्रम मस्तच बोलतो. मला एकदम माझे ग्रीन रूम मेकप अकॅडमी चे दिवस आठवले. दिवसभर आम्ही सगळे तिथे असायचो. मेकपचं टेबल, मटेरियल, विक्रमचं शिकवणं, अधून मधून विनोद... धमाल यायची!!
  -नी
  http://saaneedhapa.googlepages.com/home

  चिन्मय, मुलाखत मस्त. Happy

  मोठी असली तरी एकदम रंजक झाली आहे. रंगभूषेबद्दल इतक्या गोष्टी प्रथमच कळल्या.

  वाह रे! एकदम छान संवाद झाला आहे.. विशेष करून तू सोबत जी छायाचित्रे टाकली आहेस त्याने एकदम total feel येतोय. तुझी मेहेनत दिसते आहे.. आणि मुलाखतीचा फ्लो मला खूप आवडला.
  अशा वेगळ्याच विषय अन कलाकाराची ओळख करून दिलीस त्याबद्दल आभार!

  व्वा! मस्तच. योग ला अनुमोदन.

  अप्रतिम झाली आहे मुलाखत. खूप इन्टरेस्टिन्ग गोष्टी वाचायला मिळाल्या.

  ज ब र द स्त!!
  एकदम R&D च्या अंगाने जाणारी घेतलीयेस तू मुलाखत त्यामुळे खूप आवडली. पहिल्यांदाच इतकी माहिती मिळाली या क्षेत्राबद्दल. एकदम वाचनीय झालीये. धन्यवाद.

  सुरेख झाली आहे मुलाखत! एकदम रंजक आणि माहितीपूर्ण.
  जुकर, कॉन्ट्रॅक्टर यांच्याबद्दल वाचलं ऐकलं होतं पण गायकवाडांबद्दल फारशी माहिती नव्हती. हे मूळचे कुठले?
  तसंच वसंतराव पेंटर निर्माता-दिग्दर्शक म्हणून माहित होते, रंगभूषाकार म्हणून नाही.
  धन्यवाद!

  चिनूक्स, छान झाली आहे मुलाखत!
  तू प्रश्ण चांगले विचारले आहेस आणी त्याची उत्तरे पण अगदी सविस्तर दिली आहेत विक्रम गायकवाडांनी.

  >>जुकर, कॉन्ट्रॅक्टर यांच्याबद्दल वाचलं ऐकलं होतं पण गायकवाडांबद्दल फारशी माहिती नव्हती. हे मूळचे कुठले?<<
  विक्रम पुण्यातलाच आहे. गोखलेनगर मधे रहायचा. आता कोथरूडला रहातो. बबनराव शिंदे म्हणजे बाबा शिंदे म्हणजे निंबाळकर तालमीच्या गल्लीत पूर्वी शिंदे मेकप व ड्रेपरी होतं तेच ते शिंदे. अशोकचे वडील.

  -नी
  http://saaneedhapa.googlepages.com/home

  उत्कृष्ट, सन्ग्राह्य! Happy

  अजुन सम्पुर्ण वाचून झाले नाही! Happy
  ऑफिसमधे एवढा मोठा मजकुर एकाग्रतेने वाचणे शक्य नाही, तेव्हा मला अन थोरलीसाठी, वाचण्याकरता सरळ सरळ प्रिन्टच काढून घेतलाय! निवान्त अभ्यास करत वाचेन! Happy
  ...;
  आपला, लिम्बुटिम्बु

  चिन्मय, केतन खूप खूप धन्यवाद! एका नवीनच क्षेत्राची इतकी सविस्तर माहिती त्यातल्याच निष्णात तज्ज्ञाकडून आम्हाला दिल्याबद्दल खूप आभार!
  अत्यंत ओघवती, सविस्तर, वाचनीय आणि माहितीपूर्ण मुलाखत!
  ----------------------
  I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

  अर्भाट आणि चिन्मय, मुलाखत खूप आवडली.

  चिन्मय- मुलाखत कशी असावी याचा धडा म्हणावं इतकी सुंदर झालाय संवाद. अनेक तांत्रीक गोष्टींची चर्चा करुनही कुठेच रटाळ होत नाही हे यशच. या विषयाची काहिही माहिती किंवा आवड नसतानाही मुलाखत आवडली- धन्यवाद
  http://colors-etc.blogspot.com/

  चिन्मय आणि केतन,
  अत्यंत सुरेख मुलाखत.. विक्रम गायकवाडांनी सुद्धा हातचे काहीही राखून न ठेवता उत्तर दिलीयेत..

  ==================
  वाटेवर काटे वेचीत चाललो
  वाटले जसा फुलाफुलात चाललो

  मस्त झालिये मुलाखत एकदम... Happy
  एकदम माहितीपूर्ण आणि रंजक..

  मस्तच घेतली आहे मुलाखत. make up, रंगभुषा ह्या विषयी अतिशय, शास्त्रोक्त माहीती देणारी मुलाखत आहे. ह्या क्षेत्राविषयी मलातरी इतकि माहीती अजिबात नव्हती. आणि प्रश्नपण योग्य आणि छान आहेत व उत्तरे सुद्धा ओघवत्या भाषेत लिहीली आहेत.
  आपल्याला दिसणा-या ह्या glamour dolls आणि फिल्मी हिरो ह्यांच्या इतकेच कींवा किंबहुना जास्तच ह्या बाकी अनेक लोकांचे पडद्याआड किती महत्वाचे contribution असते.
  आणि अशाच एका पडद्याआडिल व्यक्तिमत्वाची आम्हाला ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

  वर्षा

  सुरेख रंगली आहे मुलाखत. उत्तरे पण स्पष्ट आणि सविस्तर पणे दिली आहेत त्यांनी त्यामुळे बरीच माहिती मिळाली. धन्यवाद.

  सुंदर संवाद.
  मुलाखत घेणार्‍याचे आणि देणार्‍याचे अभिनंदन.
  खूप नवीन माहिती मिळाली. फोटोंमुळे अजून रंग भरलाय.

  सुरेख मुलाखत... आणि फोटो टाकले असल्यामुळे जे वाचतोय तेच पाहिल्याचा आनंद मिळतो.
  धन्यवाद चिनूक्स. Happy

  सुंदर जमली आहे मुलाखत, चिनूक्स.
  धन्यवाद. Happy

  चिनूक्स,
  जाम चिडचिडतेय मी...
  जवळजवळ १९-२० वर्ष या माणसाला ओळखतेय. हा माझा एकेकाळचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड... गुरूच अनेक बाबतीत. आभासकलेच्या जगात यानीच प्रवेश करून दिला माझा. पण याच्याशी 'संवाद' साधावा हे माझ्या सुपीक टाळक्यात नाही आलं. तू बरं शोधलंस याला. आणि पकडलंस ही..
  श्या रे...
  -नी
  http://saaneedhapa.googlepages.com/home

  चिनॉक्स,
  केवळ अप्रतिम !!!!!!!!!!!!
  विक्रम गायकवाडांनी दिलेली उत्तर तर आहेतच खूप माहितीपूर्ण पण तुझे प्रश्न पण खूप अभ्यासपूर्ण, फोटोज पण सुरेख !
  मस्त झालाय हा संवाद, अत्ता पर्यंत च्या सगळ्या सिरिज मधे हा सर्वात जास्त आवडला !

  Pages