प्रश्न गतिमंद मुली पिडीतांचा

Submitted by निक्षिपा on 29 December, 2014 - 02:33

नमस्कार, मला मायबोलीकरांकडून एक मदत हवी आहे. थोडीशी नाजूक बाब असली तरी योग्य व्यक्तींपर्यंत कसे पोहोचावे हे मला समजत नसल्यामुळे इथे मांडतेय. माझी अगदी जवळीची मैत्रिण मुंबईतील गतीमंद शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षीका आहे. मुलांची मानसिकता ओळखणे, त्यांना शिकवणे, यामध्ये ती माहिर आहे. तिच्या शाळेमध्ये एका गतिमंद निवासी संस्थेतून दर महिन्याला काही या गतिमंद मुलांना विविध गोष्टी शिकवण्यासाठी पाठवले जाते. त्यातील काही म्हणजे नीटनेटके राहणे, कपडे बदलणे, स्वतःची स्वच्छता राखणे इत्यादी. हे शिकवत असताना त्या मुलांची इन जनरल शारिरीक चाचणीपण केली जाते. माझी मैत्रिण नुकतीच एका ७ वर्षाच्या मुक-बधिर आणि गतिमंद मुलीला कपडे कसे घालावेत हे शिकवत (तिचे कपडे काढून ते परत कसे घालावेत हे शिकवत असताना) ती मुलगी खूप घाबरली आणि जोरात रडायला लागली. ही मुलगी माझ्या मैत्रिणीकरिता नवखी नाही. वेगवेगळ्या सेशन्ससाठी आल्यामुळे तिला नजरेने ओळखते आणि मैत्रिणीला सर्व प्रकारे सहकार्य करते पण पहिल्यांदाच असे झाले. माझी मैत्रिमीला देखील खूप आश्चर्य वाटले. त्या मुलीच्या मांड्यांवर नखांचे लाल ओरखडेसुद्धा दिसले. मैत्रिणीने ते तिच्या मुख्याध्यापिकेला सांगितले आणि त्यांनी लगेच संस्थेच्या हेडना बोलावले व त्याबद्दल लक्ष वेधून घेतले. ‘‘हो... हो... लक्ष देऊ याकडे’’ असे म्हणून त्या निघून गेल्या. पण पुन्हा पुढल्या आठवड्यात येरे माझ्या मागल्या. यावेळेस पुन्हा तशाच खूणा आणि काना मागे देखील ओरखडल्याची एक लालसर खूण. माझ्या मैत्रिणीला वेगळाच संशय येतोय. त्या मुलीवर काही अत्याचार तर होत नसतील ना? आणि खास करून (पुरुषी शारिरीक आत्याचार) माझ्या मैत्रिणीला कळेनासं झालंय. याबदद्ल तपासाकरिता कोणा स्वयंसेवी संस्थांची (NGO) मदत मिळू शकेल का? ती स्वतः यामध्ये अधिक काही करू शकत नाहीए कारण
१) शाळेच्या मुख्याध्यापकांनी माझ्या मैत्रिणीला सांगितलेय जास्त विचार करू नकोस, ती मुलीचीच नखं असतील, तीच खाजवत असेल
२) माझ्या मैत्रिणीला त्या ७ वर्षाच्या मुलीला मदत करायची खूप इच्छा आहे पण दोघींचेही नाव कुठेही बाहेर येता कामा नये.
३) सगळ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करायला सांगितलंय.
मैत्रिणीने अनेक वर्ष अशा मुलांना शिकवले असल्यामुळे तिला ही गोष्ट वेगळीच वाटतेय आणि अस्वस्थ करतेय. पण तिच्या मुख्याध्यापकांच्या अनुसार ही शुल्लक गोष्ट आहे. माझ्या मैत्रिणीने काय करावे? कोणाची मदत घ्यावी?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या मुलीच्या पालकांच्या हे लक्षात आले नाहिये का? त्यांना कदाचित ह्याबद्दल जास्त माहिती असू शकेल. त्यांच्या जवळ बोलून पहायला सांगा तुमच्या मैत्रिणीला.

तुमच्या मैत्रिणीने पालकांना नाही सांगितले का अजुन? नसेल तर प्लीज त्यांना त्या मुलीच्या पालकांशी व्यवस्थित व समजुतदारपणे बोलायला सांगा.
सगळ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करायला सांगितलंय.>>>>> नको. दुर्लक्ष करु नका पण अतातयीपणा न करता संयमाने प्रकरण हाताळा जेणेकरुन त्या मुलीला व तिच्या पालकांना त्रास होणार नाही आणि सत्यही समोर येईल.

मुलीच्या पालकांशी बोलणे हा सगळ्यात पहिला उपाय. त्याच प्रमाणे, घरातून शाळेत आणि शाळेतून परत घरी जाई पर्यंत ज्या ज्या लोकांच्या संपर्कात मुलगी असते त्यांची माहिती काढून पालक आणि मुलगी ह्यांच्याशी एकत्र चर्चा करावी. शाळा दुर्लक्ष करत असल्यास आणि या सगळ्यातून जी काही माहिती मिळतीये त्या आधारे सरळ पोलीसात तक्रार करावी.

मुलींच्या पालकांशी बोलणे शक्यच नाही कारण ती मुलगी काही दिवसांची असताना रस्त्याच्या कडेला मिळालेली अनाथ मुलगी आहे. तिचा आत्तापर्यंतचा सांभाळ संस्थेनेच केला आहे. आई-वडिलांची काहीही नोंद नाही. Sad

ओह! मग तुझ्या मैत्रिणीलाच तिच्याकडून तिच्या कलाकलाने घेऊन नक्की काय झालंय्/होतंय ते काढून घेता आलं तर बरं होईल.

अरेरे. वाचुन खुप वाईट वाटले (आश्चर्य अजिबात वाटले नाही Sad ).

केसचा तपास लागणे जिकिरीचे वाटतेय कारण मुलीकडुन फारशी माहिती मिळू शकेल असे वाटत नाही. तिच्या संस्थेत जरी विचारले तरी तिथे कोणाला विचारणार? विचारणारा हितचिंतक आहे की तोही सामिल आहे हे कसे कळायचे? हल्ली अशा बातम्यांमध्ये असेही वाचायला मिळते की अत्याचार करणा-या पुरूषाला असे अर्त्याचार करण्यात मदत करणा-या स्त्रिया असतात. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवणार?

मुख्याध्यापिका दुर्लक्ष कर म्हणताहेत तर त्यांना काहीतरी माहिती असणार हे नक्की. मुलीची सोय दुसरीकडे करणे हा एक मार्ग दिसतोय, पण हे एकट्या मैत्रिणीच्या हातात नाहीय. जर मैत्रिणीला शक्य असेल तर तिने अनाथ गतिमंद मुलींसाठी असलेल्या एखाद्या दुस-या संस्थेला/एन जि ओला संपर्क करुन त्यांच्या कानावर हा प्रकार घालुन चौकशी करण्यास उद्युक्त करावे. ती याच क्षेत्रातली असल्याने तिला नक्कीच अशा दुस-या संस्थांची माहिती असेल.

पुढे काय झाले हे नक्की कळवा. त्या मुलीची सुरक्षित सोय झाली तर बरे वाटेल. नाहीतर हा बाफ नजरेसमोर आला की दररोज अशा शेकडो कळ्या कुस्करल्या जाताहेत त्यात अजुन एकीची भर पडली ही अस्वस्थ भावना मनात येत राहिल.

बाय दे वे, ती मुलगी राहत असलेली संस्था कुठली आहे हे सांगू शकाल का? ओपनली सांगू शकत नसाल तर संपर्कातून सांगू शकाल का? मुंबईतल्या मानखुर्दच्या एका संस्थेत आमच्या संस्थेतर्फे सेवेसाठी कार्यकर्ते कित्येक वर्षं जात होते. अजूनही जात असावेत. तीच संस्था असेल तर काही माहिती मिळते का बघता येईल.

मैत्रिणिला पोलिसांची मदत घ्यायला हरकत नाही.
संस्थेच्या हेड आणि मुख्याध्यापिकेची भुमिका संशयास्पद वाट्त आहे.
मैत्रिणिने न घाबरता मुलिच्या मागे ठामपणे उभे राहयला हवे.
टि व्ही वरिल सत्यकथांच्या मालिकेत अशा एक-दोन केसेस पाहन्यात आलेल्या आहेत ज्यात पिडितांना न्याय मिळाला होता.

मैत्रीणीला शुभेच्छा. लढाई मोठी असेल त्यासाठी तिला मानसिक बळ मिळू देत.

वेगवेगळ्या पातळीवर हे प्रकरण निस्तरता येइल.

सध्यातरी अशा खुणा अथवा जखमा इतरही काही मुलींच्या अंगावर दिसतात ते बघायला हवंय.
इतर मोठ्या मुलींना विश्वासात घेऊन काही माहिती देता येते का बघू शकता. कदाचित मोठ्या मुली तिला मारतही असतील. शक्य असेल तर एखाद्या डॉक्टरकडून चेकप केल्यास अधिक माहिती मिळू शकेल.
मुख्याध्यापिका दुर्लक्ष करायला सांगत असतील तर त्यांना विश्वासात घेऊन प्रकरण मीडीया आऊट झालंतर संस्था बंद पडेल शिवाय त्यांची नोकरी जाईल हे पटवून देणे हे एक करता येईल. म्हणजे मुख्याध्यापिकेला काही माहित असेल तर तिकडून परस्पर बंद केले जाईल.

दुर्दैवी आहे
दुर्लक्ष करू नका, बहुधा एकापेक्षा जास्त मुलीही या दुष्टचक्रात अडकल्या असण्याची शक्यता आहे.
इथे माहिती न देता कोणालाही संपर्कातूनच कळवा

http://www.childlineindia.org.in/contactus.htm
चाईल्ड हेल्पलाईनची मदत या प्रकरणात घेता येईल. १०९८ क्रमांक.
गोपनीय व नाजूक बाब असल्यामुळे या प्रकारात संबंधित मुलीला साहाय्य कसे मिळू शकते याबद्दल ते मार्गदर्शन करू शकतील. शिक्षिका स्वत:चे व शाळा / संस्थेचे नाव गुप्त ठेवूनही विचारणा करू शकतात.

कृपया याकडे दुर्लक्ष करू नका किंवा त्याचा पाठलाग सोडू नका योग्य ती माहिती मिळाल्याशिवाय गोष्ट अर्धवट सोडू नका. प्लीज .........

हे सगळे वाचून भयावह वाटत आहे. थेट पोलिस कंप्लेंट करण्याच्या पातळीचा प्रकार वाटत आहे मला तरी!

आय हेट टू से धिस, बट टू मी, इट सीम्स टू बी अनादर केस ऑफ चाईल्ड मॉलेस्टेशन ऑर रेप!

दुर्लक्ष करु नका. खरच हा गंभीर प्रकार वाटतोय.पण मुलगी लहान असल्यामुळे आणि नीट सांगु शकत नसल्यामुळे जास्त काळजी घ्यावी लागणार आहे तुमच्या मैत्रीणीला या लढ्यात,संयमाने प्रकरण हाताळा जेणेकरुन त्या मुलीला आणि तुमच्या मैत्रीणीला त्रास होणार नाही.

अरुंधती कुलकर्णी यांनी दिलेल्या हेल्पलाईनवर संपर्क केला असता अधिक माहीती मिळेल .चाईल्ड हेल्पलाईन-- १०९८ क्रमांक. ही हेल्पलाईन चोवीस तास मदतीसाठी उपलब्ध आहे.

वाचुन वाईट वाटले. मैत्रिणीला आलेल्या शन्केचे पुर्ण निरसन व्हायला हवे. तुमच्या मैत्रिणीला लढण्यासाठी शुभेच्छा.

खुप गाजावाजा न करता, कुठल्यातरी क्षुल्ल्क कारणासाठी (सर्दी, खोकला, पडल्यामुळे शरिराला मुका मार लागला आहे... अनेक कारणे आहेत) वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरान्ची मदत घेण्याचे स्वातन्त्र्य शिक्षक मैत्रिणीला असेल तर त्याचा वापर करावा.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी लक्ष घालण्याचे का टाळले हे समजत नाही. जर काही अन्यायकारक घटना खरोखरच घडत असेल, घडलेली असेल तर ते पण परिस्थितीला जबाबदार आहेत ह्याचे त्यान्ना भान असायला हवे. मुलीच्या शरिरावर आढळलेल्या खुणा, खरचटणे आणि एकन्दर मानसिक स्थितीमधे आढळलेला अमुलाग्र बदल याबाबत मुख्याध्यापकांना लेखी स्वरुपात कळवणे...लेखी स्वरुपात आल्यावर मुख्याध्यापकांना गम्भिरतेने घ्यावेच लागणार. कुठल्याही लढाईत सहकारी, सन्स्था, मुख्य (येथे मुख्याध्यापक) सोबत असतील तर लढणे सोपे जाते.

>>>शाळेच्या मुख्याध्यापकांनी माझ्या मैत्रिणीला सांगितलेय जास्त विचार करू नकोस, ती मुलीचीच नखं असतील, तीच खाजवत असेल<<<

हा सरळ सरळ प्रकरण दाबण्याचा प्रकार दिसत आहे.

मुख्याध्यापक असे बोलतात हे बघून खरे तर अवाक व्हायला हवे.

अश्या प्रकारांमध्ये संबंधितांबाबत पूर्ण गुप्तता पाळून प्रकरण तडीस नेणारी एक एन जी ओ चालक महिला पुण्यात आहे. ती पुण्यात असली तरीही इतर ठिकाणच्या केसेसही स्वीकारते. तिचा जमदग्नी अवतार, कायद्याचे ज्ञान, कोर्टात प्रतिपक्षाला घाम फोडणे वगैरे गुणवैशिष्ट्यांमुळे ती एक वेगळे स्थान टिकवून आहे.

वाटल्यास 'मायबोली संपर्क सुविधेतून' संपर्क करा.