अग्ली..? पण कोण ? - चित्रपट

Submitted by ऋग्वेद on 27 December, 2014 - 07:37

अग्ली म्हणजे विकृत, ओंगाळवाणा. हा चित्रपट मानवी वृत्तीच्या अत्यंत खालच्या थराचे वास्तव दाखवुन देतो. माणुस स्वार्थासाठी कोणत्याही थरावर जायला तयार होतो. इतका की आपल्याच पोटाच्या गोळ्याला देखील कचर्यात फेकुन द्यायला तयार होतो. मनाच्या तनाच्या सुखाकरीता कशाचाही बळी घेण्याची लालसा जागृत होते. बस मी माझे माझ्याकरीता. अजुन काहीच नाही. प्रत्येक मनुष्याच्या मनाच्या एका काळ्या कोपर्‍यात लालसा स्वार्थ नावाचा दैत्य लपुन बसलेला असतो. संधी मिळताच आपल्यावर तो हावी होउन मनुष्याकडुन नको ते कृत्य करुन घेतो. आणि त्यात जर पैसा असेल तर मग बघायलाच नको. तो दैत्य आपल्या छाताड्यावर नंगानाच करतो. काय चांगले काय वाईट कशाचाही फरक जाणवत नाही. मी जे करतोय तेच बरोबर. तेच खरे तेच नैतिक. अश्याच एका स्वार्थी दैत्याचे ओंगाळवाणे चित्रण या चित्रपटात केले आहे. एक चुकिचे वळण होत्याचे नव्हते करुन ठेवते.

अनुराग कश्यपचे चित्रपट गंभीर गुढ्त्वाकडे जास्त असतात. तो जे आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो उगाच चांगले चकचकित दाखवण्याच्या भानगडीत पडत नाही. थोडी गुंतागुंत जास्त असते पण तो आपला मुळ आशयावर कायम असतो. हेच वैशिष्ट्ये त्याच्या चित्रपटांची असतात. "ब्लॅक फ्रायडे" "गँग ऑफ वासेपुर" "देव डी" सारखे वास्तवाला चिकटुन असणारे चित्रपट. त्याच्या चित्रपटांमधे तुम्हाला कोणताही स्टार दिसणार नाही पण तुम्हाला अभिनेता नक्कीच दिसेल. खाजगिणतीतही नसलेल्यांकडुन अप्रतिम काम करुन घेण्याची ताकद अनुराग मधे आहे. म्हणुन व्यवसायिक दृष्टीकोनातुन भले त्याचे चित्रपट इतकी चालले नसतील तरी अभिनयाच्या दृष्टीकोनातुन बघितल्यास ते सर्वोकृष्ट ठरतात.

चित्रपटाची कथा सरळ आहे. चित्रिकरण देखील रोज घडाणार्या घडामोडी दाखवल्यासारखे चित्रित केले आहे.
शालिनीची (तेजस्विनी कोल्हापुरे) मुलगी कली हिला भेटायला तिचा घटस्फोटीत नवरा राहुल (राहुल भट्ट) शालिनीच्या घरी दर शनिवारी येतो तसा येतो. राहुल एक स्ट्रगलर अ‍ॅक्टर आहे. छोटेमोठे काम करुन उदरभरणा चालु आहे. असेच एक काम मिळवण्यासाठी एका मित्राच्या चैतन्य (विनितकुमार) घरी कली ला घेउन जातो. कली ला बिल्डींगच्या खाली कार मधेच ठेवुन वर घरी जातो. चैतन्य घरी नसल्याने थोडावेळ वर थांबतो. चैतन्य थोड्यावेळेत घरी येतो. तेव्हा सांगतो की खाली कार मधे कली नाही आहे. राहुल लगेच खाली जातो. कली त्याला कुठे ही दिसत नाही. तो सर्वत्र शोध घेतो. एका विक्रेत्याकडे कलीचा फोन सापडतो पण तो विक्रेता निसटतो. त्याचा पाठलाग करत राहुल आनि चैतन्य मुख्य रस्त्यापर्यंत येतात पण त्याला पकडण्याआधीच एक अपघात होतो आणि त्यात विक्रेता मरण पावतो. इकडे त्यांना पोलिस स्टेशनमधे आणले जाते. राहुल स्वतःची मुलगी गायब आहे, या विक्रेत्याच्या मागे लागलेलो इत्यादी सगळे सांगतो. शालिनीचा दुसरा नवरा शौनक बोस (रोनित रॉय) एक कडक एसीपी असतो. जेव्हा इन्स्पेटर विजय जाधव (गिरीश कुलकर्णी) फोन जातो. तेव्हा शौनक राहुलनेच कलीचे अपहरण केले आहे त्याला अटक करा म्हणुन विजयला आदेश देतो. राहुलला अटक केली जाते आणि चैतन्यला थोडा पोलिसी हिसका दाखवुन सोडुन देतात. बाहेर आल्यावर चैतन्य राहुलला या खोट्या आरोपातुन सुटण्याकरीता मदत करावी म्हणुन बनावट अपहरणकर्ता बनुन फोन करतो आणि पैश्यांची मागणी करतो जेणे करुन कलीचे अपहरण राहुल ने नाही तर अजुन दुसर्‍यांने केले आहे हे भासवता येईल. परंतु त्याचा हा डाव शौनक हाणुन पाडतो. राहुल, शालिनी आणि शौनक हे कॉलेजफ्रेंड असतात. . सततचे भांडण, राहुलची बेरोजगारी, शालिनीचे भव्य स्वप्ने. इत्यादीमुळे शालिनी त्याला सोडुन शौनकबरोबर लग्न करते. त्यामुळे शौनकला राहुलचा प्रचंड राग द्वेष आहे. राहुल घटस्फोटानंतर एका आयटम साँग करणार्या अभिनेत्री सोबत राहत असतो. राहुल कसाबसा शौनकच्या कैदेतुन बाहेर पडतो आणि कलीच्या शोधात निघतो. तिकडे शौनक देखील कलीच्या शोधात पोलीस लावतो. अश्यातच परत एका नंबरवरुन राहुलला फोन येतो. २० लाखाची मागणी होते. आता राहुल पैश्याचा जुगाड करण्याच्या मागे लागतो. तिकडे शालिनीला देखील एक फोन येतो. तिकडे ५० लाखाची मागणी होते. दोघांच्या मधे शौनक अडकुन जातो. राहुल पैश्याच्यागरजे मुळे लुट करण्याचे विचार करतो तर तिकडे शालिनी तिच्या आई वडीलांकडुन पैसे मागते.
शेवटी काय होते कली मिळते का? ते अपहरणकर्ता कोण आहेत ? त्या पैश्यांचे काय होते? वगैरे उत्तरे मिळवण्यासाठी नक्कीच चित्रपट बघा.

चित्रपट प्रचंड गुंतागुंतीचा आहे. दिग्दर्शकाने असे काही मुख्य मोजकेच सीन्स मधेच सोडुन दिलेले आहे ज्याचा अर्थ आपण लावायचा आहे. अरे ही अशी का वागत आहे. ? हा असा काय करतो.? इत्यादी प्रश्न लगेच आपल्या मनात येतात पण त्याची सविस्तर उत्तर चित्रपटात दिलेली नाही आहे. काहींची आडवळणाने तर काहींची दिलीच नाही आहे. संबंध चित्रपटात प्रेक्षक कलीला शोधत असतो. प्रत्येकाच्या मनाचा कांगोरा छोट्या छोट्या गोष्टींमधुन व्यवस्थित प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यात अनुराग यशस्वी झालेला आहे. चित्रपट अक्षरशः अंगावर येतो. चित्रपटात हिंसा शिव्यावगैरे असल्याने कुटुंबाबरोबर बघणे योग्य होणार नाही. अंगावर काटा येणारी दृष्ये बरीच आहेत. एका मुलीला जेव्हा पोलीस त्यांच्यापध्दतीने शोधतात ते फारच वास्तववादी दाखवले आहे. पोलीस देखील माणसच आहेत पण तपास करताना तटस्थपणेच समोरच्या घटनेकडे बघावे लागते. प्रत्येकाची वागणुक आपल्याला चीड आणणारी शिरशिरी आणणारी आहे. पण ती का तशी आहे हे मात्र नीट बघावे लागते.

अभिनयाच्या दृष्टीने सगळ्यांनीच अप्रतिम काम केलेली आहेत. राहुल भट या चित्रपटातुन फार कमी वेळा दिसलेला नटाने तर मुलगी हरवलेला बाप आणि एक बेफिकिर पती दोन्ही शेड्स उत्तम वठवल्या आहेत. आत खोल कुठेतरी हरवुन गेलेला परंतु आपली बुध्दी शाबुत असलेला राहुल छाप उमटवुन जातो. त्याचा मित्र झालेला विनयकुमार याने देखील चांगला अभिनय केला आहे. तेजस्विनी कोल्हापुरेने तिच्या वाट्याला आलेल्या काहीश्या नकारात्मक गुढ भुमिकेला न्याय दिलेला वाटतो. तिचे डल निस्तेज दिसणे, तिने घेतलेले निर्णय, तिची वागणुक, याभोवती एक विशिष्ट गुढ वलय निर्माण झाले आहे. बरेचसे प्रश्न तिच्या बाबतीत येउ शकतात. हेच त्या कॅरेक्टरच्या प्रमाणपत्र आहे. शौनकच्या भुमिकेत रोनित रॉय ने जबरदस्त व्यक्तिमत्व उभे केले आहे. त्याच्या पण कॅरेक्टरला विविध शेड्स आहेत. कधी मेहुण्याबरोबर कडक इन्स्पेटर तर कधी राहुल ला तिरस्कारने बघणे. बायकोवर संशय घेत राहणे तिचे फोन कॉल चोरुन ऐकने. तिच्या मित्रमैत्रिणींवर नजर ठेवणे. सगळे आपल्याच हातात असायला हवे याचा अट्टाहस इगो करणे. उत्कृष्ट रंगवलेला आहे. सुरविनला जितके सीन आले आहेत तितके तिने व्हॅम्प मैत्रिण म्हणुन योग्य केले आहे. सरप्राईज गिरिश कुलकणी यांचा इन्स्पेक्टर आहे. भुमिकेचे बेरींग बेस्टच पकडले आहे. खास करुन राहुल पहिल्यांदा पोलिसस्टेशन मधे येतो तेव्हाचा सीन. एका सर्वसामान्य पोलिस स्टेशन मधे गेल्यावर पोलिस त्याची कशी तपासणी घेतो. चांगले जमले आहे. शक्ति कपुरच्या मुलाचे काम देखील चांगले आहे. पण त्याच्यावाटेला फार कमीच सीन आलेत.

चित्रपटात गाणी नाही हे अतिशय चांगले आहे अन्यथा चित्रपटाच्या वेगाला अडथळा निर्माण झाला असता.

चित्रपट आहे तर लुपहोल्स देखील आहेत. वास्तववादी बनवताना तडका जरा जास्तच लागलेला दिसतो. कुठे कुठे तर जळलेला आहे. शालिनीला अशी का दाखवली आहे याचे उत्तर लवकर सापडत नाही आणि सापडले तरी त्या प्रश्नाशी सहसा जुळत नाही. दुसरे लग्न करुन देखील अतृप्त अर्धवट का राहते.? राहुलला तसेच करायचे होते तर इतके दिवस का थांबलेला.? कुठे कुठे जास्तच रेंगाळतो. तर कुठे काही कोड्यात टाकायचे म्हणुन दाखवायचे.? उदा. राहुल ला लॉकअप मधे न ठेवता एका चाळीच्या खोलीत खास तयार केलेल्या तुरुंगात ठेवतात. ? का म्हणुन? तसेच तिथे एक लहान मुलगा देखील असतो.? ते दाखवण्यामागे काय अर्थ आहे? असे दृश्य आहेत ज्यांचा आगापिछा काहीच नाही.

अगदी सुरुवातीला जो पॅरा लिहिला आहे तोच चित्रपटाचा आत्मा आहे. त्यावर मुद्दामुन काहीच उलगडुन लिहिले नाही. पुढे काय होणार आहे याचा अंदाज येउन देखील धक्के बसतात. बरेच प्रश्न घेउन अस्वस्थपणे आपण बाहेर पडतो. ज्याची उत्तर लगेच सापडत नाहीत. शोधावी लागतात. काही आजुबाजुला तर काही आपल्या मनात.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग्ली पाह्यला. टोटली अनुराग कश्यप स्टाइल.
अनेक लूपहोल्स सोडलेले आहेत, काही सीन्स उगाच मोठे झालेले आहेत पण तरी मला आवडला.
पहिल्या हाफनंतर शेवट ऑब्व्हियस होता. पण शेवट हा सिनेमाचा फोकस नाही, कली हरवण्यापासून सुरू झालेला आणि प्रत्येकाच्या आतले जे 'अग्ली' आहे ते बाहेर येण्याचा प्रवास हाच सिनेमाचा फोकस आहे असे मला वाटते.

अभिनयात रोनित रॉय नेहमीप्रमाणेच खूपच मर्यादित क्षमतेचाच वाटला. उडान पेक्षा फार वेगळे काही केलेय त्याने असे वाटले नाही. तो शोभतो त्या कॅरेक्टरला इतकेच.

तेजस्विनी कोल्हापुरेला दुबेजींच्या नाटकात पूर्वी पाह्यले होते त्यामुळे ती चांगले काम करणार हे माहित होतेच. तसेच झाले. ती मुळातली मॉडेल आहे आणि एका मॉडेलने बिना मेकपच्या, केसांचा झाडू झालेल्या, कंटाळ्याची पुटं चढलेल्या गेटपला कॅरी करणे यात तिचे गटस आणि अभिनेत्री म्हणून सरींडर आहे. जे आवडले.

गिरीश नेहमीप्रमाणेच ए प्लस.

कली हरवण्यापासून सुरू झालेला आणि प्रत्येकाच्या आतले जे 'अग्ली' आहे ते बाहेर येण्याचा प्रवास हाच सिनेमाचा फोकस आहे असे मला वाटते >> +१

हाच चित्रपटाचा खरा प्राण आहे. माणसांचा विचित्र व्यवहार हा केंद्रस्थानी आहे.

हे मी त्यादिवशीच वाचलेले, आणि आता माझा प्रतिसाद कुठे गेलाय शोधत होतो, जनरली वाचल्यावर प्रतिसाद द्यायचे मी मिसत नाही.. असो.. मुद्दाम बघणे होईल असे वाटत नाही, पण योग आला तर आळस नाही करणार एवढी उत्सुकता तर जागलीय.

गिरीश कुलकर्णी कोण नक्की?>> देऊळ आठवतोय?? राष्ट्रीय पारीतोषिक विजेता त्या साठी!!
मसाला, पुणे ५२? पोस्टकार्ड???

गिरिश कुलकर्णीने तो पोलिस रिपोर्टिंगचा सीन काय महान केलाय! 'पापा कॉलिंग' वाला...रियली सुपर्ब!

ओव्हरऑल चित्रपट एकदा बघावा असा आहेच. अंगावर येतो शेवट आणि धक्का बसतो. सतत काहीतरी घडत रहातं..फास्ट पेस आहे एकदम..गाणी वगैरे पकाऊपणा नाही.
रोनित रॉय मला खूप आवडतो..तो इथेही आवडलाच. राहुल भटला आधी कुठे बघितलंय प्रश्न पडला मग गुगल केल्यावर लक्षात आलं की पूर्वी हीना नामक सिरीयल होती त्यात तो नायक होता. सही आहे त्याचंही काम.

एका लक्षवेधी चित्रपटाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद रुग्वेद!

मला टाईमपास वाटला. मला अनुराग कश्यपचे सगळेच मूवी आवडतात.

तो गिरिश कुलकर्णीचा सीन आहे ना, कौनसा आयटम साँग था, त्यावर तो ज्या पद्धतीने रोनित रॉयला सांगतो..

कली हरवण्यापासून सुरू झालेला आणि प्रत्येकाच्या आतले जे 'अग्ली' आहे ते बाहेर येण्याचा प्रवास हाच सिनेमाचा फोकस आहे असे मला वाटते >> +१

अती किळसवाणा आणि सगळ्यांचा अग्लीनेस अंगावर येणारा..
शेवट अजुन डोक्यातुन जात नाहीये. Sad