ताडोबा, कालेश्वरम व हेमलकसा

Submitted by मंजूताई on 24 December, 2014 - 01:37

पंचवीस वर्षे झाली नागपुरात येऊन पण अगदी जवळपासची ठिकाणं पाहायला जमली नाही. त्यातले एक ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प व दुसरे पंचमढी! गाडी गाडी पे लिखा है घुमनेवाले का नाम , ताडोबाचा अनपेक्षित योग आला. आमचे मित्र रागीट ह्यांच्या मित्राचे येणे रद्द झाले अन आयत्या गाडीत आम्ही नागोबा नागीण बसलो अन एक अविस्मरणीय निसर्ग, सामाजिक व धार्मिक असं त्रिवेणी पर्यटन घडलं. संध्याकाळी सात वाजता नागपूरहून निघालो व ऊर्जानगर (चंद्रपूर)ला साडेदहावाजता श्री निंबाळकर (श्री रागीट ह्यांचे मित्र) ह्यांच्या घरी पोचलो. निंबाळकरांचे घर ऊर्जानगर गेटपासून शेवटच्या टोकाला, रस्त्यावर शुकशुकाट! प्रेमळ वंदना वहिनी वाट पाहतच होत्या. त्यांच्या हातची सुग्रास ऊर्जा अंमळ जरा जास्तच भरल्या गेली. दाट जंगल, शांतता व तो शुकशुकाट बघून दोन मुलांना घेऊन एकट्या राहणार्‍या वहिनींच्या धाडसाला दाद देत प्रश्न केलाच, भीती नाही का वाटतं ? आता सवय झाली, आज जरा जास्तच शुकशुकाट आहे कारण रिक्शा फिरलाय बिबट्याची वर्दी देत .... ताडोबा जंगल पाहण्याची एक झलक इथेच मिळाली. पहाटे सहाची सफारी घ्यायची असल्या कारणाने गप्पात रमायला सवडच नव्हती. अंधार्‍या निर्मनुष्य रस्त्यावरून व दाट झाडीतून साडेपाचाला मोहार्ली गेटवर पोचलो. मनोहर (गाईड) व फैय्याज ( जिप्सी चालक) आमच्या स्वागताला हजर होते. कार्यालयीन सोपस्कार करून गेट उघडण्याची वाट बघत पट्टेवाला वाघ दिसणार की नाही, चर्चा करत बसलो. चितमपल्ली काका म्हणतात जंगल म्हणजे पट्टेवाला वाघ हे समीकरण लोकांच्या मनात घट्ट बसलंय पण त्यापलीकडे जाऊन जंगलातल्या इतरही गोष्टी पाहण्याचा , अनुभवण्याचा व जंगल वाचनाचा आनंद घेतला पाहिजे. अस्वलाच्या पंजाचे ठसे

दुर्मिळ गोष्टीच अप्रूप, कुतूहल असतं, ह्या मनुष्य स्वभावाच्या गटातील आम्हीही असल्याने अर्थात वाघ बघायला मिळालाच पाहिजे .. ... अनेक वेळेला, अनेक जंगल फिरलेला पार्थ रागीट कभी खाली हाथ लौटा नही! आज 'लक्की' पार्थ बरोबर नक्की वाघाचं दर्शन होणार ह्या (अंध)श्रद्धेने गाडीत बसलो. झुंजुमुंजु वातावरणातली, निसर्गाच्या सान्निध्यातली पहाट, एक अनोखा अनुभव होता. रस्त्याच्या डाव्या बाजूला दिशादर्शक स्तंभ होते. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते, होते फक्त धावणार्‍या जिप्स्यांचे आवाज. आतल्या एका गेटवर नोंदणी करून मुख्य राखीव जंगलात प्रवेश करते झालो. बहुतेक प्राणी व पक्षीही थंडीमुळे आळसावले होते. दहा एक किमी आलो तरी एकाही पक्ष्या, प्राण्याचच काय दिनकराचही दर्शन नाही. गाडीने एक वळण घेतलं न अचानक मनोहरमध्ये उत्साह संचारला, राजाच्या पाऊलखुणा बघून! पाऊलखुणांचा मागोवा घेत घेत एका तलावापाशी आलो, बर्‍याच गाड्या कानोसा घेत उभ्या होत्या. कुठल्याही प्राण्या, पक्ष्यांची संशयास्पद हालचाल नव्हती ना कॉल देत होते. पक्षी निरीक्षणाचा आनंद घेत असतानाच डरकाळी ऐकू आली. जवळपासच कुठेतरी होता, आता येईल मग येईल, वाट बघत बसलो ... नि:शब्द् जंगलाचा अनुभव घेत. अखेर दुसर्‍या पाणवठ्याकडे आमची गाडी वळवली. थोडं दूर जात नाही तो समोर तीन चार जिप्स्या सुसाट वेगाने धुराळा उडवत धावत होत्या... .... आमच्याही गाडीने वेग पकडला...मध्येच एका उलट्या दिशेने येणार्‍या गाडीला वाघ विरुद्ध दिशेला असल्याचे संकेत मिळाल्याने तो गाडी पलटवू लागला... ही मांजर (गाडी) आडवी येते की काय... धडाधड अजूनही काही गाड्या लाल धुराळा उडवत चौखूर उधळू लागल्या .. .. वाटेत एका जपानी बाईचे स्मारक .. गाडी उलटून झालेला मृत्यू .... छाती धडधडू लागली... दहा फुटावरचं काही दिसत नव्हत.. हे कुठल्या हिंदी सिनेमाचं शोभेल असं दृश्य प्रत्यक्ष अनुभवत होतो... एका वळणावर पुढे गेलेल्या गाड्या पलटत होत्या ...आम्हीही थांबलो... पुढचे लोकं मागे बघा .... वो आ रहा है...
डम्प शेरा ...आम्ही उभे राहून मागे पाहू लागलो... कॅमेरे सज्ज झाले.. मांजर (गाडी) आडवी आली ते बरंच झालं आमच्या मागे फक्त एकच गाडी....और वो आ गया ...

जंगल का राजा .. काय डौलदार चाल...माझ्या बापाचा रस्ता...आहे कोणाची हिंमत मला अडवण्याची...फोटो काढू की शूट करू....की डोळे भरून पाहून घेऊ... नो अ‍ॅक्शन रिप्ले ... कॅच मी अ‍ॅज आय अ‍ॅम, अ‍ॅन अ‍ॅज यु कॅन...अखेर शूट केलं.. सकाळी सकाळी राजांनी चाहत्यांना दर्शन दिलं... थरारक अनुभव.... सहल सफल !अजून हातात दोन तास होते सकाळची सफरी संपायला... गाईड मनोहर खूश होता 'गब्बर' दर्शन घडवून आता त्याला 'माया' दाखवायची होती. ' दिल तो पागल है ' मधल्या शाहरुख सारखे आम्ही 'माया' शोध घेऊ लागलो.

ताडोबाचे जंगल नागझीर्‍याच्या तुलनेत खूप मोठे आहे. तिथे बायसन, कोल्हे, काळवीट , मोर, बारसिंगे, रानकुत्रे, हरीण असे अनेक प्राणी व पक्षी सतत दिसत राहतात तसे ताडोबात दिसत नाही. पाच वर्षापूर्वी नागझीर्‍यात असंच एक दृश्य बघितलं ... दहाबारा रानकुत्र्यांनी फिल्डिंग लावून केलेली पाडसाची शिकार.. पाडसाची सुटकेची धडपड... अन्नसाखळी वैगेरे ठीक आहे... पण ते दृश्य अस्वस्थ करून गेलं .... असो .. माया, माया कहाँ हो तुम.. . शोध घेत दोन्ही सकाळ-दुपारची सफार्‍या संपल्या. दोन दिवसांनी पेपरात बातमी ...वाघिणीचा विहिरीत पडून मृत्यू... ती माया तर नव्हती ना?

गब्बर भेटीचा आनंद व ' माया' न झालेले दर्शन, चुटपुटीत गाडीत बसलो अन अहेरीकडे निघालो. डॉ कन्ना मडावींच्या घरी मुक्काम व दुसर्‍या दिवशी हेमलकसा. काही इमर्जन्सीत अडकल्यामुळे डॉ तासाभरात पोचलेच. खर्‍या हीरो (डॉ प्रकाश) ने घडवलेला एक हीरो..खरा हिरा... सच्चा , प्रामाणिक व पारदर्शी, डॉ कन्ना मडावी !डॉ प्रकाश बाबा आमटे सिनेमातला विद्यार्थी 'कन्ना' शी आज प्रत्यक्ष भेट! डॉ कन्ना सारखा वक्ता अन आमच्यासारखे दर्दी श्रोते, रात्रीचा एक कधी वाजला कळलंच नाही. अहेरीसारख्या ठिकाणी सरकारी नोकरीत येणारे विविध अनुभव त्याच्याकडून ऐकायला चांगले जरी वाटत असले तरी कुठेतरी राग, चीड आणत होते, अस्वस्थ करत होते.

त्यांची यशोगाथा त्यांना मिळालेली पदके, पुरस्कार , सन्मानचिन्हे सांगत होती. आम्ही हेमलकसाला जाणार कळल्यावर लगेच त्यांनी हेमलकसाला फोन लावून तिथे राहायची व्यवस्था होईल की नाही विचारलं कारण सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून पर्यटकांची संख्या खूपच वाढली आहे. सोय होईल कळल्यावर आमचा थोडा प्लॅन बदलला. इतक्या दूर आलो आहोत तर कालेश्वर बघूनच हेमलकसा जायचे ठरले.

प्राणहिता व गोदावरीच्या संगमावर अलीकडे सिरोंचा (महाराष्ट्र) व पलीकडच्या तीरावर कालेश्वरम (तेलंगणा). डोंग्यात बसून संगम पार करून दर्शन घेऊन हेमलकसाला संध्याकाळी पोचलो. शाळेच्या सहलीच्या , इतर पर्यटकांच्या गाड्या उभ्याच होत्या. पाचवर्षांपूर्वी पाहिलेलं हेमलकसा खूपच बदललंय, मोठं झालंय. प्रपंच मोठा झालाय , विस्तारलंय, सगळ्या अंगाने. संध्याकाळ झाल्यामुळे इतर काही बघता आले नाही . पण दाखवलेल्या माहितीपटातून त्यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात येते. चित्रपट पाहताना सारखे कुठेतरी वाटत होते पाच वर्षांपूर्वी पाहिलेला 'माहितीपट' ह्या मूळ पदार्थात मसाला टाकून,रुचकर ' डॉ प्रकाश बाबा आमटे ' सादर केलाय की काय, खातरजमा झाली. दिवसभराच्या प्रवासाने दमलेलो आम्ही साध पण रुचकर जेवून झोपी गेलो. सकाळी चहा - नाश्ता व डॉ प्रकाशभाऊ व डॉ मंदाताईंशी गप्पा व प्राणी अनाथालय भेट असा कार्यक्रम. शांत रसात न्हाहून निघालेली ऋषितुल्य जोडी! प्रत्येकाची आपुलकीने केलेली विचारपूस,विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या नर्म विनोदी शैलीतली मार्मिक उत्तरे .. मन प्रसन्न झाले. प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न - नक्षलवादी त्रास देत नाही का? तुमचा प्रामाणिकपणा तुमची ढाल असते! अश्या विषयांवर किंवा एकूणच कमी बोललं की कमी प्रॉब्लेम येतात Happy चाळीस वर्षापूर्वी समस्या, आव्हाने होती, आजही आहेत, फक्त स्वरूप बदललंय! पुढचा कार्यक्रम डॉक्टरांच्या अत्यंत आवडीचा, जिव्हाळ्याचा! देहबोलीतून, चेहर्‍यावरुन उत्साह नुसता ओसंडून वाहत होता .. आम्हीही त्या कार्यक्रमाचे साक्षीदार झालो. .. . ..


फोटो सौजन्यः पार्थ रागीट

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast!!!

मस्त...
हेमलकशाला भेट देण्यापुर्वी आधी काही परवानगी वगैरे काढावी लागते का? त्यांना आधी कळवावे लागते का?

काय मस्त अनुभव ! हेवा वाटला अगदी.
फोटो पिकासावरुन टाकले तर आणखी मोठे दिसतील. त्यासंबधी सर्व माहिती मदतपुस्तिकेत आहे.

शागं, विकु, दिनेशदा धन्यवाद! विकु - हा अतिशय दुर्गम भाग आहे अन पर्यटकांची संख्या खूप वाढलीये, आगाऊ सूचना गेल्यास बरे पडते. दिनेशदा लेख लिहून झाला आल्याबरोबरच पण फ्रेम करुन फोटो टाकायचा होता पण ते जमले नाही पेशन्स संपला. असो! आज हेमलकसा प्रकल्प सुरु होऊन ४१ वर्ष झाली म्ह्णून घाईने टाकला. श्री रागीट बाबा आमट्यांबरोबर भारत जोडो सायकल यात्रेला गेले होते. ह्यांच्याबद्दल इथे वाचू शकता.http://www.manogat.com/node/21229

आजकाल हेमलकसा ला बरेच जण ट्रीप घेऊन जातात.
आम्ही मैत्रिणी पण फेब्रुवारीत जाणार आहोत.मस्त अनुभव Happy

चांगला अनुभव लिहिलाय. चित्रपट येणयाअगोदरच इथे जायला हवे होते. ताडोबाला जाऊन वाघ दिसला नाही की पर्यटक नाराज होत असतील.

छान लिहिले आहे. कालच मी अमरावतीहून नागपुरला गेलो. इतके कसे सुंदर रस्ते निर्माण केले आहेत कळत नाही. आणि ती सागाची दाट झाडी बघून वाटत होत परत सिंगापुरला जावूच नाही. माझा भाचा बस कंडक्टर म्हणून काम करतो. परवा बोलताना चिमुर वगैरे बोलत होता. मला इतका हेवा वाटला ना त्याचा.. Happy

वाह, वाचताना , फोटोज बघताना हरखायला होतंय.. तुला प्रत्यक्ष अनुभवताना काय वाटलं असेल.. नशीबवान आहेस Happy

डॉ प्रकाशभाऊ व डॉ मंदाताईंशी गप्पा व प्राणी अनाथालय भेट असा कार्यक्रम. शांत रसात न्हाहून निघालेली ऋषितुल्य जोडी! >>>> वाह, काय सुरेख अनुभव....

________/\_______

डॉ प्रकाशभाऊ व डॉ मंदाताईंशी गप्पा व प्राणी अनाथालय भेट असा कार्यक्रम. शांत रसात न्हाहून निघालेली ऋषितुल्य जोडी! <<< आहा... ग्रेट भेट! भाग्यवान आहात. Happy फोटो थोडे मोठे हवे होते.

खुप इच्छा आहे.. हेमलकसा, ताडोबा करायची!