आदिवासी जीवनशैली

Submitted by बेफ़िकीर on 22 December, 2014 - 05:05

आदिवासी जीवनशैली मस्त असते. गेल्या आठ दहा दिवसांत मी तीन आदिवासी वस्त्या आणि रानोमाळ फिरणारे काही आदिवासी अश्यांना भेटलो. आधी वाटत असे तसे ते मागास आहेत असे त्यांना भेटल्यानंतर वाटलेच नाही. असे वाटू लागले की आपणच मागास आहोत.

जमवलेली माहिती आणि काही छायाचित्रे:

शिक्षण - आदिवासी, कातकरी लोक हे सहसा रानावनाच्या जवळ किंवा एखाद्या लहान पाणसाठ्याच्या कडेला राहतात. सहसा एखादे लहानसे गाव आठ दहा किलोमीटरवर असते. त्यांना वर्षातून तीन महिने वीटभट्टीवर रोजगार मिळू शकतो. बाकीचा काळ ते लाकुडफाटा जमवणे, बकर्‍यांसाठी हिरवा पाला तोडून आणणे, मासे पकडणे असे प्रकार करत असतात. शासनाने आता चौथीपर्यंतचे शिक्षण मोफत ठेवलेले आहे. वह्या-पुस्तकेही मोफत आहेत. एक गणवेष मोफत आहे. शाळेमध्ये रोज पौष्टिक आहार मोफत आहे. ह्या आहारात आठवड्यातून दोन दिवस हरभर्‍याची उसळ आणि भात, दोन दिवस खिचडी आणि भाजी आणि दोन दिवस साधेवरण भात असतो. शिवाय शनिवारी एक राजगिर्‍याचा लाडू, एक खोबरं आणि थोडे शेंगदाणे प्रत्येक विद्यार्थ्याला दिले जातात. सहसा शाळेला एक लहानसे पटांगण असते आणि त्यात घसरगुंडी, झोपाळा आणि सी सॉ असतो. पटांगणात मुले लंगडी, कबड्डी खेळतात. शाळेतील पिण्याचे पाणी चांगले असते. मात्र एवढे सगळे असूनही कातकरी लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवतातच असे नाही. शिक्षण घ्यायला पाहिजे हा विचार बराचस झिरपलेला आहे खरा! पण सोयीस्करपणे शिक्षण घेतले जात आहे. आज आपण इथे वास्तव्यास आहोत तर जाऊदेत मुलाला शाळेमध्ये, अशी भूमिका आहे. मुले नुसतीच दंगा करत असतील आणि त्यांना सांभाळणे हा एक व्याप होत असेल तर द्या शाळेत पाठवून अशीही एक भूमिका घेतली जाते. त्यात पुन्हा मुलांच्या तुलनेत मुलींच्या शिक्षणाबाबत काही विशेष स्वारस्य दाखवले जात नाही. ही मुले शाळेत गेल्यानंतर इतर मुलांच्या तुलनेत मळकट, अस्ताव्यस्त, अस्वच्छ व बावळट दिसतात. त्यांना अभ्यासात फारशी गती नसल्याचेही जाणवते. मग शिक्षकांचा संयम संपला की शिक्षकही विचार करतात की ह्यांच्यावर प्रयत्न करायचे तरी किती. शिकतील तेवढे शिकतील अशी भूमिका घेऊन शिक्षक आपले अधिक बर्‍या विद्यार्थ्यांना शिकवू लागतात. आदिवासी मुले शाळेतून घरी आली की त्यांना बकर्‍या घेऊन चरायला जा, डोक्यावर पाण्याचे हंडे धरून लांबून पाणी भरून आण अशी कामे सांगितली जातात. त्यांच्या पालकांना असे वाटते की शाळेत जो अभ्यास झाला तितकाच अभ्यास करायचा असतो. घरी आल्यावर परत कशाला अभ्यास? त्यामुळे मुलांनाही अभ्यासाशी घेणेदेणे उरत नाही. अनेकदा शाळा चुकवली जाते. शासनाने भरपूर संधी देऊनही हा समाज शिक्षणाच्या बाबतीत अत्यंत उदासीन आहे. ही बापुडवाणी मुले मग रानावनात फिरून पाणी आणणे, एखादा लहान प्राणी धरून आणणे असे प्रकार करतात. ह्या मुलांच्या पालकांना अजून हेच ज्ञात नाही की त्यांची मुले शिकली तर कुठे त्या मुलांची मुले शहरी लोकांसारख्या नोकर्‍या करू लागतील. अजून सुमारे पंचवीस ते तीस वर्षे ह्या समाजाच्या शैक्षणिक विकासाला काही विशेष चालना मिळणार नाही असे चित्र सध्या दिसत आहे.

आरोग्य - तुमच्या-आमच्यापेक्षा आरोग्य ह्या बाबतीत अतिशय सुदैवी लोक असतात हे. आपल्याला मिळणारी हवा हा आपल्या आरोग्याचा मोठा शत्रू आहे. त्यांना मात्र झाडाफुलांमधून आणि डोंगरांना कुरवाळून येणारी अतीशुद्ध हवा चोवीस तास मिळते. तेथेच त्यांच्यात आणि आपल्यात फरक पडू लागतो. दुसरे म्हणजे पाणी! कातळावरून वाहणारे नितळ शुद्ध पाणी त्यांना उपलब्ध असते. पावसाळ्यानंतर जलाशयातील पाणी आणल्यावर ते त्या पाण्याला अनेकदा गरम करून शुद्ध करतात. चूल पेटवण्यासाठी लाकडे गोळा करताना, शेळ्यांसाठी हिरवा पाला आणताना, पाणी वाहून आणताना आणि रानातून मिळणारे विविध खाद्यपदार्थ आणताला त्यांची अविरत पायपीट चाललेली असते. ढोरवाटा, टेकड्या, घाट अश्या भागातून ते सतत चाललेले असतात, तेही अनेकदा वजन उचलून! त्यामुळे त्यांचे शरीर अतिशय काटक असते. दिसायला ते फार क्षीण आणि हडकलेले दिसतील, पण प्रचंड चिवट असतात. अस्थीरोग, श्वसनरोग असले प्रकार त्यांना सहसा होत नाहीत. हृदयविकाराचा तर प्रश्नही उद्भवू शकत नाही. बराच काळ अन्नपाण्यावाचून चालत राहिल्यामुळे शरीराचा चिवटपणा अधिकच वाढतो. महत्वाचे म्हणजे आहार! आपल्या आणि त्यांच्या आहारात जमीन-अस्मानाचा फरक असतो. ते लोक बर्‍याच प्रमाणात कंदमुळे खातात. तसेच, आपल्याला शहरात सहसा मिळत नाहीत अश्या पालेभाज्यांचेही त्यांना ज्ञान असते. ते त्या पालेभाज्या खातात. नित्याचे जेवण म्हणजे डाळ-भात, कंदमुळे आणि एखादी हिरवी पालेभाजी! मांसाहार, ज्याला ते 'वशाट' म्हणतात, तो म्हणजे जलाशयातून मासे किंवा इतर काही पकडणे! हा प्रकार त्यांच्यातील काहीजण नित्य करत असतात. बर्‍याचदा आदिवासी, कातकरी लोक हे कोळी जमातीचेही असतात. अत्यंत शुद्ध हवा, चांगले पाणी, निसर्गाच्या जवळ असलेला आहार आणि सततची अंगमेहनत ह्यामुळे हे लोक आरोग्याच्या बाबतीत शहरी लोकांपेक्षा सुदैवी ठरतात. नाही म्हणायला त्यांना सर्दी, खोकला, ताप व सर्पदंश हे प्रकार होत राहतात, पण त्यांचे प्रमाण व तीव्रता कमीच असते. ह्या सर्व घटकांशिवाय आपल्या जगात असलेली स्पर्धा आणि ताण त्यांच्या जगात जवळपास नसल्याने त्यांचे मानसिक आरोग्यही खणखणीत राहते व पर्यायाने त्याचाही चांगलाच परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो. त्यामुळेच हे लोक आपल्याच धुंदीत रानावनात फिरत राहतात. त्यांना अविकसित असण्याचे वैषम्य नसते, स्पर्धात्मक जीवनाचा ताण नसतो, अयशस्वी ठरण्याचे भय नसते.

समूहजीवन - सहसा एका वस्तीत चाळीसएक घरे असतात. ही घरे मातीची असतात व वर झावळ्या असतात. ह्या घरांचा आकार किती असावा हे ज्याचे तो ठरवतो. घराला कसलेही संरक्षण नसते कारण संरक्षण करायचे कशाचे हाच प्रश्न असतो. घरामध्ये चकचकीत दिसणारी भांडी असतात. एका दोरीवर धुतलेले, न धुतलेले असे सगळेच कपडे टांगलेले असतात. कपाट वगैरे प्रकार सहसा ठेवत नाहीत. चुलीवर स्वयंपाक केला जातो. आंघोळीसाठी घराबाहेर एक लाकडी काठ्या उभारून, त्यावर तीन बाजूंनी फडकी टाकून उभी केलेली बाथरूम असते. एखादा लहानसा जलाशय जवळच असतो. सहसा एकापेक्षा अधिक लग्न करत नाहीत. मात्र एखाद्याची पत्नी दगावली आणि त्याला लहान मुले असली तर वस्तीच्या एकमतानुसार त्याचे कोणाशीतरी लगेच लग्न लावून देण्यात येते व ती नवीन नवरी त्या मुलांचे संगोपन करू लागते. वस्तीला एक म्होरक्या असतो. तो बाहेरच्या जगाशी संबंध ठेवण्यास अधिकृत माणूस गणला जातो. एका कुटुंबात सहा ते सात सदस्य असतात. सहसा दोन ते तीन मुलांनंतर मुले होऊ देत नाहीत. लग्न मात्र फार लवकर लावून देण्यात येते. हे लोक सर्व सण साजरे करतात. मात्र होळी ह्या सनाला सर्वाधिक महत्व असते असे म्हणतात. साधारणपणे दोनशे ते सहाशे माणसे एकेका वस्तीत राहतात. त्यांच्या भांडणे वगैरे होण्याची कारणेच मुळात नगण्य असतात, किंबहुना नसतातच. जे घ्यायचे ते निसर्गाकडूनच घ्यायचे असल्यामुळे कोणाशी कश्यासाठी भांडायचे? ते शहरी लोकांना मित्रही समजत नाहीत आणि शत्रूही! (अर्थात, मागे मी अंदमानला गेलेलो होतो तेव्हा तिथे एक अशी वस्ती असल्याचे ऐकले होते जेथील आदिवासी हे अजूनही रानटीच असून आपले लोक दिसले तर थेट हल्लाच करतात).

सौंदर्य व व्यक्तीमत्व - आपल्या सौंदर्याच्या सर्व परिभाषांनुसार आदिवासी / कातकरी लोक हे अजिबात सुंदर ठरू शकत नाहीत. सततच्या मेहनतीमुळे रंग रापलेला असतो. शरीराच्या शिरा दिसत असतात. शिक्षणाचा गंध नसल्यामुळे चेहर्‍यावर सतत गोंधळल्यासारखे, बावळट भाव असतात. मात्र हे लोक अजिबात बावळट नसतात. फक्त ते आपल्याशी चलाखी करत नाहीत इतकेच. ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यात चांगले हुषार असतात. रानात कुठे गेल्यावर काय भाजीपाला किंवा मुळे मिळतील हे त्यांना चांगले ठाऊक असते. रानातूनच ते त्यांची औषधेही प्राप्त करतात. लहानसहान इन्फेक्शन्स, त्वचारोग, जखमा ह्यावर त्यांच्याकडे जालीम रानटी औषधे असतात. मात्र अशिक्षित असणे, अस्वच्छ असणे, पैसा नसणे, आराम नसणे ह्या कारणांनी ह्या लोकांचे सौंदर्य बाधीत होते. अंगावर सहसा चरबी अगदीच कमी असते. पुरुषांमध्ये दंडाचे मसल्स आणि पोटर्‍यांचे मसल्स वेल डेव्हलप्ड असतात. खाली एका छायाचित्रात एक उघडा आदिवासी दिसेल, तो रोज लाकडे वाहून आणतो आणि ती स्वतःच फोडत बसतो. आपोआपच त्याचे शरीर कसे ठणठणीत झाले आहे बघा! त्याच्यामागे दिसणारी एक लालभडक मोटरसायकल उमेश कोळी नावाच्या एका आदिवासीची आहे. हा उमेश कोळी विविध वीटभट्ट्यांवर आदिवासी कामगार पुरवणारा कंत्राटदार झालेला आहे. पण त्या उघड्या इसमासारखे सगळे पुरुष ठणठणीत नसतात अनेकजण वीटभट्टीवर कामाला असतात. अनेकजण नुसतेच रानात फिरतात ते चिवट आणि काटक असतात पण ज्याला पुरुषी सौंदर्य म्हणता येईल तसे नसतात. स्त्रिया काळ्यासावळ्या असल्या तरीही त्वचा सहसा तुकतुकीत असते. स्त्रिया अंगाने भरलेल्या वगैरे नसतात. किंबहुना अगदीच बारीक अश्या अनेक स्त्रिया असतात. पैसे नसल्यामुळे कपडे किंवा दागिने ह्यांचा प्रश्न येत नाही. तसेच, जीवनशैली वेगळी असल्याने मेक-अपचाही प्रश्न येऊ शकत नाही. नाही म्हणायला आता काही स्त्रिया गाऊन घालून हिंडतात ही थोडीशी अधुनिकता! मात्र ह्या स्त्रियांच्या देहबोलीत मोठे सौंदर्य लपलेले असते. खणखणीत आवाज, ताडताड चालणे, पातळ पार मांड्यांच्यावर घेऊन खोचलेले, एका हातात कोयता किंवा डोक्यावर मोळी अश्या अवतारात रानोमाळ अती आत्मविश्वासाने हिंडणार्‍या ह्या स्त्रिया ठिणग्यांसारख्या वावरत असतात. मात्र लहानपणीच्या कुपोषणामुळे असेल किंवा कोणत्याही कारणाने, अनेकदा चेहर्‍यावरील भाव थोडे बावळट असणे, शरीर सिमेट्रिकल नसणे असे काही प्रकार आढळतात. शहरी समाजाच्या तुलनेत बहुधा ह्या समाजाने स्तनपानाला अधिक महत्व दिलेले दिसते. आपल्या वस्तीत पुरुषांवर सर्रास डाफरणार्‍या ह्या स्त्रिया वस्तीबाहेरच्या माणसांसमोर मात्र एकदम कावर्‍याबावर्‍या होतात.

स्वच्छता - हे लोक स्वच्छ मात्र राहात नाहीत. अनेकदा पाण्याचा अभाव व स्थलांतर हे त्यामागील कारण असते. लहान मुले मातीत पडलेले अन्नकण खातात. नाक वाहात असते. एका लहान मुलीच्या मनगटावर मोठी जखम होती आणि त्यावर माश्या बसत होत्या, पण कोणाचे लक्ष नव्हते. आंघोळ बहुधा पाण्याच्या उपलब्धतेनुसारच करत असावेत. म्हणजेच, रोज करत नसावेत. अन्न उघड्यावरच पडलेले असते. कपडेही स्वच्छ नसतात. भांडीकुंडी मात्र नजर लागावी इतकी चमकत असतात, हे रहस्य काही मला उकलता आले नाही. स्वच्छता, किंबाहुना ह्या लोकांची अस्वच्छता हा एक असा निकष आहे की ज्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात एक मोठी दरी पडते.

संधी - शासनाने ह्या कातकरी लोकांना संधी देऊ केलेल्या आहेत. शिक्षण मोफत आहे. नोकरीसाठी आरक्षण आहे. उदरनिर्वाहासाठी लहानमोठे व्यवसाय उभारण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे. स्थलांतर करावे लागत असल्यास उगाच त्यांना कोणी 'येथे का राहायला आलात' असे विचारून त्रास देत नाही. (तेही अश्याच जागी राहतात जिथे राहिल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही). एकाच ठिकाणी राहणार्‍यांपैकी काहींना शासनाने घरकुल योजनेअंतर्गत घरेही बांधून दिली आहेत. मात्र एक खूप मोठ्ठा प्रॉब्लेम ह्या लोकांना भेडसावतो. तो म्हणजे ह्यांच्या नावचे आरक्षण कोणी भलतेच पळवतात व हे प्रचंड प्रमाणावर घडते. ह्या लोकांपैकी कोणी खरोखर शिकला आणि आरक्षण मागायला गेला तर त्या जातीची सर्व आरक्षणे आधीच संपल्याचे समजते. नंतर छडा लागतो की ज्यांनी ते आरक्षण मिळवले ते आर्थिकदृष्ट्या चांगले भरभक्कम होते. म्हणजे बघा, शासन काहीतरी करू पाहात आहे, हे लोक शिकून सुधारू पाहात आहेत आणि आपल्याकडचे भ्रष्ट लोक ती संधी त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नाही आहेत.

IMG_4300.JPGIMG_4302.JPGIMG_4329.JPGIMG_4331_0.JPGIMG_4334.JPGIMG_4338_0.JPGIMG_4351.JPGIMG_4369.JPGIMG_4370.JPGIMG_4373.JPGIMG_4375.JPGIMG_4378.JPGIMG_4379.JPGIMG_4380.JPGIMG_4382.JPGIMG_4388.JPGIMG_4389.JPGIMG_4368.JPGIMG_4361.JPGIMG_4115.JPGIMG_4197.JPGIMG_4250.JPG

हे एक वेगळे जग आहे. ताण, स्पर्धा, मत्सर, विकार, पैसा, तांत्रिक विकास, भय, अगतिकता, संताप, विकृत स्वार्थ अश्या अनेक दुर्गंधीयुक्त घटकांनी गच्च भरलेल्या ज्या उकिरड्यात आपण राहतो त्याच उकिरड्याच्या काठाला लागून हे जग आहे. आपल्या समाजातील अनेक व्यक्ती, संस्था व प्रशासन 'ह्या जगालाही आपल्यासारखे बनवण्यासाठी केलेल्या कार्याला' समाजकार्य समजते. स्वतःचा पैसा, वेळ, कष्ट वगैरे वापरून अनेकजण ह्या जगातील घटकांचा उद्धार करू पाहतात. अनेक संस्था ह्या जगातील घटकांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, राहणीमान उंचावण्यासाठी विविध उपक्रम, चळवळी चालवतात. अनेक थोर विभुती देणग्या देतात. शासन त्यांना पायाभूत सुविधा देऊ पाहते. मोफत शिक्षण देऊ पाहते. आरक्षण देऊ पाहते.

एवढी प्रचंड ताकद आणि इच्छाशक्ती त्यांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत असते.

तरीही ते तसेच राहतात. शिकत नाहीत. नोकर्‍या करत नाहीत. भटकत राहतात.

मग आपली चिडचिड होते. आपल्याला संताप येतो. आपण केलेल्या कार्याचे आपल्याच जगातील काहीजण कौतुक करतात, आपल्याला पुरस्कार वगैरे मिळतात. मात्र त्या काठावरच्या जगातील लोक काही सुधारत नाहीत. ते बावळटासारखा चेहरा करून आपली बडबड ऐकून घेतात आणि करायचे तेच करत राहतात. मग आपला संयम संपतो. आपण ओरडून सगळ्यांना सांगायला लागतो की ह्या लोकांसाठी मी हे केले, ते केले. ह्या लोकांना त्याचे काहीही नाही. खरे तर, आपल्यासारख्यांनी त्यांच्यासाठी काही करावे ही त्यांची लायकीच नाही, असेही आपण सांगू लागतो. हे कायम असेच राहणार, असा निष्कर्ष काढून आपण मोकळे होतो. त्यांना मागासवर्गीय, खालच्या जातीतले असे संबोधू लागतो. आपल्यापैकी काही चिवट व प्रामाणिक असतात ते त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवतात. काहीजण ह्या कार्यात स्वतःला झोकूनही देतात. आयुष्यभर त्यांच्यासाठी काम करत राहतात.

बर्‍याच अवधीनंतर त्या काठावरले काही धाडसी लोक एकदाचे उकिरड्यात पाय ठेवतात. मग आपण आपले झेंडे मिरवतो. 'बघा आणला की नाही त्याला आपल्यात' असे म्हणत! काहीवेळा त्या काठावरच्या जगातील एक समूहच्या समूह आपल्याकडे येतो आणि आपल्यासारखे व्हायचा प्रयत्न करतो. मग आपल्या आनंदाला उधाण येते. पण आपल्याला सत्य माहीत असते. आत आलेला हा समूह त्या जगाचा एक नगण्य भाग आहे. ते जग अजूनही तसेच आहे. त्यात फारसा फरक पडलेला नाही.

आपण आपल्या उकिरड्याला विकसित जग असे नांव ठेवतो.

......आणि त्या काठावरच्या जगाला आपण 'आदिवासी' म्हणतो.

आदिवासी, कातकरी समाज!

ह्या समाजाच्या जीवनशैलीची जमेल तसा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला. आपापले अनुभव, ज्ञानकण त्याखाली लिहून आपण सगळे हा धागा समृद्ध करू शकता.

ही माणसे ग्रामीण विभागात फिरत असताना रस्त्याकडेच्या घनदाट अरण्यातून, डोंगरांमधून, ढोरवाटांवरून, एखाद्या कालव्याशेजारी अशी वावरताना दिसतात.

आपण तेथून भर वेगात निघून जातो.

आपण त्यांना पास करत असतानाच्या क्षणापुरती त्यांच्यातील आणि आपल्यातील एक भीषण, प्रचंड दरी दृष्यमान होते. त्या एका क्षणापुरती त्यांची आणि आपली झालेली नजरानजर ही भावनाहीन असते, कोणालाच दुसर्‍याविषयी काहीच वाटलेले नसते. आपण त्यांना पास करून गेलो की ही दरी अदृष्य होते. सगळे विस्मरणात जाते.

पण दोन समांतर विश्वे एकाच भूभागावर अस्तित्त्वात आहेत ही जाणीव तेवढी आपल्या मनात दीर्घकाळ राहते.

धन्यवाद!
========================

-'बेफिकीर'!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख फार आवडला. गावातले वातावरण थोड फार अनुभवलय. एकदा कल्याणच्या पुढे मुरबाडकडे गेलो होतो. मोठ जन्गल ( जवळच गोरख आणी सिद्ध गड होते, पण आमच्या नशीबात कुठल आलय ट्रेकिन्गचे सुख.:अरेरे:), शुद्ध थन्ड निर्मळ हवा. नो पोल्युशन. इकडेच दर्‍या खोर्‍यात अदिवासी आणी कातकरी समाज मोठ्या प्रमाणावर असल्याचे समजले. वाटेत जाताना काही धनगर लोक शेळ्या हाकत नेत होते त्यानी सान्गीतले.

मला खरच याचाच भयानक राग येतो की या अदिवासी काय किन्वा इतर समाजात असणार्‍या गरीब लोकाना काय, सरकार कडुन मिळणारी मदत ही मधलेच लोक लुबाडुन घेतात.:राग: याना कसल्याच लाज-लज्जा कशा नसतात देव जाणे. दुसर्‍याच्या तोन्डचा घास पळवणारे हे लोकच खरे मागास. यान्च्याकडे माणुसकी नावाचीच जात नाही.

हो नाचणी हे या लोकान्चे मुख्य अन्न. यातुनच भरपूर कॅल्शियम मिळत असल्याने आणी प्रचन्ड कष्टाने यान्चे शरीर काट्क बनते.
फोटो अगदी प्रोफेशनल आलेत. किप इट अप!

छान. माहितीपर लेख.
हे एक वेगळे जग आहे. ताण, स्पर्धा, मत्सर, विकार, पैसा, तांत्रिक विकास, भय, अगतिकता, संताप, विकृत स्वार्थ अश्या अनेक दुर्गंधीयुक्त घटकांनी गच्च भरलेल्या ज्या उकिरड्यात आपण राहतो त्याच उकिरड्याच्या काठाला लागून हे जग आहे.>>>>>>>> आवडलं.

फोटो छान आलेत. पण परवानगी घेतली होतीत का?

आपल्या समाजातील अनेक व्यक्ती, संस्था व प्रशासन 'ह्या जगालाही आपल्यासारखे बनवण्यासाठी केलेल्या कार्याला' समाजकार्य समजते. >> असे अनेक समाजसेवक आपल्या सुखच्या कल्पना आदिवासी समाजावर लादत असतात. पूरेसे अन्नपाणी, स्वछता, वैद्यकिय मदत, शिक्षण हे मूलभूत अधिकार ह्या समाजास मिळायला हवे ह्याबद्दल दूमत नाही. पण आपल्या निकषांवर ह्या समाजाच्या गरजा ठरविणे अथवा त्यांच्या सुखदु:खाचे मूल्यमापन करणे हे अयोग्य आहे असे मला वाटते.

आपण आपल्या उकिरड्याला विकसित जग असे नांव ठेवतो.......आणि त्या काठावरच्या जगाला आपण 'आदिवासी' म्हणतो. >> हे वाक्य आवडले. आपण खरच विकसित आहोत का हा प्रश्न मला पडायला लागला आहे!! खरे पहायला गेले तर आदिवासी समाजाच्या सुखदु:खाच्या कल्पना आपल्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ असतील असे वाटते. मग आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक विकासामुळे आपण नक्की काय साध्य केले?

हे एक वेगळे जग आहे. ताण, स्पर्धा, मत्सर, विकार, पैसा, तांत्रिक विकास, भय, अगतिकता, संताप, विकृत स्वार्थ अश्या अनेक दुर्गंधीयुक्त घटकांनी गच्च भरलेल्या ज्या उकिरड्यात आपण राहतो त्याच उकिरड्याच्या काठाला लागून हे जग आहे.>>>>>>>> @बेफी, हे टाळ्या घ्यायला वाक्य चांगले आहे पण खरे कीती आहे?

आदीवासींमधे विकार, मत्सर, संताप, स्वार्थ, भय नसते असे वाटते का तुम्हाला. किंबाहुना ह्याच्या बरोबरीने हिंसा, दमन, व्यसनीपणा, पाशवी चालीरीती, नविन शिकण्याची, स्वीकारण्याची नसलेली तयारी, स्वताच्य मुलाबाळांची जबाबदारी न घेण्याची वृत्ती अश्या अनेक शहराताल्या पेक्षा मोठे आणि घाणेरडे उकीरडे आदीवासींमधे असतात.

लेख आवडला, पण आपले व्यक्तीमत्वाचे, शहाणपणाचे निकष त्यांना लावले जाऊ नयेत.
खरे तर ते जंगलचे राजे, नव्हे मालकच ( हा हक्क त्यांना भारताच्या राज्यघटनेनेच दिला आहे. ) ते कधीही जंगलाची नासधूस करत नाहीत, आपल्या गरजेपेक्षा जास्त कधी घेतही नाहीत. जंगलाची जोपासना कशी करायची हे त्यांना जास्त चांगले समजते.

ब्रिटीशांना भारतातील जंगलातून उत्पन्न खास करून साग हवा होता, म्हणून त्यांनी फॉरेस्ट खाते तयार केले आणि त्या लोकांचा हक्क नाकारला. त्यांना चोर ठरवले. तेव्हापासून ते लोक मुख्य प्रवाहापासून दूर फेकले गेले.

आजही जंगलखात्याचा कारभार त्याच खाक्याने चालतो. पण काही भागात लोकांनी आपले हक्क झगडून मिळवले आहेत.

गरजूंनी "मोंढा गावाची गोष्ट" हे मिलिंद बोकिलांचे पुस्तक अवश्य वाचावे.

बेफि. - लेख मस्त लिहिला आहे . या लोकांना शिक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्न करते आहे पण शिक्षणाचा फायदा आणि अशीक्षिताचा तोटा या लोकांना पटाउन दिले पाहिजे .

पालघर, वाडा, तलासरी आणि आसपासचे आदीवासी जिवन बर्‍यापैकी जवळून पाहिले आहे पण इतकी माहिती नव्हती. इतके मुद्देसुद आणि दिर्घ लिखाण बेफिकीर तुम्हालाच जमू शकते. हे खरे विकासाच्या प्रतिक्षेत असलेले उपेक्षीत. खराखुरा विकास हा. जो अजून आपला सर्वांचाही व्ह्यायचा आहे.

सर्व प्रतिसाददात्यांचे खूप आभार!

आठ दिवसांत आदिवासी जीवन कळणे शक्य नाही ह्याची जाणीव आहेच. जमली तेवढी माहिती फक्त द्यायचा प्रयत्न केला. काही त्रुटी जाणवल्यास अवश्य सुधारणा सुचवाव्यात.

-'बेफिकीर'!

चांगला लेख!
लहानपण रायगड जिल्ह्यात गेल्याने ठाकरं, कातकरी मंडळी रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटक होती. मात्र त्यांचे रहाणीमान अतिशय स्वच्छ असायचे. झेंडूच्या फुलांपासून ते काकडी, दुध्या वगैरे भाज्या, भारंगी सारख्या पालेभाज्या, डोंगरातल्या चिंबोर्‍या , करवंदे, मध, केवड्याची कणसे वगैरे सिझनप्रमाणे ही मंडळी विकायला आणायची. शिवाय बंबासाठी कोळ्सा, लाकूडफाटा आणायची. पावसाळा संपला की आवारातले गवत बेणायला वगैरे पण यायची. त्यातली हीरा नावाची कातकरीण अजून आठवते. माझ्या बाबांच्या ९ मापाच्या जुन्या चपला ती दरवर्षी हक्काने घेवून जायची. बहुतेकांची हक्काची ठरलेली घरं होती. एकदोनदा फॉरेस्टची माणसं मागे लागलेत सांगून २-३ कातकरणी आसरा शोधायला आल्याचेही आठवते.
नवरात्रात कातकरी स्त्रीया डोक्यावर धान लावलेले घट घेऊन यायच्या. गोल रिंगण करुन उभ्या राहून टिपर्‍या वाजवत त्याच्या भाषेत गाणी म्हणायच्या, नाचायच्या नाहीत, नुसत्याच टिपर्‍या वाजवत उभ्या रहायच्या. केसात रंगित रिबिन्स वगैरे लावून नटून यायच्या. आई पैसे द्यायची. दिवाळीतही त्यांना आई दिवाळी द्यायची. सुट्टीत रानात भटाकायला गेले आम्हा मुलांना कातकरी करवंदांच्या जाळ्या दाखवयची. खरे तर त्यांचे उपजिविकेचे साधन पण उदारपणे कच्ची करवंदे तोडून द्यायची. ११-१२वीत सर्वे करण्याच्या निमित्तानेही बरेचदा पाड्यावर जाणे व्हायचे. अंगणशाळा असायच्या. मात्र व्यसनांमुळे एकंदरीत शाळा शिकणे मागे पडायचे. त्यात प्रमाणित भाषेत शिक्षण त्यामुळे गोडीही लागायची नाही. मात्र कितीही नशेत असले तरी सभ्यपणाचा विसर पडायचा नाही. आम्ही अडनिड्या वयाच्या मुली रानात बिंधास असायचो.

बेफिकीरजी, आदिवासी जीवनशैलीचीं वैशिष्ठ्यं इतक्या अभ्यापूर्वक, सहृदयतेने अधोरेखित केल्याबद्दल व त्याविषयीं संवेदनशील मनांत उमटणार्‍या प्रतिक्रिया इतक्या नेमक्या मांडल्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन व आपल्याला धन्यवाद.
<< आपापले अनुभव, ज्ञानकण त्याखाली लिहून आपण सगळे हा धागा समृद्ध करू शकता.>> केवळ या आवाहनामुळे हें डेअरींग करतोय. मीं मुद्दाम अशा जीवनशैलींचा अभ्यास केलेला नाहीं पण खूप वर्षांपूर्वीं कामानिमित्त चंद्रपूरच्या जंगलांत दोन-अडीच महिने मुक्काम करावा लागला होता व तिथलं 'माडिया' आदिवासींचं जीवन आयतंच जवळून पहायला मिळालं. तिथं कार्यरत असलेल्या वन विभाग, जिऑलॉजी विभाग या खात्यांतील कर्मचारी, अधिकारी व स्थानिकांकडूनही कुतूहलापोटीं विश्वासार्ह माहिती मिळवतां आली. खूप वर्षांपूर्वीची ही माहिती असली तरी त्यांत फरक पडला असण्याची शक्यता कमीच म्हणून इथं ती देणं औचित्यपूर्ण होईल, असं वाटतं -
१] मध्यम बांधा, काटक शरीर, रेखीव अवयव व गव्हाळी वर्ण यामुळे 'माडिया' आदिवासी हे दिसण्यात इतर आदिवासींपेक्षां वेगळे व सरस असावेत; कांहीं स्त्रिया तर शहरी निकष लावूनही सुंदर म्हणण्याइतपत सुरेख असतात.
२] लग्नापूर्वीं मुलां- मुलींमधे बोलण्या-वागण्यात खूप मोकळेपणा असतो; लग्नानंतर मात्र कपडे, वागणं याबाबतींत बायकांवर कांहीं बंधनं येतात.
३] लग्न ठरल्यावर नवर्‍या मुलाला मुलीच्या घरी वर्षभर राहून सगळ्या कामात हातभार लावावा लागतो; या उमेदवारीत तो लायक ठरला तरच लग्नाला पंचायतिसमोर अटी ठरवून संमति दिली जाते.
४] भात हेंच मुख्य अन्न. [भाताचं पीक लावणी वगैरे सोपस्कार न करतां नुसती पेरणी करूनच काढलं जातं.पाला कुजून सुपिक झालेली जमीन असल्याने जाड्या-भरड्या जातीच्या भाताचं पीक बर्‍यापैकीं येत असावं]. भाज्या, फळं जवळ जवळ नाहीतच. गुरांचे कळप असूनही दूधावर फक्त वासरांचा हक्क म्हणून दुध काढणं निषिद्ध समजलं जातं ! [ गुरांचे कळप रोज दिसत असूनही संपूर्ण मुक्कामात आम्हीं चहालासुद्धां पावडरचंच दूध वापरत असूं !] नदीतले मासे व शिकार यांचा जेवणात समावेश असतो पण तोही नियमित नाहीं. मोहाच्या फळांची दारू व मध मात्र सर्रास उपलब्ध असतात.
५] त्यांची भाषा ही मराठी, संस्कृत, तेलगू इत्यादींचं एक अजब मिश्रण. [ मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश याना लागून असलेला हा महाराष्ट्राचा भाग असल्याने असं असावं]. बांबूंची अगदीं छोटी पण सुबक व स्वच्छ घरं. शिवाय, प्रत्येक पाड्यावर तसंच एक छोटं अतिथिगृह [गोटूल] जिथं वाटसरूंची सोय व मुलां-मुलींसाठीं 'क्लब'चं वातावरण !
६]शिक्षणासाठी प्राथमिक शाळा अधूनमधून उघडलेल्या होत्या पण विद्यार्थी - व शिक्षकही - मात्र दिसले नाहीत.
७] मुली व बायकाना दागिन्यांचं अप्रूप , मग साधीं नाणीं गुंफून केलेले हार का असेनात. इतर आदिवासींमधे असलेलं फुलांचं वेड मात्र इथं दिसलं नाहीं कारण फुलझाडंच या जंगलात अभावाने दिसतात.
८] विडी बनवायला लागणारी पानं [ तेंडूपत्ता] खुडणं, वाळवणं इ. हा इथला मोठा व्यवसाय व मर्यादित हंगामातलं माडियांचं रोजगाराचं साधन.
९] सर्वच आदिवासींप्रमाणे समूहगान व नाच हा सांस्कृतिक वारसा यांच्याकडेही आहेच.
१०] महारोगाची [लेप्रसी] लागणही मोठ्या प्रमाणात नसली तरी लक्षात येण्याइतपत आहेच.
११] बाहेरच्या माणसांसमोर बुजणारे माडिया एकमेकांशीं मात्र हंसत खेळत वावरताना दिसत. आमच्या तिथं असण्याची त्याना संवय झाल्यावर माडिया आमच्याबरोबर हंसत व आमच्यावरही विनोद करून आपापसांत हंसत, हेंहीं आम्हाला जाणवलं होतं !
१२] इतर आदिवासी व माडियांमधे मुख्य फरक हाही असावा कीं इतर आदिवासींचा इतर समाजांशीं वरवरचा तरी संबंध येतो पण माडिया हे त्यांच्या जंगलाबाहेरच्या जगाशीं अगदींच अपरिचितच असतात.

बेफिकीरजी, शहरी व आदिवासी संस्कृति याबाबत आपण जी तात्विक बाजू मांडली आहे तिला छेद देणारी तिथली एक अपवादात्मक गोष्ट मात्र माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे व तिचा उल्लेख करणं अपरिहार्य आहे -
आमच्या तेथील वास्तव्यात एक १८-२० वर्षं वयाचा पोरसवदा माडीया तरूण सतत आमच्या वाटेवर आम्हाला भेटायचा व नकळत आमच्या टीमचा तो सदस्यच होवून बसला. तो इतका चलाख होता कीं भाषेची अडचण असूनही आम्हांला काय हवंय याचा नेहमीं नेमका अंदाज घेवून तो तत्परतेने मदत करायचा. मधेंच जीप थांबवायला सांगून तो झाडींत लपलेलं आवळ्याचं झाड , कुठंतरी ओढ्यावर मासे पकडायला माडियानी लावलेली बांबूची जाळी, एखादा प्रचंड घेराचा सागाचा वृक्ष, पाचोळ्यात अदृश्यपणे सळसळणारा १०-१२ फूट लांबीचा अजगर असं कांहीना कांहीं सतत दाखवतच असायचा. त्याच्याविषयीं मग आम्हाला माहिती मिळाली कीं कांहीं प्रचलीत संकेत न पाळल्याने त्याला पंचायतीने वाळीत टाकलं आहे [ तो एका स्वतंत्र लेखाचाच विषय आहे]. पण हा पठ्ठ्या स्वतःचं वागणंच योग्य आहे - व तें आम्हालाही पटलं होतं - म्हणून त्या पाड्यालाच जणूं आपण वाळीत टाकलं आहे अशा अविर्भावात एकटा बाणेदारपणे पाड्याबाहेर रहात असे. प्रचंड कुतूहल, आत्मविश्वास हा त्याचा स्थायीभावच होता. जंगलाची त्याला इथ्यंभूत माहिती होतीच पण जंगलाबाहेरच्या जगाबद्दलची त्याची आत्यंतिक ओढही सतत आम्हाला जाणवायची. आमचं तिथलं काम संपत आलं तेंव्हां माझ्या लक्षांत आलं कीं केवळ सढळ हाताने पैसे देवून आम्हीं त्याच्या मदतीची परतफेड करूं शकणार नव्हतों, कारण त्याला खुणावत असलेल्या बाहेरच्या जगांत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणूनच तो आमच्याकडे मोठ्या आशेने पहात होता. तीव्र इच्छा असूनही आम्हाला त्याला याबाबतींत मदत करणं किती अवघड आहे हें चौकशीअंतीं आमच्या लक्षांत आलं. त्याचा निरोप घेताना दिसलेली त्याच्या डोळ्यातील हताशतेची वेदना आजही मला अस्वस्थ करतेच.
बेफिकीरजी, कारणं वेगळीं असलीं तरीही आपल्या समाजात आपली घुसमट होणं हें शहरी समाजातल्या घटकाप्रमाणे आदिवासी समाजातही अशक्य नाहीं, याचं हें उदाहरण.
शहरी माणसाला इथली घुसमट असह्य होणं व त्यावरचा उपाय म्हणून त्याने आठ-दहा दिवस जंगल रिसॉर्टमधे जावून रहाणं, हें तर आपल्या नेहमींच्या माहितीतलंच आहे. पण जंगलावर प्रेम असूनही जंगलातलं मर्यादित जगणं एखाद्या आदिवासी प्रतिभावंतालाही गुदमरून टाकूं शकतं, हें मीं प्रत्यक्ष पाहिलंय व तें मला चटका लावूनही गेलंय; पण तो बिचारा आदिवासी मात्र ती घुसमट घालवायला ह्या बाहेरच्या जगांत डोकावूंही नाही शकत, हा खरा दु:खद विरोधाभास आहे !!

किती सुंदर लिहिलं आहेत भाऊसाहेब! तुमच्या ह्या अभिप्रायाने मूळ धागा सार्थकी लागला. तुमचा प्रतिसाद मूळ लेखापेक्षा अधिक चांगला आहे. तुम्ही त्या जमातीबाबत कृपया एक स्वतंत्र धागा काढावात असे सुचवावेसे वाटते. ह्याचे कारण, तुम्ही प्रतिसाद देताना मूळ धाग्याशी सुसंगत वाटेल असा प्रतिसाद द्यायचा असल्याने मर्यादीत प्रतिसाद दिलेला असण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात तुमच्याकडे बरीच अधिक माहिती असू शकेल असे जाणवत आहे.

मनापासून धन्यवाद!

स्वातीजी,

तुमचा प्रतिसादही खूप सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. एकुण, हा धागा अश्या प्रतिसादांनी समृद्ध होत आहे. 'धान' म्हणजे काय असते? मस्त वाटला तुमचा प्रतिसाद!

सर्वांचे पुन्हा आभार!

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी, वरचं लिखाण पोस्ट करावं कीं नाहीं, हें तीन-तीनदां माझ्या पत्नीला मला विचारावं लागलं होतं. आपल्या प्रतिसादाने [त्यांतील आपल्या चांगुलपणाचा अतिरेक वगळून] आतां हायसं वाटलं. धन्यवाद.

खूपच महत्वाचं असं काहीतरी तुम्ही अनुभवून शब्दबद्ध केलं आहे. सगळ्या सामाजिक विषमतेशी टक्कर देत वनवासी अजूनही तग धरून आहेत. अत्यंत दारिद्र्यातही निसर्गसान्निध्यामुळे आनंदात , मस्तीत आहेत . या निसर्गाच्या मुळावर कुऱ्हाडी घालण्याचं कां जोरात सुरू आहे ! याच वनवासी लोकांना आपला विकसित समाज, विकास कार्यक्रम विस्थापित करत असतो..आणि मग पुनर्वसनाचे प्रयोगही करतो..

ह्या कातकरी लोकांशी अगदी घरचे दोन तीन पिढ्यांचे संबंध आहेत. बरे वाईट असे अनेक अनुभव घेतलेले आहेत. ढोबळमानाने सांगायचे तर जुन्या सगळ्या गडी बायांचे चांगले आणि आजच्या पिढीचे तुलनेने वाईट अनुभव आहेत. अर्थात ह्याविषयी माझे आई बाबा अधिक चांगलं बोलू शकतील.
माझ्या लहानपणी आमच्या गडी बायांनी मला खूप खूप प्रेम दिलं आणि अतिशय निःस्वार्थी! अनेकदा त्यांच्यात बसून मी जेवले आहे. आमच्याकडे काम करणारी शांताबाई तर माझी गेल्या जन्मीची नातलग असावी असं तिचं नी माझं नातं! सतत तिच्याभोवती असायचे मी! तिच्या पदराला बांधल्यासारखी!
आमचे आंबे राखायला पार्वती आणि जेठू हे जोडपं असायचं.मग आंबे उतरवून घेताना कडाडून वाद व्हायचे!! काय पण भयंकर विनोदी आरोप प्रत्यारोप असायचे! पण तितकंच प्रेमही असायचं! इतके कमी आंबे कसे निघाले? तू आधी विकले असशील! मग पार्वती म्हणे, विकायलाच हवे होते! जास्ती भाव मिळाला असता! मला वाटते किती आंबे उतरवले त्यावर मजुरी ठरत असे. आणि पार्वतीला आकडेमोड येत नसे! बाय तू मोज! तुझा बाबा फसविल मला! असं म्हणत मला मोजायला लावायची! दिवसभर त्या कैऱ्यांचा, करवंदांचा चीक आणि जांभळांचा गर ह्यांनी माखवून घेत आम्ही आंबे उतरवण्याच्या मोहिमेवर असायचो! तिथेच चुलीपाशी बसून हातावर थापलेली गरमागरम भाकरी खायची! गायीचं ताजं धारोष्ण दूध प्यायचं, पाण्याच्या हौदात डुबक्या मारायच्या आणि असं दिवसभर मनसोक्त हुंदडून कैऱ्यांची पोती घेऊन परत यायचं! काय दिवस होते ते!!
शांताबाई आता नाही. ती वारल्याचं आठवड्याभरानी कळलं आम्हाला Sad एक समाधान आहे! जितक्या वेळा महडला जात असे तितक्या वेळा शांताबाईला भेटत असे! तिला काहीतरी खाण्याचं भेट देत असे. तिच्या पाया पडत असे. माझी आज्जीच होती ती! एकवेळ महडला जाऊन गणपतीला जाणार नाही पण शांताबाईला न भेटता येणार नाही असं मनात ठरवलं होतं. ते पाळलं.
गेल्या डिसेंबर मध्ये भारतात गेले होते तेव्हा पार्वती भेटायला आली. नव्वदीच्या घरात वय आहे आता तिचं! कुठूनसं कळलं की मी आल्येय सुट्टीला म्हणून भेटायला आली होती. आमच्या घराला नवा रंग दिला त्यामुळे तिला ते ओळखू आलं नाही. बिचारीने दोन चकरा मारल्या घरासमोरून. शेवटी कोणीतरी घर दाखवलं! मग बसली (खाली जमिनीवर बसली, गुढगेदुखी वै. बात नाही!), चहा प्यायली, जुन्या आठवणी काढल्या! मला तर भरूनच येत होतं सारखं! ही खरी प्रेमाची नाती! ह्या सगळ्या गड्या बायांनी आजी आप्पांच्या संसाराला घरपण आणलं, संकटात, मंगलकार्यात पाठीशी उभे राहिले! काय तगडी सपोर्ट सिस्टीम होती ही! माझ्या काय माझ्या बाबांच्या बारश्याचं जेवलेली माणसं! अशी जोडलेली माणसं ही खरी श्रीमंती!

नव्या कातकरी समाजात मुख्य समस्या म्हणजे अचानक हाती आलेला पैसा आणि व्यसनाधीनता. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मुळे (त्यात जमिनी गेल्याने नुकसानभरपाईचे पैसे मिळाले) अनेक जण एका रात्रीत लखपती झाले आणि सारे पैसे फुंकून पुन्हा रंक झाले. कातकरी समाजात भविष्याचा विचार वै. नसतो. ते फक्त पुढच्या ३ दिवसांचं planning करतात! कुठेतरी राबा, रोज मिळाला की थोड्या पैशांची मीठ मिरची डाळ-भात आणून पोट भरा आणि उरलेल्या पैशांची दारू प्या! एका कामावरून दुसऱ्या कामावर एवढाच फरक. काही वर्षांपूर्वी महडजवळ खोपडी ची विषारी दारू पिऊन अनेक कातकरी मरण पावले होते. (त्यात शांताबाईचा मुलगा देखिल होता) ह्या व्यसनाधीनतेतून कातकरी लोकांना बाहेर काढणारा अजून जन्मायचा आहे. ह्या आधुनिकतेच्या वादळाने, शहरीकरणामुळे कातकरी लोकांची पूर्वीची जीवनशैली पार बदलून टाकली आहे. नव्या युगातले वाईट फार पटकन शिरले आहे आणि चांगल्या गोष्टी पोहोचल्या नाहीयेत ही शोकांतिका आहे.

भाऊ नमसकर आणि जिज्ञासा,
तुमच्या प्रतिसादांनी माहितीत अजून भर पडली. धन्यवाद.

बेफी,
धान म्हणजे धान्य. घटात तांदळाच्या लोंब्या लावलेल्या असतात.
अवांतरः एक विनंती- माझ्या नावापुढे 'जी' नका लावू. Happy

जिज्ञासा,

तुमचा प्रतिसाद जबरदस्त आहे.

खरे तर हा लेख मी लिहिण्यापेक्षा तुम्ही, स्वाती २ आणि भाऊसाहेबांनी लिहायला हवा होता.

Happy

स्वाती२ - नोटेड! (नो 'जी')

धन्यवाद बेफि, स्वाती२! आणि बेफि, तुमचेच आभार मानले पाहिजेत खरं तर! कारण काल प्रतिसाद लिहिताना मी आठवणींच्या सुंदर प्रदेशात चक्कर मारून आले! रायगड जिल्ह्यातल्या कातकरी समाजावर खरं तर माझ्या बाबांनी लिहायला हवं. एक चांगलं documentation होईल. मी सुचवीन त्यांना!
अजून एक किस्सा आठवला! माझे बाबा वकील आहेत. त्यांच्याकडे अनेक कातकरी आपले दावे घेऊन येत असतात. बरेचदा त्यांच्याकडे फी चे पैसे नसतात. पण मग परतफेड म्हणून जंगलातला अति शुद्ध मध (हा मध बरेचदा दारूच्या बाटलीत भरून आणलेला असतो! मग आई तीनतीनदा विचारते, बाबा रे बाटली धुतली होतीस ना नीट, नाहीतर मध चढायचा आम्हाला!), कोणतीतरी औषधी मूळी, रानातल्या पालेभाज्या घेऊन येतात. अशावेळी बाबा barter system ने धंदा करतात असे आम्ही गमतीने म्हणतो Happy
तर असाच एक बाबांचा आशील आहे (मला नेमकं नाव आठवत नाही आहे आत्ता). पार जंगलात राहतो (त्याच्या घरापाशी पहाटे वाघोबा येतो इतकं जंगल!). त्याला आमच्याकडे यायचे म्हणजे बरेच चालून मग बस/शेअर रिक्शा पकडून असे यावे लागते. एके दिवशी सकाळी हा दारात हजर! बाबा म्हणाले, "अरे आज तू कसा काय आलास? आपली तारीख नाहीये आज!" त्यावर त्याने जे उत्तर दिले ना त्याने आम्ही सर्वजण थक्क झालो! तो म्हणाला, "अरे! (तो बाबांना अरे तुरे करतो, अहो वकील साहेब वै. formalities नाहीत!) तू पहाटे माझ्या स्वप्नात आलास! मग मला तुझी खूप आठवण यायला लागली म्हणून मी तुला भेटायला आलो!!"
आम्हाला कमाल वाटली! बाबा मला म्हणाले, हे बघ हे खरे प्रेम, खरा स्नेह! म्हणून मी यांच्या केसेस घेतो! दोन पैसे कमी मिळाले तरी हरकत नाही पण ही अशी माणसे भेटतात ज्यांचे पैशात मोल होऊच शकत नाही! केवळ आठवण आली म्हणून आपली वाट वाकडी करून त्या माणसाला भेटायला जाण्याची निरागसता आणि संवेदनशीलता देखिल ह्या आदिवासी समाजात असते! अशावेळी प्रश्न पडतो की प्रगत नक्की कोण? ते की आपण?

<< कातकरी म्हणजेच कुळवाडी का? आमच्याकडे (कोकणात) कुळवाडी म्हणतात.>> हें बरोबर नसावं असं मला वाटतं. कदाचित, दक्षिण कोकणात ज्याना 'ठाकरं' म्हणतात तेच 'आदिवासी' या संज्ञेच्या सीमारेषेवरील असावेत. जाणकारानी नक्की काय तें सांगावं.

आदिवासी जीवनशैली विषयीची फोटोसहीत ओळख तुमच्या नजरेतुन वाचायला आवडली. पण त्यांना शिक्षणाचे महत्व समजायला हवे ,आणि त्यांच्यापर्यंत योजना पोचायला हव्यात .शिक्षणाने बदल घडु शकतो ,जसे कार्य डॉ प्रकाश आमटे हेमलकसात करत आहेत.
भाऊ, जिज्ञासा, तुमचेही लिहीलेले आवडले!+१
केवळ आठवण आली म्हणून आपली वाट वाकडी करून त्या माणसाला भेटायला जाण्याची निरागसता आणि संवेदनशीलता देखिल ह्या आदिवासी समाजात असते! >> खुप छान पुर्ण प्रतीसाद Happy

<< त्या माणसाला भेटायला जाण्याची निरागसता आणि संवेदनशीलता देखिल ह्या आदिवासी समाजात असते! >> अशांतून जाणवणारी खरीखुरी आंत जपलेली कृतज्ञता व कोरडे,औपचरिक 'थँक्स' हेही कदाचित सामाजिक प्रगतिच्या वाटेवरचे मैलाचे दगड असावेत ! Wink

इथे सविस्तर लिहायला सध्या उसंत नाही. पण ज्यांना या विषयात अगदी किंचितसाही रस आहे त्यांनी मिलिंद बोकिल यांचं 'कातकरी: विकास की विस्थापन' हे अतिशय दर्जेदार व अभ्यासपूर्ण पुस्तक जरूर वाचा. मराठीत अशा विषयावर इतक्या ताकदीने लिहिलेली संशोधनात्मक पुस्तके फार कमी आहेत.
कातकरी समाजावर मानववंशशास्त्र, समाजशास्त्र अशा शाखांमधे व संलग्न क्षेत्रांमधे सैद्धांतिक व उपयोजित दोन्ही पातळीवर कामं झाली आहेत. होत आहेत. त्यांचे गुणावगुण अलाहिदा.
ज्यांना आणखी रस असेल त्यांनी रुडॉल्फ हेरेडिया आणि राहुल श्रीवस्तव यांचं 'ट्रायबल आयडेन्टिटी अ‍ॅन्ड मायनॉरिटी स्टेटसः द कातकरी नोमॅड्स इन ट्रान्झिशन' हे पुस्तकही वाचा. दिल्लीचं कुठलंतरी प्रकाशन आहे. बोकिलांचं पुस्तक मौज प्रकाशनाचं आहे.

सायो - कुळवाडी म्हणजे कातकरी नव्हेत. तसेच कातकरी आणि ठाकर एवढेच नव्हेत तर महाराष्ट्रातील प्रत्येक उपप्रदेशात आदिवासी जमाती आहेत. आदिवासी म्हणजे काय वगैरे साठी बोकिलांच्या पुस्तकाची प्रस्तावना वाचा.

भाऊ आणि जिज्ञासा, तुमचे अनुभव आवडले. पण सगळ्याच गोष्टी शहरी - आदिवासी, विकास - मागास, दांभिकता - निरागसता/निष्पाप, गुंतागुंतीचं जीवन - तुलनेने सरळ जीवन अशा 'बायनरी अपोझिशन्स' मधे बघता येत नाही, बसवता येत नाही हे तुम्हालाही माहित असेलच

<< तुलनेने सरळ जीवन अशा 'बायनरी अपोझिशन्स' मधे बघता येत नाही, बसवता येत नाही हे तुम्हालाही माहित असेलच >> एकदम मान्य. आदिवासी पाड्यावरचं जगणं एखाद्या आदिवासीलाही असह्य होवूं शकतं, याचं एक आगळं उदाहरण तर मीं प्रत्यक्षच पाहिलंय व वर मांडलंही आहे. 'Grass is always greener on other side of the fence', हें तर आहेच !

[वरदाजी, चंद्रपूरहून परतल्यानंतर मीं पण एका लेखकाचीं याच विषयावरचीं दोन पुस्तकं मुद्दाम वाचलीं होतीं. नेमकं आत्तां मला लेखकाचं नांव आठवत नाहीय. मला आठवतांच इथं लिहीनच].

Pages