फायदा आणि तोटा

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 20 December, 2014 - 02:58

मराठी स्त्रियांचं इंटरनेटवर प्रमाण कमी का? ( http://www.maayboli.com/node/33327 ) या ३_१४ अदिती यांच्या धाग्यावर प्रतिक्रिया स्वरूप सदर ले़खन करीत आहे. प्रतिक्रिया तिथेच देता आली असती परंतु दोन कारणांमुळे स्वतंत्र ले़ख लिहीत आहे.

१. अदिती यांच्या मूळ ले़खापेक्षा माझा प्रतिसाद लांबलचक होण्याची शक्यता आहे.
२. मूळ ले़खात मांडलेल्या मुद्यांव्यतिरिक्त इतरही काही मुद्यांचा विचार करायचा असल्याने तिथे प्रतिसाद दिल्यास त्यावर "भरकटलेला" असा शेरा येऊ शकतो.

याशिवाय महत्त्वाचे म्हणजे तो धागा वाचनमात्र आहे आणि आता तिथे प्रतिक्रिया द्यायची म्हणजे तो खुला करण्याकरिता प्रशासकांना पुन्हा तसदी द्यावी लागणार.

सर्वप्रथम अदिती यांच्या लेखाच्या शीर्षकाविषयी - "मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?"

कुठल्याही वाक्याचे उद्देश (सब्जेक्ट) आणि विधेय (प्रेडिकेट) असे भाग पाडले जातात. तसे या वाक्याचे सब्जेक्ट स्त्रिया आणि प्रेडिकेट हे त्यांचे मराठी इंटरनेट साईट्सवरील प्रमाण असे होईल. आता याचे अधिक पृथक्करण करण्याआधी स्त्रियांचे प्रमाण कमी का असा प्रश्न विचारण्याऐवजी मराठी संस्थळावरील एका विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तिंचे प्रमाण कमी का? ह्या अनुषंगाने का विचार करू नये? कुठलीही कृती (अ‍ॅक्ट), जी करण्यासाठी शरीराची ऊर्जा (एनर्जी) खर्च करावी लागते ती करणार्‍यांच्यात ढोबळमानाने दोन प्रकार पडतात.

एक - कुठलातरी हेतू अथवा अपेक्षा ठेवून ती कृती करणारे.
दोन - कुठलाही हेतू अथवा अपेक्षा न ठेवता अगदी निरपेक्ष वृत्तीने ती कृती करणारे.

आता या वरील दोन प्रकारांपैकी पहिल्या प्रकारच्या व्यक्ति सर्रास आढळतात. दुसर्‍या प्रकारच्या व्यक्ति सापडणे केवळ अशक्य आहे.

आता पहिल्या प्रकारात ज्या अपेक्षा / हेतू मनाशी बाळगून कृती केल्या जातात त्या अपेक्षा / हेतूंमध्ये मोठी विविधता जाणवते. परंतु आपल्या अभ्यासाकरिता आपण काही ठराविक अपेक्षांचा विचार करूयात. आता या (किंवा यातल्या काही अथवा सर्व) अपेक्षा कुठल्याही व्यक्तिला कुठलीही कृती करण्यापूर्वी असतात. तद्वतच त्या मराठी संस्थळावर लेखन करणार्‍या व्यक्तिला त्या लेखन करण्याच्या कृतीबद्दल असतात. (इथे स्वतंत्र लेखनासोबतच प्रतिसादात्मक लेखन व त्याप्रमाणेच केवळ वाचनमात्र वावर ह्या कृतीबाबतही हाच निकष लावला जावा). आता जर या कृतीतून आपल्या अपेक्षांची पूर्ती होत असेल तर ती व्यक्ति ती कृती करणार आणि जर इष्ट अपेक्षापूर्ती होत नसेल तर अर्थातच ती व्यक्ति ती कृती करणार नाही, कारण कुठलीही कृती करताना वेळ, पैसा, कष्ट खर्ची पडत असतात. आता ती व्यक्ति स्त्री आहे की पुरूष याने त्यात फारसा फरक पडत नाही.

खाली काही अपेक्षा मांडत आहे. या अपेक्षांचा मराठी संस्थळांच्या दृष्टीने विचार करता त्यांची पूर्तता किती प्रमाणात होते तेही पाहू.

१. प्रत्यक्ष आर्थिक वा इतर लाभ :- मराठी संस्थळावर ही अपेक्षा पूर्ण होणे अंमळ अवघडच. मिसळपाव, उपक्रम व ऐसीअक्षरेवर निदान मला तरी लेखन / प्रतिसाद लेखन याकरिता काही परतावा मिळत असल्याचे आढळले नाही. मी मराठीवर विविध स्पर्धांमधून पुस्तके पारितोषिक स्वरुपात मिळतात. मराठी कॉर्नर ने मला एकदा पारितोषिक म्हणून १०० रुपयांचा (अक्षरी रुपये शंभर फक्त) टॉक टाईम दिला होता. परंतु एकुणातच खर्च होणारे श्रम, वेळ व पैसा यांचा विचार करता हा मिळणारा परतावा अतिशय क्षुल्लक आहे.

२. अप्रत्यक्ष आर्थिक वा इतर लाभ :- संस्थळावर आपल्या व्यवसायाची माहिती देऊन व्यवसायाची वृद्धी करावी किंवा आपण नोकरदार असू तर आपल्या कौशल्यांची इतरांना माहिती द्यावी सध्या करीत असलेल्या नोकरीपेक्षा अधिक चांगली संधी मिळवावी या मार्गाने अप्रत्यक्ष आर्थिक लाभ होऊ शकतो. लिंक्डइन सारख्या संस्थळावर असा उद्देश पूर्ण होतो. मराठी संस्थळावर (पुन्हा मिसळपाव, उपक्रम व ऐसीअक्षरे) हा हेतू कितपत साध्य होतो? मिसळपावने तर आपल्या व्यवसायाची जाहिरात करणारे लेखन करू नये असा नियम केला आहे. तरीही तिथे नाडीपट्टी विषयी लेखन होते, इतर सदस्य त्यावर आक्षेप घेतात. पुन्हा लेखन होते असे चालुच आहे. परंतु लेखकाला काही आर्थिक फायदा झाला असेल असे वाटत नाही कारण बहुतेक जण तिथे अंधश्रद्धाविरोधी आहेत. एकाने (मिसळपाव व ऐसी अक्षरे या दोन्ही ठिकाणी) आपल्या पुस्तकाविषयी माहिती दिली होती तर आणखी एकाने आपण केलेल्या बुटाच्या दुकानाच्या अंतर्गत रचनेविषयी माहिती दिली होती. परंतु या दोघांनाही यातून फारसा आर्थिक लाभ झाला असेल असे संभवत नाही. किंबहूना त्या दोघांचा तसा उद्देश असण्याची शक्यताही फारच कमी. (परंतू या दोघांनीही तसे अपेक्षा क्रमांक चारची पूर्तता होण्याकरिता केले आहे हे उघड आहे)

वरील दोन अपेक्षा या बहुतेकांना आपल्या अनेक कृतींमधून (यात अगदी राजकारण, समाजसेवा ते लग्नापर्यंत सारं काही आलं) पूर्ण व्हाव्या असे वाटत असते. या दोन अपेक्षांची पूर्ती होत नसेल तर या व्यक्ति स्वत:चे श्रम, वेळ व पैसा खर्ची घालत नाहीत. अर्थातच या अपेक्षा ठेवणार्‍या गटात स्त्रियांचे प्राबल्य आहे. स्त्रिया जास्त व्यवहारी असतात असे म्हंटले जाते ते यामूळेच.

३. सामाजिक बदल घडवून आणण्याची आशा :- आपल्या लिखाणाने फार मोठी क्रांती घडली नाही तरी निदान सामाजिक बदलाचे वारे वाहू लागतील व त्या करिता आपल्याला आपले हे समाजप्रवर्तक, क्रांतिकारी लेखन आवर्जून प्रकाशित केलेच पाहिजे त्याचप्रमाणे चालु घडामोडींवर झडत असलेल्या चर्चांमध्ये आपले मत हिरीरीने मांडलेच पाहिजे असे वाटणार्‍या व्यक्तींमध्ये स्त्रियांचा भरणा अर्थातच अतिशय कमी असतो. हा भाबडा आशावाद पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले अनेक युगपुरूष इथे दिसून येतात. उदाहरणादाखल - मद्य, इतिहास, नाडीपट्टी, प्रेम, चित्रपट या व अशा अनेक विषयांवर आवर्जून व नियमित लिखाण करणारे पुरुषच आहेत.

४. समाजाकडून कौतूक व प्रसिद्धी, नवे मित्र, मैत्रीणी, प्रशंसक मिळविणे :- माझं लेखन वाचून समाज बदलला नाही तरी चालेल, पण निदान समाजातून माझ्या वाट्याला चार कौतूकाचे शब्द यावेत ही अपेक्षा निश्चितच अनेकांच्या मनात असते. इथेही पुन्हा स्त्रियांची ही अपेक्षा अनेकदा आपोआपच संकेतस्थळावर न येताही पूर्ण होत असते. नुसते फेसबुकावर दोन ओळींचे स्टेटस टाकले की हजार लाईक्स आणि पाचशे प्रतिक्रिया मिळतात. अशा वेळी हजार शब्दांचा लेख टाकायचे कष्ट कशाला घ्या? इतकेच कशाला, कार्यालय, महाविद्यालय अशा अनेक ठिकाणी स्त्रियांना त्यांचे अनेक प्रशंसक भेटतच असतात. तेव्हा त्यांना ही गरज फारशा प्रमाणात उरतच नाही.

५. निखळ आनंद :- ही एक अस्तित्वात नसलेली गोष्ट आहे. जर अपेक्षा क्रमांक ४ देखील पूर्ण होणार नसेल तर कसला आलाय डोंबलाचा निखळ आनंद? मी जर एखाद्या संस्थळावर पाच लेख प्रसिद्ध केले आणि एकावरदेखील एकही प्रतिक्रिया येत नसतील तर सहावा लेख मी कशाला प्रसिद्ध करेन? तेव्हा या प्रकारात स्त्री व पुरुष या दोहोंचाही भरणा अत्यल्पच असणार. अर्थात तरीही आपले लेखन इतरांपर्यंत पोचावे, भले त्यांनी त्याची पोच न दिली तरी चालेल असा विचार करून लेखन प्रदर्शित करणारेही काही थोर आहेत. परंतु पुन्हा तेच, स्त्रिया या असल्या फंदात पडणे महामुश्किल.

६. निदान मनस्ताप तरी होऊ नये :- पहिल्या दोन अपेक्षांमध्ये मोठा फायदा अपेक्षित आहे. म्हणजेच या दोन अपेक्षांची जर पूर्तता झाली तर आयुष्यात बरंच काही ++++++ होईल. तिसर्‍या आणि चौथ्या अपेक्षांची पूर्तता झाली तर निदान आयुष्यात थोडंतरी +++ होईल. पाचव्या अपेक्षेच्या पूर्ततेने अगदीच किंचित + होईल. परंतु सहावी अपेक्षा म्हणजे निदान --- तरी होऊ नये इतकी माफक आहे. या अपेक्षेच्या कसोटीवर मराठी संकेतस्थळे कितपत उतरतात? मिसळपाव तर बिलकूल नाही. हे एक फार मोठं कारण आहे की ज्यामुळे बरेच लोक मराठी संस्थळांच्या नादी लागत नाहीत आणि या नादी न लागणार्‍या गटात स्त्रियांचा मोठा भरणा आहे.

आता या सर्व अपेक्षांचा एकत्रित रीत्या विचार करू. मॉस्लोच्या नीड्स हायरार्किप्रमाणे इथेही काही अपेक्षा या अगदी मुलभूत आहेत. म्हणजे तिसरी व चौथी अपेक्षा पूर्ण होण्यासाठी बहुसंख्य लोक या संस्थळावर येतात पण त्यांची धड सहावी अपेक्षाही पूर्ण होत नाही जी अत्यंत मुलभूत आहे. मिसळपाव (व काही प्रमाणात ऐसी अक्षरे वर देखील) या मराठी संस्थळावर सरळ सरळ जुगार चालतो म्हणजे तुम्हाला प्रशंसा हवी असेल तर लेख प्रदर्शित करा पण टीकेलाही सामोरे जायची तयारी ठेवा. अर्थातच टीका अनेकवेळा अवांतर, व्यक्तिगत स्वरूपाची व अतिशय हीन शब्दांत केली जाणारी असते. अशी शेरेबाजी सहन न करू शकणारे मराठी संकेतस्थळावर वावरू शकत नाहीत मग ते स्त्री असो वा पुरूष. माझ्या माहितीत अनेक पुरूषांनीही मिसळपाव याच कारणाने सोडलंय. खरे तर तिथे अपेक्षा क्रमांक ४ ची ज्या प्रचंड प्रमाणात पूर्तता होते तेवढी इतर कुठल्या संस्थळावर क्वचितच होत असेल, पण त्या बदल्यात जो प्रचंड मनस्तापही सहन करावा लागण्याची तयारी असावी लागते ते पाहता हा जुगार न खेळणंच उत्तम असं अनेकांना वाटतं. शिवाय पुढे पुढे त्या अपेक्षा क्रमांक ४ मधून ही फारसा आनंद मिळत नाहीच. कारण, माझ्या लेखाला दुसर्‍या संकेतस्थळावर जेमतेम दोन आकडी प्रतिसाद मिळतात तर मिसळपाववर सहज शतक गाठलं जातं पण नीट नजर टाकली तर असं दिसून येतं की सुंदर मुलगी कशी पटवावी? असे शीर्षक असणार्‍या दहा ओळींच्या धाग्याला देखील ११२ प्रतिसाद मिळतात तर माझ्या हजार शब्दांच्या लेखाला मिळालेल्या १०५ प्रतिसादांचं काय ते कौतूक? शिवाय काही व्यक्ति कंपूबाजी करून तुम्हाला त्रास देतात. संस्थळाचा टीआरपी कायम राखण्याच्या नादात संपादक ही अशा सदस्यांना पाठीशी घालतात. पक्षपाती वागणूक देतात. अशा वेळी जर अनेक पुरूष देखील संस्थळ सोडत असतील अथवा आपला वावर मर्यादित ठेवत असतील तर स्त्रियांचा सहभाग देखील आपोआप कमीच असणार.

काहींनी असेही मत मांडले आहे की स्त्रियांना स्वतःचे असे ठाम मत नसतेच त्यामुळे ते मांडण्याची खुमखुमीही ओघाने नसतेच व याच कारणाने त्या संस्थळावर येत नाहीत. हे काही फारसे पटले नाही. स्त्री असो वा पुरूष, ठाम मत असलेले अनेक जण ते मांडायच्या फंदात पडत नाहीत. ते मांडून उपयोग काय? स्वत:ला पटलेले असले तरी इतरांना पटवून देता येईलच असे नाही. म्हणजे अपेक्षा क्रमांक १ व २ ची नाहीच पण ३ व ४ चीही पूर्तता होणे नाही. शिवाय अनेकदा आपले मत पटलेले असूनही समोरचा आडमुठेपणाने आपल्याशी वाद घालत असेल तर अपेक्षा क्रमांक ६ ची ही पूर्तता होत नाही.

याबाबत एक उदाहरण देता येईल ते म्हणजे सुनीता देशपांडे यांचे. आपण डॉ. श्रीराम लागू, डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांना जसे कट्टर अंधश्रद्धा विरोधक म्हणून ओळखतो तसे सुनीताबाईंना ओळखतोच असे नाही. खरे पाहता सुनीताबाई या अंनिस वाल्यांपेक्षाही अधिक कट्टर अंधश्रद्धाविरोधक व निरीश्वरवादी होत्या. आपल्या आयुष्यात त्यांनी आपले तत्त्व आग्रहाने मोठ्या हट्टाने पाळले. प्रसंगी अनेकांशी वाईटपणाही घेतला (सख्ख्या आईशी देखील). परंतु आपले विचार लोकांपर्यंत पोचावे याकरिता डॉ. लागू व दाभोळकरांप्रमाणे त्यांनी या विषयावर सभांमधून भाषणे झोडली नाहीत. त्याऐवजी आपल्या आहे मनोहर तरी या पुस्तकात त्यांनी आपले हे सारे विचार व्यवस्थित मांडले. यातून त्यांच्या अपेक्षा क्रमांक ३ ची कितपत पूर्तता झाली हे जरी समजले नसले तरी अपेक्षा क्रमांक १ व ४ ची मोठ्या प्रमाणात पूर्तता झाली.

आज जर भाई व सुनीताबाई असते किंवा त्यांच्या काळात मराठी संस्थळे असती तर भाई मराठी संस्थळावर सक्रिय झालेले असते आणि सुनीताबाई त्यांच्यामागे "इथे का टाईमपास करतोयस? तुझे लेखन पुस्तकरूपाने प्रकाशित का करत नाहीस?" असा धोशा करताना दिसल्या असत्या. कारण पुन्हा तेच भाई फक्त अपेक्षा क्रमांक ५ करता लेखन करीत तर त्यांच्या लेखनातून अपेक्षा क्रमांक १, ३ व ४ चीही पूर्तता व्हावी असे व्यवहारी असणार्‍या सुनीताबाईंना वाटत असे.

अर्थात या व्यतिरिक्त इतरही काही अपेक्षा ठेवून काही लोक संस्थळावर येतात (ज्यामुळे बाकीचे संस्थळ सोडून जातात) त्यातली प्रमुख अपेक्षा म्हणजे इतरांना छळून त्यातून आनंद मिळविणे. या गटात पुरुषांचा भरणा जास्त असला तरी स्त्रिया अगदी नाहीतच असे नाही. मिसळपाव वर अशाही काही महिला होत्या / आहेत ज्यांनी काही पुरुष सदस्यांनाही पळवून लावले.

अशा प्रकारे आपल्या प्रत्येक कृतीत काही फायदा होतोय की नाही (किंवा निदान तोटा तरी होत नाहीये ना)? हे पाहून मगच ती कृती करण्याचा मनुष्य स्वभाव असल्याकारणाने मराठी संकेतस्थळावरून केवळ स्त्रियांचाच नव्हे तर एकूणच सहिष्णू लोकांचा वावर कमी होत चालला आहे.

हा वावर वाढवायचा असेल तर काही उपाय सूचविता येतील -

एक म्हणजे संपादकांनी काहीसे कडक धोरण आखले व अंमलात आणले पाहिजे. लेखन व प्रतिसाद शब्द न शब्द तपासून मगच प्रकाशित केले पाहिजेत (मनोगत असे करते). आपला टीआरपी कमी होईल ही भीती बाळगू नये. सर्वच संकेतस्थळांनी असे धोरण अवलंबिले तर कुणाचाच टीआरपी कमी होणार नाही. संपादकांना हवे तर या करिता मानधन द्यावे. आता मनोगत, उपक्रमवर संपादन टाईट आहे तर मिसळपाववर एकदम लूज. त्यामुळे मिसळपाववर काहीही लिहा किमान दोन आकडी प्रतिसाद येणारच व अनेकदा फालतू एकोळी धाग्यांनीही अवांतर प्रतिसादांसह शतक गाठलेले दिसून येते. त्यामुळे त्या संस्थळाची सदस्यसंख्याही वाढत चाललेली दिसते. परंतु ही सूज आहे. अनेक आयडी हे मृत, सुप्त, निष्क्रिय व बरेचसे बोगस देखील आहेत. ऐसीअक्षरेवरही अनेकदा ढिले संपादन, श्रेणी देण्याच्या प्रकारात पक्षपात असे प्रकार दिसून येत आहेत. अर्थात हे नवीन संस्थळ असून आपली वाटचाल मनोगत, उपक्रम प्रमाणे करायची की मिसळपाव प्रमाणे हे इथल्या चालकांना ठरवावे लागणार आहे. त्यांच्या धोरणानुसार येथील स्त्रियांचा सहभाग ठरेल. श्री. अशोक पाटील (अजुनही काही जण आहेत परंतु हे नाव चटकन आठवले) यांच्या सारखे कुणालाही न दुखावणारे व सर्वांनाच प्रोत्साहनपर ठरेल असे सातत्याने आदर्श लेखन (स्वतंत्र लेख आणि प्रतिसाद या दोन्हीबाबतीत) करणारे सदस्य जर ऐसी अक्षरेवर वाढत गेले तर अनेक सहिष्णु स्त्री-पुरूष सदस्य येथे सक्रिय होतील.

दुसरा उपाय म्हणजे सदस्यांना (सदस्य स्त्री आहे की पुरूष असा भेद न करता) लेखनाकरिता काही आर्थक परतावा दिला जावा. थोडक्यात अपेक्षा क्रमांक १ ची पूर्तता व्हावी. कारण, अपेक्षा क्रमांक १ ची पूर्तता होत असेल तर अनेकदा सौम्य प्रवृत्तीचे लोकही अपेक्षा क्रमांक ६ बाबत तडजोड करायची तयारी ठेवतात. अर्थात हा काही पहिल्या उपायाइतका आदर्श उपाय नव्हे.

तिसरा उपाय म्हणजे उपनगरी रेल्वेसारखी पर्यायी व्यवस्था असावी. म्हणजे उपनगरी रेल्वेच्या जनरल डब्यातही स्त्रियांचा सहभाग कमीच असतो. कारण सरळ आहे तिथे त्यांची गैरसोय होते. त्यांच्याकरिता उपनगरी रेल्वेने महिला आरक्षित डब्याची सोय केलेली आहे. तद्वतच महिलांनी महिलांकरिता चालविलेले एखादे संस्थळ काढले जावे. उपनगरी रेल्वेच्या जनरल डब्यात दुसर्‍यांना त्रास देण्याची वृत्ती नसणारे व दुसर्‍यांनी दिलेला त्रास सहन करण्याची इच्छा नसणारे अनेक पुरुषही जात नाहीत. मग ते काय करतात? सरळ जास्त भाडे देवून प्रथम वर्गाने प्रवास करतात. अशा पुरुषांकरिता व महिलांकरिता देखील एखादे प्रथम वर्गाचे संस्थळ चालू करावे. ज्यात विशिष्ट मासिक शुल्क आकारावे. त्याचप्रमाणे सदस्याची खरी माहिती ही नोंदवून घ्यावी. ही माहिती ताडून पाहिलेली (वेरिफाईड) असावी. प्रत्येक सदस्याचे खरे नाव, संपर्क क्रमांक इत्यादी गोष्टी संस्थळावर प्रकाशित असल्यावर फालतूपणास आपोआप आळा बसेल व जेन्युईन (सद्हेतू असलेले) लोकच अशा ठिकाणी सहभागी होतील.

अदिती यांनी स्त्रियांच्या सहभागाविषयी प्रश्न केला होता परंतु मी विशिष्ट अपेक्षा ठेवणार्‍या लोकांच्या सहभागाविषयी (ज्यात प्रामुख्याने स्त्रियांचा भरणा जास्त आहे असे मला वाटते) उत्तर दिले.

आता या प्रश्नाचे निव्वळ स्त्री असण्याच्या अनुषंगाने उत्तर द्यायचे झाले तर हा मूळात हा प्रश्न शरीरभेदावर आधारित असल्याचे मान्य करावे लागेल व त्याप्रमाणेच त्याचे उत्तर ठरेल. अदिती यांनीच इतरत्र समलिंगी संबंधांविषयी एक धागा काढला आहे. संबंध समलिंगी असो अथवा भिन्नलिंगी त्यात एकाला डॉमिनेटींग व दुसर्‍यास पॅसीव्ह अशी भूमिका घ्यावीच लागते. दोघेही समान पातळीवर नसतात. समलिंगी संबंधात आकाराने मोठी असणारी व्यक्ति ही डॉमिनेटींग भूमिका घेत असते अशी माहिती सिडने शेल्डन च्या एका कादंबरीत वाचली होती. परंतू भिन्नलिंगी संबंधात नेहमीच स्त्रिया या पॅसीव्ह व पुरुष डॉमिनेटींग असतात. या कारणांमुळे पारंपारिक रीत्या स्त्रीला पॅसीव्ह करमणूकीची जास्त आवड आहे. त्यामुळेच मालिका बघणार्‍यांत स्त्रियांचा जास्त पुढाकार असतो कारण ती एक पॅसीव्ह करमणूक आहे. तर व्हिडीओ गेमींग, संकेतस्थळावरील चर्चा अशा ठिकाणी पुरुष आघाडीवर असतो कारण तिथे आपला सक्रिय(अ‍ॅक्टीव्ह)सहभाग आवश्यक असतो व त्यातही काही मराठी संकेतस्थळांवर त्याचे स्वरूप आक्रमक सहभाग(डॉमिनेटींग)असे होऊ लागले आहे.

एकूणातच सारी व्यवस्था पुरूषप्रधान असल्याने स्त्रियांचा वावर सर्व ठिकाणी कमीच असतो. तो वाढविण्यासाठी इतरत्र अनेक चीप उपाय योजले जातात. जसे की, महाराष्ट्र टाईम्समध्ये फ्रेंडशिप क्लबच्या जाहिराती असतात जिथे पुरुषांना सभासद होण्याकरिता वार्षिक रुपये चार हजार पर्यंत शुल्क आकारले जाते तर महिलांना सभासद झाल्यास क्लबकडूनच आर्थिक मोबदला दिला जातो.

मराठी संस्थळांचे अशा फ्रेंडशिप क्लबांत रुपांतर होऊ नये असे वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख अर्धवटच वाचून हा प्रतिसाद द्यायला सोडला.
तुम्ही यात इतर संकेतस्थळाचे नाव घेतले आहे ते संपादीत करा हे सांगायला, कारण तुम्ही नकारात्मक भाष्य केले आहे.
अर्थात मला हे अयोग्य आणि अनुचित वाटतेय. कदाचित मायबोलीच्या धोरणाशी सुसंगतही नसेल.
बाकी लेख पुर्ण वाचून त्यावर प्रतिसाद सावकाशीने देतो.

आपल्या लिखाणाने फार मोठी क्रांती घडली नाही तरी निदान सामाजिक बदलाचे वारे वाहू लागतील व त्या करिता आपल्याला आपले हे समाजप्रवर्तक, क्रांतिकारी लेखन आवर्जून प्रकाशित केलेच पाहिजे त्याचप्रमाणे चालु घडामोडींवर झडत असलेल्या चर्चांमध्ये आपले मत हिरीरीने मांडलेच पाहिजे असे वाटणार्‍या व्यक्तींमध्ये स्त्रियांचा भरणा अर्थातच अतिशय कमी असतो. हा भाबडा आशावाद पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.

>>>>>
Lol
हे वाचून हसायला आले..

बाकी लेख छान आहे.
पण या लेखाने मनात पहिला विचार हाच येतो ते आपण नक्की कशासाठी आंतरजालावर येतो.

माझे म्हणाल तर मी व्यक्त व्हायला आणि मनोरंजन करायला येतो. व्यक्त होण्यामागेही हलके होणे हा हेतू न ठेवता त्यातही मनोरंजनच शोधायचा प्रयत्न करतो. त्यामुळे (दिर्घकथा वगळता) वाचतोही बरेच आणि लिहितोही बरेच. लिहिताना, मग लेख असो वा प्रतिसाद, प्रत्येक शब्द आनंद घेऊन लिहितो, आणि तिथेच मनोरंजनाचा हेतू साध्य होतो. त्यामुळे कोणी वाचतेय का नाही, वा कसले आणि किती प्रतिसाद येताहेत हे दुय्यम ठरते. कोणी निंदा किंवा वंदा, लिहिणे आमचा धंदा. तुमच्या लेखात उल्लेखलेली मनस्ताप हि भावना आपल्या स्वत:च्या मनातच उपजत असते, ती रोखणे हे आपल्याच हातात असते. कोणी आपल्याला मारल्यावर आपल्याला लागतेच पण कोणी शिव्या घातल्या तर त्याने दुखावले जाऊन मनस्ताप करून घेतलाच पाहिजे असे गरजेचे नसते.

स्त्रियांच्या सहभागाबद्दल बोलायचे तर माझेही असेच मत आहे की स्त्रियांची लक्षणीय संख्या एका प्रकारे एखाद्या संकेतस्थळाचा दर्जाच दर्शवत असते.
याउपर जाऊन हे संकेतस्थळालाच नाही तर कुठल्याही प्रकारच्या समूहाला लागू. ज्या वातावरणात स्त्रियांना सुरक्षित किंवा कम्फर्टेबल वाटत नसेल तिथे काहीतरी चुकत असते.

@ नरेश माने
धन्यवाद.

@ ऋन्मेऽऽष

<< हा भाबडा आशावाद पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.

>>>>>
हाहा
हे वाचून हसायला आले.. >>

यात हसण्यासारखे काय आहे? स्पष्ट करून सांगाल काय?

<< लिहिताना, मग लेख असो वा प्रतिसाद, प्रत्येक शब्द आनंद घेऊन लिहितो, आणि तिथेच मनोरंजनाचा हेतू साध्य होतो. त्यामुळे कोणी वाचतेय का नाही, वा कसले आणि किती प्रतिसाद येताहेत हे दुय्यम ठरते. कोणी निंदा किंवा वंदा, लिहिणे आमचा धंदा. तुमच्या लेखात उल्लेखलेली मनस्ताप हि भावना आपल्या स्वत:च्या मनातच उपजत असते, ती रोखणे हे आपल्याच हातात असते. कोणी आपल्याला मारल्यावर आपल्याला लागतेच पण कोणी शिव्या घातल्या तर त्याने दुखावले जाऊन मनस्ताप करून घेतलाच पाहिजे असे गरजेचे नसते. >>

थोडक्यात तुम्ही स्वान्तसुखाय लिहीता. इतरांच्या प्रतिक्रियांनी तुम्हाला फरक पडत नाही असे तुमचे मत. तर मग सार्वजनिक संकेतस्थळांवर व्यक्त होण्याचा फायदाच काय? तिथे तुम्ही मांडलेले कुणीतरी वाचत असतात म्हणूनच तुम्ही मांडता. तो उद्देश नसल्यास स्वतःच्या संगणकावर टंकून आपल्याच हार्ड डिस्कमध्ये साठवून ठेवलेले काय वाईट? फार तर स्वतःच्या ब्लॉगवर प्रकाशित करू शकता. तिथल्या प्रतिक्रिया तुम्ही नियंत्रित करु शकता हा फायदा.

असो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

भाबडा आशावाद आणि पुरुष हे कॉम्बिनेशन हसवून गेले.
पुरुष जनरली भाबडेपणापासून दूरच राहतात.

असो,

>>
थोडक्यात तुम्ही स्वान्तसुखाय लिहीता. इतरांच्या प्रतिक्रियांनी तुम्हाला फरक पडत नाही असे तुमचे मत. तर मग सार्वजनिक संकेतस्थळांवर व्यक्त होण्याचा फायदाच काय? तिथे तुम्ही मांडलेले कुणीतरी वाचत असतात म्हणूनच तुम्ही मांडता. तो उद्देश नसल्यास स्वतःच्या संगणकावर टंकून आपल्याच हार्ड डिस्कमध्ये साठवून ठेवलेले काय वाईट?
>>

माझ्या विचारांवर ईतर काय विचार करतात याचा मला फरक पडत नाही. कारण माझे लिखाण स्वांतसुखाय असते.
पण धाग्याच्या विषयासंदर्भात ईतर लोक जे विचार व्यक्त करतात ते मी वाचतो. वाचनाचा आनंद घेण्यासाठी मी इथे येतो. आणि मला ज्या विषयावर लोकांची मते वाचायला आवडतील ते विषय इथे मांडतो.

<< भाबडा आशावाद आणि पुरुष हे कॉम्बिनेशन हसवून गेले.
पुरुष जनरली भाबडेपणापासून दूरच राहतात. >>

भाबडा आशावाद आणि भाबडेपणा या दोन्हीत अंतर असते. समाजसुधारक कोण होते? त्यांच्यापैकी स्त्रिया किती़ होत्या आणि पुरुष किती? भाबडा आशावाद बाळगणार्‍यांचे चटकन आठवणारे उदाहरण म्हणजे कॉम्रेड्स. स्त्रिया या प्रकारात असतात पण फारच थोड्या. पुरुषांचा भरणा मात्र या प्रकारात फारच जास्त. अशा पुरुषांच्या बायका त्यांच्याबद्दल म्हणतात - "आमचे हे घरचं खाऊन लष्कराच्या भाकर्‍या भाजतात." सॉक्रेटीस, संत तुकाराम कसे होते आणि त्यांच्या बायका कशा होत्या? लेखात उदाहरण दिलंय त्याप्रमाणे भाई (पु.ल. देशपांडे) कसे होते आणि सुनीताबाई कशा होत्या?

तर पुरुष लेखात नोंदविलेल्या अपेक्षा क्रमांक३ ची पूर्तता होईल अशा हिशेबाने मुबलक लेखन ब्लॉग, सार्वजनिक संकेतस्थळे आणि वर्तमानपत्रे यांतून करीत असतात. भले अपेक्षा क्रमांक १ व २ पूर्ण होत नसतील तरीही...

बहुसंख्य स्त्रियांचं तसं नसतं, त्यांना अपेक्षा क्रमांक ३ पुर्ण होईल यावर विश्वास नसतोच. त्या आपल्या अपेक्षा क्रमांक १ व २ वर लक्ष ठेऊन असतात. "आपण बरं आणि आपलं काम बरं" हा त्यांचा सोपा दृष्टिकोन असतो.

मराठी स्त्रियांचं इंटरनेटवर प्रमाण कमी का? >>>>>>

@चेतन आणि आदीती - जे समाजात दिसते तेच इंटरनेट वर दिसणार.

जालापेक्षा खर्‍या दुनयेतल्या ह्या प्रश्नांची उत्तरे शोधा.

पुरुष कादंबरीकारांपे़क्षा स्त्री कादंबरीकार कमी का?
S.T. बस मधे स्त्रीयांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा कमीच का असते?
कीतीही पुढारलेल्या देशात सुद्धा नोकरी करणार्‍या पुरुषांची संख्याच जास्त का असते?

नृत्य चे गुरु म्हणुन मान्यता मिळवलेल्या व्यक्तींमधे पुरुष का जास्त असतात?
जवळ जवळ सर्वच स्त्रीया सैपाक करत असताना, आचारी पुरुष का असतात?

कीतीही पुढारलेल्या देशात सुद्धा नोकरी करणार्‍या पुरुषांची संख्याच जास्त का असते?>>>>

खरे तर ह्या प्रश्नातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर लपले आहे हे जाणवले. मराठी स्त्रीयांचे पुरुषांपेक्षा नोकरी करण्याचे प्रमाण लक्षणीय कमी आहे.
इंटरनेटवरची मराठी संस्थळे बर्‍याच प्रमाणात ऑफिस मधुन टाइमपास करण्यासाठी वापरली जातात. मुळात ऑफिस मधे जाणार्‍या स्त्रीयांचे प्रमाण कमी आहे आणि तेच इथे दिसते Happy