महानाटक

Submitted by pkarandikar50 on 5 December, 2014 - 21:33

सेनेच्या सत्ता-सहभागाचे अनेक-अंकी महानाटक: सेने तुला काय हवय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर बहुमत मिळवण्याचे स्वप्न एकदा भंग पावल्यानंतर, सेनेसमोरचे पर्याय फार स्पष्ट होते. एक तर विरोधी पक्षात बसून अफज़लखानाच्या सैन्यावर वाघनखे चालवायची किंवा ’झाले-गेले विसरून जाउ या’ म्हणत सत्तेतला मिळेल तो वाटा निमूटपणे स्वीकारायचा. मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण हा प्रश्न मतदारांनी सोडवलेलाच होता. दैवगतीने मिळालेले लहानपण स्वीकारून 'मुंगी साखरेचा रवा' पाच वर्षे खात बसण्यात व्यावहारीक शहापपण होते. उद्धव ठाकरे मात्र ’NaMo Loves me - NaMo Loves Me Not' असा मंत्र जपत राहिले. तिथे सगळा ’संशय-कल्लोळ’ सुरू झाला. एकाच वेळी दोन्ही पर्यायांवर फुली मारण्याचा त्यांचा खटाटोप अनाकलनीय होता.
त्यांनी नरेंद्र मोदींच्या शपथविधीला जायचे किंवा नाही हा काही जाहीर वाच्यता आणि चर्चा करण्याचा विषय नव्हता. गेले असते तर ते आघाडी-धर्माच्या संकेताला धरूनच झाले असते. आधी ’नाही जाणार’ म्हणायचे, मग ’त्यांचा फोन आला, काय करणार’ म्हणत जायचे, अशाने सेनेच्या पदरात केंद्रातली दोन-चार अधिकची खाती मिळतील असा त्यांचा समज असेल तर त्यातून त्यांची राजकीय परिपक्वता किती आहे तेच स्पष्ट झाले. (कदाचित आत्ता आदित्य ठाकरे शिवसेना प्रमुख असते तर अधिक पोक्तपणे वागले असते.) असल्या रुसव्या-फुगव्यांना नमो आणि अमित शहा किती भीक घालतात ह्याबाबत त्यांनी लालकृष्ण अडवानी आणि मुरली मनोहर जोशीं, किंवा जसपालसिंग यांपैकी कुणाचा तरी सल्ला घेतला असता तर बरे झाले असते.

तोच प्रकार फडणवीसांच्या शपथविधीचा. ’ठाकरे जाणार - नाही जाणार” असा जाहीर घोळ घालण्याचेही कोणतेच प्रयोजन नव्हते. ठाकरे गेले असते तर ते शिष्टसंमतच झाले असते. पृथ्विराजबाबा आणि अजितदादा नव्हते का गेले? नसते गेले तर तेव्हढ्यासाठी काही समारंभ खोळंबणार नव्हता. त्यातून जो काही ’मेसेज’ जायचा तो गेलाच असता. पण ’अग अग म्हशी’ या वागण्यामुळे भलताच ’मेसेज’ जातोय हे त्यांच्या लक्षात येऊ नये, याला काय म्हणायचे?

त्यानंतर ’स्वाभिमान - अध्याय’ सुरू झाला. "अहो, तुमचा स्वाभिमान तुम्हीच सांभाळायचा, भा.ज.प.ने नव्हे" हे त्यांना सांगणारे कोणी शहाणे-सुरते सल्लागार सेनेकडे नव्हते, हे उघड आहे. निवडणुकांनंतरची युती करायची असेल तर ’सेनेला मुख्यमंत्रीपद द्या’ ही मागणी तद्दन बालीशपणाची होती. ती बातमी वाचून मला जुन्या मालिकेतल्या एका प्रसंगाची आठवण झाली. सुधीर जोशी त्यात खलनायकाच्या भूमिकेत होते. त्यांच्या पार्टीत एक तरूण पोलिस अधिकारी जातो, तेंव्हा तो पार्टीला आलेला एक निमंत्रित असे समजून सुधीर जोशी त्याचे स्वागत करतात आणि त्याला ’ड्रिंक’ देऊ पहातात, तर तो सांगू लागतो, ”मी काही पार्टीला आलेला पाहुणा नाहीये, तुम्हाला अटक करायला आलो आहे." त्या्वर सुधीर जोशी उपहासाने म्हणतात, " अरे, तुझा पगार किती आणि तू बोलतोयस किती?" ६३ आमदारांच्या पगारावर सेनेने किती मागण्या करायच्या याला काहीच ताळ-तंत्र नसावे?

मग विरोधी पक्ष नेतेपदाचा नवा अंक सुरू झाला. खरे तर महाराष्ट्रात युती तुटली तेंव्हाच केंद्राच्या मंत्रीमंडळातून अनंत गिते राजीनामा देणार का अशा अटकळी माध्यमे बांधू लागली होती, पण तसे काही घडले नाही. हा ’मॅच फिक्सिंग’चाच एक प्रकार तर नाही ना अशा शंका व्यक्त झाल्या. बरे, आता राज्यात एकदा सेना अधिकृत विरोधी पक्ष झाल्यावर तरी, ’गितेंना राजीनामा द्यायला सांगणार का’ या प्रश्नाला ठाकरेंनी उत्तरच दिले नाही. नमो हुशार. त्यांनी गितेंचा राजीनामा मागण्याची कोणतीच घाई दाखवली नाही. उलट मंत्रीमंडळ विस्तारात त्यांनी सेनेला दोन मंत्रीपदे देऊ केली. एक सुरेशप्रभूंना दिले, तर ठाकरे म्हणाले, 'ते आमचे नाहीत.' मग त्यांना सेनेचा राजीनामा देऊन भ.ज.पा.त प्रवेश घेणे भाग पडले. दुसरे देसाई. त्यांचे नाव तर सेनेने अधिकृतरित्या कळवलेले होते. पण ते शपथ घेणार - नाही घेणार अशा दोन्ही उलट-सुलट बातम्या तासातासाने फुटत राहिल्या. अखेर त्यांना दिल्लीला धाडले पण विमानतळावरूनच माघारी बोलावले. या प्रकाराने, दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सेनेचे खूप हसे झाले, असे तिकडच्या पत्रकारांनी म्हटले.

नाटकाचा एक प्रवेश विधानसभेच्या प्रवेशद्वारावर घडला. राज्यपालांच्या गाडीसमोर सेनेचे आमदार धरणे धरायला गेले. कारण काय तर, ’आवाजी बहुमताने फडणवीस सरकारवरचा विश्वास-ठराव पसार झाला, तो बेकायदेशीर होता’ .दुसरे दिवशी, ’फडणवीस सरकार बडतर्फ करा’ अशी मागणी करायला सेनेचे शिष्टमंडळ राज भवनावर गेले. हे सगळे प्रसंग प्रेक्षकांसमोर रंगमंचावर घडत असतानाच, दुसरीकडे, पडद्यामागे भा. ज.प. बरोबर सत्ता-सहभागाची बोलणी सुरू आहेत, असे सूत्रधार सांगत होते. सत्ता-नाटकाचे असे गुंतागुंतीचे आणि नदीच्या प्रवाहातल्या भोवर्‍याप्रमाणे भिरभिरणारे कथानक रचणे खुद्द भरतमुनींनाही शक्य झाले नसते. ही कथा चमत्कारीक असली तरी सुरस मात्र नव्हती.

त्यानंतर ’वाटा-घाटीं’चा अंक सुरू झाला. सेनेला सत्तेत ’वाटा’ तर हवाच आहे पण ’घाटा’ मात्र भा.ज.प.ला व्हायला हवा हे पालुपद इतक्यांदा आळवले गेले आहे की त्याचा अद्याप नमो आणि अमित शहांना कंटाळा कसा येत नाही, याचे आश्चर्य वाटावे. माध्यमांचे काय, त्यांना ’संथ वाहती’ मालिकांचे कंटाळवाणे दळण दळत बसण्याचा चांगलाच सराव आहे, शिवाय त्या करिता त्यांना पैसे मिळतात पण प्रेक्षकांचे काय? या नाटकाचे अजून किती अंक आणि किती प्रवेश शिल्लक आहेत आणि शेवटचा पडदा केंव्हा पडणार, हेच त्यांना कळेनासे झाले आहे. नायक-नायिका परस्पर संशयातून केंव्हा बाहेर पडणार, कुणाला काय आंदण मिळणार आणि 'शुभ मंगल' होणार किंवा नाही याचे अंदाज बांधण्याचा सुद्धा त्यांना आता कंटाळा आला आहे. या सगळ्या प्रकारात, इतके दिवस खलनायकाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आता त्याला मात्र तिकडे इस्पितळात दाखल व्हावे लागले आहे. त्यात नायक किंवा नायिकेचा काही हात नसावा, असे म्हणावे तर गोपीनाथ मुंढेंच्या अपघाती निधनाचीही सी.बी. आय. चौकशी करावी अशी मागणी केली जाते आणि ती मान्यही होते, मग खलनायकाच्या पाय घसरून पडण्यामागे असेच काही काळेबेरे नसेल, हे तरी कसे म्हणावे?

सर्व प्रेक्षकांचे एका बाबतीत नक्की एकमत व्हावे, ते म्हणजे, गेल्या दोन महिन्यातील सर्वात कंटाळवाणा विषय म्हणून या नाटकाचा जीवन-गौरव व्हायला हवा. आज आचार्य अत्रे हयात असते तर म्हणाले असते, इतके कंटाळवाणे नाटक गेल्या दहा हजार वर्षात आले नव्हते!

- प्रभाकर (बापू) करंदीकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच मांडलंय व बहुतांशीं सहमत.
<< मग खलनायकाच्या पाय घसरून पडण्यामागे असेच काही काळेबेरे नसेल, हे तरी कसे म्हणावे?>> मला तर वेगळाच संशय आहे; 'आतां बघाच तंगड्या घालून हे एकमेकाना कसे पाडतात तें', याचं प्रात्यक्षिकच स्वतः पडून दाखवण्याचा तर त्यांचा हेतू नसेल ना ? Wink