धूळ साचू दे जराशी

Submitted by आनंदयात्री on 2 December, 2014 - 00:54

(ज्येष्ठ गझलकारा संगीता जोशी यांची 'हे असे आभासवाणे चांदणे आता नको' ही ओळ व्हॉट्सअ‍ॅप वर एका गप्पांमध्ये मिळाली. त्यावर गझल लिहिण्याचा हा प्रयत्न.)

लाघवी बोलून हे नाकारणे आता नको
हे असे आभासवाणे चांदणे आता नको

एकट्याच्या सोबतीला ज्याक्षणी आलीस तू -
अन् मला वाटून गेले, थांबणे आता नको!

बहर ओसरताच आले भान वार्‍याला पुन्हा -
ह्या सुगंधाभोवती रेंगाळणे आता नको

त्या निरोपाच्या क्षणी ती बोलली नजरेतुनी -
एकही कुठलेच हळवे मागणे आता नको

मी मनाच्या जवळ आता जात नाही फारसा
खोल या डोहामध्ये डोकावणे आता नको

तूच बोलावेस आता, 'हो' म्हणावे मी तुला
पण अबोल्याच्या दिशेने खेचणे आता नको

यापुढे भेटायला तू नेहमी दिवसाच ये!
सावली लपवून कोठे भेटणे आता नको!

धूळ साचू दे जराशी आरशावरती तुझ्या
रोज डोळ्यांना तुझ्या तू फसवणे - आता नको!

वाट संपायास येता फार वाटू लागले -
ऐकणे आता नको अन् बोलणे आता नको

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2014/10/blog-post_17.html)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक शेर खूप आवडले
हा सर्वाधिक आवडला.....

बहर ओसरताच आले भान वार्‍याला पुन्हा -
ह्या सुगंधाभोवती रेंगाळणे आता नको

खूप सुंदर

यापुढे भेटायला तू नेहमी दिवसाच ये!
सावली लपवून कोठे भेटणे आता नको!

वाट संपायास येता फार वाटू लागले -
ऐकणे आता नको अन् बोलणे आता नको<<< व्वा वा

बहर ओसरताच आले भान वार्‍याला पुन्हा -
ह्या सुगंधाभोवती रेंगाळणे आता नको

यापुढे भेटायला तू नेहमी दिवसाच ये!
सावली लपवून कोठे भेटणे आता नको! >>>>>> व्वा! अप्रतिम!

मी मनाच्या जवळ आता जात नाही फारसा
खोल या डोहामध्ये डोकावणे आता नको>>>

मस्तच रे. कसलं सॉलीड लिहीता राव तुम्ही लोक _/\_