छावणी - १० (अंतिम)

Submitted by स्पार्टाकस on 30 November, 2014 - 23:01

छावणी या कादंबरीचा हा अखेरचा भाग. ही कादंबरी प्रकाशीत करु दिल्याबद्दल मी मायबोली प्रशासनाचा मनापासून आभारी आहे.

हिंदुस्तानची फाळणी ही देशाच्या स्वातंत्र्याची एक भळभळती जखम. आज सत्तर वर्ष होत आली तरीही ही जखम पूर्णपणे भरलेली नाही. फाळणीच्या आगीत जे लोक होरपळले, ज्यांनी आपले आप्तस्वकीय गमावले त्यांना आयुष्यभर तो कालखंड एखाद्या दु:स्वप्नासारखा आठवत राहीला. त्यापैकी बहुतेकजण आज हयात नसले तरीही त्यांनी सांगितलेले अनुभव आजही अंगावर काटा आणतात.

फाळणीच्या या वणव्यात बळी पडलेल्या सर्व निरपराध लोकांना आणि मातृभूमीसाठी प्राणार्पण करणार्‍या सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिवीरांना विनम्र श्रद्धांजली.

*******************************************************************************************************************

कर्नल हुसेन इब्राहीमशी झालेल्या चकमकीनंतर मेजर चौहाननी ताबडतोब लाहोर छावणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. छावणीवर पुन्हा हल्ला होण्याची दाट शक्यता होती. कर्नल इब्राहीमने तर उघड उघड तशी धमकीच दिली होती. सुदैवाने त्याच रात्री हिंदुस्तानी लष्कराची आणखीन एक तुकडी लाहोरला पोहोचली. मेजर चौहाननी या तुकडीच्या अधिकार्‍यांना सगळी कल्पना देताच मेजरसाहेबांच्या तुकडीबरोबर जथ्याला संरक्षण देण्याच्या हेतूने ही तुकडी पुन्हा हिंदुस्तानच्या सीमेकडे निघाली होती.

लाहोरच्या किल्ल्याला वळसा घालून जथा हिंदुस्तानच्या मार्गाला लागला. ग्रँड ट्रंक रोड लाहोर शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असल्याने त्या मार्गाने पुढे जाणं तसं धोकादायकच होतं. वाटेत पुन्हा हल्ला होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यातच वाटेत लाहोर रेल्वे स्टेशन लागणार होतं. काही दिवसांपूर्वीच इथे हिंदू-शीखांचं शिरकाण झालेलं. ध्रार्मिक उन्मादाने अंध झालेले मुसलमान निर्वासितांवर पुन्हा हल्ला करण्यासाठी कधी संधी मिळते याची वाटच पाहत असणार होते, परंतु दुसरा मार्गही नव्हता. लष्कराची जास्तीची कुमक बरोबर होती हाच त्यातल्या त्यात दिलासा! लाहोर शहरापासून लवकरात लवकर शक्य तेवढं दूर जाण्याचा मेजरसाहेबांचा इरादा होता.

लष्कराच्या संरक्षणात जथ्याची वाटचाल सुरु होती. शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असताना प्रत्येकजण जीव मुठीत धरुन पावलं टाकत होता. रस्त्याच्या बाजूला स्थानिक मुसलमानांची गर्दी झाली होती. जथ्यातील हिंदुस्तानी लष्करी अधिकार्‍यांना आणि सैनिकांना ते अर्वाच्च शिवीगाळ करत होते. 'हिंदुस्तान मुर्दाबाद' ची नारेबाजी सतत चाललेली होती. वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं. कोणत्या क्षणी काय घडेल हे सांगता येत नव्हतं. लाहोर स्टेशनजवळ तर मोठा जमाव आला होता. त्यांच्याजवळ तलवारी, बंदुका अशी शस्त्रंही होती. जथ्यावर हल्ला करण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते. परंतु हिंदुस्तानी लष्कराची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने त्यांना काही करता येत नव्हतं. निरपराध निर्वासितांच्या कत्तली करणार्‍या, त्यांच्यावर अमानुष अत्याचार करणार्‍या या गुंडांना स्वतःच्या जीवाची मात्रं भीती वाटत असावी. जथ्यातील स्त्रिया आणि तरुणींना उद्देशून अश्लील शेरेबाजीला तर उत आला होता. निमूटपणे मान खाली घालून, मनातल्या मनात त्यांना शिव्याशाप देत शक्यं तितक्या घाईने प्रत्येकजण पावलं टाकत होता.

सुदैवाने कोणतीही अडचण न येता जथा लाहोर शहरातून बाहेर पडला. सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अर्थात अद्यापही ते पाकीस्तानात होते. कसलीही शाश्वती नव्हती. पाकीस्तानी पोलीस आणि लष्कराचा काहीही भरवसा नव्हता. ते गुंडांनाच सामिल होते. हिंदुस्तानी लष्करी अधिकारी आणि सैनिक डोळ्यात तेल घालून चौफेर लक्षं ठेवत होते. त्यांच्या कडक संरक्षणात जथ्याची वाटचाल सुरु होती.

आजचा मुक्काम होता बतपूर या गावी.

रडत-रखडत, पाय ओढत अखेर तो जथा बतपूर इथे पोहोचला. लाहोर छावणीपासून हे अंतर तब्बल दहा मैल होतं. गुजरानवाला सोडल्यापासून एका दिवसातली ही सर्वात मोठी पदयात्रा होती! त्यातच लाहोर शहरातून जाताना सतत भीतीचं दडपण आणि असह्य अश्लील शेरेबाजीला तोंड द्यावं लागलं होतं ते वेगळंच. लहान मुलांची अवस्था तर फारच करुण होती. कित्येक दिवसात धड जेवण नाही, प्यायला दूध नाही, पाण्यात पीठ कालवून दूध म्हणून द्यावं तर पीठही नाही अशा परिस्थितीत त्यांचे पालक सापडले होते. कित्येक मुलांनी आपले आई किंवा वडील गमावलेले होते. काही दुर्दैवी मुलांचे तर दोन्ही पालक मृत्यूमुखी पडले होते. फाळणीच्या या वणव्यात त्यांचं बाल्य पार करपून गेलं होतं.

गावाबाहेरच्या मोकळ्या माळरानावरच सर्वांचा मुक्काम पडला. खडतर वाटचाल आणि असह्य मानसिक तणाव यामुळे सर्वजण प्रचंड थकलेले होते. तीन धोंडे मांडून अन्न शिजवण्याचंही त्राण राहिलेलं नव्ह्तं. मोठ्या माणसांचं एकवेळ ठीक होतं, परंतु लहान मुलांच्या मुखी अन्न लागणं गरजेचं होतं. कसंतरी भोजन आटपून सर्वांनी पथारीवर अंग पसरलं. कित्येकजण तर रिकाम्यापोटी जमिनीवरच आडवे झाले. सामानाची बोचकी उघडून अंथरूण पसरण्याचीही त्यांच्यात ताकद राहीली नव्हती.

बतपूर पासून हिंदुस्तानची सीमा सहा मैलांवर होती. इथे रात्रीचा मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी सीमेकडे कूच करण्याची मेजरसाहेबांची योजना होती. परंतु बहुतेकांची अवस्था इतकी दयनीय झाली होती, की त्या दिवशी पुढे जाण्याचा बेत रहित करावा लागला. बतपूर इथे आणखीन एक दिवस विश्रांती घेऊन पुढे कूच करण्याचं मेजरसाहेबांनी निश्चीत केलं.

दिवसभराच्या विश्रांतीनंतर सर्वांच्या जीवात आला. दुसर्‍या दिवशी आपण हिंदुस्तानात पोहोचणार, एकदाची या हालअपेष्टांतून आणि भयमुक्त वातावरणातून कायमची सुटका होणार या आनंदात सर्वजण होते. पाकीस्तानातली ही आपली शेवटची रात्रं! एकदाची ही सरली की स्वतंत्र हिंदुस्तानकडे शेवटची वाटचाल सुरु होणार होती. दुसर्‍या दिवशीच्या सुखद स्वप्नांतच सर्वजण निद्राधीन झाले. लष्कराचे सैनिक मात्रं दक्ष राहून पहारा देण्याचं आपलं काम चोख बजावत होते. अद्यापही हल्ल्याचा धोका पूर्ण टळला नव्हता!

कोणीतरी घाईघाईने आपल्याला हलवून जागं करत आहे हे जाणवल्यावर आदित्यने डोळे उघडले. रजनी त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या चेहर्‍यावरील भाव पाहताच तो एकदम उठून बसला. पहिला विचार त्याच्या मनात आला तो म्हणजे हल्लेखोरांचा! या शेवटच्या क्षणी पुन्हा हल्ला तर झाला नाही?

"दादा! लवकर चल! चाचीजी गेल्या!" रजनी रडवेल्या सुरात उद्गारली.
"अं? काय...?" आदित्यला क्षणभर काहीच कळेना.
"कमलाचाची गेल्या!"

कमलादेवींचा मृतदेह पथारीवर ठेवण्यात आला होता. चौधरी महेंद्रनाथ शेजारी दोन्ही हातात डोकं धरुन बसले होते. सरिता त्यांच्या पायाशी आक्रोश करत होती. चारु, चित्रा, रुक्सानाबानू तिला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या. जसवीरही हुंदके देत होती. कित्येक वर्षे ती कमलादेवींच्या शेजारी राहीली होती. सरितेइतकीच त्यांची तिच्यावरही माया होती. डॉ. सेन आणि प्रा. सिन्हाही तिथे आले होते. कमलादेवींची मुद्रा अतिशय शांत होती. वेदनेचं कोणतंही चिन्हं त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत नव्हतं. कोणत्याही क्षणी त्या झोपेतून उठून बसतील असं वाटत होतं.

प्रा. सिन्हांकडून आदित्यला सगळी हकीकत कळली. कमलादेवी रोज आपल्या पतीच्या आधी उठत असत. कितीही दमलेल्या असल्या, आजारी असल्या तरीही वर्षानुवर्षे त्यांचा हा परिपाठ कधी चुकला नव्हता. त्यामुळे सकाळी जाग आल्यावर आपली पत्नी अद्याप झोपलेली पाहून चौधरींना आश्चर्य वाटलं. त्यांनी कमलादेवींना जागं करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. त्यांच्या मस्तकावर हात ठेवताच चौधरी चरकले. कपाळ थंडगार पडलं होतं! चौधरींनी सरितेला उठवून डॉ. सेनना घेऊन येण्याची सूचना दिली. रात्री झोपेतच कमलादेवींचं देहावसन झालं होतं.

आदित्य, प्रा. सिन्हा, डॉ. सेन आणि गुरकीरत सिंग यांनी आजूबाजूच्या परिसरातून मिळतील तेवढी लाकडं जमा केली. कमलादेवींचा मृतदेह चितेवर ठेवण्यात आला. चौधरींनी त्यांना अग्नीच्या स्वाधीन केलं. सरितेच्या डोळ्यातील पाणी आटत नव्हतं. रजनीने तिला जवळ घेतलं. सरितेची मानसिक अवस्था तिच्यापेक्षा अधिक कोण समजू शकणार होतं? दोघी समदु:खीच!

सर्वांनी निघण्याची तयारी केली. कमलादेवी गेल्या होत्या, पण इतरांना पुढे जाणं भागच होतं!
मजल - दरमजल करीत जथा पुढे निघाला. आजची ही शेवटची पदयात्रा! ही संपली की हिंदुस्तानात प्रवेश! सर्वांच्या अंगात निराळाच उत्साह संचारला होता. कधी एकदा हे उरलेलं अंतर पार करुन हिंदुस्तानच्या स्वतंत्र भूमीवर पाय ठेवतो असं प्रत्येकाला झालं होतं.

चौधरी महेंद्रनाथ कसेबसे पाय ओढत होते. त्यांचं वय साठीच्या आसपास होतं. मूळ प्रकृती दणकट असली तरी आतापर्यंतच्या वाटचालीने ते कमालीचे थकले होते. प्रतापच्या मृत्यूचा धक्का जबरदस्तं असला तरी ते दु:ख त्यांनी मनात गाडून टाकलं होतं. आतापर्यंत ते सर्वांना मानसिक आधार देत, प्रसंगी भग्वदगीतेचे दाखले देत मार्गदर्शन करत होते. आज मात्रं ते पार खचले होते. कमलादेवींच्या मृत्यूचा जबरदस्त आघात त्यांच्या मनावर झाला होता. प्रत्येक प्रसंगी आपल्या पाठीशी ठामपणे उभी असणारी, सुख-दु:खात सहभागी होणरी पत्नी कायमची सोडून गेल्यामुळे ते उध्वस्त झाले होते. आयुष्याच्या संध्याकाळी जोडीदाराची साथच सगळ्यात महत्वाची असते. परंतु त्यांच्या नशिबी मात्रं आता कायमचा एकांतवास आला होता.

हातातल्या काठीचा आधार घेत चालताना ते अडखळले.. सारं जग आपल्याभोवती फिरत आहे असं त्यांना वाटू लागलं! आपला तोल जातो आहे हे त्यांना जाणवलं. छातीतून एक तीव्र वेदना मेंदूपर्यंत पोहोचली...

दुसर्‍या क्षणी ते खाली कोसळले!

सर्वांनी त्यांच्याकडे धाव घेतली. आदित्य आणि प्रा. सिन्हांनी त्यांना हात धरुन उठवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना पाणी पाजलं. चौधरींची दातखीळ बसली होती. डॉ. सेन त्यांची दातखीळ उघडण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. परंतु कशाचाही उपयोग होत नव्हता. एक तीव्र आचका देऊन चौधरींनी डोळे मिटले!

चौधरी महेंद्रनाथांच्या आयुष्याचा अध्याय संपला!

गुजरानवाला इथल्या एका मोठ्या वाड्याचे मालक, एक प्रतिष्ठीत नागरीक आणि प्रतिथयश व्यापारी ! त्यांचा रस्त्याच्या कडेला हा असा अंत झाला!

ज्या पंजाबच्या भूमीत त्यांनी जन्म घेतला, ज्या भूमीत ते लहानाचे मोठे झाले, खेळले - बागडले, तिथल्या अन्न-पाण्यावर, मोकळ्या हवेवर पोसले गेले, त्याच पंजाबच्या भूमीवर त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला! हिंदुस्तानच्या सीमेपासून जेमतेम अर्ध्या मैलावर! स्वतंत्र हिंदुस्तानच्या धरतीवर त्यांना पाय ठेवता आला नाही!

एक प्रचंड झंझावात थंडावला!
सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा असलेला, सर्वांवर मायेची सावली धरणारा महावृक्ष कोसळला!

रस्त्याच्या कडेलाच चौधरींची चिता रचली गेली. सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं. मेजर चौहान एवढ्या कडक शिस्तीचे लष्करी अधिकारी, पण चौधरींच्या मृत्यूने ते देखील हेलावले होते! सरितेचा आक्रोश तर शब्दांत वर्णन करण्यापलीकडचा होता! आईपाठोपाठ वडीलांच्या मृत्यूचा आघात! तो देखील अवघ्या काही तासांत! तिचं सांत्वन करण्यासाठीही कोणापाशी शब्द उरले नव्हते! रजनी तिला सावरत होती, पण काय बोलावं हे तिलाही कळत नव्हतं.

सर्वांनी पुढचा मार्ग धरला! जड पावलाने आणि त्याहून जड अंतःकरणाने!

अखेर एकदाची हिंदुस्तानची सीमा आली!
गुजरानवाला इथल्या छावणीतून निघालेला निर्वासितांचा जथा हिंदुस्तानच्या सीमेवर येऊन पोहोचला होता!

हिंदुस्तानच्या पवित्र भूमीला पदस्पर्श होताच जथ्यातील सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला! कित्येकांनी हर्षातिरेकाने आरोळ्या ठोकल्या. अनेकांनी आपल्या पवित्र भूमीला आदराने वंदन केलं. तिची धूळ मस्तकी घेतली. आता त्यांना उरलेलं आयुष्य याच भूमीवर व्यतित करायचं होतं. पुढे काय करायचं, कुठे जायचं हा विचार त्याक्षणी कोणाच्याही मनात नव्हता. आपण स्वतंत्र हिंदुस्तानमध्ये सुखरुप येऊन पोहोचलो आहोत ही जाणिव सगळ्या प्रश्नांचा विसर पडण्यास पुरेशी होती. आतापर्यंतचा हा सर्व प्रवास त्यांनी जीव मुठीत धरुन, कोणत्याही क्षणी होऊ शकणार्‍या हल्ल्याच्या भीतीच्या दडपणाखाली कसाबसा पार पाडला होता. परंतु आता कोणतीही चिंता उरली नव्हती! आता ते सर्वजण स्वतंत्र हिंदुस्तानात होते! एखादा हल्लेखोर आपल्यावर तलवारीचे घाव घालेल, गोळी घालून आपला बळी घेईल, आपलं अपहरण केलं जाईल, अमानुष यातना आणि सामुहीक बलात्काराला तोंड द्यावं लागेल ही भीती आता राहिली नव्हती!

सरितेने मागे वळून पाहीलं. अर्ध्या मैलांपेक्षाही कमी अंतरावर पेटलेली चौधरींची चिता तिथूनही दृष्टीस पडत होती. तो देश आता परका झाला होता. अवघ्या काही तासांपूर्वी त्या भूमीवरच ती अनाथ झाली होती. आदित्यने हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या मानसिक अवस्थेची तो कल्पना करु शकत होता. त्याच भूमीवर त्यानेही आपले आई-वडील कायमचे गमावले होते. गुजरानवाला इथून आलेल्यांपैकी बहुतेक लोकांचे एक वा अनेक आप्त त्या प्रवासात मरण पावले होते अथवा गायब झाले होते. आदित्य आणि रजनी यांच्याबरोबर केशवराव नव्हते आणि मालतीबाईदेखील! सरितेबरोबर कमलादेवी आणि चौधरी नव्हते! लहानग्या प्रितीने तिचे आई-वडील सुखदेव आणि चंदा गमावले होते तर गुरकीरत, जसवीर आणि सतनाम यांच्याबरोबर सरदार कर्तारसिंग नव्हते!

पंजाबमधून सार्‍या हाल-अपेष्टांना तोंड देत आणि आपल्या आप्तस्वकीयांना गमावून आलेल्या या लोकांना हिंदुस्तानात आपलं स्वागत होईल ही आपली अपेक्षा चुकीची असल्याचं आढळून आलं. सीमेजवळील गावांमधील सामान्य लोकांमध्ये 'निर्वासितांची ही पीडा आमच्या इथे नको' अशीच भावना होती. अर्थात सीमेवरील लहान-सहान खेड्यांतून इतक्या लोकांना सामावून घेणं अशक्यच होतं. सरकानेच मग निर्वासितांना ट्रकमध्ये बसवून सर्वात जवळच्या मोठ्या शहरात पाठवण्यास सुरवात केली! अमृतसर!

अमृतसर शहरात पाकीस्तानातून आलेल्या निर्वासितांचा महापूर आला होता. शहरातील मोकळ्या मैदानांवर त्यांनी तात्पुरता आश्रय घेतला होता. या अपरिमीत गर्दीने अमृतसरमधील सामान्य जीवन साफ कोलमडून गेलं. पाणी - दूध - आरोग्यसेवा अपुरी पडू लागली. अमृतसरमधील स्थानिक रहिवासी अस्वस्थ झाले. निर्वारितांच्या या लोंढ्यामुळे त्यांच्या सोई त्यांनाच अपुर्‍या पडू लागल्या होत्या. कधी एकदा ही जत्रा पुढे जाईल असं त्यांना झालं होतं. शहरातले प्रतिष्ठीत नागरीक, व्यापारी सरकारी अधिकार्‍यांना विनंती करु लागले. 'काय वाटेल ते होईल ते करा, पण हा लोंढा आमच्या इथून पुढे पाठवा!'

आदित्य, रजनी, सरिता, डॉ. सेन, चारुलता, प्रा. सिन्हा, चित्रा, गुरकीरत, जसवीर, सतनाम, रुक्सानाबानू, प्रिती हे सर्वजण सुदैवाने एकाच ट्रकमधून अमृतसरला येऊन धडकले. या सर्वांना आता एकाच ठिकाणी एकत्र राहता येणं अशक्यंच होतं. प्रत्येकाला आपल्या वाटेने, आपल्या पुढच्या मुक्कामाला जाणं भाग होतं. परंतु पुढे जायचं म्हणजे नेमकं कुठे?

अमृतसरला आल्यावर पंजाबातील इतर शहरांतील अत्याचारांच्या ज्या कहाण्या कानावर पडल्या त्या ऐकून सर्वजण सुन्न झाले होते. देश स्वतंत्र झाला, देशाची फाळणी झाली. मुसलमानांना पाकीस्तान मिळालं. उर्वरीत हिंदुस्तान उरला, पण दोन्ही बाजूंना धर्मांधतेला उत आला. माणसाचा सैतान झाला!

लाहोर स्टेशनातून एक रेल्वेगाडी अमृतसरला येण्यासाठी निघाली. गाडीत शेकडो हिंदू आणि शीख निर्वासित होते. परंतु ही गाडी अमृतसरला आली तेव्हा काय आढळलं? गाडीतून रक्ताचे पाट वाहत होते! एकही हिंदू अथवा शीख जिवंत नव्हता! एकूण एक आबालवृद्धांची निर्घृण कत्तल करण्यात आली होती. त्यांच्या मृतदेहांचीही अमानुष विटंबना करण्यात आलेली होती. कित्येक मृतदेहांवरील एकूण एक कपडे टरकावण्यात आलेले होते. हे मृतदेह गाडीच्या बाहेर लटकतील असे तारांनी आणि दोरांनी बांधलेले होते. कित्येक स्त्रियांच्या मृतदेहावर उर्दूत 'पाकीस्तान' अशी अक्षरं लिहीलेलं होती! काहींच्या गुप्तांगात लाकडी खुंट्या ठोकलेल्या होत्या. काही मृतदेहांची केवळ मुंडकीच उरलेली होती.

हा प्रकार पाहून अमृतसर इथल्या स्थानिकांचं माथं भडकलं. त्यांनी गाडीतली प्रेतं बाहेर काढण्यास ठाम विरोध केला. त्यांनी रेल्वे अधिकार्‍यांना दरडावलं, 'ही गाडी अशीच पुढे दिल्लीला पाठवा! अविचाराने फाळणीला मान्यता देणार्‍या आमच्या नेत्यांना आपल्या डोळ्यांनी फाळणीची ही फळं पाहूदेत!' रेल्वेच्या अधिकार्‍यांना जनक्षोभापुढे मान तुकवणं भाग पडलं. ती गाडी तशीच दिल्लीकडे रवाना करण्यात आली!

पूर्व पंजाबातील अनेक खेड्यांत आणि शहरांत अल्पसंख्यांक असलेल्या मुसलमानांना हिंदू आणि शीखांच्या अत्याचाराला बळी पडावं लागलं होतं. जालंदर, फिरोजपूर, भटींडा आणि खुद्द अमृतसरमधील अनेक मुसलमान अमानुषपणे कापले गेले होते. हे लोण आसपासच्या खेड्यांतही पसरलं. मुसलमान स्त्रियांची आणि तरुणींची बर्‍याच ठिकाणी निर्वस्त्र करुन धिंड काढण्यात आली. अनेक स्त्रियांवर सामुहीक बलात्कार करण्यात आला.
हिंदुस्तानातील मुस्लीम निर्वासित पाकीस्तानमध्ये जाण्यास निघाले. दिल्ली रेल्वे स्टेशनवरून मुस्लीम निर्वासितांनी खच्चून भरलेली एक गाडी पाकीस्तानकडे निघाली. ही गाडी लाहोर इथे पोहोचली तेव्हा गाडीत अवघे पाचजण जिवंत आढळून आले. बा़की एकूण एक मुसलमानांची कत्तल करण्यात आली होती! जे पाजचण वाचले ते सुद्धा प्रेतांच्या ढिगार्‍यात प्रेतासारखे पडून राहीले म्हणून! तहान असह्य झाली तेव्हा कापल्या गेलेल्या इतर लोकांच्या रक्ताची थारोळी त्यांनी चाटली! काहींनी स्वतःच्या हातात दात खुपसून स्वतःचे रक्त चोखले! पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या काहींनी एकमेकांच्या तोंडात मूत्रविसर्जन केले!

डॉ. सेनना एका बंगाली माणसाने बटाला इथली एक भयंकर घटना सांगितली. बटाला इथे एक मुस्लीम डॉक्टर अनेक वर्षे राहत होता. गावातील अनेक लोकांशी त्याचे स्नेहसंबंध होते. अतिशय सहृदय असलेल्या या डॉक्टरांनी अनेकांवर मोफत उपचार केले होते. या डॉ़क्टरांच्या घरावर हिंदू आणि शीख गुंडांच्या टोळीने हल्ला केला. डॉक्टर आणि त्यांच्या मोठ्या मुलाने सुमारे चार तासांपर्यंत तीन बंदुकांच्या सहाय्याने हल्लेखोरांना रोखून धरलं, परंतु अखेर हल्लेखोर घरात घुसलेच!

डॉक्टरांचे दोन्ही हात कोपरापासून तोडण्यात आले. त्यांच्या मोठ्या मुलाचीही तीच अवस्था करण्यात आली. डॉक्टरांच्या पत्नीने स्वत:च्या पोटात सुरा खुपसून घेतला होता. डॉक्टरांची सोळा वर्षांची तरुण मुलगी मात्रं हल्लेखोरांच्या हाती लागली. सर्वांना घराबाहेर खेचून डॉक्टर आणि त्यांच्या मुलाच्या डोळ्यादेखत तिच्यावर आठ-दहा जणांनी बलात्कार केला. डॉक्टरांचा लहान मुलगा आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी त्या बलात्कारी लोकांवर धावला तेव्हा दोघांनी लोखंडाची सळई त्याच्या पोटात खुपसली आणि बकरा टांगतात तसं त्याला दोन बांबूंवर आडवं टांगून ठेवलं! अमानुष बलात्काराने मरण पावलेल्या त्या तरुणीच्या मृतदेहावरही बलात्कार करण्यास काहींनी कमी केलं नाही!

संपूर्ण पंजाबात अशाच दुर्दैवी कहाण्या ऐकू येत होत्या. हिंदु, शीख आणि मुसलमान निरपराध स्त्री-पुरुष आणि मुलं अत्याचाराला बळी पडत होती. क्रौर्याचा आणि अमानुषतेचा कळस झाला होता. विवेकबुद्धी हरपली. माणुसकीने शरमेने मान खाली घातली. स्वातंत्र्याची ही किंमत पंजाबच्या पश्चिम भागातले हिंदू आणि शीख आणि पूर्व भागातले मुसलमान यांना चुकवावी लागत होती. पंजाबप्रमाणेच बंगालही असंच पेटलं होतं.

अमृतसरमध्ये येऊन पोहोचलेल्या निर्वासितांना सरकारी अधिकारी सतत सूचना देत होते,
"पुढे चला! इथे थांबू नका! पुढे सरका"

पण पुढे सरकायचं म्हणजे नक्की कुठे? कोणालाच काही कळत नव्हतं. प्रत्येकजण इथे प्रथमच आलेला!

निर्वासितांनी अमृतसरमधून पुढे सऱकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रेल्वे स्टेशनवर गाडी पकडून पुढच्या प्रवासाला लागण! साहजिकच अमृतसर स्टेशनवर निर्वासितांची तुफान गर्दी झाली. फलाटांवर अक्षरशः हजारो माणसं जमा झाली होती. धड उभे राहण्यासाठीही जागा मिळत नव्हती. प्रत्येकाचा नारा एकच - चलो दिल्ली! दिल्लीला पोहोचल्यावर पुढे काय हा प्रश्न होताच, परंतु पहिलं लक्ष्य तिथे पोहोचण्याचं!

स्टेशनवरुन ठरावीक अंतराने दिल्लीकडे जाणार्‍या गाड्या सोडण्यात येत होत्या. एखादी गाडी फलाटाला लागली की स्त्री-पुरुष युद्धाच्या आवेशात गाडीवर आक्रमण करत होते. तिथे वृद्धांच्या वयाचा, कोणाच्या अपंगत्वाचा कोणीही विचार करत नव्हतं. लहान मुलं चेंगरली जात होती. स्त्री-पुरुष असा फरक तर उरलाच नव्हता! समोर आलेली गाडी ही दिल्लीला जाणारी अखेरची गाडी अशा आवेशात प्रत्येकजण गाडीत घुसत होता. एखादा कोणी कोलमडला तर लोक त्याला तुडवून बिनदिक्कतपणे पुढे जात होते. गाडीचे सगळे डबे गच्च भरले की लोक टपावर चढून बसत होते.

दिल्लीच्या दिशेने कितीही गाड्या सोडल्या तरी निर्वासितांची गर्दी कमी होत नव्हती. त्यात सतत भरच पडत होती. एखाद्या माणसाची चुकामूक झाली तर तो सापडण्याची शक्यताच नव्हती! त्याला शोधण्यासाठी कोणाला पाठवण्यातही अर्थ नव्हताच! शोध लागणं तर बाजूलाच, परंतु शोधण्यासाठी गेलेला माणूसही पहिल्या जागी परतून येईल याची काहीच खात्री देता येत नव्हती!

गुजरानवाला इथून आलेली सर्व मंडळी अमृतसर स्टेशनच्या आवारात येऊन पोहोचली. स्टेशनमधल्या गर्दीमुळे त्यांना आत शिरण्यास जागा मिळाली नव्हती. त्यातच त्यांच्याबरोब वृद्ध रुक्सानाबानू आणि दोन लहान मुलं होती. गर्दीचा जोर ओसरल्यावर स्टेशनमध्ये शिरावं या हेतूने सर्वजण बाहेरच थांबले होते. परंतु स्टेशनवर आल्यावर गुरकीरत सर्वांचा निरोप घेऊ लागला.

"सुवर्णमंदीरात जाऊन प्रायश्चित्त घ्यावं अशी पापाजींची इच्छा होती!" गुरकीरत म्हणाला, "पापाजींची ईच्छा मी पूर्ण करणार आहे!"

जसवीर चारूला मिठी मारून रडू लागली. दोघींची बर्‍याच वर्षांपासूनची मैत्री. पण आता कायमची ताटातूट होण्याची वेळ आली होती. चंदाची उणीव दोघींनाही जाणवत होती. ती आता कुठे असेल, काय परिस्थितीत असेल याबद्दल कोणीही तर्क करू शकत नव्हतं. तिचं नशीब आणि ती!

गुरकीरत आणि जसवीरपाठोपाठ रुक्सानाबानूही निघाली! प्रितीसह ती काश्मिरला जाणार होती.

"पर चाचीची! सुनने में आया है कश्मिरमें तो गडबड हो रही है!" चारू म्हणाली.
"सुना तो मैने भी है बेटी! पर अब इस हालतमें इस बच्ची को लेकर मै और कहां जाऊंगी? कश्मिरमें मेरे कई सारे रिश्तेदार है! कहीं ना कहीं तो हमें सहारा मिल ही जाएगा!" रुक्सानाबानू म्हणाली.

काश्मिरमधील परिस्थिती सुधारेपर्यंत तिने आपल्याकडे रहावं असं जसवीरचं मत पडलं. रुक्सानाबानूने त्याला होकार दिला. लहानग्या प्रितीला घेऊन ती त्यांच्याबरोबर निघून गेली.

सर्वजण कसेबसे स्टेशनमध्ये घुसले. आतमध्ये अद्यापही प्रचंड गर्दी होती. गाड्यांमागून गाड्या येत होत्या आणि निर्वासितांनी भरुन दिल्लीच्या दिशेने जात होत्या, त्या गर्दीतून वाट काढत फलाटावर पोहोचणं आणि दिल्लीला जाणारी गाडी पकडणं हे एक दिव्यं होतं. परंतु दुसरा काही इलाजही नव्हता. गर्दी कमी होण्याची वाट पाहत थांबण्यात काहीच अर्थ नव्हता.

रजनी आणि सरिता यांच्यासह आदित्य त्या गर्दीतून मार्ग काढत पुलावर आला होता. डॉ. सेन आणि चारु त्या तिघांच्या पाठोपाठ होते. त्यांच्या मागेच प्रा. सिन्हा आणि चित्रादेखील होते. परंतु तेवढ्यात बाजूच्या फलाटावर एक रिकामी गाडी आली. त्याबरोबर लोकांचा एक मोठा गट ढकलाढकली करत त्या दिशेला वळला. सिन्हा पती-पत्नी नेमके या गटाच्या वाटेतच होते. त्या लोकांबरोबर ते दोघेही त्या दिशेने ढकलले गेले!

फलाटावर खाली उतरल्यावर आदित्यने मागे नजर टाकली. डॉ. सेन आणि चारु त्याच्या मागेच होते. पण प्रा. सिन्हा आणि चित्रा दिसेनात. ते दोघं नेमके कोणत्या दिशेने गेले याचा अंदाज लावणंही कठीणच होतं. इतक्या गर्दीत त्यांना शोधणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखंच होतं. आदित्यने तो विचार मनातून काढून टाकला. त्यांना शोधण्याच्या प्रयत्नात इतरांपासून चुकामूक झाली तर भलतीच आफत ओढवली असती.

फलाटावर एक गाडी आधीच उभी होती. ही गाडी गच्च भरलेली होती. तरीदेखील लोक रेटारेटी करून आत घुसण्याचा प्रयत्न करतच होते. काहीजणांनी गाडीच्या टपावर चढून वरती बैठक मारली. या गाडीत चढणं आपल्याला शक्यच नाही हे आदित्यच्या ध्यानात आलं. तवढ्यात फलाटाच्या दुसर्‍या बाजूला एक रिकामी गाडी येऊन लागली. आधी त्या गाडीकडे कोणाचंच फारसं लक्षं गेलं नव्हतं. तेवढ्यात ही गाडी दिल्लीला जाणार असल्याची घोष्णा करण्यात आली. मग काय? सर्वांनीच तिकडे धाव घेतली.

रजनी आणि सरितेसह आदित्य डब्यात घुसला. एका रिकाम्या बाकावर तिघांनी बसकण मारली. डॉ. सेन आणि चारु त्यांच्यामागोमाग आत घुसले होते. त्यांना समोरच्या बाकावर जागा मिळाली. काही वेळातच गाडीने अमृतसर स्टेशन सोडलं आणि दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरु झाला! रजनी आणि सरिता दोघी थोड्यावेळातच झोपेच्या आधीन झाल्या, पण आदित्यला मात्रं झोप येईना! त्याचं विचारचक्र सुरु होतं. दिल्लीला गेल्यावर पुढे काय करायचं? राहयचं कुठे? दिल्लीतच मुक्काम करायचा का दुसरं कोणतं शहर गाठायचं? एखादी नोकरी शोधणं तर अत्यावश्यक आहेच, पण तोपर्यंत काय? या दोघींची जबाबदारी आता आपल्यावरच आहे! यथावकाश रजनीचं लग्नंही करायचं आहे. काय करावं? कुठे जावं?

आदित्य या विचारात हरवलेला असतानाच त्याला आपल्या मुंबईच्या काकांची आठवण झाली. केशवरावांकडून त्याने मुंबईच्या कितीतरी गोष्टी ऐकल्या होत्या. मुंबईत मोठा समुद्र आहे हे त्यांनी सांगितल्याचं त्याला स्मरत होतं. आपल्या या भावाचा केशवरावांच्या बोलण्यात नेहमी उल्लेख येत असे. काय बरं नाव त्यांचं.. हं वामनकाका! पण मुंबईत त्यांना शोधणार कसं? स्मरणशक्तीला ताण दिल्यावर समुद्रकिनार्‍यापासून मैलभर अंतरावर कोणत्या तरी वाडीत ते राहतात असा केशवरावांनी एकदा उल्लेख केल्याचं त्याला आठवलं. बस्सं! ठरलं! मुंबईत जाऊन या काकांना शोधून काढायचं आणि त्यांच्याकडे आश्रय घ्यायचा! मग पुढची हालचाल करता येईल!

अमृतसरहून निघालेली ती गाडी वाटेत अनेक ठिकाणी थांबत-रखडत अखेर दिल्ली स्थानकात शिरली.

दिल्ली!
स्वतंत्र हिंदुस्तानची वैभवशाली राजधानी!

दिल्लीला येऊन पोहोचताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. फाळणीच्या वणव्यात होरपळलेले आणि पाकीस्तानातून जीव कसाबसा बचावून आलेले सर्वजण अखेर दिल्लीला येऊन पोहोचले होते. जणूकाही एक मोठी लढाईच सर्वांनी जिंकली होती! आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरातच सर्वजण दिल्लीच्या फलाटावर उतरु लागले! इथपर्यंत तर सहीसलामत येऊन पोहोचलो! आता पुढचा विचार!

आदित्य, रजनी, सरिता, डॉ. सेन आणि चारु फलाटावर उतरले. फलाटावरील काही अंतरावर असलेल्या एका चहावाल्या दुकानापाशी सर्वजण आले. गाडीतून उतरलेल्या निर्वासितांना तो भला माणूस फुकट चहा देत होता. कप-दोन कप चहा पोटात गेल्यावर सर्वांना बरं वाटलं. गेल्या कित्येक तासात पाण्याचा थेंबदेखील पोटात गेला नव्हता, त्यामुळे तो चहा अमृतासारखा लागत होता.

"आपण दिल्लीला तर येऊन पोहोचलो! पण आता पुढे काय?" चारुने विचारलं.
"आपल्याला कलकत्त्याला तर जावंच लागेल!" डॉ. सेन उत्तरले, "बंगालातून तिकडे कोणी आलं आहे का ते पाहवं लागेल! तुम्ही काय ठरवलं आहे आदित्यबाबू? नाहीतर कलकत्त्याला चला!"
"आम्ही मुंबईला जातो आहोत डॉक्टरसाहेब!"
"मुंबई?"
"मुंबईत आमचे नातेवाईक आहेत! सध्या तरी त्यांच्याकडेच आश्रय घेण्यावाचून दुसरा पर्याय नाही!"
"आणि सरिता?" चारुने विचारलं.
"मी आदित्यबरोबर मुंबईला जाते आहे चारुदिदी!"

सर्वजण चौकशीच्या खिडकीकडे आले. गाडीची चौकशी करता समोरच्याच फलाटावर उभी असलेली गाडी मुंबईला जाणार असल्याचं त्यांना कळलं. फ्रंटीयर मेल!

फाळणीपूर्वी ही गाडी वायव्य सरहद्द प्रांतातल्या पेशावर पर्यंत धावत असे. कलक्त्त्याला नजरकैदेतून निसटून मुंबईला आल्यावर याच गाडीने सुभाषचंद्र बोस पेशावरला गेले होते! हिंदुस्तानची फाळणी झाल्यावर या गाडीची धाव अमृतसरपर्यंतच मर्यादीत झाली होती. ही गाडी नुकतीच अमृतसरहून आली होती. निर्वासितांचा मोठा लोंढा गाडीतून बाहेर पडला होता!

आदित्य, सरिता आणि रजनी गाडीत चढले. डॉ. सेन आणि चारू खिडकीपाशी उभे होते. अखेर तो क्षण येऊन ठेपला होता! मुंबई आणि कलकत्ता, दोन्ही मोठी शहरं! शेकडो मैल दूर! आता पुन्हा कधी भेट होणार? कदाचित कधीच नाही! कोणत्या योगाने सर्वांची भेट झाली, गुजरानवालाच्या त्या छावणीतून इथपर्यंत एकमेकाच्या साथीने आलो... सगळा नशिबाचा खेळ!

"आदित्यबाबू! आपली पुन्हा कधी भेट होईल की नाही माहीत नाही पण तुमचे आम्हावर अनंत उपकार आहेत हे आम्ही दोघं कधीच विसरणार नाही!" डॉ. सेन भावनावश होत म्हणाले.

आदित्यने चमकून चारुकडे पाहीलं. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. तो मनात समजून गेला! मुरीदके इथल्या छावणीतली ती रात्रं आणि त्या गोठ्यातला तो प्रसंग क्षणार्धात त्याच्या नजरेसमोर उभा राहीला. काय बोलावं त्याला कळेना.

"आदित्य, मुंबईत गेल्यावर काय करायचं?" दिल्ली स्टेशनमधून गाडी बाहेर पड्ल्यावर सरितेने विचारलं.
"आधी वामनकाकांचा पत्ता शोधून त्यांच्याघरी जाऊ! मग पुढचं पाहू!" आदित्य उत्तरला.
"काकांचा पत्ता आहे तुझ्याकडे?" रजनीने आश्चर्याने विचारलं.
"अर्धा! पूर्ण नाही! पण त्याला आता इलाज नाही! नाना काकांना नेहमी पत्रं पाठवत असत. त्यांना नक्की पूर्ण पत्ता माहित असणार, पण त्यांनी तो कुठे लिहीलेला मला तरी सापडला नाही. कदाचित त्यांना लिहून ठेवण्याची गरज लागली नसेल!"
"ते देखील योग्यंच म्हणा!" रजनीने मान हलवली, "असं काही होईल असं कोणाला वाटलं होतं?"
"खरं आहे!" सरिता म्हणाली, "एक दिवस अचानक आपलं घरदार, जमीन-जायदाद सोडून जीव वाचवण्यासाठी असं पळून यावं लागेल हा विचार कोणाच्या स्वप्नातही आला नसेल! माझे पिताजी, शहरातले एक बडे व्यापारी, पण काय झालं त्यांचं? दुकानं लुटली गेली, घरदार सोडून जीव वाजवण्यासाठी त्या छावणीत आश्रय घ्यावा लागला. प्रतापभय्याचं तर प्रेतही दिसलं नाही ! आणि रस्त्याच्या कडेला बेवारशासारखा मृत्यू आला शेवटी! का? त्यांचा काय दोष होता?"
वडिलांच्या आठवणीने सरितेचा स्वर ओलावला.
"दोष कोणाचाच नाही सरिता!" आदित्य हलकेच उद्गारला, "चाचाजी-चाचीजी किंवा आई-नाना किंवा दंग्यात बळी पडलेले इतर कोणी, हे सगळेच निर्दोष होते, निष्पाप होते. दोष असलाच तर तो ज्या परिस्थितीत त्यांना मृत्यू आला त्या परिस्थितीचा आणि ती निर्माण होण्यास कारणीभूत असणार्‍यांचा!"

सरिता काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. रजनीचेही डोळे भरून आले होते. आदित्यने दोघींना जवळ घेतलं. त्यांना मानसिक आधाराची गरज आहे हे त्याला जाणवलं. एकही शब्द न बोलता तो त्यांचं सांत्वन करत राहीला. केवळ स्पर्शाने... कधीकधी शब्दांची गरज नसते. स्पर्शदेखील पुरेसा ठरतो.

रात्रीचे नऊ वाजून गेले होते. एका विशिष्ट गतीने गाडी मार्गकमणा करत होती. गाडीच्याच गतीने आदित्यंचं विचारचक्रंही सुरू झालं.

देशाला स्वातंत्र्य मिळालं हा खरंतर भाग्याचा दिवस! हजारो-लाखो लोकांनी स्वातंत्र्यासाठी आंदोलनात भाग घेतला. आपल्या घरावर तुळशीपत्रं ठेवली. कित्येकांनी हसत-हसत फाशीचा दोर स्वीकारला. गांधीजी, पं. नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद यांनी वर्षानुवर्षे ब्रिटीश सरकारशी लढा दिला, त्याची परिणिती देशाच्या स्वातंत्र्यात झाली. पण दुर्दैवाने देशाची फाळणी झाली. स्वतंत्र अशा अखंड हिंदुस्तानचं स्वप्नं भंग पावलं. पूर्व आणि पश्चिम, दोन्हीकडे देशाचे तुकडे पाडून पाकीस्तानच्या रुपाने वेगळं राष्ट्र निर्माण केलं गेलं. परंतु याचा परिणाम काय होईल याची कल्पना कोणाला आली नाही का?

देशाची फाळणी टाळणं शक्यं नाही हे स्पष्ट दिसत असतानाही दोन्हीकडच्या सर्वसामान्य लोकांची सुरक्षीतपणे अदलाबदल करण्यास अग्रक्रम का देण्यात आला नाही? हिंदू, मुसलमान, शीख - तीनही धर्मातील माथेफिरुंनी क्रौर्यालाही लाजवणारा असा काही हैदोस घातला, ज्यामुळे माणुसकीलाही शरम वाटावी, या आगीच्या वणव्यात जे लोक होरपळले, अनन्वित अत्याचार सोसत मृत्यूला सामोरे गेले त्या निरपराध सामान्य जनतेचा यात काय दोष होता? याला जबाबदार कोण? फाळणीची मागणी करणारे ? फाळणीला मान्यता देणारे? पाकीस्तानची मागणी करणारा रहमत अली? आक्रमकपणे ही मागणी पुढे रेटणारे महंमदअली जिन्हा? फाळणी झाली तर ती माझ्या मृतदेहावरच होईल असं बजावणारे गांधीजी? पं. नेहरु? वल्लभभाई पटेल? व्हाईसरॉय माऊंटबॅटन? देशाच्या स्वातंत्र्याची जी किंमत दोन्ही बाजूच्या सामान्य जनतेने चुकवली त्याची नोंद करायची कोणाच्या खात्यावर?

देशाला स्वातंत्र्य मिळालं ते सनदशीर मार्गाने, अहिंसेच्या बळावर असं सर्वजण म्हणत आहेत. पण मग ज्या हजारो लाखो क्रांतिकारकांनी आपले प्राण वेचले त्यांच्या प्राणांची काहीच किंमत नाही? वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा, खुदीराम बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, रोशन सिंग, राजेंद्र लाहीरी यांच्या बलिदानाची काहीच किंमत नाही? नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या आझाद हिंद सेनेच्या लाखो सैनिकांनी आपले प्राण वेचले त्याचं काही मोल नाही? केवळ त्यांचा मार्ग अहिंसेचा नव्हता म्हणून त्यांचं देशप्रेम व्यर्थ होतं?

फाळणीच्या या आगीत आपल्यासारख्या हजारो-लाखो लोकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. स्वतंत्र, सार्वभौम हिंदुस्तानाचे नागरीक म्हणून इथे येताना ही किंमत आपल्याला चुकवावी लागली! १९४७ हे वर्ष देशाच्या इतिहासातील सर्वात भयानक नरसंहाराचं वर्ष म्हणूनच ओळखलं जाईल यात शंका नाही. परंतु आता हा काळाकुट्ट भूतकाळ विसरायला हवा. त्याबद्दल काहीही करणं आपल्या हाती नसलं तरी येणारा भविष्यकाळ आपल्याच हाती आहे! या सगळ्या भयानक परिस्थितीतून आपण जिवानीशी बचावलो, रजनी बचावली, सरितेची साथ सुटली नाही! भूतकाळाच्या कटू स्मृतींच सावट पडू न देता भविष्यकाळावर पडू न देता या दोघींसह आपलं भविष्य घडवणं आवश्यक आहे! तरच आयुष्याला काही नवा अर्थ प्राप्त होईल!

आदित्यने हलकेच सरितेच्या कपाळावर ओठ टेकले. क्षणभरच तिच्या चेहर्‍यावर स्मित झळकलं. त्याला बिलगत ती पुन्हा झोपेच्या अधीन झाली. रजनीच्या चेहर्‍यावरही खट्याळ हसू उमटलं. समाधानाने स्वत:शीच हसत त्याने डोळे मिटले.

फ्रंटीयर मेल एका संथ लयीत मुंबईकडे धावत होती.

समाप्त

*******************************************************************************************************************
टीप: सर्व पात्रं, प्रसंग, घटना काल्पनिक. कोणाशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

छावणी - ९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पार्टाकस, तुमच्या प्रभावी लेखनशैलीमुळे भारताच्या फाळणी प्रसंगी जे काही घडले असेल ते खरोखर डोळ्यापुढे उभे राहते.

धर्मांधता माणसाला आंधळं बनवते, आणि माणुस पशुलाही लाजवेल असे वागतो हे मात्र खरं. वर्षानुवर्षे एकमेकांबरोबर गुण्यागोविंद्याने राहणारी माणसे धार्मिक तेढी मुळे कशी वागतात आणि दोन्ही समाजामध्ये त्यामुळे जी भीषण दरी निर्मांण होते ते १९९२-९३ च्या जातीय दंगलीच्यावेळी स्वतः अनुभवले आहे.

भारताची फाळणी हे एक विदारक सत्य आहे, दोन्ही बाजुच्या लोकांनी त्याचा भीषण अनुभव घेतला पण इतिहासातील या घटनेपासुन बोध घेऊन भारतीय समाज खरंच काही शिकला का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल असे मला स्वत:ला वाटते.

एका गंभीर आणि संवेदनशील विषयावर एक अत्यंत संतुलित आणि सुंदर कादंबरी मायबोलीकर वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

वाच ल्यानंतर दोन दिवसांनी येथे प्रतिक्रिया देते आहे कारण या कांदबरीने मनात उठलेले काहूर. म्हणूनच थांबले विचार केला आधी आपण आपल्या भावना तपासून बघू या नंतर इथे लिहू या. कारण इथे येऊन फक्त खूप आवडली किंव पु.ले.शु. इतक्याच शुभेच्छा नव्हत्या द्यायच्या.
तुम्ही विषयच इतका वेदनादायक निवडला की त्यात झालेले अत्याचार खरोखर शहारे आणतात. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर चाळीस वर्षांनी जन्मलेली आमची पिढी. त्यामुळे अगदी त्या वेदना अंगावर घेऊन फिरणारे लोक तर कधी संपर्कात आले नव्ह्ते. पण पदवी घेतली ती सिंधी लोकांनी काढलेल्या कॉलेजात. त्या तीन वर्षात आपल्याच शहरात हे लोक कसे आले, त्यांनी आपल्या वस्ती करून, व्यवसाय उभा करून पुन्हा या समाजाचे देणे लागतो या हेतूने केलेली कार्ये ही दिसली. पण तरिही त्या मागची वेदना इतकी कधी जणवली नव्हती. ती जाणीव "ट्रेन टू पाकिस्तान" वगैरे मध्ये थोडी झाली. पण या वर्णणांनी हादरविले जस ते "शिंडलर्स लिस्ट" बघून झाले होते तसे झाले.
शेवटी हा इतिहास आहे आणि हे खरे आहे. आणि अत्यंत दुर्दैव म्हणजे आपण अजूनही त्यातून काहीच शिकलो नाही.
माफ करा, पण एक सांगू, तुम्ही वर्णन खूप छान केले पण गोष्ट सांगण्यात कुठे तरी कमी झाली हे एव्हढे खटकले. अर्थात मी लेखक नाही फक्त वाचक म्हणून हे नोंदविले.

मोजक्याच पण अर्थपुर्ण शब्दांनीयुक्त अशी अत्यंत संतुलीतपणे लिहीलेली लेखमाला. स्पार्टा, हॅटस ऑफ टु यु. धर्मांधता माणसाला कशी क्रुर बनवते आणि माणुसकी विसरायला लावते, हे पुन्हा एकदा ही लेखमालीका अधोरेखीत करते.>>१००%

धनुकली | 30 November, 2014 - 21:16
साधना.. मला तरी हा ब्रिटीशांचा एक खेळ वाटला..
दोघान्ना भांडु दे.. इतकं की परत कधीही एक होता कामा नये.. वाटल्यास एक मेकांपासुन सोडवण्यास परत ब्रीटीशांचीच मदत लागली तर उत्तम.. असं काहीसं वाटुन अशी मार काट दंगल होईल हे माहीत असुन त्या लोकांनी दुर्लक्ष केलं असेल..

>>

धनुकली तु कधी जर जातीविषयक वा धर्मविषयक धाग्यांवर जाउन पाहिलेस तर तुला जाणवेल की लोकांची सहिष्णुता किती कमी आहे. द्वेष , फुट इतर देशातील लोकांत पण असते पण त्याचबरोबर दुसर्याच्या रास्त म्हणण्याचे कौतुक करणे (नावापुरते नाही तर मनापासुन). आपला मुद्दा चुकला असेल तर ते मान्य करणे हे
पाश्चात्य देशात जास्त प्रमाणात आढळते (म्हणजे सर्वच तसे नसतात पण खुप जास्त लोक तसे असतात).
partisanship व कडवेपणा जर जास्त प्रमाणात असेल तर सहिष्णुता लयाला जाते व राष्ट्राचे नुकसान होते.
अर्थात सुरवातीच्या काळात ही फुट पाडण्यात ब्रिटीशांचा जरी हात असला तरी पुर्वापारचे मान अपमान जर कोणीच गिळु शकत नसेल तर राष्ट्र एकसंघ कसे होणार.

साधना,

>> फाळणीबद्दल जेव्हा जेव्हा वाचले तेव्हा आधी लोकांची अदलाबदल करुन मग स्वातंत्र्य जाहिर का केले गेले नाही हा
>> प्रश्न पडतो. आपल्या नेत्यांना लोकांच्या काय भावना आहेत हे तेव्हाही कळलेच नाही काय? आणि हे काय एका
>> रात्रीत घडले नाही. फाळणीआधीही देशात खुप ठिकाणी दंगे घडतच होते, मग प्रत्यक्ष फाळणीच्या वेळेस सर्व काही
>> व्यवस्थित होईल असे कसे वाटू शकले?

भारताची फाळणी हा जगातला सर्वात वाईट रीत्या कार्यवाहीत आणला गेलेला राजकीय तोडगा आहे. चिमुकल्या चेकोस्लोव्हाकियाचं उदाहरण घ्या. तीन वर्षे फाळणीची पूर्वतयारी चालू होती. मग फाळणी झाली आणि पुढे सुमारे तीनचार वर्षं पश्चातकार्य चालू राहिलं. याउलट भारत या खंडप्राय देशाची फाळणी अवघ्या १० महिन्यांत घिसाडघाईने करण्यात आली.

हे सगळं भारतीय नेत्यांना माहीत होतं. पण एव्हढी दशके संघर्ष केल्यावर जेव्हा सत्ता दिसू लागली, तेव्हा या नेत्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. फाळणीने सत्ताप्रप्तीचा मार्ग सुकर केला. लोकं मेले तर मरोत. चिंता कुणाला पडलीये!

नेते लोकांची बुडं नेहमीच सुरक्षित असतात. आपली काळजी आपणच वाहायला हवी. शिवाजीमहाराजांची शिकवण विसरणं हा अक्षम्य अपराध आहे.

आ.न.,
-गा.पै.

हर्पेन,

>> मराठीत फाळणीवर स्वतंत्र असे पहिलेच ललित लिखाण असावेसे वाटते.

तुमचा तर्क बहुधा खरा आहे. एव्हढी भीषण घटना घडूनही मराठी सारस्वतात तिचे पडसाद फारच क्षीण उमटले आहेत. Sad

हिरोशिमा, नागासाकी, नाझी छावण्या वगैरेवर मराठीत विपुल लेखन आहे. बरचसं अनुवादित आहे. मात्र घरातल्या घटनेवर बाळगलेलं औदासिन्य मनास खिन्न करतं! बहुतेक तत्कालीन साहित्यिकांना इतका जबर धक्का बसला की फाळणीच्या स्मृतीही नकोशा वाटतात.

पानिपत काय वा फाळणी काय, या वेदनादायी प्रसंगांचं मूल्यमापन व्हायला हवं.

आ.न.,
-गा.पै.

"फाळणीचे हत्याकांड- एक उत्तरचिकित्सा" हे अनुवादित पुस्तक नुकतेच वाचायचा प्रयत्न केला. पुर्ण वाचले गेले नाही पण जे काही वाचले त्यातली बरीचशी माहिती धक्कादायक आहे. त्यावेळच्या भारतीय नेत्यांमध्ये एकवाक्यता नव्हती आणि आजुबाजुला जे काय चाललेय त्यावर काही उपाय शोधण्याचीही बुद्धी त्यांना झाली नाही. लाखो लोक कल्पना करवणार नाही अशा रितीने मारले गेले आणि ज्यांच्यामुळे हे झाले ते केवळ एकमेकांवर जबाबदारी ढकलत राहिले. काही नेत्यांची त्यावेळची व्यक्तव्ये जी त्या पुस्तकात दिलीत ती वाचुन खुप आश्चर्य वाटले. Sad

ब-याचशा देशांतुन काही वर्षांनंतर सरकारी कागदपत्रे लोकांसाठी खुली करण्याची पद्धत आहे. आपल्याकडेही आहे. पण त्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, तेव्हाची सगळी महत्वाची कागदपत्रे इंग्रजांकडुन आणि भारतीयांकडुन नष्ट केली गेली आणि महत्वाच्या खात्यांमधली केवळ अ‍ॅडामिनिस्ट्रेटीव कागदपत्रेच खुली करण्यासाठी देण्यात आली. त्यामुळे आपल्याला फाळणीच्या वेळी काय झाले याची माहिती आहे. पण ते का झाले याचे उत्तर कदाचित कधीही मिळणार नाही. कोणी काहीही लिहुन ठेवलेले नाही. आणि आता कोणालाही ह्या "का" मध्ये रस नसेल. हा इतिहास परत न येवो हीच अपेक्षा.

बाकी हा केवळ ब्रिटिशांचा खेळ असावा यावर माझा पुर्ण विश्वास नाही. अर्थात ब्रिटिशांनी प्रत्येक ठिकाणाहुन काढता पाय घेताना ते तिथुन निघाल्यावर तिथे कुरबुरी राहतीलच याची सोय करुनच काढता पाय घेतला. पण तरीही ह्या कुरबुरी तशाच कायम ठेवण्याचे श्रेय तिथल्या मुळ लोकांनाही जातेच ना. मुळात लोकच आंधळे आणि लोभी असल्यावर काय.....

हर्मायनी ग्रेंजर,

>> स्वातंत्र्य मिळाल्या नंतर चाळीस वर्षांनी जन्मलेली आमची पिढी. त्यामुळे अगदी त्या वेदना अंगावर घेऊन फिरणारे
>> लोक तर कधी संपर्कात आले नव्ह्ते.

भारत आणि पाकिस्तानातल्या (काही) नेत्यांच्या कृपेने ताजीताजी वेदना घेऊन फिरणारी माणसे आजही भेटतील. नुकताच पेशावरात शाळेतल्या शाळेत लहान मुलांवर भेकड हल्ला झाला. फाळणीच्या वेळेस उडवलेल्या निरपराध्यांच्या कत्तलीची ही छोटी आवृत्ती आहे. Sad

आ.न.,
-गा.पै.

आधी ठरवुन ही मालिका वाचली नव्हती.खुप त्रास होईन ह्याची कल्पना होती.मात्र आज सगळे भाग वाचुन काढले.
फार भयानक वाटतय.ज्यांनी सहन केल ,कराव लागल त्यांच्यासाठी तर फारच वाईट वाटतय. Sad Sad Sad

Pages