निखिलदा आणि बिलासखानी

Submitted by kulu on 29 November, 2014 - 14:23

(खरं तर निखिलदांच्या बिलासखानीचं असं वर्णन करण्याची माझी क्षमताही नव्हे आणि लायकीही, पण हा बिलासखानी मनाला इतका भिडला की निखिलदांचा बिलासखानी वेगळा का ह्यावर विचार करावा वाटला आणि चैतन्यनेही बरेच दिवसांपुर्वी निखिलदांवर लिही असं सांगितलं होतं म्हणुन हे इथे पोस्टतोय. यात कुणाशी तुलना करण्याचा हेतु नाही. आणि व्याकरणाबद्दल माफ करा!
ऐकण्यासाठी https://www.youtube.com/watch?v=4eIhzzkXVjs )

निखिलदा आणि बिलासखानी

खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी सतार ऐकली पण नव्हती, फक्त पं. रवी शंकर आणि पं. निखिल बॅनर्जी ही नावे माहित होती, तेव्हा मला कुणीतरी विचारलं होतं की तुला यातलं जास्त कोण आवडतं, तेव्हा मी उगाच निखिल बॅनर्जी असं सांगून टाकलं. मग पुढे कधीतरी रेकॉर्ड्स ऐकायला सुरु केल्या आणि आता तर त्यांचं व्यसनच लागलंय!

त्यानी वाजवलेला कुठला राग जास्त आवडला असं नसतंच काही मुळी, सगळेच राग आवडतात. पण त्यांच्या बिलासखानीने मनावर जी मोहिनी घातली ती कायमचीच! मी पहिल्यांदा बिलासखानी ऐकला तो किशोरीताईंचा. त्यांची "सजनी कवन देस गयो" ही बंदिश अजूनही कानात घुमत राहते! नंतर एकदा निखिलदांचा बिलासखानी ऐकायचा योग आला. माझ्या घरापासून ETH ला जायला बरोब्बर एक तास लागतो आणि निखिलदांचा बिलासखानी बरोब्बर एक तासाचा आहे म्हणून तोच सुरु केला मोबाईलवर!

पहिल्या निषादाबरोबरच समाधी लागली! आह... काय तो निषाद! तोडी सुरु होणार याची नांदी देणारा! म्हणजे रागाचं नाव माहिती नसतं तरी हा निषाद तोडीचा हे लगेच कळावं! एकेक स्वर बिलासखानी उलगडून दाखवत होता. धीरगंभीर आलाप. विरहात चिंब भिजलेला. विरह कशापासून? व्यक्तीपासून, वस्तूपासून, सुखापासून की आत्म्यापासून.....ज्याचं त्यानं ठरवावं! पण विरहाच दु:ख नक्की! आणि हे दु:ख साधं नव्हे बरं, आता इथून पुढे काही नाहीच अशा अल्टीमेट स्वरुपातलं दु:ख.... किशोरीबाई म्हणतात की कला ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये दु:ख सुध्दा सुंदर होऊन येतं! किती खरंय! तिथे त्यावेळी ना मी होतो ना निखिलदां होते ना सतार होती. फक्त बिलासखानी होता भरून राहिलेला!

काय मज्जाय बघा - एकतर बिलासखानी हा महाभयंकर किचकट राग, जरा चुकलं की अगदी भैरवी आणि मुलतानीशी भांडण! त्यात तो राग बिलासखानाने मिया तानसेनच्या मृत्युच्या दु:खात रचला अशी आख्यायिका त्यामुळे त्यात तो दु:खी उदास वगैरे भाव! आणि आपल्या संगीतात श्रुती धरून एकूण २२ स्वर असले तरी त्याचा लगाव वेगळा, म्हणजे मुलातानीचा कोमल रिषभ हा तोडीपेक्षा वेगळा. भूपाचा गंधार हा बिलावलापेक्षा वेगळा. हे सगळं सांगता येतं आणि रीयाजानंतर गळ्यात उतरवताही येतं कदाचित पण हे सतारीवर कसं करायचं? सतारीवर रागानुसार स्वरलगाव कसा करायचा? एकतर कोमल आणि तीव्र स्वरांना मुळात सतारीवर हवा तसा झंकार येत नाही, त्यात या बिलासखानीत तर गंधाराची अतिकोमल श्रुती आणि त्यावर जरा थांबून मग रिषभावर अलगद उतरायचं. मग तो वक्र मध्यम, म-रे ची मींड घ्यायची पण त्यात भैरवी दिसता कामा नये, अमुकवर न्यास नाही आणि तमुक वर गमक नाही, अशी एक ना अनेक बंधनं, हे सगळं राग व्याकरण समजुपर्यंतच मुळात फेफे उडते!आणि ते सतारीवर वाजवायचं हेच दिव्य! आणि मग त्या रागाव्याकरणाबरोबर तो भाव प्रकट करायचा म्हणजे नुसती साधना, रियाज, प्रतिभा असून चालत नाही, त्याच्याही परे अशी काही समज आणि तादात्म्य पावण्याची शक्ती असावी, जी निखिलदांकडे होती !

आणखी एक वैशिष्ट्य असं की वाद्यसंगीतात "झाला" नावाचा एक भयंकर प्रकार असतो. तो सुरु झाला की बरेचसे वादक हे संगीत सोडून कुस्ती खेळू लागतात. "बघा माझी द्रुत लय कशीय, बघा माझा वाद्यावर कसा हात आहे" अशी हिडीस जाहिरातबाजी सुरु होते! मग त्यात रागाचा भाव वगैरे गरीब बिचाऱ्या माधुकऱ्याप्रमाणे कुठेतरी असतात कोपर्यात! पण निखिलदां इथे पुन्हा वेगळे, झाल्यामध्ये कुठे कुस्ती नाही तर भाव उलट सुंदररीत्या intensify केलाय! त्यात आपल्या महाराष्ट्राला अभिषेकीबुवांच्या "घेई छंद मकरंद" मुळे सलग वराली(ळी?) सुंदररीत्या गवसलाय, त्यामुळे इतर कुणाच्या बिलासखानीत सा रे गं प अशी स्वरावली आली की आपल्याला तो आठवतो. ते या बिलासखानीत नाही झालं. बर या राग उलगडण्याच्या प्रक्रियेत कुठे कर्त्याचा भाव नाही. खरं हे वैशिष्ट्यच आहे किशोरीताई आणि निखिलदांचं, मुद्दाम कर्तेपणा नाही. जे येतंय ते साहजिक, उत्स्फूर्त आणि आपोआप! म्हणजे बरीच मंडळी बिलासखानीचे आव्हान स्वीकारून गातात आणि हे दोघे मात्र बिलासखानीला शरण जाऊन गायलेत! रागाप्रती समर्पण भाव!

अर्थात सगळंच सुरळीत सुरु आहे अशातला भाग नाही. बिलासखानीची विलंबित बंदिश सुरु असताना तबलजीने मध्येच झटका आल्यासारख धुडगूस घातलाय. इतक्या तरल कोमल भावाला असे तडे गेलेलं मला तरी आवडलं नाही बुवा! म्हणजे असे राग सुरु असताना तबलजीने जरा sublime रोल घ्यायला काय हरकत आहे? जिथे तिथे लयीचे वर्चस्व किंवा "मै भी हुं" हे कशाला दाखवायचं? त्यासाठी कलावती, सोहनी, अडाणा, शुद्ध सारंग वगैरे आहेत की! पण बिलासखानीला हे सोसणारं नव्हे!

पु. लं. नी म्हणून ठेवलय की सतार गायली पाहिजे. निखिलदांची सतार गाते, तिथे गायकी अंग वगैरे असं ढोंग नाही, तर ती खरंच गाते. ढोंग अशासाठी म्हटलं कारण बऱ्याचदा गायकी अंगवाले खर्ज, क्रीन्तन वापरत नाहीत आणि तंतकारीवाले गायचा प्रयत्न करत नाहीत, आणि हे सर्व आपापले घराणे, खानदान जपण्यासाठी म्हणे. कधीकधी वाईट वाटतं की रवी शंकर आणि विलायत खानांच्या जमान्यात निखिलदांना जी प्रसिद्धी मिळायला हवी होती ती नाही मिळाली. पण ते प्रसिद्धीसाठी आणि घराण्याच्या वृथा अभिमानासाठी गायिले नाहीत तर साधना म्हणून गायिले त्यामुळेच तो राग बिलासखानी सचेतन प्रकट झाला असेल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक राग गात वाजवत नाहीत. फक्त इतकाच विचार करतात कि लोकांचं मनोरंजन झालं म्हणजे बास. रागविचार आणि राग-अनुभूती फारशी येत नाहॆच. आजकाल योग्य ठिकाणी 'क्याबात है!' म्हणून दाद देणार्यांपेक्षा, काहीतरी करामती करून दाखवल्या की टाळ्यांचा पाउस पाडणारी पब्लिक वाढलीय.>>>
सहमत आहे, पण पब्लिकला शास्त्रीय संगीत उमजावं, रागविचार कळावा, राग-अनुभूति यावी यासाठीचे प्रयत्न कमी पडत आहेत.यावर काम झाले पाहिजे.

षड्ज पंचम धन्यवाद! Happy हो बिलासखानीचे दोन आहेत रेकॉर्ड्स. पण मला स्वतःला त्यांचं लाइव्ह मैफलीतल आवडत. बाकी सतारीवरच्या स्वरलगावाबाबतीत कोणीही निखिलदांच्या जवळ जाऊ शकत नाहे. स्वतः गुरुमांनी देखील त्यंच खुप कौतुक केलंय!

अ‍ॅक्च्युअली पब्लिक ने समजुन घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे पण. म्हणजे मुळात आधी इच्छा दाखवल्याशिवाय एखाद्याला काहीतरी समजाऊन तरी कसं सांगणार!

लाइव्ह मैफलीत मजा वेगळीच असते. बोलायचं झालं तर त्यांच्याबद्दल बरेच काही बोलता येइल.

म्हणजे मुळात आधी इच्छा दाखवल्याशिवाय एखाद्याला काहीतरी समजाऊन तरी कसं सांगणार!>> आणि ती इच्छा पण मनापासून आली पाहिजे Happy

आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या बद्दलचा आदर शब्दात व्यक्त करू शकणारही नाही, त्यांना अंत:करणापासून वंदन इतकंच म्हणेन.

निखिलदांनी किती राग रेकोर्ड केले यापेक्षा त्यांच्या कित्त्ती रागांचे रेकोर्ड नाहीत याचीच सल राहते. Sad जसं की सारंग, पुर्वी, पुरीया, नंद !

Pages