निखिलदा आणि बिलासखानी

Submitted by kulu on 29 November, 2014 - 14:23

(खरं तर निखिलदांच्या बिलासखानीचं असं वर्णन करण्याची माझी क्षमताही नव्हे आणि लायकीही, पण हा बिलासखानी मनाला इतका भिडला की निखिलदांचा बिलासखानी वेगळा का ह्यावर विचार करावा वाटला आणि चैतन्यनेही बरेच दिवसांपुर्वी निखिलदांवर लिही असं सांगितलं होतं म्हणुन हे इथे पोस्टतोय. यात कुणाशी तुलना करण्याचा हेतु नाही. आणि व्याकरणाबद्दल माफ करा!
ऐकण्यासाठी https://www.youtube.com/watch?v=4eIhzzkXVjs )

निखिलदा आणि बिलासखानी

खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी सतार ऐकली पण नव्हती, फक्त पं. रवी शंकर आणि पं. निखिल बॅनर्जी ही नावे माहित होती, तेव्हा मला कुणीतरी विचारलं होतं की तुला यातलं जास्त कोण आवडतं, तेव्हा मी उगाच निखिल बॅनर्जी असं सांगून टाकलं. मग पुढे कधीतरी रेकॉर्ड्स ऐकायला सुरु केल्या आणि आता तर त्यांचं व्यसनच लागलंय!

त्यानी वाजवलेला कुठला राग जास्त आवडला असं नसतंच काही मुळी, सगळेच राग आवडतात. पण त्यांच्या बिलासखानीने मनावर जी मोहिनी घातली ती कायमचीच! मी पहिल्यांदा बिलासखानी ऐकला तो किशोरीताईंचा. त्यांची "सजनी कवन देस गयो" ही बंदिश अजूनही कानात घुमत राहते! नंतर एकदा निखिलदांचा बिलासखानी ऐकायचा योग आला. माझ्या घरापासून ETH ला जायला बरोब्बर एक तास लागतो आणि निखिलदांचा बिलासखानी बरोब्बर एक तासाचा आहे म्हणून तोच सुरु केला मोबाईलवर!

पहिल्या निषादाबरोबरच समाधी लागली! आह... काय तो निषाद! तोडी सुरु होणार याची नांदी देणारा! म्हणजे रागाचं नाव माहिती नसतं तरी हा निषाद तोडीचा हे लगेच कळावं! एकेक स्वर बिलासखानी उलगडून दाखवत होता. धीरगंभीर आलाप. विरहात चिंब भिजलेला. विरह कशापासून? व्यक्तीपासून, वस्तूपासून, सुखापासून की आत्म्यापासून.....ज्याचं त्यानं ठरवावं! पण विरहाच दु:ख नक्की! आणि हे दु:ख साधं नव्हे बरं, आता इथून पुढे काही नाहीच अशा अल्टीमेट स्वरुपातलं दु:ख.... किशोरीबाई म्हणतात की कला ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये दु:ख सुध्दा सुंदर होऊन येतं! किती खरंय! तिथे त्यावेळी ना मी होतो ना निखिलदां होते ना सतार होती. फक्त बिलासखानी होता भरून राहिलेला!

काय मज्जाय बघा - एकतर बिलासखानी हा महाभयंकर किचकट राग, जरा चुकलं की अगदी भैरवी आणि मुलतानीशी भांडण! त्यात तो राग बिलासखानाने मिया तानसेनच्या मृत्युच्या दु:खात रचला अशी आख्यायिका त्यामुळे त्यात तो दु:खी उदास वगैरे भाव! आणि आपल्या संगीतात श्रुती धरून एकूण २२ स्वर असले तरी त्याचा लगाव वेगळा, म्हणजे मुलातानीचा कोमल रिषभ हा तोडीपेक्षा वेगळा. भूपाचा गंधार हा बिलावलापेक्षा वेगळा. हे सगळं सांगता येतं आणि रीयाजानंतर गळ्यात उतरवताही येतं कदाचित पण हे सतारीवर कसं करायचं? सतारीवर रागानुसार स्वरलगाव कसा करायचा? एकतर कोमल आणि तीव्र स्वरांना मुळात सतारीवर हवा तसा झंकार येत नाही, त्यात या बिलासखानीत तर गंधाराची अतिकोमल श्रुती आणि त्यावर जरा थांबून मग रिषभावर अलगद उतरायचं. मग तो वक्र मध्यम, म-रे ची मींड घ्यायची पण त्यात भैरवी दिसता कामा नये, अमुकवर न्यास नाही आणि तमुक वर गमक नाही, अशी एक ना अनेक बंधनं, हे सगळं राग व्याकरण समजुपर्यंतच मुळात फेफे उडते!आणि ते सतारीवर वाजवायचं हेच दिव्य! आणि मग त्या रागाव्याकरणाबरोबर तो भाव प्रकट करायचा म्हणजे नुसती साधना, रियाज, प्रतिभा असून चालत नाही, त्याच्याही परे अशी काही समज आणि तादात्म्य पावण्याची शक्ती असावी, जी निखिलदांकडे होती !

आणखी एक वैशिष्ट्य असं की वाद्यसंगीतात "झाला" नावाचा एक भयंकर प्रकार असतो. तो सुरु झाला की बरेचसे वादक हे संगीत सोडून कुस्ती खेळू लागतात. "बघा माझी द्रुत लय कशीय, बघा माझा वाद्यावर कसा हात आहे" अशी हिडीस जाहिरातबाजी सुरु होते! मग त्यात रागाचा भाव वगैरे गरीब बिचाऱ्या माधुकऱ्याप्रमाणे कुठेतरी असतात कोपर्यात! पण निखिलदां इथे पुन्हा वेगळे, झाल्यामध्ये कुठे कुस्ती नाही तर भाव उलट सुंदररीत्या intensify केलाय! त्यात आपल्या महाराष्ट्राला अभिषेकीबुवांच्या "घेई छंद मकरंद" मुळे सलग वराली(ळी?) सुंदररीत्या गवसलाय, त्यामुळे इतर कुणाच्या बिलासखानीत सा रे गं प अशी स्वरावली आली की आपल्याला तो आठवतो. ते या बिलासखानीत नाही झालं. बर या राग उलगडण्याच्या प्रक्रियेत कुठे कर्त्याचा भाव नाही. खरं हे वैशिष्ट्यच आहे किशोरीताई आणि निखिलदांचं, मुद्दाम कर्तेपणा नाही. जे येतंय ते साहजिक, उत्स्फूर्त आणि आपोआप! म्हणजे बरीच मंडळी बिलासखानीचे आव्हान स्वीकारून गातात आणि हे दोघे मात्र बिलासखानीला शरण जाऊन गायलेत! रागाप्रती समर्पण भाव!

अर्थात सगळंच सुरळीत सुरु आहे अशातला भाग नाही. बिलासखानीची विलंबित बंदिश सुरु असताना तबलजीने मध्येच झटका आल्यासारख धुडगूस घातलाय. इतक्या तरल कोमल भावाला असे तडे गेलेलं मला तरी आवडलं नाही बुवा! म्हणजे असे राग सुरु असताना तबलजीने जरा sublime रोल घ्यायला काय हरकत आहे? जिथे तिथे लयीचे वर्चस्व किंवा "मै भी हुं" हे कशाला दाखवायचं? त्यासाठी कलावती, सोहनी, अडाणा, शुद्ध सारंग वगैरे आहेत की! पण बिलासखानीला हे सोसणारं नव्हे!

पु. लं. नी म्हणून ठेवलय की सतार गायली पाहिजे. निखिलदांची सतार गाते, तिथे गायकी अंग वगैरे असं ढोंग नाही, तर ती खरंच गाते. ढोंग अशासाठी म्हटलं कारण बऱ्याचदा गायकी अंगवाले खर्ज, क्रीन्तन वापरत नाहीत आणि तंतकारीवाले गायचा प्रयत्न करत नाहीत, आणि हे सर्व आपापले घराणे, खानदान जपण्यासाठी म्हणे. कधीकधी वाईट वाटतं की रवी शंकर आणि विलायत खानांच्या जमान्यात निखिलदांना जी प्रसिद्धी मिळायला हवी होती ती नाही मिळाली. पण ते प्रसिद्धीसाठी आणि घराण्याच्या वृथा अभिमानासाठी गायिले नाहीत तर साधना म्हणून गायिले त्यामुळेच तो राग बिलासखानी सचेतन प्रकट झाला असेल का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Awadala.

मस्त लिहिलंयस रे! काही काही तांत्रिक गोष्टी वाचताना तरी डोक्यावरून गेल्या, ऐकताना समजतायत का बघायला पाहिजे. त्यानिमित्ताने तुझ्या दृष्टिकोनातून निखिलजींचा बिलासखानी ऐकला जाईल.

एकदम झकास, पुढील मेजवान्यांच्या प्रतिक्षेत. ऐकण्याच्या पटीत लिहिण्याचीही फ्रिक्वेन्सी वाढव Happy

ललिता-प्रीतिजी धन्यवाद! Happy

सई थांकू! Happy अगं ऐकताना असं येत डोक्यात पण नंतर लिहायचं लक्ष्यात राहत नाही आणि भिती पण वाटते लिहायची असं थोरांच्या गाण्याविषयी Sad !

खुप सुंदर लिहिले आहेस.. त्यांच्यापेक्षा तूझ्याकडून तो ऐकायची जास्त तीव्र मनीषा आहे.
हा राग माझ्याही आवडीचा. इतर वाद्यांवर कधी ऐकला नाही पण पं मालिनी राजूरकर यांच्याकडून " अब मोरे कांता " प्रत्यक्ष ऐकलेय, त्याचे गारूड अजून ( १४ वर्षे झाली ) उतरले नाही.
लता ( दिया ना बुझे री ) आणि आशा ( झूठे नैना बोले ) या तर कायम छळत असतात. हे सगळे विसरून तो इतर कुणाकडून ऐकायचा.. तर तूझ्याकडूनच ऐकेन !

त्यांच्यापेक्षा तूझ्याकडून तो ऐकायची जास्त तीव्र मनीषा आहे >>>>> दिनेश जेव्हा मला जरासा देखील गवसेल ना, बिलासखानीच नव्हे, तर कोणताही एखादा राग तेव्हा नक्की हक्काने ऐकवेन Happy पण सतारीतली माझी सध्याची प्रगती (?) पाहता तो योग काय लवकर येईल असं वाटत नाही Sad
पण तु निखिलदांचा बिलासखानी ऐक रे बाबा. आणि अगदी प्रेमाने ऐक. एकेक स्वर अगदी. ही गोष्ट मिस नको करु! फार सुंदर आहे रे! कसं सांगु?

कौतुकाचं, आनंद मिळाल्याबद्दलचंच लिहायचं असतं शेवटी, मग घाबरनेका नै.. लिखने का Happy
छान लिहितोस तू. आणि अशा प्रकारचं रसग्रहणात्मक लिहिणं चेष्टा नाही. ऐकण्यासोबत अनायासे लेखनही साधतंय तर कर ना. आम्हाला लाभ मिळू दे.

सई, अगं नाही आता भारतात आलो की घेणार एक सतार विकत (हवी तशी मिळाली तर नशीब!), मिरजेत बनवतात पण फार जडशीळ असते त्यांची सतार. मुंबईतच घेईन बहुतेक! अगं पुण्यात येणार कारण माझे गुरु पुण्यात आहेत. ते स्वतः इंजिनिअर होते आणि ३० वर्षे अन्नपुर्णा देवींकडे शिकलेत.
नक्की लिहितो सई Happy

मोठे गायक कलाकार कितीही नम्र असले आणि श्रोत्यांशी संवाद साधण्यात त्यांना कमीपणा वाटत नसला तरी त्यांच्या नावाचे दडपण असतेच ना ? ते तुझ्याबाबतीत कधीच जाणवणार नाही Happy
तूझ्या तळमळीचे कौतुक करावे तेवढे थोडेच.. आणि काही ऐकवायला फार वाट बघायला लावणार नाहीस, याची खात्री आहे.

थांकु अरे Happy जरा हुरुप येतो असं आपल्या माणसांनी विश्वास ठेवला की! Happy बघ तुझी कमेंट वाचुन आज काफीतली गत लवकर शिकलो Wink

surekh olakh nikhil dan chya bilaskhani chi.. nikhil dan chaa kirwani sudhaa asach aahe..

खूप दिवसांनी अस मन शांत करणार काही ऐकल.

तसा मी काही फार मोठा कानसेन नाही पण ऐकायला आवडत. शास्त्रीय संगीताच्या बाबत काहीसा औरंगजेबच असलेल्या मित्राला हे सूर ऐकून तुला काय वाटत ? ते सांग अस म्हटल तर थोडावेळ आलाप ऐकून म्हणाला ...
" सूर्योदयाची वेळ झाल्यासारख वाटतय ! "

.... निखीलदा __/\__

श्रीयुजी खरय तुम्ही म्हणता ते. निखिलदांच्या प्रत्येक रागाबद्दल असच होत. Happy

श्रीकांतजी, तुमच्या प्रतिसाद वाचल्यावर अगदी "याचिसाठी केला होता अट्टाहास" असं वाटलं. आणि तुमचा मित्र काय म्हणाला ते ऐकुन तर अगदी आनंदच झाला. हे त्याला विचारुन तुम्ही खरं एक मोठ्ठं काम केलंय. मी स्वतः कितीतरी जणांशी याविषयावर बोललोय की रागाना वेळ-काळ आहे! उगीचच शेंडा ना बुडका अस नाहीय ते! तोडी हा सकाळचाच राग आहे आणि कानडा हा रात्रीचाच! तुमच्या मित्राच्या वक्तव्यामुळे हे परत सिद्ध झाले! आणि ते यासाठी महत्वाचं कारण तो संगीताच्या बाबतीत औरंगजेब होता, म्हणजेच त्याच्यावर ह्या संगीताचे संस्कार नव्हते आणि तरी त्याला हा राग सुर्योदयाचा वाटला यातच सारं काही आलं! Happy

कुलु, रागांची काळवेळ, ऋतू या सर्वांचे आपल्या भारतीयत्वाशी नाते आहे. एकदा मल्हाराचा एक प्रकार माझ्या झांबियन मित्राला ऐकवला होता. त्याला तो आवडला ही. पण पावसाची वाट बघणे, तो आल्यावर आनंद होणे या भावना त्याला समजू शकल्या नाहीत. त्यांच्याकडची बहुतेक शेती नदीच्या पाण्यावरच होते. पावसाचा खास वेगळा काळ नसतो.

दिनेश हो ते खरय. म्हणजे तो राग; संगीत म्हणुन आवडतो. पण राग म्हणुन कळायला त्या वातावरणात वाढणे आणि मनाची संवेदनशीलता हे दोन्ही गरजेचे आहे! मल्हारातला आनंद जाणण्याआधी पावसाळा अनुभवायला हवाच! Happy कधी कधी मात्र त्या जाणिवा आपण बरोबरच घेऊन फिरतो. परवा इथे पाऊस पडत होता (नेहमीसारखा) तर अगदी अचानक मी मनातल्या मनात किशोरीताईंची मीरामल्हार मधली बंदिश गुणगुणत होतो. ते "तुम घन से घनश्याम". बर्याच वेळाने लक्ष्यात आले की आपण हे गुणगुणतोय! Happy जाता जाता.... ते ऐकल नसशील तर नक्की ऐक. सुंदरच आहे! Happy

स्वाती२जी धन्यवाद! Happy

कुलू:
एक विनंती श्रीयुजी खरच नका म्हणू.. Happy श्रीयूच ठीक आहे. कीवा श्रीरंग म्हणा.. Happy
अवांतरः माझे काका उस्ताद अब्दूल हलीम जाफर खान साहेबांचे भक्त. काही काळ त्यांच्या कडून धडे ही गिरवलेत. तर त्यांची सतार स्वतः हलीम जाफर खान साहेबांनी प्रेमाने खुलवून दीलीय..
(म्हणजे दीड एक वर्ष ती सतार साहेबांकडेच होती. मग त्यांनी काकाला दीली)
आहा काय सतार आहे... लागली की घर भारुन जातं.. स्वर्गिय..
मिरजेची आहे ती सतार...
Happy

http://www.itcsra.org/sra_others_samay_index.html इथे या संकेतस्थळावर समयानुसार रागांच वर्गीकरण आहे. (स्क्रोल डाउन केल्यावर समयचक्र दिसते) त्या त्या रागाच्या नावाला क्लिक केल की अनेक दिग्गज कलाकारांच त्या त्या रागाच वादन वा गायन ऐकता येत. आय टी सी संगीत अकादमी च हे एक चांगल संकेतस्थळ आहे. शास्त्रीय संगीत आवडणारांसाठी तर खजिनाच. या संस्थेत गुरुकुल पध्दतीने अनेक उत्तमोत्तम कलाकार घडवले जात आहेत. स्व.यशवंत बुवा जोशींचे शिष्य डॉ. राम देशपांडे हे मी अगदी जवळून अनुभवलेल उदाहरण. एक कलाकार असा घडत असतांना बघण हा फारच आनंददायी अनुभव मी घेतलाय.

>>> हे सगळं सांगता येतं आणि रीयाजानंतर गळ्यात उतरवताही येतं कदाचित पण हे सतारीवर कसं करायचं?
>>जिथे तिथे लयीचे वर्चस्व किंवा "मै भी हुं" हे कशाला दाखवायचं?

फार सुंदर लिहिलंयस रे ! तुला लिहायचा आग्रह केला आणि वाचायला मलाच उशीर झाला बघ.
पण सार्थक झालं आजच्या दिवसाचं.
हापिसातून ऐकू नाही शकत पण घरी गेलो की ऐकेन नक्की.

दिनेशदा म्हणालेत तसे, तुझ्याकडून ऐकायचंय आता.
काफीतली गत ऐकव... चालेल Happy बिलासखानीला वेळ लागेलच.

श्रीजी धन्यवाद! Happy

चैतन्य धन्स रे Happy तरी मी विचार करत होतो कि अजुन चैतन्य कस काय नाही बोलला काही, तुला मग ह्या धाग्याची लिंक पाठवायचा विचार करत होतो. काफीतली एकच गत रे, फार विशेष नाहीय! चांगला वाजवता येईल त्यादिवशी नक्की ऐकवेन! Happy

छान ! मी निखील जीं चा जबरदस्त चाहता आहे .. आमिर खान साहेबांवर लिहिल्यानंतर मी एकदा निखीलदांवर सविस्तर पणे लिहिणार होतो. पण मला टायपिंग चा भयानक कंटाळा. बर्याच दिवसांनी मायबोली वर आलो; निखीलदांशी संबंधित लेख दिसला बरं वाटल. निखीलदांवर बोलायला लागलो म्हणजे वेळ पुरायचा नाही . असंच झालं. काय लिहू आणि काय नको करत सोडून दिला होता तो लेख.

त्यांचे तीन चार बिलासखानी उपलब्ध आहेत. बडोद्याचा, रेडिओ वरचा एक (Fond Memories vol. 5) आणि मुंबै ला १९६५ साली जोगिया कलिंगडा च्या आधी वाजवलेला - त्यात फक्त आलाप जोड आहे. सुरेख आहेत. चिक्कार वेळा ऐकून झालेत. तरीही ऐकावे वाटतात.. बडोद्याच्या आणि रेडिओ वरच्या बिलासखानी मध्ये वाजवण्याच्या शैलीत सुद्धा थोडा फरक आहे. बरेच राग आहेत त्यांचे तसे . असो.. तुम्ही सांगितलेला बडोद्याचा आहे. तो दीड तासाचा performance आहे. रेडिओ वाला इथे आहे . आधी ऐकला नसल्यास, मी लिंक पोस्ट करतोय. https://www.youtube.com/watch?v=WKHRSoXJ_5w.

"बघा माझी द्रुत लय कशीय, बघा माझा वाद्यावर कसा हात आहे" >> अगदी कबूल ! हे तर हल्ली बर्याचश्या वाद्यवादकांच झालंय. गाणार्यांच ही तसंच. लोक राग गात वाजवत नाहीत. फक्त इतकाच विचार करतात कि लोकांचं मनोरंजन झालं म्हणजे बास. रागविचार आणि राग-अनुभूती फारशी येत नाहॆच. आजकाल योग्य ठिकाणी 'क्याबात है!' म्हणून दाद देणार्यांपेक्षा, काहीतरी करामती करून दाखवल्या की टाळ्यांचा पाउस पाडणारी पब्लिक वाढलीय... जाउदे ..

मी त्यांचा मारू बिहाग ऐकेन आता, radio वाला. स्वरलगाव म्हणजे काय असतं ते कळत त्यात.

Pages