ज्ञानेश्वरांच्या चरित्रविषयक मतभेद

Submitted by मी मी on 29 November, 2014 - 12:20

संतसाहित्य वाचत आहे सध्या. आपल्याच संस्कृती बद्दल बऱ्याच गोष्टी नव्याने कळत आहेत विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांबद्दल वाचतांना विश्वास बसू नये अश्या काही बाबी वाचनात आल्यात. त्यांच्या ज्ञानेश्वरी बद्दलही अनेक वादंग आहेत त्यावर सांगोपांग चर्चा झाल्या आहेत आणि संशोधन सुद्धा सुरु आहे. काही शंका आणि तर्कांचे प्रमाण मिळालेत काहींचे नाही पण धूर उठलाय तर कुठेतरी काहीतरी आहे हे नक्की … त्यातले काही मुद्दे खाली मांडते … जाणकारांनी कृपया माहिती द्यावी.
१) ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंडाचे कर्तृत्व आणि गुणं ज्या पद्धतीने प्रसिद्धीस आले ते पाहता हा कल्पनाविलास असावा असा अंदाज बोलला जात आहे. त्यांचे वडील विठ्ठलपंत यांचे भक्तिमार्ग आणि वैराग्यकाळ बघता त्यांना बरच ज्ञान प्राप्त झालं असावं आणि 'ज्ञानेश्वरी' हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ असावा आणि ज्ञानेश्वर हे त्यातले एक चरित्रात्मक पात्र असावं …. असा एक तर्क संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांमध्ये बोलला जात आहे. इतर संतांच्या अभंगांमध्ये एक दोन संशयित ओव्या आहेत त्याचे पुरावे मात्र सढळ असे नाहीत.
२) ज्ञानेश्वरी लिहिणारे आपेगावचे ज्ञानदेव वेगळे आणि भक्तीमार्गी चौदाव्या शतकातील आळंदीचे ज्ञानदेव वेगळे असावे या दोघांनी लिहिलेले साहित्य भिन्न आहेत … हा तर्क वेगवेगळ्या साहित्याची शैली, शब्दांची ढब भिन्न असल्याने मांडला गेला आहे.
३) निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता हि सन्यासांची नावे वाटतात किंवा वैराग्य स्वीकारल्या नंतरची नावे वाटतात म्हणजे मग त्यांची जन्मानंतरची खरी नावे वेगळी असावी असाही एक तर्क बोलल्या गेला.
४) ज्ञानदेवादी भावंडांच्या जन्माकाळाबद्दल देखील वादंग आहे. नैतिक मार्गाचा अवलंब करून सामाजिक कार्य करू शकत असतांना देखील त्यांनी आयुष्याच्या केवळ एकेविसाव्या वर्षी संजीवनी समाधी का घ्यावी ? हा आणखी एक भेडसावणारा प्रश्न आहे.
यातील किती प्रश्नांची उत्तर मिळतील माहिती नाही मात्र हे ऐकून जिज्ञासा जागृत झाली आहे. याबद्दल कोणतीही माहिती मिळणार असेल किंवा वैचारिक चर्चा संभाव असेल तर नक्की करावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लिहिलेलं 'नाथ संप्रदायाचा इतिहास' हे पुस्तक कृपया वाचावे.
http://kharedi.maayboli.com/shop/Naatha-Sampradayacha-Itihas.html

मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहे.

Thnx चिनुक्स ...पुस्तकं वाचतेय मी … ग्रंथालयात मिळालीत बरीच पुस्तकं पण मला इथे चर्चा हवीय … लेखकांच्या नजरेतून नव्हे आपल्या माहितीतून निर्माण होणारी वैचारिक चर्चा

ईंटरेस्टींग, हे मी पहिल्यांदाच ऐकतोय.
अर्थात रेड्याचे तोंडून वेद वदवणे वा भिंत चालवणे असले चमत्कार जेव्हा संतांच्या नावावर सांगितले जातात, अगदी आजही, तेव्हा थोडेसे वाईटच वाटते. अर्थात हे वाईट वाटणे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा अभिमान असण्यातूनच येते.
असो, आपण तरी आपल्या वाचनाच्या आणि अभ्यासाच्या आधारे लिहा इथे.

इतिहासातील प्रत्येक व्यक्ती आणि घटना यांचे पुरावे मिळतीलच असे नाही. प्रत्येक गोष्ट सिद्ध करून दाखवा किंवा पुरावे द्या ,अन्यथा आम्ही सांगू तो (विकॄत ) इतिहास मान्य करा, असे हल्लीच्या ब्रिगेडी (कथित) विचारजंतांचे म्हणणे असते. तेच मग अशा शंका- कुशंका काढून सूर्यावर थुन्कण्याचे उद्योग करत असतात .

मयी जी आपला चर्चा घडवण्याचा उद्देश चांगला असेल , पण अशा शंका आणि संशय नक्की कोणी आणि कशासाठी घेतले आहेत ,हे पहाणे सर्वप्रथम महत्त्वाचे आहे .नाहीतरी वारकरी सम्प्रदायातील संत ज्ञानदेवांचे महात्व / योगदान (ब्राह्मण असल्याने) कमी लेखून तुकारामादि इतर (ब्राह्मणेतर) संताना पुढे करायचे आणि वारकरी सम्प्रदायात फूट पाडून हिन्दू धर्मापासून वारकर्याना दूर न्यायचे कुटिल कारस्थान बिग्रेडी मंडळीचे आहे ,हे ही ध्यानात घ्यावे !

सर्वप्रथम शंका उठल्या आहेत म्हणजे कुठेतरी कोणीतरी वाईट हेतूनेच हे करतोय असा संशय आपण तरी का घ्यावा ?? आणि त्यातून जे काही बाहेर येणार आहे ते आपल्या विरुद्ध आणि चुकीचेच असणार आहे असे का समजावे ?? सतत अस घाबरून राहायचे असेल तर कशाला करावा अभ्यास, का होऊ द्यावीत संशोधनं … आहे तस्स आणि त्यातच समाधान मानून बसावे न गप्प.

ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर आणि विराण्या लिहिणारे ज्ञानेश्वर वेगवेगळे हा प्रवाद पूर्वी वाचनात आला होता.

ज्ञानेश्वर महाराज कुणी एका जाती धर्माचे पाईक नव्हते. त्याचं कार्य हे याउपर आहे. सावता माळी, नरहरी सोनार, चोखामेळा महार, गोरा कुंभार, वामन भट अश्या सर्वच जाती धर्मांना वारकरी पंथ सुरु करून देऊन भक्तिमार्ग दाखवणारे संपूर्ण महाराष्ट्राचे संत होते आणि मराठीचे आद्य वांग्मय निर्माता होते. हे कोणीच नाकारू शकत नाही.

ज्ञानेश्वरी हि विठ्ठलपंतांनी लिहिलेली असावी आणि ज्ञानदेव हे त्यातले एक पात्र असावे असा वादंग १९६० पासून चालू आहे. आपल्या वाचनात आला नाही म्हणजे तसकाही नाहीचेय असा अर्थ कसा काढायचा? ज्ञानेश्वर महाराज हि ऐतिहासिक व्यक्ती नसून वाड्मयीन व्यक्ती असावी हे सिद्ध झालं नाहीये पण अश्या चर्चा उठल्या आहेत आणि त्यावर वाद विवाद, चर्चा, संवाद, संशोधन देखील झाले आहे त्याचे परिणाम स्पष्ट समजले नाहीये म्हणून अजूनही हे वादंग पूर्णपणे शमले अस म्हणता येत नाही.

सर्वप्रथम हा सिद्धांत लिखित स्वरूपात जानेवारी १९६० मध्ये प्रकाशित प्रतिष्ठान या मासिकात डॉ. मा. गो. देशमुख ह्यांनी मांडला. त्यांनी दिलेले पुरावे सबळ परिस्थितीला उलथवून टाकण्या इतके बलिष्ठ नव्हते परंतु परंपरेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना हलवून गेले आणि विचार करायला भाग पाडले.
तरुण भारत ४/१/१९६० आणि ५/३/१९६१ मध्ये प्रकाशित ज्ञानेश्वरांच्या चारीत्रासंबंधीचे तर्कवितर्क हे लेख विशेष वाचनीय आहेत.

ज्ञानेश्वरांची समाधी आहे हे अक्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे म्हणूनच इथेच 'ज्ञानेश्वर एक होते कि दोन' हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. 'ज्ञानेश्वरी' आणि 'अमृतानुभव' ग्रंथाची लिखाणशैली, बोल, शब्दाची ढब भिन्न आणि इतर अनेक ज्ञानदेवांच्या नावावर असलेल्या ग्रंथांची, अभंगांची शैली त्यातील सृष्टी भिन्न असल्याचे जाणकारांना संशोधकांना आढळले आहे. ज्ञानेश्वरीकर्ते ज्ञानदेव हे आपेगावचे असून ते नागपंथी हठयोगी, बाराव्या शतकातले, अद्वैतवादी, निर्गुनोपासक होते हे त्यांच्या लिखाणातून अनुभवास येते तर दुसर्या ज्ञानदेवांच्या ग्रंथांमधून निदर्शनात आलेले ज्ञानदेव चौदाव्या शतकातील, वैष्णवपंथी, भक्तीमार्गी, द्वैतवादी, सागुनोपासक असल्याचे दिसते. नामदेव हे आद्य ज्ञानदेवांच्या समकालीन नव्हते असा सिद्धांत भारद्वाजांनी लेखमालेतून मांडण्यात आला होता.

ज्ञानदेव विषयक अनेक वादांचे मूलस्थान ठरलेली लेखमाला शि. ए. भारदे बुवा आणि भारद्वाज यांनी १८८९ ते १८९९ साली प्रथम सुधारक पत्रातून लिहिली. ते सर्व लेख १९३१ ला प्रकाशित 'ज्ञानदेव ज्ञानेश्वर' या त्यांच्या ग्रंथात समाविष्ट झाली आहेत. वरील सिद्धांत इतर संत, उपासक आणि अभ्यासकांना पटला नसला तरी तो सिद्धांत इतका अभ्यासपूर्ण होता कि पूर्णपणे समर्पकरीत्या खोडून देखील काढता आला नाही.

निवृत्तीनाथ हे नाव नाथपंथाचे गुरु गोरक्षणनाथ यांची भेट झाल्यानंतर जेव्हा निवृत्तीनाथ ह्यांनी त्यांचा अनुग्रह स्वीकारला त्यानंतर ठेवण्यात आलेले नाव असावे असा तर्क आहे. निवृत्तीनंतर इतर भावडांनी हा अनुग्रह स्वीकारला … निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताई या नावांमध्ये आत्मिक विकास आहे. तेव्हा हि नावं आयुष्याचे अनुभव घेतल्यानंतर एकेकाचे गुण जाणून मग ठेवली आहेत असं जाणवतं हा संशय सर्वप्रथम भारद्वाजांनी मांडला. गो. का. चांदोरकर ह्यांनी पत्र केसरी ह्यात १८/११/१९१३ साली भाषांतर करून सिद्धांत मांडून मूळ नाव 'विद्याधर' असल्याचे म्हंटले आहे. पाठोपाठ निवृत्ती ह्यांचे नाव गणेश, सोपानचे चक्रधर आणि मुक्तीचे मदालसा अशी नावे होतीत.

भिंगारकर, रानडे, बारटक्के ह्यांनी ह्या सिद्धांताचे खंडन केले आहेत परंतु अनेक अभ्यासकांनी ते मान्य देखील केले आहे.

असले वाद उठले की मला नेहमी काही प्रश्न पडतात. वरचा वाद वाचुनही ते पडले नेहमीसारखे....

१. ज्ञानेश्वर मह्त्वाचे की ज्ञानेश्वरी?

२. ज्ञानेश्वर नक्की होते का किंवा ज्ञानेश्वरी कोणी लिहिली किंवा ती ज्ञानेश्वरांनी लिहिलिच नाही याचा शोध लावल्याने ज्ञानेश्वरीचे महत्व कमी किंवा जास्त होणार आहे का?

३. ज्या समाजाला ज्ञानेश्वरीत जे काय लिहिलेय ते वाचुन आचरणात आणता आले नाही ते आता अचानक त्यासंबंधाने नविन माहिती मिळाल्याने आचरणात आणायला जमणार आहे का?

या प्रश्नांची उत्तरे कोणी देईल का?

या असल्या वादांकडे पाहायचा माझा दृष्टीकोण हा आहे की 'आम खाओ, पेड मत गिनो.' ज्यांना पेड गिनन्यातच इतीकर्तव्यता वाट्तेय त्यांनी चालुद्या.

आता मुद्दा असा कि १९६० साली ब्रिगेडी फुगेडी, भट्ट सैनिकी हा विवाद नव्हता फोफावला तेवढा. संशोधनपर अभ्यासक अभ्यासासाठी संशोधन करायचे. प्रत्येकवेळी रस्ताछाप धार्मिक दंगे करणारेच लोकं खोड्या काढतात असे आपण समजणे हा आपल्या अज्ञानाचा भाग आहे…. कारण एवढ्या दर्जेदार तात्विक तर्क करणं या रस्तेछाप लोकांना जमणे नाही. …. आणखी एक यातून जे काही बाहेर येईल ते सत्य असेल. आणि सत्य नेहेमीच वाईट नसतं. दुसरे लगेच आपल्या धार्मिक स्थळांना तडा जाइल, संस्कृती बाटेल वगैरे अशी भीती बाळगू नका शेकडो हजार वर्षांचा इतिहासातून तावून सुलाखून निघालेली आपली संस्कृती खूप आत आत रुजलीय आता तकलादू नाहीये ती उपटून टाकण्याची ताकद अजून कोणत्या मायकालाल मध्ये नाहीये.… विश्वास बाळगा

इथे मुद्दे काहीही खोडून काढायला किंवा रुजू करायला मांडले नाहीयेत. अजून काही नवीन माहिती मिळू शकेल काय किंवा काही सांगोपांग चर्चा होईल या उद्देशाने मांडले आहे. अभ्यास व्हावा. नॉलेज वाढावे एवढेच

साधना, प्रचंड अनुमोदन. स्वतः अभ्यास करून कही मते मांडली असती तर वाचायला आवडले असते, ते सोडून इकड तिकडची चार पुस्तके वाचायची आणि लगेच "असा अंदाज बोलला जात आहे" आणि "अशी चर्चा केली जात आहे" टाईप वाक्ये फेकायची.

तुकारामांच्या गाथेसंदर्भात नुकतेच मुरली खैरनार यांचे छोटेसे फेसबूक स्टेटस वाचले, जास्तीत जास्त माहिती अचूक देण्याचा प्रयत्न करत त्यांनी मुद्दा मांडलेला होता. मुद्दा विवाद्य असू शकतो, पण त्यासाठी किमान तेवढी माहितीतरी असायला हवी.

दुसरे एक उदाहरण, चिन्मय दामलेंच्या लेखांचे. त्याचीही काही मते वेगवेगळी असू शकतात्,पण ती मते मांडण्यासाठी तो जो काय अभ्यास करतो तो थक्क करणारा आहे. हे वरचा लेख म्हणजे विनाकारण सनसनाटी पुस्तके वाचून उगाच्च चर्चा केल्याचा आव आणत ज्ञानेश्वर काय सामान्य चीज होती हे दाखवायचा क्षीण प्रयत्न आहे. शशांक यांनी ज्ञानेश्वरीवर लेखमाला चालू केली आहे, ती किमान वाचून बघायला प्प्रय्त्न करा.

साधना तुमचे मुद्दे मान्य. मुळात ज्ञानेश्वरी अंगी उतरवण्यासाठी ती वाचावी लागते …. त्याचे महत्व कळायला सुद्धा ती वाचावी लागते. मला काय वाटत माहिती काही चांगल्या गोष्टी जाणून घ्यायला/घडायला काही प्रश्न उपस्थित करणं आवश्यक असतं …वरील पोस्ट मधले प्रश्न उपस्थित केल्याने माझ्या बाबतीत अनेक चांगल्या गोष्टी घडल्या ते उपस्थित झाले नसते तर मी अनेक गोष्टींना मुकले असते … ते कसं बघा
१. मुळात मी ज्ञानेश्वरांबद्दल आयुष्यात फार काही वाचले नाहीये. मोठ्यांच्या, गुरुवर्यांच्या बोलण्यातून जेवढे ज्ञान होते तेवढेच होते. पहिल्या प्रथम माझ्या हातात लेख आला तो ह्या शंका उपस्थित करणारा… माझी जिज्ञासा वाढली आणि कधी नव्हे ते मी ज्ञानेश्वरांना आज वाचतेय, समजून घेतेय.धर्म, अध्यात्म, संस्कृती बद्दलची वरवरची तकलादू माहिती पुसली जाउन आपल्या उच्च तात्त्विक बाबी मला या निमित्त्याने कळतात आहेत.

२. मी इथे हे मुद्दे मांडल्यानंतर देखील इथून जी माहिती मिळतेय ती किंवा इथे उत्तर द्यायला म्हणून मला जी माहिती गोळा करावी लागली त्यातून माझं ज्ञान वाढलंच आहे. आणि मला खात्री आहे इथली माहिती वाचून बर्याच जणांना बरीच नवीन माहिती मिळाली असेल काहींना ज्ञानेश्वरी साहित्य वाचावे अशी इच्छा देखील प्रबळ झाली असणार.

३. तिसरा आणि महत्वाचा मुद्दा … मी काहीही खोडून काढायला किंवा रुजू करायला आले नाहीये. मी फक्त माझी जिज्ञासा शमवते आहे. जिज्ञासा शामाव्तांना येणारे मुद्दे याच बाजूचे असावे किंवा त्याच बाजूचे असावे असा माझा आग्रह देखील नाहीये…. कुठलेही का असेना ज्ञान वाढव्नारेच असतील अस माझ ठाम मत आहे.

४. या पोस्टवर पुस्तकांची नावे येताहेत. काही माहिती जी आपल्याला कधी माहितीच नव्हती अशी माहिती मिळतेय. ती माझ्यासकट आज नाहीतर उद्या कुठल्यातरी कामाला येईल… कदाचित

हे वरचा लेख म्हणजे विनाकारण सनसनाटी पुस्तके वाचून उगाच्च चर्चा केल्याचा आव आणत ज्ञानेश्वर काय सामान्य चीज होती हे दाखवायचा क्षीण प्रयत्न आहे.>>>>>>>>>>>>>>>> मी कसलाही प्रयत्न केला नाहीये मी निव्वळ अभ्यासात्मक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करते आहे. आणि ज्ञानेश्वर काय सामान्य चीज होती असा अविर्भाव कुठे दिसला तुम्हाला ?? ज्ञानेश्वर किती महान आहेत हे मुद्दे सुद्धा लिहिले आहेत ते वाचले नाहीत आणि आलात तोंड उचलून बोलायला … एवढच तुम्ही जनता महाराजांना तर मुद्द्यांवर बोला चर्चा करा. अभ्यासात्मक चर्चा तुमच्या बाजूने होऊ द्या मी सुद्धा करेन. तुम्हाला चर्चा विषयावर नाही कुण्या तरी व्यक्तीवर करायचीय … सनसनाटी कॉमेंट तुम्ही मारताय … मी फक्त चर्चा करतेय.

नैतिक मार्गाचा अवलंब करून सामाजिक कार्य करू शकत असतांना देखील त्यांनी आयुष्याच्या केवळ एकेविसाव्या वर्षी संजीवनी समाधी का घ्यावी ?>>>>>>
याचे उत्तर त्यांनीच दिलेले आहे..
पुरे पुरे आता प्रपंच पाहणे
निजानंदी राहणे स्वरुपी वो माये...

साधनाच्या संपुर्ण पोस्टला अनुमोदन.

महत्वाच हे सांगायचं आहे कि मी लेखमाला काही पुस्तकं वाचते आहे ज्ञानदेवांसंबंधित… त्यांच्या थोरवी वाचल्या तेव्हा त्या चुकीच्या आहेत अशी शंका निर्माण झालीच नाही ते सर्व तंतोतंत सत्य आहे असा ठाम विश्वास होता … आजही आहे …. दुसरी बाजू वाचली तेव्हा तुम्हा सर्वांसार्खेच माझ्या मनातही काहूर माजले. मग मी या शंका कुठे निवळायच्या … इथे फार अभ्यासू आणि जाणकार लोकं आहेत हे माहिती आहे म्हणून हे मुद्दे जसे कळले तसे इथे मांडले. आता इथे हे खोटे आहे हे खोडून काढले तरी मान्य आहेच …. मी काही हे मुद्देच खरे आहे असे सिद्ध करायला उतरले नाहीये माझी तेवढी पोच सुद्धा नाहीये … मी एक अभ्यासक आहे आणि अभ्यासात्मक मुद्दे कुठल्याही बाजूचे असले तरी ते अभ्यासकच असणार आहे … बशर्ते उगाच विषय भरकटनाऱ्या फालतू प्रतिक्रिया दिल्या नाहीत तर.

ज्ञानेश्वरी हि विठ्ठलपंतांनी लिहिलेली असावी आणि ज्ञानदेव हे त्यातले एक पात्र असावे असा वादंग १९६० पासून चालू आहे. आपल्या वाचनात आला नाही म्हणजे तसकाही नाहीचेय असा अर्थ कसा काढायचा? ज्ञानेश्वर महाराज हि ऐतिहासिक व्यक्ती नसून वाड्मयीन व्यक्ती असावी हे सिद्ध झालं नाहीये पण अश्या चर्चा उठल्या आहेत >>>> हे विठ्ठलपंत तरी अस्तित्वात होते का? Sad Uhoh

हे विठ्ठलपंत तरी अस्तित्वात होते का? >> तू अभ्यासक आहेस का? तू पुस्तकं वाचलीस का? तू संतसाहित्य वाचलंस का? तुला उच्च तात्विक बाबी माहित आहेत का? तुला अभ्यासात्मक चर्चा करता येते का?

मग कशाला तोंड उचलून बोलतेस? सनसनाटी कमेंट करतेस? कशाला विषय भरकटवणार्‍य फालतू प्रतिक्रिया देतेस?

संतसाहित्य वाचून अणि समजून वगैरे घेणार्‍या धागाकर्तीच्या वरच्या काही प्रतिक्रियांमध्ये दिसलेले आक्रस्ताळे रूप फार सुंदर आहे.

कीप इट अप!!!

नंदिनी, <<स्वतः अभ्यास करून कही मते मांडली असती तर वाचायला आवडले असते>> अनुमोदन. हे पटलं. आणि म्हणूनच मी इथे काही लिहिण्यात फारसा रस घेतला नाही.
पण << विनाकारण सनसनाटी पुस्तके वाचून उगाच्च चर्चा केल्याचा आव आणत ज्ञानेश्वर काय सामान्य चीज होती हे दाखवायचा क्षीण प्रयत्न आहे>> हे पटलं नाही. मला तरी असं वाटत नाहीये.

एकेकाळी हे सगळे वाद खूप जोमाने साहित्यक्षेत्री चालू होते (त्याचेच पडसाद म्हणून पुलंनी गाळीव इतिहासात 'ज्ञानेश्वरच आता एक की दोन' अशा वादाचा उल्लेख केला आहे) आणि उगाच सनसनाटी म्हणून उकरून काढले होते असे सगळ्या लेखांबाबत सरसकट म्हणू शकत नाही. आता बहुतेक सगळे वाद विस्मृतीत गेले. कारण ते आता कालबाह्य आहेत किंवा ज्ञानेश्वरी समजून घेण्याच्या दृष्टीने तितके महत्वाचे मानले जात नाहीत. आणि यापेक्षाही सगळ्यात मोठं कारण म्हणजे पुरेश्या पुराव्यांअभावी हे वाद कधीच निर्णायक स्वरूपात सुटणार नाहीत.

मुळात आपण ज्या व्यक्तींविषयी चर्चा करतो आहोत त्यांच्याविषयी परंपरेने चालत आलेल्या गोष्टी आणि साहित्य सोडलं तर कुठलाही अन्य प्रकारचा ठोस भौतिक पुरावा नाही. समाधी, पैसाचा खांब अशा गोष्टीही परंपरेने चालत आलेल्या माहितीवरच ठरवल्या गेल्या आहेत. इतर भावंडांच्या समाधींविषयीही तसेच आहे.

तेव्हा, मयी - इथे चर्चा उघडून काहीच निष्पन्न होणार नाही. तुमच्या स्वतःकडे काही वेगळी माहिती, असलेल्या माहितीचे वेगळ्या पण तर्कसुसंगत दृष्टीकोनातून नवीन विश्लेषण असं काही असेल तर उपयोग आहे.
मुळात जुन्या वादविवादांमधे ज्यांनी सहभाग घेतला होता तेही संशोधक-अभ्यासक म्हणून एका पातळीवरचे नव्हते. त्यातही हौसे-नवसे-गवसे होतेच. त्यामुळे कुणाचंही संशोधनात्मक लेखन अशा चर्चेसाठी वाचताना मुळात वाचकाला लेखनाचं, त्यात वापरलेल्या संदर्भांचं-पुराव्यांचं, संशोधनाच्या कार्यपद्धतींचं आकलन आणि स्वतंत्र मूल्यमापन करता येत असलं पाहिजे. ही प्राथमिक गरज आहे. तिकडचं इकडे कॉपीपेस्ट करून फायदा नाही.

या चर्चेचे फलित काय हे जाणून घ्यायचे आहे...
वादासाठी मान्य करूया - ज्ञानेश्वर हे एक काल्पनिक पात्र होते आणि सोपान, निवृत्ती आणि मुक्ता हे देखील....ज्ञानेश्वरी विठ्ठलपंतांनी लिहीली किंवा क्ष व्यक्तीने....
पुढे काय....
ही माहीती मिळवून काय करणे अपेक्षीत आहे. ज्ञानेश्वरी वाचणे बंद करणे का वारीला जाणे..काय नक्की
ज्ञानेश्वरी राहू द्या..फक्त पसायदासानाची ओवी अभ्यासाला घ्यायची म्हणली तरी त्यातले खोल अर्थ समजत नाहीत. तर इथे कुणी रचली, कधी रचली, नक्की यांनीच रचली का...कशासाठी प्रश्न पडतात....

आशुचँप, साधना - तुम्ही दोघांनी उपस्थित केलेला 'याचा उपयोग काय' हा प्रश्न सामान्य दृष्टीने मलाही पटतो. पण संस्कृती-इतिहास संशोधनक्षेत्रात हे सगळे वाद-विवाद, संशोधनप्रश्न व्हॅलिड असतात. किंबहुना महत्वाचेही असतात.

फक्त प्रत्येक वेळी त्या सगळ्या चर्चा त्यात्या क्षेत्रातील अभ्यासकांपुरत्याच मर्यादित असतात. संस्कृती-इतिहास याविषयीच्या आपल्या ज्ञानकक्षा रुंदावणार्‍या असतात. पण जे अभ्यासक-संशोधक नाहीत त्यांच्यासाठी महत्वाच्या नसतातच आणि म्हणूनच सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येक वेळा पोचवल्या जात नाहीत. कारण आपल्यासाठी त्याचं फलित काहीही असलं तरी ज्ञानेश्वरांविषयीच्या भावनांमधे, आदरामधे, त्यांच्या आणि ज्ञानेश्वरीच्या आपल्या सांस्कृतिक संचिताच्या महत्वामधे काहीच फरक पडणार नसतो. जेव्हा एखादा निर्णायक शोध सिद्ध होऊन आधीची गृहितके बदलली जातात तेव्हा सर्वांपर्यंत पोचतातच. ज्या वादांना आपल्या सामान्यांलेखी महत्व नाही ते आपल्यापर्यंत पोचत नाहीतच.
तेव्हा तुम्ही म्हणता तसं - या बीबीचं फलित का आणि काय उपयोगाचं - हे खरंच!

अर्थातच - ज्ञानेश्वर हे ऐतिहासिकच व्यक्ती होते आणि काल्पनिक नव्हते हे सर्वमान्य आहे. त्याबद्दल कसलाही संदेह नाही.

भाषेचा गोडवा, अनुभवांची समृद्धी, निरुपणाची खोली इ. पाहू जाता इतक्या वयाच्या मुलाकडून ज्ञानेश्वरीचे लिखाण होईल असे वाटत नाही. मग त्यामुळे त्या लेखकास दिव्यत्व चिकटवत जाणे, त्यांच्या खात्यावर चमत्कार जमा करीत रहाणे अशा बाबी होऊ लागतात.

त्यामुळे ज्ञानेश्वर कोण? एक व्यक्ती की अनेक? अश्या प्रश्नांना 'व्हॅलिडीटी' आहे, असे माझे मत. यातून चमत्कार उणे होऊन शुद्ध तत्वज्ञान व विचारमंथन उरते, व त्याहूनही महत्वाचे म्हणजे ज्याच्या कामाचे क्रेडिट त्याला मिळते. म्हणजे जर क्ष ने क्षएश्वरी लिहिली असेल, तर ती ज्ञच्या नावे खपवली जात नाही, असे काहीसे.

तेव्हा या चर्चेचा उपयोग नक्कीच आहे.

वासुदेव कृष्ण हा एक नसून अनेक व्यक्ती होत्या, वसुदेव ही "डिग्री" वा उपाधी असावी अशा प्रकारचेही वाचनात आलेले आहे..

हा असा प्रश्नच कसा काय उपस्थीत करता? अशा अर्थाचे प्रतिसादांतून विचारणार्‍यांना, 'आमच्या भावना दुखावतात' असा टाहो फोडणार्‍या कर्मठांइतकीच किम्मत देऊन याबद्दल ज्याचेपाशी जी माहिती असेल, ती इथे लिहावी असे सुचवतो.

*

आशूचँप,
काहीही बंद अथवा नव्याने सुरू करण्याची गरज नाहिये. ज्ञानेश्वरीचे वाचन करणे ऐच्छिक आहे. वारीला जाणेही.

पण जाताजाता, 'वारकरी' असा एक नवा कल्ट तयार झालेला असून अनेक ठिकाणी फॅनाटिक वागणूकी "वारकर्‍यांनी" केलेल्या दिसून आलेल्या आहेत, हे नोंदवितो.

प्रश्न इथे उपस्थित करून काय करणार असा आहे....
जर ती खरोखरच क्ष ने लिहीली असती आणि इतक्या शतकांनंतरही अभ्यासक ठामपणे निष्कर्ष काढू शकत नसतील तर माबोवरच्या चर्चेतून तो निघणार आहे का...

माबोवरच्या अभ्यासकांबद्दल फारच विश्वास आहे बुवा तुम्हाला....

आणि इथे कर्मठपणाचा काहीच संबंध नाही. तुमच्या माहीतीसाठी सर्वसामान्य वारकरी कधीच कर्मठ असत नाही. त्याला ना तुमच्या वादाशी देणेघेणे ना कशाशी. वारीत चार पावले चालले की हे असले फुकाचे वाद गळून पडतात.

माबो अथवा इतर अभ्यासकांबद्दल काहीच म्हणणे नाही. असेही काही असू शकते ही उत्सुकता चाळवली गेल्यानंतर कुणाला अधिक अभ्यास करायची स्फूर्ती येऊन नवे काही निष्पन्न होणारच नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

तुमचा प्रतिसाद येताना वर नवा भाग तुमच्यासाठी लिहीत होतो.

इब्लिस, वासुदेव कृष्ण आणि ज्ञानेश्वर यात फरक आहे. कृष्ण ऐतिहासिक व्यक्ती होती याचा कसलाही पुरावा नाही पण ज्ञानेश्वर ऐतिहासिक व्यक्ती होते, त्यांचा कालखंड, त्यांच्या रचना इ. पुराव्याने सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत (भाषिक, साहित्यिक, इ.)

मुळात जेव्हा हे असे वाद निर्माण झाले होते तेव्हाही अतिशय सक्षम संशोधक-अभ्यासक रिंगणात होतेच. शिवाय तेव्हा आजच्या सारख्या ऊठसूट सगळ्यांच्या भावना दुखावल्या जात नसल्याने जर व्यवस्थित पुरावे असतील तर मते, गृहितके, ऐतिहासिक आराखडे बदलताना आजच्याइतकं कठीण जात नसे. पण मुळात या वादांना पुढे नेण्यासाठी लागणारं पुराव्यांचं इंधन अपुरं आहे म्हणून हे वाद मागे पडले.

आणि मयी यांना आधी लिहिल्याप्रमाणे काही वेगळी माहिती, दृष्टीकोन असेल तर तसं लिहावं नाहीतर मग सरळ या वादांचा एक आढावा घेणारा लेख लिहावा. उगाच इथे चर्चा 'उघडून' निष्पन्न काहीच होणार नाही - नेहेमीच्या वादविवादांशिवाय. यात तसंही ब्राह्मण-ब्राह्मणेतर, बुप्रावादी-पारंपरिक्/कर्मठ विचारांचे, इतिहासलेखनाच्या कम्युनिष्टी कारवाया-राष्ट्रवादी 'खरे' इतिहासलेखन, अंधश्रद्धा वगैरे पासून सुरू करून भाजप-कॉन्ग्रेस-आप, एनाराय-भारतीय, स्त्रीपुरुष समानता वगैरे कुठल्याही रुळाला चर्चा लागण्याचं असीम आणि अफाट पोटेन्शिअल आहेच.

ठिक आहे उत्सुकता चाळवली जाऊ शकते पण इतक्या वर्षांपूर्वीची गोष्ट खरी आहे का खोटी याचा अभ्यास काय असा सहजच होणार आहे का...आणि नवे काही निष्पन्न होणारच असेल तर मग तुम्ही विचारलेत हे घ्या उत्तर असे थोडीच होणार आहे...
आज समाजात संतसाहित्याचा अभ्यास करण्यात आयुष्य घालवलेली मंडळी आहेत. ही देखील अजून ठामपणे सांगू शकत नाहीत. मग उद्या माबोवरचा कुणी उठला आणि म्हणला मी सांगतो खरे काय ते...तर कुणी विश्वास ठेवेल का...
त्याला देखील कित्येक वर्षे त्यात खर्ची घालावी लागतील. कदाचित त्याचेही काही अनुमान बदलतील..कदाचित व्यक्तीच बदलून जाईल....
पण तोपर्यंत मयी यांना वाट पहावे लागेल. त्याची तयारी आहे का....

बाकी तुमच्या विधानाला अनुमोदन...आजकाल कुठल्याही कारणावरून या तथाकथित वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या जाऊ लागल्या आहेत ही खरेच चिंतेची बाब आहे...

Pages