तामागोयाकी अर्थात एग रोल ( फोटोसह)

Submitted by सावली on 24 November, 2014 - 07:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अंडी - २
सोया सॉस ( अधिक टिपा पहा) - १ टीस्पुन
मिरिन - २/३ टिस्पुन ( मिरिन इथे भारतात मिळत नाही त्यामुळे त्याऐवजी पाणी - २/३ टिस्पुन + साखर - अर्धा ते एक टीस्पुन ( चवीनुसार ) घ्यावी.
तेल - थोडेसे
ऑम्लेटचा चौकोनी / आयताकृती तवा ( असल्यास) नाहीतर छोटा गोल पसरट तवा.
तवा सपाटच हवा ( खोलगट असलेला चालणार नाही) गोल तव्यावर करणे थोडे त्रासदायक होईल, प्रयत्न करुन पहायला हरकत नाही.

तामागो म्हणजे अंडे, याकी म्हणजे ग्रील्ड. पदार्थाच्या नावात ग्रील्ड असले तरी हा ग्रील करायचा पदार्थ नाही.

क्रमवार पाककृती: 

वरिल सर्व पदार्थ एका भांड्यात काढुन घेऊन हलक्या हाताने फेटा. साखर विरघळली पाहिजे.

सगळे व्यवस्थित मिक्स झाले की गॅसवर तवा तापत ठेवा. गॅस अगदी बारिक ठेवा..
तव्यावर थोडे तेल घालुन ते सर्व बाजुना पसरववुन घ्या. चौकोनी तवा असल्यास कोपर्‍यातही पसरवा.

१ - तवा तापल्यावर अंड्याच्या मिश्रणातले अगदी थोडे मिश्रण तव्यावर टाकुन तवा हलवुन सगळीकडे पटापट पसरवुन घ्या.

२ - अगदी पातळ थर तयार झाला पाहीजे. थर लगेच्च खालुन शिजेल , तेव्हा वरचा भाग ओला /अर्ध कच्चा असतानाच एका पसरट उलथण्याने हळुहळू त्या थराची गुंडाळी करा.
३ - ही गुंडाळी तव्याच्या डाव्या ( किंवा कोणत्याही) बाजुला सरकवुन ठेवा

४. आता पुन्हा एकदा आधीसारखाच पातळ थर स्टेप १ आणि २ करा. मात्र यावेळी एकाबाजुला ठेवलेली गुंडाळी घेऊन त्यावर नविन थर हळुहळू गुंडाळा.

५- या १,२, ३ स्टेप अजुन दोन / तीनदा ( अंड्याचे मिश्रण संपेपर्यंत) रिपीट करा

६- सगळे मिश्रण संपुन जाड गुंडाळी झाली की एखाद दोन मिनीटाने तव्यावरुन हलकेच काढुन थंड व्हायला ताटात ठेवा.

७ - साधारण ५ मिनीटाने त्याच्या वड्या कापुन खायला द्या.

डब्यात द्यायला किंवा ब्रेकफास्टला छान पदार्थ आहे.

वाढणी/प्रमाण: 
एक ते दोन जणांना
अधिक टिपा: 

- तवा पसरटच घ्या. नाहीतर पातळ थर करणे शक्य नाही.
- गॅस अगदी बारिक ठेवा.
- पहिल्य प्रयत्नात जमले नाही तरी एखाद दोन वेळा केल्यावर जमेल ( मलाही जमले म्हणजे..).
- माझ्या फोटोत अंड्याचे थर तितकेसे पातळ नाहीत. सुगरण माणसांना इथे अति पातळ थर करुन आपले स्किल्स दाखवायची संधी आहे. मुळ पदार्थात शक्य तितके पातळ थरच हवेत.
- सोयासॉस बद्दल -
आपल्याकडे सर्रास जो सोयासॉस मिळतो तो चिनी सोयासॉस असतो. त्याचा वास किंचीत आंबट, तीव्र आणि रसायनांसारखा येतो आणि ते लिक्विड पाण्यापेक्षा थोडे घट्ट वाटते. शिवाय याचा रंग खुप गडद असतो. सोसासॉस बनवणे ही थोडी मोठी प्रक्रीया आहे आणि त्याला वेळ लागतो. त्यामुळे कंपन्या रसायने आणि एम एस जी वापरुन ती प्रक्रीया कमी वेळात करतात आणि चायनीज सोयासॉस बनतो. याची चव जास्त खारट आणि कृत्रिम वाटते.

जपानी सोयासॉस हा आंबवण्याच्या प्रक्रीयेतुन तयार केलेला असतो. हा सॉस अगदी पातळ प्रवाही असुन रंगही फिकट असतो. याचा वास घेतल्यास गोडसर, हलका आणि रसना खुलवणारा वाटतो ( उमामी ) यात रसायने / एम एस जी नसतात. याची चव अर्थात उजवी आहे.

मी ही माहिती शोधायला का गेले तर भारतात परत आल्यावर इथला सोयासॉस वापरुन दोन तीन वेळा जपानी पदार्थ करुन पाहिले आणि ते खराब लागले/ हवी ती चव आली नाही. नंतर एकदा गोदरेज नेचर्स स्टोर मधे किक्कोमान सोयु ( सो.सॉ) ची बा टली मिळाली ती घेऊन आले. या सो.सॉ ची चव जपानीच होती म्हणुन शोधुन यातला फरक वाचला. याबद्दल अधिक माहीती वाचायची असल्यास इथे पहा. यात दिलेले सेन्सरी चेक मी घरी करुन पाहिले आणि घरात असलेली जुनी सोयासॉसची बाटली फेकुन दिली.

माहितीचा स्रोत: 
जपानी मैत्रिणी आणि इंटरनेट
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करून पाहिलं पाहिजे. कधी खातात हे? ब्रेकफास्टला? आणि कशा बरोबर वगैरे?

तव्याचं तापमान नीट जमलं पाहिजे नाहीतर ती गुंडाळी खालून जळत राहील.

फोटो टाक बाई लवकर म्हणजे व्यवस्थित कल्पना येईल.

सोयासॉसच्या माहितीबद्दल धन्यवाद. मलाही अजिबात आवडत नाही. आता सोसासोसानं जपानी सोसॉ घेऊन येते. नेचर्स बास्केटमध्ये शोधलंस तर मिरीनही मिळेल कदाचित.

मामी , हो ब्रेकफास्ट्ला किंवा डब्यात देऊ शकतो. फोटो टाकलेत आता.
तव्याचं तापमान नीट जमलं पाहिजे नाहीतर ती गुंडाळी खालून जळत राहील. >> हो हो. गॅस बारिक ठेवण्याची टिप अ‍ॅड केली. अगदीच जमत नसेल तर तवा थोडा सरकवुन घ्यायचा म्हणजे गुंडाळीचा भाग आचेवर येणार नाही असा.

सही दिसतय. मीठ/ पेपर नाही घालत का? चायनीज एग रोल खाल्लेले त्या तेलकट भाजी भरलेल्या गुंडाळीपेक्षा हे भारी दिसतायत. सोय सॉस बद्दल सहमत, चायनीजची विशेषणं एकदम चपखल Happy 'वास किंचीत आंबट, तीव्र आणि रसायनांसारखा येतो आणि ते लिक्विड पाण्यापेक्षा थोडे घट्ट'

मामी, करुन इथे रिपोर्ट दे Happy
अमितव, मीठ नाही कारण सोयासॉस घातला आहे. आणि पेपरही नाही कारण साखर आहे. जपानी पदार्थाच्या चवी अगदी माइल्ड असतात. पण आपल्या भारतीय चवीचे खाणार्‍या जिभेला चव पटली नाहीच ( फिकी वाटली) तर पुढच्या वेळेस जास्तीचे मीठ घालुन बघा. मला आजवर घालावे लागले नाहीये.

मस्त.. हा प्रकार करायला दिसतोय तेवढा सोपा नाही. यू ट्यूबवर बर्‍याच थरांचा केलेला आहे.

चायनीज सोया सॉस मधे फक्त खारटच चव लागते. म्हणून मीही नाही वापरत तो आता.

सावली, मस्त दिसत आहेत रोल्स. सोयासॉसबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. तू जे जॅपनिस ब्रान्डचे सोयासॉस वापरले त्याचे नक्की नाव आठवते का? इथे सिंगापुरात अनेक प्रकारचे सो. सॉ. मिळतात.

दिनेश. , हो बरेच लेयर करतात पण त्यासाठी जास्त अंडी लागतील.
सुरळीची वडी Happy

स्किल्फुल नाही हो. सोपी आहे. अंड लगेच शिजत जातं.

बी, 'किक्कोमान सोयासॉस' आहे माझ्याकडे. तिथेही बहुधा मिळेल.

बापरे, निगुतीने करायचा पदार्थ वाटतोय.
कधीत॑री करून बघीन. अंडं भयंकर आवडत असल्याने आवडेलच याची खात्री आहे! Happy

शेवटचा फोटो तोंपासु! Happy

सावली, मस्त रेसिपी आणि सुंदर फोटो ! ते ऑम्लेट करणे कौशल्याचेच काम वाटते आहे Happy

मंजूडीने कुठल्यातरी धाग्यावर भाज्या घातलेल्या कोरियन एग रोल्सची रेसिपी दिली होती.ह्याच रेसिपीचे भाज्या घातलेले व्हर्जन आहे. कुठल्या बाफवर ते अजिबात सापडत नाहीये पण गुगलल्यावर मिळाली. ती इथे चिकटवते नाहीतर परत हरवेल.

सावली, रेसिपी तशी सोप्पी आहे म्हणजे फार काही करायचं नाहीये म्हणून. फोटोही छान.

मला ४ थ्या स्टेपमध्येच कन्फ्युजन झालंय पण, त्यामुळे नंतरच्या सगळ्याच स्टेप्स पण डोक्यावरून. Proud

मस्त फोटो आहे.
माझ्याकडे छोटा चौकोनी तवा आहे, त्यावर हे मस्त होतील. पण मी ऑम्लेटच्या मिश्रणाचेच करेन, अगोने लिंक दिली आहे त्यानुसार Wink

अगो, मला नाही ग आठवत ही लिंक मी दिल्याचं.. या वेबसाईटवरच्या दुसर्‍या एका पाकृची लिंक मी अल्पनाला दिली होती.

धन्यवाद Happy
कौशल्याचे वगैरे नाही फारसे, खरच. मला जमले म्हणजे कोणालाही जमेल. करुन बघा एकदा. हो भाज्या घातलेले पण छान लागते पण भाज्या अगदी बाऽरीक कापायला लागतील. ती लिंक छान आहे

अर्र, अगं चौथी स्टेप रिपीट आहे. नुसत्या एकावर एक गुंडाळ्या करायच्या आहेत. इथे एक विडीयो आहे.

मस्तय ही रेसिपी.
अगोची लिंकही छान Happy (त्या लिंकवरच्या अखेरच्या फोटोत रोल खालून करपला आहे थोडासा Wink म्हणजे आपण घरी करून बघताना करपला तरी चालेल :फिदी:)

Pages