धूप किनारे

Submitted by जिज्ञासा on 23 November, 2014 - 13:45

झी जिंदगी ने पाकिस्तानी मालिका दाखवायला सुरुवात केल्यापासून मला त्यांचं वेड लागलं आहे. अर्थात मी त्या सर्व युट्युबवर शोधून बघते आहे. सुरुवातीला हम टीव्ही वरच्या गेल्या दोन तीन वर्षांत बनलेल्या मालिका पाहिल्या. पण खूप पूर्वी जेव्हा पी टीव्ही हा आपल्याकडच्या दूरदर्शनसारखा एकमेव चॅनेल होता तेव्हाच्या पाकिस्तानी मालिका देखिल खूप सरस आहेत. त्यातलीच एक अत्यंत गाजलेली मालिका म्हणजे धूप किनारे (शब्दशः अर्थ: उन्हाच्या किनारी, at the edge of sunshine). १९८७ साली (२७ वर्षांपूर्वी) ही मालिका प्रदर्शित झाली आणि संपूर्णपणे युट्युबवर उपलब्ध आहे. २/३ वर्षांपूर्वी ह्या मालिकेवरून प्रेरणा घेऊन सोनीवर ‘कुछ तो लोग कहेंगे’ ही मालिका आली होती. त्यावेळी उत्सुकता म्हणून धूप किनारे चा एक भाग बघितला होता. त्यातल्या उर्दुमुळे तो पार डोक्यावरून गेला आणि मी ते तिथेच सोडून दिलं! आता ह्या ३/४ पाकिस्तानी मालिका पाहिल्यावर उर्दूची थोडीफार तोंडओळख झाली आणि म्हणून मी पुन्हा एकदा धूप किनारे पहायला घेतली. शिवाय मला युट्युबवर इंग्रजी सबटायटल असलेले भाग सापडले. ही मालिका मी सलग पूर्ण पाहिली आणि आता पुन्हा पुन्हा पाहते आहे! कशाकशाची तारीफ करू? अत्यंत मजबूत कथानक, सुरेख संवाद आणि प्रसंग, अतिशय वास्तववादी व्यक्तिरेखा आणि सर्व कलाकारांचा सशक्त आणि नैसर्गिक अभिनय! पण मला सगळ्यात जास्ती आवडलेली गोष्ट (आणि आजवर पाहिलेल्या पाकिस्तानी मालिकांचा USP) म्हणजे रिकाम्या सोडलेल्या जागा! एखादा सीन जिथे संपेल असं वाटत असतं त्याच्या थोडासा आधीच संपतो! पुढच्या गोष्टी आपण आपल्या मनाने भरायच्या. चांगल्या पुस्तकात नेहमी अशा रिकाम्या जागा असतात! आणि ज्यावेळी त्या मालिकेत असतात तेव्हा पुस्तक वाचल्यासारखे वाटते! ती मालिका बघताना दरवेळी त्यातून अधिक, वेगळं काहीतरी हाती लागतं.
धूप किनारे पाहताना मला आजवर लागलेले शोध!

१. उर्दू भाषा: धूप किनारे चे संवाद अप्रतिम आहेत! ८० च्या दशकातली मालिका असल्याने बऱ्यापैकी शुद्ध उर्दू भाषा आहे. आजच्या मालिकांच्या (जि.गु. है) तुलनेत ही गोष्ट लगेच जाणवते. एक विशेष गोष्ट म्हणजे आवश्यक तिथे पूर्ण इंग्रजी वाक्यं आहेत. म्हणजे संवादात १००% उर्दू वाक्यं अधिक १००% इंग्रजी वाक्यं आहेत. हे कानांना ऐकताना खूप बरं वाटतं! हे असं बोललं पाहिजे आपण! धेडगुजरी बोलून आपण दोन्ही भाषांचा मान ठेवत नाही. उर्दूमध्ये अनेक चपखल विशेषणे, विशेषनामे आणि क्रियाविशेषणे आहेत. ह्या भाषेचा भावनिक बुद्ध्यांक फार वरचा आहे! धूप किनारे पाहताना त्यातले शेर, नर्म विनोद, संवाद ह्या साऱ्याने मी अनेक वेळा थक्क झाले! एखाद्या सुरेख संवादानंतर ‘हे किती सुंदर आहे’ असे व्हिडीओ पॉज करून मी म्हणत असे. I needed a moment to breathe in that whole beauty of language!

२. मजबूत, कालातीत कथानक: मी इथे कथेबद्दल काहीही लिहिणार नाहीये. I hate spoilers! पण २७ वर्षांपूर्वीची गोष्ट आजही तितकीच सुसंबद्ध वाटते. बाकी मानवी नातेसंबंध आणि त्यातले गुंते, भावभावना ह्या गोष्टी तर कालातीत असतातच. शिवाय बाकीच्या नेहमीच्या यशस्वी गोष्टी आहेत: limited episodes, crisp scenes, कुठेही न रेंगाळता अतिशय तार्किक पद्धतीने हाताळलेलं कथानक. एकुणात हे जाणवलं की १९८७ साली देखिल एक अत्यंत पुरोगामी विचारांचा समाज पाकिस्तानात अस्तित्वात होता. माझ्या डोक्यात एक कल्पना आली की ह्या कथानकावर एक बांधीव मराठी/हिंदी/उर्दू नाटक होऊ शकेल किंवा जरा अधिक compress करून एकांकिका! Though the crux of the story is at least 2 to 3 hours worth.

३. गाणी, इतिहास आणि बरंच काही: ह्या मालिकेत पार्श्वसंगीत म्हणून नय्यारा नूर ह्या गायिकेच्या गज़ल्स आहेत. मात्र त्या पूर्ण वाजत नाहीत. बऱ्याच सीन्स मध्ये ती धून वाजते किंवा काही ओळी ऐकू येतात. त्या ऐकून मी युट्युबवर ती संपूर्ण गाणी शोधून काढली. अप्रतिम! दुसरा शब्दच नाही! गज़ल हा कवितेचा अत्यंत mature format आहे. A good gazal is not just a piece of art but a piece of intellect.
Just as life begates life, good things lead to more good things! नय्यारा नूरची ही गाणी मी फेसबूकवर शेअर केली तेव्हा माझ्या मैत्रिणीने तिची अजून एक गज़ल सुचवली, हम के ठेहरे अजनबी. एक अप्रतिम गज़ल! पण मला त्यातून इतिहासाचे धडे मिळतील असं वाटलं नव्हतं! बरेचदा युट्युब व्हिडीओज च्या खालच्या प्रतिक्रिया देखिल वाचनीय असतात. हम के ठेहरे च्या खाली एका पाकिस्तानी व्यक्तीची comment होती : Such a painful poem, written by Mr Faiz Ahmed Faiz. I still feel for my Bangladeshi brothers, It is our Politics which has separated us. We are still one and will remain forever, there is a day after every night. Love from Pakistan <3
हमसफर सिरीयलच्या theme song च्या पाठी पण अशीच कहाणी आहे. बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळी त्याची काही कडवी लिहिली गेली.
इतिहासाची ही बाजू मला कधी जाणवली नव्हती. एका भौगोलिकदृष्ट्या एकसंध भागाचे दोन तुकडे झाले – भारत आणि पाकिस्तान. काही वर्षांनी पाकिस्तानचे पुन्हा दोन तुकडे झाले – पाकिस्तान आणि बांगलादेश. ह्या दोन्ही घटना वेदनादायी होत्या आणि वेदना ही साहित्याची आदिम प्रेरणा आहे! ह्या दोन्ही गज़लांनी इतिहासाची एक वेगळीच बाजू समोर आणली. ७१ च्या युद्धाचा असा विचार मी कधी केला नव्हता. जे घडून गेलं आहे ते आपण बदलू शकत नाही. पण त्याकडे डोळसपणे बघताना जाणवतं की सत्याच्या अनेक बाजू असतात!

कुछ तो.. धूप किनारे वरून प्रेरणा घेऊन बनवली होती. धूप किनारे पाहिल्यावर कुछ तो बनवणाऱ्यांचा भयंकर राग यायला लागला! एखाद्या चांगल्या कलाकृतीची वाट लावण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुछ तो! एक उपमा देण्याचा मोह आवरत नाहीये. दाट, ताज्या, उत्तम प्रतीच्या दुधात इतकं पाणी मिसळा की शेवटी त्या द्रव्याला ना दुधाची चव राहील ना पाण्याची! ही अशी गत करून टाकली कुछ तो वाल्यांनी धूप किनारे च्या कथानकाची!
पूर्वी एकदा धूप किनारे पहायला सुरुवात करून बोअर म्हणून सोडून दिली होती. आज त्याच मालिकेच्या प्रेमात आहे! आयुष्यात चांगल्या गोष्टींचे पण योग यावे लागतात हेच खरे!
रात यूँ दिल में तेरी खोई हुई याद आयी
जैसे वीराने में चुपके से बहार आ जाये|
जैसे सेहराओं में हौले से चले बाद-ए-नसीम
जैसे बीमार को बेवजह करार आ जाये!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही दुवे:
इंग्रजी सबटायटल असलेली धूप किनारे: https://www.youtube.com/watch?v=pEkO2mD9Gxk

हम के ठेहरे अजनबी: https://www.youtube.com/watch?v=KvBtfIP0pyM

विकिपेडिया: http://en.wikipedia.org/wiki/Dhoop_Kinare

छानच लिहलयसं.. मला या मालिका आवडल्या पण तुझ्याइतकं सुंदर लिहणं शक्य नाही ..
लिंक बद्द्ल धन्यवाद.. आता बघेन ही मालिका Happy

आमचे हैद्राबादेतील शेजारी ही मालिका व्हिडिओ लायब्ररीतून कॅसेटा आणून आवर्जून बघत असत. सना ची कथा असलेली ती हीच सिरीअल का? मी सध्या स्टार क्लासिक्स बघते आहे. मग ही चालू करेन. छान लिहीले आहेस.

सुंदर लिहिलंय... मी पण पाहीन आता युट्युब वर शोधून....

कुछ तोह...' नंतर भरकटली.. हे अपेक्षीतच असतं ना आता आपल्या कडच्या सिरीयल्स मधे. पाणी घालून वाढवणे.
एका ठरावीक पॉईंट्ला संपून जावी असं वाटतं, ते होतच नाही. मग आवडती सिरीयल्ही बोअर होऊ लागते.

जिज्ञासा मस्त लिहिलंयस. अगदी सहमत!
मला आठवतं की फार पूर्वी दिल्लीत याची(धूप किनारे) डीव्हीडी पाहिली होती/ की तिथल्या टीव्हीवर दिसायची पाकी. चॅनल्स नक्की आठवत नाही. पण खूप आवडली होती.

चनस, चैत्राली, देवकी, मानुषी, सगळ्यांचे खूप आभार Happy

अमा, धन्यवाद! ही सना ची मालिका नाही. ह्यातल्या protagonist चं नाव डॉ. झोया अली खान!

खुपच सुरेख लिहिलंयस जिज्ञासा!
जिंदगीच्या मालिका अधनंमधनं बघूनही आवडतात, आता ही पण बघेन. लिंकबद्दल विशेष थँक्स Happy सगळेच कष्ट वाचवलेस!

रात यूँ दिल में तेरी खोई हुई याद आयी
जैसे वीराने में चुपके से बहार आ जाये|
जैसे सेहराओं में हौले से चले बाद-ए-नसीम
जैसे बीमार को बेवजह करार आ जाये!>>

माझी एक आवडती कविता इथे वाचायला मिळाली त्यामुळे खूप आनंद झाला.
ही कविता कवी फैझ अहमद फैझ ह्यांची आहे.

इतकी छोटी कविता आणि अर्थ केवढा महान.

जिज्ञासा, अगदी मागच्याच आठवड्यात पुर्ण मालिका पाहिली. अजूनही एक अनामिक धडधड होत आहे हृदयात माझ्या. शेवटचा प्रसंग किती सुरेख आहे. आधी तिला भास होतो की डॉ अहमर तिथे आहे आणि तो खरच जेंव्हा परत येतो तर तिला परत तो आला आहे हा भास आहे असे वाटते म्हणून ती बाजूला सारते तर खरचं तोच असतो. मला एकदम रडूच कोसळल तो क्षण बघून. जर तसा शेवट नसता केला ना तर मला एक फार भावनिक धक्का बसला असता. आत्ताही डोळे पाणावलेत माझे हा अभिप्राय लिहिताना.

धन्यवाद हा लेख लिहिल्याबद्दल.

धुप किनारे ही सीरियल मी मनापासून पाहिली. अशा बर्‍याच सीरियल्स जिंदगि चॅनेल्वर
पाहिल्या. अतिशय उत्तम कथानकं आणि मर्यादित लांबी त्यामुळे या सीरियल्स आवडणार्या ठरत असाव्यात.
आपल्या कडच्या प्रोड्यूसर्सनी धडा घ्यावा. पण आपल्याकडे काही विशिष्ट गटांनीच लिहिलेल्या सीरियल्स
तयार केल्या जातात. नवीन लेखनाला तिथे वाव नाही त्यामुळेच प्रत घसरली तरी चालेल पण गटाबाहेरच्या
लेखनाला संधी देणार नाही , असं काहीसं या लोकांचं तत्व असावं असं वाटतं. त्यात बळी प्रेक्षकांचा जातो हे लक्षात येतं पण घेतलं जात नाही. अन्यथा मराठीत नवीन चांगलं लेखनही विपुल आहे.

धुप किनारे पाहिली. आवडली. फक्त त्यांची लव स्टोरीच नाही तर झोया, डॉ. अहमर, झोया आणि अंजीची मैत्री, दोघींच्या वडिलांची मैत्री, अंजीचे आई-वडील, झोयाचे वडील, डॉ. इरफान सगळच आवड्लं. सगळ्यांचा अभिनय छान झालाय.

डॉ. शीना प्रकरण फार ताणलं नाही हे बरं झालं. नाहीतर आपल्या 'कुछ तो लोग कहेंगे' मधे ह्या कॅरॅकटर चं उपकथानक किती ओढुन-ताणुन लांबवलं होतं...

सध्या मी झूट नावाची पाकिस्तानी सिरीयल बघत आहे.त्यातली आई ललिताबाई (नान्दा सौख्य भरे)च्या थोबाडित मारेल असे खोटे बोलताना दाखवली आहे.
धूप किनारे सोबतअनकही आणि तनहाइया पण खूप छान सिरियल्स आहेत.

अरे वा! सगळ्या नवीन प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद! तनहाईयाँ पाहिली आहे.. अनकही शोधून पाहते आता.