रुमालबाबा - मलाही, को त बो!..

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2014 - 12:29

संदर्भ - http://www.maayboli.com/node/51571

खालील शब्द न् शब्द काल रुमालबाबा माझ्या स्वप्नात येऊन बोलून गेले. काही कमी जास्त बोलले असतील तर त्यांना क्षमा करा. बिचारे दुखावलयेत!..

._-_.._-_.._-_.._-_.._-_.

"उठं .. उठ बे रुनम्या!.. तोंडावरची चादर झटक आणि हा रुमाल बघ..

हो मीच तो रुमाल.. तोच! ज्याची तुझ्यामुळे त्या दिवशी या धाग्यात टिंगलटवाळी उडवत चिंधड्या चिंधड्या झाल्या.

......पण तुझीही काय चूक यात., तू देखील तर माझ्यासाठीच हे धाडस केलेस. एका किरकोळ समजल्या जाणार्‍या वस्तूला मायबोलीच्या मुख्य पटावर आणायचे धाडस!..

पण मी म्हणतो,. काय काय सल्ले आणि कसल्या कसल्या माहितीचे धागे निघत नाहीत मायबोलीवर.. मला रेडिओ घ्यायचाय, मला मिक्सर घ्यायचाय, मला टोस्टर घ्यायचाय!.. पण कोणी मला रुमाल घ्यायचाय असा धागा काढला तर लगेच त्या धाग्याची खिल्ली उडवायची..? .. का? तर टोस्टरची किंमत हजार बाराशे असते आणि रुमाल ३०-३५ रुपयांना नग या माफक दरात मिळून जातो. माफच करा, पण एखाद्या वस्तूचे मूल्यमापन त्याच्या पैश्यातील किंमतीवर करायचा कृतघ्नपणा फक्त मनुष्यजातीलाच जमू शकतो!..

हो कृतघ्नपणाच..!!
आहे का या भूतलावर कोणी असा ज्याचे नाक लहानपणापासून आजवर कधी गळाले नाही.. आईच्या पदरानंतर त्याच मायेने ते नाक कोणी पुसले असेल,. तर हो.., तो मीच होतो!..

आठवतोय तो शाळेचा पहिला दिवस!.. जेव्हा आईच्या पंखाखालून भरारी घेत तुम्ही पहिल्यांदा घराच्या बाहेर पडलात.. शाळेत जायला.. एकटेच!.... पण खरेच तुम्ही एकटे होतात?? तर नाही,. त्या दिवशी मी देखील तुमच्या सोबतच होतो.. तुमच्या छातीला लटकत!.. मी एका आईचा विश्वास होतो!, की आपल्या मुलाला कधीही गरज पडली, तर हा आहे त्याच्या सोबत.. पण आज मला समजले की माझी जागा तुमच्या हृदयाच्या वर लटकण्यापुरतीच होती.. त्याच्या आत असे कधी मला स्थान मिळालेच नाही. आयुष्यभर तुमचे डोळे पुसायच्या कामी आलो, ते आज हा दिवस बघायला, जेव्हा तुमच्यामुळेच माझ्याच डोळ्यात पाणी यावे.. Sad

आठवतेय ती शाळेतली मस्ती!. आठवतेय ती पहिली मारामारी!.. त्यातही मी तुमच्या साथीनेच होतो. कोणी मला शिवा स्टाईल, सायकलच्या चैनीसारखे, हाताला गुंडाळले होते,. तर कोणी "सर पे कफन बांध के" स्टाईल डोक्याला लपेटले होते,. तर कोणी माझी दोन टोके, दोन हातात पकडून, त्याची ताणून भिंगरी बनवत, समोरच्याच्या साट्टं साट करून चापटी वाजवत होते...

आठवतेय ती उन्हाळ्याची सुट्टी!.. ऐन दुपारी, नदीच्या तिरी,. स्सॉरी!,. मैदानावरी, क्रिकेट खेळायला जायचा,.. तेव्हाचेही विसरलात का रे मला!.. तुमच्या डोक्यावर सावलीचे झाड बनणारे मीच होतो.. बर्फाचा गोळा खाऊन रंगलेल्या, तुमच्या तोंडाला पाने पुसणारा मीच होतो!..

आठवतेय ते तुमचे पहिले प्रेम!.. कमॉन.. आता हे तरी आठवायलाच हवे! Angry

माझ्यात लपलेला प्रेम संदेश., नक्षीकाम करत विणलेले तिचे नाव., संध्याकाळी ती भेटणार म्हणून चिकणे दिसायला माझ्यातच लपवून नेलेली टालकम पावडर!.. आठवून तर पहा जरा,. तिला दिलेले लो बजेट पहिले गिफ्ट,. मीच तर नव्हतो!..

नाही!... मला भावनिक व्हायचे नाहीये. तुमचे जग पक्के व्यावहारीक आहे हे मी जाणतो. पण मला सांगा, आता तो मोबाईल!.. काय असते त्या टिनपाटात!.. काय असते अशी त्याची किंमत!.. आजकाल दोनचार हजारातही मिळतो, नाक्यावरच्या पाणीपुरीवाल्याकडेही आढळतो. त्याच्यावर इतके धागे निघतात, म्हणजे तो खरेदी करण्यापासून त्यातील नवनवीन अ‍ॅप्लिकेशन, गेम्स, बिघाड, दुरुस्ती, तांत्रिक सल्ले, काय काय अन काय नाय.. याचा तर एक वेगळा विभागच आहे ईथे!, आणि तेच मग दुसरीकडे जाऊन आपणच काय बोलता? तर या स्मार्ट फोनने लोकांना वेडे केलेय, लोक जगाकडे बघायला विसरलेत..... हा!.. असला दुटप्पीपणा!..

एखादा शंभर दोनशे रुपयांचा फडतूस हिंदी सिनेमा निघतो, त्याचे तिकीट काढायच्या आधी तुम्ही शंभर जणांना तो काय आहे, कसा आहे विचारत फिरता. त्याच्या परीक्षणाचे खंडीभर धागे काढता. त्यातही ईंग्लिश सिनेमा असेल तर एकाच सिनेमाचे ८-८ धागे काढता. आणि एवढे करूनही काय, तर तो सिनेमा फ्लॉपच निघतो.,, त्यामानाने मी जो कधीच फ्लॉप जात नाही, त्यावर एक धागा कोणी कुठे उघडला तर काय हरकत होती?. मी काही तीन तासांचा सिनेमा नाहीये, जो बघितला! संपला! पॉपकॉर्न चघळत घरी आलात.. ना मी दिवाळीतला एखादा फटाका आहे, जो वाजला! ऐकला! धूर खोकत निघून गेलात.. जेव्हा जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा तेव्हा तुम्हाला साथ देणारा मी तुमचा खराखुरा हमसफर नाही तर आणखी कोण आहे?? ...पण तरीही अशी वागणूक??

नाही मित्रांनो,. एकेका धाग्याला धागा जोडत मी तुमच्यासाठी विणला जातो, पण आज मायबोलीवर मला एका धाग्याची जागा मिळू नये... निशब्द!.. ना कसला त्रागा ना कसली खंत!
- संत, रुमालबाबा
___/\___

तकीया कलाम - मला कल्पना आहे की रुमालबाबांच्या या प्रामाणिक भावनांचीही खिल्ली उडवली जाणार. म्हणून मी अगोचरपणा करत आधीच हा त्यांचा "कोतबो", विनोद विभागात टाकलाय. आजवरच्या मायबोली इतिहासात, या विनोद विभागाने या प्रकारच्या भावना पहिल्यांदाच अनुभवल्या असतील... नाही!..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढे मानहानिकारक प्रतिसाद मिळूनही किती हसत-खेळत सौम्य प्रत्युत्तर! ---------> त्याला निगरगट्टपणा, कोडगेपणा, बेमुवर्तखोर, नाटकी, ढोंगी, आव, सोंग वगैरे वगैरे म्हणत असावेत.

Pages