गडद - बेधडक!!!

Submitted by Discoverसह्याद्री on 2 November, 2014 - 09:41

भामा खोऱ्यातल्या अल्पपरिचित - गडदच्या दुर्गेश्वर लेण्यांचा शोध घेतानाचा थरार...
(पूर्वप्रकाशित:: http://www.discoversahyadri.in/2014/10/BhamaGadadDurgeshwarCaves.html)

...एकापाठोपाठ एक अश्या कातळकोरीव पायऱ्या काही केल्या संपेनात...
...सरत्या पावसाचं खट्याळ पाणी अजूनही कातळकड्यावर रेंगाळलेलं, शेवाळलेलं, झिरपत राहिलेलं...
....हाताच्या आधारासाठी चाचपणी केल्यावर कुठंतरी दूरवर एक पुसटशी खोबण सापडते खरी, पण आता पाय टेकवण्यासाठी शेवाळलेल्या निसरड्या पावठीवर मात्र विश्वास ठेवणं अवघड आहे...
...गवताचे झुंबाडे - शेवाळलेल्या खोबणी - कोरीव पायऱ्या, आधारासाठी कशावर विश्वास ठेवावा...
...चुकून नजर निसटली, की गरगरत जाते दाट झाडीभरल्या दरीच्या तळाशी...
...ऊर धपापलेलं, घश्याला कोरड पडलेली, माथ्यावर घामटं जमा झालेलं...
अल्पपरिचित लेणी शोधण्याच्या मोहिमेतली अनपेक्षित थरार-धम्माल अशी पुरेपूर अनुभवत होतो.

'गडद’ म्हणजे खडकात खोदलेली गुहा. सह्याद्रीत 'गडद' म्हणलं, की ट्रेकर्स-अभ्यासकांना हमखास आठवतो - ‘गडदचा बहिरी’ (म्हणजे ढाकच्या उभ्या कड्यातल्या बहिरीचं अनघड ठाणं), किंवा काहींना आठवतील पळू-सोनावळ्याची देखणी लेणी - 'गणपती गडद'. पण, आत्ताची आमची 'गडद'ची भटकंती होती - एका अल्पपरिचित गिरीस्थळाची. हे 'गडद' होतं, राजगुरूनगरच्या पश्चिमेला 'भामा' नदीच्या खोऱ्यात. भीमा नदीची उपनदी असलेल्या या भामा खोऱ्यात दडलेली भन्नाट शिखरं, घाटवाटा आणि डोंगररांगांना परत-परत भेट देणं, हा उपक्रम गेले काही महिने पायदळी घेतला होता. (या सगळ्याबद्दल स्वतंत्रपणे सविस्तर लिहीनंच.)

तळेगावच्या आमच्या ट्रेकरमित्र 'अमेय जोशी'नं गडदच्या गुहांबद्दल कुठेसे थोडं त्रोटक वाचलं होतं. अश्या या - ट्रेकर्सना आणि कदाचित अभ्यासकांनाही माहिती नसलेल्या - अल्पपरिचित अश्या 'दुर्गेश्वर लेणी' धुंडाळण्यासाठी आम्ही निघालो.

गडदचं दुर्गेश्वर म्हणजे एखादं साधं स्थानिक देवस्थान असेल, एखाद्या रविवार सकाळी सहज बघून येवूयात, असं वाटलेलं. अर्थात, हा सपशेल गैरसमज निघणार होता.…

गडद गावापाशी पोहोचलो, तेंव्हा हवेत सुखद गारवा होता. गावामागच्या डोंगररांगेची तुळतुळीत कातळभिंत, माथ्यावरची गच्च झाडी आणि आळसावलेल्या पवनचक्क्या कोवळ्या उन्हांत न्हाऊन निघत होत्या.

दूरवरून बघताना 'दुर्गेश्वरचं गडद' नक्की कुठे असावं, याचा फारसा पत्ता लागेना.

ठिकठिकाणी ताडाच्या खोडाला छेद देवून, झिरपणारा रस (नीरा/ ताडी) उपसण्याचा खटाटोप जोरात चालू होता.

दीड-दोनशे मीटर उंचीची अर्धवर्तुळाकार दिसणारी कातळभिंत होती 'तासूबाई' डोंगराची. पायथ्याशी 'गडद' गावची टुमदार घरं आणि तजेलदार शेतं-शिवारं असं मोठ्ठ प्रसन्न दृश्य सामोरं होतं...

कातळात 'दुर्गेश्वर लेणी' नक्की कोठे, हे मात्र प्रत्यक्ष भेट दिल्यावरंच समजलं...

'दुर्गेश्वर लेण्यां'ची खरी गंमत आहे, त्याच्या कातळमार्गावर... उभ्या कातळावरच्या शे-दोनशे निसटत्या शेवाळलेल्या पायऱ्या हा थरार अर्थातंच अजून उलगडायचा होता...

गडद गावातून दुर्गेश्वर डोंगराकडे निघालो, की भाताच्या घमघमणा-या शिवारांनी स्वागत केलं. सांगा बरं, कोणत्या आधुनिक यंत्रात आमच्या मावळच्या भातखाचरांचा ताजा गंध रेकॉर्ड कराल.. तो ऊरातंच भरून घ्यायला हवा!!!

ग्रामदैवत भैरवनाथाचं राउळ मोठ्ठ प्रसन्न. आसपास विखुरलेले जुने दगड बघता, इथे एखादं पुरातन कोरीव मंदिर नक्की असणार. मंदिराच्या पायऱ्या न चढून जाण्याची प्रथा गावातल्या स्त्रिया आजंही पाळतात.

भैरवनाथाच्या मंदिरामागून दाट गवतामधून डोंगराकडे निघालो. वृक्ष आणि गच्च गच्च माजलेलं गवत यातून वाट काढत गेलो. वर्षानुवर्ष एकत्र ट्रेक्स करणारी भरवशाची तुकडी सोबत असली, की शोध मोहिमांचं आव्हान स्विकारायला मागे -पुढे बघायची गरज नाही.

भैरवनाथाच्या राऊळापासून पाच मिनिटात आम्ही पोहोचलो गडदच्या 'देवराई'मध्ये. काहीशे वर्षांपूर्वीचे जुने-जाणते वृक्ष आभाळाला भिडलेले. देवाचा बांधून काढलेला पार. इथे चैत्री अमावस्येला दुर्गेश्‍वराचा भंडारा (यात्रा) भरतो. भामा खो-यातलं श्रद्धास्थान असलेल्या दुर्गेश्‍वराचा प्रसाद घ्यायला शेकडो भाविक या देवराईत जमतात.

आता आमची उत्कंठा दाटली होती, दुर्गेश्वराचं स्थान बघायची... झुडुपातून वळसे घेत जाणारी पाऊलवाट १० मिनिटात दुर्गेश्वर ठाण्यापाशी घेवून जाते.

बांधलेलं मंदिर नाही. कातळकड्याच्या छोट्याश्या खळग्यात स्थापन केलेलं शिवलिंग आणि दोन-चार किरकोळ पाय-या कोरलेल्या आहेत.

गडदगावचे 'लाऊडस्पीकरवाले' - श्री विश्वनाथ निकम - आम्ही विनंती न करताच, वाट दाखवायला सांगाती आलेले.

अग्गदी बारकाईने फोटो बघितला, तर जाणवेल की खळग्याची दिशा अचूक निवडल्याने माथ्यावरच्या खडकामधून अलगद एक-एक थेंब पाणी निसटतोय, आणि शंकराच्या पिंडीवर अव्याहत जलाभिषेक होतोय. पावसाळ्यात मात्र शिवलिंग पावसाने भिजत नाही. गावातले पुजारी 'शांताराम कवदरे' भेटले. पावसा-उन्हांत दररोज दुर्गेश्वराच्या पूजेत खंड नाही. रोजच्या पूजेमुळे परिसर प्रसन्न राहिलाय.
दुर्गेश्वर लेण्याच्या कातळमार्गाचा थ-रा-र
दुर्गेश्वर शिवलिंगाचं दर्शन तसं सहजीच झालेलं...
पण दुर्गेश्वर लेण्याची वाट मात्र 'लय अवघड हाये' या धृवपदावर
लाऊडस्पीकरवाले - निकमदादा अडून बसलेले. अर्थातंच, अवघड म्हणलं, की 'बेधडक' भेट द्यायलाच पाहिजे नाही का!!!

आणि मग सुरू झाली उभ्या कड्यातल्या एकदम खड्या उंचीच्या, पण आखूड पायऱ्यांची साखळी…

दुर्गेश्वर लेण्यांचा थरार सुरू झालेला. ऑक्टोबर हिट सुरू झालेली असली, तरी सरत्या पावसाचं पाणी अजूनही कड्यावर रेंगाळलेलं. अध्येमध्ये शूज कातळावरून किंचित सरकले, की 'जपून रे' असं एकमेकांना बजावायचं....

खाली खोSSSलवर देवराईचा झाडोरा.
तर, पायाखाली ओल्या कातळावरच्या, दृष्टीभय असलेल्या घसरड्या पाय-यांमुळे थरार...आणि थ-र-का-प देखील!!!

मध्येच एक अर्धवट पायरी - ’फुटकी पायरी’ नावाची. अर्धा क्षण पाय तरंगत हवेत, अन अल्याड-पल्याडच्या होल्ड्स साठी झटपट!!!

तब्बल शे-दोनशे निसटत्या शेवाळलेल्या पायऱ्या पार केल्यावर माथ्याकडचा कातळ जवळ आला... अंगावरंच आला म्हणायचं!!!

इतक्या पावठ्या खोदलेल्या, म्हणजे माथ्यावर काहीतरी 'घबाड' हाती लागणार, अशी खात्री पटत चाललेली...

माथ्याकडून झेपावणाऱ्या कातळाच्या पदरातल्या सपाटीवर पोहोचलेलो. दुर्गेश्वरलेणी आता अग्गदी जवळ आलेली आहेत, असं निकमभाउंनी जाहीर केलेलं. त्यामुळे, उत्साह आणि उत्कंठेने अक्षरश: पळत निघालेलो....

कातळाच्या पोटातून उजवीकडे (पश्चिमेला) निघालो. लेणी किंवा कुठलंही खोदीव-कोरीव काम अजून दृष्टीक्षेपात पडलं नव्हतं.

डावीकडे जमिनीलगत कोरीव टाके लागले. कोरडंच, साध्या खोदाईचं.

सामान्य खोदाईची ही टाक्याची सुरुवातीची खोदाई, पण सोडून दिलेली.

मुख्य दालन अजून पुढे आहे. हवेतला गारवा आणि समोर माथ्यावरचा रानवा सुखावत होता. अवघड चढाई करून, लेण्यांपर्यंत पोहोचल्याचा आनंददेखील मोठ्ठा होता.

कातळाचं छत सोडून कोरलेलं आयताकृती टाकं बाजूला ठेवत पुढे निसटलो.

आणि, आम्ही पोहोचलो दुर्गेश्वर लेण्यांच्या मुख्य दालनापाशी. कातळछत सोडून कोरलेल्या दालनात उतरण्यासाठी चार पायऱ्या उतरून दालनाच्या सपाटीवर पोहोचलो. लेणी खोदाईसाठी निवडलेल्या कातळाची 'पोत' काळ्या बेसॉल्टपेक्षा वेगळी होती. हे कारण असेल का, लेणी खोदाई साधी आणि अर्धवट असण्याचं!!!!

५० फूट रुंद - ४० फूट खोल आकाराच्या मुख्य दालनाचे दोन भाग करणारा कातळाचा कठडा, चौकोनी कातून काढलेल्या पुढच्या भागातील धान्याचे उखळ, आतील भागातील छोटी खोली हे निरखलं. गडद गावातले स्थानिक दुर्गेश्‍वर लेणी पांडवकालीन किंवा (?) रामायणकालीन आहेत, असं म्हणतात.

पुरातन व्यापारी मार्ग ट्रेस करता आला, पण कालनिश्चिती नाहीच जमली...
गुगल नकाश्यांवर भामा खोरं परिसर बारकाईने अभ्यासला. पश्चिम-पूर्व असा व्यापारी मार्ग शोधत गेलो. कोकण-तळातली आंबिवली लेणी - परिसराचा संरक्षक कोथळीगड (प्रसिद्ध पेठचा किल्ला) आणि खुद्द पेठच्या किल्ल्यावरचं विशाल लेणे दालन - घाटमाथ्याला जोडणारी घाटवाट 'कौल्याची धार' आणि ऐन घाटमार्गातली पाण्याची टाकी, पुढे पूर्वेकडे आल्यावर 'दुर्गेश्वर' आणि 'भामचंद्र' लेणी असा हा सगळा मार्ग ट्रेस करता आला. यातली आंबिवली लेणी आणि 'भामचंद्र' लेणी मूळ बौद्धधर्मीय लेणी असली, तरी 'दुर्गेश्वर' लेण्यांमध्ये कुठलेच शिलालेख, स्तूप आणि विहार नसल्याने, या लेणी मूळ बौद्धधर्मीय नक्कीच नाहीत.

मुख्य दालनाच्या लागत दुर्गेश्वराचं देऊळ आहे. वाघोबा - दीपमाळ - नागप्रतिमा - शिवलिंग असं साधं मूर्तीकाम आहे. सातव्या ते दहाव्या शतकातली ही खोदाई असावी, असा माझा अंदाज आहे.

काळ्याकभिन्न कातळाच्या उदरात दडलेला पाण्याचा साठा उलगडून दाखवणारे एखाद टाकं

बिकट कातळमार्गाचं आव्हान पेलून, जगाला अल्पपरिचित अनवट लेणी धुंडाळण्याचा निखळ आनंद अनुभवणारी ट्रेकर मंडळी!!!

मंद वारं सुटलेलं. दूरवर पसरलेली, वाऱ्याच्या तालावर डोलणारी हिरवीगार भातशेती दीठी सुखावत होती...

अजस्त्र कातळाच्या उदरात, निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी, पारंपारिक थोडकी साधने-पद्धती वापरून वर्षानुवर्षे कातळ कोरून लेणी खोदण्याचा उपक्रम कित्येक शतकं "आपल्या सह्याद्रीत" चालू राहिला होता. पूर्वजांच्या या पाऊलखुणा खरंच विस्मयकारक आहेत...

'वर्षावास' किंवा 'वर्षाविहार' म्हणजे पावसाच्या चार महिन्यात आसरा हा मुख्य हेतू आणि जोडीला व्यापार - धर्मप्रचार असे इतर हेतू. म्हणजे आठव्या - दहाव्या शतकापर्यंत लेणी खोदण्याच्या या उपक्रमाला राजाश्रय आणि धनाश्रय नक्की होता. मला कोडं पडतं - की सह्याद्रीच्या कातळात इतकी सगळी लेणी खोदली आहेत, त्यांचा पुढच्या काळात कसा उपयोग झाला असेल... म्हणजे स्वराज्यासाठी शिवरायांनी किंवा पेशव्यांनी किंवा इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारकांनी कसं वापरलं असेल... आणि, आज... आज, आपल्या मातीत घडलेल्या संस्कृतीचा किती सगळा समृद्ध वारसा निव्वळ अडगळीत पडलाय... कोणी म्हणजे कोणी फिरकत नाही. अंतर्मुख झालो... सोबती पुढे गेलेले... मी हरवलो काही क्षण त्या निशब्द शांततेत........

गडदच्या दुर्गम दुर्गेश्वर लेण्यांचा निरोप घ्यायची वेळ आली होती. परतीचा मार्ग अर्थातंच सोप्पा अजिबात नव्हता.

भामा खो-यात लपलेलं - हरवलेलं अल्पपरिचित लेणं मनापासून अनुभवलं होतं.

आता परतीच्या मार्गावर घसरड्या - निसरड्या - शेवाळलेल्या - उभ्या गवताळ उतरंडीवरून डोंबार कसरत करणं बाकी होतं...

आखूड पाय-यांवर कसंबसं उभं राहून (शूज बघा डाव्या कोप-यात) काढलेल्या या फोटोत कदाचित कल्पना येईल, कातळमार्गाची.... चढाईपेक्षा उतराई नक्कीच जास्त आव्हानात्मक होती.

७५ - ९० अंशात झुकलेल्या कड्यामध्ये कोरलेल्या दीड-दोनशे पाय-यांच्या खोदाईने आम्ही थक्क झालेलो...

क्षणोक्षणी कातळाला बिलगून आपण नक्की कशी चढाई-उतराई केली, हे न्याहाळत होतो आणि लेणीमार्ग कोरणा-या कारागिरांचं कवतिक करत होतो...

देवराईमध्ये तुकडी सुखरूप पोहोचलो. 'लाऊडस्पीकरवाले' - निकमदादा यांचे आभार मानून योग्य मानधन देण्यात आले.

ट्रेकच्या अखेरीस सह्याद्रीला अलविदा म्हणून परतीचा प्रवास सुरू करावा लागलाच... डोळ्यांसमोर तरळत होती, दुर्गेश्वर लेणी धुंडाळतानाची थरारक दृश्यं...
...विस्मृतीत दडलेल्या कोण्या भामा नदीच्या खोऱ्यात, पूर्वजांच्या पाऊलखुणा जपणारी आणि थक्क करणारी घाटवाट - दुर्ग - लेण्यांची खोदाई...
...रॉकपॅचवर ऐन ट्रॅव्हर्सवर होल्ड्स मिळवताना खटपट आणि धडधड झाली, ती अजून जाणवत होती...
...कातळावरून निसटत्या पायऱ्यांची न संपणारी शृंखला कशी खोदली असेल, या विचारानं थक्क झालो होतो...
...देवराईमधली निखळ शांतता अनुभवून भारावून गेलो होतो...
...डोंगरकपारीतल्या शिवलिंगास नैसर्गिक जलाभिषेक अलगद घडावा, ही कृती एखाद्या कविमनाच्या भक्ताचीच असणार...
… कधी वेड लागलं घमघमणा-या भातखाचरांच्या गंधानं...
...खरंच, लाभले आम्हांस भाग्य, की वेड लागलं सह्याद्रीचं...
… इतिहास - भूगोल आणि संस्कृती असं काय काय दडवलंय सह्याद्रीनं...
माझा सह्याद्री - विराट!
माझा सह्याद्री - अनाद्यनंत!!
माझा सह्याद्री - बेधडक!!!

छायाचित्रे: साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

बाबौ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

पहिला फोटो बघुनच दन्डवत घातला. _/\_

सॅल्युट्ट्ट मॅन!!!

अरे कस्सलं जब्बरदस्त ठिकाण आहे!!! Happy
फोटोंचा आकार कमी कर ना थोडा... फोटो स्क्रीनभर पसरताहेत आणि वाईट म्हणजे त्या फोटोवर जाहिरातींचा चौकोन येतोय!
(की हा माझ्या स्क्रीनचा प्रॉब्लेम आहे?)

____/\______

जबराट !!!!

फोटो स्क्रीनभर पसरताहेत आणि वाईट म्हणजे त्या फोटोवर जाहिरातींचा चौकोन येतोय!
(की हा माझ्या स्क्रीनचा प्रॉब्लेम आहे?)
>>>>>> येस्स, आया माझ्याही स्क्रीनवर हाच प्रॉब्लेम आहे

भन्नाटच. मला आवडलं असतं तुमच्या बरोबर असं यायला (भारतात असते तर).

अ‍ॅडब्लॉक करा. जाहिरातींची नो कटकट.

अफलातून Happy

तुमच्या सगळ्यांचा खुप हेवा वाटतो रे Happy

फोटोंचा आकार कमी कर ना थोडा... फोटो स्क्रीनभर पसरताहेत आणि वाईट म्हणजे त्या फोटोवर जाहिरातींचा चौकोन येतोय!>>>>>नचि +१ Happy

अ‍ॅडब्लॉक परमनंटली करता येतात का? मी दरवेळी त्या त्या अ‍ॅडवर क्लिक करून बंद करतो... मग त्या अ‍ॅडच्या जागी ब्ल्लँक चौकोन दिसत राहतो...

ललिता-प्रीति
शैलजा
Sariva
पुरंदरे शशांक
झकासराव
आनंदयात्री
किरण कुमार
बी
आबासाहेब.
विजय आंग्रे
दिनेश.
आऊटडोअर्स
जिप्सी
नुतनजे
खूप छान वाटलं तुमच्या प्रतिक्रिया वाचून... Happy
अत्यंत दुर्लक्षित साधी ठिकाणं आहेत खूप सारी.. ती दर्दी भटक्यांना माहिती व्हावीत, छोटा हेतू..
प्र.चि. आकाराबद्दल नक्की काळजी घेईन....
धन्यवाद!!!

मस्त लेख सुमित... फोटोज, ट्रेकचा अभ्यास, नकाशे आणि वर्णन अफ़लातुन...

"… कधी वेड लागलं घमघमणा-या भातखाचरांच्या गंधानं...
...खरंच, लाभले आम्हांस भाग्य, की वेड लागलं सह्याद्रीचं..."

-सह्याद्रीच वेडच आहे हे आणि हेच जीवन म्हणाव...

मिलींद आणि साकेत नेहमी प्रमाणेच खूप खंदे आणि असल्या ट्रेकला अवश्यकच...

सुंदर. नवी जागा कळली.

असा थरार अनेकदा अनूभवलाय पण दरवेळी मजा न्यारी असते.
मूख्य म्हणजे चढाई पेक्षा उतराई वाट लावते हा सर्वांचा अनुभव असतो.

शक्य असल्यास जिन्स आणि शॉर्ट्स प्रकरण टाळा.

_/\__/\_ !!!

फारुक::
आपण प्रत्यक्ष बोललोच आहे.. ट्रेकिंग म्हणजे नुसते किल्ले बघणं नसून, लेणी - घाटवाटा- फुलं - पक्षी - प्राणी - भूगोल - इतिहास....... असं किती किती समजावून घेण्यासारखं!!!
भक्कम ट्रेकर दोस्तांशिवाय ट्रेकिंग अशक्य आहे... मज्जाच नाही!!!!!!!!!

सेना::
दोस्ता, धन्यवाद Happy Happy
हो रे, कातळटप्पे चढण्यापेक्षा उतरतानाचा थरार भन्नाट!! Wink
गडद इतका authentic ट्रेक निघेल, असं न वाटल्याने जिन्स आणि शॉर्ट्स Happy सजेशन मान्यंच!!!

हर्पेन, वेडसह्याद्रीचे, वीप::
मस्त वाटलं प्रतिक्रिया वाचून...
खूप खूप धन्यवाद Happy

तोड फोड भटकंती आणि साजेशी छायाचित्र….शेवट नेहमीसारखाच जबरदस्त…घोराडेश्वरच्या तुझ्या लेखापासून पुढच्या कोणत्याही लेखाचा शेवट वाचला की एखाद्या शाही दावतीनंतर "डेझर्ट्स"चा मनमुराद आनंद लुटावा तसं वाटतं !!!

रोमा
अनंतरंगी
Sayali Paturkar
मस्त वाटलं प्रतिक्रिया वाचून...
मन:पूर्वक धन्यवाद! Happy

ओंकार
खूप खूप धन्यवाद!!!
थोडं शोधलं, तर मावळात एकापाठोपाठ एक अशी लेण्यांची मालिका उलगडली. काम्ब्रे – उकसण – पाल – गडद – पद्मावती – फिरंगाई – पिराचा डोंगर अश्या अनवट जागा असल्याने अनुभव मस्तंच. म्हणून ब्लॉग वर्णनात ‘डेझर्ट्स’ उतरले असतील... Happy