एक घास काऊचा, एक घास चिऊचा.

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 November, 2014 - 07:22

लहानपणी आपण सर्वांनी चिऊकाऊच्या बर्‍याच गोष्टी ऐकल्या असतील. त्या ऐकता ऐकता एक घास काऊचा आणि एक घास चिऊचा असे म्हणत वरणभातही खाल्ला असावा. पण आज जी चिऊ काऊची गोष्ट मी इथे सांगणार आहे ती मोठ्यांसाठी आहे. मलाही समज आल्यावरच मोठ्या काकांनी सांगितली होती.. कित्येकदा.. गोष्टच तशी होती.. एक सत्यघटना, जे ती कधीच विसरू शकले नाहीत. ना मी ती विसरलोय. जशीच्या तशी, तुमच्यासाठी!

...

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातील. मोठे काका (माझ्या वडीलांचे मावसभाऊ) तेव्हा राहायला मुंबईत कुर्ल्याला होते. वडाळ्याला ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ का कुठल्याश्या कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामाला लागलेले. माई-दादा म्हणजे त्यांचे आईवडीलसुद्धा त्यांच्याबरोबरच असायचे. कसल्याश्या आजाराचे निमित्त झाले आणि दादा गेले. खचून जायची वेळ नव्हती. स्वत:च्या बायकापोरांबरोबर धाकटे भाऊबहिण आणि माईंची जबाबदारी होती. लवकरात लवकर सावरले आणि पुन्हा कामावर रुजू झाले. अश्यातच एके दिवशी, दादांना जाऊन पंधरा-वीस दिवस झाले असताना, काकांची कामाला जाण्याची तयारी चालू होती. काकी स्वयंपाकघरात होत्या आणि माई नेहमीसारख्या देवघरात... आणि तो येऊन खिडकीत बसला!

काव काव, काव काव .. त्याची पहिलीच साद सर्वांच्या कानाला चिरत गेली. काका भाजीपोळीचा नाश्ता करत होते. त्याचा आवाज ऐकून काकांच्या घशाखाली घास उतरेनासा झाला. जसे एखादा ओळखीचाच आवाज होता. त्यांनी काकींकडे एकवार पाहिले. काकी काय ते समजल्या. गरमागरम पोळीचा एक तुकडा तोडला आणि खिडकीवर ठेवला. पण तो काही खायला पुढे आला नाही. कदाचित घाबरत असावा म्हणून त्यांनी तो तुकडा त्याच्या आणखी जवळ सरकवला आणि स्वत: थोड्या दूर जाऊन उभ्या राहिल्या. पण अजूनही तो जागचे हलायचे नाव घेत नव्हता. मग काकांच्या सांगण्यावरून थोडीशी भाजी सुद्धा त्या चपातीवर ठेवली. पण तो मात्र ढिम्म!

आता मात्र काकांना उशीर होत होता. पण पाय घरातून निघत नव्हता. तो अजूनही तिथेच होता. अधूनमधून चपातीच्या तुकड्याकडे बघत एक ‘काव’ करायचा आणि मग काही काळासाठी शांत व्हायचा. पण इथे काकांचा जीव कावला होता. त्यांनी मनोमन प्रार्थना केली, हात जोडून झाले. पण दादा ऐकायला तयारच नव्हते. इतक्यात माईंनी आतून आवाज दिला, "केशव, दूधात भिजवून घाल ती पोळी. यांना फार आवडायची.." आणि काय तो चमत्कार. तसे करताच दुसर्‍याच क्षणी तो झेपावला आणि पोळीचा तुकडा उचलत दिसेनासा झाला.

..... पण त्याच दिवशी दुपारी काकांना तो पुन्हा दिसला!
कंपनीच्या कॅंटीनबाहेर. तोच तसाच की आणखी कोणी समजायला वाव नव्हता. सर्वांचेच रंगरुप आणि शरीरयष्टी एकसारखीच तर असते. पण आवाज ओळखीचा होता. सकाळचीच ती साद. इतर कोणाचे लक्ष नव्हते, पण काकांची पुन्हा घालमेल सुरू झाली. पोळीचा एक छोटासा तुकडा खिडकीवर नेऊन ठेवला खरे, पण दूधात भिजवल्याशिवाय तो घेणार नव्हताच. मग कॅंटीनमधूनच थोड्याश्या दूधाची सोय केली आणि अपेक्षेप्रमाणेच तो ती दूधपोळी घेऊन उडाला.

त्यानंतर हे असे रोजचेच झाले. सकाळी दूधपोळीचा एक तुकडा खिडकीमध्ये आणि दुपारी कंपनीच्या कॅंटीनमध्ये. काकांनी कंपनीतला किस्सा अजून घरी कोणालाच सांगितला नव्हता. तो तोच कावळा असावा असा विश्वास अजून त्यांना स्वत:ला पटला नव्हता. कुर्ला-वडाळा अंतर तसे फारसे जास्त नसले तरी फारसे कमी सुद्धा नाहीये जे कावळ्याने रोजच्या रोज रमतगमत उडावे. ते देखील चपातीच्या एका तुकड्यासाठी. त्यातही नेमके काकांची कंपनी हुडकून त्यांच्या समोर हजर होणे.. सारेच विलक्षण!

काकांनी अखेर याचा छडा लावायचे ठरवले. काकींना विश्वासात घेतले. त्यांना हा घडणारा प्रकार सांगितला. त्यांनाही खरेखोटे जाणून घ्यायची उत्सुकता लागून राहिली. दुसर्‍यादिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे काकींनी दूधपोळी खिडकीवर ठेवली. काका जवळच भिंतीचा आडोसा घेत लपून राहिले. तो चपाती उचलायला खिडकीवर आला तसे काकांनी हातात असलेली पांढर्‍या रंगाची डबी त्याच्यावर रिकामी केली. चपाती उचलत उडायच्या आधी त्याच्या पायांवर आणि थोडाफार पंखावर तो पांढरा रंग उठून दिसत असल्याचे काकांनी नक्की केले.

दुपारी कॅंटीनच्या खिडकीवर तो पुन्हा आला. नेहमीसारखाच. सादही घालू लागला. काकांनी दूधपोळी घेतली आणि खिडकीच्या किंचित जवळच ठेवली. हेतू हा की तो पुढे यावा आणि त्याचे जवळून निरीक्षण करता यावे. तसे झाले खरे, पण अपेक्षेप्रमाणे तो पांढरा रंग त्यांना कुठेच दिसला नाही. ते बहुधा दादा नव्हतेच. काकांनी थोडेसे इथून तर थोडेसे तिथून, असे वेगवेगळ्या कोनातून निरखायचा प्रयत्न केला पण छ्या! अन इतक्यात तो उडाला. काकांची नजर अजूनही त्याच्या पंखांच्या हालचालीवर आणि पायावरच खिळून होती. कदाचित रंग उडाला असावा, पुर्ण नाही तर थोडाफार उडाला असावा, थोडासा शिल्लक असावा आणि कुठेतरी किंचितशी छटा दिसण्यात यावी.. पण तो कावळा उडाला ते थेट समोरच्या झाडावर जाऊन बसला. सर्वात उंचीवरच्या फांदीवर. चोचीतला चपातीचा तुकडा पायांखाली पकडून त्याने त्याच ओळखीच्या आवाजात एक साद घातली.. काव काव.. काव काव.. आणि कुठूनसा आणखी एक कावळा उडत येऊन त्याच्या शेजारी बसला. काका बघतच बसले. तो दुसरा कावळा तोच सकाळचा होता. पांढर्‍या रंगाचे नक्षीकाम त्याच्या अंगावर स्पष्ट दिसत होते. काव काव करत त्यानेही एक आवाज दिला. तोच ओळखीचा आवाज. दोघांनी मिळून त्या चपातीचा तुकडा अर्धा अर्धा करत वाटून घेतला आणि दोघे दोन वेगळ्या दिशांना उडून गेले.

काका घरी आले ते काही गोंधळलेल्या अवस्थेतच. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत घडलेला संपुर्ण किस्सा त्यांनी घरातल्या सर्वांना सांगितला. कोणाला काही उकल लागत नव्हती. सारे आपापले तर्क लढवत होते. जर पहिला कावळा म्हणजे दादा मानले तर तो दुसरा कावळा कोण होता. दिसायला हुबेहूब, आवाजातही साम्य, खाण्यापिण्याच्या आवडीदेखील समान.. तो कोण असू शकतो.. आणि इतक्यात,

"ती चिऊ असणार.." देवघरातून आवाज आला. सारे वळून त्या दिशेने बघू लागले. माई कापर्‍या हातात उदबत्ती घेऊन उभ्या होत्या. दरवळणार्‍या धूरातही त्यांच्या डोळ्यातले पाणी लपत नव्हते.
"कोण चिऊ??" दोन तीन आवाज एकदमच उमटले.
"यांची जुळी बहीण. चौदा दिवसांची असतानाच गेली ..."

- ऋन्मेऽऽष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अदिति,
घराच्या खिडकीवर काऊ होता, आणि ऑफिसच्य खिडकीवर चिऊ.
पण चिऊ उडून समोरच्या फांदीवर जाऊन बसते तेव्हा काऊ सुद्धा तिथे काकांना दिसला.
म्हणजे कदाचित सकाळी काऊबरोबर चिऊ सुद्धा अशीच आसपास कुठेतरी असावी.
सकाळी काऊ चिऊशी दूधपोळी शेअर करायचा तर दुपारी चिऊ काऊशी शेअर करायची.
दोघेही उडून रोजच्या रोज कुर्ला ते वडाळा प्रवास करायचे. अर्थात, काहीच दिवस.
आणि वडाळा ते कुर्ला अंतर म्हणाल तर स्लो लोकल ट्रेनची दहा मिनिटे.

Pages