एक घास काऊचा, एक घास चिऊचा.

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 November, 2014 - 07:22

लहानपणी आपण सर्वांनी चिऊकाऊच्या बर्‍याच गोष्टी ऐकल्या असतील. त्या ऐकता ऐकता एक घास काऊचा आणि एक घास चिऊचा असे म्हणत वरणभातही खाल्ला असावा. पण आज जी चिऊ काऊची गोष्ट मी इथे सांगणार आहे ती मोठ्यांसाठी आहे. मलाही समज आल्यावरच मोठ्या काकांनी सांगितली होती.. कित्येकदा.. गोष्टच तशी होती.. एक सत्यघटना, जे ती कधीच विसरू शकले नाहीत. ना मी ती विसरलोय. जशीच्या तशी, तुमच्यासाठी!

...

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातील. मोठे काका (माझ्या वडीलांचे मावसभाऊ) तेव्हा राहायला मुंबईत कुर्ल्याला होते. वडाळ्याला ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ का कुठल्याश्या कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामाला लागलेले. माई-दादा म्हणजे त्यांचे आईवडीलसुद्धा त्यांच्याबरोबरच असायचे. कसल्याश्या आजाराचे निमित्त झाले आणि दादा गेले. खचून जायची वेळ नव्हती. स्वत:च्या बायकापोरांबरोबर धाकटे भाऊबहिण आणि माईंची जबाबदारी होती. लवकरात लवकर सावरले आणि पुन्हा कामावर रुजू झाले. अश्यातच एके दिवशी, दादांना जाऊन पंधरा-वीस दिवस झाले असताना, काकांची कामाला जाण्याची तयारी चालू होती. काकी स्वयंपाकघरात होत्या आणि माई नेहमीसारख्या देवघरात... आणि तो येऊन खिडकीत बसला!

काव काव, काव काव .. त्याची पहिलीच साद सर्वांच्या कानाला चिरत गेली. काका भाजीपोळीचा नाश्ता करत होते. त्याचा आवाज ऐकून काकांच्या घशाखाली घास उतरेनासा झाला. जसे एखादा ओळखीचाच आवाज होता. त्यांनी काकींकडे एकवार पाहिले. काकी काय ते समजल्या. गरमागरम पोळीचा एक तुकडा तोडला आणि खिडकीवर ठेवला. पण तो काही खायला पुढे आला नाही. कदाचित घाबरत असावा म्हणून त्यांनी तो तुकडा त्याच्या आणखी जवळ सरकवला आणि स्वत: थोड्या दूर जाऊन उभ्या राहिल्या. पण अजूनही तो जागचे हलायचे नाव घेत नव्हता. मग काकांच्या सांगण्यावरून थोडीशी भाजी सुद्धा त्या चपातीवर ठेवली. पण तो मात्र ढिम्म!

आता मात्र काकांना उशीर होत होता. पण पाय घरातून निघत नव्हता. तो अजूनही तिथेच होता. अधूनमधून चपातीच्या तुकड्याकडे बघत एक ‘काव’ करायचा आणि मग काही काळासाठी शांत व्हायचा. पण इथे काकांचा जीव कावला होता. त्यांनी मनोमन प्रार्थना केली, हात जोडून झाले. पण दादा ऐकायला तयारच नव्हते. इतक्यात माईंनी आतून आवाज दिला, "केशव, दूधात भिजवून घाल ती पोळी. यांना फार आवडायची.." आणि काय तो चमत्कार. तसे करताच दुसर्‍याच क्षणी तो झेपावला आणि पोळीचा तुकडा उचलत दिसेनासा झाला.

..... पण त्याच दिवशी दुपारी काकांना तो पुन्हा दिसला!
कंपनीच्या कॅंटीनबाहेर. तोच तसाच की आणखी कोणी समजायला वाव नव्हता. सर्वांचेच रंगरुप आणि शरीरयष्टी एकसारखीच तर असते. पण आवाज ओळखीचा होता. सकाळचीच ती साद. इतर कोणाचे लक्ष नव्हते, पण काकांची पुन्हा घालमेल सुरू झाली. पोळीचा एक छोटासा तुकडा खिडकीवर नेऊन ठेवला खरे, पण दूधात भिजवल्याशिवाय तो घेणार नव्हताच. मग कॅंटीनमधूनच थोड्याश्या दूधाची सोय केली आणि अपेक्षेप्रमाणेच तो ती दूधपोळी घेऊन उडाला.

त्यानंतर हे असे रोजचेच झाले. सकाळी दूधपोळीचा एक तुकडा खिडकीमध्ये आणि दुपारी कंपनीच्या कॅंटीनमध्ये. काकांनी कंपनीतला किस्सा अजून घरी कोणालाच सांगितला नव्हता. तो तोच कावळा असावा असा विश्वास अजून त्यांना स्वत:ला पटला नव्हता. कुर्ला-वडाळा अंतर तसे फारसे जास्त नसले तरी फारसे कमी सुद्धा नाहीये जे कावळ्याने रोजच्या रोज रमतगमत उडावे. ते देखील चपातीच्या एका तुकड्यासाठी. त्यातही नेमके काकांची कंपनी हुडकून त्यांच्या समोर हजर होणे.. सारेच विलक्षण!

काकांनी अखेर याचा छडा लावायचे ठरवले. काकींना विश्वासात घेतले. त्यांना हा घडणारा प्रकार सांगितला. त्यांनाही खरेखोटे जाणून घ्यायची उत्सुकता लागून राहिली. दुसर्‍यादिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे काकींनी दूधपोळी खिडकीवर ठेवली. काका जवळच भिंतीचा आडोसा घेत लपून राहिले. तो चपाती उचलायला खिडकीवर आला तसे काकांनी हातात असलेली पांढर्‍या रंगाची डबी त्याच्यावर रिकामी केली. चपाती उचलत उडायच्या आधी त्याच्या पायांवर आणि थोडाफार पंखावर तो पांढरा रंग उठून दिसत असल्याचे काकांनी नक्की केले.

दुपारी कॅंटीनच्या खिडकीवर तो पुन्हा आला. नेहमीसारखाच. सादही घालू लागला. काकांनी दूधपोळी घेतली आणि खिडकीच्या किंचित जवळच ठेवली. हेतू हा की तो पुढे यावा आणि त्याचे जवळून निरीक्षण करता यावे. तसे झाले खरे, पण अपेक्षेप्रमाणे तो पांढरा रंग त्यांना कुठेच दिसला नाही. ते बहुधा दादा नव्हतेच. काकांनी थोडेसे इथून तर थोडेसे तिथून, असे वेगवेगळ्या कोनातून निरखायचा प्रयत्न केला पण छ्या! अन इतक्यात तो उडाला. काकांची नजर अजूनही त्याच्या पंखांच्या हालचालीवर आणि पायावरच खिळून होती. कदाचित रंग उडाला असावा, पुर्ण नाही तर थोडाफार उडाला असावा, थोडासा शिल्लक असावा आणि कुठेतरी किंचितशी छटा दिसण्यात यावी.. पण तो कावळा उडाला ते थेट समोरच्या झाडावर जाऊन बसला. सर्वात उंचीवरच्या फांदीवर. चोचीतला चपातीचा तुकडा पायांखाली पकडून त्याने त्याच ओळखीच्या आवाजात एक साद घातली.. काव काव.. काव काव.. आणि कुठूनसा आणखी एक कावळा उडत येऊन त्याच्या शेजारी बसला. काका बघतच बसले. तो दुसरा कावळा तोच सकाळचा होता. पांढर्‍या रंगाचे नक्षीकाम त्याच्या अंगावर स्पष्ट दिसत होते. काव काव करत त्यानेही एक आवाज दिला. तोच ओळखीचा आवाज. दोघांनी मिळून त्या चपातीचा तुकडा अर्धा अर्धा करत वाटून घेतला आणि दोघे दोन वेगळ्या दिशांना उडून गेले.

काका घरी आले ते काही गोंधळलेल्या अवस्थेतच. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत घडलेला संपुर्ण किस्सा त्यांनी घरातल्या सर्वांना सांगितला. कोणाला काही उकल लागत नव्हती. सारे आपापले तर्क लढवत होते. जर पहिला कावळा म्हणजे दादा मानले तर तो दुसरा कावळा कोण होता. दिसायला हुबेहूब, आवाजातही साम्य, खाण्यापिण्याच्या आवडीदेखील समान.. तो कोण असू शकतो.. आणि इतक्यात,

"ती चिऊ असणार.." देवघरातून आवाज आला. सारे वळून त्या दिशेने बघू लागले. माई कापर्‍या हातात उदबत्ती घेऊन उभ्या होत्या. दरवळणार्‍या धूरातही त्यांच्या डोळ्यातले पाणी लपत नव्हते.
"कोण चिऊ??" दोन तीन आवाज एकदमच उमटले.
"यांची जुळी बहीण. चौदा दिवसांची असतानाच गेली ..."

- ऋन्मेऽऽष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद हर्पेन, पण आहे सत्यघटना.
गोष्ट म्हणूनच रंगवायची असती तर मीठमसालाही लावला असता. (काकांनी सांगताना लावला असेल तर कल्पना नाही)
बाकी कसलीही अंधश्रद्धा पसरवायचा हेतू नाही, मात्र कावळ्यांचे अनुभव सर्वांनाच येत असावेत, काही तरी शास्त्रीय कारण यामागे असावेच.

एक महिना उशीर वगैरे नाही, काल आठवले हे सो लिहिले आणि पटकन टाकले, ११ महिने वाट बघण्यापेक्षा हे चांगले असा विचार केला Happy

अवांतर - गेले काही दिवस हे बरेच Light 1 दिवा प्रकरण पाहिलेय म्हणून अखेर नमूद करावेसे वाटतेय, मला कोणतीही पोस्ट टाकताना हा दिवा नाही दाखवला तरी चालेल, मी सारे तसेच घेतो, किंबहुना दिवे घेत जगणे हाच माझ्या लाईफचा फंडा आहे Happy

सकाळचा कावळा पण दुसर्या कावळ्याला पोळीतला अर्धा तुकडा देतो का नाही हे पाहिले का नाही काकांनी? बहीणीने भावासाठी हे केले यात विशेष ते काय, घरपण टिकून राहते. या धाग्याचे नाव "वेड्या बहिणीची वेडी ही माया" पण छान वाटेल.

सकाळचा कावळा पण दुसर्या कावळ्याला पोळीतला अर्धा तुकडा देतो का नाही हे पाहिले का नाही काकांनी?
>>>>>>>>>

शक्य आहे, किंबहुना असेलच, म्हणून त्यानंतर काकांनी रोज सकाळी घरातच दूधचपातीचे दोन तुकडे ठेवायला सुरुवात केली होती. त्यानंतर मग कंपनीमधील कावळा यायचा बंद झाला. बहुतेक सकाळीच ते दोन तुकडे आपापसात एक असे वाटून घेत असावेत.
अर्थात हे सारे मी लेखात टाकले नाही कारण दूरचे काका असल्याने फारसे डिटेल नाहीयेत माझ्याजवळ.. असो, पण याउपर आता खरे खोटे करणे शक्य नाही कारण ते काका स्वतःच आता एक कावळा झाले आहेत.

असो, आपण सुचवलेले नाव सुद्धा छान, पण त्या आजोबांच्या बहिणीचे नाव चिऊ असल्याने (कदाचित पाळण्यातील असावे) आणि ते असे एकेक घास वाटून घेत असल्याने हे शीर्षक मला जास्त समर्पक वाटले.

परवा आमच्या कुत्र्यानं एक उंदीर मारला तो पण एका कावळ्याने उचलून नेला.>>

कुत्र्याने मारायचे काम करायचे पण मलई (उंदीर) खायचा कावळ्याने. तुम्ही ऐतखाऊ कावळ्यांचा बंदोबस्त करावा म्हणून जनाआंदोलन उभारा Proud

परवा आमच्या कुत्र्यानं एक उंदीर मारला तो पण एका कावळ्याने उचलून नेला.
<<
<<
मांजर उंदिर मारतात हे तर ऐकल होत, पण आता कुत्र्यांनी पण उंदिर मारायचा उद्योग सुरु केला की काय?
Happy

अर्थात हे सारे मी लेखात टाकले नाही कारण दूरचे काका असल्याने फारसे डिटेल नाहीयेत माझ्याजवळ.. असो, पण याउपर आता खरे खोटे करणे शक्य नाही कारण ते काका स्वतःच आता एक कावळा झाले आहेत.
<<
<<
Lol

लेख आवडला. विश्वास असो नसो पण या गोष्टी बरेच जण मानतात .माझ्या( वडिलांचे आई वडिल)आजी आजोबांनाही जे पदार्थ आवडत होते तेच पदार्थ त्यांना पितृपक्षात पानात वाढलेले असताना कावळ्याने उचलले तर माझ्या आईला त्यांनीच खाल्ल्याचं समाधान वाटते.

जे पदार्थ आवडत होते तेच पदार्थ त्यांना पितृपक्षात पानात वाढलेले असताना कावळ्याने उचलले
>>>>>>
हो हे बरेचदा होते.
आवडीचेच पदार्थ का त्या कावळ्याचेही फेव्हरेट असतात याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केल्यास अखेर यावर विश्वास ठेवावाच लागतो.

..... आणि म्हणूनच मृत्युपत्रात आपल्या आवडीच्या पदार्थांची एक लिस्ट बनवून जायची, म्हणजे आपला कावळा उपाशी राहायला नको. Wink

कोकणस्थ,
आपण स्वतः कावळा बनतो हे कन्सेप्ट मला चुकीचे वाटते. कारण एखादी व्यक्ती मेल्यावर ती लगेच कावळ्याचा जन्म घेऊन मोठी कशी होऊ शकते. किंवा तात्या विंचूसारखा आपला आत्मा एखाद्या कावळ्यात कायमस्वरूपी जातो म्हटले तर मग त्या कावळ्याचा आत्मा कुठे जातो हा प्रश्न शिल्लकच. त्यामुळे मला वाटते की आपण मरणानंतर एखादा कावळा सिलेक्ट करून त्याला वश करत असावे वा त्याला आपला आत्मा त्याला झपाटत असावा.

इथे फारच खिल्ली उडवणं सुरू आहे.
माझा अशा गोष्टींवर फार विश्वास नाही पण आपल्या लाडक्या माणसांना आपण सतत आपल्या भोवती शोधत असणार याची जाणिव आहे मला.
ऋन्मेष माझी सहसंवेदना.

दक्षिणा, धन्यवाद आणि सेम हिअर. माझा स्वतःचाही फारसा विश्वास नाहीच. किंबहुना कोणाच्या व्यक्तीगत भावना न दुखावता मी अंधश्रद्धांचीही टिंगलटवाळीच करतो. पण स्वत:च्या आजोबांच्या जाण्यानंतर जेव्हा वडीलांना ते कुठल्या कावळ्याच्या स्वरुपात दिसतात तेव्हा त्या भावनांची थट्टा उडवता येत नाही याचा अनुभव आहे. आणि म्हणूनच जाणही आहे.

फारसे तर्क न लढवता आयुष्य सुखकर असेल तर राहू द्यावे तसे.

हम्म!
आमच्या कडे आलेल्या गुरुजींच्या म्हणण्यानुसार मृत व्यक्ती कावळा बनत नाही तर कावळ्याला आत्मा दिसतो. आणि इच्छा अपूर्ण असतील तर पिंडदानाच्या वेळी आत्मा घोटाळत असेल तर कावळा वाढलेल्या पानाजवळ येत नाही. खरे खोटे कुणास ठाऊक परंतू मृत्यू आणि कावळ्याबद्दल हिंदू धर्मात समज आहेत तसे समज अमेरिकेतील नेटिव कल्चरमधेही आहेत असे कळले तेव्हा मला आश्चर्य वाटले होते. अमेरिकन नेटिव कावळ्याला जीवन आणि मृत्यूच्या प्रदेशातील मध्यस्त मानतात. कावळे, आत्म्याला मृत्यूप्रदेशात जाताना वाटाड्या म्हणून काम करतात असा समज आहे.

हे आजी आजोबा वडिलांचे आईवडिल असुनही माझे वडिल म्हणतात "जे पण माणुस त्याच्या आवडीचे खातो ते जिवंतपणीच "आणि "ते आम्ही त्यांना भरपुर मनसोक्त अगदी शेवटच्या त्यांच्या श्वासापर्यंत देण्याची काळ्जी घेतली आहे त्यामुळे अश्या गोष्टी करु नयेत " माझेही तेच मत आहे .व माझा आणि माझ्या वडिलांचा या गोष्टींवर तितकासा विश्वासही नाही पण आईच्या आनंदासाठी आम्हाला करावं लागत. कावळ्यावर भुतदया म्हणुन ठिक अशी समजुत घालुन घेते मी स्वतःची. Happy .

१. कावळा फार गूढ व हुषार पक्षी आहे.

२. कावळा अनेकदा इतर पक्ष्यांना सूचना देतो. दोन प्रसंग मी पाहिलेले आहेत. त्यातील एक प्रसंग नेहमीच पाहतो. खायला टाकलेल्या गोष्टीतील ज्या गोष्टी कावळ्याला खायच्या नसतात त्या खाण्यासाठी तो इतर पक्ष्यांना (जसे कबूतरांना) जणू आमंत्रणच धाडतो. तेही तिथे बसून! दुसरा प्रसंग एकदाच पाहिला. अनेक कबूतरांना पाहून एक मांजर दबा धरून बसलेले असताना दोन कावळे त्या कबूतरांच्या अगदी जवळून उडत व ओरडत गेले व सर्व कबूतरे तत्क्षणी उडाली. एकंदर घटनाप्रसंग पाहून असे मानणे मुळीच खोटे वाटले नाही की कावळ्यांनी कबूतरांना वाचवले.

३. कावळा शिकारही करतो. बिळात जात असलेला उंदीर धरून बाहेर ओढणारा कावळा पाहिलेला आहे.

४. काही वेळा कावळा चक्क कबूतरांना घाबरतो हेही पाहिलेले आहे.

५. कावळा माणसांना चेहर्‍याने ओळखणारा एकमेव पक्षी आहे असे म्हणतात (व ते सिद्ध करणारा एक परदेशीय व्हिडिओही आहे).

धाग्याच्या विषयाबाबतः

आई गेल्यापासून आमच्याही खिडकीत एक कावळा येऊ लागला. आधी एकही कावळा येत नसे. तो कावळा सुरुवातीला शांत बसे, नंतर उपस्थितीची जाणीव करून देण्याइतपतच कावकाव करत असे आणि तरीही काही ठेवले नाही तर प्रचंड इर्रिटेटिंग कावकाव करत असे. त्यानंतर त्याने चित्रविचित्र आवाजही करायला सुरुवात केलेली होती. आईच्या दहाव्या दिवशी जेव्हा कावळा पहिली काही मिनिटे शिवत नव्हता तेव्हा काही नेहमीची आश्वासने मनातल्या मनात व्यक्त करून झाली. जसे मी म्हणालो की मी बाबांकडे बघेन, वडील म्हणाले की ते तिच्या उरलेल्या इच्छा पूर्ण करतील वगैरे! मग थोडा वेळ गेला आणि माझी बायको थोडी पुढे गेली आणि मनातल्या मनात म्हणाली की ती माझ्या बाबांची काळजी घेईल. त्याक्षणी कावळा शिवला. आता हा श्रद्धेचा भाग असल्याने ठामपणाने काही म्हणता येत नाही. पण हा अनुभव घेतलेला असल्यामुळे ऋन्मेष ह्यांच्या ह्या धाग्याबाबत मला कोणतेही विरोधी मत मांडायची इच्छा होत नाही आहे.

चु भु द्या घ्या

४. काही वेळा कावळा चक्क कबूतरांना घाबरतो हेही पाहिलेले आहे.
>>>
हे आमच्याकडे बरेच वेळा पाहिले आहे. कावळ्यांना पान वाढलेले असते पण कबुतरे कावळ्यांना हुकसवत ते खायला येतात. मग त्या कबूतरांना हुकसवावे लागते कारण तो पक्षी फार घाण करतो. भूतदयेच्या विरुद्ध वाटेल पण मुंबईत नाईलाज होतो.

घरचा घास घेणारा एक कावळा आणि ऑफिस चा घास घेणारा दुसरा (चिऊ). पण एक कळल नाही घरचा कावळा ऊडत ऑफिस ला जाउन शेअर करुन खातो की ऑफिसचा घरी येउन? शेअर करण्यासाठी दोघांना एकत्र याव तर लागणारच. पण घर ऑफिस मधे अंतर खुप आहे रोज दोन वेळा अप डाउन करायला. कन्फुज्ड.

Pages