हत्या: द मर्डर

Submitted by मंदार on 1 November, 2014 - 12:40

थ्री इडीयटस मधे वीरु सहस्रबुद्धे एके ठिकाणी म्हणतो, की चंद्रावर गेलेल्या पहील्या माणसाचं नाव सर्व जगाला माहीतीय, पण त्याच्या मागोमाग गेलेल्या दुसर्‍या माणसाचं नाव मात्र कोणालाच माहीत नाही. तसाच काहीसा प्रकार 'हत्या: द मर्डर' या चित्रपटाबाबत घडलेला आहे. निर्मीतीस ११ वर्षे लागलेला 'मुघल-ए-आझम' सगळ्यांना माहीत आहे, पण १९९२ ते २००३ अशी तब्बल ११ वर्षे अविरत कष्ट करुन बनलेली उत्तुंग कलाकृती म्हणजेच 'हत्या: द मर्डर' मात्र फारशा लोकांना माहीत नाही. या भव्य चित्रपटाची ओळख व्हावी म्हणून हा रिव्हूप्रपंच!

तर चित्रपटाच्या सुरुवातीलाच कार्पेटवरुन टॉक-टॉक बुट वाजवत रझा मुराद जिना उतरुन खाली येतो. रझा मुराद शास्त्रज्ञ असतो. खाली २-३ फालतू माणसे - ज्यांना बघताच ती व्हीलन आहेत हे ओळखू येते - असतात. त्यातला एक रझा मुराद ला विचारतो - की "आज कुठला शोध लावला शास्त्रज्ञ साहेब?" हा प्रश्न आजवर "मग आज कुठली भाजी केलीय?" वगैरे स्वरुपात ऐकला होता, पण हा रोज शोध लावणारा शास्त्रज्ञ पहील्यांदाच आढळला! मग आधी रझा मुराद त्याने लावलेल्या शोधासाठी वापरलेली रेफरन्स बुक्स वगैरेची थोडक्यात माहीती देतो जसे की रुग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, स्वयं ब्रह्मा ने बताया हुआ सृष्टीका अदभुत चमत्कार वगैरे वगैरे. तर या शोधानुसार दक्षिणेकडे एक नाग १०० वर्षे शंकराची तपश्चर्या करुन इच्छाधारी बनणार असतो. आता रझा मुराद मुंबईत रहात असतो असे धरले, तरी दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण मुंबई/पुणे/बंगलोर ते पार श्रीलंकेपर्यंत जाता येईल. एवढ्या एरीयामधे नाग कसाकाय शोधणार? परंतू तेवढ्यात दुसरा एक जण म्हणतो की अरे, दक्षिणेकडे तर रतनलाल चं फार्महाउस आहे. चला म्हणजे एक प्रश्न चुटकीसरशी सुटला.
मग १०० वर्षे शंकराची तपश्चर्या केलेला शक्तीशाली इच्छाधारी नाग, ज्याला पकडून तिन्ही लोकांवर राज्य करणे शक्य असते, त्याला पकडायला ते एक लोकल गारुडी पाठवतात:

HT01.jpg

आता कल्पना करा, की तुम्ही हॉल मधे बसला आहात अन एकदम तुमच्या नजरेसमोर एक झुरळ सोफ्याखाली पळालं. तर तुम्ही रेड/हीट वगैरे स्प्रे हातात घेउन जसे बारकाईने जमिन निरखत चालाल, त्याच प्रमाणे हा गारुडी पुंगी वाजवत रतनलालच्या फार्महाउसपाशी इच्छाधारी नाग शोधू लागतो. पुंगी ऐकून नागच देवळातून बाहेर येतो, अन सामान्य गारुडी त्याला एका अतिसामान्य टोपलीत बंद करतो.
तेवढ्यात आतून शाल पांघरलेला, अत्यंत सात्विक भाव चेहर्‍यावर असलेला नवीन निश्चल येतो. हाच रतनलाल. तो गारुड्याला म्हणतो की नागाला सोडून दे. वास्तविक शेंबडं पोरदेखील ज्याला घाबरणार नाही अशा अवस्थेत नवीन निश्चल असतो. पण व्हीलनच्या गँगमधला गारुडी घाबरुन जातो, किंवा त्याला बहुदा वाटते, की रतनलाल चे मन मोडून तिन्ही लोकांत सत्ता मिळवली तरी त्याचा काय उपयोग? त्यामुळे नाइलाजाने तो नाग लगेच सोडून देउन निघून जातो. इच्छाधारी नागावर रतनलालचे उपकार असतात याची तुम्हा-आम्हा जाणिव असावी हे या प्रसंगामागचे प्रयोजन!

पण त्यामुळे बाकी व्हीलन मंडळी अर्थातच खवळतात. त्यांच्यातला एक साधू असतो, तो तर भलता खवळतो, अन त्या भरात एक सुंदर डायलॉग बोलतो, तो असा - "हे ईच्छाधारी नाग, तू जहा कहा भी है सुनले! तू बहेरा तो है ही, मै तुझे अंधा भी बनाकर मेरा सेवक बनाउंगा!"

ताबडतोब पुढच्या शॉट मधे आंधळा अक्षयकुमार दिसतो. केवळ अंधा नाग अन अक्षय कुमार यांच्यातील कनेक्शन दाखवण्यासाठी हा शॉट असून त्याचा बाकी पिक्चरशी काहीच संबंध नाही. (एकूणच बर्‍याच शॉट्सचा चित्रपटाशी वा परस्परांशी काहीच संबंध नाही, पण असो!) तर वास्तविक अक्षयकुमार आंधळा असल्याचे नाटक करुन पोरींचे हात पकडून रस्ता ओलांडावा अशा लबाड विचारात असतो. त्याप्रमाणे एक पोरगी त्याला रस्ता ओलांडून देताना बेसिक प्रश्न विचारते, की क्या तुम सचमुच अंधे हो? तर तो म्हणतो की हा, इसिलिये मुझे तुम्हारे काले बाल, लाल लिपस्टीक, निला शर्ट बिलकूल दिखाई नही दे रहा. पण पोरगी चतूर निघते, अन अक्षयकुमार ची धुलाई करायला मैत्रीणींना बोलावते. चारी बाजूंनी मैत्रिणी अक्षयकुमारकडे सरकत असताना मधेच स्क्रीनवर वर्षा उसगावकर प्रकटते. मला वाटले ती त्यांच्यापैकीच असावी, पण आता एका बागेत फक्त ती अन अक्षयकुमार असतात. तिथे ती सांगते की तिचे लग्न ठरले आहे. अक्षयकुमार आनंदाने तिचे अभिनंदन करतो, त्यामुळे खवळून ती विचारते की मी हिरोईन, तू हिरो तरी हे ऐकून तू चिडला नाहीस का? अक्षय म्हणतो नाही. ती चिडून त्याला एक सणसणीत कानाखाली लगावते. लगोलग तो तिला कानाखाली लगावतो. ती रडू लागते, अक्षय मानेनी नाही म्हणतो, तिला जवळ घेउन तिचा किस घेतो अन ते गाणं म्हणू लागतात. गाणं संपत आलेलं असताना अन दर्‍याखोर्‍यातून फिरत असताना अचानक समोर अक्षय ची आई - रिमा लागू येते. अक्षय ओळख करुन देतो की ये तेरी बहू, ती म्हणते वडीलांना सांग. वडील म्हणजेच रतनलाल!
रतनलाल वर्षा उसगावकर ला म्हणतो की अक्षय हा एक मुर्ख माणूस आहे, तू त्याच्याशी लग्न आजीबात करु नको. ती म्हणते असूदे, मला चालेल. तो म्हणतो ठीक आहे, पण आधी याला अमेरिकेला जाउन डिग्री घेउदे. ती म्हणते ओके. मग एक विमान टेकऑफ घेताना क्षणभर दिसले. तिकडे गेल्यावर अक्षय रिमा लागूला फोन करुन सांगतो की मी मजेत आहे. रिमा लागू म्हणते मग मी इकडे वर्षा उसगावकरचं लग्न लाउन देते. अक्षय म्हणतो नको नको, मी येतो तिकडे. मग तेच टेकऑफ केलेले विमान लँण्ड होते अन अक्षय डिग्री घेउन परततो! (हा पॅरॅग्राफ टाइप करायला मला ५ मिनीटे लागली पण प्रत्यक्ष चित्रपटात हे सर्व २ मिनीटात घडले)

आता मुरुगन नावाच्या मुख्य व्हीलनची एन्ट्री होते. इंट्रोडक्शनला तोच सांगतो की शाळेत असतानासुद्धा त्याला शाळेतील मुले 'गुन्हाओंका देवता' म्हणत. तो बिजनेसमन कम बिल्डर कम व्हीलन असून त्याला रतनलालचे फार्महाउस हवे असते. रतनलाल अर्थातच तयार नसतो. तोपर्यंत मागचे गाणे संपून बर्‍यापैकी वेळ झालेला असल्यामुळे वर्षा उसगावकर गाणे म्हणू लागते. ती सापांवर रिसर्च करत असल्यामुळे गारुड्यांच्या वस्तीत योग्य ते कपडे घालून नाच करते, गाणे म्हणते अन बेशुद्ध पडते.

मग अक्षय, रतनलाल अन अक्षयची बहीण कारमधून कुठुनतरी येत असतात. त्यांना मुरुगन गाठतो, अन दुहेरी वहीचा एक कागद दाखवून त्यावर रतनलालची सही मागतो. त्यामुळे त्यांची फायटींग सुरु होते. भर दुपारी उन्हात फायटींग सुरु असते अन त्याचवेळी तिकडे गडद रात्री विजा कडाडून वर्षा उसगावकर झोपेतून दचकून उठते अन ताबडतोब कारमधे बसून निघते. ती कार चालवताना आतून कॅमेरा मारतात तेव्हा बाहेर गडप अंधार दिसतो, पण बाहेरुन कार जाताना दिसते तेव्हा मात्र लख्ख उन असते. सुरुवातीला रझा मुराद सांगत असलेला सृष्टीचा अदभुत चमत्कार कदाचित हाच असावा. चित्रपटात एकाच वेळी घडत असलेले हे प्रसंग खालील चित्रात एकत्र केलेले आहेतः

HT06.jpg

मग ते व्हीलनचे लोक आधी रतनलाल, अन मग अक्षयच्या बहीणीला मारतात, अन अक्षयलाही मारुन एका दरीत टाकून देतात. तोवर तो इच्छाधारी नाग तिथे पोचतो अन सर्व पहातो. व्हीलन लोक गेल्यावर नाग मृत अक्षयकुमारमधे स्वतःला ट्रान्सप्लांट करतो, तेव्हा बॅकग्राउंडला 'कॉन्ट्रा' गेम मधल्या एका बंदुकीच्या आवाजासारखे म्युजिक वाजत असते.

HT02.jpg

मग वर्षा उसगावकर त्या निर्मनुष्य, आडबाजूला असलेल्या डोंगरात कार चालवित येते, अन जिथे अक्षय ला दरीत फेकलेले असते त्याच्या बरोब्बर वर कार थांबवते अन दरीत उतरु लागते. मग तिला जखमी अक्षयकुमार दिसतो अन ती किंकाळी फोडते.
मग अक्षयकुमार उर्फ इच्छाधारी नाग घरी येतो अन बरा होउन बदला घ्यायला सुरु करतो. नियमाप्रमाणे व्हीलनच्या टिममधल्या सर्वात फालतू अन प्रत्यक्ष खुनात नगण्य भुमिका बजावलेल्या माणसाचा मरण्यासाठी पहीला नंबर लागतो. तो एका कळकट्ट रुममधे एका कळकट्ट स्त्री बरोबर क्रीडा करत असतो. अक्षय कुमार नागरुपात तिथे पोचतो, पण क्रीडेत मग्न असलेल्या माणसाला चावायला त्यालाही ऑकवर्ड होते, म्हणून मग तो तिथल्या एका दारूच्या ग्लासात विष सोडतो.

HT03.jpg

विष सोडल्यावर लगेचच त्या माणसाला हातातले काम सोडून घोटभर दारु प्यायची इच्छा होते, अन तो दारु पिउन मरुन जातो!
मग बाकी व्हीलनची जाम टरकते. पण नंतर त्यांच्या टरकण्यामागचं कारण ऐकल्यावर पुढे अजून कायकाय बघायला लागणार आहे या विचाराने आपली दुप्पट टरकते! गँगमधला एकजण तर मेला. आता खरतर एका फुटकळ गुंडाच्या मरण्याचे समाजाला ना सोयर ना सुतक! त्यात मुरुगन 'मै पुलीस को भी बिलकूल नही डरता' असे स्वतःच म्हणणारा. पण सद्य परिस्थितीत सहकारी मेल्यावर आपण न रडल्यास लोकांना वाटेल की आपणच त्याला मारलय, या विचाराने तो अस्वस्थ झालेला असतो. मग दुसरा गुंड प्रार्थमिक उपाय सुचवतो, की तू रड की मग. पण मुरुगन म्हणतो की मला रडायलाच येत नाही! मग तो दुसरा गुंड म्हणतो, की जवळच एकजण भाड्याने खोटी रडणारी माणसे पुरवतो. अशा रितीने जॉनी लिव्हरची एंट्री होते. प्रत्यक्ष प्रेतापाशी केवळ व्हीलनची टीम अन जॉनी लिव्हरची टीम याखेरीज चिटपाखरु हजर नसते. कदाचीत जॉनी लिव्हरचे आचरट हावभाव अन रडणे बघून समाजानी काढता पाय घेतला असावा.

त्यानंतर नागाची शक्ती दाखवायला म्हणून एक बळच फायटींग दाखवली आहे. चार टपोरी गुंड - ज्यांना याआधी चित्रपटात कधीही पाहीले नाही - निवांत दारु पित बसलेले असतात. तर ते अचानक कुठल्यातरी अदृश्य शक्तीने हवेत फेकले जातात अन कशाकशावर आपटून मरतात. ती अदृश्य शक्ती कोण ते शेवटपर्यंत दाखवलेच नाही, तो अक्षयकुमारच होता असे गृहीत धरुया!

मग मधेच रिमा लागू अक्षय कुमारला लग्न कर म्हणते. तो म्हणतो ये हरगीज नही हो सकता. मग रिमा म्हणते शादी तो तुझे करनी ही होगी. तो म्हणतो ठिक है माँ. मग त्याचं वर्षा उसगावकरशी लग्न होतं. (हे सर्व लिखाण फार तुटक वाटत असलं तरी ते स्क्रीप्ट प्रमाणेच लिहिलंय. याच पद्धतीने अन वेगाने या गोष्टी चित्रपटात घडतात.)
मग लग्न झाल्यावर पहील्या रात्री अक्षयकुमार रुममधे फिरकतच नाही, अन वर्षा उसगावकर रात्र एकट्यानेच तळमळत काढते. लगेच सकाळी बाहेर २ नोकर आपसात बोलताना दाखवलेत, की सुहागरात को मालीक मालकीन के कमरे मे गये ही नही! बहुदा सगळ्या नोकरांना आग्रहाने बोलावून पहील्या रात्रीचे थेट प्रक्षेपण दाखवण्याचा प्लॅन असावा, कारण ती संधी हुकल्यामुळे त्यांचे हळहळलेले चेहरे स्पष्ट जाणवतात.

अधूनमधून तो साधू अन सुरुवातीचा लोकल गारुडी अक्षयच्या घरी येउन पुंगी वाजवून त्याला उगाच डोकं धरुन जमिनीवर लोळायला वगैरे लावतात, पण रिमा लागू अन वर्षा उसगावकर हजर असल्यामुळे त्यापलीकडे फारसं काही घडत नाही. इथे अजून एक विशेष गोष्ट म्हणजे एवढा शक्तीशाली, अदृश्य होउ शकणारा, माणसांना उचलून हवेत फेकू शकणारा नाग, पण कोणी पुंगी वाजवू लागले की त्याची पुंगी टाईट होत असते!

मग मुरुगन अक्षयला मारायला एक योजना आखतो. करोडोंकी बिजनेस डील करण्याच्या निमित्ताने सोनिया नावाची त्यांची साथिदार अक्षयला एका फाइव्ह स्टार हॉटेलमधे बोलावते. अक्षय तिथे थेट रुममधे पोचतो अन तिथेच लगोलग वेलकम साँग सुरु होते:

HT04.jpg

(इथे मला आमच्या क्लायंट बरोबरच्या मिटींग्ज आठवल्या अन कमालीचा न्युनगंड आला!) तर मिटींगचे गाणे गाता गाताच ते बिजनेस डीलची 'सर्वांगाने' चर्चा करतात, पण गाणे संपल्यावर अक्षय सोनीयाला चावतो अन ती मरुन जाते!

व्हीलनची पुढची आयडीया म्हणजे मुंगुस! आजवर आपण भुखा शेर, किंवा क्वचित भुखा मगरमच्छ पाहीला, येथे भुखे नेओले (मुंगुसं) आहेत. इच्छाधारी नाग बहुतांश वेळ मनुष्यरुपात राहून अचाट साहसकृत्ये करतो, पण त्याच्यावर मुंगुस सोडलं की त्याच्याशी मात्र त्याला नाग होउनच रक्तबंबाळ होत लढावे लागते. अशावेळी मनुष्यरुप धारण करुन मुंगुसाच्या पेकाटात एक लाथ मारावी, अशी इच्छा आजवर कोणत्याही इच्छाधारी नागास एकाही नागपटात झालेली नाही!

असो! अशा अनेक गोष्टी पुढेही घडतात, पण रिव्हू भलताच वाढत चालल्यामुळे जरा आवरतं घेतो. या अक्षयच्या सख्ख्या मामाचे काम केलंय लक्ष्मीकांत बेर्डे यांनी! रतनलालच्या इस्टेटीच्या लोभापाई आधी तो व्हीलन लोकांना सामील असतो, पण शेवटी हृद्यपरिवर्तन होउन तो अक्षयच्या पार्टीत येतो. मग त्याची माफक मदत घेउन अक्षय उरलेल्या सर्व व्हीलन्सचा खातमा करतो, अन शेवटी शंकराच्या कृपेने संपूर्ण माणूस बनून वर्षा उसगावकरबरोबर सुखाने नांदू लागतो!

कामे सर्वांचीच अप्रतिम झालेली आहेत. प्रदीर्घ कालावधीसाठी शूटींग चालू राहील्यामुळे या चित्रपटात अक्षयची विविध वयोगटातील रुपे पहावयास मिळतातः

HT05.jpg

अलिकडे एका लोकप्रिय नटाने पिक्चरमधे स्वतःचा असा डायलॉग मारायची पद्धत चालू केलीय. 'एक बार मैने कमिटमेंट' वगैरे डायलॉगवर बेभान होउन शिट्ट्या मारणार्‍या आजच्या युवा पिढीस आवर्जून सांगावेसे वाटते की ही मूळ संकल्पना मुरुगन यांची आहे. जितक्या वेळा मुरुगनचा सीन आलाय त्या प्रत्येक वेळेला न चुकता त्याने त्याचा खास डायलॉग मारला आहे. "दुनिया मे सिर्फ दो चीजे रहेगी, एक तो जमिन और दुसरा कमिन - याने के मै" हा तो डायलॉग!

*संपूर्ण चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या काळात अक्षयचे सर्व सिनेमे मी बघत असे.. हा कसा राहिला ??. आता एवढा अप्रतिम चित्रपट बघायचा राहिला म्हणून फारच चुटपुट लागून राहिलीय.

बाकी तो फोटु पाहुन, त्या सापाने आधी ग्लासातलं रंगीत पाणी पिलं असेल मगच त्यात विष घातलं असेल अस राहुन राहुन वाटतय.
नंतरच्या प्रसंगात साप वळवळ करत न जाता सरळ जाताना दिसला असेल तर नक्कीच रं पा आस्वाद घेतला अशी शंका घेवुन.
त्यासाठी चित्रपट पहावा लागेल.
झी सिनेमावर लक्ष ठेवेन आता.

"हे ईच्छाधारी नाग, तू जहा कहा भी है सुनले! तू बहेरा तो है ही, मै तुझे अंधा भी बनाकर मेरा सेवक बनाउंगा!"

केवळ अशक्य.....


आता एका बागेत फक्त ती अन अक्षयकुमार असतात. तिथे ती सांगते की तिचे लग्न ठरले आहे. अक्षयकुमार आनंदाने तिचे अभिनंदन करतो, त्यामुळे खवळून ती विचारते की मी हिरोईन, तू हिरो तरी हे ऐकून तू चिडला नाहीस का? अक्षय म्हणतो नाही. ती चिडून त्याला एक सणसणीत कानाखाली लगावते. लगोलग तो तिला कानाखाली लगावतो. ती रडू लागते, अक्षय मानेनी नाही म्हणतो, तिला जवळ घेउन तिचा किस घेतो अन ते गाणं म्हणू लागतात.

पण क्रीडेत मग्न असलेल्या माणसाला चावायला त्यालाही ऑकवर्ड होते,
बहुदा सगळ्या नोकरांना आग्रहाने बोलावून पहील्या रात्रीचे थेट प्रक्षेपण दाखवण्याचा प्लॅन असावा,

अरे काय आहे हे....फुर्कन चहा सांडला माझा....कैच्याकै लिहीले आहे.

मस्त लिहिलय.अशक्य हसतेय मी ,प्रत्येक पंच भारी. अक्षयच्या २० वर्षाच्या चिकाटीबरोबरच तुमची फोटोंसहीत व स्पेशल इफेक्टसहित या अश्या चित्रपटावर इतकं लिहायची चिकाटीही कौतुकास्पद्च आहे. एवढा छान रीत्या चित्रपट समजावल्याबद्द्ल धन्यवाद.
अचाट सिन्स साठी तरी पहायला हवा Happy

मंदार, हा चित्रपट पाहिल्याबद्दल (म्हणजे तो पाहिल्यानंतरही तुझं मानसिक संतुलन चांगल राहिल्याबद्दल) आणि अशा महान कलाकृतीची माबो करांना एवढी चांगली ओळख करून दिल्याबद्दल तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. Wink

तुझं परिक्षण वाचुन आता हा चित्रपट शुक्रवारी संध्याकाळी मित्रांबरोबर बघण्याच्या यादीत सर्वात वर टाकला आहे. तुझे पंचेस एक से एक आहेत! Happy

"हे ईच्छाधारी नाग, तू जहा कहा भी है सुनले! तू बहेरा तो है ही, मै तुझे अंधा भी बनाकर मेरा सेवक बनाउंगा!" >>> हे वाक्य "बहिर्‍या" असलेल्या नागाला! हे आधी लक्षात आले नव्हते Lol

सॉल्लिड आहे रिव्ह्यू. अशा महान कलाकृती नेहेमी अ आणि अ टीमच्या कलासक्त नजरेतून पाहिल्या की छान अप्रिशिएट करता येतात. Happy

सर्वांना धन्यवाद!

पहीलाच प्रयत्न होता, तुमच्या सर्वांच्या कॉमेंट्समुळे अजून लिहायला हुरुप आला.

या क्षेत्रातल्या जाणकारांनी बर्‍याच दिवसात अ अ चित्रपट परीक्षण लिहीलं नाहीये, त्यांनीही या निमीत्ताने पुन्हा लिहायला घ्यावं अशी विनंती! Happy

<< पन व्हिलन लोकांना कसं कळतं की तो इच्छाधारी नाग म्हणजेच अक्षय म्हणून? >>
यासाठी अजून एक अतर्क्य प्रसंग आहे चित्रपटात, पण लेखात काय काय अन किती लिहू त्याबाबत संभ्रमात पडल्यामुळे लिहलं नाही. तरी या व अशा प्रश्नांच्या उत्तरांकरता चित्रपट अवश्य पहावा Happy

<< पण सगळं इथेच लिहिल्यावर आता आम्ही बघायचं तरी काय? >>
सायो, सगळं इथे लिहीलेलं नाहीये, अजून बरच काही बघायला मिळेल, तेव्हा काळजी नसावी Proud

Pages