साट्याच्या करंज्या

Submitted by शलाका पाटील on 28 October, 2014 - 06:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

कव्हर-
१/२ कप मैदा
२ टेस्पून रवा
२ टेस्पून तूप, मोहनासाठी
चिमुटभर मीठ
खायचा रंग (लाल किंवा हिरवा)
२ ते ४ टेस्पून दुध
सारण-
१/२ कप किसलेले सुके खोबरे, भाजलेले
१/४ कप पिठी साखर
२ टेस्पून बारीक चिरलेले बदाम, पिस्ते, चारोळ्या
१/२ टीस्पून वेलची पूड
साटा-
३ टेस्पून तूप
२ टेस्पून कॉर्न फ्लोअर
इतर साहित्य-
तळण्यासाठी तूप/तेल

क्रमवार पाककृती: 

कृती:
१) मैदा आणि रवा एकत्र करून २ टेस्पून कडकडीत गरम तुपाचे मोहन घालावे. चमच्याने ढवळून मीठ घालावे. दुध घालून मध्यमसर मळून घ्यावे. २० मिनिटे झाकून ठेवावे.
२) तोवर सारण बनवावे. किसून भाजलेले खोबरे हाताने चुरून घ्यावे. त्यात पिठीसाखर, बदाम-पिस्ते, आणि वेलचीपूड घालून मिक्स करावे.
३) तूप हाताने फेसून घ्यावे. तूप हलके झाले कि कॉर्न फ्लोअर एकत्र करून फेसावे.
४) भिजवलेले पीठ तीन समान भागात विभागून घ्यावे. दोन भागात २-३ थेंब रंग घालून मळून घ्यावे.
५) पांढऱ्या रंगाचा गोळा घेउन एकदम पातळ लाटून घ्यावे. त्यावर बोटाने खळगे करून घ्यावे. त्यावर फेसलेला साटा लावावा.
६) रंगीत गोळ्यांची पातळ पोळी लाटून घ्यावी. हि पोळी पहिल्या पोळीवर ठेवावी. त्यावर बोटाने खळगे करून घ्यावे. यावर साटा लावावा.त्यावर तिसरी पोळी ठेवावी त्यावर बोटाने खळगे करून घेवुन यावर साटा लावावा. घट्ट रोल करावा. थोडावेळ हा रोल हवेवर ठेवावा. साट्यातील तूप सुकले कि रोल थोडा घट्ट होईल.
७) रोल घट्टसर झाला कि त्याचे १ इंचाचे तुकडे करावे. लेयर असलेली बाजू वर ठेवून पुरी एवढे लाटावे. त्यात एक-दीड चमचा सारण भरून कडा सील कराव्यात. कातणाने जास्तीची कड कापून घ्यावी.
८) कढईत तूप गरम करून करंज्या मध्यम आचेवर तळून घ्याव्यात.

वाढणी/प्रमाण: 
ह्या प्रमाणात ८/१० मध्यम करंज्या होतात
अधिक टिपा: 

मोहन कडकडीत गरम पाहिजे नाहीतर करंज्या नरम पडतील.

माहितीचा स्रोत: 
जाऊबाई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users