व्यवहार आणि विज्ञानाच्या कसोटीवर गंडलेल्या म्हणी
.........................................................................
१. दुधाची तहान ताकावर.
शाळेत असताना, मराठीच्या तासाला, शर्मा बाईंच्या तोंडून, जेव्हा पहिल्यांदा मी हि म्हण ऐकली, तेव्हा क्षणभर माझा कानावर विश्वास बसायचा बंद झाला. पण पुस्तकात सुद्धा असेच लिहिले होते. म्हणीचा अर्थ काढायला तर आपण चुकत नाही ना, अशी शंका वाटली खरी, पण ते देखील शक्य नव्हतेच. शर्मा बाईंचे मराठी व्याकरण आणि शब्दार्थ चुकणे जगातली अंतिम घटना होती. पण तरीही म्हण बनवणारा नक्कीच कुठेतरी चुकला होता एवढे मात्र नक्की.
ताक..! अहाहा.!! आंबटगोड ताक किती मधुर चवीचे असते. (उपमा ठोकळेबाज आहे ना, काय करणार त्या वयात अश्याच सुचायच्या) पण तेच याउलट दूध म्हणजे याईईऽऽक ग्गगग.. त्यात कॉम्प्लॅन किंवा बोर्नविटा घातल्याशिवाय नरड्याखाली उतरूच नये (हि उपमा आमच्या आईची), मग हे असे असताना दूध हे ताकापेक्षा भारी म्हणून कोणी ठरवले? आणि कोणत्या निकषावर?
पण मग मी तर्कशुद्ध विचार करू लागलो. आवड निवड हि व्यक्तीसापेक्ष असते. हे जग लहानांचे नाही तर मोठ्यांचे आहे. आपण लहान मुलांना दूध आवडत नसले तरी मोठ्या माणसांना कदाचित ते भारी वाटत असेल. किंवा त्यांच्यासाठी जे महागडे तेच भारी असेल. आणि दूध हे कदाचित ताकापेक्षा महाग असावे. बहुधा म्हणूनच अश्वत्थामाच्या आईला ते परवडले नसावे, जे तिने त्याला पाण्यात मीठ, स्सॉर्री पीठ मिसळून दिले. याउलट दही-ताक वगैरे पदार्थ फारच स्वस्त असावेत. बहुधा म्हणूनच गोकुळातला बालकृष्ण खडे मारून ताकाचे हंडे फोडायचा, कोणाच्याही मटक्यातील दही चोरायचा, आणि त्याच्या या गुणांचेही कौतुक व्हायचे. जर खरेच दही-ताक वगैरे महाग असते तर धपाटे नसते पडले!
असो, तर त्या शालेय वयात दूधाच्या डेअरीवर जाऊन दुग्धजन्य पदार्थांच्या किंमती काढून स्वत:च्या तर्काला पुष्टी देण्याचे राहूनच गेले. पण काल संध्याकाळी ग’फ्रेंडची वाट बघत गोपाल डेअरीबाहेर उभे असताना सहजच खालील धावफलक स्सॉर्री भावफलक नजरेस पडला.
दूध - फक्त ४० रुपये लीटर
ताक - तब्बल ६० रुपये लीटर
आणि,
दही - चक्क ८० रुपये किलो
येल्लो करलो बात. अचानक मला ‘दुधाची तहान ताकावर’ या म्हणीतील दूध फारच पाणचट वाटू लागले.
........................................................................................................................................
२. नाकापेक्षा मोती जड.
हि म्हण देखील ‘दुधाची तहान ताकावर’ पठडीतील तुलना दर्शवणारी. इथे जडत्वाबाबत नाकाची तुलना त्यावर अलंकार म्हणून परीधान केल्या जाणार्या मोत्याच्या नथीशी केली आहे. हि म्हण ऐकताच पहिला प्रश्न मनात आला तो हा, अरे नाकापेक्षा मोती जड असू नये वगैरे ठिक आहे, पण नाकाचे वजन करणार कसे? नाक कापून? पण माझा हा बेसिक प्रश्न नाक कापले जायच्या भितीपोटी बाईंना विचारायचे धाडस झाले नाही. कदाचित वैद्यकशास्त्रामध्ये मनुष्याच्या एकूण वजनऊंची वरून त्याच्या नाकाचे अंदाजे वजन ठरवणारा थम्ब रूल (ठेंगा नियम?) असावा म्हणत मौन बाळगले.
त्या ईयत्तेत मास डेन्सिटी (वस्तुमान घनता) नावाची संकल्पना अभ्यासक्रमात नसल्याने कमी आकारमानाची नथ देखील जास्त घनतेच्या पदार्थापासून बनवली गेलेली असल्यास स्वच्छ आणि पोकळ नाकापेक्षा जड असू शकते हे ध्यानात आले नव्हते. परीणामी नाकापेक्षा मोती जड म्हणताच नाकाच्या आकारापेक्षा भलीमोठी, हातच्या कंकणाएवढी नथ घातलेली बाई नजरेसमोर आली होती. असो, काही का असेना, त्या काळी या म्हणीला पास म्हणत माझ्या बालमनाने मान्यता दिली होती एवढे मात्र खरे.
दहावीनंतर मात्र अभियांत्रिकीच्या शाखेला प्रवेश घेतला. अप्लाईड मॅकेनिक्स आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरीअल (मराठी प्रतिशब्द सुचवा!) वगैरे विषयांशी ओळख झाली. तेव्हा जाऊन समजले की नाकाचे वजन नथीच्या वजनापेक्षा कमी आहे की जास्त हे मॅटरच करत नाही. तर नाकाची लोड कॅरींग कॅपॅसिटी (वजन उचलण्याची क्षमता) हे इथे हिशोबात धरायला हवे. उदाहरण द्यायचे झाल्यास, एखाद्या पाच-पंचवीस ग्रामच्या दोर्यालाही आपण शंभर दोनशे ग्रामचा चेंडू सहज बांधू शकतो. त्याने तो दोर काही तुटत नाही किंवा दोर्यापेक्षा चेंडूच जड बाई असे कोणी म्हणत नाही. अगदी पाच-दहा किलो वजनाचे टेबलसुद्धा ७०-८० किलो वजनाच्या माणसाचे वजन सहज पेलते. तर त्याच धर्तीवर नाकही त्यापेक्षा जास्त वजनाची नथ पेलत असेल तर कोणाला हरकत काय? ......आणि अचानक मला भलीमोठी बांगड्याएवढी, स्सॉर्री बांगडीएवढी नथ नाकासमोर क्षुद्र वाटायला लागली.
३. .... क्रमश: क्रमश: क्रमश:
अजून अश्या तर्कात गंडलेल्या म्हणी सापडल्या तर या धाग्यात नक्की भर टाकेन. ईतर कोणाला प्रतिसादात भर टाकायची असेल तर हक्काने टाकू शकता. पण माझा हा उपक्रम पाहता मी मराठी भाषेतल्या चुका काढतोय वा मला मराठी भाषेचा अभिमान नाही असे समजू नका. कारण मी बोलतो मराठी, मी वाचतो मराठी.. मी ऐकतो मराठी, मी चालतो मराठी.. अरे मी तर जगतो मराठी ! ... हे सर्वांना ठाऊक असेलच.
आभारी आहे,
ऋ ऽऽ .. क्रमश:
एक पेलाभर दूधाला विरजन लाऊन
एक पेलाभर दूधाला विरजन लाऊन त्याचे दही बनवल्यास त्या दह्याचे तांब्याभर ताक तयार होते. यावरून ताक (लोण्यासह) दूधापेक्षा स्वस्त असे म्हणायला हरकत नाही.
अंगापेक्षा भोंगा मोठा की बोंगा मोठा अशीही काहीशी म्हण आहे ना ..
भोजनान्ते च किं पेयं जयन्तः
भोजनान्ते च किं पेयं जयन्तः कस्य वै सुतः । कथं विष्णुपदं प्रोक्तं तक्रं शक्रस्य दुर्लभम् > इंद्राला ताक दुर्लभ वगैरे काहीही नाहीये... हे समस्यापूर्तीचे सुभाषित आहे...
जेवणानंतर कोणते पेय प्यावे? जयंत कोणाचा मुलगा आहे आणि विष्णुपदाला पोहोचणे कसे आहे अश्या तीन प्रश्नांची उत्तर म्हणजे शेवटचे चरण आहे.. ताक, शक्र म्हणजेच इंद्र आणि दुर्लभ..
^^^ येस्स, आणि ते देखील चवथे
^^^ येस्स, आणि ते देखील चवथे चरण हा खरा प्रश्न (समस्या) असून ते चरण अर्थपुर्ण करण्यासाठी पहिले तीन चरण (समस्यापूर्तीचे) रचले गेलेत.
म्हणजे उलटा प्रकार.
- असे मला गूगल शोधकार्यात सापडले.
धारोष्ण म्हैस
धारोष्ण म्हैस
Pages