व्यवहार आणि विज्ञानाच्या कसोटीवर गंडलेल्या म्हणी

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 October, 2014 - 10:17

व्यवहार आणि विज्ञानाच्या कसोटीवर गंडलेल्या म्हणी
.........................................................................

१. दुधाची तहान ताकावर.

शाळेत असताना, मराठीच्या तासाला, शर्मा बाईंच्या तोंडून, जेव्हा पहिल्यांदा मी हि म्हण ऐकली, तेव्हा क्षणभर माझा कानावर विश्वास बसायचा बंद झाला. पण पुस्तकात सुद्धा असेच लिहिले होते. म्हणीचा अर्थ काढायला तर आपण चुकत नाही ना, अशी शंका वाटली खरी, पण ते देखील शक्य नव्हतेच. शर्मा बाईंचे मराठी व्याकरण आणि शब्दार्थ चुकणे जगातली अंतिम घटना होती. पण तरीही म्हण बनवणारा नक्कीच कुठेतरी चुकला होता एवढे मात्र नक्की.

ताक..! अहाहा.!! आंबटगोड ताक किती मधुर चवीचे असते. (उपमा ठोकळेबाज आहे ना, काय करणार त्या वयात अश्याच सुचायच्या) पण तेच याउलट दूध म्हणजे याईईऽऽक ग्गगग.. त्यात कॉम्प्लॅन किंवा बोर्नविटा घातल्याशिवाय नरड्याखाली उतरूच नये (हि उपमा आमच्या आईची), मग हे असे असताना दूध हे ताकापेक्षा भारी म्हणून कोणी ठरवले? आणि कोणत्या निकषावर?

पण मग मी तर्कशुद्ध विचार करू लागलो. आवड निवड हि व्यक्तीसापेक्ष असते. हे जग लहानांचे नाही तर मोठ्यांचे आहे. आपण लहान मुलांना दूध आवडत नसले तरी मोठ्या माणसांना कदाचित ते भारी वाटत असेल. किंवा त्यांच्यासाठी जे महागडे तेच भारी असेल. आणि दूध हे कदाचित ताकापेक्षा महाग असावे. बहुधा म्हणूनच अश्वत्थामाच्या आईला ते परवडले नसावे, जे तिने त्याला पाण्यात मीठ, स्सॉर्री पीठ मिसळून दिले. याउलट दही-ताक वगैरे पदार्थ फारच स्वस्त असावेत. बहुधा म्हणूनच गोकुळातला बालकृष्ण खडे मारून ताकाचे हंडे फोडायचा, कोणाच्याही मटक्यातील दही चोरायचा, आणि त्याच्या या गुणांचेही कौतुक व्हायचे. जर खरेच दही-ताक वगैरे महाग असते तर धपाटे नसते पडले!

असो, तर त्या शालेय वयात दूधाच्या डेअरीवर जाऊन दुग्धजन्य पदार्थांच्या किंमती काढून स्वत:च्या तर्काला पुष्टी देण्याचे राहूनच गेले. पण काल संध्याकाळी ग’फ्रेंडची वाट बघत गोपाल डेअरीबाहेर उभे असताना सहजच खालील धावफलक स्सॉर्री भावफलक नजरेस पडला.

दूध - फक्त ४० रुपये लीटर
ताक - तब्बल ६० रुपये लीटर
आणि,
दही - चक्क ८० रुपये किलो
येल्लो करलो बात. अचानक मला ‘दुधाची तहान ताकावर’ या म्हणीतील दूध फारच पाणचट वाटू लागले.

........................................................................................................................................

२. नाकापेक्षा मोती जड.

हि म्हण देखील ‘दुधाची तहान ताकावर’ पठडीतील तुलना दर्शवणारी. इथे जडत्वाबाबत नाकाची तुलना त्यावर अलंकार म्हणून परीधान केल्या जाणार्‍या मोत्याच्या नथीशी केली आहे. हि म्हण ऐकताच पहिला प्रश्न मनात आला तो हा, अरे नाकापेक्षा मोती जड असू नये वगैरे ठिक आहे, पण नाकाचे वजन करणार कसे? नाक कापून? पण माझा हा बेसिक प्रश्न नाक कापले जायच्या भितीपोटी बाईंना विचारायचे धाडस झाले नाही. कदाचित वैद्यकशास्त्रामध्ये मनुष्याच्या एकूण वजनऊंची वरून त्याच्या नाकाचे अंदाजे वजन ठरवणारा थम्ब रूल (ठेंगा नियम?) असावा म्हणत मौन बाळगले.

त्या ईयत्तेत मास डेन्सिटी (वस्तुमान घनता) नावाची संकल्पना अभ्यासक्रमात नसल्याने कमी आकारमानाची नथ देखील जास्त घनतेच्या पदार्थापासून बनवली गेलेली असल्यास स्वच्छ आणि पोकळ नाकापेक्षा जड असू शकते हे ध्यानात आले नव्हते. परीणामी नाकापेक्षा मोती जड म्हणताच नाकाच्या आकारापेक्षा भलीमोठी, हातच्या कंकणाएवढी नथ घातलेली बाई नजरेसमोर आली होती. असो, काही का असेना, त्या काळी या म्हणीला पास म्हणत माझ्या बालमनाने मान्यता दिली होती एवढे मात्र खरे.

दहावीनंतर मात्र अभियांत्रिकीच्या शाखेला प्रवेश घेतला. अप्लाईड मॅकेनिक्स आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरीअल (मराठी प्रतिशब्द सुचवा!) वगैरे विषयांशी ओळख झाली. तेव्हा जाऊन समजले की नाकाचे वजन नथीच्या वजनापेक्षा कमी आहे की जास्त हे मॅटरच करत नाही. तर नाकाची लोड कॅरींग कॅपॅसिटी (वजन उचलण्याची क्षमता) हे इथे हिशोबात धरायला हवे. उदाहरण द्यायचे झाल्यास, एखाद्या पाच-पंचवीस ग्रामच्या दोर्‍यालाही आपण शंभर दोनशे ग्रामचा चेंडू सहज बांधू शकतो. त्याने तो दोर काही तुटत नाही किंवा दोर्‍यापेक्षा चेंडूच जड बाई असे कोणी म्हणत नाही. अगदी पाच-दहा किलो वजनाचे टेबलसुद्धा ७०-८० किलो वजनाच्या माणसाचे वजन सहज पेलते. तर त्याच धर्तीवर नाकही त्यापेक्षा जास्त वजनाची नथ पेलत असेल तर कोणाला हरकत काय? ......आणि अचानक मला भलीमोठी बांगड्याएवढी, स्सॉर्री बांगडीएवढी नथ नाकासमोर क्षुद्र वाटायला लागली.

३. .... क्रमश: क्रमश: क्रमश:

अजून अश्या तर्कात गंडलेल्या म्हणी सापडल्या तर या धाग्यात नक्की भर टाकेन. ईतर कोणाला प्रतिसादात भर टाकायची असेल तर हक्काने टाकू शकता. पण माझा हा उपक्रम पाहता मी मराठी भाषेतल्या चुका काढतोय वा मला मराठी भाषेचा अभिमान नाही असे समजू नका. कारण मी बोलतो मराठी, मी वाचतो मराठी.. मी ऐकतो मराठी, मी चालतो मराठी.. अरे मी तर जगतो मराठी ! ... हे सर्वांना ठाऊक असेलच.

आभारी आहे,
ऋ ऽऽ .. क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि अचानक मला भलीमोठी बांगड्याएवढी, स्सॉर्री बांगडीएवढी नथ नाकासमोर क्षुद्र वाटायला लागली.

बांगडीपेक्षाही मोठी नथ नाकात घातली जाते. राजस्थान आणि त्याआसपासह्या भागात घालतात अशा नथी. मी टिवीवर एक कथा पाहिलेली त्यात नवरा स्वतःछ्या श्रीमंतीचे प्रदर्शन बायकोच्या नाकात मोठी नथ घालुन करतो. त्याची स्पर्धा शेजा-याशी असते. शेवटी एकाच्या बायकोचे नाक तुटते आणि स्पर्धा थांबते.

मोहे पनघटपे नंदलाल... या गाण्यात मधुबालाने घातली आहे कि अशी नथ.. कभी कभी गाण्यात राखीनेही घातली आहे.

म्हणी या लाक्षणिक अर्थानेच घ्यायच्या असतात, शाब्दिक अर्थाने नाहीत. ताकाला आजकाल भाव आलाय. पुर्वी लोणी काढून घेतल्यावर ताक फुकटच देत असत. ताकाला जाऊन मोगा लपवणे .. हे त्यातूनच आलेय.

ताकाला आजकाल भाव आलाय. पुर्वी लोणी काढून घेतल्यावर ताक फुकटच देत असत. >> Uhoh .. याची कल्पना नव्हती, बहुधा लोणीही मग भरमसाठ निघत असावे. कम्पेअर टू हल्लीची मिलावट की दुनिया.

आजही खेडेगावात ताक मुबलक मिळते. माडगूळकरांच्या एका कथेतही तसा उल्लेख आहे.
जून्या गाण्यातही असे संदर्भ सापडतात.

खेळेल का देव माझिया अंगणी,
मज मागेल का, दही दूध लोणी ( गायिका - ज्योत्स्ना भोळे, यात ताकाचा उल्लेख नाही. )

दह्या दूधाची करतो चोरी, नंदाचा हरी
गौळणींनो जाऊ नका बाजारी ( गायक : आर. एन. पराडकर, यातही ताकाचा उल्लेख नाही. )

रंगू बाजारला जाते हो जाऊ द्या
लोणी इकाया नेते हो, नेऊ द्या ( गायिका : ललिता देऊळगावकर.. ""........)

अशी अनेक गाणी सापडतील.

दिनेशदा, ओके आणि माहितीतही भर पडली Happy

खरे तर दूध मला नावडते आणि ताक तितकेच आवडीचे .. त्यावरून हे सुचलेय
किंमतीचा मुद्दा त्यानंतर म्हणून लिहिला.. अर्थात डेअरीवर कच्चे दूध आणि तयार ताक पाहता ताकाची किंमत जास्त लावलेली असते हे देखील खरेय .. (चहाच्या टपरीवर गरमागरम दूध घेतल्यास बहुधा ते महाग होईल) .. असो, तर त्या तयार ताकापेक्षा पाव किलो दही घेऊन त्याचे तांब्याभर ताक करणे हा माझ्या आवडीचा उद्योग Happy

दिनेशदा, हेच लिहायला आले होते.
पूर्वी मलाही असंच वाटायचं दूधापेक्षा ताक महाग कसं असेल? तेव्हा आम्ही पावलिटर दूध घेऊन कसाबसा एकवेळ चहा करायचो. Happy
आता खात्यापित्या घरात आल्यावर कळलं लोणी काढून झाल्यावर बरंचसं ताक फुकटच इकडे तिकडे गरीबाना किंवा मोलकरणींना वगैरे देऊन टाकतात लोक.
त्यामुळे गरीबाना सहसा ताजे दूध मिळणार नाही पण ताक मिळतं मालक लोकांच्या घरचं.
म्हणून दूधाची तहान ताकावर भागविणे आले असावे.

'शर्मा' हे आडनाव मराठी शिक्षिकेचे... ??? हा पण एक अपवाद नाही का?
>>>>>>>>.
थोडा विचार करा, नाहीच सुचले तर उत्तर मी चहा पिऊन आल्यावर सांगतो Happy

रच्याकने...
दिनेशदा, ललिता देऊळगावकर म्हणजे च आपल्या बाबुजींच्या सौ. व श्रीधर जींच्या मातोश्री का ???
त्या पण एक महान गायिका होत्या असे ऐकुन आहे.

आत्ता आत्ता पर्यंत ताक विकल जात नव्हत. लोणी काढुन झाल्यावर ताक फुकट वाटल जायच.

गेल्या ३०-४० वर्षात शेण विकल जाउ लागल्यावर ताकाला किंमत येणारच.

प्रसन्न.. त्या बाबूजींच्या सौभाग्यवती.. मूळ गीत रामायणात त्या गायल्या होत्या. काही हिंदी गाणीही त्या गायल्या आहेत.

सुमुक्ता..
ताकदेखील दूधाएवढेच महत्वाचे आहे. ते तर ईंद्राला दुर्लभ व्हावे, एवढे महत्वाचे आहे.

रांजणा चित्रपट पाहीला आहे का? कारण त्यातही हिरोच्या चोर असण्यावर रात्रभर हुशार मुले अगदि हिरीरीने निश्कर्ष काढतात त्याची आठवण झाली .तो सीनही धमाल होता . हा धागाही .

मलाही दुधापेक्षा ताक जास्त आवडते, हाच प्रश्न कधीकाळी मलाही पडला होता...
तसे अर्थ न सापडलेल्या म्हणी आणि वाक् प्रचार असतील बरेच

अति शहाणा त्याचा बैल रिकामा -ही म्हण कशावरुन आली आहे ? कोणास माहिती असल्यास लिहा.

पालथ्या घड्यावर पाणी या वाक्याचाच मला जाम तिरस्कार आहे ( आमच्या पिताश्रीनी या वाक्याचा आतापर्येंत एके४७ रायफलसारखा वेळोवेळी मारा केलेला आहे. म्हणून कदाचित) Happy

बवनणारा -बनवणारा असे कर.
>>>
सिनि अशी नजरेतून पटकन निसटू शकणारी चूक शोधल्याबद्दल स्विकारा .. __/\__
आपला मान राखून करतो ते दुरुस्त Happy

किरणकुमार,
अतिशहाणा बैल रिकामा यामागच्या कथेबद्दल मी कुठेतरी वाचलेले मागे आता नक्की आठवत नाहीये ..
आणि पालथ्या घड्यावर पाणी हि सर्वच मायबाप लोकांची फेवरेट म्हण असावी आपल्या सुपुत्रांसाठी Happy

दुधाने जीभ पोळली तर ताक ही फूंकुन प्यावे .अशीही म्हण प्रचलीत आहे. दुधापासुन ताक बनते,ताकापासुन दुध बनवता येत नाही .या निकशावर दूध हे ताकापेक्षा भारी ठरवले असेल. आणि हो अजुनही ग्रामीण भागात लोणी काढुन ताक फुकट शेजारी किंवा इतरांना देतात. आणि पाहुण्यांना प्रेमळ जबरदस्तीने म्ह्शीचे धारोष्ण दुध प्यायला देतात . नाही पिले तर वर " तुम्हा शहरी लोकांना पाणचट दुधाचीच सवय लागलेय" असा शेरा ऐकावा लागतो.

नाकापेक्षा मोती जड याची प्रचीती जेव्हा एखादी सासू सुनेला म्हणते तेव्हा कळते. स्वानुभावरुन कळेलच तुम्हाला Happy .

दुधापासुन ताक बनते,ताकापासुन दुध बनवता येत नाही .>> हा हि निकष भारी, म्हणजे साखर उसापेक्षा भारी सारखे.
बाकी आपण म्हणता तसा सासूसुनेचा कुठलाही अनुभव मला न मिळो अशीच प्रार्थना, आधीच मंगळ आहे त्यात आणखी दंगल नको Happy

'शर्मा' हे आडनाव मराठी शिक्षिकेचे... ??? हा पण एक अपवाद नाही का?
>>>>>>>>>.
अरे हो, याचे उत्तर राहीलेच.
शर्मा बाईंचा आंतरप्रांतीय प्रेमविवाह झाला असावा. शर्मा हे लग्नानंतरचे आडनाव. माहेरचे आडनाव माहीत नाही पण मूळच्या अर्थातच मराठीच असणार एवढे नक्की.

मला आठवते आहे, लहानपणी सप्तश्रुंगीला पायर्‍या चढताना ताक फुकट देत होते आणि दुध २ रुपये ग्लास मिळत होते.

साखर उसापेक्षा भारी सारखे >> नाही! ऊस साखरेपेक्षा भारी!
मला न पटलेली/पटणारी म्हण- पुढच्यास ठेच मागचा शहाणा! इथे स्वतः ठेच खाऊन शहाणपण येत नाही तर दुसरयाच्या ठेचेनं शहाणपण कुठुन येणार?

शर्मा नावाची माणसं अस्खलित मराठी बोलू शकतात. कोकणी ब्राह्मण असतात बहुतेक ते नक्की आठवत नाही. पण माझी एक मैत्रिण होती.

दक्षिणा, शक्य आहे.
लेखात मी नावे बदलूनच वापरतो. पण आमच्या मराठीच्या बाई शर्मा नसल्या तरी शर्मा नावाच्या बाई दुसर्‍या एका विषयाला होत्याच. आणि त्या अस्खलित मराठीच बोलायच्या. त्यामुळे आंतरप्रांतीय विवाह हा माझा अंदाज. पण आपण म्हणता तसे असेल तर ते देखील शक्य आहे.

किरण कुमार,

मागे एका वेबसाईट वर अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ह्या विषयी वाचले होते. पुढील URL पहा:

http://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A...

Wink

आमच्याकडे गावात आजही दुधाचे लोणी काढले की त्यापासून निघणारे ताक काही घरी ठेवून आसपासच्या मळ्यांमध्ये नेऊन देतात किंवा घरी कुणी आले तर त्यांना देऊन टाकतात. तसेच आमच्याही घरी शेजारून-पाजारून ताक येते. या म्हणी ग्रामीण भागांतूनच, तेव्हाच्या परिस्थितीनुरूप बनलेल्या आहेत. आजची परिस्थिती त्यापेक्षा वेगळी असल्यामुळे या म्हणींचे संदर्भ तितकेसे लागू पडत नाहीत.

Pages