गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाही मायबोलीवर आपण लेखनस्पर्धा आयोजित केली होती. मनोविकास प्रकाशन हे या स्पर्धेचे प्रायोजक होते.
स्पर्धेसाठी दोन विषय होते व एकूण ४८ प्रवेशिका या स्पर्धेत होत्या.
ज्येष्ठ संपादक श्री. संजय आवटे यांनी पहिल्या विषयाचं व श्रीमती सुजाता देशमुख यांनी दुसर्या विषयाचं परीक्षण केलं.
गुणांकन करताना कुठली प्रवेशिका कोणी लिहिली आहे, हे परीक्षकांना माहीत नव्हतं. तसंच शब्दमर्यादेचा नियमही शिथिल करण्यात आला.
पहिल्या विषयासाठी एकूण आठ प्रवेशिका होत्या. त्यांपैकी दोन प्रवेशिकांना बक्षिसं दिली आहेत. दुसर्या विषयासाठी चाळीस प्रवेशिका होत्या. या विषयासाठी तीन बक्षिसं देण्यात आली असून तिसर्या क्रमांकासाठी दोन विजेते निवडले आहेत.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे -
विषय पहिला - मोदी जिंकले, पुढे काय?
पहिला क्रमांक - रांचो
दुसरा क्रमांक - अतुल ठाकुर
विषय दुसरा - व्यक्तिचित्रण
पहिला क्रमांक - नंदिनी - आंखो मे क्या!
दुसरा क्रमांक - तुमचा अभिषेक - कट्ट्यावरचा एक मित्र खास असतो....
तिसरा क्रमांक - आशूडी - जनाकाका
चमन - 'ऑ-ईगो'
सर्व विजेत्यांशी मायबोलीच्या संपर्कसुविधेतून दिवाळीनंतर आम्ही संपर्क साधू.
श्री. संजय आवटे यांचं मनोगत -
'मोदी जिंकले, पुढे काय?' या विषयावर ज्यांचे लेख आले आहेत, त्या सर्वांनीच आपले मुद्दे प्रामाणिकपणे आणि अपवाद वगळता, अभ्यासपूर्वक मांडले आहेत.
या विषयात दोन भाग संयोजकांना आणि परीक्षकांना अनुस्यूत होते. 'मोदी जिंकले' असे म्हणताना त्या विजयाची कारणपरंपरा, थोडक्यात का होईना, विशद करणे अपेक्षित होते, कारण हे जिंकणे साधेसुधे नव्हते. आजवरची राजकीय नेपथ्यरचना भिरकावून देणारे असे जोरकस जिंकणे होते हे! 'पुढे काय?' असे म्हणताना भविष्याचा वेध घेणे अपेक्षित होते. त्यामध्ये फक्त अपेक्षा अपेक्षित नाहीत. कारण सरकार कोणतेही आले, तरी साधारण अपेक्षा त्याच असतात. 'विशलिस्ट' तीच असते. मात्र, मोदींच्या नेतृत्वाखाली नक्की काय घडणे शक्य आहे, देशाची धोरणात्मक चौकट कशी बदलू शकते, कशाला हादरे बसतील आणि कोणत्या मुद्द्यांना उमेद मिळेल, हे विश्लेषण स्पर्धकांनी करावे, अशी आमची इच्छा होती. हे विश्लेषण करताना देशाचा इतिहास, राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा वेगवेगळ्या पैलूंना ध्यानात घेणं आवश्यक होतं. ही मीमांसा आणि विश्लेषण करण्याचा थोडाफार प्रयत्न झालेला दिसतो. तो अधिक विस्ताराने व्हायला हवा होता.
हे विश्लेषण वस्तुनिष्ठ असावे, अशीही अपेक्षा होती. स्पर्धकाने कोणती भूमिका घ्यावी, हा त्याचा प्रश्न. मोदी पंतप्रधान झाल्यामुळे सुराज्य येईल, असे म्हटले तरी हरकत नाही, किंवा मोदींमुळे या देशाचं फक्त नुकसान होईल, असे म्हटल्यासही वावगे नाही. मात्र कोणतीही भूमिका घेताना तिच्या समर्थनार्थ तुम्ही पुरावे देणे अत्यावश्यक आहे. भावनेच्या भरात भूमिका तयार करणे अयोग्य असते. आपली भूमिका सार्वजनिक करताना तर्काच्या वैज्ञानिक कसोट्यांवर ती खरी उतरलीच पाहिजे. तुम्ही जर तुमच्या भूमिकेला तर्काचं योग्य अधिष्ठान देणार नसाल, पूर्वग्रहांवर आधारित भूमिका मांडणार असाल, तर तुमच्या म्हणण्याला फारसा अर्थ राहणार नाही.
सर्व प्रवेशिका वाचून खटकलेली महत्त्वाची बाब म्हणजे तीन हजार शब्दांची मर्यादा असूनही, आणि या विषयावर भरपूर लिहिण्यासारखे असूनही या शब्दमर्यादेपर्यंत प्रवेशिका पोहोचू शकल्या नाहीत. शब्दमर्यादा पाळणे आवश्यक आहे आणि कमी शब्दांमध्ये आपले म्हणणे मांडता आले पाहिजे, हे खरे असले तरी निदान काही स्पर्धक तीन-चार हजार शब्द लिहितील, अशी मला अपेक्षा होती.
विषयाचा आवाका, मांडणी आणि भाषाशैली या तीन मुख्य निकषांवर मी विजेत्या प्रवेशिकांची निवड केली आहे. हे तीन निकष समाधानकारकरीत्या पूर्ण करणार्या दोनच प्रवेशिका असल्याने तेवढीच बक्षिसे दिली आहेत.
या स्पर्धेच्या निमित्ताने मलाही या विषयासंदर्भात नव्याने काही विचार करता आला. त्यामुळे प्रत्येक प्रवेशिकेचे विश्लेषण इथे करण्यापेक्षा या सगळ्या प्रवेशिका वाचून (आणि इथल्या प्रवेशिकांसंदर्भातच प्रामुख्याने) मी केलेला विचार इथे मांडतो आहे.
मोदी यांचा विजय ही भारताच्या राजकीय इतिहासातील ऐतिहासिक घटना आहे. नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नेता या देशाचा पंतप्रधान होणे, हेतर अभूतपूर्व आहेच, पण कॉंग्रेसची (आणि इतरही काही पक्षांची) अशी वाताहात होणे, हेही धक्कादायक आहे. मोदींची लाट होती, असे म्हणावे तर ओडिशा, बंगाल, तामिळनाडू अशा राज्यांत ती का दिसली नाही? दुसरे असे की, मोदींची लाट असेल तर लोकसभेपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला एवढे विलक्षण यश कसे मिळाले? एखाद्या नवजात पक्षाला असे यश आणि अननुभवी राजकीय नेत्याला मुख्यमंत्रिपद हे भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडलेले दिसते. याचे महत्त्वाचे कारण असे की, ही लाट मोदींची नंतर झाली. मूलतः ती बदलाची लाट होती. आणि या असंतोषाचा नायक, बदलाचा चेहरा होण्यात मोदींना यश मिळाले. अण्णा आणि अरविंद यांनी रचलेल्या पायावर कळस चढवणे मोदींना शक्य झाले. त्यामध्ये अर्थातच त्यांचे व्यूहरचनात्मक कौशल्य, माध्यमांचा वापर, उपभोगशून्य स्वामीसारख्या मिथकांचा प्रभाव, मोदींचे वक्तृत्व, त्यांची धडाकेबाज शैली असे अनेक घटक आहेत. मोदी स्वतःच एक ब्रॅंड झाले हे खरे, पण मार्केटचे अभ्यासक सांगतील, अशा कशाचाही ब्रॅंड होऊ शकत नाही. त्यासाठी किमान अंगभूत शक्ती असावी लागते. मोदींमध्ये ती होती.
मोदी विजयी झाले, त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न आजही सुरु आहे. आकांक्षा असलेला वर्ग विस्तारत जाणे आणि त्याच्या आकांक्षांना रोज नवे पंख मिळणे, हे एक कारण तर आहेच. तरुणांची संख्या आणि त्यांना खुणावणारी स्वप्ने; हे त्या देशात घडू शकते, तर इथे का घडत नाही, असा सवाल; आता हे सगळे बदलून टाकूया, असे तारुण्यसुलभ वाटणे; आणि, या वेळचा तरुण सामान्य नसणे. जागतिकीकरणानंतर जन्माला आलेली तरुणाई प्रथमच कळ दाबत होती. तिने ना भारत-चीन युद्ध पाहिलेले, ना भारत- पाक युद्ध. आणीबाणी तिच्या गावीही नाही. ती जन्माला आली तेच जागतिकीकरणासोबत. जगात जिकडेतिकडे आनंदी आनंद गडे आहे आणि आपल्याकडे मात्र खूप प्रश्न आहेत, अडचणींचे डोंगर आहेत, ते काही नाही, आता हे बदलायला हवे, असे वाटणारी तरुणाई. तिसरा मुद्दा माध्यमांचा. सर्व माध्यमे आपल्या बलस्थानांसह प्रभावी होत असताना, सोशल मीडियामुळे प्रथमच आश्वासन मिळाले की, आता माध्यम माझ्या मालकीचे झाले आहे. 'द मीडियम इज द मेसेज' या मार्शल मॅकलुहानच्या जगप्रसिद्ध सिद्धांताची आठवण यावी, अशा पद्धतीने माध्यमांचे जग बदलून गेले.
ही जी काही वरवरची कारणे आहेत, त्याचा जन्मदाता खरेतर कॉंग्रेसच आहे. जागतिकीकरणाला वाट करुन देऊन कॉंग्रेसनेच आकांक्षा असणारा वर्ग जन्माला घातला. राजीव गांधी आणि सॅम पित्रोदा जेव्हा संगणकीकरणाचे पर्व सुरू करीत होते, तेव्हा ज्यांना मिरच्या झोंबत होत्या, त्यांच्यापैकी काहींची मुले आता सिलिकॉन व्हॅलीत सुखेनैव कार्यरत आहेत. अठरा वर्षांवरील मुलामुलींना मतदार करण्याची कल्पना राजीव गांधींचीच. तरुणांना जेव्हा कोणी गंभीरपणे घेतले नव्हते, तेव्हा राजीवच तरुणांशी संवाद वगैरे साधत. या आकांक्षा कॉंग्रेसने निर्माण केल्या ख-या, पण पुढे मात्र त्यांना पुरे पडणे या पक्षाला झेपले नाही. नवी धोरणे, नव्या धारणा यांतून नवा समाज निर्माण होतो आहे, हे त्या पक्षाच्या धुरिणांना कधी समजलेच नाही.
जागतिकीकरणाने निर्माण केलेली स्वप्ने, तंत्रज्ञानाने दिलेली अभिव्यक्ती या बळावर नवे जग निर्माण होत असतानाच, भारतातील राजकारण मात्र याच कालावधीत अधिक अस्थिर आणि भयावह होत गेले. आघाड्यांची अपरिहार्यता, धोरण-लकवा, घोटाळे आणि भारताची घसरलेली पत अशा मुद्द्यांवर यूपीएच्या शेवटच्या पाच वर्षांत एवढी चर्चा झाली की, 'फील बॅड फॅक्टर' वाढत गेला आणि हे असेच सुरू राहिले तर आपले जगणे असह्य होईल, असे दीनदलित माणसाला वाटले, आणि ज्याच्याकडे गमावण्यासारखे काही आले होते, त्याला ते गमावण्याची भीती वाटू लागली. याच कालावधीत अरब जगतात झालेली कथित क्रांती, सोशल साईट्स्ने घडवलेले परिवर्तन यांतून बदलाचे संसर्गजन्य वातावरण तयार होत गेले. प्रस्थापित नेत्यांनी आणि मंत्र्यांनी आपल्या सरंजामी, भ्रष्ट वर्तनाने या बदलाला इंधन पुरवले. अण्णा-अरविंद आणि टीमच्या जंतर-मंतरने बदलाची द्वाही फिरवली. हे एवढे वाईट आहे की, आता यापेक्षा आणखी काही वाईट असूच शकणार नाही, अशी खात्री पटलेले मतदार कॉंग्रेसला नाकारायचे ठरवूनच या निवडणुकीत उतरले. त्यांना मोदींसारखा चेहरा सापडला. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन मतदारांनी मोदींना विजयी केले.
मोदी जिंकले हे खरे, पण यदा यदा ही धर्मस्य... अशा मानसिकतेतून त्यांच्याकडे आपण पाहाणार असू, तर मोदींवर अन्याय होईलच, पण देशावरही होईल. कारण, कोणाच्यातरी हातात सगळी सूत्रे सोपवून निश्चिंत होणे, हे सामान्य माणसाचे संकुचित राजकारण असते.
मोदी निवडून आल्यानंतर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आणि उमटत आहेत. एक अशी की, बस, आता देश बदलेल. अच्छे दिन येतील, वगैरे. दुसरे म्हणजे, मोदी आल्यामुळे देश धोकादायक वळणावर उभा आहे. अशी विधाने करणार्या दोघांनाही मुळात या देशाची लोकशाही समजलेली नाही. मोदी कोणत्याही पक्षाचे अथवा विचारांचे असोत, त्यांना विकास आणि गव्हर्नन्स् यांच मुद्द्यांवर निवडणूक लढवावी लागणे, हे बरेच स्पष्ट करणारे आहे. पण, मोदींमुळे आता सगळे बदलेल, हा जो आशावाद आहे, तो बिनबुडाचा तर आहेच, पण त्यातून वास्तवाकडे डोळेझाक होण्याची भीती आहे.
मध्यंतरी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मी आणि अन्वर राजन असे आम्ही दोघे वक्ते होतो. तिथे अन्वर राजन फार महत्त्वाचे बोलले. तेव्हा लोकसभा निवडणूक अद्याप व्हायची होती. ते म्हणाले की, 'मोदींना असे पोर्ट्रे केले जातेय की, सध्या या देशात अनागोंदी आहे आणि अंधाराचे राज्य आहे. आणि, मोदी आल्यानंतर असे भासवले जाईल की, हा सगळा उजेड इथे पहिल्यांदाच आला आहे'. त्यांनी चांगले उदाहरण दिले. ते म्हणाले, 'असे भासवले जाते की, मुहम्मद पैगंबरांपूर्वी सगळा अंधार होता. रानटी टोळ्या होत्या. महिलांवर बलात्कार होत, वगैरे वगैरे आणि पैगंबरांनी सगळे बदलून टाकले. मग प्रकाशाचे राज्य आले. प्रत्यक्षात पैगंबर स्वतः एका विधवेकडे काम करत आणि त्यांनी विधवेशीच लग्न केले. याचा अर्थ एका मर्यादेपर्यंत प्रागतिक व्यवस्था होतीच.' इथे साधर्म्याचा अन्य मुद्दा नाही. नायकाला अधिक उजळ करण्यासाठी भूतकाळ आणखी अंधारात रंगवणे हा अनुयायांचा लाडका छंद असतो. तेवढ्याच संदर्भात हे उदाहरण पाहावे. मोदींपूर्वी काही घडलेच नाही, असे मांडले जाते. हा दोष अनुयायांचा आहे.
प्रत्यक्षात, जो भारत देश आज उभा आहे, त्याची मूल्ये विकसित झाली ती स्वातंत्र्यचळवळीतून. या स्वातंत्र्यचळवळीशी मोदींचा संबंध नव्हता, कारण ते १९४७नंतर जन्माला आले. असे ते पहिलेच पंतप्रधान की जे स्वातंत्र्यानंतर जन्मले. (ते ज्या संघटनेत लहानाचे मोठे झाले, ती त्यापूर्वीच जन्माला आली असली तरी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी तिचा काही संबंध नव्हता!) या मूल्यांवर भारत उभा राहिला. भारताची यशकथा ही फक्त अर्थकारणात दडलेली नाही. भारताचे अपवादात्मक वेगळेपण लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला भविष्याचा विचार करता येणार नाही. विन्स्टन चर्चिल असे म्हणाले होते - India is a geographical term. It is no more a united nation than the Equator.
ज्या देशाला एक धर्म नाही, एक जात नाही, एक भाषा नाही, त्याला एकसंध ठेवणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे, असे चर्चिलच काय, अनेक युरोपीय विचारवंतांना वाटत होते. कारण 'नेशनस्टेट' या संकल्पनेत त्यांच्या लेखी असे काही आधार असावे लागतात. भारताला जोडणारे हे आधार स्वातंत्र्यचळवळीतून निर्माण झाले आणि पुढे नेहरू-पटेल-आंबेडकरांनी हे आधार विकसित केले. पुढे चर्चिलचा देश वेगळेपणाची भाषा करु लागला, पण भारत स्वाभाविकपणे एकसंध राहिला. झेपावत गेला. शेजारील सगळे देश 'फेल्ड स्टेट'च्या यादीत जाऊ पाहत असताना, भारतासारखा महाकाय देश प्रगतीकडे झेपावत जाणे, हे आपोआप घडलेले नसते. त्यामागे एक सूत्र आहे. हिंदू बहुसंख्य असले तरी बांग्लादेशापेक्षा जास्त आणि साधारणपणे पाकिस्तानाएवढी मुस्लिम लोकसंख्या या देशात नांदते आणि तरीही इथे सगळे आलबेल आहे, कारण यामागे एक सूत्र आहे. हे सूत्र लक्षात न घेता फक्त रस्ते, वीज, पाणी अशा मुद्द्यांना विकास मानत बसणे फसगत करणारे आहे. विकास हा आकड्यांचा खेळ नव्हे, जिवंत माणसे तिथे असतात, हे लक्षात घ्यावे लागते.
मोदी भारताचे पंतप्रधान झाले आहेत आणि त्यांनी धडाकेबाज पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. ते उत्तम काम करू शकतील, पण त्याचवेळी काही चिंता उपस्थित होणे अस्वाभाविक नाही. मोदी यांची तुलना अनेकदा 'सीइओ'शी केली जाते. कॉर्पोरेट म्हणजे काहीतरी चकचकीत, आधुनिक असा आपला समज अद्यापही आहे. पण, यूपीए-२च्या बहुतेक बहुचर्चित घोटाळयांमध्ये अनेकदा हेच कॉर्पोरेट जग सरकारसोबत होते. क्षणभर कॉर्पोरेट म्हणजे उदात्त, उन्नत असे मानले, तरी लोकशाहीत पंतप्रधान हा सीइओ होऊन कसा चालेल? तेही भारतासारख्या देशात! मोदींच्या हातात अवघे मंत्रिमंडळ आणि पक्ष आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा एकमेव स्टार कॅम्पेनर म्हणून त्यांनाच उदंड सभा घ्याव्या लागतात. सर्व अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतलेले आहेत. मोदी अथवा नमो हे शब्द म्हणजे काहीतरी विलक्षण प्रकरण आहे, अशाप्रकारे सगळे सुरू आहे.
एकतर, मोदींना मिळालेले निरंकुश बहुमत, त्यात पक्षावर पकड, विरोधी पक्ष नामधारी. अशावेळी चिंता आणखी गडद होते. एडवर्ड अबेचे 'Power is always dangerous. Power attracts the worst and corrupts the best' हे वाक्य आपल्या विजेत्या स्पर्धकाने उद्धृत केले आहे. इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीचा फटका या देशाला एकदा बसला आहे. मोदी अशा संघटनेत वाढले आहेत की, जिथे लोकशाही हे मूल्य नाही. मोदी विकासवादी असले तरी लोकशाहीवादी कितपत आहेत, त्याचा अंदाज येणे कठीण आहे. त्यांचा माध्यमांशी असणारा संपर्क आणि माध्यमांवर सध्या ठेवली जात असलेली नजर यांतूनही अनेक गोष्टी स्पष्ट होतात. मोदींचा पूर्वेतिहास उगाळायची गरज नाही, हे खरे असले, तरी अशा पद्धतीने ते विचार करत असतील तर निरंकुश सत्ता असताना काही विपरित तर घडणार नाही ना, असे भय एखाद्या समाजघटकाला अथवा कोणालाही वाटणे हे भयावह ठरु शकते. बहुसंख्यांनी असहिष्णू होणे, म्हणजे शेवटची आशा संपण्यासारखे आहे!
या देशाच्या अधिष्ठानावर हल्ला झाला आणि लोकशाही, सर्वसमावेशकताच धोक्यात आली, तर तुम्ही किती धरणे बांधली आणि किती उद्योग भारतात आणले, याला काही अर्थ उरत नाही.
अर्थात, तरीही मोदी खूप चांगले पंतप्रधान ठरतील आणि ते विकासाच्या दिशेने देशाला नेतील, असे मला वाटते. (ती माझी अपेक्षा तर नक्कीच आहे) कारण, मोदी मुळात स्ट्रॅटेजिस्ट आहेत. पूर्णवेळ राजकारणी आहेत आणि राजकारण हे त्यांच्या लेखी एक मिशन आहे. शिवाय, विकास याच मुद्द्यावर आपण निवडून आलो, हे त्यांना ठाऊक आहे. त्यांच्यावर अंकुश कोणाचाही नसला तरी भारतीय लोकशाही, राज्यघटना हाच एक मोठा अंकुश आहे. शिवाय, या देशाने आजवर कधीही थेट मूलतत्त्ववादी राजकारणाला थारा दिलेला नाही, हा इतिहास महत्त्वाचा आहे. लोक आकांक्षांनी झपाटले की मूलत्त्त्ववादी नेतृत्व पुढे येते, हे खरे असले तरी भारताने या निवडणुकीत परिवर्तनाच्या, विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. (त्यात हिंदुत्वाचा अजेंडा रेटणारे होतेच, पण तो या निवडणुकीचा केंद्रबिंदू होऊ शकला नाही!)
मोदींना The most provincial Prime Minister असे म्हटले जात असले आणि जगाचे त्यांचे आकलन मर्यादित असले, तरी त्यांनी त्यांची कर्तबगारी गेल्या काही वर्षांत सिद्ध करत, विकासाचे एक प्रारूप तयार केले आहे, हे नाकारता येत नाही. 'सोयरे धायरे संपत्तीचे लोक', असा कुटुंबकबिला नसणे आणि पैशांच्या संदर्भात मोदींचे निर्मोही असणे, हाही कमी महत्त्वाचा मुद्दा नाही. (मोह फक्त पैशांचे असतात आणि कुटुंब नसले की माणसाच्या गरजा संपतात, हा आपला संसारी मध्यमवर्गीयांचा साधा होरा!) मनमोहनसिंग यांच्याप्रमाणेच मोदीही सामान्य कुटुंबातून इथपर्यंत आले आहेत, हाही मुद्दा महत्त्वाचा. मोदी उद्यमशील आहेत आणि अर्थकारणाला एक नवी सळसळ ते देऊ शकतात. एकूण काय, मोदी खूप चांगल्या दिशेने देशाला नेऊ शकतात, अशी आशा बाळगण्यास जागा आहे.
बर्याच दिवसांनी सिटी बसने चाललो होतो.
माझ्या शेजारी बसलेले गृहस्थ, वय वर्षे चाळीसच्या आसपास, तंबाखू चघळत पेपर वाचत होते. एकदम ओरडले, अरेरे, गांधी जयंती म्हणजे ड्राय डे!
मग त्यांचा फोन वाजला. व्हॉट्स्अॅपचा मेसेज होता. तो फोटो बघत ते म्हणाले, 'याला म्हणतात पंतप्रधान. झाडू घेतला हो हातात.' आणि मग सराईतपणे त्यांनी एक पिचकारी खिडकीतून बाहेर मारली!
मोदी बरेच काही बदलतील, पण हे कोण बदलणार?!!
(श्री. संजय आवटे 'सकाळ' माध्यमसमूहाचे रोव्हिंग एडिटर आहेत.)
श्रीमती सुजाता देशमुख यांचं मनोगत -
‘मायबोली’नं आयोजित केलेल्या लेखनस्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिकांची परीक्षक या नात्यानं वाचकांची सुरुवातीलाच क्षमा मागून (आणि दृक्श्राव्य माध्यमातल्या अनेक स्पर्धा संपल्यानंतर परीक्षक हेच वाक्य उच्चारतात याची जाणीव ठेवून...) एक ‘सरधोपट’ विधान करते - वाचकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादातून पहिले तीन क्रमांक निवडणं कमालीचं अवघड होतं; हे तीन क्रमांक (तिसरा विभागून) जरी दिलेले असले, तरी एकूण पंधराजण या स्पर्धेत विजेते ठरले आहेत.
आलेल्या प्रवेशिकांमध्ये मला साधारणपणे दोन प्रकारची व्यक्तिचित्रणं आढळून आली. उदाहरणादाखल पहिला प्रकार म्हणजे, ‘चैतन्याचा झरा’सारखा शरच्चंद्र पटवर्धन यांच्यावरचा लेख. पार्किन्सन्स्च्या रुग्णांसाठी आयुष्य झोकून देऊन काम करणार्या श्री. पटवर्धनांवर लिहिताना ते जे काही करतात, फक्त तेवढं लिहिलं तरी समर्थ चित्रण उभं राहू शकतं, इतकी त्या माणसाच्या अस्तित्वातच, कार्यकर्तृत्वातच ताकद आहे. व्यक्तिचित्रणाचा सादर झालेला दुसरा प्रकार म्हणजे, सहवासातली व्यक्ती वरकरणी सामान्य वाटत असली, तरी तिचे वेगवेगळे कंगोरे आपल्या माणूसपणाच्या, जाणिवांच्या, सूक्ष्म निरीक्षणांतून लेखात उतरवणं. बहुतांश व्यक्तिचित्रणं या दुसर्या प्रकारात मोडणारी आहेत. यामध्ये अर्थातच डावं-उजवं काही नसून, प्रवेशिकांच्या लिखाणपद्धतीबाबत आणि विषयाच्या त्या त्या व्यक्तीच्या आकलनाबाबत केलेलं हे विधान आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ मला, ‘कट्ट्यावरचा एक मित्र खास असतो’, या लेखातली दोन वाक्यं मुद्दाम द्यावीशी वाटतात. कळत्या वयापासूनचा खूप जिवाभावाचा मित्र तरुणपणी अपघातात गेल्यावर हा लेखक म्हणतो, ‘त्या दिवशी मी किती रडलो मला आठवत नाही. पण खरं म्हणजे कोणीतरी माझ्यासाठी रडावं असं वाटत होतं.’ (या वाक्यावरून मला एक खूप जुनी आठवण झाली. ‘मित्राची गोष्ट’ नावाचं मराठी रंगभूमीवरचं लेस्बियनिझम्वरचं एक अतिशय संवेदनशील सुंदर नाटक पूर्वी सादर झालं होतं. त्यात नाटकातला तरुण सूत्रधार आपल्या मैत्रिणीची - सुमित्राची, म्हणजेच मित्राची - गोष्ट सांगत असतो. रंगकर्मी माधव वझे यांनी ‘मित्राच्या मित्राची गोष्ट’ असा अतिशय अर्थगर्भ मथळा देऊन या नाटकातल्या पुरुष-स्त्री, स्त्री-स्त्री यांच्यातल्या तरल नातेसंबंधाचं रसग्रहण केलं होतं. त्याचीच हा लेख वाचताना आठवण झाली. कारण हा लेख म्हणजेही अशीच ‘मित्राच्या मित्राची गोष्ट’ आहे.) या लेखातला शेवटचा परिच्छेद हा आजच्या बहुआयामी तरुण पिढीचा निदर्शक वाटतो. म्हणजे मृत्यू हाही सेलिब्रेट करायचा असतो, हे ओशोचं तत्त्वज्ञान आकळणारा; पण तरीही ‘तो आता शारीर अस्तित्वानं कधीच असणार नाही’ याचं अतीव दुःख होत असूनही त्याच्या आठवणीत बीअर पिणारा! आणि त्यावरची त्याची वाक्यं आहेत, ‘...पण हल्ली नाही रडायला येत. उलट छानच वाटतं. त्याच्या आठवणी भूतकाळात चांगल्या दिवसात घेऊन जातात. त्या उगाळताना मला पुन्हा तरुण होऊन ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं. अगदी आत्ताही... पक्या साल्या वाचतोयस ना? कॉलेज संपल्यावर नोकरीला लागल्यावर पहिल्या पगारात शेट्टीच्या बारमधे बसून दोघांत एक खंबा मारायचा होता. पण तुला साधा एक ट्रेनचा खांबा चुकवता आला नाही. पहिली बीअर कडवट लागते असं सारेच बोलतात रे, पण मला तुझ्या आठवणींत खारट लागली...’
या लेखाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. पहिला क्रमांक मिळाला आहे ‘आँखो में क्या!’ या लेखाला. विषय दिल्यानंतर त्याला अनुलक्षून लिहितानासुद्धा किती वेगळ्याप्रकारे मांडणी करता येते, याचा हा लेख उत्तम नमुना आहे. यात लेखिका म्हणते, ‘गर्दीतल्या चेहर्यांची एक गंमत असते. हे चेहरे स्वतःशी फार प्रामाणिक असतात... कित्येक वेळा व्यक्ती काहीच बोलत नाही. बोलतात ते फक्त डोळे... असे हे डोळे आणि या नजरा... प्रत्येक नजरेमागे एक व्यक्ती. प्रत्येक व्यक्तीमागे एक कथा. प्रत्येक कथेमागे एक आयुष्य. एका नजरेमधे एक आयुष्य, एका आयुष्यामधे मात्र अशा कितीक नजरा.’ शब्दांमधून भावना समर्थपणे व्यक्त करण्याची ताकद या लेखिकेने दाखवली आहे.
तिसरा क्रमांक विभागून दिला आहे ‘ऑ-ईगो’ आणि ‘जनाकाका’ या लेखांना. बक्षीस विभागून देण्यामागचं कारण सुरुवातीलाच स्पष्ट केलं आहे. ‘ऑ-ईगो’ वाचल्यावर ‘भन्नाट’, ‘रजनीकांत’ आणि ' ' अशी माझी प्रतिक्रिया होती. वेगळा विचार करून आणि अतिशय विचारपूर्वक लिहिलेला हा लेख आहे. ‘जनाकाका’ अनेकांच्या आजूबाजूला असणारा, चटका लावणारा! या लेखातली भाषाशैली मला खास भावली. शब्दांच्या जंजाळात न अडकता भावना वाचकापर्यंत पोहोचवण्याचं कसब या लेखकाकडे नक्की आहे.
बक्षीस मिळवलेल्या या चार लेखांव्यतिरिक्त अन्य अकरा लेख ’वाचावेच’ अशा सदरातले आहेत. मी फक्त त्यांचे मथळे देते, कारण लेखक अज्ञातच आहेत. ‘माझा पहिला मित्र’, ‘महाराज’, 'ढवळ्याची गोष्ट', ‘विनीत मोडक’, ‘येडा गोप्या’, ‘भोळ्या सांबाचा हरफनमौला पीर’, ‘एमी’, ‘हाऊस हजबंड... बाबा’, ‘बाईमागच्या बाई- रुक्मिणीबाई’, ‘केइजी ताकाहाशी’ आणि अर्थातच सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला आहे तो ‘चैतन्याचा झरा’. या सर्व लेखकांना मनःपूर्वक धन्यवाद - छान वाचायला दिल्याबद्दल!
काही गोष्टी मला निरीक्षण म्हणून नमूद कराव्याशा वाटतात. ‘ढवळ्याची गोष्ट’ हे खरंतर खूप चांगलं व्यक्तिचित्रण झालंय. पण लिहिताना - आजच्या ‘लिंगो’सारख्या - काही गोष्टी गृहीत धरल्या गेल्या आहेत. कदाचित सगळाच वाचकवर्ग ऑनलाईन वाचणारा आहे, याची कल्पना असल्यामुळे असेल. पण या ऑनलाईन पदवीधर लेखकांना पहिली-दुसरीतला, नव्यानं या माध्यमाशी ओळख झालेला, वाचकही असतो, याचं यापुढे भान ठेवावं लागणार आहे किंवा त्यांनी ते ठेवावं, अशी विनंती. तरीही चांगल्या हलक्याफुलक्या लेखनाचा हा दर्जेदार नमुना आहे.
‘हाऊस हजबंड... बाबा’ हे एक असंच उत्तम असलेलं, परंतु तोकडं व्यक्तिचित्र. माणूस वेगळा असूनही शब्दांत पुरेसा पकडला न गेल्यानं चुटपुट लावणारं. ‘महाराज’ हे एक हटके म्हणता येईल असं नेटकं जमलेलं व्यक्तिचित्रण. अंधश्रद्धा निर्मूलनाची अत्यंत गरजेची आणि योग्य चळवळ लक्षात घेऊनही हे अशा प्रकारच्या माणसांचं प्रत्यक्ष असणं, मनाला खंतावून जातं. ’एमी’ हे व्यक्तिचित्रणही दर्जेदार आहे. व्यक्ती म्हणून ’एमी’चा केलेला विचार सुरेख पद्धतीनं लेखात उतरला आहे.
स्पर्धेचं परीक्षण करताना मराठीच्या शुद्धलेखनाबाबत बोलावं लागतंच. र्हस्व-दीर्घाच्या चुका असतातच. ग्रांथिक मराठी वाक्यं आणि बोली मराठी वाक्यं यांची नेहमी गल्लतशीर सरमिसळ असते. आपलं लिखाण तटस्थपणे आणि त्रयस्थासारखं आपणच वाचून पाहिलं, तर आपल्याच चुका आपल्याला नक्की कळतात. यासंदर्भात उदाहरणादाखल ‘भोळ्या सांबाचा हरफनमौला पीर’ या व्यक्तिचित्राचा उल्लेख करीन. वास्तविक मेहबूब बाबूराव संकेश्वरकर यांच्या आयुष्यातले प्रसंग हृद्य आहेत. परंतु सुरुवातीची मांडणी जर नेटक्या पद्धतीनं झाली असती, तर वेगवेगळ्या वयातल्या व्यक्तीवरचे प्रसंग हे या एकाच माणसाच्या आयुष्यात निरनिराळ्या टप्प्यांवर आले आहेत, हे स्पष्टीकरणाविना समजलं असतं, किंबहुना समजायला हवं. असं होऊ नये म्हणून स्वसंपादन अत्यावश्यक आहे. लेख लिहिल्यानंतर तो दोनतीनदा वाचावा, शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त कराव्या, परिच्छेद योग्य आहेत का, शब्दांचा वापर व्यवस्थित झाला आहे का, आपल्याला जे म्हणायचं आहे, तेच लेखात मांडलं गेलं आहे का, या सगळ्यांच्या विचार करून मगच लेख प्रकाशित करावा.
माणसाची अभिव्यक्त होण्याची गरज ‘मायबोली’ पूर्ण करत आलेलीच आहे. आता दरवर्षी आयोजित होणार्या लेखनस्पर्धांच्या स्वरूपात ती अधिक सकसपणे आणि जबाबदारीनं वाचकांच्या पुढे येत आहे, याबद्दल ‘मायबोली’च्या कल्पक प्रशासनाचे व स्पर्धेच्या संयोजकांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत.
(श्रीमती सुजाता देशमुख या ‘मेनका प्रकाशन’ आणि ‘माहेर’ यांच्या संपादक आहेत.)
अतिशय व्यग्र असूनही या स्पर्धेचं परीक्षण केल्याबद्दल श्रीमती सुजाता देशमुख व श्री. संजय आवटे यांचे मन:पूर्वक आभार.
स्पर्धेच्या विजेत्यांची बक्षिसं प्रायोजित केल्याबद्दल श्री. आशिष पाटकर व मनोविकास प्रकाशन, पुणे, यांचे आम्ही आभारी आहोत.
या स्पर्धेसाठी लेखन करणार्या आणि या लेखांवर भरभरून प्रतिसाद देणार्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. या उपक्रमाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्व मायबोलीकरांना धन्यवाद.
या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास काही अपरिहार्य कारणांमुळे उशीर झाला. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
धन्यवाद.
विजेत्यांचे मनःपूर्वक
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.. +१
फार फार फार आनंद झाला
फार फार फार आनंद झाला
नंदिनी, आशूडी, चमन, रांचो, अतुलजी सर्वांचेच अभिनंदन.
परीक्षकांना धन्यवाद, वाचकांना धन्यवाद, पण सर्वात महत्वाचे म्हणजे जे एकसो एक व्यक्तीचित्रणे आली होती त्यांना धन्यवाद, त्यांच्यातून क्रमांकाची निवड झाली हेच खरे तर फार फार आनंदाचे कारण ..
परीक्षकांनी आपले मनोगत, विचार मांडणे, त्यात आपल्या लेखाबद्दलही दोन चांगले शब्द लिहिणे हे आठवणीत राहावे असे ..
सरतेशेवटी संयोजक... यांचे आभार, अभिनंदन आणि कौतुकही !!
अभिनंदन!
अभिनंदन!
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..
परीक्षकांची मनोगते आवडली!
परीक्षकांची मनोगते आवडली! सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन !!
संजय आवटेंचं अॅनॅलिसिस मस्त
संजय आवटेंचं अॅनॅलिसिस मस्त आहे.
विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचं अभिनंदन.
विजेत्यांचं अभिनंदन. परिक्षकांनी विश्लेषण फार सुंदर केलं आहे.
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन
विजेत्यांचे अभिनंदन
अतुलजी, नंदिनी, तुमचा अभिषेक,
अतुलजी, नंदिनी, तुमचा अभिषेक, आशुडी आणि चमन, तुम्हा सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन!
स्पर्धेचे प्रायोजक मनोविकास प्रकाशन, मायबोली प्रशासन आणि संयोजकांचे अनेक आभार. तुमच्याचमुळे मी लिहीता झालो. अनेकांनी लिहील्या प्रमाणे, श्री. संजय आवटे आणि श्रीमती सुजाता देशमुख यांची मनोगते नितांत सुंदर आणि माझ्या सारख्या नवोदिताला खचीतच मार्गदर्शक आहेत. मनोगतातील लेखांचे संदर्भ निश्चीतपणे लेखकांसाठी उत्साहवर्धक आहेत.
लहान असताना खुप वेळा स्वप्न पडायची, फलंदाजी करताना पहिल्याच बॉलवर सिक्सर मारली आहे किंवा गोलंदाजी करताना पहिल्याच बॉलवर कुणालातरी त्रिफळाचीत केले आहे. पुढे कधीतरी, गोलंदाजी करताना असे घडलेही. तेंव्हा जसा आंनद झालेला, तसेच काहिसे आत्ता जाणवते आहे.
ज्यांनी ज्यांनी लेख वाचुन प्रतिक्रीया दिल्या, उत्साह वाढवला व अभिनंदन केले, त्या सर्वांचे अनेक आभार.
सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक
सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन!
सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन!
.
परीक्षकांची मनोगते आवडली!
परीक्षकांची मनोगते आवडली! सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
परीक्षकांची मनोगतं आवडली.
काही लेख वाचायचे राहिले आहेत ते आता वाचते.
सर्व विजेत्यांचे हार्दिक
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन
मायबोली आणि मनोविकास प्रकाशनाचे मनःपूर्वक आभार.
प्रतिसादकांना धन्यवाद
शोभनाताईंचे खास आभार मानयला हवेत. त्यांनी लिहिण्याचा आग्रह धरला होता.
स्पर्धेत भाग घेणार्या सर्व
स्पर्धेत भाग घेणार्या सर्व स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
परीक्षकांची मनोगते आवडली.
मायबोली आणि मनोविकास प्रकाशनाचे मनःपूर्वक आभार.
विजेत्यांचे
विजेत्यांचे अभिनंदन!
परीक्षकांची मनोगते फार आवडली.
संयोजक, याचे बक्षीस कधी
संयोजक,
याचे बक्षीस कधी मिळणार?
सर्व विजेत्यांच मनापासून
सर्व विजेत्यांच मनापासून अभिनंदन. !!!
सर्व विजेत्यांच मनापासून
सर्व विजेत्यांच मनापासून अभिनंदन. !!!
सर्व विजेत्यांच हार्दिक
सर्व विजेत्यांच हार्दिक अभिनंदन.
तुमचा अभिषेक, पुढच्या
तुमचा अभिषेक,
पुढच्या आठवड्यात तुम्हांला मायबोली प्रशासनाकडून याबाबत इमेल येईल. उशीर झाल्याबद्दल दिलगीर आहोत.
धन्यवाद संयोजक
धन्यवाद संयोजक
अभिनंदन
अभिनंदन
संयोजक, अजुनही बक्षीसा
संयोजक, अजुनही बक्षीसा संदर्भात काहीच कळाले नाही...?
आज भी वही सवाल ... याचे
आज भी वही सवाल ...
याचे बक्षीस कधी मिळणार?
सर्व विजेत्यान्चे हार्दिक
सर्व विजेत्यान्चे हार्दिक अभिनन्दन
Pages