हैदर - एक अश्वत्थामा ? (Movie Review - Haider)

Submitted by रसप on 5 October, 2014 - 03:21

बर्फाचा रंग कोणता ?
पांढरा ?
असेल. पण काश्मीरच्या बर्फाचा रंग लाल आहे. रक्ताचा लाल. १५-२० वर्षांपूर्वीपर्यंत तर काश्मीरचे रस्ते, झाडं, घरं सगळंच लाल होतं. वर्षानुवर्षं, पिढ्यान् पिढ्या धुमसत राहिलेला हा भाग. त्याला नंदनवन म्हणून अभिमानाने शिरपेचातल्या तुऱ्याप्रमाणे मिरवतो आपण, पण ह्या नंदनवनात शांतता व सुरक्षित वातावरण अभावानेच नांदलं. असुरक्षिततेच्या झाडाला असंतोषाची विषारी फळं येत असतात आणि हिंसेच्या उष्ण हवेने बदल्याच्या भयंकर आगी भडकत असतात. हा इतिहास आहे आणि एक वैश्विक सत्यही. पाचही इंद्रियांच्या जाणिवांतून एका निष्पाप मनांत जेव्हा असंतोषाचं विष झिरपतं आणि डोक्यात बदल्याची आग पेट घेते, तेव्हा एक 'हैदर' बनत असतो.

हैदर.
शेक्सपियरच्या सुप्रसिद्ध 'हॅम्लेट'वर आधारलेला आहे, हे आपल्याला माहित असतंच. पण बहुतेकांनी फक्त 'हॅम्लेट' हे नाव ऐकलेलं असतं, त्याचं कथानक काय आहे, हे खरं तर बऱ्याच जणांना माहित नसतं. त्यामुळे 'हैदर' बघत असताना आपण पूर्वतयारीनिशी नसतो. 'हॅम्लेट' ही सत्तेच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेली एक भावनिक व नात्यांची ओढाताण होती. दोन शत्रूराष्ट्रे, त्यातील एकाच्या राजाचा त्याच्याच भावाकडून खून, मग राणीशी त्याने लग्न करणं आणि मग खून झालेल्या राजाच्या मुलाचं परतणं, अश्या वळणांनी 'हॅम्लेट' एका शेक्सपियरियन शोकांतापर्यंत जातं. विशाल भारद्वाजने ह्या कहाणीचे भारतीयीकरण करताना निवडलेली काश्मीरची पार्श्वभूमी 'काश्मीर, १९९५' ह्या इतक्याच शब्दांतून अर्धी कहाणी सांगते. उरतो तो फक्त भारतीय हॅम्लेटचा - 'हैदर'चा - सिस्टीमशी, कुटुंबाशी, मित्रत्वाशी, प्रेमाशी आणि स्वत:शी संघर्ष.

तो नेमका काय व कसा ? हे पडद्यावर बघत असताना काश्मीरचे बर्फाळ पर्वत, झुळझुळ वाहणारी झेलम, लाकडी घरं प्रत्येक फ्रेममध्ये सौंदर्याची भीषणता ठळकपणे दाखवत राहतात. चित्रपट जरासा रेंगाळतो, पण तिथल्या आयुष्याच्या एका मंद तणावपूर्ण गतीशी त्याचं नातं तुटत नाही. तरी एक गाणं व काही दृश्यं वगळता आली असती; हे मात्र नक्कीच.

Haider-movie-collection-prediction.jpeg

सुरुवातीच्या काही चित्रपटांत शाहरुख खानची सही सही नक्कल करणारा शाहीद कपूर हळूहळू एक अभिनेता म्हणून परिपक्व होत जातो आहे. 'हैदर' ही त्याची आजवरची सगळ्यात आव्हानात्मक भूमिका, आणि ती त्याने जीव ओतून साकारली आहे. वेडेपण, संताप, निराशा वगैरे भावना त्याच्या डोळ्यांत पाण्याने रंग बदलावा त्या सहजतेने येतात. हरणारा हैदर साकारणारा शाहीद जिंकला आहे.
श्रद्धा कपूरला फारसा वाव नसला, तरी तिचा वावर आश्वासक आहे. 'एक व्हिलन'मधली तिची छोटीशी भूमिका तिने महत्प्रयासाने मोठी इरिटेटिंग केली होती. पण इथे मात्र विशाल भारद्वाजने तिच्यातली अभिनेत्री हुडकून वर आणली आहे.
इरफान खानची भूमिकाही लहानशी आहे, पण कितीही लहान असला तरी खरा हीरा लक्ष वेधून घेतोच. त्याची भूमिका जरा जास्त हवी होती, अशी चुटपूट मनाला लागते.
के के मेनन हा मला का कुणास ठाऊक पण ह्या काळातला बलराज साहनी वाटत आला आहे. उत्कटतासुद्धा संयतपणे सादर करता येऊ शकते, हे मेननचा अभिनय वारंवार सिद्ध करत आला आहे. हा एक असा अभिनेता आहे, जो कुठल्याही भूमिकेत अगदी सहज फिट्ट बसतो आणि कोणतीही व्यक्तिरेखा ताकदीने उभी करू शकतो. खरं तर, मी 'हैदर' बघण्याचं मुख्य कारण मेनन होता.
तब्बूला बऱ्याच दिवसांनी पडद्यावर पाहिलं आणि क्षणार्धात तिच्यात शबाना आझमीच दिसली. तिची अर्धवट विझलेली नजर चित्रपटभर छळते. तिची व्यक्तिरेखा एका गोंधळलेल्या असुरक्षित व्यक्तीची आहे. जिला नेमकं काय हवं आहे, हेच समजत नसावं आणि हवेवर उडणाऱ्या वाळलेल्या पानाप्रमाणे आयुष्य नेईल तशी स्वत:ची फरफट ती निर्विकारपणे सहन करत असते. हे अतिशय गुंतागुंतीचं भावविश्व तिने समर्थपणे आपलंसं करून प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं आहे.

प्रत्येक चांगल्या कहाणीत एक अव्यक्त, अदृश्य उद्गार असतो. गंगा, यमुनेच्या संगमात सरस्वतीचाही प्रवाह मिसळत असतो, पण तो दिसत नाही. ही सरस्वती ओळखणं आणि तिच्या अदृश्यतेला हात न लावता तिचं अस्तित्व जपणं, कुठल्याही चांगल्या कहाणीला सादर करताना दिग्दर्शकासाठी खूप महत्वाचं असावं. 'हॅम्लेट'मधला अव्यक्त उद्गार विशाल भारद्वाजने ऐकला, समजुन घेतला आणि म्हणूनच 'हैदर' बनला आहे. मध्यंतरानंतरची धीमी गती व काही अनावश्यक दृश्यं हे जर गालबोट मानलं तर This is a monumental effort by Vishal Bhardwaj.

अखेरीस, हैदरच्या वडिलांना असलेलं गझल व शायरीचं वेड, हा भाग एका वेगळ्या अंगाने मस्त फुलवता आला असता. चित्रपटात 'हैदर'च्या तोंडी शायरी मिसिंग वाटली. 'हैदर' ही एक जखम आहे. न भरलेली, न भरणारी. अनेक हैदर अश्वत्थाम्यासारखे अशी एक जखम जपून आहेत आणि ठसठसत असूनही जपलेल्या जखमेतून मूकपणे कविता जन्म घेत असते. हैदरचीही एक कविता असणार, असायला हवी होती.

Having said this, 'हैदर' कदाचित बॉक्स ऑफिसवर कमाल करणार नाही पण चोखंदळ प्रेक्षकासाठी नक्कीच कमाल करेल. सर्वांनी बघावा, असं मी म्हणणार नाही; पण 'सर्वांनी' मध्ये जे स्वत:ला समजत नाहीत, त्यांनी मात्र नक्कीच बघायला हवा.

रेटिंग - * * * *

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलेय रसप. परीक्षणालाही रेटींग ४ स्टार!

के के मेनन बद्दल संपूर्ण सहमत
चित्रपट न पाहताही आपल्या वर्णनातील तब्बू डोळ्यासमोर आली.
शाहीदच्या अभिनयक्षमतेबद्दल मला कधीच शंका नव्हती, उलट त्याला तो किंवा दिग्दर्शक न्याय देत नाही याचे वाईटच वाटायचे. यात त्याने तो दिला असेल तर बघण्यास उत्सुक. या आधीचा त्याचा अभिनेता म्हणून आवडलेला "जब वुई मेट" जो करीनामुळे त्याचा एफर्ट तुलनेत झाकोळला गेला असे वाटते.

असो, एकंदरीत परीक्षण वाचता या चित्रपटासाठी आयुष्यातील अडीज तास खर्च करायला नक्कीच हरकत नसावी. तसेही काश्मीरचे सौंदर्य चित्रपटांत नेहमीच भुरळ घालते.

कशी कोण जाणे मला सतत जाणीव होत राहिली होती की "हैदर" चित्रपटावर रसप यांचे परिक्षण जरूर इथे येणार. ज्याना हॅम्लेट माहीत नाही त्यांच्यासाठी ही नातेसंबंधातील सरमिसळ प्रभावीपणे दाखवायची आहे तर कथानकाची मांडणी अशी करणे गरजेचे आहे की ज्या पार्श्वभूमीवर ते नाट्य उलगडत आहे निदान काही प्रमाणावर तरी तिची माहिती भारतीय प्रेक्षकाला असणे गृहित धरावे लागेल....मग विशाल भारद्वाजने या तिसर्‍या नाटकासाठी निवडला तो धगधगता काश्मिर आणि गेली साठ वर्षे अस्तित्व न संपू शकणारा तो तुझे किती माझे किती हा प्रश्न. त्यात भरडून गेलेली स्थानिक जनता....खरा कोण खोटा कोण....काही समजून येत नाही....हिंसाचारी कोण किती तो कसा आणि का बनला हे प्रश्न काल होत आजही आहेत उद्याही राहतीलच.....पण ते पडद्यावर मांडायचे झाल्यास त्याला कथानकाची डूब दिली गेली पाहिजे....ती विशालला चारशे वर्षापूर्वीच्या हॅम्लेटमध्ये मिळाली....आणि त्याने तिला जे काश्मिरी रुपडे प्रदान केले ते खरोखरीच प्रशंसनीय असेच आहे.

रसप यानी अत्यंत संतुलितपणे या कथेकडे लक्ष देताना...."...सिस्टीमशी, कुटुंबाशी, मित्रत्वाशी, प्रेमाशी आणि स्वत:शी संघर्ष...." या सर्वांनी गुंफले आहे....ते प्रभावीही झाले आहे. गझालाकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसते आणि तब्बू ह्या विलक्षण प्रतिभेच्या कलाकाराने ती साकारलीही आहे तितक्याच ताकदीने....नवर्‍यावर प्रेम आहे ? जरूर आहे....तो करीत असलेले काम....एक डॉक्टर म्हणून, तिला पसंद आहे...? आहेही नाहीही...गोंधळ आहे सारा तिचा....दीर खुर्रम शांत नाही, त्याच्याकडे तिथल्या स्थितीबाबत कायम काहीतरी खदखदत आहे (पण तो टिपिकल व्हीलन नाही...), तरीही त्याच्याविषयी तिला विशेष वाटते ? हो, वाटते...ते प्रेम आहे की नाही हे माहीत नाही...पण त्याच्याशी लग्न ठरल्यावर तिला आनंदही होत असेल. मुलावर तर प्रेम आहेच....इतके की प्रसंगी त्या दुसर्‍या नवर्‍याचेही ती ऐकत नाही..... गर्ट्र्यूड पुरेपूर उतरली आहे गझाला मध्ये...पण ऑफिलिया नाही चमकली अर्शियामध्ये....कथानकाच्या व्यापात विशालचे काहीसे दुर्लक्ष झाले असेल असे मानू या.

ईर्फान खानची भूमिका मूळातच कॅमिओ रुपातील असल्यामुळे रुहजार हे प्रतिकात्मक पात्र त्याला जसे वठवायचे तितके ते उतरले आहे हे तर स्पष्टच आहे....पण मेननचा खुर्रंम अगदी अस्सल....किंबहुना सारा संघर्ष हैदर आणि खुर्रम यांचा मिळूनच पडद्यावर येतो.....काहीही झाले तरी खुर्रम हा पारंपारिक खलनायक अशा तर्‍हेने विशालने रंगविलेला नाही. शाहिद खरोखरी एक सक्षम आणि गुणी कलाकार आहे.....जब वुई मेट नंतर मला आवडलेला हा त्याचा चित्रपट. पंकज कुमारच्या चित्रिकरणाचा (आऊटडोअर शूटिंग) खास उल्लेख करावा लागेल इतक्या देखण्यारितीने ते काम पूर्ण झाले आहे.

रसप यानी अगदी चांगले रेटिंग दिले आहे आणि इथल्या सदस्यांनी विशाल भारद्वाजच्या भारतीय रुपातील हॅम्लेटला जरूर भेट द्यावी.

<<के के मेनन हा मला का कुणास ठाऊक पण ह्या काळातला बलराज साहनी वाटत आला आहे>>

+१ मनापासून सहमत.

मला आवडला हैदर. मधुन मधुन थोडा गोंधळ उडतो पण इन ऑल सुरेख चित्रपट. उत्तम ट्रीटमेंट

अजुन चित्रपट पाहिला नाही
परंतु सोशल मिडीया मधे या चित्रपटाबद्दल बरेच काही चालु आहे
#‎Banhaider‬ ट्रेडिंग आहे. चित्रपटाला विरोध मुख्यतः भारतीय सैन्याविरोधी दाखवण्यात आले आहे तसेच विशाल भारद्वाज यांनी श्री. मोदी यांना मतदान करु नका म्हणुन आवाहन केले होते म्हणुन त्यांचे चित्रपट पाहु नये. असा मेसेज फिरत आहे.

चित्रपटाला विरोध मुख्यतः भारतीय सैन्याविरोधी दाखवण्यात आले आहे<< असे काहीही नाहिये. मुळात चित्रपट सेपरेटिस्ट लोकांच्या विश्वामध्ये घडतो. त्यांच्या दृष्टीकोनातून बघायचा प्रयत्न आहे, दृष्टीकोन बरोबर की चूक हा प्रश्न येत नाही, कारण विषय त्याहून वेगळा आहे. बहुतेकांनी जे अत्याचार दाखवले आहेत ते भारतीय सैन्याचे आहेत असं समजून गोंधळ घालायला सुरूवात केली आहे, पण नीट पाहिलं तर लक्षात येईल की ते अत्याचार काश्मिर स्टेट पोलिसांचे दाखवले आहेत.

चित्रपट एकाच वेळी अनेक पातळ्यांवर घडत असल्यानं सरसकट असा मुद्दा काढून हुल्लडबाजी करणं योग्य नव्हे. हैदरची कथा कश्मिरच्च्या वातावरणामध्येच का घडते.. कारण जो हॅम्लेटचा चिरंतन प्रश्न आहे, या प्रश्नाशी गेले साठ वर्षं काश्मिरी जनता झुंज देते आहे. त्या प्रश्नाचा विशाल त्याच्यापरीनं मागोवा घेतो. ब. या अख्ख्या कहाणीत "सरहदपार" देखील येत नाही. हिंदुस्तानदेखील येत नाही. फक्त आणि फक्त काश्मिर. बाकीच्या राजकारणाचा त्यावर काहीही परिणाम न दाखवता काश्मिरी जनतेचं दैनंदिन आयुष्य यामध्ये येत राहतं.

शेवटच्या प्रसंगासाठी विशालने केलेलं सेटींग अक्षरशः अंगावर येणारं आहे. स्पॉयलवर वॉर्निंग असल्यानं लिहत नाही, पण पांढर्‍या पार्श्वभूमीवरचे रक्ताचे लाल थारोळी, ती धगधगती आग आणि तो हैदर सगळच डोळ्यासमोर तरळत राहतं.

'No bloody militant, dead or alive, is worth my soldier's life.' असा एक डायलॉग आहे.
भारतीय सेनेला कुठेही बदनाम केलेलं नाहीये. सैन्याकडून अत्याचार होतात असे दाखवलेले नाही, तर सततच्या युद्धसदृश परिस्थितीमुळे सामान्यांना सामान्य आयुष्य जगता येत नाही, हे दाखवलं आहे. ते दाखवणं म्हणजे सैन्यावर टीका होत नाही, तर परिस्थितीवर भाष्य होतं.
जे लोक 'ह्या सिनेमात सैन्याला बदनाम केले आहे' वगैरे बोलत असतील, त्यांनी एक तर सिनेमा पाहिलेलाच नाही किंवा ते मूर्ख आहेत.

दिवाकर, मी चित्रपट पाह्यलाय, सोशल मीडीयावरच्या # पेक्षा माझा माझ्या डोळ्याम्वर आणि चित्रपट समजून घेण्याच्या माझ्या कुवतीवर मला जास्त भरोसा आहे.

भारतीय सैन्याला वा कोणत्याही सेनाधिकार्‍याला बदनाम केल्याची किंचितही भावना येत नाही. "अमुक एका प्रसंगी चौकीवरील सैनिक आणि अधिकारी हैदरच्या अंगावर येतात...." अशी एक बालिश वा बेताल प्रतिक्रिया वाचली (मायबोलीवर नव्हे....). ज्याने व जिने केली त्याने/तिने तो चित्रपट न पाहाताच केली असणार हे निश्चित.

प्रसंग असा आहे की, नाक्याच्या प्रवेशद्वारावर सार्‍यांच प्रवेशाची झडती (तपासणीच म्हटले पाहिजे....तरीही लोक झडती म्हणतात तर तेही म्हणतो) घेतली जातेच....त्यातच हैदरची कागदपत्रासोबत "कुठून आलास ?" याला उत्तर तो देतो "अलिगढ....". इथपर्यंत ठीक....पण पुढे सैनिक विचारतो, "कुठे जाणार ?" तर हा उत्तर देतो अगदी थंडपणे, "इस्लामाबाद...". ते उत्तर ऐकताच शेजारचा भारतीय सेनाधिकारी आणि तीनचार सैनिक सजग होतात....आणि हैदर भोवती कोंडाळे करतात. हे बरोबरच आहे ना ? एक व्यक्ती इस्लामाबाद असे उत्तर देते तर सैनिकांनी खोलाची चौकशी करायची नाही का ? त्याला अंगावर येणे म्हणत नाहीत.....पुढच्याच मिनिटाला अर्शिया (ऑफेलिया) घाईघाईने खुलासा करते, "अहो, त्याला अनंतनागला जायचे आहे. त्या गावाला इस्लामाबाद असेही म्हणतात ना...". संपला मुद्दा....हैदरला पास मिळतो....तो आणि अर्शिया घरी निघतात.

यामध्ये ना सर्वसामान्य नागरिकाला त्रास ना मिलिटरीची अरेरावी. नेहमीचा प्रघात. असे असूनही केवळ ऐकीव बातम्यावरून चित्रपटाची जातकुळी निश्चित्त करण्याचा जो एक प्रघात आहे, त्याने चित्रपटनिर्मितीशी बांधलेल्या घटकांवर अन्याय होतो असेच म्हणावे लागेल.

जो हॅम्लेटचा चिरंतन प्रश्न आहे, या प्रश्नाशी गेले साठ वर्षं काश्मिरी जनता झुंज देते आहे हेच मुळात एकूण काश्मीर प्रश्नाचे ओव्हरसिम्प्लीफीकेशन आहे. 'हाफ विडो' अशा स्थितीत पुरुषाची कंपनी शोधणे किंवा पुढील आयुष्याचा विचार करणे हे नैसर्गिक आहे. शिवाय उत्तरेत अनेक जागी पतीच्या भावाशी लग्न करण्याचा रिवाज आहे. तिथे हैदरचा आईवरचा राग फारसा योग्य वाटत नाही. उलट तोच बालिश वाटला. भारतीयकरण करण्याच्या अट्टाहासात मूळ संघर्ष हरवला आणि काश्मीर प्रश्नाबद्दलही फारसे काही हाती आले नाही (विशेषतः आता चित्र बदलत आहे ह्या शेवटच्या क्लेम वरून. खाजवून खरुज काढणे कशाला?). म्हणून रम्य वाटली तरी काश्मीर पार्श्वभूमी पटली नाही.

बाकी सिनेमा आवडलाच. के के बद्दल अगदी सहमत. तब्बू मकबूल पेक्षा फार वेगळी वाटली नाही (मकबूल मध्ये चांगलीच होती). मुलाशी कॉम्प्लेक्स रिलेशनशिप जी मूळ कथेत बोचरी वाटते ती इथे काश्मीर प्रश्नामुळे फारशी बोचरी वाटत नाही. स्ट्रेसफुल सिच्युएशनसमध्ये संस्कारांचा त्याग होऊन वेगळे वर्तन होणे हे हजार लोकांच्या बाबतीत घडते. नथिंग वर्थ डिस्कशन.

*******हा स्पॉईलर वाटू शकतो तेव्हा केअरफूल **********

हाफ विडो' अशा स्थितीत पुरुषाची कंपनी शोधणे किंवा पुढील आयुष्याचा विचार करणे हे नैसर्गिक आहे. >>>> पण त्यांचं प्रेम किंवा पुरूषाची कंपनी शोधणं हे 'हाफ विडो' अवस्थेत गेल्यावर कुठे आहे ? ते आधी पासुनच म्हणजे नवरा जिवंत असतानाच होतं...
आणि शिवाय शाहिदच्या तोंडी वडिलांच्या कबरीवरची फुलही सुकायच्या आधी तू दुसरं लग्न केलस ह्या अर्थाचं वाक्य आहे.. त्याने लग्न कदाचित मान्यही केलं असतं पण ते थोड्या काळाने असतं तर.. त्यामुळे त्याचा राग मला तरी बालिश वाटला नाही.

स्पॉयलर एलर्टः

चं प्रेम किंवा पुरूषाची कंपनी शोधणं हे 'हाफ विडो' अवस्थेत गेल्यावर कुठे आहे ?>>> नवर्‍याच्या मृत्यूची बातमी येण्याआधीच ती चक्क दीराच्या बेडवर झोपलेली दाखवली आहे. त्याही आधी दोघांमध्ये कायमच नाजुक संबंध दाखवलेत. आणी हैदरचा राग आई दुसरं लग्न करते यावर नाही, तो सर्वातगपहिल्यांदा घरी येतो तेव्हाचा सीन आठवा.

नवर्‍याच्या मृत्यूची बातमी येण्याआधीच ती चक्क दीराच्या बेडवर झोपलेली दाखवली आहे. त्याही आधी दोघांमध्ये कायमच नाजुक संबंध दाखवलेत. आणी हैदरचा राग आई दुसरं लग्न करते यावर नाही, तो सर्वातगपहिल्यांदा घरी येतो तेव्हाचा सीन आठवा. >> हे दोन्ही ती हाफ विडो असतानाचे आहेत. त्याच सीनमध्ये मला शाहीदला दोन "हम आपके .."ची तिकिटे काढून द्यावीशी वाटली. १९९५-६ साली नवरा गायब होवून १५ दिवस झाल्यावर पण आईने सुतकी चेहरा करून बसायची अपेक्षा करणारा शिकलेला मुलगा अजीब वाटतो.

ती तिच्या दिरावर आधारासाठी कायम विसंबते (उदा: कुलभूषण भेट) पण त्यावरून ती आधीच एकनिष्ठ नव्हती असा निष्कर्ष मी तरी नाही काढू शकत. शेवटी हैदर तिला स्पष्ट विचारतो तरी ती उत्तर देत नाही. हे मौन आता ओपन टू सर्वार्थसाधनं. प्रेक्षकांना आपापले निष्कर्ष काढू देणे हा चांगला सिनेमा.

बाकी अनेक शतके माहित आहे अशा हॅम्लेटवर बेतलेल्या सिनेमात काय स्पॉयलर! Happy

चित्रपट चांगला आहे. ओंकारा हा करीना, बिपाशा मुळे जरा जास्त कमर्शिअल वाटला होता. मकबूल आवडलाच होता. महत्वाचे म्हणजे शाहीदला अगदी वेळेवर हा ब्रेक मिळाला व त्याने त्या रोल मध्ये स्वतःला अगदी मिळवून टाकले आहे. बॉलिवूड मध्ये असे रोल्सच किती कमी मिळतात. हृतिक रोशनचा डेड एंड पर्फॉरमन्स बघितल्यावर हे प्रकर्षाने जाणवते.

हैदरबद्दलः

प्रत्येक व्यक्तिरेखा ही एक प्रतिक आहे असे समजून बघितल्यास चित्रपटाचा एक वेगळा दृष्टिकोण समोर येइल.

आई : आईची व्यक्तिरेखा हे मदरलँडचे मेटॅफोर आहे. गोंधळलेली. स्वतःचे स्टॅटस नक्की नाही. अर्धी विधवा अर्धी नववधू असे तिच्या मनात आहे. आपल्या मुलांशी ( जनतेशी, स्व. शी तिचे नाते तुटलेले नाही पण स्वार्थामुळे अस्पष्ट झाले आहे. तिचा नाथ गेलेला आहे कायमचा. आता नक्की कोणाशी नाते जमवायचे ह्या संभ्रमात ती आहे. चुका करते व फळे भोगत आहे. कधी इमोशनली मॅनिप्युलेट करते आपल्याच मुलांना. ) राज्यकर्त्यांशी सोयीस्कर पाट लावते पण त्यातही अस्वस्थच आहे. तिला मनःशांती नाही. मरणाच्या जवळ पोहोचलेला तिचा नाथही तिचा न्याय निवाडा देवच करेल असे स्व. ला सांगतो. तिचा नाश करू नकोस तिचे प्राक्तन तीच भोगेल असे ह्यात अध्यार्हुत आहे. मुलावरचे तिचे निस्सीम प्रेम शेवटी तिला निर्णय घेण्यास भाग पाडते. ह्या निर्णयाचा भयानक परिणामही दाखवला आहेच. तबूचा चाळीशी
पलिकडला भकास चेहरा हे फार संयतपणे व्यक्त करतो.

हैदरः हा स्व, स्वतः किंवा मदरलँडवर प्रेम करणारा एक जनतेचा प्रतिनिधी आहे. कशी ही असली तरी तीच त्याची आई. ह्यातून त्या दोघांची सुटका नाही. एका म्युचुअली सेल्फ डिस्ट्रक्टिव नात्यात ते बांधले गेलेले आहेत. तिचा विश्वास घात हा सहन करू शकत नाही. उगीच कोणा वरही विश्वास ठेवू नकोस पक्के अलायन्स करण्या आधी विचार कर असे तो बिस्मिल गाण्यात शेवटाचे अपील करतो. हे नाते धुवट स्वच्छ मध्यमवर्गी नाही. आत्म्याच्या अगदी जवळचे करकचून टाकणारे बंध असतात तसे आहे. तिच्या सौंदर्याने तो मोहित झालेलाच आहे पण तिचे वागणे सहन करू शकत नाही. तिचे स्वतःपुरते पाहणे ही त्याला डाचत राहते.

अर्शिया: हा जनतेच्या मनातला इनोसन्स, भाबडेपणा आहे. पोलिस तिचा पिता, ती ही त्याच्यावर प्रेम करते पण त्याने एका हाताने आपल्याला भरवता भरवता, सुर क्षिततेच्या मोबदल्यात आपला वापर करून घेतला आहे हे समजले की उध्वस्त होते. तिचे कुठेच फिट न होउ शकलेले अस्थायी प्रेम जनतेच्या हाताला बांधून ठेवते पण मग ते काढा, मला अ‍ॅक्षन घ्यायची आहे असा टाहो जनता/ स्व फोडतो आणि ते डिस्कार्ड करतो. शेव्टी हे पूर्ण उसवून नाहिसे होते.

खुर्रमः स्वार्थी, राजकारणी नेतृत्व. जे मातृभूमीस वापरून घेउन तिच्या घराचा नाश करते तिच्या मुलांना देशोधडीस लावायला बघते. स्वतः ची तळी भरते.

रुहदारः रूथलेस मर्सेनरी मानसिकता. जनतेची इमोशनल व्हल्ररेबिलिटी वापरून घेउन ऐन नाजूक क्षणी तिच्या / स्व च्या हाती शस्त्र देते. ही वैश्विक आहे. आत्म्यासारखीच.

सलमानः क्षुद्र, शॉर्ट सायटेड, स्वतःच्या सुखात मग्न असलेले सुपर फिशिअल कल्चर. वास्तवाशी संबंध तोडायला उत्सुक असलेले. स्वतः बद्दलच्या अवास्तव कल्पनांमध्ये रंगणारे.

इर्फानचा एक जेलमधला डायलॉग फार मस्त रेंडर केला आहे त्याने. टु बी ऑर नॉट टु बी चे हिंदीकरण
जास्त गोड वठले आहे. हैदर अर्शिया प्रेम प्रसंग वेळखाउ असला तरी सेन्सिटिवली चित्रित केला आहे. है दरचे अं तर्गत वे ड, परिस्थितीला समजून घेण्यातली असमर्थता आणि जनरल क्रेझीनेस दाखव ण्यात शाहीद जस्ट अबाउट पास होतो पण त्याने निदान प्रयत्न तरी केला आहे. ह्रूतिक रोशनच्या पॅथेटिक ओठ हलवण्या च्या अ‍ॅक्टिंगपेक्षा तरी हा प्रयत्न स्वागतार्ह आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत चांगले आहे. ओरि जिनल का श्मिरी गा णी घेतली आहेत. त्यांचा अर्थ समजला अस ता तर अधिक परिणाम कारक वाटले असते.

शेव्टी आई व अर्शिया ह्यांचा दोघींचा भ्रमनिरास होतो दोघी शुभ्र वस्त्रा बसल्या आहेत. इनोसन्स असा वेडा होत चालला आहे व आपल्याला सोडून जात आहे ह्याचा आईला त्रास होतो आहे. तो ती हताश होउन बघते.
शाहीदचे अनेक सीन्स चांगले वठले आहेत. वडील नक्की गेले आहेत. आता आपण अनाथ ह्या भावनेने तो त्यांना फोटोवरून आयडी करतो व ग्रेव समोर बसतो तो सीन फार परिणामकारक वाटला. आपले भवि श्य आपण च घडवले पाहिजे ह्या जनतेच्या मनातील जाणीवेची ही सुरुवात आहे.

बघा चित्रपट जरूर.

१९९५-६ साली नवरा गायब होवून १५ दिवस झाल्यावर पण आईने सुतकी चेहरा करून बसायची अपेक्षा करणारा शिकलेला मुलगा अजीब वाटतो. >>>> Uhoh पण म्हणून दिराबरोबर गाणी म्हणत नाचाणं अपेक्षित आहे? नॉर्मल केसमध्ये? असो.. Happy

अमा, मस्त पोस्ट आहे. Happy

१९९५-६ साली नवरा गायब होवून १५ दिवस झाल्यावर पण आईने सुतकी चेहरा करून बसायची अपेक्षा करणारा शिकलेला मुलगा अजीब वाटतो. >>>> हिंदू धर्मात नवरा गेल्यास १४ दिवसाचे ऑफिशिअल मोर्निन्ग आहे. इस्लाम मध्ये चार महिने १० दिवस हे आहे. ह्या पिरीअड मध्ये विधवेने तिचे लग्न होउ शकेल अश्या पुरुषाच्या सांन्निध्यात वावरणे निषिद्ध असते. पण तिची तब्येत ख राब झाल्यास डॉक्टर कडे ती जाउ शकते. मी ज्या फॅमिलीज पाहिल्या आहेत तिथे अश्या वेळी तिला फारसे एकटे सोडत नाहीत. एकतरी रिटेनर, दासी, हाताखालची स्त्री त्या मेन मोर्नरच्या जवळ कायम असते. ती अति दु:खाने स्वतः जीव देउ नये, तिला नीट खायला प्यायला द्यावे तिला दु:खाचे उमाळे येतील ते ऐ कून घ्यायला इत्यादि. चित्रपटात मुलगा वडिलांना जास्त अ‍ॅ टेचड दाखवला आहे. त्यांच्या मृत्यू चे/ गायब होण्याचे कळल्यावर आई मुलगा पहिल्यांदा भेटतात तेव्हा तिने अरे माझ्याडोळया देखत तुझ्या बाबाला नेले आपला अधार गेला इत्यादी दु:ख व्यक्त करणे नैसर्गिक होते. तश्या दु:ख कर णार्‍या स्त्रिया कदाचित सीएनएन वर दाखवत नसतील पण अल जझिरा व इतर चॅनेलवर दाखवतात
सर्व वयाच्या स्त्रिया घरातील कर्ता पुरुष / भाउ /मुलगा गेला म्हणून आकांत करत असतात त्यामुले त्या
हिंसेतील निरर्थक पणा कायम अधोरेखित होतो. ह्या प्रसंगातही ती एका दोन क्षणाचा विचार करून मग प्रॉपर रिस्पॉन्स देते तोपर्यंत मुलाच्या लक्षात सर्व प्रकार आलेला आहे. कावेबाज कांगावाखोर इमोशनल मॅनिप्युलेटिव अशी ती स्त्री आहे. मुलगा दूर करायच्या प्रसंगातच तिने खुर्रम शी नेत्र पल्लवी केलेली आहे व नवरा डॉक्टरकीत व्यग्र असल्याने तिच्या आयुष्यात जे रिकामेपण आले आहे ते त्या विचित्र अश्या संबंधातून भरून काढायचा तिचा प्रयत्न आहे.

15 days is too short a time to fill up the loss of a life time partner and start dancing singing unless the character is not fully involved with him in the first place and the son has sensed it at some inner level. Not childish at all.

रसप,

सुंदर परिक्षण !!
नंदिनी ताई आणि अशोक मामा आपले प्रतिसाद फारच उत्तम...
त्यांच्यामुळे अधिक रंगत आली.
चित्रपट नक्की पहांणार

Have we all missed the Oedipus complex shown here? Haidar always had a thing about his mother. That has been clearly shown in many scenes!

अमा, पुन्हा एकदा मस्त पोस्ट.

Have we all missed the Oedipus complex shown here? Haidar always had a thing about his mother. That has been clearly shown in many scenes! >> नाही. इन फॅक्ट मी मुली बरोबर सिनेमा पाहिला. तेव्हा मी तिला आधी म्हणत होते कि खूप हिंसा असेल तुला बघवेल का ? रात्री वाइट स्वप्ने पडतील का इत्यादि. आणि तिने मला सावध केले कि त्यात वरील काँप्लेक्स संबंधाने वर्तन आहे. ते तुला ऑब्जेक्षनेबल वाटू शकते. तू ऑफेंड होशील का? तबू लाल ड्रेस व शॉल घेउन बसलेली असते व तो मागून येतो. ती अत्तर लावत अस्ते. तो क्षण सुरेख आहे. आधीच तबू त्यात अत्तर! और क्या चाहिये. तिची एक स्त्री म्हणून पॉवर बघायची असेल तर रंग दे गाणे बघावे. तक्षक सिनेमातले.

त्या फीलिन्ग मुळेच तर तो आईला पटकन/ कधीच शेअर करू शकत नाही पूर्णपणे.

मुलीने पूर्ण होमवर्क केलेले होते. त्यामुळे कुठे कुठे हॅम्लेट्चे भाग कायकाय आहेत ते सर्व मला सांगितले. पहिल्या भागात बाप एका टेररिस्ट्ला घरी आणतो व लपवतो. तो भाग तिला अ‍ॅन फ्रॅक सारखा वाटला. त्यांना दहावीत शिकायला होते. ह्यामुळे आम्ही होलोकॉस्ट, एथ्निक क्लीन्सिन्ग वगैरे वर खूप चर्चा केलेली होती तेव्हा. हे इंटरप्रिटेशन विशाल भारद्वाज ह्यांनाही अपेक्षित नसेल. व आमचे पूर्ण वैयक्तिक मत आहे. कृपया गैरसमज करून घेउ नये.

क्रॅक डाउन होतो तेव्हा सर्व आपले कार्ड घेउन लायनीने बाहेर येतात तेव्हा पण होलोकॉस्ट ची आठ्वण येते. हैदर एकाठिकाणी म्हणतो सर्व स्टेट्च एक कैदखाना झाले आहे. तेव्हा देखील् शिवाय चुट्झ्पा!!!!

जळून गेलेल्या घरात हैदर बाबांचे बूट पॉलिश करत बसतो हा बारका सीन फार हृद्य आहे.

अमा, तुमच्याविषयी म्हटले नाही.>> नाही नाही माझा तसा गैरसमज झाला नाही. ते वैयक्तिक मताचे मी होलोकॉस्ट बद्दल लिहिले आहे.( कारण आधीच विषय सेन्सिटिव आहे उगीच भलते वळण लागायला नको. ) मला उलट असले काँप्लेस व इतर वार्प्ड बिहेविअर फार इंट्रेस्टिन्ग वाटते. साधे सरळ जीवनप्रवाहच मला बोअरिन्ग वाट्तात. म्हणून लिहीले. जिथे लोक नॉर्मल्सीच्या बाउंड्रीज तोडतात तिथेच नाट्य घडते. आप लिखो बिनधास्त.

Pages