आयुष्य खरवडत बसतो .....

Submitted by वैवकु on 4 October, 2014 - 14:09

आयुष्य खरवडत बसतो तो बिनकामा आहे मी
हॄदयात जखम झालेला अश्वत्थामा आहे मी

यासाठी मी आजोळी दत्तक गेलेलो नाही
हासून लोक म्हणतिल की माझा मामा आहे मी

ह्या मनातल्या कुस्तीची चितपट होणारच नाही
माझा गूंगा आहे.. 'मी' माझा गामा आहे.. 'मी'

इवलीच मदत करणारी खारुंडी फेमस झाली
कोठेच दखल नसलेला सैनिक , रामा आहे मी

माझ्याच वळचणीवर का पारवे हुंदके देती
काय ह्या मुहल्ल्यामधली पडकी जामा आहे मी

रडणार्‍या लोकांवर मी आनंद उधळतो माझा
जणु मंगळवेढ्याचा तो हळवा दामा आहे मी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगळे काफिये व त्याबरहुकूम वेगळेच खयाल असलेली गझल! एक दोन संदर्भ माहीतच नसल्याने नीट आस्वाद घेता आला नाही. त्याशिवाय, काही ठिकाणी गांभीर्य किंचित कमी झाल्यासारखे वाटून गेले. पण पुन्हा नीट वाचून बघेन कारण तुम्ही उगाचच काहीतरी लिहायचा नाहीत हे माहीत आहे.

माझ्याच वळचणीवर का पारवे हुंदके देती
काय ह्या मुहल्ल्यामधली पडकी जामा आहे मी<<< हा शेर तूर्त आवडला आहे.

प्रतिसादामुळे वाईट वाटल्यास क्षमस्व!

धन्यवाद बेफीजी

आजकाल अनेक जण काफिया आधी योजून गझल रचण्याच्या शैलीचा अक्षरशः दुस्वास वगैरे करत आंतरजालावर फिरत आहेत आणि हे लोण बर्‍याच वेगाने पसरत आहे . मग शेर खरोखरच चांगला होता का हे कोणी पाहत नाही . लोक ह्या शैलीला तुच्छ वगैरे समजतात अगदी असे माझे निरीक्षण आहे. जाणून बुजून मग अश्या गझल वाचायच्याच नाहीत वाचल्या तर उणीदुणी काढायची असा प्रकार आंतरजालावर अनेक ठिकाणी सुरू आहे काही प्रस्थापित गझलकार ह्यात अग्रणी आहेत . अगदी प्लानिंगफुल्ली हा प्रकार सुरू आहे .
असो
बाकी ह्या रचनेला खूप पसंत केले जाईल अशी अपेक्षा मलातरी नाहीच पण कुणाला आवडलीच तर मला मनाला बरे वाटावे म्हणून सादर केली .

धन्यवाद

काही संदर्भ :
गामा आणि गूंगा : स्वातंत्र्यपूर्व काळातील कालजयी कीर्ती लाभलेले प्रतिस्पर्धी मल्ल . जणू क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन , हॉकीत ध्यानचंद फूटबॉलमध्ये पेले . (दोघातही गामा अधिकच महान मल्ल . अजेय निव्वळ अजेय !! विकिपीडीयावर माहिती मिळेलच )

दामा : संत दामाजी .मंगळवेढा . बीदरच्या सुलताना दरबारी असलेले दयावान अधिकारी भीषण दु:ष्काळात जनतेसाठी धान्याची कोठारेच्या कोठारे रिती केली

भामा : सत्यभामा .कृष्णपत्नी . रुक्मिणीची सवत . इंद्राच्या दरबारातला पारिजात रुक्मिणीने कृष्णाकडे हट्ट करून आपल्या दारी लावून घेतला पण फुले सत्यभामेच्या दारात पडत अशी आख्यायिका आहे

दत्तकविधानाचा शेर : नॉस्टॅल्जिया !! आई माझ्या आजीचे एकुलते एक आपत्य मला दत्तक घ्यायचे ठरले माझ्या बालमनाला फारसे काही कळत नसे पण मनात विचार येत जे शेरात मांडले आहेत.. पुढे धर्मसिंधु ने मदत केली . आईला मी मुलगा म्हणून एकुलता असल्याने विधी टळला . (पण इस्टेट मला मिळालीच Happy )

>>>आजकाल अनेक जण काफिया आधी योजून गझल रचण्याच्या शैलीचा अक्षरशः दुस्वास वगैरे करत आंतरजालावर फिरत आहेत आणि हे लोण बर्‍याच वेगाने पसरत आहे . मग शेर खरोखरच चांगला होता का हे कोणी पाहत नाही . लोक ह्या शैलीला तुच्छ वगैरे समजतात अगदी असे माझे निरीक्षण आहे. जाणून बुजून मग अश्या गझल वाचायच्याच नाहीत वाचल्या तर उणीदुणी काढायची असा प्रकार आंतरजालावर अनेक ठिकाणी सुरू आहे काही प्रस्थापित गझलकार ह्यात अग्रणी आहेत . अगदी प्लानिंगफुल्ली हा प्रकार सुरू आहे .<<<

अनुमोदन

छान

<< माझ्याच वळचणीवर...>> आवडला.
गामा - गुंगातील खयालही छान.

शेवटच्या शेरात संदर्भ चुकलाय बहुधा.
प्राजक्त सत्यभामेने आपल्या दारी मागून घेतला पण फुले रुक्मिणीच्या दारात पडत.

प्राजक्त सत्यभामेने आपल्या दारी मागून घेतला पण
फुले रुक्मिणीच्या दारात पडत.<<< अनुमोदन .

ग्रेसांची रचना (कृष्णएकांत) --

तिच्या अंगणातील प्राजक्त बंदी
तरी सत्यभामे ढळे तोल का ?
झाडाप्रमाणे असे झाड हेही
असे सांगते ती ,तरी हुंदका ?

अरेच्चा ! पारिजाताच्या शेरात संदर्भ कसा काय चुकला माहीत नाही . मला ती गोष्ट चुकीची सांगणार्‍याला शोधावे लागेल आता
असो
हा शेरच उडवावा लागणारय मला . कारण बदल करावासाच वाटत नाही आहे इतका मझामला तरी तो शेर आवडून बसलाय . अश्यावेळी बदल करण्यापेक्षा शेर उडवणे परवडेल

बाय द वे मला 'तो' पारिजात असे म्हणताना विठ्ठल अपेक्षित होता . ही ओळ मला भटांच्या>>>> उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे << ह्या ओळीवरून सुचली त्यातल्या उभा हा शब्द मी कुठेतरी विठ्ठलाशी जोडून पाहिला होता असे आता स्मरते आहे . माझ्या ओळीतला प्रियतम हा शब्द प्रिय हूनही प्रिय ह्या अर्थाने मी योजला आहे .

असो

आता हा शेर कटाप !

अंगणी उभा रखमेच्या पण माझ्या दारी वर्षा
"तो" पारिजात लुटणारी प्रियतम भामा आहे मी

योग्य मार्गदर्शनासाठी सर्वांचे आभार

माझ्याच वळचणीवर का पारवे हुंदके देती
काय ह्या मुहल्ल्यामधली पडकी जामा आहे मी >>> वा ! .... हा सर्वात विशेष वाटला.
(इथे 'जामा' असे अवतरणात हवे होते का असे वाटले. अर्थात ते तसे नसूनही संदर्भ नक्कीच कळला.)

इवलीच मदत करणारी खारुंडी फेमस झाली
कोठेच दखल नसलेला सैनिक , रामा आहे मी >>> यातला खयाल मस्त आहे.
'रामा'चा संदर्भ लागला नाही.
(सध्या 'अनाम' असा अर्थ समजला आहे.)

गझल आवडलीच , संदर्भ वाचल्यावर आकलन करणे जमले..गामा आणि दामा चे

Happy

धन्यवाद

बर्याच दिवसांनी तुमच्या गझला (दोन) वाचायला मिळाल्या

Happy

वाह..अलग खयाल अलग काफिये..
अश्वस्थामा,जामा,दामा हे शेर आवडले नी कळालेही...बाकीच्यांचा संदर्भ लागल्यावर तेही आवडतीलच..

अरेवा..संदर्भ दिलेत तर वर..ते वाचलेच नाही...हं...
छान..पण गामा पेक्षा मला भामावाला आवडला...दत्तकवाला जरा अवघडलाच..!

वेगळा अंदाज आहे, विशेषत: पहिल्या दोन शेरांत.प्रयोगशील असावेच.
@ उल्हासजी, '''रामा'चा संदर्भ लागला नाही''- रामाला उद्देशून तो सैनिक तसं म्हणतोय..

धन्यवाद जोशी , शिंदे ,
उकाका , भारतीताई धन्स (उकाका भारतीताईंनी रामा चा संदर्भ बरोबर सांगीतला आहे तो लक्षात घ्या )
अगाधा धन्यवाद रे