अवघ्या पंढरीचा नाथ

Submitted by नभ on 4 October, 2014 - 10:36

माझा देव पांडुरंग
त्याची काय सांगू शोभा,
राही ठेवून कर-कटी
युगे अठ्ठाविस उभा

मुर्ति गोजिरी तयाची
रुपे दिससी सावळा,
घाली रिंगणात पिंगा
भक्तासंगे चाले मेळा

झाला वैकुंठ पंढरीचा
उभा स्वर्ग या भूमीत,
अतुलित त्याचि शोभा
नाही मावत शब्दात

संत ज्ञानेश्वर, तुका
संगे जनी, नामा, चोखा,
दिंडी चालतसे पुढे
मागे चाले बंधु सखा

घाट चालतसे दिंडी
सोबतीला हरि नाम,
हरि भेटीने झिंगली
झाली भक्त बेभाम

उभा गाभार्यात श्रीरंग
संगे उभी रखुमाई,
मागे सोडुन सोयरे
वाट भक्तांची तो पाही

घडे अद्भूत रिंगण
धावे भेटण्या माधवा,
निघे तोडीत बंधने
चाले भक्तांचा तो थवा

दृष्टादृष्ट घडताच
लागे आल्हदिक मना,
चिंता दु:ख ते सरती
श्यामल पाहुनी लोचना

गजर करीत नामाचा
पुढे चालतसे वारी,
अवघी दुम दुमे नादाने
माझे माहेर पंढरी

टाळी संगे मृदुंग बोले,
संगे बोले एकतारी,
एका मुखाने गजर
जय जय रामकृष्ण हरी

वर्षवात या भक्तीच्या
भिजलेले अंतरंग,
भक्तासंगे रिंगणात
खेळे भक्तांचा श्रीरंग

जगण्यास आता झाली
वारकर्यांसी हि साथ,
भक्त भक्तांचा तो झाला
अवघ्या पंढरीचा नाथ……. अवघ्या पंढरीचा नाथ.........

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users