अनुवाद अनुभव

Submitted by काळेकाकू on 2 October, 2014 - 08:11

मंडळी, नमस्कार!

नेटवर गुगलिंग करता करता एक दिवस मायबोलीशी परिचय झाला आणि मी त्यावरच्या लेखनाच्या प्रेमातच पडले. विशेष करून चिनूक्स, नंदिनी, दाद, दिनेशदा यांचं लिखाण जास्त भावलं. म्हणून मग मायबोलीची सभासद व्हायचं ठरवलं. मी तशी खूपच नवीन आहे; पण तुम्ही मंडळी सांभाळून घ्यालच!
तर आता या धाग्याबद्दल... आपण बर्‍याच वेळा अनुवादित पुस्तकं वाचतो. काही अनुवाद छान जमून येतात, तर काही अगदी फसलेले असतात. माझ्या मते शब्दश: केलेले अनुवाद बहुधा फसतात. उदाहरण म्हणजे अनिल किणीकरांनी केलेला उमराव जानचा अनुवाद किंवा ग्रंथालीने हल्लीच प्रकाशित केलेला गुलजारांच्या कवितांचा अनुवाद. अशा वेळी मूळ साहित्यातील त्या विशिष्ट परिवेषातील शब्दांना न्याय मिळत नाही. म्हणून भावानुवाद किंवा स्वैर अनुवाद हे पर्याय योग्य वाटतात. अर्थात हे माझं मत. तुम्ही तुमचंही मत मांडा. उत्तम अनुवादित पुस्तकांवरही चर्चा होऊद्या. कोणाला यातून नव्याने अनुवादाची प्रेरणा मिळाली, तर उत्तमच.
माझ्या माहितीत एका मॅडमनी रॉय किणीकरांच्या उत्तररात्र चा हिन्दी अनुवाद केला आहे आणि आणखी एका काकूंनी कबीराच्या दोह्यांचा अगदी ओवीबद्ध अनुवाद केला आहे. असं काही तुम्हा मंडळींच्या पोतडीत असेल, तर तेही येऊ दे इथे...
फिर हो जाओ शुरू....

तुमचीच काळेकाकू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार काळेकाकू,
तूम्ही वाचू आनंदे या ग्रूपचे सदस्य व्हा आणि हा धागाही त्या ग्रुपखाली हलवा, म्हणजे योग्य सभासदापर्यंत पोहोचेल.
अनुवादीत पुस्तकांचा अनुभव तितकासा चांगला नाही माझाही.. खास करून मराठीतल्या रुढ वाक्यरचनांचा विचार केला नाही तर असे होते. पसंत करतो, खुप सारे, जो कि नंतर तिचा नवरा झाला.. अश्या वाक्यरचना मला मराठीत खटकतात.

अनुवाद कसा असावा याचे उत्तम उदाहरण काही दिवसापूर्वी whatsapp मध्ये आलेल्या संदेशात कळते.
१९७६ सालच्या साहित्य संमेलनात साहीर लुधियानवी यांना कवी संमेलनाच्या व्यासपीठावर आमंत्रित केले होते. त्यांनी सूत्रसंचालक पु.ल. देशपांडे ह्यांना विनंती केली, त्यांच्या कवितेचं कुणीतरी भाषांतर करावे. पु.ल.नी ग.दि.माडगुळकरांना व्यासपीठावर बोलावून भाषांतराची जबाबदारी सोपवली आणि बरोबर एक अट घातली - "रूपांतरात असा एक मराठी शब्द हवा ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही."
साहीरजींचा शेर -
एक बात कहू राजा किसीसे ना कहिओं जी,
एक बात कहू राजा किसीसे ना कहिओं जी,
रातभर रहिओ सबेरे चले जईयो जी|
सेजिओ पे दिया जलाना हराम है,
खुशियों मे जलनेवालोंका क्या काम है?
अंधेरेमे रेह के जड़ाओ मजा पियो जी,
रातभर रहिओ सबेरे चले जईयो जी|

गदिमांचे रुपांतर -
एक अर्ज सुना दिलवरा मनीचं मनी ठेवा जी,
एक अर्ज सुना दिलवरा मनीचं मनी ठेवा जी,
ओ रातभर तुम्ही राव्हा झुन्झुरता तुम्ही जावा जी.
सेजेशी समई मी लावू कशाला?
जुळत्या जीवालागी जळती कशाला?
अंधार्या राती इष्काची मजा घ्यावी जी,
रातभर तुम्ही राव्हा झुन्झुरता तुम्ही जावा जी.

ह्याच्याही वरची कडी म्हणजे पुलंनी त्याचवेळी पेटी मागवली आणि तिथल्या तिथे हे चालीत गाऊन दाखवले!! Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी!
गुलजारजींची एक त्रिवेणी आणि तिचा मी केलेला अनुवाद इथे देत आहे.
उठके जाते हुए पन्छीनें बस इतना ही देखा था
देर तक हाथ हिलाती रही वो शाख फिजा में
अलविदा कहनेंको की पास बुलाने के लिये.......

पंख पसरुनि उडून जाता, इतकेच दिसले त्या पाखरां
किती वेळ तरी हलवत होती फांदी आपला पर्णपिसारा
हा झाडाचा निरोप होता, की परतून येण्याचा इशारा?

गुलजार यांच्या 'देवडी'चा अंबरीश मिश्र यांनी केलेला अनुवाद
पाडस : राम पटवर्धन : The yearling चा अनुवाद.
शांताबाईंचा 'पाण्यावरल्या पाकळ्या' हा अनुवादित हायकूंचा संग्रह

शांताबाईंनीच केलेला गुलजारच्या त्रिवेणीचा अनुवाद तितकासा नाही आवडला.

अनुवादाच्या संदर्भात एक फ्रेंच उक्ती प्रसिद्ध आहे :

भाषांतरे आणि बायका एक आकर्षक तरी असतात, किंवा एकनिष्ठ तरी असतात - दोन्ही असणे कठीण!